व्हिस्टल ब्लोअर-११(अंतिम)

Submitted by मोहिनी१२३ on 24 August, 2021 - 13:27

भाग-१: https://www.maayboli.com/node/77210
भाग-७: https://www.maayboli.com/node/77860
भाग-९: https://www.maayboli.com/node/78368
बाकी भागांच्या लिंक्स त्याच्या आधीच्या भागाच्या शेवटी आहेत.

आधीचा भाग:https://www.maayboli.com/node/78425

शिशिरने आता त्वरित पावलं उचलायला सुरूवात केली. त्यादिवशी संध्द्याकाळी त्याचा स्कॅाटशी तब्बल तासभर कॅाल सुरू होता. एकंदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आल्याने स्कॅाटनेही त्याला पुरेसा वेळ दिला होता. नजीकच्या काळातील तातडीचे उपाय म्हणून कल्पनावर दबावतंत्राचा वापर करणं, तिला कोणाचंही डायरेक्ट रिपोर्टिंग न ठेवणं,त्या मुलांना प्रोत्साहनपर,धीराची वागणूक देणं अशा बर्याच पर्यायांची चर्चा झाली. सर्वसमावेशक ग्लोबल पॅालिसी बनवायची गरज अधोरेखित झाली होतीच. पण त्यासाठी पुरेसा वेळ देणं गरजेचं होतं.

शिशिरने सर्वात प्रथम आनंद आणि अमितला बोलावून घेतलं आणि त्यांना अशी वागणूक आत्तापर्यंत सहन करावी लागली याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्या कौशल्य,अनुभव यांचा विचार करून दुसर्या कोणत्या टिम/प्रोजेक्ट मध्ये त्यांना जाता येईल याची चाचपणी सुरू केली. त्यांनाही त्यांच्या नेटवर्किंगचा वापर करून पुण्यात,भारतात किंवा विदेशात त्यांना योग्य असं प्रोजेक्ट शोधायला उत्तेजन दिले. त्यांना आहे त्या प्रोजेक्टमध्ये थांबायचा पर्यायही उपलब्ध होताच.त्यांना कोणत्या प्रकारच्या समुपदेशनाची गरज आहे का ही चाचपणी केली.

खरं तर कल्पनाच्या वागण्याला वैतागून त्यांनी ॲालरेडी बाहेर जॅाब बघायला सुरूवात केली होती. केवळ चांगली ॲाफर मिळत नाहीयं म्हणून ते थांबले होते. शिशिरच्या बोलण्याने त्यांना आपली दखल घेतल्यासारखे वाटले आणि नव्या उमेदीने ते कामाला लागले. आहे ते काम करतानाच वेगळ्या टिममध्ये जाण्याकरिता मोर्चेबांधणीही त्यांनी सुरू केली. यावेळी आगीतून फुफाट्यात पडायला नको म्हणून स्री मॅनेजर नको असा त्यांचा एक मुख्य निकष होता.हे शिशिरच्या जेव्हा लक्षात आले तेव्हा त्याने आनंद व अमितची कानउघाडणी केली आणि अशा एकांगी निकषांमुळे त्यांचेच नुकसान होण्याची शक्यता आहे हेही समजावून सांगितले.

पॅालिसी तयार होईस्तोवर शिशिर गप्प बसणार नव्हता. त्याने कल्पनाला बोलावून चांगलेच फैलावर घेतले. प्रथम कल्पना आरोप मान्य करायला तयारच नव्हती. नंतर तिला शिशिरने पुरावे दाखवल्यावर मात्र ती वरमली.शिशिरने तिला त्यांची लेखी माफी मागायला सांगितले. आणि ती असे का वागते याची सहानुभूतीपुर्वक पृच्छाही केली. आधी कल्पना ताठ्याने वागत होती. पण शिशिरचे संवेदनाक्षम बोलणे ऐकून तिचा बांध फुटला आणि ती भडाभडा बोलू लागली. शिशिरला तिचे बोलणे ऐकून वाईटही वाटले आणि तिला एका चांगल्या मानसोपचार तज्ञाची गरज आहे हे ही जाणवले.

पुढे गोष्टी झपाट्याने बदलत गेल्या. कंपनीमधील आणि बाहेरील अनेक तज्ञांच्या योगदानामुळे सर्वसमावेशक अशी शोषण पॅालिसी अस्तित्वात आली. त्याच्या आधारे कल्पनावर कारवाई करण्यात आली. लेखी माफी मागणे,२ वर्षे demotion,२ वर्षे सबळ कारणाशिवाय कंपनी सोडायला मनाई असं त्या कारवाईचे स्वरूप होते. आनंद आणि अमितला कंपनीकडून घसघशीत नुकसान भरपाईही मिळाली. कल्पना, आनंद,अमित या तिघांसाठी समुपदेशकांची काही सत्रंही योजण्यात आली. आनंद आणि अमितला दुसरे चांगले प्रोजेक्ट लवकरच मिळाले.

आणि त्याच वर्षी सुरू झालेला पहिला “Whistle Blower Of the Year” हा पुरस्कार नेहाला मिळाला.

समाप्त.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंतिम भाग टाकायला खूपच उशीर झाला त्याबद्दल मनापासून दिलगीर आहे.सर्वांच्या अभिप्राय आणि शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद.

चांगले झालेत सगळे भाग. मी पहिले एकदोन वाचले होते. आज सगळे वाचले.
एक शंका - अमित आणि आनंद कल्पनाविरुद्ध तक्रार करतात का?

मालिका यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल आभार Happy
चांगले लिखाण.
आता पुढच्या लेखाची वाट बघत आहे.

शेवट आवडला... ओव्हरऑल कथा चांगली झाली आहे.

कल्पनाला २ वर्षे सबळ कारणाशिवाय कंपनी सोडायला मनाई हे पटले नाही. अश्या केसेस मध्ये तर पहिल्यांदा बाहेरचा रस्ता दाखवतात भले तो/ती कितीही महत्वाचे असतील तरी....

पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. नाहीतर ते लायब्ररीतून पुस्तक आणावं नि कुणीतरी शेवटची ६ पाने फाडलेली असावी तसं होतं. छान झाली मालिका, नेहमीपेक्षा वेगळी गोष्ट.

धन्यवाद योगी९००,सीमंतिनी.
योगी९००-हो,बरोबर. पण ती दुखावल्या/डिवचल्या परिस्थितीत बाहेर पडली असती तर कंपनीला अपाय पोचवू शकली असती.म्हणून हे कलम.
सीमंतिनी-मला फिसकन् हसूच आले तुमचा प्रतिसाद वाचून.बरोबर आहे तुमचं.

ही मालिका मी पूर्ण वाचली.आवडली.त्याच बरोबर थोडे प्रश्न पण आले मनात.(लिखाण प्रभावी आहेच.)
1. ऑफिसमध्ये इनऍप्रोप्रियेट स्पर्श वगैरे असे वागणारी मंडळी बऱ्यापैकी जपून असतात.या गोष्टी बंद केबिन, स्टेअर वॉल किंवा सीसीटीव्ही फुटेज नसेल अश्या जागा बघून केल्या जातात.
2. या केस मध्ये आनंद आणि अमित ने त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल विचारल्यावर नीट खरं सांगितलं.काही ठिकाणी कल्पना ने आनंद अमित वर उलटे आरोप करणे, किंवा कल्पनाने आनंद अमित ला चांगले प्रमोशन्स, इतर पर्क चे आमिष देऊन सगळ्यांनी मिळून व्हीसल ब्लॉअर ला खोटे ठरवणे, कंपनीला कल्पना अत्यंत महत्वाची,टेक्निकली स्ट्रॉंग आणि आनंद अमित गेल्यास सहज रिप्लेसमेंट मिळणे शक्य असे असल्यास आनंद अमित ला पूर्ण वेगळ्या प्रोजेक्ट्स वर बदली आणि कल्पनाला एक तंबी देऊन नीट निरीक्षणाखाली ठेवणे आणि तिची नोकरी चालू ठेवणे ही कॉम्बिनेशनस पण होतात.

एक कथा आणि 'असे व्हावे' या दृष्टीने ही मालिका आवडली.

धन्यवाद अनू ,विस्तृत आणि बारकावे टिपणार्या प्रतिसादाबद्दल.
मुद्दा १- होय,बरोबर आहे तुमचे. हळूहळू भीड चेपते. आणि मग खुलेआम हे प्रकार घडायला लागतात.
मुद्दा-२-हो १००%. तुम्ही म्हणता तसं अगदीच घडू शकलं असतं.तुम्ही सुचवलेला शेवटचा पर्याय कंपनीने साधारणपणे निवडला.

सर्वांना परत एकदा खूप धन्यवाद.

छान झाली कथा...!!
छान लिहिली आहे...
पुढील लेखनास शुभेच्छा ...!

धन्यवाद रूपाली.
तुझ्या,अनूच्या नवीन लेख/कथेची आतुरतेने वाट पहातीय.
सीमंतिनी-तुमच्या पंधराशे हॅरिसनचा पुढचा भाग येऊ देत ना.फारच मस्त आहे ही सिरीज.

आज अंतिम भाग आला असे दिसल्यावर पूर्ण कथा सलग वाचून काढली. आणि त्यामुळे जास्त आवडली.
HR डिपार्टमेंट एवढे कार्यतत्पर बघून छान वाटले. फँटसी असल्यासारखे.
तुम्ही चिकाटीने ही कथा पूर्ण केलीत त्यासाठी तुमचे कौतुक वाटते.
पुलेशु.

धन्यवाद एस,अंकु.
तुमच्या शुभेच्छा/मतांमुळे छान वाटले.

त्याने कल्पनाला बोलावून चांगलेच फैलावर घेतले. >> ऑफिशिअल ऑथोरिटीमध्ये असे कुणाला फैलावर वगैरे घेऊ शकत नाही. ईन्वेस्टिगेशनमध्ये काय कळाले आणि कंपनी मॅनेजमेंटला काय वाटते आणि तिने काय ठरवले आहे (पॉलिसी नसली तरी) ते सांगतात नंतर जी काही अ‍ॅक्शन वगैरे घ्यायची असेल ती शांतपणे घेतात. फैलावर घेतले म्हणजे प्रिज्युडिस अंतर्गत अ‍ॅक्शन घेतली असे म्हणायला वाव राहतो.

आणि त्याच वर्षी सुरू झालेला पहिला “Whistle Blower Of the Year” हा पुरस्कार नेहाला मिळाला. >> Whistle Blower Of the Year पुरस्कार ?? असे कुठे असते?
असे झाले तर नेहाला रिटॅलिएशन होऊ नये म्हणून कंपनीला नवीन पॉलिसी लिहायला घ्यावी लागेल.
किंवा शोषण प्रकरणाची वाच्यता झाल्याने कल्पनाला ईतरांकडून मानहानीकारक/ तुटक वागणूक मिळू शकते, जी कंपनी कल्चर आणि परफॉर्मन्स साठी आजिबात हेल्दी नाही. शक्यतो राँग डुईंग सिद्ध झाल्यानंतर सदर व्यक्तीला कंपनीत कार्यरत ठेवणे हितावह नसते. भले त्यांनाही जाण्यासाठी काँपेसेशन द्यावे लागले तरी ते सुद्धा करतात. कल्पनाने ईतरांच्या ह्या वागणुकीविरूद्ध तक्रार केली तर त्याची दखल घेणेसुद्धा कंपनीला भाग पडेल. कल्पनाही चिडून जाऊन काहीतरी डिस्ट्रक्टिव करण्याचा धोका असतोच.
आणि नेहाकडून कुठेही ह्या प्रसंगाची वाच्यता करणार नाही म्हणून लिहून नाही का घेणार? ऊद्या नेहाला मनासारखे प्रमोशन नाही मिळाले आणि तिने मी शोषण प्रकरणावरून मिडिया मध्ये जाईल अशी धमकी दिली तर?
Whistle Blower ची आयडेंटिटी गुप्त ठेवणे हे केसमध्ये ईन्वॉल्व्ह असलेल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. अमित आणि आनंदने कल्पनाविरूद्ध तक्रार करून ती साबित झाली असती तर गोष्ट वेगळी.

माफ करा जरा जास्त लिहिल्या गेले पण शेवटच्या भागाकडून जास्त अपेक्षा होत्या.

धन्यवाद अश्विनी, तुमच्या दीर्घ आणि परखड प्रतिसादाबद्दल.
हो असंही असू शकतं.
मी एवढेच म्हणेन की सत्य हे बर्याच वेळा कल्पितापेक्षा वेगळे आणि विचित्र असते. “असं कुठे असते का?” म्हणेम्हणेस्तोवर अशा गोष्टी घडतात.

धन्यवाद वर्णिता,मेघना.

HR डिपार्टमेंट एवढे कार्यतत्पर बघून छान वाटले. फँटसी असल्यासारखे.>> HR म्हणजे कोण हो,आपल्यातीलच कोणतरी.
बरे-वाईट लोक सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये असतात.अर्थात HR मध्ये संवेदनाशील लोक असतील तर जाणवण्याइतपत फरक पडतो हे मात्र खरे.

काही जण कथेला कथेसारखं पाहायला कधी शिकणार ?

हे असं कसं असू शकत?
तिकडे अस नाही अस्सचं असतं!
त्याने असा का विचार नाही केला? मग तिने हे का नाही केलं?

कुठल्याही बाबतीत हजारो शक्यता असतात ना, मग सोडा ना लेखक / लेखिकेचं लेखनस्वातंत्र्य म्हणून.

धन्यवाद आसा.अशाने चर्चा छान होते. सगळ्यांनाच नवनवीन शक्यता कळतात. त्यामुळे ओके आहे हो हे.
वाचक कथेत रंगले आहेत ही ही शक्यता वाटते लेखकाला

धन्यवाद मृणाली.
छान वाटलं सर्वांचे प्रतिसाद वाचून.

Submitted by मोहिनी१२३ on 28 August, 2021 - 00:05
>>> तुमचा दृष्टीकोन आवडला Happy

पुढील कथा टाका लवकरात लवकर Happy

ताई भाग एक पासून कुठे वाचायला मिळेल? मी लास्ट भागच वाचला. छान चांगला विषय घेतला आहे.

Pages