व्हिसल ब्लोअर-१०

Submitted by मोहिनी१२३ on 24 March, 2021 - 11:09

https://www.maayboli.com/node/78368

नेहा निघून गेली आणि शिशिरने एक सुस्कारा टाकला. त्याला पुढचा विचार करण्याआधी स्ट्रॅांग कॅाफीची नितांत आवश्यकता होती. त्याने पल्लवीला फोन करून त्याची नेहमीची ब्लॅक कॅाफी मागवली आणि शांतपणे तो विचार करू लागला.

खरं सांगायचं तर कल्पनाला त्यानेच या कंपनीत आणले होते. ही बाब आत्तापर्यंत कोणाच्याही लक्षात आली नव्हती हे एक आश्चर्यच.पण कल्पनाला ती एक प्रशिक्षित आणि हरहुन्नरी, कंपनीच्या द्रुष्टीने ॲसेट ठरू शकणारी म्हणून त्याने तिला प्रतिस्पर्धी कंपनीतून अक्षरश: उचलले होते. म्हणून त्याने आत्तापर्यंत जाणीवपूर्वक कल्पनाच्या वागण्याकडे काणाडोळा केला होता. पण आता मात्र पाणी डोक्यावरून चालले होते. लवकरात लवकर कल्पनाच्या वागण्याला चाप बसणे आवश्यक होते.

त्याला गरम कॅाफीचा चटका बसला आणि तो भानावर आला. तो कॅाफी पीत खिडकीशी आला. त्याला काचेतून कॅंटिनमध्ये चालणारी गडबड, हास्यविनोद, ग्रुप्स,एकामेकांना टाळ्या देणं दिसत होतं आणि त्याच्या चेहर्यावर हलकसं हसू आलं.तेवढ्यात त्याला कल्पना आणि तिचे टीममेंबर्स दिसले. ती कॅंटिनमध्येही त्यांच्या अंगाअंगाशी करत होती आणि ते बिचारे अंग चोरून घेत इकडंतिकडं बघत होते.

आता मात्र शिशिरच्या अंगाचा तिळपापड झाला आणि कल्पनावर लवकरात लवकर कारवाई करायचा त्याने निर्णय घेतला.

त्यासाठी एकदा कंपनीची “शोषण प्रतिबंधक” पॅालिसी नीट वाचून बघू म्हणून त्याने लॅपटॅाप चालू केला.पॅालिसी वाचायला घेतली आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्या पॅालिसी मध्ये सगळीकडे ‘if male employee does this to female employe’ अशीच शब्दरचना होती. ही पॅालिसी बनवताना, बदलताना यापेक्षा वेगळा प्रकार होऊ शकतो ही शक्यता कोणीच विचारात घेतली नव्हती. सध्द्याच्या पॅालिसी प्रमाणे कल्पनावर काहीही लेखी कारवाई करणं शक्य नव्हतं आणि तोंडी कारवाईला तिने भीक घातली नसती.

एकूणच कंपनीच्या वाढत्या पसार्याचा, कंपनीच्या संस्कृतीमधे भाषा, वर्ण, लिंग, राष्ट्रीयत्व इ. मधील विविधतेला उत्तेजन द्यायच्या नुकत्याच झालेल्या निर्णयाचा विचार करून ही पॅालिसी आमुलाग्र बदलून सर्वसमावेशक करायची गरज आहे असं त्याचे ठाम मत बनले.त्यासाठी एच आर, लिगल, कंप्लायन्स आणि एथिक्स आणि बाहेरचे काही तज्ञ यांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता होती.

शिशिर कंपनीच्या पुणे शाखेचा एचआर प्रमुख असल्याने त्याचे रिपोर्टिंग डायरेक्ट सीइओला होते. त्याच्या सीईओचे नाव स्कॅाट. तो कंपनीच्या मुख्य शाखेत म्हणजे ह्यूस्टनला होता. शिशिरने एकदा स्कॅाटच्या कानावर सर्व गोष्ट घालायची ठरवली.

या सर्व घडामोडींमध्ये नेहाला काही स्थान असायचे कारण नव्हते.त्यामुळे नेहाला शिशिरने फोन करून ‘तिने आत्तापर्यंत केलेल्या सहकार्याबद्ल मन:पूर्वक धन्यवाद. कल्पनावर योग्य ती कारवाई नक्की करण्यात येईल.मात्र त्यासाठी आहे ती पॅालिसी बदलायला लागेल. त्यासाठी वेळ आणि तज्ञ लोकांचे सहकार्य लागेल.’ ‘ नेहा मात्र दुसर्या दिवसापासून तिच्या नेहमीच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकते’ ही पुस्ती जोडायला तो विसरला नाही.तशी त्याने नेहा आणि आदितीला मेलही केली.

नेहाचा योग्य वेळी तिच्या या सत्कृत्याबद्गल ‘सत्कार’ करायला शिशिर विसरणार नव्हता.

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झालाय हा ही भाग.
मैत्रेयी:हे कथानक २०१०-११ सालातील आहे. आधीच्या कोणत्या तरी भागात तसे वाचल्याचे स्मरते.
Prevention of Sexual Harassment Act, POSCH committee मध्ये पुरूषाकडून स्त्रीचे होणारे शोषणच गृहित धरले आहे.
त्यामुळे यावर आधारित कंपनी पॅालिसी ही अशीच असणार ना!

छान भाग..!!
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..!!

चांगला भाग.
अशी अर्धवट पॉलीसी असणे सहज शक्य आहे. भारतात आता आता पर्यंत पुरुषावर बलात्कार किंवा लैंगिक शोषणाला पण फुलप्रूफ कायदा नव्हता.
एक बाजूची या कथेशी संबंधित नसलेली गोष्टः भारतात अजूनही 'हॅरेसमेंट अ‍ॅट वर्कप्लेस' म्हणजे कायम सेक्श्युअलच असेल असं समजलं जातं. साधी सेक्श्युअल नसलेली, पण कामाच्या ठिकाणी मानसिक त्रास, धमक्या या स्वरुपाची हॅरेसमेंट कोणाच्या विशेष खिजगणतीत नसते.

धन्यवाद आसा.,मैत्रियी,स्वाती२,मृणाली,मुग्धमोहिनी,रूपाली,अनू,अनिश्का.
तुमच्या सर्वांच्या प्रतिसादामुळे उत्साह ही वाढतो आणि नवीन कल्पनाही सुचतात.
तुम्ही इतक्या बारकाईने वाचताय, सुधारणा सुचवताय, आवडल्याचं सांगताय, या अनुषंगाने अजून काही महिती/मत मांडताय त्याबद्द्ल मनापासून आभार.

वेगळाच विषय आहे.
पण मला एक गोष्ट कळली नाही- ती बाई सगळ्यांसमोर- अगदी कँटीनमध्येही पुरुषांच्या 'अंगाअंगाशी' करते आहे तर ते कोणी नोटीस करत नाही? 2011 मध्ये त्याचा इश्यू होत नाही? तो गॉसिपचा, कमेंट्सचा, कुचेष्टेचा विषय होत नाही?

मागच्या भागात दिलेली प्रतिक्रिया परत टाकतो. कथा चांगली आहे पण प्रत्येक भाग खूपच छोटा आहे आणि त्यामुळे फारच थोडी पुढे सरकते.

धन्यवाद सनव,योगी९००,सोनाली. पुढचा भाग शक्यतो अंतिम आणि मोठा लिहायचा प्रयत्न आहे. त्यामुळे वेळ लागतोय.

बापरे अख्खा April महिना गेला
पुढचा भाग कधी येणार आहे??
प्रथमदर्शी वाटले की हाच शेवटचा आहे का?? म्हणून वाचायला लागलो,
याच्या आधीच्या(९ वा पुन्हा वाचला) पासून वाचायला लागलो!!
पण आत्ता समजले की दहावा देखील आधीच वाचलेला आहे.

अनिश्का>> + १००००००००००००००००००००००००००००००००००
पूर्ण करा प्लीज :<
(एक दोन आठवडे gap सहन होईल पण महिनाच गेला इथेतर)
कथेचा गाभा हा ईषय खोल टाईप चा आणि तोचतोचपणा नसलेला आहे. म्हणून सर्व भाग वाचलेले आहेत, आवडलेले आहेत!