ओडीन डायरी

Submitted by आशुचँप on 2 August, 2021 - 15:48

भुभुच्या गंमती जमती धाग्यावर हा विषय चर्चेला आला आणि लिहायचा प्रयत्न केला. सगळ्यांना काही पोस्ट आवडल्या त्यामुळे मग वेगळा धागा काढून त्या इथे हलवत आहे.
आशा करतो आमच्या ओडीन ची डायरी तुम्हालाही वाचायला आवडेल.
ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी
ओडीन हे आमचे लाब्रॅडॉर भुभुचे नाव
तो आता दीड वर्षाचा आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुभु मैदान आणि नॉर्मल वॉक वाल्यांचं मैदान वेगळं हवं.
लोक भुभु ला घाबरतात आणि त्यांची घाबरण्याची रिएक्शन बघून भुभु गोंधळून त्यांनी प्रेडीक्ट केल्याप्रमाणे वागून त्यांना अजून घाबरवतं.
किंवा त्या लोकांच्या डोक्यात कोणत्या तरी भटक्या भुभु चे अंगावर आल्याचे किंवा चावल्याचे पूर्वी आलेले कटू अनुभव असतात.मी तक्रार करणाऱ्या लोकांना फार दोष देणार नाही.
माझा नवरा एकेकाळी 3 ते रात्री 1 अश्या विचित्र टायमिंग वर होता.रात्री बाईक वरून येताना भुभु मागे लागायचे.मग त्यांना बाईकवरूनच लाथ मारून हाड करावं लागे.त्याच्या मनावर ही आठवण इतकी होती की त्याने अपरेजल मध्ये पण सांगितलं होतं Happy

आपल्याकडे खास भुभु साठी राखीव मैदान वगैरे कधी अस्तित्वात येईल याबद्दल शंका आहे
इथे लोकांना मैदान नाही मिळत, भुभुना वगैरे तर विषयच नाही

हे टायमिंग माझेही होते, मी दोन वाजता घरी यायचो, मला खरे तर सायकल ने ऑफिस ला जायला चालणार होते पण येताना रात्र झाली की भटके मागेलागतात आणि टोळ्यांच्या टोळ्या अंगावर येतात
बाईकवरून पण माझा अकसिडेंट होता होता राहिला आहे

पण गंमत म्हणजे याच मैदानावर जवळपास 15 ते 20 भटकी कुत्री आहेत, ती तिथेच मारामारी पळापळ करत असतात
लोकं त्यांच्यातून कसेतरी करत, हाड हाड करत जातात
पण त्यांची तक्रार कोणाला करणार
त्यापेक्षा पाळीव भुभुच्या मालकांना शिव्या घालता येतात

सगळेच असे असतात असे नाही, ओडीनशी आणि इव्हन बाकी भुबुशी खेळायला खूप जण यायचे, लहान मुले मुली तर अगदी पळत पळत यायची खेळायला
खूप दिवसात गेलो नाही तर विचारायचे की काय बरं आहे ना ओडिनला वगैरे

अस्तित्वात आलं तर मुंबै पुणे सारख्या ठिकाणीच येईल.जसे स्पा आणि आता बरीच पेट फ्रेंडली रेझोर्ट आली आहेत तसं.
पण पि सौ ला इतक्यात येणं कठीण.तेथे मोकळी जागा मिळाली की मॉल किंवा बिल्डिंग स्कीम उभी राहते.

हे भुभु साठी मैदान लवकरच यावं. फुटपाथवर, जॉगिंग वॉकींग ट्रॅक्सवर गवतावर हगणार्या कुत्र्यांमुळए वैताग आलाय.
आॅफिसला जाताना त्यात पाय भरलाय माझा हल्लीच.
ईथले कुत्रेमालक आपल्या कुत्र्यांचा उचलत असतीलच. इतरांना पण सांगुन प्रबोधन करा.

असे एक किंवा दोन ने काय होणार
कोरेगाव पार्क मध्ये असेल तर इथून उठून 20 किमी ट्रॅव्हल करून कोण नेणार
त्यात आमचा ओड्या बसतो गाडीवर, पण सगळेच भुभु नाही बसत
त्यामुळे त्यांच्या वॉकिंग रेडियस मध्ये असेल तरच रोज नेलं जाणार

आणि असे मग किती पार्क उभे करणार

रस्त्यावर शी केली आणि उचलली नाही तर दंड करतात मुंबई मध्ये असे ऐकलं आहे
पुण्यात तरी असे काही नाही
आमच्या गल्लीत पण जागोजागी पडलेली असते
20 25 भटकी भुभु आणि 10 12 पाळीव
कॅनाल ला तर गाई म्हशी शेण, आणि माणसे पण सकाळी सकाळी डबा घेऊन बसलेली असतात

कुठं आणि कसं कोणाचे प्रबोधन करणार

पुण्यात लोकांना अडवणे अतिशय कठीण आहे.>>>> हे सगळीकडेच असावे.मधे आमच्या सोसायटीत एक पाहुणा भुभू २-३ दिवसांसाठी आला होता.तर सोसायटीच्या आवारात केक पडलेले असायचे.भुभूचे मालकमंडळी थोर शिक्षित लोक्स आहेत.बाकी पब्लिक काही बोलायचे नाहीत.नंतर मात्र काही महिन्यांसाठी तोच भुभू आला होता,त्यावेळी मात्र त्याला बाहेर घेऊन जात असत.

चिंचवडचा किस्सा भारी आहे.एकजण सांगत होती की ४-५ घरे सोडून असलेल्याचा कुत्रा, शी करायला हिच्याच दारात आणायचा.१-२ वेळा असं झाले आणि त्या बाईने मोठ्याने ओरडून मालकाला सांगितले की आता परत तुम्ही कुत्र्याला इथे दारात xxxxत तर तेच आणून तुमच्या घरात टाकीन.मग मात्र ते बंद झाले.

आमच्याकडे पण हे होत होते
मी मग गांधीगिरी केली दोन तीन दिवस
ती कदाचित वर्क झाली असावी पण आता तरी बंद आहे अगदी दारासमोर करणे

ओडीन डायरी 9
उपोषण

माझा बाकी भुभुजशी असलेला वाद परस्पर दादूने मिटवल्यानंतर बाबाला हायसे वाटले, त्याला वाटलं झालं आता. पण मज्जा तर पुढेच होती.
त्याचे झाले असे, की सुरुवातीला मला काही महिने डॉग फुडच देत होते आणि मग नंतर थोडा मोठा झाल्यावर व्हेट डॉ च्या सल्ल्याने घरचे जेवण सुरू केले. भात भाकरी दही वगैरे. आणि मग नंतर एकदा बाबाने चिकन आणले.
आमच्याकडे आई आणि बाबा चिकन खातात पण घरी नाही, म्हणजे घरी मी यायच्या आधी कोणीच चिकन घरी आणून खात नव्हते. आजीला त्याचा वास सहनच होत नसे. पण मी आल्यावर बाबाने कसेतरी आज्जी ला पटवले की मला वाढ होण्याच्या दृष्टीने चिकन देणे आवश्यक आहे. मग तिने वेगळा कुकर, वेगळी भांडी वापरण्याच्या अटीवर मान्यता दिली.
हे जेव्हा बाबाच्या भावाला अमेरिकेत कळलं तेव्हा तो उडालाच, म्हणाला मी इतकी वर्षे म्हणत होतो आणतो तर कधी आणू नाही दिले आणि आता हा बारक्या आलाय तर लगेच घरी चिकन शिजवायला परवानगी Happy
असो तर बाबाने सुरुवातीला आणले चिकन, ते कसे साफ करायचे, शिजवायचे कसे हे विचारायला चक्क मित्राला व्हीडिओ कॉल पण केला. आणि अखेरीस ते चिकन शिजले. शिजले म्हणजे काय त्या वासाने माझं अंग न अंग मोहरून उठलं, लाळ गळू लागली, सुळे सरसरू लागले, तो वासच इतका अद्भुत होता की आयुष्यात कधी खाल्लेले नसताना मी किचन मध्ये त्या वासाच्या मागेमागे जात राहिलो. आणि जेव्हा भातासोबत ते लुसलुशीत चिकन माझ्या बाउल मध्ये आले तेव्हा तर मला स्वर्गीय आनंदच मिळाला.
बस, तेव्हापासून ठरवले की आता खायचे तर चिकनच, दुसरे काही नाही. त्या आधी मी जेवणात बिट, गाजर, बटाटा, रताळे आणि भोपळा खपवून घेत असे पण एकदा चिकन आल्यावर मी सगळं बंदच करून टाकलं.
बाबाने सुरुवातीला कौतुकाने हे सांगीतले पण लवकरच हे त्याला महागात पडणार आहे याची त्याला मुळीच कल्पना नव्हती.
आणि तो दिवस लवकरच उजाडला. ते लॉकडाऊन सुरू झाले आणि दुकाने बंद झाली तसे चिकन पण बंद झाले. बाबाने मग घरी जे होतं ते शिजवून खायला घातले, मी वास घेतला जाऊन आणि त्यात चिकन नाहीये हे त्यक्षणीच लक्षात आले. मी तोंड फिरवून बसून राहिलो आणि एक कणही खाल्ला नाही.
बाबाला कळलंच नाही, त्याला वाटलं की आता भूक नसेल थोड्या वेळाने खाईल पण मी अजिबात बधलो नाही.
संध्याकाळी पण मी काहीच खाल्ले नाही म्हणल्यावर आजी म्हणाली कदाचित वास येत असेल, भोपळा शिळा होता. मग बाबाने परत वेगळ्या भाज्या घालून भात दिला. मी पुन्हा उत्साहाने धावत गेलो आणि परत चिकन नाही कळताच माघारी वळलो.
तेव्हा कुठं बाबाला कळलं की मला काय म्हणायचं आहे. त्याने मला चिकन द्यावे म्हणून मी लगेच त्याच्या गळ्यात पडुन त्याला चाटले पण तो म्हणाला नो, चिकन नाही आता, खायचं तर हेच.
म्हणलं असं काय दाखवतोच आता. आणि तिकडे बाबाही हट्टाला पेटला. त्याने ते सगळे उचलून फ्रीज मध्ये ठेऊन दिले. सकाळचे ते फेकून द्यावे लागले होते.
ती अक्खा दिवस आणि ती रात्र मला पाणी पिऊनच काढावी लागली. पोटातून भुकेची गुरगुर होत होती पण म्हणलं थोडी कळ काढू, उद्या नक्की चिकन देतील.
सकाळ होताच मी बाबाभोवती उड्या मारून आनंद व्यक्त केला, वेळीच पॉटी करून आलो, गुड बॉय असल्याचे त्याला दाखवले.
पण छे! त्याने तेच जेवण गरम करून वाढले. मी म्हणलं मी एकदा हे खाणार नाहीये सांगितलेले कळत नाहीये का?
बाबा म्हणाला चिडून भुंकू नकोस, चिकन मिळत नाहीये, हवं असेल तर हे खा नैतर बस उपाशी
म्हणलं चालेल मी नाहीच खाणार
बाबाने अर्धा तास मी खाण्याची वाट पाहिली आणि शांतपणे उचलून परत फ्रीजमध्ये ठेऊन दिले. तो दिवसही तसाच गेला आणि घरी सगळ्यांना माझ्यातल्या आणि बाबातल्या युद्धाची बातमी समजली. संध्याकाळी सगळे जण वाट बघत होते की आज तह होणार का?
पण जसा बाबा हट्टी तसा मीही होतो, त्यामुळे कडकडून भूक लागलेली असतानाही मी अक्षरशः निग्रहाने मान फिरवून बसून राहिलो. बाबाने ते अन्न आता खाण्यास योग्य नसल्याने परत टाकून दिले आणि म्हणाला सकाळी उद्या आता मागितले तरी काही मिळणार नाही. घरच्यांना पण सांगितलं की याला बिस्किटे, पोळी, ट्रीट काही म्हणजे काही द्यायचे नाही.
त्या रात्रीही मी उपाशीपोटी झोपलो. झोप लागेना सारखी डोळ्यासमोर चिकनची चित्रे येत होती. सकाळ होताच मी कुई कुई करून बाबाला उठवले, मला वाटलं तो कालचे गमतीत म्हणाला असेल, पण नाहीच
त्याने फक्त पाणी भरून बाउल दिला. नो लाड, नो बक्षीस काही नाही
मीही काहीच झाले नसल्यासारखा वावरत राहिलो. दादूसोबत खेळलो, हिंडलो फिरलो, पोटात काही नव्हतेच,त्यामुळे पॉटी काही झालीच नाही. पण संध्याकाळी थोडा दमून पडून राहिलो तेव्हा नाही म्हणलं तरी जवळपास 60 तास मी कधीही खाल्लं नव्हतं. घसा कोरडा पडला की पाणी पीत होतो इतकेच.
आजी म्हणायला लागली ओळखीत कुठे मिळतंय का बघ आणि घेऊन ये. बाबा म्हणाला तो मुद्दा नाहीये, इथे त्याला हे कळलं पाहिजे की घरात शब्द कोणाचा चालतो
एकदा त्याला हे कळलं की आपण हट्ट केला की घरचे ऐकतात तर पुढे जाऊन ते आपल्याला त्रासाचे होईल. त्याला आता हीच वेळ आहे समजायची की लाड केले जातील पण हट्ट पुरवले जाणार नाहीत आणि अशा पद्धतीने अडवणूक करून तर नाहीच नाही.
असे म्हणाला तरी तो धास्तवला होता कारण फोन वरून तो डॉ शी बोलला आणि सगळे सांगितले. डॉ म्हणाले काही हरकत नाही दोन दिवस नाही खाल्ले तरी, जेव्हा अगदीच असह्य होईल तेव्हा मुकाट खाईल जे दिसेल ते,
आमरण सत्याग्रह वगैर करत नाहीत हे
मग बाबा थोडा रिलॅक्स झाला. त्याने अगदी थोडासाच भात आणि भाजी उकडून कालवून ठेवली, वाया नको जायला म्हणून.
माझ्या पोटात कल्लोळ उसळला होता पण वाटत होते आता जर माघार घेतली तर आयुष्यभर हेच खावे लागेल.
मला काही केल्या चिकन खायचे होते. म्हणून मी प्रचंड मेहनतीने मान फिरवली.
बाबाने उचलून अन्न फ्रीज मध्ये ठेऊन दिले. उद्या सकाळी किंवा संध्याकाळी हेच तो मला गरम करून देणार हे आता मला कळून चुकले. कितीही दिवस ताणले तरी आता मला हेच खावे लागणार आहे
पण तरीही माझा हट्टीपणा मला नमू देत नव्हता. मी चौथा दिवस उजाडला तेव्हा अगदी मलूल झालो होतो. बाबा ने जवळ घेऊन थोपटले पण खायला दिले नाही.
आता मात्र मग माझा पेशन्स संपला. रात्रीच्या जेवणाची वेळ होईपर्यंत मी कसातरी एकेक तास काढला.
बाबाला खात्री नव्हतीच मी खाईन म्हणून त्यामुळे परत त्याने थोडासा भात दिला. मी पळत पळत गेलो आणि आधाश्यासारखा गुरगुरत भाताचा चट्टा केला आणि अजून दे म्हणून बाबाच्या मागे लागलो.
बाबाचे डोळे समाधानाने भरून आलेले, शहाणा माझा बाळ तो म्हणत त्याने मला जवळ घेऊन भरपूर माया केली, आणि लगेच थोड्या वेळात भरपूर खाऊ पुढ्यात आला.
अशा रीतीने आमच्यातला हा लढा चार दिवस चालला.
नंतर मी मग जे मिळेल ते मुकाट खायला लागलो. तयानंतर परत चिकन मिळायला लागले तसा मी परत एकदा नखरे करून पहिलेच पण बाबाने परत एक दिवस उपाशी ठेऊन मागची आठवण करून दिली.
आता तर त्यानी आमची लढ्याची धार च काढून टाकली आहे, तो चिकन शिजवताना उरलेले पाणी बाजूला काढून ठेवतो आणि नंतर व्हेज जेवणात मिक्स करून देतो, त्या वासाने मी सफाचत करून टाकतो
पहिल्या वेळी हे झालं तेव्हा माझा इतका संताप झाला की वास तर चिकन चा येतोय पण खाताना तोंडात फक्त गाजर किंवा भोपळा. जेवण संपले तरी चिकन आले नाही तेव्हा कळलं आपली घोर फसवणूक झालीय.
त्या दिवशी माझा माणूस लोकांवरचा विश्वास उडाला

IMG_20200409_191931.jpg

Just for the record, मला तुमच्या शब्दात लिहिलेले प्रसंग जास्त आवडतात ओडिनच्या शब्दात लिहिलेले नाही

लिहीत रहा

धन्यवाद सर्वांना

व्यत्यय - नाही आणले कधी
पण मी यापेक्षा raw चिकन घेतो सरळ, कटपीस तर 80 रु किलो ने मिळतात, ते एकदम आणतो आणि शिजवून फ्रीज ला ठेवतो
Lucious वर चिकन हार्ट, गिझर्ड आणि लिव्हर वेगळ्या मिळतात
त्या देतो

माझ्या शब्दात मी भुभुच्या गमतीजमती धाग्यावर लिहितो
आणि इकडे ओड्याच्या

सायो - हो माझाही आवडता, आज्जी काय करतेय खायला असे विचारतोय जणू
आणि आज्जी पण भारी आहे, एकेकाळी तिला चिकन चा वासपण सहन होत नसे आता आम्ही कुणी घरी नसलो तर शिजवलेलं चिकन हाताने भातात कुस्करून देण्यापर्यंत मजल मारली आहे

आता आम्ही कुणी घरी नसलो तर शिजवलेलं चिकन हाताने भातात कुस्करून देण्यापर्यंत मजल मारली आहे >>> आज्जी भारी आहेत! Happy कौतुक आहे खरंच.
कसला गोड फोटो आहे! असे केल्यावर काय आहे ते द्यावेच लागत असेल. ऑडिन ने ३ दिवस सत्याग्रह केला! बाप रे! डांबरट आहे. Happy

आता आम्ही कुणी घरी नसलो तर शिजवलेलं चिकन हाताने भातात कुस्करून देण्यापर्यंत मजल मारली आहे >>> आज्जी भारी आहेत!

मॅगीचे चिकन स्टॉक क्युब्स येतात>>मॅगी चिकन क्युब वगैरे अजिबात नका वापरु ओडीन बाळासाठी. आख्खी कोंबडी उकडून घ्यायची, त्याचा स्टॉक आईस क्युब ट्रे मधे फ्रीझ करुन ते क्युब्ज झिप्लॉक बॅगेत फ्रीझरला ठेवा. उकडलेले मीट हाडापासून वेगळे करुन तेही असेच फ्रीजरमधे पोर्शन करुन ठेवा.

मस्तच.
माणसावर चा विश्वास उडाला >> Lol
फोटो ही मस्त .

त्याला हे कळलं पाहिजे की घरात शब्द कोणाचा चालतो...... हे महत्वाचे आहे.पण सर्वांनी मानले हे मोठे.आमच्या मातोश्रीनी,नको ग आईवेगळे पोर आहे म्हणून पिंट्याला डोक्यावर बसवला होता.

हा ही भाग मस्त!
फोटो खरंच खूप गोड...
बिचारा ओडीन एवढे तास उपाशी <<+१

ओडिनला फटाक्यांचा त्रास झाला का? परवा वरचा भाग मुलाला वाचून दाखवला,त्याने आणि मीही एन्जॉय केले. आता ही पूर्ण डायरी सुरुवातीपासून त्याच्याबरोबर वाचणार आहे.

ओडीन डायरी

पोहण्याचे धडे

उपोषण सप्ताहानंतर बराच काळ घरात शांतता होती पण मधेच बाबाने टूम काढली की मला अजून व्यायामाची गरज आहे. मला तशी काही गरज वाटत नव्हती, मस्त खावं प्यावं आणि तंगड्या वर करून पडून राहावं यातच मी खुश होतो, त्यात सकाळ संध्याकाळ फिरायला जात होतोच, अजून कसला व्यायाम पाहिजे या मताचा मी होतो, पण बाबा माझ्या मताला अजिबात जुमानत नाही त्यामुळे एके दिवशी त्याने मला घराच्या मागे काही अंतरावर असलेल्या एका कॅनाल जवळ नेले. मी पहिल्यांदाच इतकं मोठं पाणी बघत होतो, त्या आधी मी फक्त टबात डुबक्या मारल्या होत्या, तेही बाबा किंवा दादू मला महिन्यातून एकदा अंघोळ घालत तेव्हा. मला पाण्यात खेळायला खूप आवडतं आणि मी मधेच अंग झटकून या दोघांना भिजवून टाकतो आणि ते ओरडतात तेव्हा मला खूप मज्जा येते.
पण इतकं मोठं पाणी खूप विचित्र वाटत होतं. मला बाबाने पाण्याजवळ सोडलं तसा मी गेलो, पाण्याचा वास घेतला, एक पाय बुडवला आणि लगेच मागे घेतला, पाणी एकदम गार होते. मग बाजूला एक छोटे झाड होते तिथे शु केली. मला वाटलं झालं आता परत जायचं, पण बाबा म्हणे नई आता तूला यात पोहायचं आहे. मला म्हणजे काय करायचं ते कळलं नाही पण काहीतरी वेगळं करावं लागणारे हे जाणवलं आणि झटकन तिथून पळ काढण्याच्या बेतात होतो तोच बाबाने मला पकडून पाण्यात सोडले.
बापरे मी एकदम डुबकी मारून खाली गेलो, आणि कसतरी पाय मारत बाहेर आलो. हे खूप डेंजर होतं आणि मला अजिबात आवडलेल नाहीये हे असलं वागणं, हे मी बाबाला निक्षून सांगितले.
पण तो कसला ऐकतोय, त्याने परत धरले आणि पाण्यात सोडण्याचा प्रयत्न चालवला, पण मी एकदा धडा घेतल्याने जोरदार प्रयत्न करून त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि लांब पळून गेलो.
बाबा म्हणाला घाबरतो काय लेका, तू लॅब आहेस, पोहणं तुमच्या रक्तात आहे, गपागप पोहायला यायला पाहिजे. मला काही म्हणजे काहीच कळलं नाही, पण मी लॅब आहे एवढं कळलं. मी जवळ येईना म्हणून शेवटी बाबाच पाण्यात उतरला आणि कंबरेला पाणी येईल इतका खोल गेला आणि मला बोलवायला लागला, पण मी मुळीच जवळ गेलो नाही.
मग तो तसाच बाहेर आला, झटापट करून कसेतरी मला पकडले आणि लीश बांधून परत पाण्यात घेऊन गेला. लीश बांधल्याने मला पळता येईना आणि ती लीश त्याने स्वतःच्या कम्बरेला बांधली. मी कितीही स्ट्रॉंग असलो तरी बाबाला ओढून नेऊन पळणे तेव्हा शक्य नव्हते, माझ्यासारखाच तो वजनदार आहे.
तो पाण्यात उतरला तसा मलाही खेचून नेले, मी जिवाच्या आकांताने पाय झाडायला सुरुवात केली तसे त्याने मला पोटाखाली धरून आधार दिला आणि तोंड वरती उचलले.
घाबरू नकोस, मी आहे, बुडत नाहीस तू, गपचूप पाय मर असे म्हणाला. म्हणलं तुझं काय जातंय, तुझे पाय खाली पोचतात, माझे नाही.
पण त्याने सोडलं नाहीच, हळूहळू बोलत मला मधेच सोडत, मधेच पोटाला धरून वरती उचलत पोहायला शिकवायला सुरू केले. मी पण मग त्याचे समाधान होण्यासाठी पाय मारले जोरात आणि कसतरी करत काठाला गेलो.
बस झाला आज इतकंच, असे म्हणून तोही बाहेर आला. पण झालेला प्रकार मला अजिबात आवडला नाही, घरी जाताच आजी ला सांगून याला ओरडा बसेल असे करावं असे मनाशी ठरवत आम्ही घरी आलो. पण घरचे मी आता लवकरच पोहणं शिकणार म्हणून खुश झालेले.
त्यांनतर बाबाने मला तीन चार वेळेला कॅनाल ला नेले पण मी आता सावध असल्याने आधीच पळून जायचो किंवा एकदाच कसतरी काठाला आलो की परत जायचो नाही.
मी इतका निरुत्साह दाखवल्याने बाबाने पुन्हा त्याच्या मित्राशी सल्ला मसलत केली. आणि तो भयंकर दिवस उजाडला. बाबाचा मित्र त्याच्या भुभ्याला घेऊन आलेला. बापरे त्याला बघून मी अक्षरशः दचकलोच. तो डोगो अर्जेंटिनो होता म्हणे, इतका प्रचंड आकाराचा भुभु मी आयुष्यात पहिल्यांदा बघत होतो, माझ्या आकाराचा तर त्याचा पंजाच होता आणि एवढा मोठा जबडा. मी येताच तो गुरगुरला तर आपसूक माझी शेपूट पायात गेली आणि मी बाबाच्या मागे लपलो.
ब्लॅंको नो, असे तो बाबाचा मित्र म्हणाला तसा तो एकदम गप्प बसला. मला फारच आश्चर्य वाटले की एवढा मोठाला भुभु कोणाचे ऐकतो कसा?
मग तो मित्र म्हणाला जम्प, तसा त्या राक्षसाने पाण्यात उडी मारली आणि कॅनाल च्या पार टोकाला जाऊन परत आला. म्हणलं असेल बुवा जमत एखाद्याला.
आणि मग बाबाने आणि त्याच्या मित्राने मिळून त्याच्या लीश ला मला बांधले आणि जम्प म्हणले, तसे परत ब्लॅंको ने उडी मारली आणि काही कळायच्या आत मी झपकन पाण्यात खेचला गेलो. मी नको नको म्हणत परत यायला बघत होतो पण ब्लॅंको दादा कशाची पर्वा न करता सरसर पुढेच पोहत चालला आणि त्यामुळे मलाही काहीतरी करून पाय मारावे लागले. मी कसेतरी तोंड वरती काढून पाय मारत स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत होतो. पण थोड्याच वेळात मला लक्षात आले की नीट पाय मारले तर आपण खाली जात नाही उलट पुढे पुढे जातो. अरेच्या ही भारीच गंमत होती की, मग एकदा आपण बुडत नाहीय हे कळल्यावर मला मज्जा यायला लागली आणि मीही ब्लॅंको दादासोबत पोहायला सुरू केले. तो खूपच मोठाला होता आणि फार स्पीड ने पोहत होता, माझे इतुकले पाय मला किती जोरात नेणार. पण मी पोहायला लागलोय म्हणल्यावर त्यांनी ब्लॅंको दादाला परत बोलावले.
मग बाबाने मला एकट्यालाच पाण्यात सोडले, मी एक छोटी राउंड मारून परत आलो आणि बाहेर न येता तिकडेच मस्त डुंबत बसलो. पाण्यात एकदम हलकं हलकं वाटत होतं आणि नाक वरती ठेऊन कसं पोहायचं हे मला कळलं होतं.
आता कसं वाटतंय, बाबा म्हणाला
मी म्हणलं, गार गार वाटतंय
आणि अशा रीतीने माझी पाण्याशी दोस्ती झाली. ही दोस्ती बाबाला लैच त्रासदायक ठरणारे याची त्याला त्यावेळी मुळीच कल्पना नव्हती.
मग आम्ही आठवड्यात एकदा किंवा दोनदा कॅनाल वर जायला लागलो. आता माझी एकदमच भीती गेली होती आणि पाणी दिसताच मी धडमकन त्यात उडी मारायला लागलो होतो. मग बाबाने नवा खेळ सुरू केला, बाटली फेकण्याचा. तो रिकामी बाटली लांबवर पाण्यात फेकत असे आणि मी फुल्ल स्पीड ने पोहत जाऊन ती घेऊन येत असे. आमचा तासन तास असा खेळ चालत असे.
बघता बघता मी एकदम चॅम्पियन झालो आणि कितीही जोरात पाणी असले तरी मला काही फरक पडत नसे, जाऊन बाटली आणायची एवढंच मला कळत होतं. पोहणं माझ्या रक्तात आहे असे बाबा का म्हणाला ते मला आता जाणवायला लागलं होतं.
पाणी दिसताच मला प्रचंड सुरसुरी येत असे आणि मला अजिबातच कंट्रोल होत नसे. कधी एकदा जाऊन उडी मारतोय असे व्हायचे. पण याचा बाबाला उलटा त्रास व्हायला लागला, कारण मी डुंबून आलो की मला पुसून कोरडा करणे हे फार कष्टाचे काम होते. मी एकतर स्वस्थपणे पुसून घेत नसे, मला तो टॉवेल धरून खेचायचा असे, किंवा बाबाच्या गालाला चाटणे, ओल्या अंगाने त्याच्या अंगावर उडी मारणे असले सगळे प्रकार मी करत असे. त्यामुळे दिवसेंदिवस माझं पोहणं बाबाला व्यापाचे होऊ लागले.
त्यात आम्ही फिरायला कॅनाल ला जायचो तेव्हा जर मला मोकळं सोडलं तर मी पळत पळत जाऊन धडमकन पाण्यात उडी मारत असे. मग बाबा काठावर उभा राहून ओड्या परत ये, आज पोहायचं नाहीये, मी तूला कोरडा करणार नाहीये, मग बसशील शिंकत अश्या धमक्या द्यायचा पण मला पोहण्यापुढे कशाची पर्वा नसे.
एकदा तर बाबाला ऑफिसमध्ये उशीर झाला म्हणून आम्ही रात्रीचे फिरायला गेलो. कॅनाल जवळ येताच मी धुम ठोकली आणि पाण्यात उडी मारली. बाबाला मी इतक्या रात्री पाण्यात जायचे डेरिंग करणार नाही असे वाटलेलं पण मी त्याचा अंदाज चुकवला. मी जिथून गेलो ती आमची नेहमीची जागा नव्हती, तिथे खूप झाडी होती आणि खूप उतार होता. त्यामुळे बाबाला पाण्याजवळ येताच येईना, त्यात अंधारात मी कुठं आहे हेही त्याला दिसत नव्हते. त्याने बऱ्याच हाका मारल्या पण मी मस्त डुंबत राहिलो. मग तो चिडला आणि त्याचा आवाज चढला. मला लक्षात आलं की काहीतरी गडबड झालीये पण काय ते कळत नव्हतं. पण बाबा म्हणाला मी चाललो निघून आणि तो जायला लागला तसा मी पटकन पाण्याबाहेर आलो आणि त्या झाडीतून वाट काढत बाबापाशी गेलो. तो भयंकर चिडलेला होता, त्याने जवळच एक छडी होती त्याने एक जोरात फटका दिला. मी पटकन पळून गेलो पण तो खूपच म्हणजे खूपच चिडलेला होता. यापूर्वी त्याने मला कधीच असे मारले नव्हतं. मी कान पाडून त्याच्या जवळ गेलो, तसं काहीही न बोलता मला घरी घेऊन गेला. दादूला म्हणाला त्याला कोरडा कर आणि माझ्यापासून लांब ठेव नैतर अजून मार खाईल फुकट. मग दादूने कोरडा करून खायला दिले. रात्री मग बाबा शांत झालेला दिसला तसा मी जवळ गेलो. त्याने मला परत मारले असते तरी मी गेलोच असतो, कारण तो बाबा होता.
मला मग जवळ घेऊन तो म्हणाला अरे तू अंधारात कुठं गेला कळेना, तिथे झाडी होती, साप असू शकतात, अंधारात काहीतरी चावतं, लागतं, मग काय करणार? इतकं पाण्यासाठी हपापलेला असू नये, म्हणून मी चिडलो. मला काही कळलं नाही पण मी हं हं करत त्याच्या मांडीवर पडून राहिलो झोप लागेपर्यंत.
त्याला वाटलं मला धडा मिळाला असेल म्हणून दुसरे दिवशी त्याने कॅनाल वर सोडले तर मी परत जाऊन पाण्यात उडी मारली. आता म्हणजे तो अगदीच हैराण झाला. मला मुळात आपलं काय चुकतंय हेच कळत नव्हतं आणि बऱ्याच उशिराने त्याला कळलं की मला शिक्षा का आणि कशासाठी होतीय हेच समजू शकत नाहीये, त्यामुळे मी हे करतच राहणार.
मग त्याने एक भयंकर जालीम उपाय केला. आम्ही पोहायला जायचो तिकडे जाळीचे कंपाउंड होते, त्याला काही लोकांनी भोसकांड पडले होते आणि तिथन खाली कॅनाल पाशी जाता येत असे. मी त्याच भोसकांडमधून खाली घुसत असे आणि तिकडून बाबाला खाली येणे शक्य व्हायचे नाही.
आणि मला मोकळा सोडताच मी तिकडे पळत जात असे आणि पाण्यात उडी मारत असे. आणि मग एकदा बाबा आणि दादू मला न घेताच बाहेर गेले आणि बऱ्याच वेळाने आले. दुसरे दिवशी कॅनाल वर जाताच बाबाने मला मोकळा सोडला आणि मी नेहमीच्या जागी गेलो पळत तर धक्काच. तिथे जाळी इतकी पक्की बसवली होती की मला काय कुणालाच तिकडून कॅनाल पाशी जाता येत नव्हते. बाबा राक्षसासारखा हसला आणि म्हणाला जा जा आता दाखवच जाऊन. त्याने आणि दादू ने मिळून हा उद्योग केला होता, की ती जाळीचे भोसकांड बंद च करून टाकले होते.
मी हताश नजरेने पाण्याकडे बघत बसलो, बाबा असला काहीतरी उद्योग करेल याची मुळीच कल्पना नव्हती. मला वाटलं आता आपलं पोहणेच बंद.
पण तसे काही झालं नाही, आम्ही नंतरही जात राहिलो पण आता बाबाला न जुमानता पाण्यात घुसणे बंद झाले.
आता तर मी फार फेमस झालोय कारण मी पोहायला लागलो की काठावरून कितीतरी लोकं बघत असतात, काही जण फोटो आणि व्हीडिओ काढतात. त्यात मग बाबा शायनिंग मारायला ऑन युर मार्क, गो असे म्हणत बाटली टाकतो, आणि मी पोहत असताना कमॉन अजून स्पीड पाहिजे, गुड वन, वन मोर राउंड असे काहीतरी आरडाओरडा करतो. लोकांना वाटतं आमचं काहीतरी भन्नाट ट्रेनिंग सुरू आहे. प्रत्यक्षात तो बाटली टाकतो आणि मी घेऊन येतो इतकंच.
बाबाने माझे पोहताना कितीतरी फोटो आणि व्हीडिओ काढलेत आणि त्यामुळेही मी खूप फेमस झालोय. कितीतरी जण आता त्यांच्या भुभुजना घेऊन येतात आणि ओडीन सोबत याना पोहायला शिकवा म्हणतात. मग मी आता ब्लॅंको दादा सारखा ट्रेनर झालो आहे आणि त्यांना मस्त पोहून दाखवतो आणि शिकवतो.
शेवटी बाबा म्हणतो तसं मी एक लॅब आहे आणि पोहणं माझ्या रक्तात आहे.

Swimodin.jpg

Pages