ओडीन डायरी

Submitted by आशुचँप on 2 August, 2021 - 15:48

भुभुच्या गंमती जमती धाग्यावर हा विषय चर्चेला आला आणि लिहायचा प्रयत्न केला. सगळ्यांना काही पोस्ट आवडल्या त्यामुळे मग वेगळा धागा काढून त्या इथे हलवत आहे.
आशा करतो आमच्या ओडीन ची डायरी तुम्हालाही वाचायला आवडेल.
ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी
ओडीन हे आमचे लाब्रॅडॉर भुभुचे नाव
तो आता दीड वर्षाचा आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेही पान आवडलं. मला कुत्रे आवडतात. पण जवळ आले की भीती वाटते. चाटायला वगैरे लागले की आवडत नाही. पण आताशा फिरायला गेल्यावर एखादा पाळलेला कुत्रा दिसला की त्याच्या डोक्यावरून हात फिरवण्याइतकी हिंमत आली आहे. आपण कौतुकाने पाहायला लागलो की त्यांना कसं बरोब्बर कळतं. अगदी दुरूनसुध्दा जवळ येतात आपल्या. काही लोकांना भटक्या कुत्र्यांच्या डोक्यावरूनसुध्दा प्रेमाने हात फिरवताना पाहिलंय. त्यांना मात्र माझा सलाम आहे. हे खरे श्वानप्रेमी.

वाचतेय. प्रचि पण समर्पक!
मला कुत्रे आवडतात. पण जवळ आले की भीती वाटते. >>
माझाही प्रवास इथूनच सुरु झालाय. Happy पण नंतर त्या जीवाचं निरपेक्ष प्रेम जाणवून आपण विरघळतो, भाषा एकमेकांना कळायला लागते आणि शब्दांवाचूनही बंध असे जुळतात की ते स्वतः अनुभवल्याशिवाय इतरांना कळणे कठीण Happy

धन्यवाद सर्वांना

स्वप्ना - खूपच छान,मस्त प्रगती आहे
आणि खरंय भुभुज ना लगेच कळतं कोण प्रेम करणारे आणि द्वेष करणारे

चंद्रा - अगदी समर्पक लिहिलं आहे
नंतर तुम्हाला शब्दांची गरज लागत नाही
डोळयातून आणि स्पर्शातून सगळं काही व्यक्त होतं आणि हे सांगून समजत नाही, अनुभवायलाच लागतं

अमा - ही भन्नाट आयडिया आहे, हे करायला पाहिजे, धमाल येईल
त्याचा इंस्टा ला अकाऊंट आहे पण बोलके व्हीडिओ नाही केले कधी
करून बघतो

राधिका - त्याने एक सलग खूप मोठे होईल आणि मग वाचायला कंटाळा येईल असे वाटले. स्वप्ना ने सुचवल्या प्रमाणे प्रत्येक भाग नवा धागा काढून टाकावे याही विचारात आहे, अद्याप काही ठरत नाहीये

राधिका - त्याने एक सलग खूप मोठे होईल आणि मग वाचायला कंटाळा येईल असे वाटले. स्वप्ना ने सुचवल्या प्रमाणे प्रत्येक भाग नवा धागा काढून टाकावे याही विचारात आहे, अद्याप काही ठरत नाहीये >>>

दोन्हीच्या मधले कर. दर महिन्याच्या / तिमाहीच्या डायरीचा एक धागा असे काहीतरी.
सलग वाचायला आवडेल ह्याच्याशी सहमत.

ओडीन डायरी 7

घरात येऊन काही महिने होत आले पण माझ्यात आणि आई मध्ये काही विशेष अशी सलगी झाली नव्हती. पण तिने माझे घरभर वावरणे आणि उनाडक्या चालवून घेतल्या होत्या आणि मीही आता तिच्या मागे जाणे, गाऊन पकडणे प्रकार सोडले होते. त्यामुळे या आघाडीवर शांतता होती.
त्यानंतर काहीतरी झाले आणि सगळे रोज चर्चा करू लागले, त्यांच्या बोलण्यात मग कोरोना, लॉकडाऊन असे काय काय ऐकू येत असे. मला ते काही कळलं नाही पण हळूहळू सगळ्यांचे घराबाहेर पडणे बंद झाले. आई काही दिवस गेली ऑफिस ला पण नंतर घरूनच काम करायला लागली. बाबा तर आधीपासूनच घरून काम करत होता. दादूची शाळा पण बंद झाली. त्यानंतर घरी मावशी कामाला येणे बंद झालं आणि सगळेच थोडे असे चिंतेत होते.
मला काही त्यानं फरक पडत नव्हता उलट सगळे आता पूर्ण वेळ माझ्याशी खेळायला आहेत याचाच आनंद झाला होता आणि दिवसभर मी सगळ्यांना खेळायला लावून व्यायाम करायला भाग पाडत असे. आणि दिवसभर घरी असल्याने आईलाही कळून चुकले की सगळे भूभू डेंजरस, चावरे, आणि भुंकणारे नसतात. काही माझ्यासारखे खाणे पिणे खेळणे आणि झोपणे कॅटेगिरीचे पण असतात.
त्यातच मग मी एकदा आजारी पडलो, आणि सारखे जुलाब सुरू झाले. मला पोटात पण दुखत होतं आणि बाबाने डॉकटरकडे नेऊन आणलं त्यांनी काही भयानक वासाची औषधे दिली. आणि इतक्यात त्याला हेवी काही देऊ नका, दही, ताक किंवा अगदीच वाटलं तर मऊ भात इतकेच खाऊ दे असे सांगितले.
मी आजारी होतो तरी मला खेळायचं असायचं पण पोटात काही नसल्याने लगेच दमून जायचो आणि पडून राहायचो.
त्यावेळी मला खूप कसतरी व्हायचं, बाबा जमेल तसा लक्ष देत होता पण त्यालाही काम होती खूप.
एकदा मी असाच हॉल मध्ये पडून होतो आणि आई टीव्ही बघत होती. मला त्यावेळी कुणीतरी जवळ घेऊन थोपटाव वाटत होतं पण बाबा वरच्या खोलीत होता आणि माझ्यात जिने चढायची ताकद नव्हती.
मी मग हळूहळू आईजवळ गेलो आणि तिच्या पायात मुटकुळे करून पडून राहिलो. मला वाटलेलं ती ओरडेल पण तिच्याही लक्षात आलं की मी किती एकटा फिल करत असेन. कदाचित तिच्यातली आई जागी झाली आणि तिने भीती सोडून मला अलगद थोपटले. मला त्या क्षणी इतकं बरं वाटलं आणि मी तिच्या मऊ हातावर डोकं ठेऊन पडून राहिलो.
नंतर मग तिने दहीभात कालवला आणि चक्क मांडी घालून माझ्यासमोर बसली आणि मला खायला दिला.
हे तिने नंतर बाबाला सांगितले आणि त्यालाही खूप आनंद झाला की आमचे एकदाचे सूर जुळले म्हणून. नंतर मी बरा झालो, पूर्वीसारखे खायला आणि मस्ती करायला लागलो. आता अधून मधून आई जवळ गेलो की ती माझ्या अंगावरून हात फिरवायची. अर्थात तिच्या मनातली भीती पूर्णपणे गेली नव्हती, कारण बाबा आणि दादू जसे मला उचलून घ्यायचे, अवळी चिवळी करायचे तसं तिने कधी केलं नाही पण आता ती माझ्याकडे लक्ष देऊ लागली होती हे नक्की.
त्यांचे व्हीडिओ कॉल व्हायचे तेव्हा ती आवर्जून सगळ्यांना दाखवायची हा बघा आमचा ओडीन.
मी असाही गोंडस गुटगुटीत बाळ होतो आणि सगळे अय्या किती गोड ना, असे म्हणत. त्याने ती अजून खुश व्हायची. आणि मीही मग कॉलर टाईट करून सगळीकडे फिरत असे की बघा मी किती गोड आहे वगैरे करत.
ती आता टीव्ही बघत असेल तर मी तिच्या पायाशी पडून राहिलेलं चालत असे आणि उलट मस्त पायाने मला गुदगुल्या करत असे आणि बाबाला म्हणायची याची फर किती सॉफ्ट सॉफ्ट आहे, टेडी आहे एकदम
बाबा म्हणे हो ना मला माहितीच नव्हतं, बरं झालं सांगितले.
नंतर मग उन्हाळा वाढला तसा माझ्या अंगाची लाही व्हायला लागली आणि मी बाथरूम मधल्या गार फरशी वर झोपायला जात असे पण त्याने माझी फर ओलसर राहून पोटाला आणि पायाला रॅश यायला लागले. तर तिनेच बाबाला सांगून मला बेडरूम मध्ये एन्ट्री मिळवून दिली, तिकडे ते रात्री एसी लावत. ती गार हवा इतकी मस्त वाटायची की मी लगेच अंगाचा बॉल करून गुरुगुरु झोपत असे.
बाबासाठी हा आश्चर्याचा धक्काच होता. पण मीही तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला नाही, आणि कधीच त्यांच्या बेडवर चढलो नाही. मी बाबा ज्या साईड ला असेल तिथे गार हवा घेत पडून राहत असे.
नंतर तर मी डबल बेड च्या खाली सरपटत जात तिकडे कोपऱ्यात झोपायला सुरुवात केली. बाबा म्हणाला अरे लेका चोर आले तर तू इथून बाहेर येणार कधी, आम्हाला सावध करणार कधी. आम्हालाच सांगावे लागेल की बाबा ये बाहेर आणि चोरावर भुंक म्हणून.
पण त्याच्यासाठी आश्चर्याचा सगळ्यात मोठा धक्का होता जेव्हा एकदा माझे खाऊन झाल्यावर आईने तिच्या गाऊन ने माझं तोंड पुसले तेव्हा. बाबा केवळ खाली पडायचा शिल्लक होता, म्हणाला अरे याचा फोटो हवा होता म्हणजे मी तो फ्रेम केला असता आणि खाली लिहिलं असतं याच 'त्या बाई ज्या घरात कुत्रा राहील नैतर मी असे म्हणणाऱ्या'.
आई ला जिंकून घेतल्यावर तर माझे लाड अफाट वाढले कारण ती अजिबात बाबाला जुमानत नसे आणि खुशाल मला बिस्किटे, आईस्क्रीम किंवा काय हवं ते खायला देत असे आणि वर म्हणे की तुम्ही नीट लक्ष देत नाही, किती बारीक झालाय तो.
बाबा म्हणे तो बारीक वगैरे काही नाहीये, एवढंच पाहिजे, लॅब असेही खादाड आणि आळशी असतात, आणि लगेच लठ्ठ होतात
पण आईच्या लाडाला काही सीमाच नव्हती, मला सगळे छान गोड आहे म्हणतात तर दृष्ट लागेल म्हणून तिने गळ्यात काळा धागा आणून बांधला. आता तर सकाळी मी तिच्यासोबतच खाली येतो आणि ती माझा बाउल गच्च भरून खायला देते. बाबा म्हणतो एवढं नाही द्यायचं पण ती काही ऐकत नाही, म्हणते इतका दिवसभर मस्ती करत असतो, पोटाला इतकं तर पाहिजेच.
बाबा मग माझं वजन करून तिला दाखवतो आणि म्हणतो तो व्यवस्थित मापात आहे. पण त्यांच्यात कधीच एकमत होत नाही आणि मधल्यामध्ये माझी चंगळ होत राहते.

odindiary2.jpg

आता या खोलीत एन्ट्री मिळाली आहे तर शहाण्यासारखं वागायचं, नैतर परत बाहेर ठेवीन काय Happy

किती मस्त
ओडिन सगळ्यांना जिंकत चाललाय.

अरे वाह नवीन डायरीचे पान आले. मला वाटलेले ओडीन विसरला की काय डायरी लिहायला.
मस्त आहे हे पण.
आशूचॅम्प, तुमचा ओडीन खरचं खूप क्यूट आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन अगदी बोलके आहेत.

धन्यवाद सर्वांना
Happy

निल्सन लवकरच तुम्ही घेणार असं दिसतंय भुभु Happy

डायरी टाकायची होती पण कोरोना लोकडाऊन चे कसे लिहावं त्याच्या भाषेत हे समजत नव्हतं
त्यातल्या त्यात सोप्पे करून लिहावं असं डोक्यात होतं

वरच्या फोटोत ओडिन अगदी हसतोय असं वाटतंय Happy
मी मग हळूहळू आईजवळ गेलो आणि तिच्या पायात मुटकुळे करून पडून राहिलो.>>> हे अगदी टिपिकल बिहेवियर! माउई पण बरं वाटत नसलं की अगदी खेटून जवळ येऊन बसतो. किंवा कधी कधी सरळ मांडीवर चढून बसतो.

मस्त.
फार बोलका चेहरा केलाय वरच्या फोटोत.

ओडीन डायरी 8

घरातल्या सगळ्यांना जिंकून घेतल्यावर आता वेळ होती बाहेर उनाडक्या करायची. पण झालं काय मी इथे घरी आल्यावर काही महिन्यात ते कोरोना का काहीतरी झालं आणि सगळे घरी राहायला लागले. रात्री कधीतरी बाबा मला पॉटी करायला बाहेर न्यायचा तर रस्त्यावर एकही माणूस नसायचा, आमचे आम्हीच.
त्यातही गंमत अशी की मला बेल्ट किंवा लिश नव्हताच कारण लहान असताना बाबा ने एक strap सारख काहीतरी गळ्यात घातलं होत, ते लहान व्हायला लागल्यावर काढून टाकला आणि नंतर सगळी दुकानेच बंद झाली.
आता मला फिरवायचा कसं हा प्रश्न होता.
पण दादूने यावर युक्ती शोधली, त्याने मोबाईल वर बघून मला एका कापडी बेल्ट चा harness बनवला. तो गळ्यात न बांधता माझ्या छाती आणि पायातून अडकवून घालता येत असे त्यामुळे मी कितीही खेचाखेची केली तरी माझ्या गळ्याला हिसका बसत नसे. बाबा हे बघून दादूवर खूप खुष झाला.
आम्ही मग अगदी रात्र पडल्यावर घराच्या जवळच चक्कर मारायला जात असू. माझ्यासाठी हा सगळा नवीन अनुभव होता. वाटेत इतक्या गाड्या, त्यांचे टायर, खांब, कचरा, वाळलेल्या पानांचा ढीग असं खूप काही भारी भारी गोष्टी असत आणि मला त्यांचा वास घ्यायला प्रचंड आवडत असे, अजूनही आवडतं. तेव्हापासूनच माझे आणि बाबा चे खटके उडायला सुरुवात झाली. मी कचऱ्यात तोंड घालून बाकी भुभुज च्या शी चा, अजून काही असेल त्याचा खोलवर वास घेत असे आणि तिथे लगेच शु करत असे.
त्याला वाटायचं की हे सगळं घाण आहे आणि मी आजारी पडीन. पण आम्हा भुभुज साठी हे आवश्यक आहे हे मी त्याला पटवून द्यायचा प्रयत्न करायचो. आता थोडं थोडं त्याला पटलं आहे तरीही मी जर भुभुची शी किंवा गायीच्या शेणाची टेस्ट घ्यायचा प्रयत्न केला तर फटका मिळतो.
इतकं महागातल डॉग फूड आणून देतोय लेका आणि घाण कसली खायची असते रे तुला, हा त्याचा ठरलेला डायलॉग आहे. असेही मला आणि दादू ला लेक्चर देणे त्याचा आवडता छंद आहे. गरीब मुले कशी झोपडीत राहतात आणि किती अभ्यास करतात यावरून तो दादू ला बोलत असे आणि भटकी भुभी कसे नखरे न करतात जे मिळेल ते खातात यावरून मला. अर्थात आम्ही दोघेही त्याचे फार काही ऐकत नाही ही गोष्ट वेगळी.
पण काही महिन्यांनी जेव्हा काही काही जण फिरायला लागले तेव्हा खरी मजा आली. तोवर मी माझी आई आणि बहीण भाऊ सोडून कुठल्याच भुभुला पाहिले नव्हते त्यामुळे कोणीही भुभु घेऊन येताना दिसले की मी खच्चून भुंकोयला सुरू करत असे. सुरुवातीला याचे कौतुक झाले की कसा तिखट आहे वगैरे पण मी एक सेकंद उसंत न घेता वॉव वॉव करत कान किटेपर्यंत भुंकत राही.
दादू आणि बाबाला मी बाकी भुभुज मध्ये जाऊन खेळावं, मस्ती करावी असे वाटे पण मी अजिबात ऐकत नसे आणि सतत भुंकत राही. त्यामुळे सुरुवातीला बाकी भुभुसोबत फिरायला येणारे लोक दादूला आणि बाबाला टाळायला लागले आणि याने बाबा अजून वैतागला.
याला चार दिवस डॉग हॉस्टेल ला ठेवलं पाहिजे म्हणजे बरोबर होईल असं तो म्हणायला लागला.
पण तशी वेळ आली नाही कारण दादू ने माझ्यावर खूप वाईट गेम केली.
मी नवा भुभु दिसला की मी भुंकतो हे ठरलेच होते आणि त्याने त्यांचे आई बाबा किंवा ते भुभु पण त्रासून जात आणि उलट भुंकयला लागत मग एकदम गदारोळ सुरू होई. आणि मग ते त्या भूभूंना किंवा बाबा मला खेचत घरी घेऊन येई.
म्हणून मग दादू मला कॉलनी मधल्या एका कडे घेऊन गेला. तिकडे जेनी नावाची एक गोल्डन रित्रीव्हर होती. तिची पिल्ले माझ्यापेक्षाही खूप मोठी होती म्हणजे माझ्यासाठी ती काकू किंवा आजी कटेगिरी मधली होती. असेही ती फार हालचाल करत नसे आणि थोडेसे चालून फतकल मारून बसत असे. कोणीतरी म्हणले की तीचे खूप वय झालं आहे.
तर दादू ने जेनी आणि मला एका रिकाम्या पार्किंग मध्ये सोडले आणि स्वतः लांब जाऊन बसला. मी काय भुभु दिसताच भुंकून आसमंत दणाणून सोडला. पण त्याचा जेनीकाकू वर शून्य परिणाम झाला. तिला बहुदा ऐकू पण कमी येत होतं आणि मी नाचून नाचून उड्या मारून भुंकत होतो तर तिने एकदाही माझ्याकडे लक्ष दिले नाही.
मी मात्र घसा खरवडून खरवडून भुंकत राहिलो आणि शेवटी दमलो आणि निपचित पडलो.
दादूने मला धरले आणि घरी घेऊन आला. त्याला कळलं होतं आता काय करायचं ते. त्याने पुढचे सलग पाच सहा दिवस मला जेनीसोबत सोडले. मी अकख्या आयुष्यात भुंकलो नसेन तेवढा त्या पाच सहा दिवसात भुंकलो आणि त्याचा जिनी वर काडीमात्र फरक पडला नाही. ती तशीच निर्विकारपणे माझ्याकडे बघत राहायची.
शेवटी शेवटी माझी भुंकण्यावरची वासनाच उडाली. काय उपयोग ना शेवटी इतकं भुंकून. दादूने माझी मस्ती पार जिरवून टाकली. शेवटी अशी वेळ आली की मला पार आडवा तिडवा हलवून काढला असता तरी माझ्यात भुंकणे शिल्लक राहिले नसते.
त्यामुळे पुढच्या आठवड्यात जेव्हा बाकीचे भूभू आले तेव्हा मी शांतपणे बसून राहीलो. जाऊन त्यांचा वास घेतला आणि त्यांच्यावर अजिबात भुंकलो नाही. यामुळे फायदा माझाच झाला की मला खूप छान छान फ्रेंड्स मिळाले. त्यांच्याबद्दल आता पुढच्या भागात सांगतो.

odin_belt.jpg

मी अकख्या आयुष्यात भुंकलो नसेन तेवढा त्या पाच सहा दिवसात भुंकलो आणि त्याचा जिनी वर काडीमात्र फरक पडला नाही. ती तशीच निर्विकारपणे माझ्याकडे बघत राहायची. >>> Lol

मस्त Lol
बाकी भुभुज च्या शी चा, अजून काही असेल त्याचा खोलवर वास घेत असे आणि तिथे लगेच शु करत असे. << आम्ही ह्याला pee-mail म्हणतो.. Happy

धन्यवाद सर्वांना

पी मेल - हाहाहा भारिये हा शब्द Happy

सुनिधी - पोरालाच सुचला, मला कारण कळतच नव्हतं याला सोशल कसा करावा ते, ज्यांच्याकडून आणला त्याला त्यानाही विचारले की काय करू, तर म्हणे हळूहळू होतात ते
पण हा काही ऐकतच नव्हता, गच्चीत असताना खालून दिसले भुभु की तिथूनच ठाण ठाण सुरू व्हायचा
आता काही नाही,मस्त दोन पाय पुढे टाकून खालची गंमत बघत बसलेला असतो

भारी किस्सा आहे हापण Lol
पूर्वी अशोककुमारचं आत्मचरित्र लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत क्रमशः यायचं. (जीवन नैया नाव होतं बहुतेक) त्यातला एक गमतीदार किस्सा आठवला. लहानपणी म्हणे किशोरकुमारचा आवाज फारसा चांगला नव्हता. त्यांचा तिसरा भाऊ अनुपकुमार मात्र तेव्हा मेळ्यांमध्ये वगैरे गात असे. एकदा काय झालं, किशोरकुमारच्या हाताला काही तरी जखम झाली कापल्यामुळे वगैरे आणि ती बरी व्हायला बरेच दिवस गेले. तेव्हा तो दिवसेंदिवस रडत असायचा आणि शेवटी जेव्हा त्याचा हात बरा झाला तेव्हा याचा आवाजही पहिल्यापेक्षा छान झाला होता आणि मग तोही गायला लागला!!
(तसं काही ओडीनचं झालं का? आवाज बदलला/ सुधारला वगैरे? Lol )

नई सुधारला वगैरे काही नाही
वयानुसार बदलला इतकाच
पूर्वी किरट्या आवाजात वॉव वाउ करत असे आता व्होकल कॉर्ड अजून दणदणीत झाल्या आहेत
पण आता भुंकण्याच्या छटा ओळखू येऊ लागल्या आहेत
म्हणजे चिडून भुंकतोय, का चौकशी का संशयास्पद काही दिसलं

मागणी करायची असेल तर तोंड बंद ठेऊन कुई कुई असा रडल्यासाख शार्प टोन मध्ये आवाज करतो, तो भयानक इरिटेत होतो

आपल्या कुत्र्यानी कधी भुंकावं आणि कधी भुंकु नये हे ठरवणं आणी त्याना ते शिकवण फार ट्रीकि आहे बाबा! आमची एल्सा दारात कोणीही आलं कि भुंकत सुटते. आमचे कॉल सुरु असताना तर बरोबर जमतं तिला. जाम डोक्याला ताप व्हायला लागला होता. बरं, लोक आल्यावर भुंकु नको असं शिकवावं तर ही बया अनोळखी लोकांनाही चालवून घेईल.
एकदा बायको तिच्या कलीगला हे सांगत होती तर तो म्हणाला, "कुत्रा कुत्र्यासारखाच वागणार ना? चांगलय कि भुंकतीये ते.. तुम्हाला आणि बाहेरच्यालाही कळतय कि कोणीतरी लक्ष ठेऊन आहे. कुत्रा घेतला आहे तर त्याचा हा उपयोग म्हणून बघा कि!"
तेव्हापासुन आम्ही तीला थोडं भुंकु देतो आणि मग गप्प करतो. बर्याचदा तीही ते नुसतं गप्प बसण्यापेक्षा जास्त ऐकते.
आशुचँप - आपल्याकडे आता डॉग पार्क असतात का? आमच्याकडे डॉग पार्क मधे नेल्यामुळे एल्साला सोशल व्हायला मदत झाली. "पपी टाईम" मिळाला आणि एनर्जी पण चांगली बाहेर निघते :). आता तिला बहेर गेलो कि कुत्रांना भेटायचं असतं पण ती ओरडाआरडा करत नाही.

डॉग पार्क असा नाहीये, पण पूर्वी एका मोकळ्या मैदानावर सगळे जण आपापले भुभु घेऊन यायचे
फुल्ल मस्ती चालायची, पण नंतर फिरायला येणाऱ्या लोकांनी तक्रार केल्याने बंद झालं सगळं
आता कोणी येत नाही

Pages