ओडीन डायरी

Submitted by आशुचँप on 2 August, 2021 - 15:48

भुभुच्या गंमती जमती धाग्यावर हा विषय चर्चेला आला आणि लिहायचा प्रयत्न केला. सगळ्यांना काही पोस्ट आवडल्या त्यामुळे मग वेगळा धागा काढून त्या इथे हलवत आहे.
आशा करतो आमच्या ओडीन ची डायरी तुम्हालाही वाचायला आवडेल.
ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी
ओडीन हे आमचे लाब्रॅडॉर भुभुचे नाव
तो आता दीड वर्षाचा आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओडीन डायरी
दि 1 ऑगस्ट

आज संध्याकाळी बाबा सोबत बाहेर फिरायला निघालो तर समोरून चेरी येताना दिसली. माझी फ्रेंड. मी आनंदाने उड्या मारत गेलो तर भुंकायला लागली. मला काही कळलंच नाही, मी आपला सांगतो, अगं मी ओडीन, तरी चिडली मग मी नाद सोडला आणि पुढे जायला लागलो
बाबा म्हणतो बायकांचा मूड कधी बिनसेल सांगता येत नाही, खरेच असेल कदाचित
पण म्हणून बाबाला सगळं कळतं असे नाही. उदा फिरायला जाताना त्याला वाटतं की मी सरळ रेषेत, मान वरती ठेऊन असं रुबाबात फिरावं. पण त्याला हे कळत नाही प्रत्येक खांबावर, कारच्या चाकावर, भिंतीवर आणि झाडावर बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या वाचून अर्थ लावायचा असतो मला. आणि शु करून माझी टेरीटरी मार्क करायची असते. नैतर बाहेरच्या भुभुना कळणार कसे की ओडीन इथे राहतो आणि इथून त्याची हद्द सुरू होते.
मी शु करायचं म्हणलं की म्हणतो सारखी किती रे शु करतो, एकाच वेळी सगळी का करत नाही, सगळीकडे शिंपडत जातो.
त्याला मी एकदा शांतपणे बसून हे भुभुज चे शास्त्र समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याला काही कळलंच नाही.
आज इतका का भुंकतोय, त्रास होतोय का असे म्हणून स्टिक दिली आणि शांत बस म्हणाला थोडा वेळ.
आता काय बोलणार या माणसाला

मी घरी त्याच्या मागे मागे हिंडतो तेही त्याला आवडत नाही. तो टॉयलेट ला गेला मी दारात जाऊन बसतो आणि मग मला म्हणतो मी काय आता खिडकीतून उडी मारून पळून जाणारे का?
अरे म्हणलं मी शु करतो, पॉटी करतो तेव्हा समोर उभा राहून बघतोस. पॉटी बदलली असेल तर पोट बिघडलं आहे आज ओडीन चे, पातळ झालीय त्याला दही द्या, चिकन नको म्हणून सांगतो
मग मलाही त्याच्या तब्येतीवर लक्ष द्यायला नको का?

बाबाला ऐकूही तसे कमीच येते. बाहेरून गाडी गेली, शेजारचे गेट उघडून आले, पत्र्यावर मांजर उडी मारून आलं किंवा रस्त्यावरून भटके भुभु चालले आहेत यातलं त्याला काही म्हणजे काही ऐकू जात नाही. तो बिचारा आपल्या नादात असतो. मग मी माझं कर्तव्य म्हणून सगळं त्याला सांगायला जातो तर माझ्यावरच ओरडतो
ओड्या आवाजाने कान किटले माझे, प्रत्येक गोष्टीवर भुंकलं पाहिजे का?
घ्या म्हणजे मदत करतोय ते कुठेच गेलं
अवघड आहे

ओडीन डायरी
पुढे चालू

मला माझ्या लहानपणीचे काही आठवत नाही पण मी आईचे दूध पिताना माझ्या भावना बहिणीशी मस्ती करायचो आणि नंतर एकमेकांना चावा चावी करत दमून एकमेकांच्या अंगावर झोपी जायचो. कसले मस्स्त दिवस होते.
माझ्या खऱ्या बाबांना मी कधी पाहिले नाही पण ते चॅम्पियन आहेत असे सगळे म्हणतात. मी त्यांच्यावर गेलोय म्हणे. म्हणजे मलाही चॅम्पियन व्हायला हवं.
आताचा बाबा मला बघायला आलेला तो दिवस पण आठवतोय. आई पण होती सोबत. आम्ही ते दारातून आत आल्यावर कोण आलंय म्हणून पळत आलो तर आई किंचाळून बाहेरच्या बाहेर पळून गेली. पण बाबा शूर होता तो काही पळाला नाही. तो उलट मांडी घालून खाली बसला. मग आम्ही सगळ्यांनी त्यावर हल्ला केला. याला पार आडवा करू असे म्हणत आम्ही सात आठ जण तुटून पडलो तर तो गुदगुल्या झाल्यासारखा हसायला लागला.
मग आईची कुमक आली पण झालं उलटंच. बाबाने तिला मानेला, गळ्याला खाजवायला सुरुवात केली आणि आई पघळली. मी तिला सांगत होतो की अटॅक कर तर उलट ती त्याला चाटायला लागली.
मी म्हणलं आता आपल्यालाच अटॅक करावं लागणार म्हणून जोरात त्याचा पायाचा अंगठा चावला तर त्याने मला उचलूनच घेतले.
मी अधांतरी असतानाच त्याने मला उलटा पालटा करून तपासले. माझे कान, पंजे, शेपूट, फर
मी फिस्करून सांगत होतो मला खाली ठेव नैतर तुझी खैर नही पण तो म्हणाला मला हे पिल्लू आवडलं. मी याला घेतो.
मग आईच्या बाबांनी माझ्या गळ्यात रिबीन बांधली आणि म्हणाले अजून दूध पितोय तो, थोडा मोठा झाला की घेऊन जा.
मला काही कळलं नाही पण कुठेतरी घेऊन जाणार हे कळलं आणि मी त्या रात्री आईला जास्तच बिलगून झोपलो

01FC472RN2FDP9F3S1TZMR05AK.jpg

तर अखेरीस तो दिवस उजाडला जेव्हा मला बाबा न्यायला आला. त्यासोबत एक छोटा मुलगा होता, तो बाबाचा मुलगा दर्शन, म्हणजे माझा भाऊच. दर्शन असेही नाव म्हणायला अवघड, त्यामुळे मी त्याला दादया म्हणायला सुरुवात केली. तर दादूची आणि माझी अगदी लगेच गट्टी जमली कारण बाबा सारखा तोही खाली बसला आणि आमच्या सगळ्यांच्या अटॅक ला हसत हसत खेळवत राहिला.
जेव्हा जायची वेळ झाली तेव्हा माझ्या आईला त्यांनी एका खोलीत कोंडून ठेवलं, तिला बहुदा कळलं असणार कारण ती भुंकून भुंकून रडत होती. मला त्यांनी न्यायला एक प्लस्टिक ची टोपली आणली होती आणि त्यात मऊ पांघरूण घातले होते. मी पहिले बसलो आरामात पण नंतर त्यांनी गाडी सुरू केली तशी माझी घाबरगुंडी उडाली. तो सगळाच अनुभव फार भयानक होता. गाडी गदागदा हलत होती, बाहेरून कर्कश्य आवाज येत होते, आणि मला हे लोकं माझ्या आई आणि भावंडांपासून कुठेतरी लांब घेऊन चालले. मग मी मोठ्याने हेल काढून रडायला सुरुवात केली. बाबा माझ्याशी बोलत होता काहीतरी पण मला टोपलीत ते काहीही कळत नव्हतं आणि प्रत्येक हदऱ्याला मी जोरजोराने आवाज काढत होतो.
शेवटी कसातरी तो प्रवास संपला.
घरी आलो तेव्हा मी जरा शांत झालेलो आणि मग बाबाने टोपली उघडली तेव्हा टुणकन बाहेर उडी मारली.
बाबा म्हणत होता त्याला शांत बसू देत पण दादूला खेळायचं होतं माझ्याशी.
मी मग सगळं घर हिंडून पाहिले, हॉल, सोफे, डायनिंग टेबल, मग पॅसेज, मग बेडरूम आणि पुढे किचन. इथे बरेच मस्त मस्त वास येत होते. पुढे माझा मुक्काम इथेच जास्त असणार होता पण त्यावेळी मी एकदम कुतूहलाने सगळं फिरून बघत होतो. त्यांनी माझ्यासाठी एक बॉल पण आणला होता, तो थोडा वेळ खेळलो.
सगळेजण मी काय करतोय याच्याकडे बघत होते,मला अजिबात सवय नव्हती अशी कारण आमच्या सात आठ जणांच्या गोंधळात कोणा एकाकडे लक्ष द्यायला आईला फुरसत नसे.
त्यांनी माझं नाव ओडीन ठेवलं, म्हणजे काय कुणास ठाऊक पण मी काय अजिबात त्याना दाद दिली नाही. आईने आम्हाला काही नाव दिले नव्हते, ती मुळात जास्त बोलायची नाही. ती कुशीवर पसरली की आपल्याला दुदू मिळतं आणि उठून उभी राहिली की दुदुची वेळ संपली इतकंच आमच्यात कळत होतं. नाही म्हणायला आमच्यात भांडणे आणि चावा चावी झाली की ती भुंकून आम्हाला ओरडत असे पण म्हणून आम्ही काही तिचे ऐकत असू असे नाही.
आता इथे आई नव्हती आणि वेगळेच लोकं होते ज्यांना बाबा अहो बाबा म्हणत होता आणि त्याची एक आई पण होती. मला हे सगळं लक्षात ठेवायला खूप अवघड होतं म्हणून मी त्यातल्या त्यात ओळखीचा बाबा म्हणून त्याच्या मागे हिंडत राहिलो.
भूक लागल्यावर काय हाही मोठा प्रश्न होताच पण तो लगेच सुटला कारण त्यांनी एका बाउल मध्ये डॉग फूड मऊ करून कुस्करून दिले.
अरेच्या हेच सेम आम्ही तिकडे खात होतो, कारण नंतर आमचे दात लागायला लागले म्हणून आईने दुदु देणं बंद केले होते. बाबाने तिथूनच एक पिशवी उचलून आणलेली मला माहिती नव्हतं.
बाउल मध्ये दिलं की आम्ही आक्रमण म्हणून त्यावर तुटून पडत असू. तोच सेम खाऊ इथेही आहे म्हणल्यावर मला आलेलं टेन्शन कमी झालं.
आणि बाउल पुढ्यात येताच मी गुरगुरत त्यावर झडप घातली. आमच्यात जो दांडगाई करून पुढे घुसेल त्याला जास्त खाऊ मिळत असे तीच ट्रिक इथेही वापरली.
पण बाबा म्हणाला अरे सावकाश खा, तुझ्याचसाठी आहे सगळं, आम्ही कोणी खाणार नाहीये.
पण मी रिस्क घेतली नाही, इतकं मस्त खाणं समोर आल्यावर कोणीही तुटून पडेल. मी मिनीटभरात सगळा बाउल चाटून पुसुन स्वच्छ केला आणि अजून हवं म्हणत बाउल चावत बसलो पण बाबाने तो उचलून वर ठेऊन दिला.
थोडा वेळ असाच गेल्यावर मला दुसरे टेन्शन आले पॉटी चे. तिकडे आई घराबाहेर जाऊन करून यायची आम्ही पण रांगेने जाऊन मोकळं व्हायचो. इथे आता बाहेर कुठे हेच मला कळत नव्हतं.
पण दादू हुशार होता, त्याने थोडा वेळ गेल्यावर मला उचलून अंगणात नेले. तिथे बरीच झाडे, सायकल, एक टायर आणि चावता येतील अशा बऱ्याच गोष्टी होत्या. पण त्यांच्याकडे नंतर बघता येईल म्हणत मी मोकळा झालो.
गुड बॉय, एकदम मस्त पॉटी ट्रेन झालेला आहे हा असं कोणीतरी म्हणलं.
मला भारी वाटलं, आपण काहीतरी झकास काम करून आलो असं दाखवत मग मी रुबाबात हिंडलो.
दिवस असाच नव्या नव्या गोष्टी चावून बघण्यात गेला पण रात्र झाली तशी मला आईची आणि भावा बहिणींची आठवण यायला लागली. त्याना कळलं असेल का मी कुठे आहे, काय करतोय, कसा आहे?
मला खूपच आठवण यायला लागली तसं मी पुन्हा एकदा भोकाड पसरले. बाबा झोपण्याच्या तयारीत होता. तो पळत पळत आला आणि मला उचलून घेतलं.
एक मऊ मऊ पांघरूण अंगावर घेतलं आणि मला त्याच्या मांडीवर अलगद ठेऊन मानेवर, डोक्यावर हात फिरवायला लागला.
मला रडू पण येत होतं आणि बरं पण वाटत होतं. मुसमुसु करतच मी झोपी गेलो.

01FC47CRYY8TMQ910YT22975CR.jpg

अरे वा ! डायरी लेखन सुरू केलं का ? तत्परतेनं नवीन धागा काढून लिहिलंत हे ब्येष्ट केलंत. धन्यवाद !! छानच लिहिलंय.. फोटोही आवडला.
>> तो टॉयलेटला गेला मी दारात जाऊन बसतो आणि मग मला म्हणतो मी काय आता खिडकीतून उडी मारून पळून जाणारे का? >> अगदी अगदी Happy

वाह! किती गोंडस फोटो आहेत.
तो वरच्या फोटोतला ओडीन कोणता नक्की तुमच्या अंगठ्याला चावतोय तो का? पुढे रिबीनवाला? ते टिपीकल ओडीन भाव दिसतायत अगदी.

कित्ती गोड लिहिलयस Happy
ओडीनची भाषा कळलीय हो तुला अगदी
मी घाबरते भूभूंना पण हे वाचताना फार छान वाटलं

गोड लिहिलंय. त्याला आणायच्या क्षणापासूनचा ट्रॅक ठेवलाय हे भारी आहे. खूप समजून उमजून त्याला घेतलेलं दिसतंय.

मला यांची भी ती वाटते, पण तुमचं भु अगदी निरागस दिसतंय.

पुस्तक छापायचं पोटेन्शल असलेलं लिखाण आहे.

हे किती छान आहे.
मस्त.ओडिन चं घरी आल्यावरचं वाचून एकदम भावनिक झाले.>>>>> हो अगदी अगदी. खुप वाईटच वाटलं. पण एंड रिझल्ट चांगला आहे ना त्यामुळे नो प्रॉब्लेम. तुमचं आणि ओडिनचं नातं आवडतं. वरती कोणीतरी म्हंटलय कि ओडिनच्या मनातलं कळतं तुम्हाला, खरंच आहे.

छान लिहिताय! वाचायला आवडेल पुढचं पुढचं.

यावरून आठवलं. वि.वा. शिरवाडकर आपल्याला कथाकार म्हणून फारसे माहिती नसतात, पण त्यांनी उत्कृष्ट कथाही लिहिलेल्या आहेत आणि त्यातल्या काही तर चक्क विनोदी आहेत. तर त्यापैकी एक कथा म्हणजे 'कामयाब'. एका श्वानाच्या नजरेतून लिहिलेली ही अतिशय भन्नाट कथा आहे!

सगळ्यांना धन्यवाद

चंद्रा - तुम्हाला स्पेशल थँक्स, तुमच्याच सल्ल्याने लिहावं वाटलं. आणि मलाही मज्जा येतीय लिहायला
आता प्रश्न तोच आहे काय लिहावं कारण इतक्या गमतीजमती आहेत त्याच्या

अंजली - नाही यातला कुठलाच नाहीये, तो त्यावेळी माझ्या मागून हल्ला चढवत होता,पण ते सगळे सारखेच दिसतात किंवा दिसायचे. हा फोटो नंतर चा आहे, कारण नुसतंच बघायला गेलो तर फोटो काढू दिला नाही. इव्हन पिल्लांना हात लावन्यापूर्वी पण त्यांनी साबणाने हात धुवायला लावले. त्यांना लगेच इन्फेक्शन होऊ शकत बाहेरून आलेल्या लोकांचे. ही जेमतेम एक महिन्याची पिल्ले होती. ओडीन ला त्यानंतर एक महिन्यांनी म्हणजे तो 60 दिवसाचा झाला तेव्हा घेऊन आलो.

अदिती - Happy हो ना, मला अक्खा लॉटच उचलून आणावा वाटत होता, पण मग मला त्यांच्यासक्त घराबाहेर काढलं असतं म्हणून मोह टाळला

पुस्तक छापायचं पोटेन्शल असलेलं लिखाण आहे. - बापरे, नई हो, आपलं जे सुचतय ते खरडतोय इतकंच

अनु आणि धनुडी - त्यांना आईपासून वेगळं करणं त्रासदायक होतं खर पण त्यांना इतक्या पिल्लांना सांभाळणे शक्य नव्हते. यांचा मेंटेनन्स आणि खर्च लै असतो, त्यामुळे कधीना कधी वेगळीकडे द्यावं लागलाच असतं. आणि ओड्या मस्त मजेत आहे, ज्यांच्याकडून आणला त्यानीही पोचपावती दिली की तुम्ही एकदम मस्त मेंटेन केलाय, तब्येत, फर ची क्वालिटी आणि मसल्स छान झालेत
सो आम्ही पालकत्वची परीक्षा पास झालोय

वावे - हे नव्हतं माहिती, मला वाचायला आवडेल, तसेच ते सुधा मूर्तींचे पुस्तक पण आता वाचायचं आहे

त्याबद्दल वाचून आणि युट्युब वरचे व्हीडिओ बघून गेलो होतो की पिल्लाची निवड कशी करावी
तो किती ऍक्टिव्ह आहे, पंजे कसे आहेत, कानाची आणि डोकयाची ठेवण
जरी ते दिसायला सगळे सारखे असले तरी त्यांच्यात कमी जास्त असतात. मी जवळपास तासभर त्यांच्यासोबत घालवला, आणि सोबत माझा मित्र केदार ज्याचा डॉग फूड श्वान चा बिझनेस आहे, तो त्यातला जाणकार आहे. त्याच्या सल्ल्याने निवडला.
ओड्या अगदी ऍक्टिव्ह होता पण हायपर नव्हता, मस्ती सॉलिड सुरू होती त्याची. त्यामुळे वाटलं हाच घ्यावा

ओडीन डायरी -४

नव्या नवलाईचे दिवस भराभर संपले. मला काही दिवस आईची आठवण येऊन रात्री रडू यायचं पण बाबा पांघरूण घालून थोपटून झोपवायचा आणि कधी डोळे मिटायचे कळायचं नाही.
असाही माझा दिवस लवकर सुरू व्हायचा आणि माझी बाबाकडे भुणभुण सुरू व्हायची. तो वैतागायचा आणि म्हणायचा अरे आताशी उजडताय, झोप की जरा वेळ.
पण मला पॉटी आलेली असायची, मस्त झोप झालेली असायची, त्यामुळे मला जाम उड्या मारून मस्ती करायचा मूड असायचा. पॉटी झाली की लगेच पोटात खड्डा पडायचा की लगेच खायला हवं असायचं.
बाबाला या सगळ्याची अजिबात सवय नव्हती, तो रात्री जागून उशिरा उठणारा. आता मी पूर्णपणे त्यावरच अवलंबून असल्याने बिचारा झोपेतून उठून जांभया देत कसेतरी मला खेळवायचा. त्यात मी दमुन झोपेन आणि त्यालाही झोपायला मिळेल असा प्लॅन असायचा. पण माझ्या एनर्जीची त्याला बिलकुल कल्पना नव्हती.
अजूनही नाहीये म्हणा, आम्ही सकाळी संध्याकाळी फिरायला जातो, अंगणात खेळतो, कॅनाल वर पोहतो तरी मला रात्री बॉल दिसला की खेळायचा असतो. किंवा आता टोटो टर्टल आणलं आहे त्याच्याशी. बाबा म्हणतो अरे झोप की लेका, अजुन किती खेळणार. खायचं प्यायचं आणि झोपून झालं की खेळायचं. जरा घरातली कामं तरी कर.

तर सकाळ चा प्रोग्रॅम झाला की आम्ही खाली यायचो. अजून मला जिने उतरायला जमत नव्हते म्हणून बाबा उचलून खाली आणून हॉल मध्ये सोडायचा. तिकडे आजो आणि आजी चहा पीत असायचे. ते चहा सोबत जी बिस्किटे खातात ती खूप मस्त असतात असा नुकताच मला शोध लागला होता. त्यामुळे मी लुटूलुटू चालत, सोफ्यावर पंजे ठेऊन (तेव्हा माझी उंची अगदीच कमी होती, त्यामुळे मी कितीही प्रयत्न केला तरी सोफ्याच्या खालीच माझं डोकं राहत असे) बिस्कीट देतात का बघत असे.
ते बाबाची नजर चूकवून हळूच एखादा तुकडा द्यायचे कारण मला ही बिस्किटे द्यायची नाहीत असं त्याचं म्हणणं होतं. पण ते बाबा चे आई बाबा होते आणि ते बाबाला पण ओरडू शकतात हे माहिती असल्याने मी खुशाल बाबाकडे दुर्लक्ष करून मिळेल तो तुकडा मटकवायचो.
पण सगळ्यात मज्जा आईची असायची. ती पहिल्यादा बघायला आलेली तेव्हा घाबरून पळाली होती. तेव्हा मला वाटलं आमच्या गॅंग ला घाबरून पळाली, आम्ही होतोच तसे डेंजरस. Happy
पण नंतर लक्षात आलं तिला मुळातच भुभु ची भीती वाटायची. मी खेळताना जवळ गेलो तरी किंचाळत असे. मला तसे तिच्या वाट्याला जायचं काही कारण नव्हतं कारण घरात बऱ्याच गोष्टी आणि बरेच लोकं होते. पण तिच्या गाऊन वर लाल किंवा निळ्या रंगाचे डिझाइन होतं ते मला जाम आवडायचं. आणि ती चालताना ते हललं की मला ते पकडून ठेवावं वाटायचं आणि मी त्याच्या मागे पळत जायचो.
मी असं काही करायला गेलो की तिची भयंकर तारांबळ उडत असे. एकदा तर ती घाबरून कॉट वर चढून उभी राहिली. मी तिला सांगत होतो की मी काही चावत नाहीये तुला, मला फक्त ते डिझाइन बघू दे. पण ती अजून घाबरली, बाबाला म्हणाली तो भुंकतोय माझ्यावर. मी म्हणलं होतं घरी आणायचा नाही कुत्रा. तो मला एक दिवस चावणारे.
बाबा समजावून सांगत होता की तो खेळतोय फक्त, दात लावणार नाही. मी लगेच होकार दिला पण तिला ते काही कळलं नाही, ती म्हणे बघ तो अजून जोरात भुंकतोय.
मला त्या दिवशी लक्षात आलं की या लोकांना आपली भाषा कळत नाही. तरी मी प्रयत्न सोडत नाही, कधीना कधी त्यांना कळेलच आणि मग मी आणि बाबा मस्त गप्पा मारू.
हां, तर आईचे सांगत होतो. तिने माझा धसकाच घेतला होता. मी येताना दिसलो की ती आधीच कुठेतरी चढून बसायची. आजी त्यामानाने अगदीच कुल होती. मी तिच्या गाऊन ला धरून फरफटत गेलो तरी काही ओरडायची नाही, फक्त गाऊन फाडलास तर तुझ्या बापाकडून वसूल करणारे लक्षात ठेव, म्हणायची.
असेही बाबा नसेल तर तीच मला खायला द्यायची आणि तिचे माझ्यावर बारीक लक्ष असायचं, माझ्यावर आणि दादू वर पण. त्यामुळे आम्ही दोघेही तिला दबुन असायचो.
आजोबाची गोष्ट वेगळी होती. ते टीव्हीसमोर चटई टाकून पडत दुपारी. ती चटई दिसली की मी कुठे असेन तिथून पळत यायचो आणि चटई वर उडी मारायचो. आणि आधीच टाकली असेल तर त्यांना खेटून झोपून मी हळूहळू ती कुरतडत राहायचो. मी इतके हाल केले त्या चटई चे की शेवटी त्याची पार रया गेली आणि त्यांनी ती टाकूनच दिली. असेही ते झोपले असतील तर त्यांच्या पोटावरुन इकडून तीकडे जायला मला भारी मज्जा यायची. मग मधेच दचकून ते ओरडायचे मला पण मी काही मनावर घ्यायचो नाही.
एकदा तर असली भारी मजा, बाबा ऑफिसला जाताना सांगून गेला की ओडीनला संध्याकाळी अंगणात चकरा मारा म्हणजे दमून झोपेल. तर आजोबांनी मी काहीतरी उद्योग करीन म्हणून चक्क मला कडेवर घेऊन चार पाच चकरा मारल्या आणि घरात आणून सोडलं. बाबाला ही गंमत कळली तेव्हा तो हसायलाच लागला.
आता दादू बद्दल, पण त्याची आणि माझी गंमत पुढच्या भागात सांगतो.

withgrandparents.jpg

Pages