एका भुताचा शोध

Submitted by गोडांबा on 9 July, 2021 - 10:42

कोरोनामुळे सध्या घरीच आहे. अभ्यास करून कंटाळा आल्यावर असंच काहीतरी वेगळं वाचावं म्हणून रस्किन बॉन्ड वाचत होतो . एका कथेचं नाव होतं - old graveyard at sirur....( By C.A Kincaid ) सिरुर वाचून जरा उडालोच... सिरुरची कथा ते पण रस्किन बॉण्ड च्या पुस्तकात?? छे छे हे दुसरं काहीतरी असेल म्हणून पुढे वाचायला सुरुवात केली .. forty miles from POONA आणि आश्चर्य सत्यात उतरलं हे पुणे नगर रोडवरचंच शिरूर ... तर कथा होती अशी की पुण्याच्या एका इंग्रज अधिकार्याला शिरूरला असताना स्थानिक लोक एका ठिकाणी नमस्कार करून जाताना दिसले . पूर्वी इथे पुना हॉर्स ची तुकडी होती आणि त्यातल्या एका इंग्रज अधिकार्‍याची तिथे समाधी होती. स्थानिक लोक एका ख्रिश्चन समाधीच्या पाया कसे पडतात हे पाहून त्याची उत्सुकता जागृत झाली. त्याने जरा चौकशी केली मग त्याला कळले की ही एका कर्नल Hutchings नावाच्या अधिकार्‍याची समाधी होती. त्याने एका तरुण विधवेला सती जाण्यापासून वाचवले होते आणि तिच्याशी लग्न केले होते. त्यानंतर त्या विधवेच्या घरच्यांनी धर्म भ्रष्ट झाला म्हणून कर्नलची हत्या केली. हे पाहून त्याच्या बायकोने आत्महत्या केली. त्यानंतर लोकांनी त्यांची समाधी बांधली. त्याचे भूत पौर्णिमेला त्या समाधी वर येऊन बसत असे आणि कधीकधी त्याची बायको सुद्धा त्याच्या शेजारी येऊन बसत असे . लेखकाला सांगण्यात आले की पुण्यात रिसालदार शिंदे याविषयी माहिती देऊ शकतील. तेव्हा पुण्यात गेल्यावर शिंदेंना भेटल्यावर त्यांनी सांगितलं की विधवेच्या घरचे आमचे पूर्वज होते व त्यांनी अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याची हत्या केली

हे सगळं वाचल्यावर हायला ....आपल्या कधी ही कथा ऐकण्यात आली नाही .नेमकं खरं काय आहे म्हणून माझी उत्सुकता चाळवली. म्हणलं चला हा कर्नल आहे तरी कोण आणि त्याची समाधी जरा शोधूया आणि या भुताचा शोध चालू झाला... गुगल वर त्याचं नाव टाकून बघितलं पण काही हाती लागलं नाही. archive.org विषयी ऐकून होतो . तिथे नाव सर्च केलं तिही अपयश पदरी आलं . मग sirur असं टाकलं तर 1818 च्या काळातली बरीच कागदपत्रे मिळाली. ह्यात काही सापडतय का जरा म्हणून एक-एक चाळायला सुरुवात केली तर 1818च्या भीमा कोरेगाव युद्धाची माहिती होती. ह्या युद्धात कर्नलची माहिती मिळेल म्हणून ते वाचून बघितलं पण त्यातही कर्नल Hutchings सापडला नाही. खाली Imperial gazetteer of India नावाचं एक पीडीएफ होतं, त्यात शिरुर सर्च केल्यावर Hutchings सापडला नाही, पण तिथे एका समाधीविषयी माहिती होती-- .....

कर्नल Wallace नावाचा एका अधिकाऱ्याची समाधी शिरूरच्या दक्षिणेला दोन मैलावर आहे. तिथे हिंदू लोकांची जत्रा भरायची ..ब्राम्हण आणि मारवाडी सोडून इतर सर्व लोक त्याची पूजा करायचे त्यांच्या दृष्टीने कर्नल Wallace शिरूर चा रक्षणकर्ता होता. लोक त्याला सत्पुरूष मानायाचे ...मला हे प्रकरण भारी इंटरेस्टिंग वाटायला लागलं . कर्नल Wallace तर सापडला आता मला त्याच्या बायकोविषयी काही सापडते का याची आस लागली, मात्र ती आणि तिच्या घरच्यांविषयी काही संदर्भ मिळाले नाहीत. एके ठिकाणी "British association for cementeries" चं "चौकीदार" नावाचं एक पीडीएफ मिळालं . त्यात थोडीशी माहिती मिळाली, त्याबरोबर त्या समाधीचा फोटोही मिळाला . माझ्या मनाचं आता बऱ्यापैकी समाधान झालं होतं,परंतु अजूनही त्याची ख्रिश्चन समाधी नेमकी आहे कुठे ह्याचं मला लोकेशन हवं होतं. माझ्याकडे फक्त two miles south of sirur एवढंच लीड होतं. गुगल मॅपवर काही संदर्भ मिळत नव्हते आणि ह्या शिंदे प्रकरणाचा पण संदर्भ लागला नाही. घरी आणि शेजारी विचारलं त्यांनाही याविषयी माहित नव्हतं. मग मायबोली आठवलं... आणि आता इथे पोस्ट करत आहे. जाणकारांनी पुढे माहिती द्यावी, माझ्या या छोट्याशा शोधमोहिमेत मला खूप आनंद अन एक्साइटमेंट मिळाली ती तुमच्या बरोबर शेअर करत आहे

सोबत
1.इम्पेरियल गॅझेटिअर मधील माहिती
2.चौकीदार या लेखातील उतारा
3. Ghost stories from The Raj- Edited by Ruskin Bond या पुस्तकातील कथा
जोडत आहे

(ता.क. - हा माझा माबोवर चा पहिलाच लेख आहे चुका झाल्या असतील तर हक्काने सांगाव्यात)
20210709_165544.jpg20210709_165754.jpg20210709_165832.jpgScreenshot_20210709-193406.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला आहे प्रयत्न. पूर्ण लेख नाही वाचला पण माझ्या शिरूरच्या परिचितांना पाहतो विचारून. माझ्या सम्प्रदायाशी निगडीत समाध्या शोधताना मलाही बरीच भटकंती करायचा योग आला होता. तुम्ही पुण्यात राहत असल्याने शिरूर फार लांब नाही, एखादी ट्रिप मारून बघा.