रेबॅन

Submitted by पलोमा on 20 June, 2021 - 00:54

हाडळीचा आशिक, रूपाली विशे-पाटील, निरु, rr38, अतुल,वावे, सामो, जाई,लावण्या, प्राची, जिज्ञासा , स्वाती२, रश्मी. संयोग ,पशुपत Rani_ आणि फारएण्ड. तुम्ही सर्वानी माझ्या पहिल्या वहिल्या “ मैं तुम्हे फिर मिलूंगी” या कथेचे भरभरून कौतुक केल्याबद्दल मनापासून आभार. Thank you so so much.

रेबॅन

“ पल, आमी खुबा रागानबीता.. एवढा संताप येतोय ना.... काय सांगू? एक उलट्या हाताने ठेऊन द्यावी असं वाटतंय. किती बेशरमपणे निरखत असतो तो आपल्याला, कधी मुली पहिल्याच नाहीत याने.” माझी रूममेट मुनमुन म्हणत होती, . “चल, त्याच्या घरी जाऊ आणि खडसावू. अशा बेशरमपणाने बघत राहतो सारखा आपण बाहेर पडलो कि " . ती उठली तसं मी तिला थांबवलं, "जाऊ दे ग मुन, आपल्या अंगाला काय भोकं पडतायत ? आपणच बघायचं नाही त्याच्याकडे. आपल्या कामाशी मतलब. फार मुश्किलीने मिळालंय गं हे घर भाड्यानं.. जर आपण त्या मुलाबद्दल तक्रार करायला गेलो तर कोणीही आपल्यावर विश्वास ठेवणार नाही.” मी तिला समजावलं. पुणे आमच्यासाठी अपरिचित शहर. एकतर अविवाहित मुलींना घरं भाड्याने मिळत नाही. भाड्याचे घर शोधतांना, आमच्या तोंडाला फेस यायचा. आमच्याकडे बघूनच घरमालक किंवा मालकिणी तोंड वेंगाडायचे. त्यात मालकिणी तर जास्तच. प्रत्येकीच्या डोळ्यात स्कॅनर बसवलाय चष्म्याच्या जागी असं वाटायचं. आणि त्यातलाच हा एक मुलगा. घर मालकिणीचा. फरक म्हणजे चष्म्याच्या जागी हा गॉगल घालतो. सकाळी लवकर उठून ऑफिस गाठायचं म्हणून आमची घाई, आणि त्या वेळी हा गॅलरीची जाळी धरून उभा असायचा. सुरुवातीला मी आणि मुनमुनने एवढं काही लक्ष दिलं नाही पण हे पहिल्या आठवडाभर रोज चाललं आणि मग सोमवार पासून परत. तो जणू काय आमची ऑफिसला जायची वेळ अगदी बरोबर माहीत असल्यासारखा त्या जाळीच्या मागे उभा राहायचा. कानावर हेडफोन, एका हातात डंबेल्स आणि आपण रोखून पाहतोय हे कळू नये म्हणून किंवा पूर्वेकडून येणारी सूर्याची किरणे थेट डोळ्यात घुसू नये म्हणून कदाचित डोळ्यावर गॉगल चढवून आमच्याकडे नजर रोखायचा. दोन्ही कामं होत असावीत. बॅन द सन रेज, रेबॅन आणि बर्ड वॉचिंग. एक पंथ दो काज. मुनमुनला एकदा एवढा राग आला, मला म्हणाली, "पल, एक मोठा दगड उचलून फेकू का गं त्याच्यावर?"

त्या शुक्रवारी नळाला पाणी उशीरा आलं. सकाळी उठून डबा तयार करायला उशीर झाला. कसं तरी आवरून आम्ही गडबडीत स्कूटी बाहेर काढली आणि गेट बाहेर पडताना समोरच पडलेल्या विटेवर धडकून स्कूटी उलटी झाली. माझा कुर्ता फाटून पाठ उघडी पडली आणि ते लेगींग्ज.. सगळी अंतर्वस्त्रं दिसण्या इतपत उघडं. माझी नजर वर गॅलरीत गेली तर हा आपला उभा आमच्याकडे बघत. हसत होता की काय कोण जाणे आमची फजिती बघून. मला राग, रडू, शरम अशा सगळ्या भावनांचा कल्लोळ होऊन घश्यात हुंदका दाटला. परत जाऊन कपडे बदलले आणि शपथ घेतली की परत लेगींग्ज नावाचा प्रकार घालायचा नाही. खाली येऊन स्कूटी चालू केली तर समोरचं टायर फिरू लागलं तसं ते पत्र्याला घासून त्याचा चुईं चुईं आवाज यायला लागला. रस्ताभर आम्हाला वाटत होतं की सगळे लोक आमच्याकडेच बघून हसतायत. ऑफिस जवळच्या गॅरेजमध्ये स्कूटी रिपेअर करायला दिली. त्या दिवशी ऑफिसमध्ये कामाचा सगळा विचका झाला, आणि साहेबांनी ओव्हरटाईम करायला लावला. मी मुनमुनला फोन करून तिला घरी जायला सांगितलं. मी ऑफिस सोडलं तेंव्हां नऊ झाले. खराडीहून बस पकडून मी डेक्कनला उतरले तेंव्हा अकरा वाजले होते. मी झपझप पावले टाकत संभाजी पार्क समोर असणाऱ्या घराकडे चालू लागले. नंतर लक्षात आलं की कोणीतरी माझ्या मागून येतंय. मला जरा घाबरल्यासारखं झालं आणि मी जवळ जवळ पळत असल्यासारखी झपझप पावलं टाकत फडणीस क्लिनिकला लागून असलेल्या गल्लीत शिरले. तो पण शिरला. रेबॅन तर नसेल?...... पाठलाग करणारी व्यक्ती आणि माझ्यातला अंतर कमी होत होतं . मी घराच्या गेटजवळ पोचले तसं त्या व्यक्तीनं माझा हात धरला. " ए, सोड, सोड मला," मी त्याच्या हाताला हिसका देत जोरात किंचाळले. " ए कोण आहे रे? सोड तिला.. थांब साल्या येतोच खाली.." गॅलरीतून मोठ्याने आवाज आला. मी पाहिलं तर रेबॅन हातात पाण्याचा ग्लास घेऊन उभा. त्याचा दरडावणीच्या सुरातला आवाज ऐकून ती व्यक्ती पळाली. मी पण गेट बंद करून पट्कन खोलीत घुसले आणि मुनमुनच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडू लागले. मग तिला सगळी हकीकत सांगितली.

" खरंच की गं, " मुनमुन म्हणाली, " वाचवलं त्याने आज तुला."

" आपल्याला वाटतंय की त्याची नजर वाईट आहे. कदाचीत तो त्याच्या परीने आपल्यावर लक्ष ठेवत असावा असं पण होऊ शकतं. हो ना?" मी विचारलं.

" तसं पण असेल, " मुनमुन म्हणाली," आपण उगीच काहीतरी गैरसमज करून घेतो तसं असेल. उद्या आपण त्याला थँकयू म्हणायला जाऊया."

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघी वरती गेलो. डोअर बेल वाजवली. काकूनी दरवाजा उघडला आणि आम्हाला ओळखल्यावर हसल्या आणि ‘आत बसा’ म्हणाल्या. आम्ही सोफ्यावर बसलो. तिथून गॅलरी दिसत होती. रेबॅन कानात इअर फोन घालून डंबेल्स उचलत कसरत करत होता. आमच्याकडे त्याने पाहीलेही नाही. आम्ही त्याला ' नमस्ते' म्हणालो पण त्याने काहीच उत्तर दिले नाही. काकूंनी आमच्या हातात चहाचे कप दिले आणि एक कप गॅलरीत नेत म्हणाल्या, " विनय बेटा, गुलाबाच्या कुंडी जवळ कप ठेवलाय हां. जपून."

त्या वळल्या आणि मग आमच्याकडे बघून स्मित करत म्हणाल्या, " विनयला लहानपणापासूनच दिसत नाही. दृष्टिहीन आहे तो. ब्लाइन्ड."

मी आणि मुनमुन एकमेकींकडे बघत राहिलो. मला एकदम गलबलून आलं. मुनमुनचे डोळे पण पाणावलेले दिसले.

………………………

Group content visibility: 
Use group defaults

>>>अंदाज आला होता. अपेक्षित शेवट आहे. पण आवडली.>>>
सहमत
तुमची पहिली कथा सुद्धा वाचली, छान शैली आहे लेखनाची
पुढील लेखनासाठी शुभेच्छा

छान आहे. आधी पोस्ट केली तेव्हा वाचली नसावी. आता खूप महिन्यांनी मायबोलीवर आले तेव्हा मिळाली.