टोक्यो ऑलिंपिक्स २०२१

Submitted by Adm on 16 June, 2021 - 16:11

दर चार वर्षांनी होणार जगातला सर्वात मोठा क्रिडा सोहळा अर्थात उन्हाळी ऑलिंपिक गेम्स यंदा पाच वर्षांनी होणार आहे. यंदा हा सोहळा जपानमधल्या टोक्यो इथे पार पडणार आहे. २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान ह्या स्पर्धेत आत्तापर्यंतचे सर्वाधिक क्रिडाप्रकार खेळले जातील तसेच तब्बल ४२ ठिकाणी सामने रंगतील. ही स्पर्धा जेमतेम दिड महिन्यावर येऊन ठेपली असूनही स्पर्धेवर कोव्हिड महामारीमुळे अनिश्चिततेचे सावट आहे.

ह्या काळातही शक्य होईल तशी खेळाडूंची तयारी मात्र जोरात सुरू आहे. अमेरिकेत तसेच इतर देशांतही ऑलिंपिक ट्रायल सुरू झाल्या आहेत.
हा धागा वातावरण तापवण्यासाठी. स्पर्धा अजून जवळ आली/सुरू झाली की गेल्या दोन वेळांप्रमाणे अ‍ॅडमिनांना वेगवेगळा ग्रुप काढण्याची विनंती करता येईल.

ही वेबसाईटः https://olympics.com/tokyo-2020/en/

अजून लिंक सापडतील तश्या मी अपडेट करेन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर झाल पराग तु हा धागा सुरु केलास.

मी या शनिवारी ओमाहा, नेब्रास्काला अमेरिकन ऑलिंपिक्स स्विमिंग ट्रायल्सला जाणार आहे.

मी २००८ च्या बैजींग ऑलिंपिक्सच्या निमित्ताने जुन्या मायबोलिवर (२००९ च्या आधीची मायबोली) ऑलिंपिक्सबद्दलच्या बर्‍याचश्या रंजक गोष्टी लिहिल्या होत्या. त्यातलीच एक गोष्ट इथे टोकियो ऑलिंपिक्सच्या निमित्ताने पुन्हा टाकत आहे. गोष्ट थोडी मोठी आहे पण शेवटपर्यंत वाचली तर नविन मायबोलिच्या वाचकांना ही गोष्ट आवडेल अशी अपेक्षा.

अजुन नविन गोष्टीही इथे लिहायचा प्रयत्न मी जरुर करणार आहे.

मी आजपर्यंत ऑलिंपिक्समधील बर्‍याच स्पर्धांमधल्या स्फुर्तीदायक व मनोरंजक गोष्टी इथे लिहिल्या पण जलतरण स्पर्धा... ज्या मला स्वत्:ला खुप प्रिय आहेत.. त्याबद्दल एकही कथा मी अजुन लिहीली नाही. आज मात्र मी तुम्हाला ऑलिंपिक्स जलतरण स्पर्धेत घडुन गेलेल्या एका अजरामर शर्यतीबद्दल सांगणार आहे. ही शर्यत ऑलिंपिक प्रेमींच्या मनात एक कायमची स्मृती करुन गेली आहे. त्या अजरामर जलतरण शर्यतीच्या स्मृतीला उजाळा देण्याचा माझा हा एक प्रामाणीक प्रयत्न...

तर चला मंडळी.... या 'रेस ऑफ़ द सेंचुरी' साठी जाउयात १९७६ च्या मॉन्ट्रियाल ऑलिंपिक्सच्या जलतरण तलावात. पण या शर्यतीबद्दल सांगण्या आधी शर्यतीची थोडी पुर्वपिठीका....

ऑलिंपिक्स जलतरण स्पर्धांचा उल्लेख करताना अमेरिकन जलतरणपटुंचा उल्लेखही त्याच श्वासात करण्याइतके प्रभुत्व आजतागयत अमेरिकेच्या पुरुष व महीला जलतरण पटुंनी या स्पर्धांमधे गाजवले आहे. १९२४ व १९२८ मधील जॉनी व्हॅसमुल्लर पासुन ते सध्याच्या मायकेल फेल्प्स नावाच्या "फ़्रीक!" पर्यंतच्या सर्व ऑलिंपिक्स जलतरण स्पर्धा अमेरिकेच्या जलतरणपटुंनी मिळवलेल्या विजयांनी ओतप्रोत भरल्या आहेत. तसे वर्चस्व गाजवण्यात पुरुषांमधे मार्क स्पिट्ज़,ब्रायन गुडेल, जॉन नेबर, राउडी गेन्स, मॅट बिऑंडी,टॉम जॅगर, गॅरी हॉल ज्युनिअर,लॅनी केझेलबर्ग एरन पिअरसॉल या अतिरथी महारथींनी मोट्ठा हातभार लावला आहे.महिलांमधे तो भार उचलला आहे डेबी मायरपासुन ते मेरि मेहेर, एमी व्हॅन डायकन,जेनी थॉमसन व जॅनेट एव्हान्स सारख्यांनी.

त्यांच्या या अश्या सार्वभौम ऑलिंपिक वर्चस्वाला अधुनमधुन जरुर आव्हान दिले गेले.. त्यात पुरुषांमधे प्रामुख्याने रशियाच्या ऍलेक्झॅंडर पॉपॉव्ह व डेनिस पेत्रेंकोव्ह, ऑस्ट्रेलियाच्या इयान थॉर्प(जो टोर्पिडो नावाने प्रसिद्ध होता!)व ग्रॅंट हॅकेट, वेस्ट जर्मनिच्या मायकेल ग्रॉस(ज्याच्या दोन्ही हातांची व्याप्ती ७ फ़ुटापेक्षा जास्त होती म्हणुन त्याला 'अल्बट्रॉस म्हणायचे!),हॉलंडच्या पिटर व्हान डन हॉगनबांड व हंगेरीच्या टॉमस डार्नी सारख्यांचा मोठा हात होता. त्यांनी बरेच वैयक्तीक विजय मिळवुन जगाची वाहवा मिळवली.पण एक संघ म्हणुन अमेरिकेच्या पुरुषांनी ऑलिंपिक्समधे नेहमीच अव्वल नंबर पटकावला आहे.

अमेरिकन महिलांच्या बाबतीत मात्र तेच म्हणता येणार नाही. जरी १९२४ पासुन ते १९७२ पर्यंत व १९९२ पासुन आतापर्यंत अमेरिकन महिलाच ऑलिंपिक्समधे सर्वात जास्त पदके मिळवली असली तरी.... १९७४ ते १९८८ या १४ वर्षांमधे अमेरिकन महिला जलतरणपटुंना एक संघ म्हणुन ऑलिंपिक्समधे कधीच पहिले स्थान मिळु शकले नाही!त्यांच्या वर्चस्वाला ती १४ वर्षे काटशह देणार्‍या होत्या... इस्ट जर्मनीच्या महिला! त्या दरम्यान कॉर्नेलिया एंडरपासुन(मॉंट्रियाल ऑलिंपिक्समधे चार सुवर्णपदके!) ते क्रिस्टीन ऑटोपर्यंत(सेउल ऑलिंपिक्समधे सहा सुवर्णपदके!)... इस्ट जर्मनीच्या महिलांनी ऑलिंपिक्समधे पदकांची नुसती लयलुट केली.... अलबत! ऍट द एक्स्पेन्स ऑफ़ अमेरिकन गर्ल्स!

अमेरिकन महिलांच्या पराभवाचे सत्र सुरु झाले १९७३ च्या विश्वस्पर्धांपासुन. त्यामुळे जोपर्यंत १९७६ साल उजाडले व अमेरिकन महिला जलतरणपटुंचा संघ जेव्हा मॉंट्रियालला येउन डेरेदाखल झाला तेव्हा त्यांचा प्रशिक्षक जॅक नेल्सन याच्या डोक्यात विचारांचे काहुर माजले होते... या इस्ट जर्मनीच्या महिलांना या ऑलिंपिक्समधे कसे थोपवायचे? गेल्या ३ वर्षांच्या हेड टु हेड कामगीरीवरुन अमेरिकन महिलांना चिअर अप करण्यासारखे त्याच्याजवळ काहीच नव्हते.. सर्व शर्यतीत इस्ट जर्मनीच्या महिला अमेरिकेच्या मुलींपेक्षा कमीत कमी एका सेकंदाने तरी वेगवान होत्या... एक सेकंद!....जो जलतरण स्पर्धेत युगासारखा असतो! कोच नेल्सन खुप संभ्रमात पडला होता... काय असेल या इस्ट जर्मन महिलांच्या प्रशिक्षणाचे रहस्य? तो काळ कोल्ड वॉरचा असल्यामुळे कम्युनिस्ट इस्ट जर्मनीच्या पोलादी पडद्यामागे त्या देशात काय चालले असते याचा बाहेरच्या जगाला सुगावा लागणे ही केवळ अशक्य बाब होती... पण एक गोष्ट कोच नेल्सनलाच काय.. पण सगळ्या जगाला दिसुन येत होती... या इस्ट जर्मनीच्या महीला एकसाथ सगळ्या अतिशय पुरुषी दिसत होत्या!.. इतक्या पुरुषी..म्हणजे हातापायावरचे भरमसाट केस... शरीराची ठेवण.. जास्तीचे... जे स्त्री शरीरावर क्रुत्रिम वाटतील असे पिळदार स्नायु..त्यांचा तो लो पिच मधला पुरुषी आवाज... की हे सगळे बघुन कोणाच्याही मनात संशय यायला जागा मिळावी की या महिला टेस्टास्टेरॉन सारखे पुरुषी हार्मोन्स तर घेत नाहीत ना? पण कोच नेल्सनकडे ते सिद्ध करायला काहीच पुरावा नव्हता. तो काळ ड्रग टेस्टींगच्या आधीचा असल्यामुळे ती गोष्ट कोणीच सिद्ध करु शकले नसते. म्हणुन ऑलिंपिक्सच्या स्पिरीटला धक्का लागु नये यासाठी कोच नेल्सनने आपल्या संघातल्या मुलींना अशा उघड उघड संशय येणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यास सांगीतले.

कोचला असे सांगणे खुप सोप्पे होते पण अमेरिकन मुली व जर्मन मुली सरावाच्या वेळी व ऑलिंपिक व्हिलेजमधुन व्हेन्युपर्यंत जाण्यासाठी बर्‍याच वेळेला एकत्र असायच्या. त्यांचा तो पुरुषी आवाज ऐकुन एक दिवस महिलांच्या लॉकर रुममधुन अमेरिकेची १५ वर्षाची जिल स्टर्केल पळुन बाहेर आली... तिची ठाम समजुत झाली होती की काही पुरुष मंडळी मुलींच्या लॉकररुममधे धुमाकुळ घालायला पलीकडच्या बाथरुममधे आली आहेत!

झाले... स्पर्धांना सुरुवात झाली... आणी कोच नेल्सनला ज्याची भिती होती तेच घडायला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी अमेरिकेची सर्वोत्तम जलतरणपटु शर्ली बाबाशॅफ़.. जिच्याकडुन अमेरिकेची ७ सुवर्णपदकांची आशा होती.. ती १०० मिटर्स फ़्रिस्टाइलमधे...तिच्या सगळ्यात स्ट्रॉंग इव्हेंटमधे... पदक न मिळताच रिकाम्या हाताने परत आली!

१९ वर्षांची शर्ली बाबाशॅफ़... जी १९७२ च्या म्युनिक ऑलिंपिक्समधे अवघी १५ वर्षांची असताना २ रजतपदक व १ सुवर्णपदक जिंकुन आली होती व आता तिच्या प्राइम फ़ॉर्म मधे या ऑलंपिक्समधे एकुण ७ शर्यतीत उतरुन एकुण २१ वेळा जलतरण तलावात उतरणार होती.... जी शर्ली बाबाशॅफ़... जी महिलांमधे मार्क स्पिट्झसारखा ७ सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम करण्याची स्वप्न बघत होती.. ती शर्ली बाबाशॅफ़ तिच्या पहिल्याच प्रयत्नात सपशेल तोंडावर आपटली होती. १०० मिटर्सची विजेती होती.. अर्थातच.. इस्ट जर्मनीची.. कॉर्नेलिया एंडर..

आणी पुढच्या ५ दिवसात त्याचीच पुनरावृत्ती मॉंट्रियालच्या ऑलिंपिक जलतरण तलावात सगळ्या जगाला दिसुन आली... २०० मिटर फ़्रिस्टाइल.. सुवर्णपदक...कॉर्नेलिया एंडर.. रजतपदक... शर्ली बाबाशॅफ़!... ४०० मिटर फ़्रिस्टाइल... सुवर्णपदक.. इस्ट जर्मनीची पेट्रा थुमर.... रजतपदक... शर्ली बाबाशॅफ़! ८०० मिटर्स फ़्रिस्टाइल.... सुवर्णपदक.... इस्ट जर्मनीची पेट्रा थुमर... रजतपदक... शर्ली बाबाशॅफ़!

असे रोज होत असताना शर्लीला ती परत परत दुसर्‍या स्थानावर येणाचे शल्य खुप जाचत होते. तिलाही कोच नेल्सनप्रमाणे इस्ट जर्मनीच्या महिलांनी ड्रग्स घेउन तसे शरीर कमावले आहे असे ठामपणे वाटत होते व तिने शेवटी न राहवुन त्या संशयाबद्दल उघड उघड बोलुन तोफ़ डागली! सर्व ऑलिंपिकभर शर्ली बाबाशॅफ़च्या त्या आरोपाने खळबळ माजवली. बर्‍याच लोकांनी तिला पराजय न पचवता आलेली एक "सोअर" लुजर असेही म्हटले..... इस्ट जर्मनीच्या महिलांनी तर तिला "सर्ली" बाबाशॅफ़ असे म्हणायला सुरु केले. तिने जेव्हा इस्ट जर्मनीच्या महिलांच्या पुरुषी आवाजाचा उल्लेख केला तेव्हा इस्ट जर्मनीच्या महिलांनी तिला टोमणा मारला की त्या इथे फक्त स्विमींग करायला आल्या आहेत.... गायला नाही....

तर अश्या या अमेरिकन व इस्ट जर्मन महिलांमधल्या अतिशय कडव्या लढतीला जलतरण स्पर्धेच्या शेवटच्या दिवसांपर्यंत प्रचंड उकळी फुटली होती... दोन्ही बाजुच्या एमोशन्स एकदम हाय होत्या... तवा दोन्ही बाजुने प्रचंड तापला होता... व अशा परिस्थीतीमधे मला ज्या शर्यतीबद्दल सांगायचे आहे त्या शर्यतीचा दिवस उजाडला....

जलतरण स्पर्धेचा शेवटचा दिवस... संध्याकाळची शेवटची एकच शर्यत बाकी होती... महिलांची ४ बाय १०० मिटर्स फ़्रिस्टाइल रिले... ५० मिटर्सच्या तलावाच्या लांबीला प्रत्येक खेळाडु जाउन येउन असे १०० मिटर पोहोणार... इस्ट जर्मनीच्या संघाने पहिल्या नंबरवर अंतिम फेरी गाठली होती... त्यांच्यामागे जवळ जवळ २ सेकंद हळु दुसर्‍या नंबरवर अमेरिकेच्या महिला अंतिम फेरीत आल्या होत्या. या शर्यतीतला जागतीक विक्रम इस्ट जर्मनीच्या नावावर होता--- ३ मिनीट्स ४८.८ सेकंद्स.. तर अमेरिकन महिलांचे या शर्यतीतले ऑलिंपिक्सला यायच्या आधीचे बेस्ट टाइमींग होते ३ मिनीट्स ५५.५ सेकंद... तब्बल ७ सेकंदांनी हळु....

शर्यतीच्या दिवसाची सकाळ उजाडली.... त्या आधी रात्रभर अमेरिकन महिला संघाच्या टीम मिटींगमधे खलबते चालली होती... सगळ्यांच्या मनात या शेवटच्या शर्यतीत तरी या गताड्या इस्ट जर्मन महिलांना धुळ चारायची असे वाटत होते... पण वाटणे आणी प्रत्यक्षात ते उतरवणे यात कोच नेल्सनला सात सेकंदांची प्रचंड मोठी दरी दिसत होती... पण तरीही त्याने त्या रात्री आपल्या शिष्यांना एकच गोष्ट सांगीतली... तुमच्या मनातल्या रागाला...तुमच्यावर जो अन्याय झाला आहे असे तुम्हाला वाटत आहे.... त्या अन्यायाला तुम्ही तुमच्या प्रचंड इच्छाशक्तीमधे परीवर्तीत करा...व सगळ्या जगाला दाखवुन द्या की माइंड ओव्हर बॉडी हा नुसता क्लिशे नसुन जर मनुष्याने मनात आणले तर आयुष्यात कुठल्याही अडथळ्याची त्याला भिती वाटायला नको.... बळकट मन हे बळकट शरिरापेक्षाही आधिक प्रभावी असते... जा आणी उद्याच्या शर्यतीत सगळ्या जगाला माइंड ओव्हर बॉडी या क्लिशेला प्रत्य्क्षात उतरवुन दाखवा.... माझ्या मनात किंचीतही संदेह नाही की तुमच्या एकत्रीत इच्छाशक्तीच्या बळावर तुम्ही उद्या एक चमत्कार घडवुन आणणार आहात.... जा आणी स्वत्:ला व आपल्या देशाला गर्व होइल असा परफ़ॉर्मंस उद्या द्या!

कोच नेल्सनच्या या स्पीचने अमेरिकेच्या महिला संघातल्या प्रत्येक खेळाडुंच्या रोमारोमात जिद्दीने पेट घेतला... सगळ्यांनी एकत्र येउन सभा बरखास्त होण्याच्या आधी...एकमेकांच्या गळ्यात हात टाकुन एक मोट्ठा एल्गार केला..... GO.....USSSSAAAAAAAAAAAA!

कोच नेल्सनने फ़ायनल्स साठी किम पेटन,वेंडी बोग्लीओली,जिल स्टर्केल व ऍंकर लेगसाठी अर्थातच शर्ली बाबाशॅफ़ अशी चौघांची निवड केली.

इस्ट जर्मनीतर्फ़े कॉर्नेलिया एंडर लिड ऑफ़ करणार होती मग पेट्रा प्रायमर मग ऍंड्रिया पॉलक व ऍंकर लेग क्लॉडिया हेम्पेल स्विम करणार होती. त्यावरुन त्यांची स्ट्रॅटीजी सरळ दिसत होती... कॉर्नेलिया एंडरला सगळ्यात प्रथम पाठवुन अनसरमाउंटेबल लिड घ्यायचा व उर्वरीत शर्यतीत एंडरने मिळवुन दिलेला लिड बाकीच्यांनी वाढवत न्यायचा.. सोप्पा प्लान! पण इस्ट जर्मनीच्या महिलांना याचा लवकरच साक्षात्कार होणार होता की कधी कधी आयुष्यात सगळ्यात सोप्प्या वाटणार्‍या गोष्टीच मन गाफ़ील राहीले तर सगळ्यात कठीण होउन बसतात!

शर्यत सुरु व्हायला अगदी थोडा अवधी बाकी होता. मॉंट्रियाल ऑलिंपिक जलतरण तलाव अधिर प्रेक्षकांनी खच्च भरला होता. जजेस नी आपापली जागा घेतली.... आठ टाइमकिपर्स हातात स्टॉप वॉचेस घेउन शर्यत सुरु होते त्या काठावर आठी लेनच्या ठोकळ्यांच्या बाजुला येउन उभे राहीले. फ़ायनलला आलेल्या आठी रिले टीम्सच्या पहिल्या स्पर्धकांनी आपापल्या स्टार्टींग ठोकळ्यांवर पुढे ओणवे उभे राहुन स्टार्टर गनची वाट पाहात हात लुज हलवुन स्ट्रेचींग करायला सुरुवात केली.

कोच नेल्सनने शर्यतीची स्ट्रॅटीजी सगळ्यांना व्यवस्थीत समजवुन सांगीतली होती... किम पेटनचे लिड ऑफ़ लेगमधे काम असणार होत की सहा फ़ुटी जायंट कॉर्नेलियाला पहिल्या १०० मिटरपर्यंत एका बॉडी लेन्ग्थ पेक्षा जास्त दुर जाउ द्यायचे नाही... म्हणजे जगातल्या सगळ्यात वेगवान स्विमरला १ सेकंदापेक्षा जास्त पुढे जाउ द्यायचे नाही... तसे झाल्यावर पुढच्या २ स्विमरनी आपल्या आतापर्यंत त्यांनी पोहोलेल्या वेगापेक्षा कमीतकमी १ सेकंद जास्त वेगाने पोहायचा प्रयत्न करायचा व शेवटच्या लेगमधे बाकीचे काम शर्ली बाबाशॅफ़च्या खांद्यावर सोपवुन निर्धास्त व्हायचे...

प्रेक्षकातही एक चांगली जलतरण शर्यत बघायला मिळणार म्हणुन एक इलेक्ट्रीफ़ायींग वातावरण निर्माण झाले होते.. सगळे आपापल्या सिटच्या एजवर... पुढे सरकुन... अधिरतेने शर्यत सुरु व्हायची वाट पाहात होते. तिकडे शर्ली बाबाशॅफ़ मात्र खुर्चीवर शांतपणे डोळे मिटुन ध्यान करत गंभिरतेने बसली होती.. मनातल्या मनात तिच्या पुढे उलगडत असलेल्या शर्यतीची ती उजळणी करत होती. तिला ठाम विश्वास होता की जर इस्ट जर्मनच्या मुलींनी ड्रग्सचा वापर नसता केला तर तीच जगातली सगळ्यात वेगवान जलतरणपटु होती... पण आज तिला त्या जर तरच्या पलीकडे जाउन जगाला दाखवुन द्यायचे होते की ती 'सोअर' लुजर नव्हती... तिला तिच्यातला चॅंपीअन जगाला दाखवुन द्यायचा होता... तिला आजुबाजुचा गोंधळ, प्रेक्षक या सगळ्यांचा विसर पडला होता.. तिच्या बंद डोळ्याच्या पटलावर तिला तिच्या गळ्यात लटकत असलेले सुवर्णपदकाचे चित्र दिसत होते...

फाट्ट! अश्या स्टार्टर बंदुकीच्या आवाजाने शर्लीचे ध्यान भंग पावले व किम पेटन कशी स्विम करत आहे ते बघायला व तिला प्रोत्साहन द्यायला ती खुर्चीवरुन उठुन पुढे सरसावली व किम पेटनला गो किम गो! असे ओरडुन प्रोत्साहन देउ लागली. तिकडे किम झप झप हात मारत मासोळीसारखी पाण्यात सर सर अशी अंतर काटु लागली... स्ट्रोक फ़ॉर स्ट्रोक किम पेटन पहिल्या ५० मिटर्सपर्यंत इस्ट जर्मनीच्या कॉर्नेलिया एंडरबरोबर वेग ठेउन राहीली. पहिल्या ५० मिटर्सच्या वळणावर किम फक्त एक स्ट्रोकच मागे होती... दुसर्‍या ५० मिटर्समधे पण किम पेटनने कॉर्नेलियाबरोबर स्ट्रोक फ़ॉर स्ट्रोक बरोबर राहुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला...पहिले १०० मिटर संपत आले... कॉर्नेलियाने प्रथम भिंतीला हात टेकवले व किम फक्त अर्ध्या बॉडी लेंग्थने कॉर्नेलियाच्या पाठोपाठ १०० मिटर्स पुर्ण करुन आली.... कोच नेल्सनने त्याच्या हातातल्या स्टॉप वॉचकडे पाहीले.... त्याच्या घड्याळानुसार किम पेटनने तिच्या पर्सनल बेस्ट टाइमपेक्षा चक्क दिड सेकंद कमी वेळ १०० मिटर्स स्प्लिटसाठी घेतला होता....

आता वेंडी बोग्लीओलीने पाण्यात सुर मारला होता व पहिल्या श्वासासाठी तिने जेव्हा डोके बाहेर काढले तेव्हा इस्ट जर्मनिच्या पेट्रा प्रायमरला तिने जवळजवळ गाठले होते! वेंडी २१ वर्षाची.... म्हणजे या चारी अमेरिकन मुलींमधे वयाने सगळ्यात मोठी.... व अनुभवानेही सगळ्यात वरिष्ठ होती. त्याची तिला जाण होती व ही शर्यत वेंडी वयाने बाकींपेक्षा जास्त असल्यामुळे अमेरिका हरली असे तिला कोणी म्हटलेले नको होते... त्यामुळे तिही अतिशय तडफ़ेने फ़्रीस्टाइलचे स्ट्रोक झपाझप मारत अंतर काटत होती. ती आणी इस्ट जर्मनीची पेट्रा प्रायमर जवळजवळ एकाच वेळेला दुसरी लेग संपवुन आत आले व तिसर्‍या लेगसाठी एकाच वेळेला अमेरिकेच्या जिल स्टर्केलने व इस्ट जर्मनीच्या ऍंड्रिया पोलकने पाण्यात सुर मारला...

१५ वर्षाची जिल स्टर्केल.... अमेरिकेची सगळ्यात कमी वयाची व कमी अनुभवाची जलतरणपटु! पण आज ती एवढ्या मोठ्या स्टेजवर अमेरिकेची शान आपल्या स्विमिंगच्या स्ट्रोकवर पेलवत जलतरण तलावात उतरली होती. कोच नेल्सनने मुद्दामच तिची निवड केली होती... जास्त अनुभव नसल्यामुळे आंतराष्ट्रीय शर्यतीमधे मानसीक दबाव काय असतो याची तिला जास्त प्रचिती नव्हती.... त्यामुळे तशा दबावाला बळी पडण्याचा प्रश्नच तिला पडणार नाही असा साधा विचार कोच नेल्सनने केला होता... १५ वर्षाच्या.... व भिती अजुन माहीत नसलेल्या या बेडर मुलीने कोच नेल्सनचा होका बरोबर ठरवला... या मुलीने काय करावे? तिचे सवंगडी त्यांच्या पर्सनल बेस्ट वेळेपेक्षा एक एक सेकंदांनी जास्त वेगात शर्यत पोहोत असताना या पट्ठीने तिच्या लेगमधे चक्क तिच्या पर्सनल बेस्ट वेळेपेक्षा तब्बल सव्वा दोन सेकंद कमी वेळात तिचे १०० मिटर्स पोहुन काढले व शर्ली बाबाशॅफ़ला अर्ध्या बॉडी लेंग्थचा लिड तिने मिळवुन दिला!

आता शर्ली पाण्यात झेपावती झाली... आज तिला इस्ट जर्मनीची चौथ्या लेगमधील क्लॉडिया हेम्पलच काय... साक्षात वारासुद्धा लगाम घालु शकला नसता.. इतक्या प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर ती झपाझप पाणी कापत चालली होती.. ती ही शर्यत.... काल रात्रीपासुन हजार वेळातरी.. मनातल्या मनात पोहोली होती... ५० मिटर्स संपले.. आता फक्त ५० मिटर्स बाकी राहीले होते... शर्ली सर्रकन उलटी वळली... ती पहिल्या स्थानावर होती... तिने आजुबाजुला पाहण्यात अजिबात वेळ घालवला नाही.. सप.. सप.. सप.. करत ती पाणी कापत फ़िनिश लाइअनला टच करण्यास पुढे पुढे येउ लागली.. तिच्यात व इस्ट जर्मनीच्या क्लॉडिया हेम्पलमधे एका बॉडी लेंग्थचे अंतर पडले होते... शर्यत बघणार्‍या सगळ्यांनी तो जलतरण तलाव त्यांच्या ओरडण्याने अक्षरश्: डोक्यावर घेतला होता..कोणीही बसलेले नव्हते... सगळे आपापल्या सिटच्या एजवर येउन उभे राहीले होते...१५ मिटर्स...शर्ली अजुनही पुढेच होती... १० मिटर्स... शर्ली अजुन पहीलीच.... पण आता ती फक्त पाउण बॉडी लेंग्थनेच आता पुढे होती..५ मिटर्स... क्लॉडिआ हेंपलने आपला वेग पुढच्या गीअरमधे टाकलेला सगळ्यांना स्पष्ट दिसत होता व ती आता फक्त अर्ध्या बॉडी लेंग्थने शर्लीपेक्षा मागे होती! १० फ़ुट... ५ फ़ुट... आता शर्लीनेही आपला गिअर बदलला होता व फक्त ३ फ़ुट बाकी असताना ती परत पाउण बॉडी लेंग्थने पुढे गेली होती व.....शेवटचा स्ट्रोक मारताना शर्लीने आपला हात तलावाच्या भिंतीला टेकवला....

इकडे वर काठावर बाकीच्या ३ अमेरिकन मुली.. किम, वेंडी व जिल.. ओरडत ओरडत व नाचत नाचत... शर्ली ई...... शर्ली ई..... गो शर्ली असे एकमेकांचे हात घट्ट पकडुन आनंदाने बेभान होउन उड्या मारत होत्या.... शर्लीने हात भिंतीला टेकवताच डोके बाहेर काढत इस्ट जर्मन टिमच्या लेनकडे पाहीले व तिला तिच्या टिममेट्स किम,वेंडी व जिलच्या हिस्टेरिकल आरड्याओरड्याने लगेच कळले की त्यांनी असंभवाला संभव केले होते.... त्या मायटी इस्ट जर्मन टिमचा स्पर्धेतल्या शेवटच्या शर्यतीत त्यांनी पाडाव केला होता!... शर्लीने डोक्यावरची वॉटरकॅप काढली व तलावातुन बाहेर येत तिच्या तिन टीममेट्सबरोबर.... एकमेकांच्या गळ्यात हात घालुन... रिंगण करत.. तिने नाचायला सुरुवात केली....व एकमुखाने चौघी... USA.....USSSAAAAA....USSSSSAAAAAAAAA...असे म्हणत जल्लोश करु लागल्या...

आणी कोच नेल्सन? तो जलतरण तलावाच्या एका बाजुला पाय गुढग्यात दुमडुन जमीनीवर थर थर करत... दोन्ही हात हातात घेउन..ते एकत्र केलेले हात हनुवटीवर ठेवुन व कोपरे गुढग्यांवर ठेवुन.... मान शेक करत.... डोळ्यातुन आनंदाश्रु काढत.... त्या चार मुलींच्या वेड्या सेलीब्रेशनकडे क्रुतार्थ नजरेने बघत बसला होता....:-)

फ़ायनल टायमींग.... यु. एस. ए........ ३ मिनीट्स ४४.८ सेकंड्स.... नवीन ऑलिंपिक व वर्ल्ड रेकॉर्ड!

इस्ट जर्मनी... ३ मिनीट्स ४५.५ सेकंड्स...

मुकुंद
काय वर्णन! काय वर्णन!!
अफाट सुंदर लिहिलंय एकदम चित्रदर्शी !

मुकुंद , चांगला प्रतिसाद.

अडमा, बाफ काढलायएस पण मटा आणि तत्सम पेपरात टोकियो ओलिपिंक रद्द करणार अश्या बातम्या वाचल्यात. जपानमध्ये कहर आहे करोनाचा . Uhoh

मुकुंद मस्त किस्सा!! पुढे कधी इस्ट जर्मनीच्या त्या मुलींनी हार्मोन्स घेतले होते की नव्ह्ते याचा काही सोक्ष्मोक्ष लागला का?

मुकुंद मस्त ! हि गोष्ट जून्या मायबोलिवर वाचलि होति. पून्हा वाचायला मजा आलि.

जाई, हो पेपरमध्ये बातम्या येतात खर्‍या पण क्रीकेट, फ्रेंच ओपन, यूरो, होउ घातलेलं वींबल्डन पार पडतय तसं हे हि पार पडेल अशि आशा आहे !

त्या शर्यतिची उत्कटता ,शर्ली बाबाशॉफच्या मनातली घालमेल, तिचे फ्रस्ट्रेशन आणी तिची व तिच्या टिममेट्सची जिद्द मी माझ्या शब्दात पकडायचा प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न तुम्हाला आवडला त्याबद्दल धन्यवाद!

पण मी ही शर्यत जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा तेव्हा शर्ली बाबाशॉफ व तिच्या टिममेट्सच्या जिद्दीला सलाम करतो.

मैत्रेयी, अग सगळ्या जगाला ठाउक होते की इस्ट जर्मनच्या सगळ्या महिला स्विमर्स पर्फॉर्मंस एनहांसींग ड्रग्स करत होत्या. फक्त तेव्हा आतासारखे कडक रुल नव्हते त्यामुळे ऑफिशिअली कोणीच सोक्षमोक्ष लावु शकले नाही त्या गोष्टीचा.

ऑलिंपिक्स हा माझ्याही अतिशय जिव्हाळ्याचा सोहळा. चार वर्ष आतुरतेनं वाट बघण्यात कशी निघून जातात समजत नाही.

बघितला का उद्घाटन सोहळा ?
मी इथल्या वेळेप्रमाणे जेव्हडा बघता येईल तेव्हडा बघितला. एकूणात छान, 'स्वीट अँड सिंपल' म्हणता येईल असा झाला. जपान कडून मलातरी तेच अपेक्षित होतं! मुख्य ज्योतीसाठी केलेली सनफ्लॉवर थीम आवडली. नाओमी ओसाकाने ज्योत प्रज्ज्वलीत केली ते बघूनही मस्त वाटलं! मागे सिडनीला कॅथी फ्रिमनला तो मान मिळाला होता तेव्हाही मस्त वाटलं होतं. एकूण फ्रंटलाईन वर्कर्सबद्दल अगदी स्पष्टपणे आभार आणि आदर व्यक्त केला गेला ते ही चांगलं झालं. 'दे आर जस्ट डूईंग देअर जॉब' वगैरे सगळं खरं असलं तरी गेले दीड वर्ष सलग अश्या प्रकारे इतक्या तणावाखाली काम करत रहाणे कौतुस्कापद आहे आणि त्याबद्दल धन्यवाद द्यायलाच हवेत !

पिक्टोग्राम प्रकार खूप आवडला. त्यांनी कितीवेळा सराव केला असेल कोण जाणे ! पिआनोचा कार्यक्रम आणि एकंदरीत जपानी सिंफनी आवडल्या.

भारतीय पथकातील पुरूषांचे पोशाख आवडले. एकदम रुबाबदार होते. मनप्रित सिंग पाजीला तर तो ड्रेस एकदम शोभून दिसत होता. गेल्या काही स्पर्धांपासून (फक्त ऑलिंपिक नाही, बाकीही), भारतीय बाया साड्या, पंजाबी ड्रेसवगैरेंवर ब्लेझर, कोट का घालतात काय माहित !! ना धड भारतीय ना धड वेस्टर्न!

स्विमिंग, जिमनॅस्टीक, अ‍ॅथलेटीक्सच्या स्पर्धा बघायची खूप उत्सुकता आहे. लेडीकी, स्कुलींग, लक्जोज वगैरे मंडळी असतील अशी आशा आहे.

Star sports ने भारतीय entry च्या वेळी मंत्र्याचा close up अर्ध्या screen मध्ये दाखवून रसभंग केला
खेळाडू नीट दिसलेच नाहीत.
नंतर क्लिप पाहून समाधान करून घेतले मनाचे

भारतीय हॉकी संघाने न्यूझीलंडला हरवून पुढील फेरीत प्रवेश केलेला आहे .

बॅडमिंटन मेन्स डबल बघितली काय कोणी. वर्ल्ड रँकिंग 3 चायना संघाला हरवलं आपण.फुल्ल टशन झाली. मजा आली बघताना. लास्ट राऊंड बघताना तर एखाद्याला हार्ट अटॅक आला असता.

तिरंदाजी मध्ये पुन्हा एकदा निराशा
जागतिक क्रमवारीत असूनही ऑलिम्पिक मध्ये का खेळत नाहीहेच कळत नाही

तिरंदाजी मध्ये पुन्हा एकदा निराशा>>>हो खूपच निराशाजनक.
जिथे द्रोणाचार्य, अर्जुन, कर्णा सारखे महान धनुर्धर होऊन गेले ते तिरंदाजीत अव्वल पाहिजे होते.मी लहानपणी माझं टॅलेंट वापरून खराट्याच्या काडीचा धनुष्यबाण बनवायचो. पण घरचे मला नेहमी ओरडायचे. त्यांना भीती होती मी कोणाचा तरी ह्युमन्स आय हिट करेन. त्यांनी माझ्यावर थोडा विश्वास दाखवला असता तर ऑलिम्पिकमध्ये मी आज बुल्स आय हिट केला असता. असो.

Pages