अर्थाअर्थी -(भाग-०५) - आर्थिक स्वातंत्र्य..

Submitted by अ'निरु'द्ध on 12 June, 2021 - 07:29

अर्थाअर्थी -(भाग-०५) - आर्थिक स्वातंत्र्य..

या आधीचे भाग :
अर्थाअर्थी -(भाग-०१) - टिंडर भेट..

अर्थाअर्थी -(भाग-०२) - चाय पे चर्चा..

अर्थाअर्थी -(भाग-०३) - नचिकेतच्या मनातलं..

अर्थाअर्थी -(भाग-०४) - समज - गैरसमज..

बुधवारी नचिकेत आणि रेवा भेटले ते बाँबे काॅफी हाउसमधे.

लिंबोणी रंगाचा लखनवी परिधान केलेली, बिना मेकअपची रेवा आज एकदम उत्फुल्ल, तजेलदार दिसत होती.
नचिकेत तिच्याकडे अनिमिष डोळ्यांनी पहातच राहिला.

आजं एकदम सिंपल ?

हो ना. कारण बँक हाॅलिडे, ऑफिस अटायर नाही. एरवी मी अशीच रहाते, आवडतं.

दोघांनीही आयरिश क्रीम काॅफी ऑर्डर केल्यावर रेवा म्हणाली मग कशापासून बोलायला सुरुवात करायची ?

नचिकेत : आपण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक स्वातंत्र्यापासून सुरुवात करुया.

कुठलीही गोष्ट आपण शिकतो त्याचा मूळ उद्देश आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे जावं, सहजसोपं जावं, सुखासमाधानात आणि आनंदात जावं हा असतो.

आर्थिक साक्षरतेचं पण तसंच आहे. आयुष्यभर आपण जो पैसा कमावतो, अर्थव्यवहार करतो, तो या अर्थसाक्षरतेमुळे सोपा, सहज व्हायला पाहिजे. खरं तर आपलं आयुष्यच यामुळे सोपं आणि सहज व्हायला पाहिजे.

आपण नोकरी, धंदा, व्यवसाय करुन अर्थार्जन करतो. चालू असलेलं आयुष्य, निवृत्ती नंतरचं आयुष्य सुखासमाधानाने जावं म्हणून पैसे राखून ठेवतो, गुंतवतो.
थोडक्यात संपत्ती कमवावी, राखावी, वाढवावी ह्या त्रिसुत्रीने शक्यतो चालतो.

ते कसे राखायचे, कसे गुंतवायचे याआधी का गुंतवायचे आणि कशासाठी गुंतवायचे, थोडक्यात आर्थिक स्वातंत्र्य का मिळवायचं हे आज बघूया.

सर्वसाधारण माणसं वयाच्या ५८ किंवा साठाव्या वर्षापर्यंत नोकरी करतात. व्यावसायिक माणसं किंवा धंदेवाईक माणसं त्यापुढेही जेवढा वेळ जमेल तेवढा काळ त्यांचा व्यवसाय किंवा धंदा करतात.

थोडक्यात सर्वसाधारण माणूस त्याच्या निवृत्तीपर्यंत जे पैसे कमावतो, त्यातून जे शिल्लक राहतील ते गुंतवतो आणि त्यावर त्याच्या निवृत्तीपासून ते मरेपर्यंत आयुष्य जगत असतो.

आता वैद्यकीय क्षेत्रातले शोध, नवनवीन औषधांमुळे वाढलेलं आयुर्मान ह्यामुळे निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा कालावधी पूर्वीपेक्षा वाढलेला आहे.

हे जगणं, हा कालावधी जर विनाताणाचा आणि चिंतामुक्त घालवायचा असेल तर आयुष्यभर पुरेल अशी आर्थिक तजवीज आपल्याकडे असायला पाहिजे.

मग हे जर आपल्याला साध्य करायचं असेल तर काय करायला पाहिजे आणि मुळात हे का साध्य करायला पाहिजे ?

निवृत्तीनंतर, मग ती नोकरी मधून असो किंवा स्वतःच्या व्यवसाय धंद्यामधून असो,
ती सक्तीची असो किंवा ऐच्छिक निवृत्ती असो..
त्यावेळेला आपलं दर महिन्याला येणार वेतनाचं किंवा व्यवसायातलं उत्पन्न थांबलेलं असतं आणि आपल्याला आपल्या राखून ठेवलेल्या गुंतवणुकीमधून आणि/किंवा त्याच्या परताव्या मधून आपला मासिक खर्च चालवायचा असतो.
हे करताना पुन्हा आपल्याला दोन गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
एक म्हणजे दरवर्षी होणाऱ्या महागाईमुळे आपले खर्च गेल्यावर्षीपेक्षा सहा ते दहा टक्‍क्‍यांनी वाढणार आहेत. म्हणजेच रुपयाची क्रयशक्ती कमी होत जाणार आहे.
आणि आपण पुरेसे पैसे जमवलेले नसतील किंवा योग्य प्रकारे गुंतवलेले नसतील तर त्याच्यावरचा परतावा (Yield) कमी होणार आहे.

म्हणजे आपल्या गुंतवणुकीवरचा मासिक/वार्षिक परतावा जर आपल्या मासिक/वार्षिक खर्चापेक्षा कमी असेल तर तो फरक आपल्याला आपली थोडीशी मूळची गुंतवणूक वापरुन करावा लागणार आहे. मग आपली गंगाजळी थोडी थोडी कमी होत जाणार आहे.
थोडक्यात आपला आर्थिक स्तर पूर्वीपेक्षा खालावत जाणार आहे. तो ही दर वर्षी.

किंवा ज्या गोष्टी आपल्याला आधी परवडत होत्या,जी लाईफ स्टाईल आपण अंगीकारलेली होती; तिचा दर्जा आपल्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे हळूहळू कमी करायला लागणार आहे.
कारण असं जर मी केलं नाही तर मी आणि माझा जोडीदार सर्वाईव्ह होऊ शकणार नाही.
नोकरी व्यवसायात असताना मी ज्या रुबाबात राहिलो होतो तसा आता राहू शकणार नाही आणि याचं कारण म्हणजे आर्थिक साक्षरतेचा अभाव.

आता असंही होऊ शकतं की जरी माझी गंगाजळी कमी होत गेली तरी मी आणि माझ्या जोडीदाराच्या मृत्यूपर्यंत ती पुरु शकेल. (हं, एवढंच आहे की मुलाबाळांना काही आर्थिक वारसा शिल्लक ठेवता येणार नाही. {अशा वारशाची कदाचित गरजही नसावी })
किंवा मुलाबाळांच्या मदतीवर आयुष्य काढावं लागेल.

पण अशी दिवसेंदिवस कमी होत जाणारी शिल्लक, त्यामुळे येणारं टेन्शन किंवा मुलांनी मदत करायची आवश्यकता याला आर्थिक स्वातंत्र्य म्हणता येणार नाही.
अजून एक रिव्हर्स माॅर्गेजिंगचा पर्याय आहे पण ते नंतर बघू.

मग या गोष्टीला काही सोल्युशन उपाय इलाज आहे का, तर आहे.

जर आपल्या गुंतवणुकीवरील मासिक परतावा हा आपल्या मासिक खर्चाएवढा असेल किंवा खरंतर थोडासा जास्त असेल, जे जास्त उत्पन्न आपण परत आपल्या गंगाजळी मध्ये टाकून आपलं मूळ मुद्दल वाढवू शकलो तर एका प्रकारे आपल्या सध्याच्या राहणीमानाला सपोर्ट करणारे एक शाश्वत इन्कम तत्वतः आपल्याला मिळू शकेल.

मात्र परताव्याची जी रक्कम उत्पन्न म्हणून आपण विचारात घेणार ती करपश्चात रक्कम असली पाहिजे. कारण शेवटी टॅक्स भरल्यानंतर जी रक्कम उरेल तीच आपल्याला वापरण्यायोग्य रक्कम असेल.

अशी एक योग्य रक्कम आपण निवृत्तीपूर्वी किंवा आधीच जमा करुन गुंतवू शकलो आणि तिच्या परताव्यावर आपण आपलं पूर्वीचं राहणीमान न बदलता आयुष्यभर सुखाने राहू शकलो तर ती एक मोठी आणि चांगली अचिव्हमेंट झाली.

हे होणं म्हणजेच थोडक्यात आपलं आर्थिक स्वातंत्र्य.

तुला एक Net Worth ची वेगळी व्याख्या सांगतो : The number of Days or Months or Years One can Survive if He/She Stops Working Today.

रेवा : हे असं होऊ शकेल ?

नचिकेत : का नाही ??
मात्र यासाठी आपण ही संकल्पना समजून घेण्याबरोबरच एका चांगल्या फायनॅन्शिअल ॲडव्हायजरची गरज आहे.

अशी आर्थिक स्वतंत्रता प्राप्त करताना आपण काटकसरी वृत्ती बाळगली तर ते आपल्या फायद्याचं आहे परंतु पुढे सुखाने रहायचंय म्हणून आत्ता करायची मजा टाळून, कृपणवृत्ती धारण करून अशी गुंतवणूक करणं टाळावं.

त्या लहानपणीच्या गोष्टीतल्या मुंगी आणि टोळाच्या जगण्यातला सुवर्णमध्य गाठता आला की झालं.

आयुष्यातला उपभोग, आनंद नाकारून आपण केवळ निवृत्तीनंतरची किंवा म्हातारपणाची सोय बघणं याला आदर्श आर्थिक साक्षरता म्हणता येणार नाही.
कुठल्यातरी भीतीपोटी, शक्यतेतल्या परिस्थितीसाठी, फार लांबच्या भविष्यकाळासाठी आपण आपला नजीकचा भविष्यकाळ आणि वर्तमान काळ काळजीमध्ये घालवणं अभिप्रेत नाही.

आपलं उद्दिष्ट तर छान आहे पण तिथे पोहोचायचा प्रवास हा जास्त छान, यादगार असला पाहिजे.

हे आर्थिक स्वातंत्र्य तीन गोष्टींवर ते अवलंबून आहे.

एक म्हणजे एखाद्याचं आज उत्पन्न किती आहे.

दुसरं म्हणजे त्या उत्पन्नाचा किती भाग ती व्यक्ती योग्य प्रकारे गुंतवते.

आणि तिसरं म्हणजे या व्यक्तीची लाईफस्टाईल, राहणीमान.

जेवढं उत्पन्न जास्त आणि त्यापैकी त्याचा जास्तीत जास्त भाग योग्य प्रकारे गुंतवलेला असेल, शिवाय साधं सोपं राहणीमान जर असेल तर हे उद्दिष्ट जास्त लवकर पूर्ण होऊ शकतं.

हा ब्रेकइव्हन पॉईंट जर लवकर आला तर एक तर आपला आत्मविश्वास वाढतो. कारण आपल्याला आता पैसे कमवायची आत्यंतिक गरज उरलेली नसते, मनाचा त्यात गुंतलेला भाग शांत झालेला असतो. आणि दुसरं म्हणजे आयुष्यात आपल्याला एखाद्या गोष्टीचं थोडसं रिस्क घ्यायचं असेल तर ते घेण्याची आर्थिक क्षमता आपण प्राप्त केलेली असते.

अशा वेळी एखाद्याकडे साधारणतः तीन पर्याय असू शकतात.

पहिला पर्याय म्हणजे आपण जे काम करतोय त्यातून किंवा कोणत्याही कामातून सर्व प्रकारची निवृत्ती स्विकारायची.
याला FIRE (Financially Independent Retired Early) असं म्हणतात.
वयाच्या चाळीशीत, अगदी तिशीतही निवृत्त होणं हा गेल्या काही काळापासून एक ट्रेंड आहे.

यशस्वी स्टार्ट अप वाले, बिझनेसमन, व्यावसायिक आणि उच्च पगारदार आणि अत्यंत यशस्वी खेळाडू ह्यांना हे जमण्याची शक्यता जास्त असते. कारण त्यांची उच्च आमदनी.

ह्या लवकर निवृत्त होणाऱ्यांना काय हवं असतं?
आर्थिक बाबतीत चिंतामुक्त आयुष्य जगायचं असतं.
एकच आयुष्य मिळतं, ते आनंदाने उपभोगावं ही त्यांची धारणा असते. छंद जोपासायचे असतात.
आणि मर्जीप्रमाणे स्वतःच्या क्षेत्रातलं काम करणं किंवा आवडीचं दुसरं कुठलंतरी काम करणं हवं असतं. किंवा कोणतंही काम न करणं.

पण ह्या प्रकारात आपल्याला फक्त घरखर्चच नाही तर इतर सर्वच खर्च गृहीत धरायला लागतात. म्हणजे ती व्यक्ती वर्षातून चारवेळा देशात फिरायला, वर्षातून एकदा किंवा जास्तवेळा परदेशात फिरायला जाणार असेल तर तो किंवा असे इतर खर्च एकूण खर्चाच्या अंदाजात मिळवायला हवेत.

दुसरा प्रकार म्हणजे आपलं आहे ते काम/नोकरी आवडत असेल तर ते चालू ठेवून आपल्या गंगाजळीत भर घालत रहावी. कामधंदा आणि त्या योगे उत्पन्न चालू असल्यामुळे ती एक जमेची बाजू असेल. संपूर्णपणे निवृत्त होणार नसल्यामुळे वर म्हटलेल्या काही खर्चाची बेगमी आत्ताच नाही केली तरी चालेल.

आणि तिसरा प्रकार म्हणजे कामाचा कंटाळा किंवा आपल्या Field चा कंटाळा आला असेल किंवा कामाचं क्षेत्र तेच पण त्यातला वेगळा भाग जो करायला मिळत नसेल पण ज्यात आपल्याला जास्त रुची, स्वारस्य असेल तर आधीचं काम सोडून आवडीचं काम करणं हे शक्य होईल.

मला आता पैशांसाठी काम करायची आवश्यकता नाही ही भावना मनाला जाणवते तेव्हा आपल्या output मधेही छान फरक पडतो. We Deliver Better.

यात उत्पन्न कदाचित कमी होईल (बऱ्याचदा ते वाढतंही) पण ब्रेकइव्हन पाॅईंट आधीच आलेला असल्यामुळे त्याची तमा नसेल. मनाची घुसमट होणार नाही. Job Satisfaction मिळेल, छंद पुरे करता येतील. समाजसेवेचा पिंड असेल तर तेही करता येईल.

स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर घर खर्चाचं टेन्शन मिटल्यामुळे हे रिस्क आपण सहज घेऊ शकतो, स्वतःला एक्सप्लोर करू शकतो.
गरजवंत असताना आधी येणारा नोकरी धंद्यातला ताण आता येत नाही.

समजा तुला त्याचत्याचपणामुळे १५/२० वर्षांनी तुझ्या कामाचा कंटाळा आला आणि पुरेशी आर्थिक क्षमता आलेली असेल किंवा त्याच्या जवळपास असशील तर पूर्णवेळा ऐवजी अर्धवेळ काम करणं, स्वतःला वेळ देणं, कन्सलटन्ट म्हणून काम करणं, Psychology मधे करियर करणं हे शक्य होऊ शकेल.

माझ्या क्षेत्रात कायम नव्या नव्या संकल्पना, सादरीकरण यामुळे कदाचित कंटाळा येणार नाही पण जुन्यांची स्पर्धा खूप वाढली, नवे नवे तरुण स्पर्धक व्यवसायात आले आणि त्यामुळे अवाजवी कमी दरात कामं करायला लागली आणि असं कमी दरात काम करणं माझ्या मनाला पटणार नसेल तर मी ही माझं क्षेत्र सोडायचा किंवा ॲक्टिव्ह व्यवसायातून बाहेर पडून त्याच क्षेत्रात फ्रीलान्सर म्हणून मर्जीप्रमाणे आवडतं काम करायचा विचार करु शकतो.

निवृत्तीनंतर काम केलं तर ते स्वेच्छेने असलं पाहिजे.
I am Drop out by Choice, Sir असं 'अ वेनस्डे' मधला हॅकर अनुपम खेरला म्हणतो तसं.

निवृत्तीनंतरच्या कामाचं कारण आपली गरज,अनिवार्यता आणि मुख्य म्हणजे अगतिकता असता कामा नये. (जसा बावर्ची मधला ए. के. हन्गल)

हे करताना सगळ्या भयंकर वाईट शक्यता विचारात घ्यायची, अतिशय किचकट आकडेमोड करायची गरज नाही. कारण सर्व टोकाच्या शक्यता आपण विचारात घेऊ शकत नाही, घेऊ नयेत.
घाण्याच्या बैलासारखं किंवा डोक्यासमोर गाजर टांगलेलं गाढव आपल्याला व्हायचं नाही.
जे करतोय त्यात आनंद मिळाला पाहिजे, मजा आली पाहिजे, आयुष्याचा उपभोग घेता आला पाहिजे.
तो आनंद नाकारुन, त्याची किंमत मोजून आपण कितीही मोठी गंगाजळी निवृत्तीसाठी जमा केली तर त्याला अर्थ नाही.

तारुण्यातल्या इच्छा, आकांक्षा, कामना, वासना नाकारुन हे प्राप्त करणं आणि या पैसे कमावण्यापोटी पुढे खंत वाटेल असं काही आज गमावणं चुकीचं ठरेल.
आणि अशी खंत न वाटता, आयुष्य छान घालवूनही आपल्याला अशी गंगाजळी राखता येऊ शकते.

आता हे सगळं करायचं असेल तर त्या संदर्भात Magic of Compounding, Asset Allocation, Risk Appetite, Rebalancing of Assets, Rule of 72, Hedging, Time Value of Money, शाश्वत उत्पन्न म्हणजे काय; अशा बऱ्याच गोष्टी आपण योग्य वेळी बघू. पुरेशी गंगाजळी जमवता येत नसेल तल रिव्हर्स माॅर्गेजिंगचा पर्याय पण बघू.

अर्थात यातला एक एक विषय आख्ख्या पुस्तकाचा, गेला बाजार निदान एका आख्ख्या प्रकरणाचा विषय आहे. इथे आपण फक्त त्याची तोंडओळख करून घेणार आहोत.

हे सगळं मी सांगतोय म्हणजे ते तुला जसंच्या तसं करायला लागेल असं नाही. हा एक दृष्टीकोन झाला. May Be माझा. तुझा दृष्टिकोन थोडा किंवा पूर्णपणे वेगळाही असू शकतो.

पण मी म्हणतोय तसा पर्यायी दृष्टिकोन/मार्ग तुला माहितीच नाही आणि म्हणून तू तुझ्या मार्गाने चाललीय असं व्हायला नको.
हे सगळं जाणून बूजून, समजून उमजून तू तुझ्या आर्थिक बाबतीत काही वेगळा, तुला हवा तसा निर्णय घेतला तर ते तुझं निर्णयाचं स्वातंत्र्य आहे.

म्हणून तर याला आपण साक्षरता म्हणतो. अक्षरओळख झाल्यावर एखादी व्यक्ती त्याला आवडणारी पुस्तकं वाचेल तर अन्य व्यक्ती दुसरी. पण उपलब्ध पुस्तकांची नावं सगळ्यांना माहिती पाहिजेत आणि त्यासाठी अशी अक्षरओळख मात्र आवश्यक आहे.

आता हे सगळं जाणून घेऊन अमलात आणायचं तर आपापले बँक व्यवहार, जाॅईंट अकांउंट, नाॅमिनेशन वगैरे बेसिक गोष्टी तर प्रत्येकाला माहिती असल्या पाहिजेत आणि आल्याच पाहिजेत.

रेवा : हे सर्व मी माझ्या कलिग्जना सांगू शकते. खूप उपयोगी आहे हे.

हो. नक्कीच. पण एवढयात नाही. हा सर्व प्रकार तुला छान कळला, त्यावर तू तुझा विचार केला, जवळच्या लोकांशी चर्चा केली, त्यातून तुझं असं एक मत तयार झालं की मग तू याचा विचार करणं, खरं तर सुरुवातीला या क्षेत्रातल्या एखाद्या तज्ञाचं लेक्चर त्यांच्यासाठी ॲरेंज करणं जास्त श्रेयस्कर ठरेल.

चल मी जरा फ्रेश होऊन येतो, नचिकेत म्हणाला.

रेवा तिच्या यावरच्या विचारात गर्क असताना तो आलासुध्दा.
ती टेबलवर आणि तो समोरुन येतोय असं पहिल्यांदाच घडत होतं.
Leisurely Cargo Pants, T Shirt मधे स्मार्ट दिसतोय की हा, तिच्या मनात उमटलं.

काय, आज तू ही एकदम कॅज्युअल ?

अगं, जनरली मी असाच असतो आणि बहुतेक वेळेला असाच ऑफिसमधे जातो.

योगायोगाने गेल्या दोन्ही वेळेला फाॅर्मलमधे होतो.
आमच्या ऑफिसमधले बहुतेक सगळे कलंदर लोकं तर अजूनच कुठल्या कुठल्या कपड्यात असतात. एकदम Informal माहौल. मजा असते.

अरेच्चा. आमचं ऑफिस एकदम फाॅर्मल आहे. मला बघायला आवडेल तुझं ऑफिस.

चालेल नं. पुढची भेट तिथेच ठरवू. ते आहेही खाऊगल्लीत. काय हवं ते मिळेल.

नक्की. चला निघूया.
दोघांनी एकमेकांना बाय केलं आणि आपापल्या घरची वाट धरली.

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम झालाय हा भाग.सोप्या शब्दांत छान मुद्दे समजावताय.
पुढेही वाचायला आवडेल.>>+१११ पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
आपल्याकडे
आर्थिक साक्षरतेबाबत खुपच आनंदीआनंद आहे. अनेकांचे आर्थिक नियोजन म्हणजे घरातल्या सगळ्या सदस्यांच्या वीमा पॉलीसी काढणे असे असते.
त्यामुळे या लेखमालेचा माबोकरांना नक्की लाभ होईल अशी आशा आहे.

FIRE.jpeg

(हा फोटो २००५ मध्ये झोई रॉथ हिच्या वडिलांनी घेतला. ह्या फोटोला इंटरनेटवर बर्‍यापैकी प्रसिद्धी व बक्षीसे मिळाली होती. आता झोई कॉलेजात जाणार म्हणून फी साठी एनएफटी करून हा फोटो विकला. तिला तब्बल पाच लाख डॉलर मिळाले.)

छान लिहीले आहे. खरं तर हे टीनएजर्सना ही समजेल अशा भाषेत आहे. ज्यांची मुले त्या वयोगटात असतील त्यांनाही उपयोग होईल या लेखमालिकेचा.

सगळे भाग वाचलेत. अतिशय उत्तम माहिती आणि लेखन.

आर्थिक स्वातंत्र्य ही कल्पना अतिशय नेमकेपणाने स्पष्ट झाली आहे.

या भागात नचिकेतचा लांबलचक मोनोलॉग झालाय त्याला रेवाकडून येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं असं रूप दिलं तर अधिक गुंतवून ठेवणारं होईल.

अजूनपर्यंत लाइफ इन्शुरन्सचा उल्लेखही झालेला नाही हे इंटरेस्टिंग आहे.

छान भाग! पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या विषयी माहिती दिली गेली पाहिजे खरंतर. The earlier you start the better it is.

धनवन्ती, mrunal, धनुडी, स्वाती२ : प्रतिसादाबद्दल आभार..

@ साधना : खरं तर असे दोन धागे आठवतायत. एक 'रिटायरमेंट साठी किती रक्कम पुरेशी आहे' असा होता.
आणि दुसरा, कोणाचे तरी मित्र एक कोटीच्या गंगाजळीवर दोन, तीन वर्षांनी स्वेच्छानिवृत्ती घेणार होते, तर ती रक्कम पुरेशी आहे का असा धागा होता. माझ्या आठवणीप्रमाणे यात किती काॅर्पस पुरेसा यावर जास्त चर्चा झाली होती. (आणि विषयानुसार ते साहजिकच होते). पण तरुण वयापासून असा काॅर्पस जमवण्याबाबत त्यात विशेष उल्लेख नसावा. (चूभुदेघे)

@ वीरु : आर्थिक साक्षरतेबाबत खुपच आनंदीआनंद आहे. अनेकांचे आर्थिक नियोजन म्हणजे घरातल्या सगळ्या सदस्यांच्या वीमा पॉलीसी काढणे असे असते.
खरंय. म्हणूनच ह्या लेखातल्या माहितीची पातळी बेसिक आणि बेसिक प्लस अशी ठेवली आहे. जाणकारांना हे खूप बाळबोध वाटेल. पण ज्यांना हे माहिती नाही असाही एक मोठा वर्ग आहे, असावा... त्यांच्यासाठी या लेखाचं प्रयोजन आहे. (तुमच्या तिसऱ्या भागातल्या प्रतिसादाबद्दल आता अधिक खुलासा करतो : मुळात हाच भाग पहिला असायला हवा होता. पण नुसती माहिती देण्यापेक्षा कथेच्या फाॅर्मॅट मधे हे करावं का असा विचार आला. नचिकेत, रेवा डोक्यात आले आणि शिरुनच बसले. त्यामुळे आधीचे चार भाग ही प्रस्तावनाच आहे. {कदाचित अनावश्यक} ती ही दोनंच भागात आटपायचा विचार होता. पण लोकांनी रोल वगैरे पण सिलेक्ट केले, मग घाईघाईत आटपूनही चार भाग झालेच. पण असो.)

@ सीमंतिनी : झोईची माहिती आणि त्याचा मीम मधे वापर मस्तच. FIRE, तिची गंगाजळी हे तर एकदम चपखल.
तुमची मिम्स लेखाला चार चांद लावतात. धन्यवाद.

@ जिज्ञासा : पदवीचे शेवटचे वर्ष हा पण खूप उशीर होईल कदाचित.
दोन कारणांनी. एक म्हणजे हे एका वर्षात शिकण्यापेक्षा अजून आधीपासून थोडं थोडं मुलांच्या मनात मुरवत राहिलं तर जास्त चांगलं.
आणि दुसरं, आपल्याकडची असंख्य मुलं (विशेषतः कनिष्ठ आर्थिक स्तरावरची) पदवीच्या शेवटच्या वर्षापर्यंत पोहोचतच नाहीत. (ग्रामीण भाग किंवा शहरातला कष्टकरी समाज म्हणा).

अजून एक वेगळा मुद्दा : आपल्याकडे गणित, Commerce विषय म्हणून शिकवतात पण त्याची उपयोजिता, Application of the Knowledge हे बहुतेक वेळेला कधीच शिकवत नाहीत. मुलांना विषय येतात, पण त्याचा वापर कुठे कसा होतो, कुठे कसा करावा हे कळत नाही, शिकवलं जात नाही.
ही खरं तर अतिशय वाईट गोष्ट आणि कदाचित एका स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.

खूप महत्वाची माहिती आली आहे या भागात. या विषयावरची माहिती अजून वाचायला आवडेल.
कधीच इतका खोल विचार नव्हता केला.
भरत >> +१

@ भरत. : प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.

या भागात नचिकेतचा लांबलचक मोनोलॉग झालाय त्याला रेवाकडून येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं असं रूप दिलं तर अधिक गुंतवून ठेवणारं होईल.
खरं तर तसंच करायचा विचार होता पण हा भाग त्यातल्या कंटेट मुळे आधीच्या चारही भागांपेक्षा जवळजवळ दुप्पट मोठा झालाय. त्यात प्रश्नोत्तरं स्वरूपात मांडला असता तर अजून थोडा मोठा झाला असता.
दूसरा एक विचार असा केला की नचिकेत हे एका सलग, Uninterrupted आणि सुसंगत विचारांच्या ओघात, लयीत बोलतोय, अगदी मनापासून.
ती लय, तो ओघ तोडावासा वाटला नाही.
आता हे करताना खूप मोठा मोनोलाॅग झाला, एका व्यक्तिरेखेला खूपच जास्त महत्त्व दिलं गेलं हे ह्या निवडलेल्या पर्यायाचे निगेटिव्ह मुद्दे आहेतच.
संवादातून हे उलगडलं असतं तर नक्कीच वेगळ्या प्रकारे Balanced Interesting झालं असतं.
अजूनपर्यंत लाइफ इन्शुरन्सचा उल्लेखही झालेला नाही हे इंटरेस्टिंग आहे.

तुमचं निरिक्षण अचूक आहे. जीवनविमा हा गुंतवणुकीपेक्षा Hedging चा विषय आहे म्हणून तो त्या ठिकाणी कदाचित येईल..

@ रानभुली : प्रतिक्रियेबद्दल आभार..

काय घाण पकवले आहे नचिकेत ने... रेवा कसे सहन करतेय...
सॉरी अर्जेंट फोन आलाय मला जायला हवे म्हणून पळून कशी नाही गेली...

>>>>
भारतात १३० करोड लोकसंख्येच्या max. २% लोक फक्त आर्थिक साक्षर आहेत. हे लोकं व्यवस्थित आर्थिक गुंतवणूक करून स्वतःचा फायदा करून घेतात आणि उरलेले ९८% लोक चुकिच्या गोष्टींमधे पैसे गुंतवत राहतात.

तुम्ही सांगताय ती माहिती उत्तम आणि अतिशय उपयुक्त आहे. वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे नवतरुणच काय पण ३०-४० वयोगटातल्या पण आर्थिक साक्षरता नसललेल्या अनेकांना बोधप्रद आहे.
पण कथा म्हणून वाचताना आता कंटाळा आला. हे ललित लेखनाच्या सदरात हलवल्यास हरकत नाही असे माझे मत आहे. जोडीदार निवडताना आर्थिक दृष्ट्या सज्ञान माणून निवडणे हा गाभा आणि साचा समजू शकतो पण नचिकेतचा मोठा मोनोलॉग कथा म्हणून वाचताना खूप कंटाळा आला.