अर्थाअर्थी -(भाग-०४) - समज - गैरसमज..

Submitted by अ'निरु'द्ध on 4 June, 2021 - 17:08

अर्थाअर्थी -(भाग-०४) - समज - गैरसमज..

या आधीचे भाग :
अर्थाअर्थी -(भाग-०१) - टिंडर भेट..

अर्थाअर्थी -(भाग-०२) - चाय पे चर्चा..

अर्थाअर्थी -(भाग-०३) - नचिकेतच्या मनातलं..

रेवाला धक्काच बसला. हेच जर सांगायचं होतं तर या प्राण्याने का बोलावलं परत भेटायला ?

पहिल्या भेटीतल्या माझ्या उत्तराने मला या आर्थिक क्षेत्रात सध्यातरी काही गति नाहीये, मी काही करत नाहीये हे स्पष्ट नव्हतं का झालं.
मग हा एवढं मनापासून, नाॅनस्टाॅप आणि
तळमळीने सांगून चक्क नाही का म्हणतोय ?

त्याच्याबाबत अंतिम निर्णय घेतला नसला तरी रेवाला तसा तर तो आवडलेला होताच. बाकी भेटलेल्या मुलांपेक्षा तर खूपच जास्त.
म्हणूनच त्याचा हा नकार तिच्या मनाला खूपच लागला.
बिलाचे पैसे पर्समधून काढायच्या निमित्ताने तिने मान खाली घालून चेहेऱ्यावरची निराशा लपवायचा कितीही प्रयत्न केला तरी तिचा पडलेला चेहरा नचिकेतने पाहिलाच.

अगं ए रेवा, तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. हा विषय निघाला की मी माझा रहात नाही.
आणि एवढ्या कळकळीने सांगाव अशी खरं तर मला कोणी भेटलेलीही नाही. ह्या वाक्याला तर तो मान खाली घालून तिची नजर चुकवत होता.

हे बघ रेवा, मला अशी Financially Literate पत्नी हवीच आहे.
आणि ती आधीपासूनच तशी असेल तर उत्तमच. पण एखादी मुलगी आज तशी नसेल मात्र तिला हे सगळं शिकायला, आत्मसात करायला आवडणार असेल तरीही चांगलंच आहे की.
कदाचित असं तयार कोणी मिळण्यापेक्षा ही अनघड पासून माहितगार होण्याची प्रोसेस मला वाटतं जास्त मजेदार आणि इंटरेस्टिंग असेल.

मग ? आवडेल तुला हे समजून घ्यायला ? असेल इंटरेस्ट ह्यात ?
नचिकेतचा तो प्रचंड आर्जवी, जणू याचना करणारा स्वर रेवाच्या मनाला भिडला.
त्याच्या प्रत्येक शब्दागणिक तिची निराशा दूर होत गेली. चेहेरा पुन्हा हसरा होत गेला.
त्या विषयाचं महत्व तर तिला पटलं होतंच पण त्याची उपयोगिताही तिच्या लक्षात आली होती.
हे खूप काही कामाचं होतं, खूप आवश्यकही…
शिवाय आत्मविश्वास देणारं आणि आत्मनिर्भर बनवणारं.
तिचा होकार शब्दांत येण्याआधीच नचिकेतला तिच्या चेहेऱ्यावर दिसला.

पण हे कसं जमू शकेल ?

प्रत्येक भेटीत मी एखादी संकल्पना सांगिन. तुला थोडंसं इंटरनेटवर पहायला लागेल. कदाचित तुझे बाबा, दादा जर यात माहितगार असतील तर ते ही काही मदत करु शकतील.
युट्युब व्हिडिओज् वर पण बरीच माहिती मिळेल. फक्त त्यात चांगले व्हिडिओज्, चांगले माहिती देणारे वक्ते, चांगलं आणि योग्य चॅनेल निवडणं हे पथ्य तुला पाळायला लागेल.

आणि मुख्य म्हणजे आपल्याला अजिबात किचकट काही शिकायचं नाहीये.
एकदम बेसिक, साधं, सरळ, सोपं. आपल्याला ना इनव्हेस्टमेंट कन्सलटन्ट बनायचंय ना अर्थशास्त्री.

आपल्याला गाडी दुरुस्त करायला नाही शिकायचंय, फक्त ती चालवायचीय, मजेत, गाणी ऐकत..
सो नो टेन्शन.. आणि मी आहेच ना..

नचिकेत म्हणाला, फक्त एक गोष्ट दोघांमधे क्लिअर करु..

आपली ही दुसरीच भेट आहे. आत्ता आपण एकमेकांना बरे वाटलोय, आवडलो आहोत म्हणून भेटतोय.

पण पुढच्या भेटींमधे ही आवड टिकेलच असं नाही. कारण सुरुवाती सुरुवातीला सगळ्यांचीच Best Persona to Display अशी Tendency असते.
स्वतःच्या छान छान गोष्टी कळत नकळत प्रदर्शित केल्या जातात. पण नंतरच्या भेटीत हा असा पवित्रा थोडा सैल पडतो. नकळत चढवलेल्या मुखवट्या मागची, त्या प्रेझेंटेशन मागची व्यक्ती कुठेतरी दिसायला लागते. खऱ्या आवडीनिवडी, सवयी, स्वभाव जाणवायला लागतात
तेव्हा काही भेटींनंतर दोघांचाही काय निर्णय असेल तो वेगळा मुद्दा.

रेवा म्हणाली, बरं झालं हे तूच बोललास म्हणून. या Financial Literacy च्या लेनदेन मधे आपलं दोघांचं ठरलंच असं आत्ताच गृहीत धरायला नको. That Won't be a Burden on Me.
शेवटपर्यंत दोघांचीही एकमेकांबाबत आवड कायम राहिली तर उत्तमच. पण नाहीच जमलं आपलं, तर या आर्थिक साक्षरतेचा निदान मला तरी उपयोग होईल. I hope तुझी याला काही हरकत नसावी.

नचिकेत : Absolutely Not. हे सगळं तू जाणून घेतलंस, Financially Aware झालीस तर मला त्याचा आनंदच होईल.

रेवा : सी यू देन..

नचिकेत : बाय..

रेवाने आज बेल दाबायचे कष्ट घेतलेच नाहीत. चावीने दार उघडून ती घरात गेली आणि थेट तिच्या रुममधे घुसली. तिला आज घरच्या कोणाच्याही चौकशा नको होत्या, विशेषतः आईच्या.

दुसरा दिवस शनिवार होता. कोणालाही कुठेही जायची घाई नव्हती. डायनिंग टेबलवर सगळे रेवाची वाट बघत होते.
रेवा गंभीर चेहेऱ्याने खुर्चीवर येऊन बसली.

काय कळलं का गं त्याच्या त्या प्रश्नाचं ? आईने विचारलं. की यावेळी आपली इस्टेट किती याची चौकशी केली ?

रेवा : नाही आई. असं काहीही झालेलं नाही.

मग रेवा त्याचं सुरुवातीचं सगळं बोलणं गंभीरपणे सांगून म्हणाली,

'त्यामुळे बाकी कितीही मतं जुळली, मनं जुळली तरीही मला माझी पत्नी मात्र Financially Literate च हवीय', असं नचिकेतचं म्हणणं आहे.
आणि मला तर तुम्ही यातलं कधी काही सांगितलं नाहीये, ना कुठे बँकेची वगैरे कामं सांगितली, ना करवून घेतली.

आई : चांगला दिसतोय गं मुलगा. रेवा, हे स्थळ सोडायचं नाही बरं का… मी ठरवलंय. ह्याच मुलाशी तुझं लग्न लावून द्यायचं.
आईचे रंग बदलेले बघून दादा आणि बाबांनी एकमेकांकडे पाहिलं.

आणि काय हो ? इनव्हेस्टमेंटच्या नावाखाली त्या भुस्कुटे भाऊजींचं डोकं तुम्ही दोन दोन तास खाता..
हिला त्यातलं कधी काही सांगावं, त्यांच्याकडे तुमच्यासोबत न्यावं असं कधी वाटलं नाही तुम्हाला ?

बाबा : रेवा, मग आता काय गं पर्याय ? अगदी ठामपणे म्हणाला का तो हे ? चालवून घेईल असे काही चान्सेस ??

रेवा गंभीर सूर कायम ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत म्हणाली : नाही, तो म्हणाला ठामपणेच, खरं तर अगदी ठाशीवपणे.
आणि या बाबतीत काही कॉम्प्रमाईज करेल असंही वाटत नाहीये. त्याला Financially Aware मुलगीच पत्नी म्हणून हवीय..

फक्त तो पुढे म्हणाला की एखादीला हे माहिती नसलं, आत्ता कोणी तशी नसली पण तिची हे शिकायची तयारी असेल तरी त्याला ते चालेल म्हणून.

मग ?

मग मी तयारी आहे म्हणून म्हटलंय. इथे मात्र तिचा स्वर विलक्षण आनंदी होता.

अरे व्वा.

मग आता पुढची भेट कधी ?
येत्या बुधवारी बँक हाॅलिडे आहे. दोघांनाही सुट्टी आहे. आता हे सगळं बोलायचं तर जास्त वेळ लागणार म्हणून आम्ही सकाळी साडेदहा वाजता भेटणार होतो पण कॅफे तेवढ्या लवकर उघडत नाहीत. शनिवार रविवार नसल्यामुळे Brunch ही नसेल कुठे. मग साडे अकराला भेटु, असं ठरलंय.

आई : कशाला उशीर करता. अगदी दहा वाजल्यापासूनच जावईबापूंना आपल्या घरीच बोलव…

आऽऽई, पमाऽऽऽ….

रेवा, दादा आणि बाबा एकदमच ओरडले..

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

च्रप्स, वीरु : धन्यवाद

हो वीरु, पुढच्या भागापासून.
ह्याच भागात सुरुवात करणार होतो पण मग हा भाग खूप मोठा झाला असता.
आता ह्यापुढे गोष्ट पिछाडीला जाईल आणि आर्थिक बाबी आघाडीवर..

मस्त सुरूए.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

मस्त सुरू आहे गोष्ट.....
आता नचिकेत व रेवा रोज भेटणार की आठवड्यातून एकदा?

रच्याकने, गोष्टीनिमित्ते आपली जुनी चर्चा आठवली.

मस्तय Happy सलग वाचून काढली. नचि चे मुद्दे पटले. आवडलाच मुलगा मला. मला मुलगी असती तर असा जावई आवडला असता. Happy

सी Lol

आसा. , मृणाली, जिज्ञासा, स्वाती२, धनुडी, Rani_1, फलक से जुदा

प्रतिसादाबद्दल आभार..
@ साधना : अहो त्या दोघांना दिवसातून दोनदा पण भेटायला आवडेल. पण इथे मात्र आठवड्यातून एकदाच..
@ सीमंतिनी, तुमची सर्वच मीम्स भारी असतात..
पण हे एकदमच लय भारी Wink