अर्थाअर्थी -(भाग-०३) - नचिकेतच्या मनातलं..

Submitted by अ'निरु'द्ध on 2 June, 2021 - 16:04

अर्थाअर्थी -(भाग-०३) - नचिकेतच्या मनातलं..

या आधीचे भाग :
अर्थाअर्थी -(भाग-०१) - टिंडर भेट..

अर्थाअर्थी -(भाग-०२) - चाय पे चर्चा..

शुक्रवारी सकाळी रेवा ब्रेकफास्ट साठी आली तेव्हा डायनिंग टेबलजवळ एकटा दादाच बसला होता.

दादा : काय मग कधी आणि किती वाजताची भेट ठरलीय तुझ्या नचिकेत बरोबर?
रेवाने आश्चर्यचकित होऊन विचारले, दादा, तुला कसं कळलं ?

म्हणजे काय.. जेव्हा जेव्हा तू ब्रेकफास्ट साठी माझ्यासमोर येतेस तेव्हा तुझ्या चेहेऱ्यावर भांडखोर भाव असतात.
आज तू स्वतःतच हरवलीयस. चेहेऱ्यावर लाजरं हसू आहे.
म्हणून अंदाज लावला.

काहीही हं दादा..

कितीऽऽ वाजता ऽऽऽ ?

आज संध्याकाळी सात, रेवा नजर चुकवत उत्तरली.

तिकडे नचिकेत ऑफिसला जाण्यासाठी दिवाणखान्यात आला तेव्हा सोफ्यावर बसलेले नाना त्याला म्हणाले, आज उशीर होणारेय ना रे ? आणि जेवायलाही नसणार नां ?

हो. पण नाना, तुम्हालाऽऽऽ कसं काऽऽय..

अरे, एखाद्या ढ मुलाला शाबासकी दिल्यावर त्याचा संपूर्ण चेहेरा जसा इथून तिथपर्यंत खुळचट हसरा होतो तसा तू दिसतोयस. म्हणजे त्या रेवाला आज भेटणार असशील असं वाटलं.

तेवढ्यात लगबगीने टिफीन द्यायला आलेल्या माई नचिकेतकडे पहात म्हणाल्या, आज अगदी तुमची आठवण आली हो. केवढा तुमच्यासारखा दिसायला लागलाय.
आठवतं का ? तुम्ही लग्न ठरल्यावर मला भेटायला यायचात तेव्हा अगदी असेच दिसायचात.
नानांनी कपाळावर का हात मारुन घेतला आणि नचिकेत का खदाखदा हसत टिफीन घेऊन घराबाहेर पडला, माईंना काही कळलंच नाही.

सातला पाच कमी असताना दोघे एकाच वेळी माॅकिंगबर्डच्या बाहेर भेटले.

आत जाऊन ऑर्डर दिल्यावर थोड्या इथल्या तिथल्या गप्पा झाल्यावर रेवानी विचारलं, परवा कामाच्या गडबडी बद्दल बोलत होतास. काय काम असतं तुझं नेमकं ? म्हणजे त्या दिवशी बाकी आपण काही बोललोच नाही, नाही का ?

मी ॲड एजन्सीमधे पार्टनर आहे. अजून तिघे पार्टनर आहेत. तिघेही वयाने आठ/दहा वर्षांनी मोठे आहेत. पण कंपनी मी फाॅर्म केलीय. कारण मला लवकरात लवकर स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा होता. हे तिघेही कुठे कुठे नोकरी करत होते. त्यांच्या त्यांच्या कामात छान होते. चांगली टीम होईल असं वाटलं. मग ऑफर देऊन, सगळं ठरवून कंपनीच फाॅर्म करुन टाकली.

मग टिंडर वर कसा आलास ?
या पार्टनर लोकांच्या बायकांमुळे. इथून तिथून माहिती गोळा करणं आणि जरुर त्याला पुरवणं हा यांचा छंद.
तशा ह्या तिघी माझ्या वहिन्या असल्या तरी मैत्रिणीच जास्त आहेत. पण माझ्यावर दादागिरी फार करतात. आणि मी ऑफिसात बाॅसिंग करतो म्हणून पार्टनर लोकांचीही त्यांना साथ. ती ही उघड उघड.

आमच्या चौघांमधे मी एकटा अनमॅरिड. मग बघवत नाही ह्या तिघींना. त्यात माझ्या माईची त्यांना फूस.

यांनी आधी मॅट्रीमोनीअल साईटवर माझं नांव नोंदवलं. तिथे काही जमलं नाही. मग एके दिवशी ऑफिसमधे आल्या होत्या तेव्हा म्हणाल्या, हल्ली त्या डेटिंग साईट्सच्या चर्चा आहेत फार. तू एवढा तरुण आहेस, कर जाॅईन. बघ तिकडे काही जमतंय का.
मला तर वाटतं यांचा लग्न जमवायचा वगैरे काहीतरी स्टार्ट अपचा प्लॅन असणार.
मी त्यांना म्हणालो की मॅट्रीमोनीअल साईटपेक्षा ते खूप वेगळं आहे म्हणून.
तेव्हा त्या म्हणाल्या, अरे नचिकेत, तुला आम्ही ओळखत नाही का.
मॅट्रीमोनीअल साईट्स सिंगल पर्पज आहेत. त्यांच्या ठराविक रुटिन प्रोफाईलला कंटाळला असशील तर माॅडर्न आणि मल्टीपर्पज टिंडर ट्राय कर.
सुरुवातीला ते आलं तेव्हा फक्त डेटिंग पुरतंच होतं. Limited to Urban, rather Metro Cities.
पण आता तेही भारतीय होतंय. चेहेरामोहरा बदलतंय.
शेवटी संपूर्ण भारतभर व्यवसाय वाढवायचा तर थोडीफार भारतीय संस्कृती त्यांना स्विकारावी लागणारच.
इथे तुला फ्रेश, माॅडर्न प्रोफाईल्स मिळतील. मोकळ्या मनाने आवडीनिवडी देणाऱ्या मुलींमुळे त्यांच्याशी तुझी कंपॅटिबिलीटी जास्त चांगली मॅच होऊ शकेल. कदाचित बेटर चाॅईस मिळेल. ट्राय करायला तर हरकत नाही ना ?

मग मी ही विचार केला की डेटिंगच्या प्रायमरी इंटरेस्ट व्यतिरिक्त Serious Relationship मधे स्वारस्य असलेले कमी प्रमाणात का होईना कोणीतरी असेलंच.
मग मी तशा प्रोफाईल्स चाळल्या आणि तुझ्या प्रोफाईल मधलं सिरियस रिलेशनशिप वाचून तुला Right Swipe केलं.

रेवा : हो आणि मी ही मॅच फाऊंड मधे तुझ्या प्रोफाईल मधे आधी तेच पाहिलं. बाकीही प्रोफाईल बरी वाटली मग भेटायला हो म्हटलं.

नचिकेत : Ya and Actually it Worked. बरं, तुझ्या कामाचं स्वरूप काय आहे.

रेवा : मी बी.ए. with Psychology केलं आणि आता HR Executive म्हणून काम करतेय.

मग कामाचा भाग म्हणून बऱ्याच लोकांशी बोलावं लागत असेल ना.

हो ना. इंटरव्हयूज घेणं, अपाॅईंटमेंट करणं, सॅलरी निगोसिएशन्स, त्यांच्या रजा, डिफीकल्टीज, परफाॅर्मन्स हे सगळं मॅनेज करताना बोलावं तर लागतंच. मेडिक्लेमच्या वेळीही बोलणं होतं.
यामुळे त्यांच्याशी थोडी जवळीकही होते. मग ते ही त्यांच्या अडचणी, सुखदुःख शेअर करतात.
सायकाॅलाॅजीची पार्श्वभूमी असल्याचा या सगळ्यात मला फायदाही होतो.
आणि मी जे बोलते त्यामुळे त्यांनाही कुठेतरी थोडासा दिलासा मिळत असावा. कारण ते त्यांच्या वागण्या बोलण्यातून, संवादातून जाणवतं.

नचिकेत. : हे लोकं आर्थिक बाबतीतही त्यांच्या अडचणी बोलत असतील ?
हो ना. कधी लोन साठी किंवा ॲडव्हान्स पेमेंट साठी येतात तेव्हाही बोलणं होतं आणि कधी कलिग म्हणूनही बोलणं होतं.

नचिकेत : त्यांच्या अडचणी ऐकून तू मात्र तुझ्या आर्थिक बाबी एकदम सुनियोजित well planned करुन ठेवल्या असतील ना.?

नाही म्हणजे खरं तर I don't know..

नचिकेतने वेळ किती उरलाय याचा अंदाज घ्यायला घड्याळात पाहिलं.

अनायसे निघालेला विषय आणि आठवडाभर मनाला सतावणाऱ्या प्रश्नाबद्दल आता विचारायची वेळ आली असं रेवाला वाटलं.

आणि एकाचवेळी दोघंही बोलले.

नचिकेत : मला एक सांगायचं होतं.
रेवा : मला एक विचारायचं होतं.

हं. बोल ना.
पुन्हा दोघं एकदम बोलले.

थोडंसं Awkward हसत परत दोघांनीही एकदम म्हटलं : तो गेल्या आठवड्यातला प्रश्नऽऽऽऽ

नचिकेत म्हणाला, थांब. मीच बोलतो.

तू खरंच तुझ्या पगाराच्या पैशांबद्दल काही करत नाहीस ? की पहिली भेट म्हणून तेंव्हा तसं बोललीस ?
रेवा म्हणाली अरे नाही, खरंच. मी गेल्या वेळेला सांगितलं होतं तसंच. बाबाच सगळं बघतात. या बाबतीत मी कशातच लक्ष घालत नाही.
नचिकेत : हे योग्य आहे, असं वाटतं तुला ?
रेवा : म्हणजे आत्तापर्यंत कधी तसा विचारच केला नव्हता.
नचिकेत : पण का ? आधी कधी याबद्दल काही वाचलं बिचलं नाही ?
रेवा : नाही. कारण तशी कधी वेळच आली नाही.
नचिकेत : तुझ्या घरच्या कुणी कधी सुचवलं नाही ही की आता तुझी जबाबदारी आहे. तू बघ, जरा लक्ष घाल म्हणून.
किंवा घरच्यांचे, त्यांच्या पैशांचे जे काय व्यवहार असतील त्याबद्दल तुला कोणी तोंड ओळख करून दिली नाही ?
रेवा : कधीच नाही.

रेवा, कसं असतं नं, की लहान असताना सुरुवातीला आपण चालताना पडतो, धडपडतो. तेव्हा घरचे आपल्याला चाली चाली करवतात, आपल्यासाठी पांगुळगाडा आणतात, टप्प्याटप्प्याने आपल्याला ते जमावं म्हणून.
तसंच सायकलच्या बाबतीतही होतं. आपले बाबा, मोठा भाऊ, शेजारचा कुठलातरी दादा, एखादी ताई छोटीशी सायकल घेऊन आपल्याला धरून धरून सायकल चालवायची शिकवतात. मग तीची एक्स्ट्रा व्हील्स काढून तशीही प्रॅक्टीस देतात. आपण पडलो, धडपडलो तर पडून खरचटल्याशिवाय सायकल चालवता येत नाही असं आदिम ज्ञान ही देतात. आणि जरी खरचटलं तरी पुढे शिकवतात, आपल्याला जमेपर्यंत.

दहावी-बारावीला शाळेबरोबरच खाजगी क्लासेस मधेही घालतात. आणि या सगळ्यांचा उद्देश असतो की आपलं पुढचं आयुष्य हे सुखासमाधानाचे, समृद्धीचे आणि मजेचं जावं.
स्वतःच्या पायावर मुलांनी उभं रहावं यासाठी आटापिटा करुन शाळा, काॅलेजमधे सर्वोत्कृष्ट शिक्षण देण्याचा प्रयत्न करणारे पालक त्या शिक्षणाच्या विनियोगातून येणारा पैसा कसा सांभाळावा याबाबत शक्यतो कधीच कुठलंही शिक्षण का देत नाहीत ?

आपल्याकडे बाकी इतर सर्व गोष्टी शिकवतात.
पण आर्थिक साक्षरता हा विषय ना शाळेत शिकवत, ना घरी शिकवत. ना हे मित्रांमध्ये बोललं जातं ना शक्यतो कुठेच.
पैसा आणि त्याची गुंतवणूक हा विषय अगदीच टॅबू असल्यासारखा का मानला जातो मला कल्पना नाही.

अर्थात आता हळूहळू हे चित्र बदलायला लागलंय पण तरीसुद्धा या बाबतीत रस घेणाऱ्या माणसांची टक्केवारी फार कमी आहे. ज्या जाती जमातींमधे पिढ्यानुपिढ्या व्यवसाय चालत आलेला आहे ते फक्त याला अपवाद.
शिवाय बहुतेक वेळेला मुलींना तर यापासून लांबच ठेवलं जातं.

ज्या गोष्टी वर तरुण आणि प्रौढ वयातला आत्मविश्वास आणि संपूर्ण उतार वयाची, निवृत्तीची मदार अवलंबून असते त्या महत्वाच्या Skillset कडे का दुर्लक्ष ?

कुठल्याही जोडप्याने खूप काळ सुखाने संसार केला तर चांगलंच आहे. पण काही आजारपण, अपघात वगैरेमुळे एका जोडीदाराचा लवकर मृत्यू झाला तर सगळं व्यवस्थित असूनही मागे राहिलेल्या आर्थिक दृष्ट्या अजाण जोडीदारामुळे दोघांनीही कमावलेल्या संपत्तीची, केलेल्या तरतूदींची वाताहात व्हायला नको. संधीचा फायदा घेऊन जवळच्यांनी, लांबच्यांनी फसवलं असं व्हायला नको.

खरं तर बँकिंग, आरोग्य विमा, लाईफ इन्शुरन्स, करबचतीसाठी गुंतवणूक, निवृत्तीसाठी गुंतवणूक, नाॅमिनेशन, आर्थिक दृष्ट्या फ्री होणं म्हणजे काय हे दोघांनाही बऱ्यापैकी माहिती असावं, दोघांनी मिळून संपत्ती राखावी, वाढवावी.. असं व्हायला हवं.

यात अगदी मास्टरी नसली तरी मूलभूत संकल्पना माहिती असायला हव्यात. आर्थिक सल्लागाराने दिलेला सल्ला योग्य आहे की नाही हे समजून घेता यावं.
मुलांवर अर्थसाक्षरतेचे संस्कार दोन्ही पालकांकडून व्हावेत.

असं सहजीवन जगायला मला खूप आवडेल.

आयुष्यात इतर अनेक चिंता असताना आपल्या पश्चात आर्थिक साक्षरते अभावी आपला जोडीदार काय करेल याची चिंता आयुष्यभर पोखरत रहायला नको.

त्यामुळे बाकी कितीही मतं जुळली, मनं जुळली तरीही मला माझी पत्नी मात्र Financially Literate च (अर्थसाक्षरच) हवीय.

असं म्हणत वेटर कडून आलेला बिलाचा फोल्डर नचिकेतने रेवाकडे सरकवला.

जो प्रश्न रेवाला, तिच्या घरच्यांना सतावत होता त्या प्रश्नाचं तिला उत्तर मिळालं होतं.

(क्रमशः)

पुढील भाग : अर्थाअर्थी -(भाग-०४) - समज - गैरसमज..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झाला आहे हा भाग पण.
मला तर वाटतं यांचा लग्न जमवायचा वगैरे काहीतरी स्टार्ट अपचा प्लॅन असणार. >> Lol

छान! अर्थसाक्षरता हवीच. नचिकेतला हे सगळे कसे आणि कुठून कळले त्याच्या प्रेरणा काय हे देखील गोष्टीत आलं तर वाचायला आवडेल.

मग टिंडर वर कसा आलास ?
या पार्टनर लोकांच्या बायकांमुळे.
>>> आवरा...

नचिकेत चे मुद्दे आवडले.. रेवा त्याच्यासाठी योग्य मॅच वाटत नाहीय...

खूप महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. . कथा format मधे हे सांगणे जास्त आवडले. हे financial planning training खरे तर सर्व पालकांनी आपल्या मुलांना द्यायला हवेच हवे.

सगळे भाग वाचले.

आवडला हा भाग ही.
पुढील लेखणास शुभेच्छा.
>> +१

कथा छान सुरु आहे, आर्थिक साक्षरताही महत्वाचीच पण दुसऱ्याच भेटीत कोणी तिला आर्थिक साक्षरतेवरुन लेक्चर देईल का? हा प्रश्न मनात आला.

सीमंतिनी, जिज्ञासा, च्रप्स, धनवन्ती, mrunali, हर्पेन, स्वस्ति, वीरु

सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार..

@ च्रप्स : दोघं सुयोग्य (आर्थिक बाबतीत Compatible) असतील तर गोष्ट पुढेच जाणार नाही. त्यामुळे सध्यातरी रेवा सुयोग्य मॅच नाहीये.

@ धनवन्ती <<खूप महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. . कथा format मधे हे सांगणे जास्त आवडले. हे financial planning training खरे तर सर्व पालकांनी आपल्या मुलांना द्यायला हवेच हवे.>>
फायनॅन्शिअल बाबतीत लिहावं (फार तपशीलवार नाही पण सुरुवातीची तोंडओळख, अगदीच नवोदितांकरता.) अशी संकल्पना होती.
हे डायरेक्ट कसं लिहावं याचा विचार करता करता हे कथेचं रुप डोक्यात आलं.

@ वीरु <<<आर्थिक साक्षरताही महत्वाचीच पण दुसऱ्याच भेटीत कोणी तिला आर्थिक साक्षरतेवरुन लेक्चर देईल का? हा प्रश्न मनात आला.>>>

बरोबर आहे तुमचं म्हणणं. मूळ विषय आर्थिक साक्षरता हा होता. एकेका भागात एकेक मुद्दा असं स्वरुप असणार होतं. पण मग मधेच हे नचिकेत, रेवा मनात आले.. ह्याला सलग कथेचे रुप दिलं गेलं. लोकांना आवडेल की नाही असं वाटत होतं पण उत्साहवर्धक प्रतिसाद आले. माबोकरांनी रोलही आपलेसे केले. हे तीन भाग खरं तर प्रस्तावनेचेच आहेत. (डायरेक्ट विषयावर लिहायचं ठरवलं असतं तर खरं तर पूर्णपणे अनावश्यक.)
ते ही दोन भागातच आटपेल असं सुरुवात करण्यापूर्वी वाटलं होतं, पण तीन भाग झाले.
आता दुसऱ्याच भेटीत हे लेक्चर आलं हे कथेच्या दृष्टीने लवकरच आणि म्हणून चूकच. पण मुळ मुद्दा बाजूला रहायला नको म्हणून नचिकेतरावांनी दुसऱ्या सेमिस्टरचा पोर्शन पहिल्याच सेमिस्टर मधे आटपून घेतला.
यापुढच्या भाग (आधीच मनात ठरवल्याप्रमाणे) आता गुलमोहर : कथा-कादंबरी मधे न येता आर्थिक विषयाच्या टॅब खाली येतील.
आता ही सांधेजोड/प्रयोग वाचकांना आवडते की नाही ते बघायला लागेल. (म्हणजे कथा वाले आर्थिक विषय आले म्हणून नाराज आणि आर्थिक वाले कथा का घुसवली म्हणून नाराज Uhoh )

प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार.

आर्थिक साक्षरता प्रत्येकासाठी महत्वाचीच! त्या जोडीला सुज्ञ ग्राहक बनणेही आजच्या काळात फार गरजेचे. टिंडर वाल्या पहिल्या-दुसर्‍या भेटीतच अर्थविचार येणार नाही म्हणूनच FIRE वाला का असे विचारले. आर्थिक साक्षरता हा मुद्दा इतका डील ब्रेकर आहे तर तसे क्रायटेरीयातच यायला हवे होते. आता नचिकेतने इतक्यात रेवाला राईट ऑफ करु नये. डेटिंग करायचे तर थोडा वेळ द्यावा. त्याच्या या मुद्द्याबाबत काही तरी बॅक स्टोरी असेलच ना? रेवा आत्ता अर्थ साक्षर नाहीये कारण तसे तिला वाढवलेले नाहीये पण हे लाईफ स्कील महत्वाचे आहे हा विचार रुजला तर नचिकेतच्या मदतीने ती देखील अर्थ साक्षर होवू शकते. बघा, त्यातून एक एक मुद्दा कव्हर करता येइल. कदाचित रेवा स्वतः अर्थ साक्षर होवून , पुढे ती काम करते त्या कंपनीत एच आर तर्फे अर्थ साक्षरता वर्ग सुरु करेल.

स्वाती२, प्रतिसादाबद्दल आभार..

वरच्या माझ्या प्रतिसादात काही खुलासे केलेले आहेत.
आत्तापर्यंत तरी प्रत्येक भागाचा शेवट अपूर्ण घटनेवर केला आहे.
(असा हा शेवटचाच भाग बहुतेक)
त्यामुळे जरी पुढच्या सगळ्या भागांचा ढाँचा जवळ जवळ ठरलेला असला तरी सगळ्या गोष्टी आत्ताच स्पष्ट करता येणार नाहीत.
(खरं तर नचिकेत रेवाचं अजून संभाषण पुढे आहे. पण हा भाग एका बोल्ड स्टेटमेंटवर संपवायचा होता म्हणून इथेच थांबवला.)

छान झालाय हा भाग. आर्थिकदृष्ट्या साक्षर असण ही काळाची गरज आहेच.

घरच्या लक्ष्मीला वनलक्ष्मीचं रूप मिळावं हे सामाजीक वनिकरणाचं काम आहे.
जळणाला लाकूड
गुरांना चारा
गाठीला पैका घरच्या घरी
सामाजीक वनिकरण येता दारी

Light 1

आसा., जेम्स बाँड, सायो, maitreyee, धनि अभिप्रायाबद्दल आभार.
सीमंतिनी, तुमची मीम्स नेहेमीप्रमाणेच सुंदर.

या भागात नवीन कॅरेक्टर्स आली तरी यावेळी त्यांना उठाव नाही. Sad
कॅरेक्टर्स वयस्कर असल्यामुळे असेल कदाचित. मायबोलीवर सगळेच तरुण.. Wink
पुढचा भाग पोस्ट केला आहे.

कॅरेक्टर्स वयस्कर असल्यामुळे असेल कदाचित. मायबोलीवर सगळेच तरुण.. Wink
असं कसं असं कसं.....तुम्ही तो वयाचा धागा वाचलेला दिसत नाही :))

असं कसं असं कसं.....तुम्ही तो वयाचा धागा वाचलेला दिसत नाही :))

वाचलाय की. माझे चार शब्द आणि माझ्या बद्दलही चार शब्द आहेत बहुतेक तिथे.

पर मै तो दिलकी बात कर रहा था.. Wink