आगुनेर पोरोशमनी - तेजोमय पारसमणी - गुरुदेव टागोरांची एक सुंदर रचना

Submitted by किशोरी on 6 May, 2021 - 11:11

क्षितिजापर्यंत पसरलेलं, चंद्र चांदण्या तारे जडलेलं, आपलं उत्तरीय सावरत रजनीने आकाशाचा निरोप घेतला. लालिमा भरल्या नयनांनी उषेने सृष्टीवर दृष्टी टाकली आणि विश्व उजळून निघालं. माझ्या कल्पनाविश्वात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा रूप डोळ्यासमोर आलं.

अशीच रम्य पहाट झाली असेल. जागृत, संवेदनशील कविवर्य प्रकाशाचे स्वागत करण्यासाठी उद्यानात निघाले असतील. सोनेरी जरतारी किरणांची वस्त्रे ल्यालेले लाल गुलाबी मेघ बघून ते प्रसन्न झाले असतील. तृणपात्यांनी दंवबिंदुंच्या माळा त्यांच्या चरणी अर्पण केल्या असतील. बकुळ फुलांचा गंध घेऊन शीतल समीर त्यांना स्पर्शून जात असेल. उमलत असलेली चंपक वृक्षाची फुले पाहून त्यांना तरुणाईच्या मनात उमलत असलेल्या प्रतिभेची आठवण होत असेल. वृक्षांच्या पानांआडून आशेने भरलेले आनंदी सूर गाणारे पक्षी त्यांना मोहवत असतील. सुदूर आकाशात भरारी घेणाऱ्या विहंगांचे स्वातंत्र्य, त्यांना भारत मातेची स्वातंत्र्य -गीते गायची प्रेरणा देत असेल. पानोपानी नाचणारी सोनेरी किरणे पाहून त्यांना वाटत असेल, संपणार आहे लवकरच अंधार, अशीच रम्य पहाट फुटणार आहे जनमनाच्या आकाशात! प्रकाशच प्रकाश पसरणार आहे दिगंतात!

मग माझ्या मनाला प्रश्न पडतो, प्रकाशाचं असंच अस्तित्व अभिप्रेत होतं का त्यांना? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या या कवितेने दिले .

“आगुनेर पोरोशमनी छुवाओ प्राने ए जीवन पूर्ण कोरो” त्यांना अभिप्रेत होता प्रखर अग्नी तत्वाचा प्रकाश!

त्या वेळी भारताची परिस्थिती कठीण होती. तरुणाई दिशाहीन झाली होती. ईश्वरावर, मानवतेवर, एवढेच काय स्वतःवरचा ही विश्वास उडाला होता. भय, अश्रद्धा, अज्ञान व अनास्था व्यापून होती सगळीकडे. निराशेच्या काळोखात मन प्राण हरवले होते. गुरुदेवांना जाणवत होती ही काळिमा, म्हणून त्यांना हवा होता अग्नी तत्वाचा पारसमण्यागत स्पर्श! वाईटाला जाळून, नष्ट करून, प्रकाशित होणारे अग्नी तत्व! त्यासाठी दधिचीच्या त्याग भावनेची आवश्यकता होती. स्वतःची आहुती देऊन, मातृभूमीच्या देवालयात दीप बनून, स्वत: ला संपवत,सर्वांना प्रकाशाची वाट दाखवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली!

“आमार एई देहोखानी तुले धोरो
तोमार देवालये प्रोदीप्त कोरो “

ते म्हणतात, फक्त वाट दाखवायची नाही तर आशेने भरलेली मधुर गीतेही गायची आहेत. ईश्वरा फक्त माझ्या विचारांना तू आधार दे. माझी व्यथा, माझी कळकळ सर्वांपर्यंत पोहचू दे!

सामान्य माणसाला देवाकडे काय मागावं ते कळत नाही. तो आपलीच दुःखे चाचपडत राहतो. पण गुरुदेवांनी अग्नी देवतेकडे जे ‘पसायदान‘ मागितले त्यात त्यांचं आलोकित व्यक्तिमत्व दिसून येतं.

या गीताला अनेक गायकांनी स्वर दिला. प्रत्येकाच्या गीतातून तीच आर्तता हृदयाला स्पर्शून जाते. माझ्या अल्पमतीनुसार त्या गीताचा भावानुवाद करून त्यांच्या दिव्य विचारांचा “सागर गागर मे भरने का “ प्रयास करायचे धाडस मी करतेय.

हा भावानुवाद ७मे रोजी - गुरुदेवांच्या जन्मदिवशी त्यांना अर्पण!

“तेजोमय पारसमणी “
—————————-
तेजोमय अग्नीने पारसमणी सम स्पर्श करावा मला ।
दाहक दुःख देऊनही, शुद्ध कांचन सम करो जीवनाला ।
ऊर्ध्वगामी विचार व्हावे आधार तुझा मज मिळावा ।
प्रदिप्त होऊन तुझ्या मंदिरी देह दीप हा उजळावा ।
निशिदिन आलोक शीखेसम प्रकाश गीतातून यावा ।
तव कोमल स्पर्शे, घोर तिमीरी ही सूर स्फुरत राहावे ।
साऱ्या रात्री नव नव प्रतिभेचे तारे नभी उगवावे ।
दृष्टी नयनांना नवी मिळावी, तिमीरातही मार्ग दिसावे।
व्यथा जाव्या जळूनी सार्‍या, चमकत राहावे आकाश ।
जाईल दृष्टी जिथवर तेथे दिसावा प्रकाशच प्रकाश!!

हे गीत अनेक गायकांनी गायले आहे. काही लिंक्स इथे देत आहे. जरूर ऐका....

Aguner Poroshmoni by shaan - https://www.youtube.com/watch?v=2IkAz8K_QGM

guner Parasmani Chhoao Prane" by Smt.Swagatalakshmi Dasgupta - https://www.youtube.com/watch?v=pYTj0OAsbF8

Aaguner Parasmoni - Iman Chakraborty - https://www.youtube.com/watch?v=zqT6noi9vzc

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप आवडले. आज गुरूदेवांची जयंती आहे त्यानिमित्ताने तुम्ही केलेले लेखन समयोचित...!

फारच छान.
हे गीत हेमंत कुमारांच्या आवाजातले ऐकायला फार आवडते.
भावानुवाद छान झालाय.