गुरुदेवांचे निसर्गप्रेम

Submitted by किशोरी on 25 April, 2021 - 04:24

गुरुदेव रवींद्रनाथ यांच्या जीवन कार्याचा आणि साहित्याचा महासागर खऱ्या अर्थाने रत्नाकर आहे .अगणित रत्नांनी भरलेला ! त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभिन्न भाग म्हणजे त्यांचं निसर्गाशी नातं! ७ मे या त्यांच्या जयंती निमित्त या पैलूकडे बघूया.

"आजी होते शतावर्षो पोरे के तुमी पोडीछो बोसी आमार कविता खानी". 'चित्रा' या त्यांच्या काव्य नाटकात ते विचारतात तू दक्षिण द्वार उघडून वातायनात बसून दूर दिगंतात दृष्टी टाक, बघ काही दिसतंय का. कधी कोणी कवी होता शतवर्षांपूर्वी? क्षणभर वाचशील का माझ्या कविता? माझ्या मनातली सुंदर प्रभात, बहरलेला वसंत, विहंगाचे गाणे, लालीमेने नटलेले मेघ या सर्वांबद्दलचा माझा अनुराग पोहोचवू शकणार आहे का मी तरुणाईपर्यंत, शत वर्षानंतर?

फाल्गुनाच्या सोनेरी किरणांनी न्हालेली धरती, फुलांच्या परागगंधाने माखलेला दक्षिण समीर, चंचल पंखांचे बंधनरहित पक्षी .... हा सुंदर निसर्ग पाहून कवीचे हृदय भरून जातं, फुलतं. शतवर्षांनी ध्वनित होतील का ही गीते पानांच्या सळसळीत, भ्रमराच्या गूंजनात, तरुणाईच्या हृदय स्पंदनात? शतवर्षानंतर?

होय, गुरुदेव आज दीडशे वर्षांहून जास्त काळ लोटला पण तुमचीच गीते गुंजन करतात भारतीयांच्या मनात!

रवींद्रनाथ टागोर अत्यंत संवेदनक्षम होते. त्यांच्या सर्व भावना निसर्गाशी निगडित होत्या. राने वने, बरसणारे मेघ, उसळून वाहणारे झरे, कधी श्यामल तर कधी सोनेरी मेघ, गंध फुलांनी बहरलेल्या वृक्ष लता, आकाशात उडणारे पक्षी, पक्ष्यांची-भ्रमरांची मधुर गाणी, सूर्य चंद्र ताऱ्यांचे प्रकाशविश्व, उसळत येणारा समुद्र, अथक वाहणाऱ्या नद्या हा निसर्ग अभिन्न आहे त्यांच्या भावविश्वापासून! त्याला दिव्यत्वाचा स्पर्श आहे. एक गूढ वलय आहे त्यांच्या साहित्या भोवती!!

गुरुदेवांचे मन संपन्न होते. शंभर वर्षांपूर्वी निसर्ग आणि धरतीही संपन्न होती. महानगरे आणि यांत्रिक जीवनाचा पाश आवळला गेला नव्हता तिच्या भोवती. गुरुदेवांचे संवेदनशील कवी हृदय निसर्गाची सारी स्पंदने अनुभवत होते, लिपिबद्ध, गीतबद्ध करत होते. ती गीते, ते साहित्य आजही तरुण आहे. तरुणाईच्या मनाला व्यापून आहे. दीडशे वर्ष दूर दिगंतात ही प्रकाशमान आहे.

ऋतू येतात आणि कविमनाला भरून टाकतात सर्वांचाच आवडता ऋतू वसंत! कवीला वाटतं फुलपाखरे पंख पसरून जणू वसंताला उत्सवाचं निमंत्रण देत आहेत, "दक्षिण द्वार उघडून ये, रानावनातून ये, बकुलफुलांच्या रथावरून ये, चमेलीच्या गंधधुंद समीराच्या झुळकीवरून ये, चंपक वृक्षांवर सुगंधी ज्योती तेववत ये, पुष्प केसरांनी माखलेलं तुझं उत्तरीय क्षितिजापर्यंत उडवत ये"

त्या सुंदर निसर्ग सोहळ्यात त्यांना दिव्यत्वाचे अस्तित्व जाणवते. मग ते आदितत्व, गुरुदेव आणि निसर्ग एक होऊन जातात. त्यांच्या त्या छोट्या छोट्या कविता चित्र उभं करतात डोळ्यासमोर त्या सुंदर निसर्गाचं. आपण तेवढं संवेदनक्षम मात्र असायला हवे!

निसर्ग वेगवेगळ्या रूपात त्यांच्या समोर येतो. वैशाख चांगलाच तापतो तेव्हा गुरुदेवांना तो मौनी तपस्वी वाटतो. धरती चिडीचूप होते. ही कसली निसर्गाची वाणी ?गूढ गंभीर, खोलवर मनाच्या गाभाऱ्यातून येणारी! वैशाखाला काय मिळवायचं आहे एवढं रुद्र तप करून? निष्ठुर मृत्यूकुठार घेऊन अंगार भरल्या डोळ्यांनी कुणाला भस्म करायला निघाला आहे वैशाख? भीषण प्रलय साधन करून जुने अनुपयोगी संपवायचे आहे का त्याला?

वैशाखाच्या भीषणतेत कवींना दिसतो दूरवर एक श्यामल मेघ! हे तरुण, कोमल, श्यामल मेघ आशेने ओथंबलेले, रस सुधेने भरलेले, शीतल छाया घेऊन येतात. दामिनी कडकडते. रात्री पाऊस पडून जातो. प्रभाती बांबूच्या वनात छायाप्रकाशाचा खेळ चालतो. पानोपानी मेघामेघांवर सोन्या-मोत्याच्या अक्षरांनी श्रावण गीते लिहित असतो. अलख पथावर स्वप्नांचे पक्षी दूर दिगंतापर्यंत झेप घेत असतात. मनमयूराला स्वाभाविकच नृत्य स्फुरतं. श्रावण अक्षरशः चिंब भिजवतो त्यांच्या मनाला! ढोल वाजवत मेघ येतात. झर झर झर बरसतात आणि कधी व्यथेने कधी आशेने ओथंबलेल्या कवी मनातून गीते झरझर उमटतात.

शरदात त्यांना वृक्ष कुरकुरतांना दिसतात. श्रावण भाद्रपदातल्या झडींनी वृक्षांची पाने फुले ओरबाडून घेतलेली असतात. कवीला वाटतं शरद त्यांना धीर देत आहे. मी ती निराशेची शामल अक्षरे पुसून, लिहीन चांदण्या ज्योतींची दिव्य अक्षरे आणि ढगांवर घालेन सोनेरी पांघरूण! गुरुदेव निसर्गाशी संवाद साधत असतात, त्यांच्या काव्यात ते प्रतिबिंबित होत असते. निसर्गाचे अद्भूत रूप आणि काव्य विलास बघून आपण चकित होत असतो. शत वर्षांनंतरही!

रवींद्रनाथांना प्रकाशाचे आकर्षण आहे. दिव्य प्रकाशाचा त्यांच्यावर वरदहस्त आहे. त्यांच्या कल्पनेत आकाशात अमृतरस उसळत असतो. चंद्र, सूर्य, तारे ओंजळी भरभरून ते अमृतपान करून प्रदीप्त होतात. तोच प्रकाश गुरुदेवांचे मन उजळतो. एका कवितेत त्यांनी इच्छा व्यक्त केली - माझा देह दीप विश्वात दीपकलिका होऊन प्रकाशात रहावा. वसंताच्या फुलाफुलात माझी गीते उमटत रहावी आणि बासरीच्या सुरांनी शून्यत्व भरून जावे.

त्यांचे देशावर, मातृभूमीवर, मानवतेवर, प्रकाशावर, दिव्य आदी तत्वावर,निसर्गाच्या विविध रुपांवर, गीतांवर, संगीतावर, बासरी आणि वीणेच्या नादावर, भाषेवर अपार प्रेम होतं. ते शब्दाशब्दातून जाणवतं. ते प्रचंड आशावादी होते. या आशावादाची आज आपल्याला फार गरज आहे.

त्यांची एक कविता आहे -
“बोहे निरंतर आनंदो धारा
बाजे असीम नभो माझे ओनादि रोबो”

त्या अनंत असीम ब्रम्हांडात निरंतर आनंद धारा वाहते आहे, तो अनादी नाद क्षितिजावर घुमतोय, त्याचा निरंतर प्रतिध्वनी ऐकू येतोय. हे आदितत्वा, ब्रम्हांडातल्या तुझ्या एकछत्री राज्यात रवी, चंद्र, तारे निरंतर आलोकित आहेत आणि आम्ही तुझे लक्ष लक्ष भक्त नि:शब्द चित्ताने तुझ्या चरणी विनीत झालो आहोत.

गुरुदेवांची प्रतिभा अद्वितीय आहे. नोबेल पुरस्काराने ते जगमान्य झालेत. त्यांच्या त्या प्रकाशमान व्यक्तीमत्वासमोर विनीत होऊन आम्हीही नि:शब्द उभे ठाकतो !!

- किशोरी डांगे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोहे निरंतर आनंदो धारा ......

लेखातून टागोरांच्या कवितांमधील ऋतुसौंदर्य तुम्ही अलगद उलगडले आहे , ब्राव्हो !