
अपरिग्रह मनाचा !
मला लहानपणापासून आयुष्याविषयी फार प्रश्न पडतात , त्यात नैराश्य नाही (मी एक आनंदी मुलगी आहे) तर केवळ निखळ जिज्ञासा असते. आई कोरोनाने गेल्यापासून मला मृत्यु विषयी सुद्धा प्रश्न पडायला लागले. एकदम अदृश्य झाली ती , मला काही सांगायचं बोलायचं असेल तिला , निरोपसुद्धा नाही घेतला. मी सातासमुद्रापार , काही अर्थ नाही कशाला. काही तरी आयुष्याशी नातं होतं त्यातून स्वतंत्र वाटायला लागला, म्हटलं तर निर्मूळ म्हटलं तर मुक्तं. नेमक्या कुठल्यातरी भावना आपण पकडून ठेवतो व त्याला आयुष्यं समजतो, समजा एकेदिवशी त्या भावनाचं अदृष्य झाल्यानंतर जे उरते ते काय असते ??! म्हणजे जी आधी होते ती मी होते की ही उर्वरीत मीच खरी मी आहे.
माणूस म्हणजे भावनांच्या संचयाने ओतप्रोत असलेला मातीचा गोळा आहे. मृण्मयं आहे , मगं या मृण्मयातलं चिन्मयं कुठे आहे?! सारखं काही नं काही गोळा करायचं आणि त्यामुळे होणाऱ्या परिग्रहाच्या व्याप्तीवरून आयुष्याचं सामृद्ध्यं जोखायचं. दृश्य-अदृश्य ओझं जपायला जीवाचं रान करायचं , जणू हीच आपली ओळख आहे. ठराविक आकाराची माती, ठराविक आवडीनावडी, ठराविक सुखदुःख, भावना , आनंद, राग, लोभ हा पसारा म्हणजे आपली अस्मिता. आयरनी ! झालं एवढंच??
अष्टांगयोगातले अपरिग्रह कसं जमायचं मगं, कारण त्याग नेहमी बाहेरचं पाहिलायं. भौतिक गोष्टींचा त्याग करून किंवा कमी संग्रह करून या नियमाचे पालन करणे हीच या शब्दाची ढोबळ व्याख्या आहे पण ती अपूर्ण-अर्धवट आहे . मनातल्या भावभावनांच्या संग्रहाचं काय , त्याचही आयुष्यात ओझंच होतं. यातला समतोल साधताना फेफे उडते, काय ठेऊ काय नको होते. फक्त भौतिक गोष्टींचा अपरिग्रह नसतो तर सूक्ष्म भावनांचा अपरिग्रह सुद्धा असतो. जेव्हा तुम्ही भावनांचा संचय कमी करता तेव्हा तुमच्या विचारातही स्पष्टता येते.
सध्या बाहेरच्या जगात जे काही चाललयं त्याचे आपल्या मनावर दूरगामी परिणाम होत आहेत. कदाचित आपली पिढी हे आयुष्यभर विसरणार नाही. माझ्या दृष्टीने हे समुद्रमंथन आहे. मनाचं ,समाजाचं, सगळ्याच चांगल्यावाईटाचं. हलाहल पिणे क्रमप्राप्तच आहे. जे तरीही यातून आत्मविश्वासाने बाहेर पडतील ते अमृतासम राहतील. कितीही प्रयत्न केला तरी याच्यापासून दूर रहाणं अशक्य आहे. कितीही सकारात्मकता बाळगली तरी ती पोकळ ठरू शकते. कारण बाहेर काहीही सकारात्मक नाही. अशी टेकू दिलेली सकारात्मकता मला अर्थहीन वाटते. कारण चांगले झाले पाहिजे आणि मला चांगले दिसले पाहिजे मगं माझ्या मनात चांगले सकारात्मक विचार येतील. बापरे ,किती त्या अटी. बाहेरचे सगळे टेकू काढले तर दोन दिवसात नैराश्य येईल, हे मला अजिबात पटत नाही. जितक्या अटी तितके आपण बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो. ज्या क्षणी अटी संपतील त्या क्षणी तुम्हाला खरी सकारात्मकता , जीवाचे तेज पहायला मिळेल. हे तेज सगळ्यांसाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे पण सतत दूर लोटले गेलेले आहे. भावनिकदृष्ट्या स्वतंत्र होऊन या पिंजऱ्यातून बाहेर पडायचं हा खरा अपरिग्रह.
एक जीव म्हणून स्वतःच स्वतःला वचन द्यायचं , कितीही चिता जळताना पहाव्या लागल्या तरी मी यातून बाहेर पडेनच , मी माझं उत्तम करेनच कुणाला कळले नाही तरी चालेल , कशीही परिस्थिती असो , कुठलीही व्यक्ती असो मी manipulate होणार नाही. You don't know how strong you are until being strong is your only option. भावनांचं निरिक्षण करायचं आणि त्यांना जाऊ द्यायचं. साठवायचं नाही , जितके रिक्त असू आयुष्याचा प्रवास तितका सहज होतो. It is very hard to be something, but it is way too harder to be nothing.
मन अग्नी सारखे अन्ध असते , त्याला भक्ष्य आणि अभक्ष्य यातला फरक कळत नाही. असं कोपिंग मेकेनिजम बनवायचं की कमीतकमी दाह जाणवावा. मनातही कमीतकमी पसारा ठेवायचा, सुखातही फार रमायचं नाही कारण मगं मन दुःखाचे चटके जास्त बसवते. सुखाला चटावलेले असते ते , आपल्याला सहज सळोकीपळो करते. मन जितकं रिक्त तितका आयुष्याचा प्रवास सोपा , हलका. प्रत्येक आनंदाची, दुःखाची, रागाची, अपेक्षाभंगाची गोष्ट यज्ञातल्या घृतासारखा त्याचा उष्मा वाढवते. त्याची शक्तीच काढून घ्यायची. निर्विचार असणं अशक्य आहे पण कमीतकमी भावना मनामध्ये राहू देणं कठीण नाही. 'अनुगच्छन्तु प्रवाहं' म्हणत पुढे पुढे जात रहायचं. मनाचा अपरिग्रह जमवत , सगळे 'आतले' पिंजरे तोडत ... शाश्वत सुख म्हणजे शून्यातून शून्याकडे !!
धन्यवाद 
©अस्मिता
चित्रं आंतरजालाहून आभार.
Internalyoga magazine.com
वेमा अनुमती नसेल तर कळवणे , काढण्यात येतील.
सुरेख लेख.
सुरेख लेख.
निरू आणि हीरा यांचे उत्कृष्ट प्रतिसाद!
@अस्मिता, नेटफलिक्स वर the
@अस्मिता, नेटफलिक्स वर the good place ही सिरीज आहे. Watching it put my mind in a peaceful place for a while.
आणि the brand new testament एक फ्रेंच मूव्ही आहे. Watching it tickled my mind with bizarre fulfilment.
वंदना, थोडा वेगळा विचार करते
वंदना, थोडा वेगळा विचार करते आहे - I agree that one single omnipotent God is the best way to explain. But I don't think it's evil. I think it's निर्गुण निराकार. निसर्गासारखं - it just exists. त्याच्या पातळीवर माणूस, दगड, झाडे, पाणी, कोरोना व्हायरस सारे एकच आहे. माझ्यातले लोह कधीतरी एका दगडात असेल. माझ्या हाडांची उद्या फुले बनतील आणि आज आत्ता याक्षणी कोणा कोरोना पेशंटच्या अन्नातील प्रोटिन्स घेऊन कोरोना व्हायरस ची नवीन पिढी तयार होते आहे. We are part of this universe and we are all using some form of energy to exist. We will continue to exist in some or the other form. त्याअर्थी आपण सगळे नश्वरही आहोत आणि अमरही आहोत.
अर्थात ही सगळी फिलॉसॉफी बोलून/ऐकून/वाचून दुःख कमी होत नसतं (स्वानुभव). लेकीन दिल के खुश रखनेको गालिब ये खयाल अच्छा है!
>>>>नेहमीप्रमाणे सुंदर,
>>>>नेहमीप्रमाणे सुंदर, सकारात्मक लेखन..!!
अगदी १००%. खूप सुंदर लिहीले आहे. काहीतरी नवा दृष्टीकोनच मिळाला मला तरी. किती वासनांची, भावनांची, विचारांची पुटं चढत असतात आपल्या मनावर. ती पुटं चढू न देणं खरच कसं जमणार. कसा जमणार अपरिग्रह?
अस्मिता या सुंदर विचारांबद्दल धन्यवाद.
कमळाचे चित्रही साजेसे.
+१११२२२४४४
अस्मिता, कालपासून तुझा हा लेख
अस्मिता, कालपासून तुझा हा लेख खूपदा वाचला. परत परत. तू जे म्हणतेस तेच मला वाटतंय का हे तपासून बघण्यासाठी.
ऑगस्ट 2019, माझ्या वाढदिवसाची सकाळ, 8 वाजता फोन आला की आई गेली..कशी ? काल तर तिच्याकडे दिवसभर होतो आम्ही, सत्यनारायण पूजा होती, जेवलो, हसलो, दंगा केला, आज गेली..अपघात...
सप्टेंबर 2019, आजोबा कोमा मध्ये गेले..आईच्या मृत्यूचा धक्का सहन नाही होत..3 महिने कोमा मध्ये राहून डिसेंम्बर ला गेले..
हे ही असुदेत..अजून आजी आहे आपल्याला..आई पेक्षा जास्त माया देते आहे..
मे 2020, आजी ला कँसर आहे असं कळतं.. लास्ट स्टेज.. जास्तीत जास्त 3-4 महिने..
नोव्हेंबर 2020, आजी सोबत मी दवाखान्यात बसले आहे. ऑक्सिजन मशीन, खूप नळ्या, तिचे श्वास बघते आहे.. पुढचा श्वास शेवटचा असू शकतो कदाचित...तिच्या सुरकूतलेल्या हातावर हात ठेवून मी तिला सांगतेय.. शांतपणे जा..आमच्यात नको अडकूस..घेऊ आम्ही स्वतः ची काळजी..
माझ्या प्राणप्रिय आजी च्या सुटकेसाठी मी देवाला प्रार्थना केली..
कुठून आला हा तटस्थपणा माझ्यात माहिती नाही...
या सगळ्या काळात मनाला शांत करण्यासाठी खूप पुस्तकं वाचून काढली, कौंसिलिंग सेशन घेतले.
आपल्यातून गेलेली माणसं कशी आपल्या सोबत कायम असतात अशी पुस्तकं वाचली..
मग एक दिवस एक चायनिज कथा वाचली...त्या लेखकाच्या स्वप्नात दिसलं
की तो एक फुलपाखरू आहे.फुलपाखचं सगळं आयुष्य जगतोय आणि मग एकदम त्याला जाग येते.. आणि लक्षात येतं की नाही तो एक माणूस आहे..फुलपाखरू हे स्वप्न होतं....मग त्याला अचानक वाटतं.मी खरंच हा माणूस आहे का ? की मी खरंतर एक फुलपाखरू आहे आणि मला माणूस असल्याचं स्वप्न पडलय.. ? Now I don't know whether it was then I dreamt I was a butterfly ..or whether I am now a butterfly dreaming I am a man....
मग मला एकदम लक्षात आलं की,
माझ्या आयुष्यात घडून गेलेल्या किंवा आता घडत असलेल्या घटना या एखाद्या चित्रपटा सारख्या किंवा स्वप्ना सारख्या होत्या. चित्रपट बघताना किंवा स्वप्नं बघताना त्याक्षणी त्या भावना खऱ्या असतात/वाटतात..पण मग आपण त्या पकडून बसत नाही..अगदी फार फार तर 2-3 दिवस चित्रपट किंवा स्वप्न आठवत राहातो आणि मग पुढे जातो..
आता हे जे सगळं घडून गेलं ते तटस्थपणे बघता येतंय..पुढे जे काही घडेल तेव्हा त्यातून मी स्वतः ला अलिप्त नाही काढू शकणार.. भावना खरी असेल .. पण मला पुढे जावं लागणार आहे.. माझा जो रोल मला मिळालाय तो निभावाव लागेलच.. साक्षी भावाने स्वतः च्या प्रत्येक कृती कडे आणि आयुष्यातल्या प्रत्येक घटने कडे बघायचा प्रयत्न करत राहणं हे अवघड असतं पण तेच महत्वाचं असतं मनाला शांत आणि स्थिर करण्यासाठी..हे सगळं माझ्या बाबतीत घडतंय.. पण मग "मी" म्हणजे नक्की कोण ?
असो.. विचारांचा खूप गुंता झाला..
तुझा लेख खुप आवडला हे सांगायचं होतं
तुमचया काही धाग्यावर काय
तुमचया काही धाग्यावर काय प्रतिसाद द्यावा हे मला कळत नाही, म्हणुन देत नाही. हे सांगायला हा प्रतिसाद.
लिहीत रहा, व्यक्त होत रहा.
माणूस म्हणजे भावनांच्या
माणूस म्हणजे भावनांच्या संचयाने ओतप्रोत असलेला मातीचा गोळा आहे. >>> भावना या ड्रायव्हिंग फोर्स सारख्या असतात. प्रत्येक प्राण्याची वैशिष्ट्ये आहेत, त्यानुसार तो वागतो. शिकार करणारे प्राणी आणि शाकाहारी प्राणी यांचा प्रोग्राम वेगळा. माणसाचा आणखी वेगळा. माणसाचे जे सॉफ्टवेअर लिहीले आहे, त्यानुसार त्याला आता मांसाहाराशिवाय जगता येऊ लागले आहे. प्राण्यांची शिकार न करणे ही भावना त्याच्यात उत्पन्न झाली. कारण तसं विकसन हा त्याचा प्रोग्राम आहे. तो शाकाहारावर जगू लागला म्हणून शेती करू लागला आणि सिव्हिलाइज्ड झाला. हळू हळू तो जंगली निसर्गाचे कायदे विसरत चालला. म्हणजे अजून सिव्हिलाइज्ड झाला. असे उत्क्रांत होत जाणे हा ही नियम आहे.
कुठपर्यंत उत्क्रांत व्हावे ? याचे नियम नाहीत. इथे विवेकाचा आधार घ्यावा लागतो. विवेक म्हणजे तरतमभाव. तो गुरू शिकवतात.
गुरूचे तरी किती ऐकावे ?
माणसाच्या आयुष्यातून भावना काढल्या तर त्याला विरक्ती येते. हा मूळ प्रोग्राम आहे का ? सगळेच विरक्त झाले तर माणसं आपसात लढून कशी मरणार ? आपसात लढून मरणे, रोगांच्या साथी येणे हे सर्व तर नियम आहेत. रोगांच्या साथीवर विजय मिळाला का ? त्या नव्याने येतच राहणार. वाढती लोकसंख्या ही उत्क्रांतबुद्धीची कमाल आहे. त्याची दुरूस्ती निसर्ग करतो. ते स्विकारणे हा निसर्ग नियम आहे. निसर्गापुढे झुकणे हा सोपा मार्ग आहे.
भावनांमुळे नाती घट्ट राहतात. आपसात आनंद वाटता येतो. आणि भावनांमुळेच नातीही दुरावतात. युद्धे होतात.
त्यामुळे भावना नसतील तर काहीच घडणार नाही.
बुद्ध म्हणतो अपेक्षा हे दु:खाचे मूळ आहे. बरोबर. त्याची दु:खाची व्याख्या वेगळी. पण हे दु:ख काढून टाकले तर माणूस अमर करायचा आहे का ? अमर म्हणजे पुढची पिढीही गुणाकारासारखी वाढत जाईल. आनंदाने आपसात राहणे हे तरी अपेक्षित आहे का ?
स्ट्रेस नसेल तर प्रगती होत नाही. स्ट्रेस नसेल तर लोकोपयोगी संशोधन होणार नाही.
स्ट्रेस काढून टाकली तर लोकोपयोगी संशोधनाची गरज संपेल का ?
पा. आ.,. प्रतिसाद आवडला. फक्त
पा. आ.,. प्रतिसाद आवडला. फक्त स्ट्रेसच्या ऐवजी मराठीतला निकड हा शब्द अगदी समर्पक आहे. गरज ही शोधाची जननी आहे ह्यावर शाळेत निबंध असायचे, ती गरज. मनात खळबळ असली तरी ती overcome करून केलेले काम यशस्वी होते. भावनांच्या तीव्र आंदोलनामुळे किंवा मधून नवनिर्मितीचे बीज पडत असते, पण हा स्ट्रेस नव्हे. ह्या भावना तपासून, तावून सुलाखून घेऊन ते बीज फुलवण्यासाठी त्यावर एकाग्रतेने विचार करून स्फुरलेली कथा, शिल्प अशी निर्मिती उत्कृष्ट ठरते. उत्कृष्ट निर्मितीसाठी केवळ भावनांच्या झोपाळ्यावरचे हिंदोळे पुरेसे नाहीत. त्यासाठी स्थिर मनाने मांडी ठोकून बसावे लागते. one per cent inspiration & 100%perspiration ही निर्मितीसाठी आवश्यक गोष्ट आहे. आपण अनेकदा ऐकतो की सलग अमुक एक वेळात अगदी तहान भूक हरपून काम करीत राहिलो आणि अमुक एक गोष्ट/कथा/शिल्प/चित्र तयार झाले. इथे लक्षात घ्यायला हवे की तहान भूक हरपते तेव्हा दुःखाची जाणीवही हरपलेली असते. एक विशुद्ध तंद्री, एकतानता असते, तेव्हा सृजन होत असते.
भावनांचा तात्कालिक उद्रेक हा एक प्रकारचा निचरा असतो. विरेचन असते. त्यामुळे बरे वाटते मनाला. त्याला स्ट्रेस बस्टरही म्हणता येईल. आणि ते थोड्या प्रमाणात आवश्यकही असते. पण असे उद्रेककाळात केलेले चिंतन जास्त deep जाऊ शकत नाही. दु: खापलीकडे जाऊन घटनांकडे बघू शकत नाही.
छान प्रतिसाद आत्मा!
छान प्रतिसाद आत्मा!
खूप छान लेख...आवडला.
खूप छान लेख...आवडला.
शेवटचे परिच्छेद तर अतिशय सुंदर..प्रतिसादही छान आहेत.
पण कमीतकमी भावना मनामध्ये राहू देणं किंवा मनाला रिक्त ठेवण हे कस जमवायचं ? की हे सर्व काळावर अवलंबून असत? म्हणजे एखाद्या गोष्टी किंवा परिस्थिती बद्द्ल आता ह्या क्षणाला जो भावनेचा आवेग आहे तो थोड्या दिवसानी तसाच असेल असे नाही ना.
तुमचं लिखाण नेहमीच काहीतरी छान सकारात्मक शिकवतं.
मानव , हीरा धन्यवाद.
मानव , हीरा धन्यवाद.
हीरा, स्ट्रेस म्हणजे ताण या अर्थानेच घेतले आहे. १०० मीटरच्या शर्यतीत पहिले यायचे तर त्या पहिल्या येण्याचं दडपण घ्यावं लागतं. त्यातून येणारा ताण. बिपश्यना सांगते की ताण टाळा. खरं काय आहे ? बुद्धाच्या काळात जाऊन उत्तरं शोधली तर ते ताण व्यवस्थापन असं आहे. तुम्हाला ताणाचे व्यवस्थापन जमले तर तुम्ही अधिक सुलभरित्या पुढचे ध्येय गाठू शकता. ध्येय गाठण्याचे दडपण असतेच. त्यातून हे ध्येय गाठायाचे आहे ही स्ट्रेस असतेच असते.
एकच गोष्ट आहे. आपल्या अनावश्यक गरजा कमी केल्या तर येणारा अनावश्यक ताण कमी होतो. त्यासाठी अनावश्यक गरजांना सामूहीक मान्यता मिळायला हवी. सर्वांनी सोन्याचे दागिने घालणे सोडून दिले तर सोने मिळवण्याचा सोस, ईर्ष्या - त्यातून येणारा ताण कमी होईल. कारण सोने हवे हे दु:ख नाहीसे होते.
सद्भावना आणि सहकंपना.>
सद्भावना आणि सहकंपना.>>अनुमोदन.
सर्व प्रतिसाददात्यांचे आणि
सर्व प्रतिसाददात्यांचे आणि वाचकांचे आभार. काही प्रतिक्रिया फार आत्मियतेने दिलेल्या आहेत, स्वानुभवातून आलेल्या आहेत. तुम्ही निर्भयपणे लिहिल्याबद्दल अतिशय कृतज्ञ आहे.
सर्व नीट वाचून जशी जमतील तशी उत्तरं देणार आहे.
मी क्षणाची खरडीका अनंत काळची वाचक आहे.
खरडीका--काही तरी खरडणारी
लेख आवडला.
लेख आवडला.
तुमच्या काही धाग्यावर काय प्रतिसाद द्यावा हे मला कळत नाही, म्हणुन देत नाही. हे सांगायला हा प्रतिसाद..>>>अगदी हेच सांगायचं होतं पण जमत नव्हतं. धन्यवाद मानवकाका.
अस्मे, मलाही मानव सारखंच
अस्मे, मलाही मानव सारखंच म्हणायचय.
आई कोरोनाने गेल्यापासून मला मृत्यु विषयी सुद्धा प्रश्न पडायला लागले. एकदम अदृश्य झाली >>>>> ह्या वाक्याने काटा आला गं . अजूनही माझा आमच्या घरातल्या दुर्दैवी प्रसंगावर विश्वासच बसत नाहीये कि माझ्या धाकट्या बहिणीचा नवरा करोना ने गेलाय. असाच अदृश्य च झाला .
आति सुरेख ❤
आति सुरेख ❤
माझ्या तर्फे श्रद्धांजलि
माझ्या तर्फे श्रद्धांजलि आईंना.
दु:खाचा पहिला भर ओसरल्यावर असा विचार करून बघा कि आई जितके वर्शे लाभली ते सर्व सोन्याचे क्षण आता कायम तुमच्या बरोबर राहिले आहेत. जगात असे ही अभागी लोक आहेत ज्यांना आई जन्मताच नाकारते व ती मुले आई व तिचे प्रेम कोणात तरी शोधत मोठी होतात , धड पडतात त्यांच्या मनात एक पोकळी कायम राहते जी त्यांना इतर कश्याने भरावी लागते. आई कडून प्रेम व आधार रिस्पॉन्स लाभले हेच आपले सौभाग्य .
लेख सुरेखच लिहीला आहे. भावनांचे गाठोडे काळाच्या वाहत्या नदीच्या काठा पाशी कोठे तरी ठेवुन दिले की पुढे जायला फार हलके व मस्त वाट्ते हा अनु भव मी घेतला आहे. त्यामुळे पुढील वाटचालीस अनेकानेक शुभेच्छा.
आई कोरोनाने गेल्यापासून मला
आई कोरोनाने गेल्यापासून मला मृत्यु विषयी सुद्धा प्रश्न पडायला लागले. एकदम अदृश्य झाली ती , मला काही सांगायचं बोलायचं असेल तिला , निरोपसुद्धा नाही घेतला. >> वाचून काळजात तुटले एकदम.
लेख सुंदरच आहे. नवीन दृष्टीकोन मिळाला मला.
नेहमीप्रमाणेच सुंदर, खोलवर
नेहमीप्रमाणेच सुंदर, खोलवर विचार करायला लावणारे लिखाण.
नेहमीप्रमाणे सुंदर, सकारात्मक
नेहमीप्रमाणे सुंदर, सकारात्मक लेखन..!! >>>
धन्यवाद रूपाली
विचारांचा धागा संपतच नाही, उलट नुसता गुंता होऊन बसतो आणि त्या गुंत्यातल्या एकेका गाठीवर मन पुनःपुन्हा react करत राहतं.अश्या वेळी तुम्ही मांडलेला सकारात्मक विचार अत्यंत मोलाचा आहे. >>>
धन्यवाद हरचंद पालव
काहीतरी नवा दृष्टीकोनच मिळाला मला तरी. किती वासनांची, भावनांची, विचारांची पुटं चढत असतात आपल्या मनावर. >>> पुटं आहेत हे लक्षात येणं सुद्धा खूप मोठी पायरी आहे नं सामो, धन्यवाद
.
खूपच छान लिहिले आहे. हे असं काहीतरी वाचायची गरज होती खरंच. खूप शांत वाटतंय.>>> धन्यवाद भाग्यश्री१२३ , लेखन खूप डार्क होईल का ही भिती होती ती दूर झाली.
बाबांनी वेळोवेळी जे विचार सांगितले ते आताशी कुठे समजतायत. आतून कणखर होणं, सकारात्मकता मनातूनच येणं हे सगळं आताशी सुरू झालंय.मनात इतकं काही येतंय की ते लिहीता सुद्धा यायचं नाही या क्षणी! खूप खूप रिलेट झालंय हे लिखाण आणि पटलं तर आहेच.>>> तुलाही बिग हग्ज प्रज्ञा९, भावना पोचल्या, हेच म्हणायचं होतं मला
मी परत एकदा वाचणार आहे तुझा लेख. माझ्या दुःखाची अस्वस्थता, बायसेस आणि दुराग्रह बाजूला ठेवून. मला वाटतंय मला यातून बरंच काही मिळणार आहे कारण हे एका सहवेदनेतून आले आहे.>>> खूप खूप आभार वंदना. मी सेपियन वाचलेले नाही पण असेच प्रश्न मलाही सतावतात. God is evil or God is nice पेक्षा हे जग Autopilot वर टाकलयं का असं मात्र वाटतं. प्रश्न पडणं चांगलंच आहे... हळूहळू उत्तरं मिळतील. द गुड प्लेस पाहिले आहे. the brand new testament हे बघते. Morgan Freeman यांची the story of God ची डोक्यु जमल्यास बघं. Big hug to you. >>> तुलाही.
धन्यवाद देवकी.
जिज्ञासा प्रतिसाद आवडला. But why do I exist हा प्रश्न पडलायं मला. आहार, निद्रा भय आणि मैथून ह्या चार कोनांच्या डब्यात जीव घुसमटतो. मगं असं काही तरी लिहिते. हे खरंतर धडं आध्यात्मिक सुद्धा नाही. ईश्वर आहेच आणि तो निर्गुण निराकारच आहे. आपण डाउनग्रेड करतो त्याला , आपल्या आणि त्याच्या असण्याचं कारण एकच असेल असं वाटतं मला
धन्यवाद किल्ली

आपल्यातून गेलेली माणसं कशी आपल्या सोबत कायम असतात अशी पुस्तकं वाचली.. >> ती माझ्यात आहे असंच मी मानते.
@स्मिता श्रीपाद, सुरेख गोष्ट. कुठून आला हा तटस्थपणा माझ्यात माहिती नाही...>>> हीच ती सकारात्मकता.
साक्षी भावाने स्वतः च्या प्रत्येक कृतीकडे आणि आयुष्यातल्या प्रत्येक घटने कडे बघायचा प्रयत्न करत राहणं हे अवघड असतं पण तेच महत्वाचं असतं मनाला शांत आणि स्थिर करण्यासाठी..हे सगळं माझ्या बाबतीत घडतंय.. पण मग "मी" म्हणजे नक्की कोण ?>>> किती सुरेख लिहिले आहेस. सहमत. हेच वरच्या लेखाचं सार आहे.
धन्यवाद मानवदादा, निर्व्याज व प्रेमळ प्रोत्साहनासाठी
पा. आ. प्रतिसाद खूप आवडला. माझे म्हणणे भावना मुक्त व्हा असेही नाही जमेल तेवढा पसारा कमी करा एवढचं अभिप्रेत आहे. मला माहिती आहे की तसं पूर्ण निर्लेप होणे अशक्य व अनैसर्गिक आहे. Go with the flow with less baggage.
सुवर्णमध्य हवायं आणि चाचपडतेयं , हे मी भावनांच्या त्याच ड्रायव्हिंग फोर्सने लिहिले आहे, पण यात रेंगाळणार नाही हेही ठरवलेयं.
धन्यवाद राणी1.


धन्यवाद प्राचीन.
धन्यवाद आनंद.
धन्यवाद धनुडी , बिग हग्ज.
धन्यवाद देवकी_
धन्यवाद अमा, बहुतेक भर ओसरला आहे , म्हणून लिहू शकलेयं. शुभेच्छांबद्दल खूप आभार. नदीची उपमा आवडली.
धन्यवाद ssj.
धन्यवाद सुनिधी.
सगळ्या वाचकांचे आभार.
हे स्मशानवैराग्यातून आलेले नाही. ह्यावर खूप खूप वर्षांपासून विचार करतेयं मी. बऱ्याच जणांना आध्यात्मिक म्हणजे उदास वगैरे वाटते. मी त्याच्या बरोबर विरुद्ध आहे.(बहुतेक) मी आध्यात्मिक आणि धमाल दोन्ही आहे. मला मुव्ह ऑन व्हायला माझ्या आध्यात्मिक पिंडाने व विनोदबुद्धीने वेळोवेळी मदतच केली आहे. ज्याने माझ्या आध्यात्मिक पिंडाचं पूर्ण समाधान व्हावं असं लेखन मला क्वचितच सापडतं म्हणून मीच वेडंवाकडं लिहायला लागले.
एवढ्या प्रतिसादांची अपेक्षाही नव्हती . तुम्ही दाखवलेल्या प्रेमळ प्रोत्साहनासाठी आणि सदिच्छांसाठी मनापासून आभार
कृतज्ञ ❤ _/\_
सुरेख लिहीलं आहेस!
सुरेख लिहीलं आहेस!
नेमक्या कुठल्यातरी भावना आपण
नेमक्या कुठल्यातरी भावना आपण पकडून ठेवतो व त्याला आयुष्यं समजतो, समजा एकेदिवशी त्या भावनाच अदृश्य झाल्यानंतर जे उरते ते काय असते ?>>>
हे फार खोल आहे !!! _/\_
धन्यवाद वत्सला
धन्यवाद वत्सला

धन्यवाद पाचपाटील
परत एकदा वाचून काढला. काय
परत एकदा वाचून काढला. काय सुंदर विचारमंथन आहे गं.
Pages