अपरिग्रह मनाचा !

Submitted by अस्मिता. on 23 April, 2021 - 22:21

अपरिग्रह मनाचा !
मला लहानपणापासून आयुष्याविषयी फार प्रश्न पडतात , त्यात नैराश्य नाही (मी एक आनंदी मुलगी आहे) तर केवळ निखळ जिज्ञासा असते. आई कोरोनाने गेल्यापासून मला मृत्यु विषयी सुद्धा प्रश्न पडायला लागले. एकदम अदृश्य झाली ती , मला काही सांगायचं बोलायचं असेल तिला , निरोपसुद्धा नाही घेतला. मी सातासमुद्रापार , काही अर्थ नाही कशाला. काही तरी आयुष्याशी नातं होतं त्यातून स्वतंत्र वाटायला लागला, म्हटलं तर निर्मूळ म्हटलं तर मुक्तं. नेमक्या कुठल्यातरी भावना आपण पकडून ठेवतो व त्याला आयुष्यं समजतो, समजा एकेदिवशी त्या भावनाचं अदृष्य झाल्यानंतर जे उरते ते काय असते ??! म्हणजे जी आधी होते ती मी होते की ही उर्वरीत मीच खरी मी आहे.

माणूस म्हणजे भावनांच्या संचयाने ओतप्रोत असलेला मातीचा गोळा आहे. मृण्मयं आहे , मगं या मृण्मयातलं चिन्मयं कुठे आहे?! सारखं काही नं काही गोळा करायचं आणि त्यामुळे होणाऱ्या परिग्रहाच्या व्याप्तीवरून आयुष्याचं सामृद्ध्यं जोखायचं. दृश्य-अदृश्य ओझं जपायला जीवाचं रान करायचं , जणू हीच आपली ओळख आहे. ठराविक आकाराची माती, ठराविक आवडीनावडी, ठराविक सुखदुःख, भावना , आनंद, राग, लोभ हा पसारा म्हणजे आपली अस्मिता. आयरनी ! झालं एवढंच??
9dccd00bdd0d8883ef61ecee1ee0bcdb.jpg
अष्टांगयोगातले अपरिग्रह कसं जमायचं मगं, कारण त्याग नेहमी बाहेरचं पाहिलायं. भौतिक गोष्टींचा त्याग करून किंवा कमी संग्रह करून या नियमाचे पालन करणे हीच या शब्दाची ढोबळ व्याख्या आहे पण ती अपूर्ण-अर्धवट आहे . मनातल्या भावभावनांच्या संग्रहाचं काय , त्याचही आयुष्यात ओझंच होतं. यातला समतोल साधताना फेफे उडते, काय ठेऊ काय नको होते. फक्त भौतिक गोष्टींचा अपरिग्रह नसतो तर सूक्ष्म भावनांचा अपरिग्रह सुद्धा असतो. जेव्हा तुम्ही भावनांचा संचय कमी करता तेव्हा तुमच्या विचारातही स्पष्टता येते.

सध्या बाहेरच्या जगात जे काही चाललयं त्याचे आपल्या मनावर दूरगामी परिणाम होत आहेत. कदाचित आपली पिढी हे आयुष्यभर विसरणार नाही. माझ्या दृष्टीने हे समुद्रमंथन आहे. मनाचं ,समाजाचं, सगळ्याच चांगल्यावाईटाचं. हलाहल पिणे क्रमप्राप्तच आहे. जे तरीही यातून आत्मविश्वासाने बाहेर पडतील ते अमृतासम राहतील. कितीही प्रयत्न केला तरी याच्यापासून दूर रहाणं अशक्य आहे. कितीही सकारात्मकता बाळगली तरी ती पोकळ ठरू शकते. कारण बाहेर काहीही सकारात्मक नाही. अशी टेकू दिलेली सकारात्मकता मला अर्थहीन वाटते. कारण चांगले झाले पाहिजे आणि मला चांगले दिसले पाहिजे मगं माझ्या मनात चांगले सकारात्मक विचार येतील. बापरे ,किती त्या अटी. बाहेरचे सगळे टेकू काढले तर दोन दिवसात नैराश्य येईल, हे मला अजिबात पटत नाही. जितक्या अटी तितके आपण बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो. ज्या क्षणी अटी संपतील त्या क्षणी तुम्हाला खरी सकारात्मकता , जीवाचे तेज पहायला मिळेल. हे तेज सगळ्यांसाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे पण सतत दूर लोटले गेलेले आहे. भावनिकदृष्ट्या स्वतंत्र होऊन या पिंजऱ्यातून बाहेर पडायचं हा खरा अपरिग्रह.

एक जीव म्हणून स्वतःच स्वतःला वचन द्यायचं , कितीही चिता जळताना पहाव्या लागल्या तरी मी यातून बाहेर पडेनच , मी माझं उत्तम करेनच कुणाला कळले नाही तरी चालेल , कशीही परिस्थिती असो , कुठलीही व्यक्ती असो मी manipulate होणार नाही. You don't know how strong you are until being strong is your only option. भावनांचं निरिक्षण करायचं आणि त्यांना जाऊ द्यायचं. साठवायचं नाही , जितके रिक्त असू आयुष्याचा प्रवास तितका सहज होतो. It is very hard to be something, but it is way too harder to be nothing.

मन अग्नी सारखे अन्ध असते , त्याला भक्ष्य आणि अभक्ष्य यातला फरक कळत नाही. असं कोपिंग मेकेनिजम बनवायचं की कमीतकमी दाह जाणवावा. मनातही कमीतकमी पसारा ठेवायचा, सुखातही फार रमायचं नाही कारण मगं मन दुःखाचे चटके जास्त बसवते. सुखाला चटावलेले असते ते , आपल्याला सहज सळोकीपळो करते. मन जितकं रिक्त तितका आयुष्याचा प्रवास सोपा , हलका. प्रत्येक आनंदाची, दुःखाची, रागाची, अपेक्षाभंगाची गोष्ट यज्ञातल्या घृतासारखा त्याचा उष्मा वाढवते. त्याची शक्तीच काढून घ्यायची. निर्विचार असणं अशक्य आहे पण कमीतकमी भावना मनामध्ये राहू देणं कठीण नाही. 'अनुगच्छन्तु प्रवाहं' म्हणत पुढे पुढे जात रहायचं. मनाचा अपरिग्रह जमवत , सगळे 'आतले' पिंजरे तोडत ... शाश्वत सुख म्हणजे शून्यातून शून्याकडे !!

धन्यवाद Happy
©अस्मिता

चित्रं आंतरजालाहून आभार.
Internalyoga magazine.com
वेमा अनुमती नसेल तर कळवणे , काढण्यात येतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवातीचे परिच्छेद खूपच छान आहेत.
पण शेवटचे दोन परिच्छेद तुमच्या आधीच्या भूमिकेशी विसंगत वाटले.
मनाला हे असं समजवायला लागलं, वचनं द्यायला लागली, मेकॅनिझम्स जमवायला लागले तर शेवटी टेकूच झाले की ते.
खरं तर ही वृत्ती आतूनच असते. फक्त अनुभवाने आणि/अथवा एखाद्या/अनेक निमित्ताने त्याची जाणीव होते/व्हायला लागते.
ती जाणिव जाणली, तीचा आनंदाने, डोळसपणाने पाठपुरावा केला की झालं.
सुरुवातीच्या परिच्छेदात तुम्ही जे लिहिता ते ज्याला जाणवतं ती व्यक्ती खर तर अपरिग्रहाच्या सुरुवातीच्या पायरीला पोहोचलीच की.
पुढचं आपसूक, सहजपणे, सहजभावाने व्हावं, व्हायला पाहिजे.
म्हणूनच तर ह्याला सहजयोग म्हणतात.

मला शेवटचे 2 परिच्छेद जास्त पटले.
खूप जास्त अध्यात्मिक मला कळत नाही(आवडत नाही असे नाही, ते कळण्याची बौद्धिक क्षमता नाही)
शेवटचे 2 परिच्छेद अगदी मीच माझ्या मनातलं बोलते वाचते आहे असं वाटलं.
कोणतीहि खोटी बाहेरून चिकटवलेली सकारात्मकता अगदी मस्ट नसतानाही आपल्या आतल्या सकारात्मकतेने आपण बाहेर पडणार आहोत यातून.

अस्मिता, तुमच्या दुःखात सहभागी. अतिशयच तीव्र असते ही लॉस ची भावना. काळ हेच उत्तर आहे यावर. ह्या दुःखावर विजय मिळविण्याची ताकद तुम्हांला मिळो ही प्रार्थना.
नीरू, सहमत. अपरिग्रह हा सहजभाव झाला पाहिजे. तो साधायला चित्तशुद्धी, स्थिरबुद्धी साधली पाहिजे आणि ती योगातून म्हणजे परमेश्वर किंवा cosmic एनर्जी ला जोडलेले , त्याच्याशी अनुसंधान साधलेले असण्याने येते. योग म्हणजेच जोडलेले असणे. हा योग साधण्याचे अनेक मार्ग म्हणजे ज्ञान, कर्म, सांख्य, ज्ञानकर्म -संन्यास, भक्ती, असे अनेक, गीतेत सांगितले आहेत. आणि भक्ती हा सगळ्यात सोपा मार्ग आहे हेही सांगितले आहे. अर्जुनविषादापासूनच(पहिला अध्याय) ही समजावणी सुरू होते. लिहिण्यासारखे बरेच आहे पण उपदेशात्मक होईल असे काहीही लिहायचे नसल्याने पूर्णविराम.
हे सर्व आत्मीयतेने आणि स्वानुभवातून लिहिले आहे.
सद्भावना आणि सहकंपना.

खूप छान लिहिलं आहे.

शीर्षक 'अपरिग्रह मनाचा' थोडं विचित्र वाटलं अर्थाच्या दृष्टीने. भावनांचा अपरिग्रह किंवा विचारांचा अपरिग्रह असं जास्त बरोबर वाटेल ना? मी चुकत असेन तर क्षमस्व.

>> भावनांचं निरिक्षण करायचं आणि त्यांना जाऊ द्यायचं.
>> कमीतकमी भावना मनामध्ये राहू देणं कठीण नाही

+११११

>> असं कोपिंग मेकेनिजम बनवायचं की कमीतकमी दाह जाणवावा
अगदी! मागची काही वर्षे हेच विचार मनात दृढावताहेत . प्रत्येक भावना आपल्यासोबत मनाचा दाह घेऊन येते. हर्षोल्हसित होऊन नाचणे अन दु:खावेगाने कोसळणे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू.

लेखातल्या प्रचि मधला संदेश जितका मनात घोळवू तितका आचरणात आणणे सोपे.

लेख भावला. धन्यवाद.

सीमंतिनी, निरू, बन्या, जिज्ञासा, रानभुली, वावे,सोनाली, अनु, सूर्यकांत जाधव,हीरा, मीरा, कुमारसर, मृणाली, अमितव, वर्णिता, स्वातीताई, अनया......
मनमोकळ्या आणि प्रेमळ प्रतिसादांबद्दल अतिशय आभार !! Happy

निरू आणि हीरा... मी विचार करतेयं की मला साक्षिभाव आणि सहजयोग म्हणजे नक्की काय आहे हे कळलयं का, तुमचे प्रतिसादही आवडले. Happy

धन्यवाद हरचंद पालव आणि अतुल .
हर्पा.. भावनांचाच म्हणायचं होतं लिहिले मनाचा, काय माहिती विचित्र असेलही Happy , क्षमस्व कशाला.
अतुल , दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू. >>> अगदी अगदी.

खूप छान लिहिलेय. आतून आलेय हे जाणवतेय.

एकदम अदृश्य झाली ती , मला काही सांगायचं बोलायचं असेल तिला , निरोपसुद्धा नाही घेतला >>>>>>> हे वाचल्यावर खरे तर आवंढा दाटून आला. त्यातच पुढचे वाचले. दुखाच्या वेळी व्यक्त होता येणे हि एक देणगी असते _/\_ नाही जमले तर अव्घड होते Sad
अमुकतमुक प्रकारे जगायचे असे ठरवणे आणि तसे ठरवल्याप्रमाणे जगणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
अपेक्षाच ठेऊ नये म्हणने सोपे असते पण ते नेहमीच असे ठरवून होते का..
सुखात गुंतलो तर दुखाचा काळ अवघड जाईला म्हणून सुखात गुंतूच नये का...
सुख आणि दुख दोन्ही शाश्वत आहेत. ते पाळीपाळीने येणारच आहेत. जर सुखाची पाळी आहे तर ते भरभरून उपभोगावे.. जर दुखाची वेळ आली तर तिचाही स्विकार करावा..
सुखात नक्की रमावे, अगदी समरसून ते जगावे, फक्त हे सदैव नसणार ईतकी जाण ठेवावी... मग येणार्‍या दुखातही पुन्हा त्या सुखाची आस जगायला बळ देते.. जबतक सांस है तब तक आस है, जब तक आस है तब तक सांस है.. हे एकमेकांना पूरकच असते.

आता मी दुःखातून बऱ्यापैकी बाहेर आले आहे, नाही तर मी लिहूच शकले नसते. सदिच्छांंबद्दल धन्यवाद ऋन्मेष. सुखात न गुंतता आनंद घेता येतो बहुतेक, निरासक्त राहून ... हे मला जमतं की नाही माहिती नाही पण हे विचारांचे पडसाद आहेत.
सुखदुःखाच्या पलिकडे कुठे जाता येते माणसाला , कमीतकमी त्रास व्हावा हाच हेतू असतो. हे लेखन 'साक्षीभाव' ह्या शब्दाची मला सध्या वाटणारी व्याख्या आहे. हे विचार बदलत राहतील, कोण सांगावे. Happy

खरंतर इतकं मनमोकळं लिहिलं आहे आणि खूप अंतर्मुख करणारं आहे, त्यामुळे त्यात तांत्रिक चुका काढल्याबद्दल मलाच कसंतरी वाटलं.

हा अपरिग्रह करावा हे थेरोटीकली कळत असलं तरी वळत नाही. स्वतःकडे अश्या तटस्थपणे पाहणे प्रचंड अवघड आहे.

it is way too harder to be nothing >> अगदी खरं आहे. विचारांचा धागा संपतच नाही, उलट नुसता गुंता होऊन बसतो आणि त्या गुंत्यातल्या एकेका गाठीवर मन पुनःपुन्हा react करत राहतं.
अश्या वेळी तुम्ही मांडलेला सकारात्मक विचार अत्यंत मोलाचा आहे.

>>>>>नेहमीप्रमाणे सुंदर, सकारात्मक लेखन..!!
अगदी १००%. खूप सुंदर लिहीले आहे. काहीतरी नवा दृष्टीकोनच मिळाला मला तरी. किती वासनांची, भावनांची, विचारांची पुटं चढत असतात आपल्या मनावर. ती पुटं चढू न देणं खरच कसं जमणार. कसा जमणार अपरिग्रह?
अस्मिता या सुंदर विचारांबद्दल धन्यवाद.
कमळाचे चित्रही साजेसे.

अस्मिता, बिग हग! मी हेच सगळं गेले काही महिने अनुभवतेय, बाबा गेले तेव्हापासून. नुसते प्रश्न.. गमावलेली झोप आणि मन:स्वास्थ्य. जरा बाहेर पडतेय यातून आता.
बाबांनी वेळोवेळी जे विचार सांगितले ते आताशी कुठे समजतायत. आतून कणखर होणं, सकारात्मकता मनातूनच येणं हे सगळं आताशी सुरू झालंय.
मनात इतकं काही येतंय की ते लिहीता सुद्धा यायचं नाही या क्षणी!
खूप खूप रिलेट झालंय हे लिखाण आणि पटलं तर आहेच.

अस्मिता, एकदा वाचले आणि रिलेट झाले माझ्या सध्याच्या मनस्थितीत. ५ महिने झालेत, माझी धाकटी बहीण कॅन्सरने हिरावून नेली. पूर्ण आयुष्यभर सोबत देणारच असे गृहीत धरलेले असते आपण भावंडाबाबत. तिच्या जाण्याने इतके प्रश्न, उत्तरं, प्रतिप्रश्न यांची सरबत्ती सुरू आहे. कांहीं जुन्या जखमा परत जिवंत झाल्यात. खूप वाचून वाचून उत्तर मिळतील, दृष्टिकोन मिळतील म्हणून आशाळभूतपणे खूप वाचले. सेपियन्स पुस्तकात धर्मांचे देवाविषयी ( supreme Creator) वेगवेगळे सिद्धांत चर्चेस घेताना एक शक्यता postulate केली आहे. Nobody in history has had stomach to say it but God is evil. अर्थातच आपल्यातल्या पुष्कळांनी काही वेळा तरी देव दुष्ट आहे निर्दयी आहे अशा प्रकारचा विलाप केलाय पण असे logical argument blew my mind away.
(From book *** So, monotheism explains order, but is mystified by evil. Dualism explains evil, but is puzzled by order. There is one logical way of solving the riddle: to argue that there is a single omnipotent God who created the entire universe – and He’s evil. But nobody in history has had the stomach for such a belief.)

मी परत एकदा वाचणार आहे तुझा लेख. माझ्या दुःखाची अस्वस्थता, बायसेस आणि दुराग्रह बाजूला ठेवून. मला वाटतंय मला यातून बरंच काही मिळणार आहे कारण हे एका सहवेदनेतून आले आहे.
Big hug to you.

Pages