हरबर्‍याच्या पानांची भाजी

Submitted by तृप्ती आवटी on 16 May, 2009 - 15:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी हरबर्‍याची पाने (घाटे फुटायच्या आधी हरबर्‍याची कोवळी पाने तोडुन वाळवतात, ती वाळवलेली पाने), १ डाव ह. डाळ पीठ, अर्धा गड्डा लसूण, १-२ चिंचेची बुटकं, २ वाट्या पाणी, फोडणीला तेल, हळद, हिंग, तिखट.

क्रमवार पाककृती: 

हरबर्‍यातल्या बारीक काड्या काढुन टाकाव्यात. ही पाने, डाळीचे पीठ पाण्यात कालवुन घ्यावे. त्यात चिंचेची बुटकं धुवुन आणि शिरा काढून घालावीत. पीठाच्या गुठळ्या राहु देऊ नयेत.

१ डाव तेलात हळद हिंगाची फोडणी करुन लसूण चांगला लाल होऊ द्यावा. त्यातच तिखट घालावे. तिखट घातल्या घातल्या वरील मिश्रण त्यात ओतावे. १-२ उकळ्या आल्या की भाजी चांगली शिजते. गरम भाकरीबरोबर खावी.

वाढणी/प्रमाण: 
दोन
अधिक टिपा: 

भाजी जशी पातळ/घट्ट हवी त्याप्रमाणे पाणी कमी जास्त करावे.
सकाळी केलेली भाजी संध्याकाळी खायला अधिक रुचकर लागते. त्यावर मोठा चमचाभर कच्चे तेल घालुन मस्त लागते.
भारतातला गावराण लसूण असेल तर अर्धा गड्डा लागतो. पाकळी मोठी असेल तर ५-६ पाकळ्या पुरे.

माहितीचा स्रोत: 
आई
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंड्रेला माझी आई हि सेम अशीचं करते हि भाजी. तिची अतिशय आवडती आणि माझी तितकिचं नावडती. पण वरची रेसिपी वाचून कमीत कमी आईची आवड तरी आठवली.

सिंडे, कशी दिसतात ही हरभर्‍याची पानं? इथे मिळतात का? काय म्हणतात त्यांना?

सायो, हरबर्‍याच्या झाडावर चढ एकदा म्हणजे कळेल कशी दिसतात Lol

इथे बाजारात नाही मिळत गं. भारतात पण फार्फार तर वानोळ्यात येतात पण विकत मिळत नाहीत. तुला हवी असल्यास माझ्याकडची देते.

सायोनारा तुला हरभर्‍याची पाने कशी दिसतात ठावूक नाही!!!!!! कधी विकत घेऊन खाल्ला नाहीस का? ही पान चिंचेच्या पानासारखी बारीक असतात. त्याहूनही बारीक खरे तर. ओरबडून काढता येत नाही मात्र.

नाही बी. माहित नाहीत मला. पण आता सिंडी म्हणतेच आहे तर चढेन हरभर्‍याच्या झाडावर. Wink

पहिल्या फोटोत आहेत ती पाने. दुसर्‍या फोटोत आहेत ते सोलाणे. तीसर्‍या फोटोतले ते घाटे. संपदा, फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद Happy

अच्छा , म्हणजे पहिल्या फोटोत दिसणार्‍या पानांची भाजी करायची तर ... मला वाटले होते, दुसर्‍या फोटोतल्या पाल्याची . Proud

हे हरभर खाल्लेत बी मी. पण ती पानं काही लक्षात नव्हती.

संपदा, तुझ्यासाठी नाही, सायोसाठी ती माहिती दिली. सोललेल्या हरबर्‍यांना आम्ही सोलाणे म्हणतो. बाकी कुणी म्हणतात की नाही माहिती नाही.

सिंडे, दुसर्‍या फोटोतल्या पाल्याचा काय उपयोग मग?

सायो, मुंबईत मिळते की ही भाजी. खास नाशिक वरून ज्या भाज्या येतात उन्हाळयात. सांताक्रुझला पण कुठेशी मिळायची स्टेशनजवळच वाटते जिथे नाशिकची भाजी करून सगळ्या पाले भाज्या ठेवल्या असत. (मला नक्की आठवत नाही)

अग मी बघितली आहे नक्कीच. पण आमच्याकडे केली जात नाही ग.

सिंडे, कधी शेळ्या पाळायचा योग आला तर जास्त आणली जाईल असं वाटतंय. Proud

छान वाटतेय...मिळाली तर नक्की करणार. ह्यावरुन आठवल आई शेवग्याच्या पानाची पण भाजी करायची Happy

माझी फेवरेट भाजी आहे ही Happy
-------------------------------------------------------------------------
मन की गली तू पुहारों सी आ
भीग जायें मेरे ख्वाबों का काफीला
जिसे तू गुनगुनायें मेरी धून है वही ....

हरबर्‍याची भाजी म्हणुन जी खातात तो पाला (चित्र नं. १) नोव्हेंबर - डिसेंबर मध्येच येतो फक्त. संक्रांतीला घाटे तयार झालेले असतात (चित्र नं. २ व ३) आणि मार्च पर्यंत पीक निघते म्हणजे काळे चणे तयार होतात. तेव्हा ही भाजी जरी नाशीकवरुन मुंबईला येत असली तरी उन्हाळ्यात शक्य नाही. जितकी थंडी जास्त तितकी भाजी अंबट जास्त होते त्यामुळे निदान पश्चिम महाराष्ट्रात ही भाजी सप्टेंबर-ऑक्टोबर मधे पेरतात.

थॅन्क्स सिंडी लगोलग कृती टाकल्याबद्दल. मी म्हणत होते ती भाजी, क्र २ ची होती. नो वंडर. त्यामूळेच बेक्कार लागत असणार.

यावेळी घरी गेले की येताना घेवुन येईन..मस्तच लागते ही भाजी..एखाद्या दिवशी भाजी नसली की मग हरभरा कधी वडा (सांडगे) असल्या भाज्या.. ज्वारीच्या भाकरीबरोबर.
आमच्याकडे सोले म्हणतात त्या सोलाण्यांना.. सोल्यांची आमटी पण माझा फेवरीट पदार्थ आहे.

हि भाजी बर्‍याचदा वाळवून ठेवली जाते नासिक ला तरि. ताज्या भाजीची चव येत नाहि तरिही ज्यांना आवडते त्यांना बारा महिने खाता येते (इति आई).

हो हो..आमच्याकडे (मराठवाड्यात) पण वाळवुन ठेवतात.. वाळलेलीच आणनार आहे आता घरुन.. छान लागते वाळवुन ठेवलेली.. ताजी खावुन तर खुप दिवस झाले.. गावाकडुन वाळवलेली येते भाजी दरवर्षी..

अरे माझी प्रतिक्रिया कुठे गेली ? मुंबईत मिळतो तो पाला बर्‍याच वेळा चरबट असतो. नीट शिजत नाही. मला वाटते छोल्यापेक्षा जे देशी हरबरे असतात त्याच्या पानाना जास्त चव असते. राजस्थानात मुगाची डाळ घालून करतात हि भाजी, तसेच या पाल्याचे (मूग घालून ) वडे पण तळून घालतात या भाजीत.

मी मागे पण लिहिले होते. थंडीत हरबर्‍याच्या शेतावर रात्री एक तलम कपडा पांघरतात. सकाळी दंव पडले कि तो कपडा पिळून घेतात. जो द्रव मिळतो तो खाटी. पोटावरच्या सर्व विकारांवर तो उत्तम औषध आहे. माडगूळकरांच्या एका कथेत, या खाटीचा एक अत्यंत करुण संदर्भ आहे.

हरबरा बरा आहे की हरभरा ? आमच्याकडे ही भाजी एकदम आवडती. पण चिंच घालत नाहीत, हरभर्‍याला जो आंबटपणा असतो तोच पुरेसा.
दिनेश, ही खाटी म्हणजे हरभर्‍यावरची आंब असेल का ?

  ***
  Finagle's Second Law : No matter what the anticipated result, there will always be someone eager to (a) misinterpret it, (b) fake it, or (c) believe it happened to his own pet theory.

  हो स्लार्टि तीच ती आंब. हि अगदी वर्षभरदेखील टिकते.
  हि भाजी खुडताना नखं दुखायला लागतात. पण हि पाने खुडणे आवश्यक असते. त्यामुळे झाडाला अनेक फांद्या फुटतात आणि जास्त घाटे लागतात. कोल्हापूर भागात त्याला घाटेच म्हणतात.

  हो नासिक ला हि घाटेच म्हणतात. असे घाटे छोट्याशा शेकोटीमध्ये भाजतात. खुप छान लागतात.

  कधी खाल्ली नाही ही भाजी. पुढल्या भेटीत कर हा सिंडे! Happy

  हरभ‍र्‍याच्या जातीचं आणखी एक झुडुप आहे. नागपुरात त्याला 'तरोटा' म्हणतात. जांभळ्या फुलांची ही झुडपं अगदी रस्त्याच्या कडेला सुध्दा भरपूर उगवतात. त्याचा कोवळा पाला तोडताना बघीतलं होतं काही जणांना. तेव्हा 'त्या पाल्याची ज्वारीचं पीठ घालून भरपूर लाल मिरच्या आणि लसणाच्या फोडणीची भाजी करतात' असं ऐकलं होतं.

  ही भाजी खुप आवडते मला, पण कित्येक वर्ष झाले खाल्ली नाही Sad

  Pages