सागा ऑफ साग - सरसो का साग

Submitted by मीपुणेकर on 2 February, 2021 - 23:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ कप - सरसोची /मोहोरीची पानं ( शेंडे खुडून, अधिक माहिती खाली दिली आहे)
२ कप - पालक ( पालकाचं प्रमाण खरतर सागाच्या निम्मं घेतात, पण सागाची शार्प चव वास याची सवय नसेल तर आधी सागाच्या बरोबरीने पालक घालायचा. हळूहळू आवडीनुसार हे प्रमाण निम्म्यावर आणायचं )
१ वाटी - मेथी पाने ( बथुआच्या ऐवजी मी मेथी वापरली)
१ वाटी - हरभरा पाने, शेंडे खूडून ( हि पाने नसतील तर १ अधिक टोमॅटो)
१ टोमॅटो
१/२ अमेरिकेत मिळतो तो कांदा बारीक चिरुन
२ चहाचे चमचे मक्याचे पीठ
५,६ मोठ्या कळ्या लसूण बारीक चिरुन
१ चमचा धणेपूड
१/२ चमचा जिरपूड
१,२ हिरवी मिरची बारीक चिरुन
१ लाल मिरची मोडून
थोडं आलं चिरून
बारीक चिरलेली कोथिंबीर
फोडणीसाठी १ चमचाभर तूप + तूप जळू नये म्हणून थोडंसं तेल, हिंग, हळद, गूळ

क्रमवार पाककृती: 

सरसो का साग!

गेले २,३ वर्षे घरच्या बागेत मोहोरीची झाड येत राहतात. त्याची बरेचदा भाजी केली जायची, पण ती चवीला ठिकठाक लागायची. कदाचीत सागाच्या तीव्र चवीची सवय व्हायला लागते असं मनाला बजावत परत करत रहायचे. पण या मोसमाला बागेत साग दिसायला लागल्यावर मी बर्‍याच ऑथेंटीक सरसो का साग रेसिपीज यु ट्युब वर बघितल्या. काही पंजावी मैत्रिणींच्या घरचे त्यांच्या आई, सासूच्या हातचे साग खाल्ले होतेच. त्या टीपा आठवून एकत्र असा प्रयत्न करुन बघितला आणि या प्रकारे फायनली घरी एकदम पसंद पडलेले, हीट झालेले हे सरसो का साग!

कृती -
१> २ वाट्या पाणी मोठ्या पातेल्यात गॅसवर ठेवून त्यात बारीक चिरलेला साग, पालक, हरभरा, मेथी, थोडं मीठ घालून झाकण लावून शिजु द्याव्यात. त्यात एक छोटा आल्याचा एक तुकडा पण भाज्या शिजताना घालावा. हे प्रेशर कुकर मध्ये करता येतं, लवकर होतं पण शक्य असेल तर या रेसिपीकरता प्रेशर कुकर न वापरता भाज्या बाहेरचं शिजवा असं सुचवेन.
२> भाज्या नीट शिजेस्तोवर तडक्यासाठी कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, मिरच्या बारीक चिरुन घेणे.
३> भाज्या शिजत असताना, पावभाजी मॅशरने त्या अधून मधून हटून घेत रहायच्या. पाणी जर कमी पडत असेल तर थोडं गरम पाणी घालत रहावं.
४> तडक्यासाठी एका पॅन मध्ये, चमचाभर साजूक तूप घालावे, ते जळू नये म्हणून थोडे तेल त्यात घालावे.
५> तूप गरम झाले कि त्यात जीरे, हिंग, किंचीत हळद घालून बारीक चिरलेला लसूण त्यात छान परतून घ्यावा. मग लाल मिरची परतून , हिरवी मिरची, कांदा घालून परतून घेणे.
६> कांदा जरा गुलाबी परतून झाला कि मक्याचे पीठ, धणे पूड, जिरपूड घालून २,३ मि परतून घ्यायचं.
७> मग त्यात टोमॅटो घालून २ मि. छान परतून घ्यायचं
८> आता शिजलेली , हटून एकजीव झालेली भाजी या तडक्यात घालून वरुन अगदी थोडा चवीपुरता गूळ, चव बघून हवं असल्यास मीठ घालायचं, चिरलेली कोथिंबीर घालून एक वाफ आणायची.
भाजी तय्यार. हि भाजी दुसर्‍या दिवशी मुरल्यावर अजून जास्त चविष्ट लागते Happy

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

१. सरसोची पानं भाजी साठी घेताना फक्त शेंडे खुडून घ्यायचे, म्हणजे वरची ३ पानं, त्या बरोबरचा देठ. बाकी खालची पानं भाजीसाठी वापरत नाहीत. ही टीप शेफ रणवीर ब्रार कडून साभार. त्याच्या भाषेत बाकी के पत्ते गाय भैसोंको खिलाते है Happy
२. मक्याचे पीठ फोडणीत भाजून घेतल्याने जास्त चांगली खमंग चव आली, ही टीप शेफ कुणाल कपूर कडून साभार.
३. हि भाजी चिरल्यावर जो ढिग दिसतो त्यामानाने तयार झाल्यावर बरीच कमी होते.
४. सरसो का साग हे मुरल्यावर, दुसर्‍या दिवशी जास्त छान लागते. त्यामुळे आदल्या दिवशी करून दुसर्‍या दिवशी खायची किंवा दुस र्‍या दिवशी खाण्याकरिता पण उरवायची Happy

माहितीचा स्रोत: 
रणवीर ब्रार, कुणाल कपूर, भरत किचन या चॅनेल्सवर बघून प्रत्येकातून काही ना काही घेऊन, आवडीनुसार काही बदल करून हि रेसिपी केली.
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@मामी, प्राजक्ता धन्यवाद Happy

@प्राजक्ता, डोसा काऊंटर ईथे बे एरियातल्या होल फुडस मध्ये आहे.
घोटाघोटी केलेलं साग मिळालं म्हणजे काम सोप्पं झालं कि. प्रेशर कुकर, आयपी मध्ये पण पटकन शिजुन घोटून होते, घाईच्या वेळी ते बरं पडतं Happy

@झंपी, मी पण तुम्हाला महितीच दिली कि या भाजीला बथुआ मस्ट आहे असे काही नाही. त्याखेरीज देखील भाजी छान लागते. बथुआ बरेच जण घालतात ते माहिती आहेच, वर रेसिपी मध्ये देखील तसा उल्लेख आहे. ज्यांना आवडतो त्यांनी तो जरूर वापरावा.
आणि मला काय झेपेल, पचेल, चालेल याची चिंता माझ्यावरच सोडा.
बाकी हे तुमचं बरोबरे, पदार्थ आणि पोस्ट दोन्ही मला सौम्यच आवडतात, त्यामुळे ईथेच थांबते.

ओके धन्यवाद. बघते मिळतंय का.लगेच नाही तर कदाचित थोड्या दिवसांनी मिळेल.
रेसिपी छान आणि फोटो tempting आहे अगदी.

>> आणि मला काय झेपेल, पचेल, चालेल याची चिंता माझ्यावरच सोडा.<<
मी असल्या क्षुल्लक गोष्टींवर कशाला वेळ घालवेन?
पण , तुम्ही दुसर्‍याला काय येतं की नाही असले फाजील सवाल वा अंदाज नका लावू. तुम्ही जसं लिहाल तसेच तुम्हाला उत्तर मिळेल.

म्हणजे 'साग' हे मराठी भाषेतलं फदफदं(आय हेट धिस वर्ड( किंवा गरगटं आहे.
माझ्या फुटक्या फोन वर आता क्लोजिंग कंस टाईप होत नाहीये.तो जास्त फुटक्या भागात आहे.तरीहि एमआय मॅक्स असल्याने तो मरेपर्यंत वापरायचा अट्टाहास Happy बात करने के लिये आणि बँकिंग ऍप साठी नॉर्मल फोन आणि नेटफलिक्स, मायबोली, व्हॉटसअप साठी हा फुटका फोन.
(*झंपी, त्या रेसिपीचा स्वतंत्र धागा टाकाच.
आपला मायबोलीचा रेसिपी डीबी अजून समृद्ध झाला तर हवाच आहे.(

अच्छा अस आहे होय. मला वाटल सागाच्या झाडाच्या पानांची भाजी. मोहरी ची फोडणी देउन व अन्य काही झाडांची पान ही व्हॅल्यु ॲडिशन

आज स.सा+म.रो.खाल्ले.पोट तुडुंब झालेय.

मीपुणेकर, ते मक्याचे फुलके कसे केले?छान पातळ दिसताहेत.

सागाच्या झाडाच्या पानांची भाजी वाटली >>हे भारी आहे Happy

@सनव, देवकी, जाई धन्यवाद Happy

@ देवकी, मक्याचे फुलके करण्यासाठी, आपण मोदकाची उकड करतो तसंच, पाणी उकळून त्यात मीठ, मावेल तितकं मक्याचं पीठ (अंदाजे जेवढे पाणी तेवढचं पीठ लागतं) घालून , मग गरम असतानाच हे वाटीने मळून, नंतर फुलके केले.
अवांतर - याच प्रकारे ज्वारीच्या पिठाचे फुलके पण छान होतात.

Pages