द ग्रेट इंडिअन किचन

Submitted by मेधावि on 1 February, 2021 - 07:00

गेल्या दहा दिवसांत तीन सिनेमे पाहीले.
1. इज लव्ह इनफ ? "सर"
2. द लास्ट कलर
3. द ग्रेट इंडिअन किचन.

पहिले दोन सिनेमे आवडले ...

तिसरा सिनेमा.. (Neestream -मल्याळी भाषेतला इंग्रजी सबटायटल्सवाला) पाहून मात्र त्रास झाला. एक सण्णसणीत मुस्काटात बसली. हा चित्रपट संपत नाही. तो मानगुटीवर बसतो आणि छळतो. "अगदी फ्रंट ऑफ द माईंड" छळत रहातो. स्वैपाकघर आणि स्वैपाक ह्या विषयातले बारीक सारीक तपशील टिपून त्यावर एका पुरुषानं हा सिनेमा बनवलाय,त्याला साष्टांग प्रणाम.

Spoiler alert - ज्यांना पहिल्या  धारेचा सिनेमा बघायचाय त्यांनी इथून पुढे वाचू नये. पण लवकर बघा...

(एक डिस्क्लेमर - मी अजिबातच स्त्रीवादी नाही. स्वतः राबून घर सजवणं, स्वच्छ आणि सुंदर ठेवणं, छान छान पदार्थ बनवून दुस-याला खाऊ घालणं हे मला आवडतं. मी माझ्या आवडीसाठी ते करते, तरीसुद्धा सिनेमा पाहून मी गोंधळले आणि भांबावले आहे)

लास्ट अॅलर्ट!!!
ह्यापुढचं लेखन प्रचंड उत्कट असेल. ते कदाचित  असंबंद्धही होईल, पण विचारांचं घोंघावीकरण न थोपवता आणि त्याचं अजिबात सुबकीकरण न करता ते जसे येतील तसे ते इथे येतील.

एखाद्या व्यक्तीला कोणी सपासप आसूडाचे फटके मारत असेल तर त्याच्या वेदना पाहून बघणाराही कळवळतो.  पण ती व्यक्ती जर खूषीत ते फटके खात असेल तर? .... आनंदानं हे फटके खाणं म्हणजेच आपल्या आयुष्याची सार्थकता, कृतार्थता, परीपूर्णता असं तिला आणि तिच्या सर्व जिवलगांना वाटत असेल तर ?

आणि....... मीही त्यातलीच एक असेन तर?????
मीच काय,  निरक्षर ते डाॅक्टरेटपर्यंत शिकलेल्या, गरीब ते गडगंज श्रीमंतीत लोळणा-या माझ्या परिचयायल्या सर्वच्या सर्व  स्त्रिया दिसतायत् मला आत्ता डोळ्यापुढे. हे सगळं आमच्या, आपल्या  हाडीमाशी इतकं रुजलंय आणि तुम्ही आम्ही सर्वांनी ह्या प्रचंड प्रचंड भीषण वर्णव्यवस्थेला किती सहजपणे आत्मसात केलंय...आणि आणि "आज" एक पुरुष बोलतोय त्यावर..हॅट्स ऑफ टू हिम.

हा सिनेमा  पितृसत्ताक पद्धतीतल्या "स्त्री" ह्या सो काॅल्ड  "देवीच्या" कर्तव्यांवर, तिच्या अधिकारांवर, सुखी आणि संपन्न आयुष्याच्या  परंपरेनं रुजवलेल्या कल्पनांवर, व्याख्यांवर आणि "घरगुती हिंसाचाराच्या प्रकारांवर बोलतो. चित्रपट पहाताना एकापाठोपाठ एक एक सण्णसणीत कोरडे बसत रहातात अंगावर खण्णं..खण्णं..खण्णं करत  !!!!   पण तो थांबत नाही, वेगवान बनतो आणि बोलतच रहातो, बोलतच रहातो. मी ..पहातच रहाते....कण न् कण् एका क्षणी  "पेटत" असतो आणि पुढल्या क्षणी "विझत" असतो. एक मोठ्ठी  हतबलता साचून रहाते. हे सगळं बदलण्यासाठी आपण फार फार दुबळे आहोत असं वाटतं.  पटो...न...पटो.... मी तीच वाट पुढे चालणार असते.

हा चित्रपट फार महत्वाचा आहे. पहायलाच हवा असा.  रोजच्या जगण्यातल्या ब-याच बेसिक गोष्टींचं भान देतो तो. मानवता शिकवतो. आपल्या मायेच्या माणसांच्या आणि प्रेमाच्या कल्पना, जेवणाचे, वागण्याचे  मॅनर्स, म्हातारपणापर्यंत बाळगलेल्या आणि  कौतुकानं जोपासलेल्या  नाठाळ आणि त्रासदायक सवयी आणी चवी-ढवी ह्या सगळ्यावर प्रश्न उभे करतो.

चित्रपटाची सुरुवात.. , केरळमधल्या एका गावात एक लग्न ठरतंय. मुलगी काळीसावळी, स्मार्ट, हसरी, टिपिकल दाक्षिणात्य सुंदर काळेभोर बोलके डोळे आणि दाट कुरळे केस. तशी पहिल्यांदा पाहताना ती सुंदर वगैरे नाही वाटत पण हसली की फार गोड दिसते. नृत्याची आवड आहे तिला. नैपुण्यही आहे त्यात. हसरी, खेळकर फुलपाखरी आयुष्य जगणारी ही मुलगी.  बघायला येणारं स्थळही  तालेवार असावं. मुलीची आई भरपूर उत्साहानं राबते आहे, गोड आणि तिखट असे भरपूर तळीव पदार्थ (घरातच) बनवते आहे. सुंदर मोठ्ठा "आधुनिक" आणि कलात्मक पद्धतीनं सजवलेला दुमजली बंगला आहे त्यांचा. संपन्नता जाणवते सगळीकडे. वडील गल्फमधे नोकरी करत असल्याचं गप्पांमधून समजतं.  नातेवाईक, हास्यविनोद, गप्पा........ छान आनंदाचं वातावरण आहे.

बघण्याचा कार्यक्रम पार पडतोय. दोन्ही बाजूंचे लोक सधन वाटतात आणि खुशीत दिसतायत्. मुलामुलीला एकट्यानं एकमेकांशी काही बोलायचं तर बोला अशी परवानगी देऊनही  घरच्या सगळ्यांनी फिल्डींग लावली आहे. अशा परिस्थितीत संकोचल्यामुळे मुलामुलीचा फार संवाद होतच नाही. स्वभाव, विचार-आचार जाणून घेणं वगैरे काही घडताना दिसत नाही. पण दोघंही एकमेकावर अनुरक्त वाटतात. 

छान थाटामाटात लग्न होतं. हुंड्यात मिळालेली एक अलिशान कार ही दिसतेय दारात.  लाजत मुरडत नव्या नवरीचा कौतुकाचा गृहप्रवेश. प्रेमळ व शांत स्वभावाचे सासूसासरे आणि नवरा.  सासरचं घर किती सुंदर!!! वडिलोपार्जित असणार. टुमदार, कौलारू, खूप मोठ्ठं पण जुन्या पद्धतीचं.  दोन मजली, मागेपुढे भलं मोठ्ठं अंगण, जुन्या पद्धतीची कडी-कोयंडे असलेली लाकडी दारं,  शिसवी लाकडाचं फर्निचर, पितळी मोठी मोठी छान छान भांडी, मागेपुढे भरपूर झाडं. स्वैपाकघर  मोठ्ठं, मात्र अंधारं आणि साधं आहे. तिथं माॅड्युलर किचन नाहीये. साधा कडप्याचा ओटा, अॅल्युमिनीयमची भांड्यांची मांडणी, भिंतीवरचं ताटाळं, फळीवरचे डबे. स्वैपाकघरातच अजून एका भिंतीशी अजून एक ओटा आहे आणि त्यावर चक्क एक ढणढणती चूल आहे. वर वखारीची लाकडं रचलेली दिसतात.  चुलीवर (केरळमधे) भात शिजवतात ते भाताचं डेचकं. इतर भांडी आणि भात ढवळायचा मोठा डाव. बाकी स्वैपाक गॅसच्या शेगडीवर होतो पण भात मात्र अजूनही चुलीवरच शिजतो. मिक्सर आहे, पण वाटण मात्र पाट्यावरच होताना दिसतं. कायमचा फिक्स केलेला एक मस्त मोठ्ठा पाटा दिसतो.

मुलीच्या संसाराचा पहिला दिवस. नवरा चांगला वाटतो. सासूही प्रेमळ, शांत आणि कामसू आहे. मुलीला हळूहळू रुळूदे. लगेच कुठे कामं सांगायची? सासराही शांत आहे. घरात फारसा बोलतही नाही.

भांडी घासणं, उष्टं खरकटं काढणं, केरवारे, फरशी, अंगण झाडणं, पुसणं , भरपूर भाज्या, निवडणं, चिरणं, फोडणीस टाकणं....मोठ्या अलीशान पाट्यावर भरपूर नारळ वाटणं, चटणी, सांबार बनवणं. मांसाहारी पदार्थ बनवणं. वेळेवर डायनिंग टेबलवर सगळं अन्न मांडणं, गरमागरम सर्व्ह करणं.... विविधरंगी, विविध चवींचा, सुग्रास, तृप्त करणारा स्वैंपाक.. गृहलक्ष्मीनं, अन्नपूर्णेनं घर सांभाळावं, सजवावं, ते उबदार ठेवावं, कुटुंबाला छान खाऊ पिऊ घालून सुखात ठेवावं.  जेवताना स्वैपाकाचं आवर्जून कौतुक करणारी घरची माणसं.  पुरुषाच्या ह्दयाचा मार्ग पोटातूनच तर जातो ना....ह्या संसारला सुखी संसारच तर  म्हणतात ना?  

रोज सकाळी बिडाच्या तव्यावरचे गरमागरम डोसे, इडिअप्पम, पुट्टु आणि कडला करी, सांबार, पदार्थाला लाल मिरच्या, उडीद डाळ, भरपूर कढीपत्याची खमंग फोडणी. दुपारच्या जेवणातल्या वेगवेगळ्या भाज्या, भात... हळूहळू डोळ्यातून  ती चव आपल्या डोक्यात, मनात, आणि मग जिभेवर उतरायला लागते. चायला, आपण फूड चॅनेल बघतोय का काय असं वाटतं.

घरच्यांच्या आवडीनिवडी आणि चवीढवींचा विचार करत करत रोजचा स्वैपाक करणं, सकाळी दूध येण्यापासून सुरू झालेला दिवस, रात्रीची जेवणं झाली की ओटा टेबल आवरून, भांडी घासून मग श्रांत तनामनानं दिवा बंद करून बिछान्यावर अंग टाकणं ही त्या गृहलक्ष्मीची आनंदाची, सार्थकतेची, तृप्तीची कल्पना. लग्नानंतर सुरुवातीला  नवरा व सासरच्यांचं सगळं व्यवस्थित करणा-या ह्या घरोघरीच्या नायिका, नंतर मुलंबाळं, नातवंडं ह्यांच्यासाठी अविरत झिजतच असतात......झिजतच रहातात....मरेपर्यंत. आणि आपण म्हणतो...माझी आई/आजी फार फार प्रेमळ होती. माझ्यासाठी खूप केलं तिनं. तो तिच्यासाठीही सन्मानच असतो.

कथानायिकाही लग्नानंतर सासूच्या बरोबरीनं  सर्व जबाबदा-या उचलायचा प्रयत्न करताना दिसते.  एक आदर्श सून, बायको बनण्याचा प्रयत्न करताना दिसते.  हे सर्व करताना तिला मजा येते आहे, आत्मिक समाधान मिळतं आहे. पण ते निभवताना तिची दमछाक होतेय.

घरातला पुरुषवर्ग शांत, अबोल....पैसे मिळवून आणणं आणि बाहेरची कामं करणं हे पुरुषांचं काम. ते किचनमधे ढवळाढवळ करत नाहीत. आणि अचानक सासूला मुलीच्या बाळंतपणासाठी परदेशी जावं लागतं. आणि संपूर्ण घराची संपूर्ण जबाबदारी सुनेवर धाप्पकन् येऊन पडते.  माहेरी
फारशी स्वैपाकघरात न  वावरलेली ही मुलगी, पटापट सगळं शिकून अपेक्षांना उतरायच्या प्रतिक्षेत.

सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, भांडी घासणं, केरवारे, अंगणाची झाडलोट, फरश्या पुसणे, जिने पुसणे..... न संपणारी आणि मारूतीच्या शेपटाप्रमाणं सतत वाढत जाणारी कामं आणि अपेक्षा. सास-यांना चुलीवरचाच भात, पाट्यावरची चटणी प्रिय आहे. कुकर, मिक्सरमधे ती चव येत नाहीये. ते प्रेमानं तिला सुचवू पहातात. तीही त्यांच्या मताचा आदर राखते, एक एक दिवस पुढे सरकतो तशी वेगवेगळ्या प्रसंगातून तिला येत जाणारी जाण, येणारा मानसिक आणि शारिरीक थकवा,  फ्रस्टेशन्, पुरुषांच्या प्रायोरिटीज,  एकत्र कुटुंबपद्धतीतल्या अपेक्षा, रोज येणारी वेगळी वेगळी आव्हानं. त्यावर मात करण्यासाठीची तिची ओढाताण आणि ह्या सगळ्यावर त्यावर तिनं दिलेलं उत्तर....ह्यावर बोलतो हा सिनेमा.

गरमागरम डोसे करून वाढायचे म्हणजे बरोबरीनं ती जेवू नाही शकत बाकीच्यांबरोबर. सगळ्यांचं खाणं झाल्यावर टेबलवर ताटाबाहेर काढून टाकलेल्या शेवग्याच्या शेंगांची सालं आणि इतर खरकटं  उचलताना तिला ढवळतं. जेवायला सुरुवात करताना नवरा व सास-यासाठी हिनं सुबकपणे मांडलेलं टेबल आणि आता ती आणि सासू जेवायला बसतानाचं टेबल ह्यात जमीन अस्मानाचं अंतर. सासू सरावलीये. तिला ह्याचं काहीच नाही वाटत. उलट ती नव-याच्या उष्ट्या ताटातच घेते वाढून. मुलीला मात्र हे जड जातंय. हाॅटेलमधे टेबल मॅनर्स पाळणारा नवरा घरात का पाळू शकत नाही? सतत भांडी घासण्याचा आणि उष्ट- खरकटं आवरण्याचा सीन येत रहातो. किती घरांमधे तुंबलेल्या सिंकमधे हात घालायचा प्रसंग घरच्या मुलांवर/ पुरुषांवर  येत असेल? दुस-या घरातनं आलेल्या मुलीनं मात्र हे पट्कन् आत्मसात करण्याची अपेक्षा ठेवली जाते.

घरोघरी नव-याच्या हातात डबा, रुमाल, पाकिट, मोबाईल देणा-या बायका आपण पहातोच की. त्यात कुठं काय वावगं वाटतं? नाॅर्मलच तर आहे की हे..
रांधा वाढा उष्टी काढा ह्यात तर मागच्या अनेक पिढ्या संपल्या. ह्यात काय एवढं मोठं? नाॅर्मलच आहे की हे सगळं..  "ह्याच" गृहितकांकडे हा सिनेमा परत एकदा नव्यानं बघायला लावतो. त्या गृहीतकांना मानवतेच्या निकषांवर परत एकदा तपासायला लावतो. मारहाण किंवा  शिवीगाळ म्हणजेच काही घरगुती हिंसाचार नाही फक्त. खूप व्यापक आहे ती कल्पना. पिढ्या न् पिढ्यांपासून होत असलेले काही अन्याय आता परंपरेच्या नावानं इतके मान्यताप्राप्त झाले आहेत की  मानवतेनच्या  दृष्टीकोनातूनही ते दूर करू शकत नाहीये आपण. म्हणून ही अस्वस्थता येते. ही अस्वस्थता कधी जाईल, कशी जाईल ते माहीत नाही पण  सिनेमाचा प्रेक्षक आपल्या ताटातलं उष्टं दुस-या कुणाला तरी साफ करायला टाकताना  दहा वेळा तरी विचार करून टाकेल  हे सुद्धा ह्या सिनेमाचं यशच म्हणावं लागेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

सिंक बिघडल्यावर तो काही तातडीने करेल ही अपेक्षा करणे म्हणजे .... इथे फिल्मीच हवं असेल तर "आग से ठंडक, बर्फसे गर्मी मांग के हम पछताए... ध्यान अब आए हमने गवाए दिन कितने अनमोल..." गाणे ब्याकग्राउंडला वाजवू शकता Happy

सिंक तुंबल तर त्याचा थेट त्रास तिला होतो मग तिला तो त्रास दूर करण्यासाठी आवश्यक तो पैसा, वेळ, इ तिला उपलब्ध पाहिजेच. //

मुळात सिंकचा वापर ती एकटीच करते आणि ते तुंबण्याचा त्रास तिला एकटीलाच होतो हाच मुख्य प्रॉब्लेम आहे.
ती एकटी सिंक फिक्स करून घेऊ शकते की नाही हा सेकंडरी प्रश्न.
घटस्फोटानंतर ती एकटी राहिली किंवा आईसोबत राहिली तर तिथेही सिंक तुंबू शकते आणि त्यावेळी तिचं तिने ते फिक्स करून घ्यायला पाहिजे. पण इथे नवरा काहीच मदत करत नाही हा मुद्दा हायलाईट करायचा असावा.
म्हणजे सिंक तिनेच फिक्स करायचं, अनेक तास किचनमध्ये राबायचं, करियरचा त्याग करायचा आणि त्याबदल्यात तिला त्याच्याकडून काहीच मिळत नाही. तिच्या कामात मदत मिळत नाही, तिला एक व्यक्ती म्हणून भावनिक आधार मिळत नाही आणि लैंगिक सुखही मिळत नाही!
हा घाटे का सौदा ती वेळीच ओळखते आणि मूल वगैरे होऊन आणखी नुकसानीत अडकायच्या आत स्टॉप लॉस ऑर्डर लावते हे मुख्य Happy

सनव, तुमचा मुद्दा पटतो ही आणि नाहीही. तिला त्याच्याकडून काहीच मिळत नाही हे बरोबर नाही- अन्न,वस्त्र, निवारा नि समाजात विवाहीता म्हणून पत मिळतेच आहे. श्रमविभागणी पारंपारिक म्हणजे तिने घरचं बघायचं त्याने अर्थार्जन करायचं. लैंगिक बाबतीत ती असुखी तसा तो ही असुखीच आहे. तो तिला भावनिक आधार देत नाही तसा तो तिच्यात भावनिक आधार शोधतही नाही.

म्हणजे असा कुठला घटक आहे जो त्याला घरात राहण्यास भाग पाडतो नि तिला बाहेर पडायला मजबूर करतो? - सत्ता नि संसाधने. त्याला ते घरात मिळतं, तिला नाही. तिला सतत मायक्रोमॅनेज केले जात आहे - मशीन वापरायचे नाही, सिंक मला जमेल तेव्हा दुरूस्त होतील इ इ. तिला जर संसाधने मिळाली, थोडी सत्ता/स्वातंत्र्य मिळाले तर लैंगिक-भावनिक कोंडमारा असतानाही जगणे सुसह्य होईल.

बर्‍याच घरां त बायका किराणा सामान भाजी पण आणत नाहीत. घरातले जेंट्स आणून देतात व ते रांधून द्यायचे. नवरा टूर वर गेला तर वर्तमान पत्र बंद करतात. ती कोपर्‍या परेन्त देखील जात नाही का?/ किंवा घरीच मला एकटीने निभले नाही तर मेड ठेवुन द्या मुकाट्याने असा आग्रह करत नाही निगोशिएट करत नाही. इट इज अ पावर गेम.

अन्न,वस्त्र, निवारा नि समाजात विवाहीता म्हणून पत मिळतेच आहे.///

अन्न वस्त्र निवारा तिचं ती मिळवू शकते. किचनमध्ये राबण्याऐवजी तिच्या आवडीचं काम करून ती स्वतःच्या पायावर उभी असलेली दाखवली आहे.
हां आता विवाहिता म्हणून 'पत' नसेल मिळत पण त्या सोकॉल्ड सन्मानाचा तिला तिच्या डेली आयुष्यात काही उपयोग नाही किंवा ते स्टेटस नसलं तरि फारसं काही बिघडणार नाही असं तिला वाटलं असावं.

तुमचा मुद्दा रोचक आहे कारण एकूणात किती बायका केवळ ते विवाहाचं स्टेटस मिळावं म्हणून लग्न करत असतील. किंवा एकदा लग्न करून फसल्यावर 'एकट्या बाईचं जगणं कठीण' असा विचार करून abusive नात्यात अडकून राहात असतील. कुठेतरी हा स्टीरियोटाईप दूर व्हायला हवा. अनेक स्त्रिया समर्थपणे एकट्या राहतात. त्यांची उदाहरणं लक्षात घ्यायला हवीत.

अगदी पटलं सनव.
त्या मुलीने आप्पाना आपलं मानून, आदर देऊन त्यांचे चक्रमपणे सहन करण्याची अपेक्षा आहे.घरातल्या संस्काराला आपलं मानून पिरियड मध्ये सर्दी पाठ दुखत असताना चटईवर झोपणं आणि आपले कपडे वेगळे नदीवर पिळणं आहे, सगळ्यांना आपलं मानून त्यांच्या खरकटं ताटाबाहेर टाकण्याच्या यक सवयी प्रेमाने नजरेआड करायच्या, स.आ.मा. काही दिवस वाट पाहून घाणीचं आगार बनलेलं सिंक स्वतः प्लम्बर बोलून दुरुस्त करायचे.गृहीत एकतर्फी अपेक्षांची आणि स्पेसिफिकेशन ची यादी वाढते आहे.या बदल्यात तिने तिला आपलं मानून केले जातील असे मोजके बदलही सुचवण्याबद्दल तिला सतत माफी मागायला लावली आहे.
हा पूर्ण घाटयाचा सौदा आहे.

छान चर्चा चालु आहे आणि अजुन तरी गाडी ट्रॅकवर आहे.
कदाचित सगळ्या माबोकर स्त्रियाच चर्चेत असल्याने, विषयाला अजुन उभे आडवे फाटे फुटले नसावेत Wink

दुसऱ्या पिरियड्सच्या वेळी ते दोघे शबरीमलाच्या यात्रेसाठी व्रतबद्ध असल्यामुळे हिच्यावर जास्त निर्बंध असावेत.

(अवांतर: आमच्या प्लंबरच्या बाबतीत माझा अनुभव असा आहे की तो मी कामासाठी बोलावलं तर शक्यतो येत नाही, नवऱ्याने बोलावलं की येतो. पैसे किती ते मी विचारलं तर सांगत नाही, 'सर को बोलता हूँ' सांगतो. त्यामुळे मीही त्याला बोलवायचं असलं तर नवऱ्यालाच सांगते Wink समस्त प्लंबर लोक असेच असतील असं नाही. )

वावे, अगदी.मला हा अनुभव पेंटर बाबत आहे.
इथे मला मेड इन हेवन चा लूधियाना वाला एपिसोड आठवतो.'साब, आप बता दिजीए ना क्या करना है.महिला की थोडे ना सुनेंगे हम' म्हणून ती मंडपवाली टीम 'पुरुष'येईपर्यंत काही काळ मख्ख बसून राहिलेली असते.

अवांतरः अगदी याच अशाच अनुभवांपायी प्रत्येक क्षेत्रात महिला असणे गरजेचे आहे. महिला प्लंबर असेल तर "करवंटीचा गाकरा एवढा तुकडा पडला नि सिंक तुंबलं" असं सांगता येतं नि तिलाही रोजगार मिळतो. मागे मला कुणी विचारलं होतं प्रत्येक क्षेत्रात महिला असावी असा का तुमचा आग्रह? कारण आता महिला अनेक क्षेत्रात ग्राहक आहेत. त्यांना समजून सर्व्हिस देणे जमत नसेल पुरूषांना तर सुविधा पुरवणारी महिला हवीच.

सनव, अब्यूज इतका श्वेत-श्याम नसतो. तो समजण्यात अनेक वर्ष जातात नि बाहेर पडलं की संपलं अब्युज असं ही घडत नाही. मी आधी टेड टॉकची एक लिंक दिली होती. पुन्हा देते - https://www.ted.com/talks/leslie_morgan_steiner_why_domestic_violence_vi...

अनु ते इडिआप्पम मस्त लागतं..तांदळाचंच असतं..छान लागतं...गोड आवडत असेल तर नारळाच्या दुधासोबत नाहीतर.. वेज कुर्माबरोबर खातात..

म्हणजे, चवीला लागत छानच असेल. ग्रेव्ही भात सारखं. माझा प्रश्न टेक्निकल आहे. हाताने शेवया पोळीसारख्या धरुन अंडाकरी ला लावून कश्या खात असतील Happy की बाऊल मध्ये ग्रेव्ही घेऊन त्यात शेवया टाकून चमच्याने काढून खात असतील?

हातानेच खातो गं बुडवून म्हणजे प्लेटमध्ये इडिआप्पम, एका बाऊलमधे ग्रेव्ही मग थोडं थोडं तोडून डुबवुन Happy .. इथं लोकं घरी बनवतात. आम्ही विकतचे आणतो.

या चर्चेवरुन गेल्यावर्षीची कविता आठवली माझीच

आंतरराष्ट्रीय महिला दिन
शुभेच्छा, कार्यक्रम या सगळ्यात
टीआरपी उंचावला म्हणून काही खुश
गोड मिट्ट पाकातला दिवस
म्हणून पण काही खुश
पण मी..?
माझं काय ..?
असला काहीतरी प्रश्न चेहऱ्यावर घेऊन तू माझ्यासमोर आलीस
पण मला कळत नव्हतं
तुला जे ऐकायचय तेच बोलू
की मला जे ऐकवायचय ते बोलून घेऊ?
मग म्हंटलं ही संधी साधून
विचारुया तुलाच की बाई गं,

नुसता प्रश्नाचा दिवा सोडलायस पाण्यात?
की उत्तराच्या प्रतिक्षेत आहेस?

नुसता प्रश्न पडून आणि तो मांडून
झालं असेल समाधान
तर थांबूया इथेच काठावर
सोडलेला दिवा, पाण्यात विझत
दूर जाताना बघत
उत्तर हव असेल,
तर मात्र उतराव लागेल पाण्यात
आहे तयारी? मनाची, शरीराची.. सगळ्याचीच?
उत्तम, आदर्श मुलगी पत्नी सून आई
अशा शेऱ्यांचा करावा लागेल त्याग,
जमेल तुला?
सुपरवूमन ही शिवी आहे
असं बिंबवावं लागेल मनावर,
जमेल तुला?
'हाऊस हजबंड' व्हायचा चॉईस
पुरुषालाही असू शकतो,
हे घेशील समजून?

रचशील का नवीन कथा?
ज्यात राजकुमार कायम
ताकदवान शूर नसेल आणि
ऱाजकुमारी कायम गोरीपान
दुर्बल नसेल?
बाईच्या त्यागाच ग्लोरिफिकेशन नसेल
आणि सगळंच जमाव असा अट्टाहासही नसेल
मदत घेण्यात आणि करण्यातही
कमीपणा नसेल
पण प्रत्येकच वेळी आसरा शोधायची त्यात घाईही नसेल

जमेल? अशी कथा शोधायला, वाचायला, लिहायला आणि जगायलाही?

हरकत नाही,
कर विचार निवांत

आणि
उत्तर शोधायची आस नसेल उरली आता,
तर थांबूया काठावरच

तो प्रश्नाचा दिवा विझलाय की, अजून कोणी तेवत ठेवलाय बघत
पण उत्तरच हवी असतील अजूनही तर मग ऐक

प्रत्येक उत्तराची असते एक किंमत
ती चुकवल्याखेरीज मिळत नाही काहीच, कुठेच आणि कधीच

आणि कधीकधी स्वत:च कृष्ण बनून
पुरवावी लागतात स्वत:तल्या द्रौपदीला वस्त्रही

बाई ग! काठावरुन नाही कळत हे काहीच
त्यासाठी झोकूनच द्याव लागत पाण्यात,
बुडायची भिती काठावरच ठेवून

जमेल का तुला?

म्हणून म्हणते बाई नुसता प्रश्न विचारणार असलीस तर राहू दे
गेली कित्येक दशकं ऐकतेय मी प्रश्न हा,
तस अजून काही दशकं ऐकेन असाच

प्रश्न ऐकेन
त्यावर वाह वाह ऐकेन
त्यावर टिकाही ऐकेन
पण उत्तर?
अहं! ते नाही ऐकवणार, ऐकायचं असल्याखेरीज

हे एकदमच पटलं
"प्रत्येक उत्तराची असते एक किंमत
ती चुकवल्याखेरीज मिळत नाही काहीच, कुठेच आणि कधीच"

मस्त कविता कविन!

मागे कुठे तरी हा मुद्दा वाचला होता आणि तो पटला होता. आत्ता चाळीस-पंचेचाळीसची जी पिढी आहे (आणि त्यानंतरच्या सगळ्या) त्यातल्या मुलींना लहानपणापासून मुलांच्या बरोबरीने वाढवलं गेलं. पण मुलग्यांवर मात्र तसे (मुलींना बरोबरीने वागवण्याचे) संस्कार समहाऊ झाले नाहीत. (सन्माननीय अपवादांनी स्वतःला वगळावं) लग्नरीती (आडनाव बदलणे वगैरे, त्यातही जरी मुलीने स्वतःचं आडनाव बदललं नाही तरी मुलांना मात्र वडिलांचंच आडनाव जनरली लावतात) तशाच चालू राहिल्या. बायकोकडून नवऱ्यांच्या, सुनेकडून सासरच्या माणसांच्या असलेल्या अपेक्षा बऱ्यापैकी तशाच राहिल्या. पण मुली मात्र मधल्या काळात बदलल्या. हा 'mismatch' त्रासदायक आहे!
आता पंचेचाळीस-पन्नाशीत असलेल्यांची मुलं तरुण व्हायला लागली आहेत, त्यांचं कसं होतं ते दिसेलच.

चांगली चर्चा चालू आहे. डोक्याची कल्हई करणाऱ्या अनेक गोष्टी चालू आहेत त्यामुळे सध्या हा सिनेमा बघायला नको असं वाटतंय.
कविन, कविता अत्यंत पटली!

वावे पटला मुद्दा

साधारण याच विषयावर एक निबंध स्पर्धा कोणीतरी घेतली होती. तेव्हा पाठवला होता निबंध मी. (अर्थात दखलपात्र नसावा म्हणून गणतीत धरला गेला नसावा स्पर्धेत. तिथले गणतीत धरले गेलेलेही काय होते कुठे वाचायला नाही मिळाले तो भाग वेगळा)

जस्ट चर्चेशी सुसंगत आहे म्हणून तो निबंध खाली देत आहे, अस्थानी वाटल्यास उडवेन प्रतिसाद

विषय : स्त्री-पुरुष समानतेमुळे उध्वस्त संसार( विषय आयोजकांनी दिला होता)

‘स्त्री-पुरुष समानतेमुळे उध्वस्त संसार’ हे गणितातल्या ‘वेन आकृती’ प्रमाणे आहे. म्हणजे स्त्री-पुरुष समानता हे एक स्वतंत्र वर्तुळ आहे आणि संसार- त्याचे चढ उतार हे एक वेगळ वर्तुळ आहे. प्रत्येक वर्तुळाची व्याप्ती खूप मोठी आहे. तसच त्या वर्तुळातल्या समस्या, तिथले घटक, तिथल यशापयश हे बऱ्याच वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून आहे. पण इथे ती वर्तुळे एकमेकांना छेदतात तेव्हा होणाऱ्या काही परिणामांविषयीचे विचार मांडायचे आहेत. परीक्षेत ‘चूक की बरोबर’ असा प्रश्न येतो तेव्हा त्याच एक ठाम उत्तर असतं पण समाजातल्या घटना आणि त्याचे परस्परावलंबन बघताना बरेचदा अस एकच एक चूक किंवा बरोबर उत्तर देता येत नाही. म्हणजे वरवर बघता हे वरचं विधान काहीशा खेदाने ‘बरोबर’ आहे अस म्हणाव लागेल पण म्हणून ते आणि तेच बरोबर असही नाही. हे कसं ते बघण्यापूर्वी आपण यातल्या या दोन स्वतंत्र वर्तुळांना समजून घ्यायचा प्रयत्न करुया.

समानता म्हणजे दोन घटक समान पातळीवर असणं. इथे दोन घटक आहेत स्त्री आणि पुरुष. हे असे दोन घटक आहेत जे शरीररचना पातळीवर मुळातच भीन्न आहेत. मग अशा दोन घटकांमधे समानता साधताना त्यांच्यातल्या वेगळेपणाचा स्वीकार करुनच बाकी बाबींचा विचार व्हायला हवा. पण बरेचदा होतं काय? आपण समानता आणि आरशातील प्रतिमेइतकी साधर्म्यता यात गल्लत करतो आणि मग हट्टाने वेगळेपणालाही बदलून समान पातळीवर आणायचा अट्टाहास करतो. समानता म्हणजे स्त्रीने पुरुषासारखे किंवा पुरुषाने स्त्रीसारखे होणे नव्हे. समानता म्हणजे स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही घटकांच्या विकासाला पूरक असे निकोप वातावरण निर्माण करणे ज्यायोगे हे दोन्ही घटक त्यांच्या नैसर्गिक क्षमतेनुसार स्वत:ला घडवू शकतील. समानता म्हणजे कोणा एका घटकाला झुकते माप न देणे. समानता म्हणजे समान संधी. गृहव्यवस्थापन ही फक्त स्त्रीयांची जबाबदारी आहे आणि अर्थार्जन हे पुरुषांनी करायलाच हवे असा हट्ट न धरता गृहव्यवस्थापन करणारा पुरूष आणि अर्थार्जन करणारी स्त्री यांचा समाजाने सहजपणे स्वीकार करणं म्हणजे समानता. हक्कांच्या बरोबरीने जबाबदाऱ्यांच्या वाटपातही जी भेदभाव मानत नाही ती असते समानता.
आता समानतेची ही व्याख्या जर बघितली तर खरतर ती समाजसुधारक. मग समानतेमुळे संसार उध्वस्त होतात असा विचार काही अंशी समाजात रुजण्यामागच कारण काय असाव?मला वाटतं त्याच एक कारण हे आपण समानतेकडे बघण्याचा जो दृष्टीकोन आहे त्यात दडलेल आहे. थोडक्यात काय तर आपण चुकीच्या चष्म्यातून बघतो आणि मग चित्र स्पष्ट दिसत नाही अशी तक्रार करत चष्मा न बदलता ते दृष्यच कसं चूक आहे म्हणत त्यावर खापर फोडतो.

आता यातलं दुसरं वर्तुळ बघूया. संसार म्हणजे खरतर इथे नुसते पतीपत्नीच नाही तर सबंध कुटुंब अपेक्षीत आहे. कारण जरी पती पत्नी या संसारातल्या प्रमुख व्यक्तीरेखा असल्या तरी बाकी ‘य’ घटकही त्यावर प्रभाव टाकत असतात. संसार यशस्वी होतो की उध्वस्त हे एकाच नव्हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. तसच दरवेळी कागदोपत्री न मोडलेले संसार हे खऱ्या अर्थाने मनाने एकत्र असतीलच असही नाही पण तरी माननीय जस्टीस वासंती नाईक यांनीही एका समारंभात ‘आजघडीला मुंबई दिल्लीसारख्या शहरांमधली ४०% लग्न ही घटस्फोटाकडे वाटचाल करत असल्याचे’ नमूद केले आहे आणि ही आकडेवारी खरोखर चिंतनीय आहे. यातील आजघडीला हा शब्दही महत्वाचा आहे. याचा अर्थ पूर्वीच्या तुलनेत संसार उध्वस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे हे नक्कीच. मग कारणांचा शोध घ्यायचा झाला तर पूर्वीची समाजव्यवस्था आणि आताची बदललेली परिस्थिती असा संपूर्ण विचार करावा लागेल. हा विषय खूप मोठा असल्याने तूर्तास आपण समानता आणि त्याचा यात असलेला संबंध यापुरता विचार करु. संसाराची दोन चाके म्हणजे पती आणि पत्नी अस म्हणतात. पूर्वी पती अर्थार्जन आणि पत्नी गृहव्यवस्थापन अशी कामांची विभागणी होती. थोडक्यात या दोन चाकांवर जबाबदाऱ्यांचा बोजा तुलनेने समान होता. ज्याला आपण इंग्रजीत division of labour म्हणतो त्यानुसार बऱ्यापैकी समान भार दोन्ही चाकांवर होता. स्त्रीया शिकल्या अर्थार्जनासाठी घराबाहेर पडू लागल्या तेव्हा समाजशास्त्स्त्रीय नियमांनुसार त्यांच्यात सुधारणा झाली खरी. पण या सगळ्यात झाल काय? आपण division of labour चा नियम विसरुन एकाच चाकावर दोन गोष्टींचा भार टाकायला सुरुवात केली. म्हणजे घरच आणि दारचं बघणाऱ्या ‘सुपरवूमन’ सिंड्रोमला आपण जन्म दिला. या सिंड्रोमने जसं स्त्रीचं नुकसान झाल तसच ते पुरुषाचही झालं. परस्परपूरक म्हणजे एकमेकांना पूर्ण करणारे अस नात्याच असलेल स्वरुप हे हळूहळू व्यक्ती स्वयंपूर्ण असण्याकडे झुकायला लागलं. आणि मग त्याचे साईड इफेक्ट्स म्हणून परस्परावलंबी नात्यामधे हेअरलाईन फ्रॅक्चर दिसायला सुरुवात झाली.
पूर्वीचे संसारचित्र जर बारकाईने बघितले तर त्यात अधिकाराच्या उतरंडीत पत्नीचे स्थान कायम दुय्यम होते. कमावत्याच राज्य, पदरी पडलं पवित्र झालं या वाक्प्रचारांच्या उगमातच त्यावेळची परिस्थिती स्पष्ट दिसून येते. बदलत्या काळात ‘मखरातली देवी’, ‘कार्येषु मंत्री..’ या भुमिकेतून बाहेर येत ‘माणूस’ ही ओळख ‘तिने’ आपलीशी केली. ‘ती’ बदलली मात्र ‘तिच्याकडून’ असलेल्या अपेक्षांमधे बदल झाले नाहीत.अगदी घरकामात ‘मदत’ करणाऱ्या पुरुषाचं प्रमाण वाढलं तरी मूळ साचे तेच राहीले. कारण मदत करण म्हणजेच ती मूळ जबाबदारी फक्तं ‘तिची’ आहे हे अधोरेखित करणं झालं. त्याच्यात झालेला हा बदल म्हणूनच स्वागतार्ह्य असला तरी तो अपूर्ण आहे. तसच त्याच्यावरही ‘कर्ता पुरुष’ या अपेक्षेतून आलेलं जोखड योग्य नाही. अमूक एक जबाबदारी ‘तिची’ आणि तमूक एक ‘त्याची’ या विचारसरणीतच बदल होणं अपेक्षित आहे. याची जाणीव ज्या ‘ती आणि तो’ला होत आहे तिथे अजूनही नात्यामधली रचना ही परस्परपूरक आहे. जिथे हे दिसत नाही तिथे मात्र संसार उध्वस्त होत असल्याचे चित्र दिसत आहे. म्हणजेच संसार उध्वस्त होण्याचे मूळ कारण समानता हे नसून ते असमानता हेच आहे किंवा समानतेचे चुकीचे निकष हे आहे.

Happy "संसार उध्वस्त होत असल्याचे" चित्र फक्त 'घटस्फोट' ह्या घटनेवर जे फिक्सेट झाले त्यांना दिसेल. नाहीतर सिनेमात दाखवल्याप्रमाणे त्याला मनाजोगती दुसरी बायको आणि तिला हवी ती नोकरी असं दोघांनी आयुष्याची स्वतःस अनुकूल अशी पुनर्बांधणी केली असंच गोड चित्र दिसेल.

मला एक समजत नाही - पुरूषाकडून अपेक्षा करा इ इ मध्ये त्याला बदलण्यासाठी इंसेंटीव्ह काय आहे? माकड सुद्धा चणे दिल्याशिवाय नवीन करामती शिकत नाही तर सज्ञान मिळवता पुरूष का बदलेल? तिला फारशी पोटगी न देता घालवता येतं आणि दुसरी पटकन मिळते. ती इतकी डिस्पोजिबल आहे तर तिने घरकाम्/मेड इ इ निगोशिएट तिने कशाच्या जोरावर करायचे आहे?

(हे अतिशय अतिशय स्वप्नरंजन)
सीमंतिनी, एक काळ येईल की या माकडाला चणे(इथे चणे म्हणजे त्या पिक्चर मधल्या पुरुषांच्या नजरेत नियमित sxx, नीटनेटका ताजा स्वयंपाक, सामाजिक स्टेटस,घटकाम) मिळणं बंद होईल.या घाटयाच्या सौदयातील तपशील जाणून घेऊन बायका मिळणे बंद होईल.आणि हा दिवस बदला साठी इंसेंटिव्ह ठरेल.
(इथे मी पुरुषांना माकड किंवा सगळे मेले तसेच वगैरे विचार मांडते आहे असे समजू नये.माझ्या आजूबाजूला अनेक रोल मॉडेल पुरुष आहेत, जे आधार बनत आले आहेत.प्रसंगी स्वतःला बदलत आले आहेत.हा लेख, किंवा त्यावरील प्रतिसाद समस्त पुरुषांवर हल्ला मानून इथे न लिहिणे किंवा 'या मेल्या फेमिनाझी असल्याच' मत करून घेणे हा या चर्चेचा पराभव ठरेल.ऍमी सध्या मायबोलीवर लिहीत नाही.तिने यावर खूप वेगळ्या बाजूची लॉजिकल मते मांडली असती.)

सेपिअन्स पुस्तकामध्ये हरारीने पितृसत्ताक पद्धत अधिक यशस्वी का झाली या विषयावर लिहीले आहे आणि त्याच्या मते यामागे कोणतेही ठोस कारण दिसत नाही. I felt like it was a cruel joke played by the history when I read it!
सी, तुझा मुद्दा पटला. जे माझ्या प्रचंड फायद्याचे आहे ते मी सहजासहजी सोडणार नाही. हेच नेमके दिसून येते. सुदैवाने नवीन पिढी थोडीशी या साच्यातून बाहेर पडताना दिसते. ज्यांना (स्त्री पुरुष सर्वच जण) egalitarian (मराठी शब्द?) समाजाचे फायदे लक्षात येतात त्यांनी सद्य व्यवस्थेच्या बाहेर पडत राहणे गरजेचे आहे. ज्यांना हा चॉईस करता येईल त्यांनी तो करावा. जे अजून कोणताही चॉईस करण्याच्या परिस्थितीत नाहीत त्यांना तेवढे स्वातंत्र्य मिळावे यासाठी प्रयत्न करत राहणे हे ही गरजेचे आहे.
शेवटी, there are no good or bad choices - there are only consequences.
There will be a tipping point where the consequences of the patriarchal system will stop being enticing for everyone especially for the men.

पुरूषाकडून अपेक्षा करा इ इ मध्ये त्याला बदलण्यासाठी इंसेंटीव्ह काय आहे? माकड सुद्धा चणे दिल्याशिवाय नवीन करामती शिकत नाही तर सज्ञान मिळवता पुरूष का बदलेल? तिला फारशी पोटगी न देता घालवता येतं आणि दुसरी पटकन मिळते. >> दुसरी (आणि खरं तर पहिलीही) सहजासहजी मिळणं कमी होईल, जर मुलगे बदलले नाहीत तर.

कविन, छान लिहिलं आहेस. 'संसार यशस्वी होणं' हे तसं फसवं वाक्य आहे.जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नहीं. तसंच संसार किती वर्षं टिकला यापेक्षा तो कसा झाला, दोघांना आनंददायी झाला का, हे महत्त्वाचं.

बदला बद्दल लिहि ताना एक चांगली बाब लिहिणे आवश्यक आहे. परवा आमच्याक डे एक नव्या जनरेशन चा पाहु णा आला होता. त्याने जेवण झाल्यावर आवरायला मदत केली व ताट ल्या घासून ठेवल्या. हे तो नेहमीच करतो असे म्हटला. आम्ही देखील हे नॉर्मलच आहे असेच वर्तवले. काही जास्त कौतूक वगैरे केले नाही. विषय संपला . काही नवीन पुरु ष आहेत अशी विचारसरणी असणारे. पण त्यात स्त्री पुरु श असे काही नसून कविन म्हणतात तसे स्वयंपूर्ण व्यक्ती असणे हेच आहे.

कधी तरी ही फ्युडल विचार सरणी मोडीत निघेलच. खरे तर कोणत्याही व्यक्तीने पहिले स्वयं पूर्ण होउन मगच रिलेशन शिप मध्ये गुंतण्याचा विचार शोधावा म्हणजे ती फेल गेल्यास फक्त भावनिक नुकसानच होते आर्थिक व इतर बाबींवर नाही. ह्या सिनेमात तो सासरा म्हणतो ना तुझी सासू डबल ग्रॅजुएट होती पण मी तिला नोकरी करू दिली नाही( घरात कुजवली) आणि पण त्यामुळे मुले चांगली शिकलेली निपजली.!!!

पूर्वी बाल विवाह होत. अ अजूनही होतात च आहेत. त्यात मुलीला शिंगे फुटण्या आधी, प्युबर्टी आधीच तिला घोड नवृयाच्या गळ्यात अडकवीत.
म्हणजे तिने स्वतंत्र पणी काही अनुभव घेणेच ह्या पित्रुसत्ताक पद्धतीस मंजूर नाही. ( हे जग भर आहे अरब टोळ्या/ व्हाइट अमेरिकन / ज्युइश ओर्थोडॉक्स/ चीन जपान कोरिअन सोसायटीज ) सेक्स, आर्थिक स्वातंत्रय आनंद सुखे हे तिला नाहीच म्हणजे गुलामच ती .

दक्षिण कोरिआत ह्या विरुद्ध एक एक्स्त्रीम फेमिनिस्ट चळव ळ उभी आहे. ज्यात उच्च शिक्षित स्त्रिया लग्न संसार मुले सर्व चौकट्च स्वीकारत नाहीत.

पण हे उत्तर नव्हे चांगली गोड रिलेशन शिप उत्तम संसार मुले हे देखील स्त्रीला हवे असते व तिचा हक्क आहे. फक्त त्यात तिच्या मानवी हक्कांची पायमल्ली होउ नये. ती इतके शतके नमते घेत आलेली आहे तर आत दुस र्‍या बाजू ने ही थो डे पाउल उचलावे. ही अपेक्षा रास्त वाट्ते मला.

हो, नवीन पिढीच्या मुलांमध्ये नक्कीच हा चांगला बदल जाणवतो. माझे १५+ वयाचे भाचे स्वैपाकघरात किंवा एकूण घरात मदत करायला पुढे असतात.

तिचे सासरे मला सगळ्यात डेंजरस वाटले .
"मी अजून तोंडही नाही धूतलयं , माझा ब्रशच कोणी आणून दिला नाही "
"तु आज चटणी मिक्सरमध्ये वाटलीस का? बरं बरं ठीक आहे . "
"भात कूकरमध्ये लावलास का ? पातेल्यात करत जा हां "
"आमच्याकडे नोकरी केलेली चालत नाही , बेटा"

प्र्यतेक वेळी ते एक्दम सौम्य आवाजात , हसून बोलतात . कधीही आरडाअओरडा नाही .
अशी लोक जास्त त्रासदायक . तिसर्या माणसाला समोरच्याची घुसमट कळतच नाही .
ईतके चांगले तर आहेत सासू-सासरे , तुला कधी ओरडतात , भांडण करतात ? मग काय त्रास आहे ?

Pages