व्हिसल ब्लोअर-८

Submitted by मोहिनी१२३ on 16 January, 2021 - 13:32

भाग ७-https://www.maayboli.com/node/77860

“खरं सांगू का, याच गोष्टीचा मी गेले काही दिवस विचार करतेय. कदाचित याची पाळंमुळं माझ्या शालेय-महाविद्यालयीन जीवनात सापडतील.” नेहा म्हणाली.

“म्हणजे?”

नेहाने एक लांबलचक सुस्कारा सोडला. “तुला खरचं वेळ आहे का ऐकायला? कारण मी एकदा भूतकाळाबद्द्ल बोलायला लागले की माझे मलाच भान रहात नाही.”

“डोन्ट वरी ,मी माझ्या कामाची सोय लावून आलोय. आणि तू खुपच असंबध्द बोलायला लागलीस तर टोकेन मी तुला” अमोल हसून उद्गगारला.

नेहाने महत्वाचे १-२ फोन करून घेतले. ती दोघांसाठी कॅार्न-स्पिनॅच सॅंडविच घेऊन आली. ते खाता-खाता ती बोलू लागली.

“मी ८ वीत गेल्यापासून मला लोकांसाठी काहीतरी करावे, त्यांना मदत करावी असं वाटू लागले.त्याद्रष्टीने मी काही गोष्टी सुरुही केल्या.१० वी नंतर मी कॅामर्स विद्याशाखेला प्रवेश घेतला.त्यामुळे हातात वेळ भरपूर.पुढे ३-४ वर्ष माझे रोज एक तास सातही दिवस अंध,वृध्द,अपंग,आदिवासी,अनाथ मुले यांच्यासाठी काम करणार्या संस्थांसाठी राखीव होते.खूप हिंडले,शिकले मी त्या काळात. मी जेव्हा पदवीच्या अंतिम वर्षात आले तेव्हा माझा कल लक्षात घेऊन मी पदव्युत्तर शिक्षण समाजसेवेत करावे असा विचार माझ्या घरच्यांनी माझ्यापुढे मांडला.

आम्ही घरचे खाऊन-पिऊन सुखी,पण तेवढेच. आम्हा दोघा भावंडांचा शिक्षणखर्च, इतर हौशी-मौजी करायला आई-वडिलांना किती कष्ट करावे लागत होते,मन मारावे लागत होते हे आम्ही रोज पहात होतो.

समाजसेवेचे शिक्षण घेऊन आपण सेटल होऊ शकणार का?, आपले चांगल्या ठिकाणी लग्न होणार का? असे अनेक विचार माझ्या मनात त्यावेळी येत होते.त्यामुळे त्यावेळी मात्र माझ्या व्यवहारी मध्यमवर्गीय मनाने बाजी मारली आणि मी लवकर अर्थप्राप्ती सुरू करून देऊ शकणार्या कॅाम्प्युटर शाखेत प्रवेश घेतला.

अपेक्षेप्रमाणे मास्टर्स संपता संपता मला एका एमएनसी मध्ये नोकरी लागली.त्यावेळी मी प्रचंड बावळट होते.”

“म्हणजे आत्ता नाहीयस का?” अमोलने उगाच एक पीजे मारून वातावरणातला ताण हलका करायचा प्रयत्न केला.

“ए गप रे” नेहा पुढे बोलू लागली.

“त्यावेळी मला वाटायचं की इतक्या मोठ्या कंपनीत काम करणारी,इतक्या सोयी-सुविधा असणारी लोकं खूप चांगली,मदत करणारी असतील. पण माझा भ्रमनिरास झाला. आपली त्याच कंपनीत ओळख झाली. पण तुम्ही मंडळी वेगळ्या पॅरेंट कंपनीत आणि वेगळ्या मजल्यावर असल्याने आपलं प्रत्यक्ष बोलणं फारसं झालं नाही. पण माझं या कंपनीत लैंगिक शोषण सोडून सर्व प्रकारचं शोषण झालं,अन्याय झाला. काही कर्मचारी फारसं काम न करता सर्व फायदे कसे ओरपून घेतात हे ही जवळून बघितलं.आणि मी प्रचंड सावध झाले.

मी लवकरच ही कंपनी सोडली आणि दुसर्या कंपनीत कामाला चोख पण स्वभावाला पक्की अशी प्रतिमा निर्माण करायचा प्रयत्न केला.या कंपनीतले मॅनेजर्स,सहकारी हे बहुतांशी चांगले होते.पण तरीही काही स्वभावाने भाबड्या असणार्या मॅनेजर्सची,सहकार्यांची टर उडवली जायची.पण मी जाणूनबुजून गप्प रहायचे. कारण आत्ता कुठे मी स्वत:चे रक्षण करायला शिकले होते.

तिसर्या कंपनीत मात्र मी कोणावरही अन्याय झाला की तलवारच उपसायचे.पहिल्यांदा या गोष्टीचे कौतुक झाले. पण लोकं नंतर आडून बोलू लागली. पण मी माझ्या अन्यायनिवारणाच्या धुंदीत या गोष्टीकडे पूर्ण काणाडोळा केला. शेवटी मला लेखी ताकीद मिळाली तेव्हा मी भानावर आले.”

असं म्हणून नेहाने थोडा विराम घेतला. ती थोडं पाणी प्यायली आणि पुढे बोलू लागली.

“म्हणून या कंपनीत आत्तापर्यंत शक्यतो आपण बरं आणि आपलं काम बरं असं वागायचा प्रयत्न करतेय.या सर्व काळात एक आवड म्हणून मानसशास्त्राचा, वेगवेगळ्या सामाजिक कामांचा अभ्यास मात्र बराच केला. आणि कल्पनाच्या प्रकरणात अगदी रहावलेच नाही म्हणून वाचा फोडण्याचा निर्णय घेतला.”

“एवढं बोलून मी माझे २ शब्द संपवते” असं म्हणून नेहा खुद्कन हसली.
गेल्या दीड-पावणेदोन तासांत पहिल्यांदाच तिच्या चेहर्यावर हसू उमलले होते.

अमोल पण हसला आणि बोलू लागला.

“तू लई भारी आहेस. मानलं तुला बॅास. बहुतेकांचा प्रवास संवेदनशीलतेकडून बथ्थडपणाकडे होतो.तुझा मात्र प्रवास डोळस संवेदनशीलतेकडे,दुसर्यांच्या भल्यासाठी उपयुक्त रिस्क घेण्याकडे होतोय.
तूला एकच सांगावसं वाटतयं,भूतकाळात इतकी रमू नकोस. भूतकाळातील समीकरणे वर्तमान,भविष्याला जशीच्या तशी लागू पडतील असं नाही. तुला उद्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुझ्या या लढ्याला साथ म्हणून आजची ट्रीट माझ्याकडून”

एवढं बोलून , दोघांनी एकामेकांचा निरोप घेतला. आजच्या गप्पा कम चर्चेत दोघांनाही खूप काही मिळाले होते. अमोलला आपणही वेळप्रसंगी स्टॅंड घेतला पाहिजे ही टोचणी आणि नेहाला पुढच्या दिवसाला सामोरे जाण्यासाठी लागणारं सामर्थ्य.

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचते आहे. हा भाग आवडला. वैयक्तिक आयुष्यात एखादी घटना घडली म्हणून व्हीसल ब्लोअर होणे असा घिसापीटा फिल्मी फॉर्म्यूला लिहीणे शक्य असताना, हा भाग वास्तवाच्या जवळचा लिहीला त्याबद्दल अभिनंदन. नोकरी व त्यातील बदल सांभाळून आवड म्हणून मानसशास्त्राचा अभ्यास इ. इ. फार मोठा प्रवास आहे. एखादी-एखादीचा पिंडच तसा धडपडा असतो. अशी नायिका लिहीणे कौतुकास्पद आहे. अभिनंदन.

धन्यवाद सीमंतिनी,दीर्घ आणि नेमक्या प्रतिसादाबद्दल.
असे प्रतिसाद लिखाणाची(विशेषत: माझ्यासारख्या नवलेखकांच्या) उमेद वाढवतात. धन्यवाद.

<<<काही कर्मचारी फारसं काम न करता सर्व फायदे कसे ओरपून घेतात हे ही जवळून बघितलं. >>>
हे पाहिले आहे. .
पटला हा भाग. ..
स्वतः अन्याय करायचा नाही आणि स्वतःवरचा अन्याय सहन पण करायचा नाही ही दोन्ही टोके सांभाळून राहिले तरच टिकाव लागतो..