हिरव्या मसाल्यातल्या अमृतसरी वड्या (सांडगे)

Submitted by MazeMan on 13 January, 2021 - 10:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अमृतसरी/इतर कुठल्याही तिखट वड्या/ सांडगे
सुके खोबरे (पाऊण मध्यम वाटी)
कोथिंबीर मुठभर
पुदीना मुठभर
फोडणीसाठी : तेल, जिरे, हळद

क्रमवार पाककृती: 

अमृतसरवरून येताना ट्रीपऍडव्हायजरने सांगितलं म्हणून वड्या घेऊन आलो. त्यांचं काय करायचं माहिती नव्हतंच. आणि पाकीटावर कृती दिली होती त्यामुळे फार R&D पण केली नाही.
एका सुप्रभाती वेगळे काहीतरी हवं होतं त्यामुळे वड्यांचा नंबर लागला. सहज म्हणून वड्यांचे इनग्रेडीयन्टस् आणि कृती (दोन्हींचे स्क्रीनशॉटस् इच्छुकांसाठी दिले आहेत) वाचून पाहीली, एक तुकडा खाऊन पाहीला आणि प्रकरण फारच मसालेदार होईल असं वाटलं. दुसरा काही सौम्य प्रकार घरातील उपलब्ध साहित्यातून करता येईल का याचा शोध सुरू झाला. शेवटी सुकं खोबरं (नारळ नव्हता म्हणून ओलं नाही) , कोथिंबीर आणि पुदीना यावर निभवून न्यायचं ठरवलं. तर ही होती हिरव्या मसाल्याची मजबूरी.

1. वड्या अंगासरशी गरम पाण्यात १५ मिनीटे भिजवून ठेवाव्या. ( पहिल्यावेळी मी न भिजवता फोडणीत टाकल्या होत्या त्यामुळे शिजायला वेळ लागला. यावेळी गरम पाण्याचा उपयोग केला. चवीत फरक जाणवला नाही.)
2. सुकं खोबरं किसून घ्या. पुदीना, कोथिंबीर आणि सुकं खोबरं वाटून घ्या.
3. थोड्या जास्त तेलात जिरं आणि हळदीची फोडणी करून घ्या.
4. फोडणीत हिरवा मसाला परतून घ्या.
5. वड्या आणि त्यातलं पाणी फोडणीत टाका.
6. वरून १-२ कप गरम पाणी टाका आणि एक उकळी येऊ द्या. वरून मीठ टाका.
7. अजून २ उकळ्या येऊ द्या आणि ग्रेवी आटून अंगासरशी झाली की आच बंद करा.
8. लिंबू पिळून चपाती किंवा भाकरीबरोबर आस्वाद घ्या.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

1. सांडगे तिखट नसतील तर मजा येणार नाही कारण वरून लाल तिखट/गरम मसाला/हिरवी मिरची काहीही घातलं नाहीये.
2. वरील मसाल्यात हिरव्या मिरचीची भर घालून घरगुती पार्टी/गेटटुगेदरसाठी थोडी झणझणीत तरीही सोपी डिश करता येऊ शकते.
3. ही डिश पंजाब मित्रमैत्रिणींना खाऊ घातल्यास होणार्या परीणामांची जबाबदारी लेखिका कॅटेगरीकली नाकारते आहे.

माहितीचा स्रोत: 
गरज ही शोधाची जननी असते.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults