फोडणीचा भात - पहिले प्रेम

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 January, 2021 - 13:33

फोडणीचा भात - पहिले प्रेम

फोडणीचा भात कदाचित महाराष्ट्रात सर्वत्र बनवला जात असावा. तरीही मला तो लहानपणापासून खास आमच्या गावचा, आमचा घरचा पदार्थ वाटत आला आहे. कारणही तसेच आहे, माझी जवळपास अख्खी इंजिनीअरींग फोडणीच्या भातावर झाली आहे.
शप्पथ! म्हणजे रोज डबा उघडला की त्यात फोडणीचा भात. तरीही रोजच डबा उघडताच पाच सेकंदातच त्यात दहा हात तुटून पडायचे आणि पंधराव्या सेकंदाला डब्बा रिकामा. फोडणीचा भात या त्याच्या नावाने त्याला कोणी ओळखायचेच नाही. शेजार पाजारच्या क्लासमध्येही तो ऋन्मेषचा भात म्हणूनच ओळखला जायचा. मी सिविलचा. पण ट्रिकल, मॅकेनिकल, आयटी, कॉम्प, सिनिअर ज्युनिअर, मित्र, मित्रांचे मित्र, मला नावेही माहीत नसलेली पोरं, अगदी पोरीसुद्धा माझा डब्बा उघडताना कुठून कुठून हजर व्हायचे. आणि सत्यनारायणाचा मूठभर शिरा खाल्याच्या समाधानात तृप्त व्हायचे.

प्रसिद्धी म्हटले की अफवाही आल्या, सर्वात मोठी अफवा म्हणजे ऋन्मेषच्या आईला चपात्या करता येत नाहीत म्हणून रोज डब्यात फोडणीचा भात देते. अर्थात ही अफवा मीच उडवली होती. पण लोकं या अफवेच्याही ईतके प्रेमात होते की ते म्हणायचे असा भात असेल तर आयुष्यात चपात्यांची गरजच काय. एका अर्थी खरेही होते ते. फोडणीचा भात हे पुर्ण जेवण होते. मला आठवत नाही मी घरीही कधी भाजी चपाती खाऊन मग त्यावर डाळभात खातो तसे फोडणीचा भात खाल्ला. कधीच नाही. जेव्हा फोडणीचा भात असायचा तेव्हा जेवणात फोडणीचा भातच असायचा!

आपण रोज आमरस खाऊ लागलो तर काही दिवसातच कंटाळून जाऊ. भले मग तुम्ही आमरसाचे कितीही का चाहते असेना. पण फोडणीच्या भाताला पुर्ण ईंजिनीअरींगमध्ये मी किंवा माझ्या कुठल्याही मित्राने कधी नकार दिलाय असे अनुभवण्यात आले नाही. ईतकेच नाही तर रोज डब्यात असूनही ईतर दिवशी जेव्हा घरी बनायचा तेव्हा मी तितक्याच उत्कटतेने त्यावर तुटून पडायचो.
तुम्ही रोज एकाच चवीचे सरबत पिऊन कंटाळाल, पण पाण्याला कधीच कंटाळणार नाही. कारण पाण्याला तशी चवच नसते, तसा रंगच नसतो, तसा वासच नसतो. फोडणीच्या भाताबाबतही तो बनताना मस्त घमघमाट सुटला आहे, दिसायला खूप देखणा म्हणजेच तोपासू दिसतोय असे कधी झाले नाही. ताटात घेतल्यावर त्याचा छान फोटो काढावा असे वाटले नाही. पण एकदा ताटात घेतलेला कधी पुरलाच नाही. अगदी पाण्यासारखाच जीवनावश्यक आणि तितकाच अवीट, निर्मळ, स्वतःची एक सादगी बाळगून असलेला असा हा फोडणीचा भात, त्याच्या मी प्रेमात पडलो नसतो तर नवलच.

तर काय असायचे त्या फोडणीच्या भातत.... तर काही नाही !
गरीबांचा, मध्यमवर्गीयांचा समजला जावा असा हा पदार्थ.
ना त्यात भाज्या, ना मांसाचे तुकडे, ना काजू बदाम... थोडेसे तेल, थोडेसे मीठ, थोडा कांदा आणि घरचा मसाला ! नावाला थोडासा लसूण कडीपत्ता असायचा तो देखील कधी घाईगडबडीत खाताना कोणाच्या पोटात जायचा ते समजायचेही नाही Happy

त्यात हा फोडणीचा भात प्रामुख्याने शिळ्या भाताचा केला जायचा. आता मजा शिळ्या भतातच असली तरी त्यामुळे त्यावरचा मध्यमवर्गीय असल्याचा शिक्का आणखी ठळक व्हायचा. पण जिथे शौकच फोडणीच्या भाताचे असायचे तिथे रात्रीच्या जेवणात मुद्दामच गरज नसताना जास्तीचा भात लावला जायचा Happy

पण फोभाच्या याच वैशिष्ट्यामुळे कोणी कोणाला घरी जेवायला बोलावलेय, आणि फोडणीचा भात खाऊ घालतेय असे सहसा होत नाही...

आणि झालेच तर समजून जावे की त्या दोंघांत विशेष जिव्हाळ्याचे नाते आहे Happy

तसे तर फोडणीचा भात स्वयंपुर्ण असतो. तरी त्यासोबत तोंडी लावायच्या माझ्या आवडीच्या पदार्थांमध्ये येते - ऑमलेट (अर्थातच अंड्याचे), सुके भाजलेले बोंबील, किंवा बोंबील बटाटा, पिवळी बटाट्याची भाजी किंवा बटाटावडा, काळ्या वाटाण्याची घट्ट उसळ, सुके चिकन-मटण ईत्यादी ईत्यादी.. आणि हे रोजच माझ्या डब्यात दिलेही जायचे.

यात पापडाचे नाव मुद्दाम घेतले नाही कारण ते कंपलसरी होते. एखादा नाही तर रोज चारपाच पापड असायचे. त्याचा डबा वेगळाच असायचा. आणि फोडणीच्या भाताचा डबा उघडायच्या आधी लोकं पापडाचा फडशा पाडून वा ते हातात घेऊन तयार असायचे.

एक माझी वेगळी आवड म्हणजे ऑमलेट असले की मला सोबत तांबाट्याचा सॉसही आवडायचा. फोभा, ऑमलेट आणि सॉस हे त्रिकूट माझ्या फार आवडीचे होते. लोणचे मात्र मी फोडणीच्या भातासोबत कधीच खाल्ले नाही. त्यातले घटकपदार्थ मसाला आणि तेल हे सारखेच असल्याने मला फोभा-लोणचे हे कॉम्बिनेशन कधी जमलेच नाही.

बाकी हे वरीलपैकी नेहमीचे यशस्वी कलाकार नसले आणि दुसरीच एखादी भाजी असली तरी ती आवडीने खाल्ली जायची. पण मग सोबत ताक असणे आवश्यकच. मस्त मसालेदार फोडणीचा प्लेट भरून भात खावा, मग त्यावर ग्लासभर ताक प्यावे. मग पुन्हा हेच, मग पुन्हा हेच. असे पोटभरेपर्यंत छोटे छोटे राऊंड घ्यावेत. जेव्हा मला कॉलेजला सुट्टी पडायची, तेव्हा माझी ईतकी सोय करून आई निर्धास्त ऑफिसला जायची.

आज त्या बिर्याणीच्या धाग्यावर कोणीतरी मला म्हटले, अहो बिर्याणी वेगळी असते आणि फोडणीचा भात वेगळा असतो...
तेव्हाही मी हेच म्हटले,

फोडणीचा भात माझे पहिले प्रेम आहे. कित्येक बिर्याणीज ओवाळून टाकेन मी त्यावरून ...

आणि हे खरेच आहे

सौ बात की एक बात - बिर्याणी असेलही माझे क्रश. पण फोडणीच्या भाताला कोणी स्त्रीचे रूप दिले असते तर ती माझी आई असती, ती माझी पत्नी असती, ती माझी बहीण असती, ती माझी मुलगी असती Happy

आणि हे सुद्धा खरेच आहे Happy

- धन्यवाद
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही ऑटाफे आहे फोभा. ( 'फोभा' म्हटलं की जास्त प्रेम येतं). मला किंचित साखर , कमी तिखट आणि मूड असेल तर ताजे मटार हे कॉम्बो लै म्हणजे लै आवडतं.

थोडेसे तेल, थोडेसे मीठ, थोडा कांदा आणि घरचा मसाला ! >>> हेही करायचा कंटाळा आला असेल किंवा वेळ नसेल तर भात त्यावर मसाला(घरची चटणी) आणि तेल घालून खायला खूप आवडते.

E5999A01-331C-4588-B788-CC338A3DFD13.jpeg

त्यावर मसाला(घरची चटणी) आणि तेल घालून खायला खूप आवडते.
>>>>>
कच्चे तेल, मसाला आणि कांदा एकत्र करून माझे वडील ते तांदळाच्या भाकरीसोबत खायचे ते आठवले.
बाकी फोभामध्ये फाफटपसारा कमीच असावा. हे माझे मत

फो भा वरून भा वर चाल्लंय आता. हरकत नाही. जगातला श्रेष्ठ पदार्थ आहे तो. बिर्याणी आणि फोभाचा लसावि "भात" च आहे म्हणा.

फोभा, ऑमलेट आणि सॉस हे माझ्या नवऱ्याचे हि favorite combination आहे .
माझाही आवडता आहे फोभा पण हिरवी मिरचीपेक्षा लाल तिखट जास्त आवडते सोबत दही !!

फोडणीचा भात माझाही आवडता. मला त्याच्याबरोबर काही तरी कुरकुरीत आवडतं. शेव, फरसाण वगैरे. पापड कधी खाल्ला नाही फोभाबरोबर. पण आवडेल.
माझ्या जास्त आवडीचा प्रकार म्हणजे तेल-तिखट-मीठ-भात. हे सगळं कच्चं. दुपारच्या उरलेल्या भातात संध्याकाळी थोडं तिखटमीठ कालवून वर थोडं कच्चं तेल घालून कालवायचं. हे बेसिक. यात कांदा बारीक चिरून घातला की आणखी चांगलं. वर शेव/फरसाण असलं की आणखी चव वाढते. पण हे काही नसेल तरी बेसिक चवही मस्तच असते.

> हेही करायचा कंटाळा आला असेल किंवा वेळ नसेल तर भात त्यावर मसाला(घरची चटणी) आणि तेल घालून खायला खूप आवडते. आम्ही लहान पणापासून असच फोभा खातो आणि मला तसाच आवडतो आताही सकाळी मी नाश्त्याला असाच खाऊन जाते कधी तरी.

आज त्या बिर्याणीच्या धाग्यावर कोणीतरी मला म्हटले, अहो बिर्याणी वेगळी असते आणि फोडणीचा भात वेगळा असतो...>> ..आणि तुम्ही धागा काढलापण! छान.
आता माझेही २ शब्द: फो.भा.बरोबर चिवडा किंवा फरसाण. अप्रतीम चव!!

फो.भा.बरोबर चिवडा किंवा फरसाण. अप्रतीम चव!!
>>>>>>
हो, असा रावडाचिवडा माझ्याही आवडीचा.
एका डु आयडीने मी यावर धागाही काढलेला ::)

पाककृती - रावडाचिवडा (पाककौशल्यात "ढ" असलेल्यांसाठी)
https://www.maayboli.com/node/48902

चित्रान्न नुसते किंवा दह्या सोबत अवडतेच.
त्यात अंडाकरी किंवा चिकन करी कालवून खायची. मस्त लागते.

दही बुत्ती यात फोडणी असते, वरून तळलेल्या दही मिरच्या कुस्करून टाकायच्या.

अगदींच पहिलं प्रेम नसलं तरीही फोभा खूप आवडीचा. लाॅकडाऊनमधे कांहीं काळ घरीं एकटाच अडकलो, त्यामूळे प्रेमाच्या क्रमवारीत आतां आणखीनच वर आलेला !
विविध प्रकारे मीं करतो पण आवडीची क्रमवारी अशी -
1 . थोडे उकडलेले मटार टाकून वर खोवरं व कोथिंबीर पेरलेले ( या सादरीकरणामुळे ' दिसायला खूप देखणा म्हणजेच तोपासू दिसतोय असे कधी झाले नाही ' याच्याशी असहमत Wink )
2. वर ऑम्लेटचे छोटे तुकडे पेरून. सोबत साॅस
3. सोबत बटाटा किंवा सूरणाचे 'शॅलो फ्राय 'काप अथवा पापड.
टीप - कधीं उरलेला भात कमी असेल तर भरीला पोहे व्यवस्थित भिजवून भातात फोडणी देतानाच मिसळावे. बेमालूम मिसळतात व textureही सुधारतं.

मला लिहायचं आहे इथे. उद्या लिहिते आता झोप आलीये
उद्या ताज्या भाताचा फोभा करेन आणि मुलाला खाऊ घालेन. लिगसी पुढे चालवायलाच हवी

मलाही फोभा फार आवडतो .

मोहरी , कांदा,हळद आणि हवी असेल तर हिरवी मिरची , मला मिरची नसेल तरी चालते.
फोडणीला हळद कणभर जास्त घालायची , चव लागली पाहिजे आणि कांदा अगदी बारीक चिरायचा नाही आणि मउ करायचा नाही . करकरीत लागला पाहिजे थोडा .
दूसरी पद्धत म्हणजे फक्त तिखट आणि लसूण फोडणीला . बाकी फाफटपसारा काही नाही .

सोबत पापड आणि लोणचं . बस्स्स्स .

रिया, ताज्या भाताचा लगेच नीट नाही होत फोभा. जरा मोकळा करून घे.

मी शाही फोभा आणि फोपो पण करते कधीकधी.
फोडणीत कां, मिरची, दाणे, कढीपत्ता, टाॅ, मटार. आणि वरून लिंबू. कोथींबीर, ओलं खोबरं पण ....भारी लागतो.

मला ही जाम म्हणजे जामच आवडतो फोडणीचा भात.

नोकरीत असताना proper पोळी भाजी चा डबा करणं कधी शक्य नसेल तर lounge मध्ये जेवण्या ऐवजी मी हा भात प्रिफर करत असे.

आमचा वेस्वार, लाल तिखट ,मीठ (नो साखर ) आणि फोडणीत कांदा आणि थोडी लसूण ...अप्रतिम लागतो . जोडीला लोणचं दही ..जेवणच होत.

भाऊ म्हणालेत तस भात कमी असेल तर पोहे भिजवून बेस्ट लागतात.

मलाही आवडतो फो भा
वरच्या बर्याचजणींना मम ! लाल तिखट लसूण, कांदा,दाणे कढीपत्ता.. कधीतरी त्यात मेतकूट, दाण्याचा कुट घालून साखि सारखा आणि हो भरपूर कोथिंबीर आणि त्यासोबत काहीतरी क्रंची हवच.. चिप्स, फरसाण , शेव, पापड इ
ममो, भाऊ मी पण पोहे घालते भिजवून भात कमी असेल तर

*तसे तर फोडणीचा भात स्वयंपुर्ण असतो* -

' रोज उत्तम स्वयंपाक करून वाढेल तुम्हाला माझी लेक !', असंच सांगितलं होतं ना माझ्या आईने. मग, रोज फोडणीचा भातच कां, असं आतां कां विचारताय !!20190930_223510_5.jpg

हा हा.
मागे ही एकदा एकाजणाने वडपावाबद्दल लिहिताना "वडापाव हे संपूर्ण अन्न आहे" असे ठोकून दिले होते ऑर्कुटवर. ऋन्मेषच होता की काय आठवत नाही.

मेधा, मी ताजा भात गार करून मगच करते त्याचा फोभा. पण ताज्या भातात तूप मीठ आणि कांदा लसूण मसाला घालायचा आणि मग तो भात फोडणी मध्ये घालायचा . हे पण करून बघा! भयंकर मस्त लागतो!

मागे ही एकदा एकाजणाने वडपावाबद्दल लिहिताना "वडापाव हे संपूर्ण अन्न आहे" असे ठोकून दिले होते ऑर्कुटवर. ऋन्मेषच होता की काय आठवत नाही.
>>>>>>>.
मी एकदा मिसळपावबद्दल असे लिहिल्याचे पक्के आठवतेय. वडापावचे नक्की आठवत नाही. पण दोन वड्यासोबत चार पाव लाऊन खाल्ले तर त्याला लंच म्हणू शकतो.
फोडणीचा भात मात्र दिवसाचे पाचही वेळा कधीही कितीही खाऊ शकतो.

आईने फोडणीचा भात बनवला की भातापेक्षा लोखंडी कढईला लागलेली खरवड खाण्यासाठी आम्हा भावंडांची चढाओढ असायची. स्वतः कितिही वेळा बनवला तरी आईच्या हातची सर येत नाही.

येस्स.. शेवटच्या प्लेटवर कढई खरडवून तो एक्स्ट्रा फ्राय कडक क्रिस्पी मालमसाला पोह्यावर खोबरे टाकल्यासारखे पसरवणे हे माझ्याही आवडीचे Happy

त्यापेक्षा २-४ वडापावच खावेत ना पोटभरेपर्यंत
>>>>
हो पण त्यात पैसे जास्त जातात. ते नसतील आणि पोट भरायचे असेल तर पाव जास्त खाणे सोयीचे पडते.

अधिक माहितीसाठी हि कथा वाचा

पाच आदमी... एक उस्सल... और पाव नही... ?

https://www.maayboli.com/node/33981

Pages