फोडणीचा भात - पहिले प्रेम

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 January, 2021 - 13:33

फोडणीचा भात - पहिले प्रेम

फोडणीचा भात कदाचित महाराष्ट्रात सर्वत्र बनवला जात असावा. तरीही मला तो लहानपणापासून खास आमच्या गावचा, आमचा घरचा पदार्थ वाटत आला आहे. कारणही तसेच आहे, माझी जवळपास अख्खी इंजिनीअरींग फोडणीच्या भातावर झाली आहे.
शप्पथ! म्हणजे रोज डबा उघडला की त्यात फोडणीचा भात. तरीही रोजच डबा उघडताच पाच सेकंदातच त्यात दहा हात तुटून पडायचे आणि पंधराव्या सेकंदाला डब्बा रिकामा. फोडणीचा भात या त्याच्या नावाने त्याला कोणी ओळखायचेच नाही. शेजार पाजारच्या क्लासमध्येही तो ऋन्मेषचा भात म्हणूनच ओळखला जायचा. मी सिविलचा. पण ट्रिकल, मॅकेनिकल, आयटी, कॉम्प, सिनिअर ज्युनिअर, मित्र, मित्रांचे मित्र, मला नावेही माहीत नसलेली पोरं, अगदी पोरीसुद्धा माझा डब्बा उघडताना कुठून कुठून हजर व्हायचे. आणि सत्यनारायणाचा मूठभर शिरा खाल्याच्या समाधानात तृप्त व्हायचे.

प्रसिद्धी म्हटले की अफवाही आल्या, सर्वात मोठी अफवा म्हणजे ऋन्मेषच्या आईला चपात्या करता येत नाहीत म्हणून रोज डब्यात फोडणीचा भात देते. अर्थात ही अफवा मीच उडवली होती. पण लोकं या अफवेच्याही ईतके प्रेमात होते की ते म्हणायचे असा भात असेल तर आयुष्यात चपात्यांची गरजच काय. एका अर्थी खरेही होते ते. फोडणीचा भात हे पुर्ण जेवण होते. मला आठवत नाही मी घरीही कधी भाजी चपाती खाऊन मग त्यावर डाळभात खातो तसे फोडणीचा भात खाल्ला. कधीच नाही. जेव्हा फोडणीचा भात असायचा तेव्हा जेवणात फोडणीचा भातच असायचा!

आपण रोज आमरस खाऊ लागलो तर काही दिवसातच कंटाळून जाऊ. भले मग तुम्ही आमरसाचे कितीही का चाहते असेना. पण फोडणीच्या भाताला पुर्ण ईंजिनीअरींगमध्ये मी किंवा माझ्या कुठल्याही मित्राने कधी नकार दिलाय असे अनुभवण्यात आले नाही. ईतकेच नाही तर रोज डब्यात असूनही ईतर दिवशी जेव्हा घरी बनायचा तेव्हा मी तितक्याच उत्कटतेने त्यावर तुटून पडायचो.
तुम्ही रोज एकाच चवीचे सरबत पिऊन कंटाळाल, पण पाण्याला कधीच कंटाळणार नाही. कारण पाण्याला तशी चवच नसते, तसा रंगच नसतो, तसा वासच नसतो. फोडणीच्या भाताबाबतही तो बनताना मस्त घमघमाट सुटला आहे, दिसायला खूप देखणा म्हणजेच तोपासू दिसतोय असे कधी झाले नाही. ताटात घेतल्यावर त्याचा छान फोटो काढावा असे वाटले नाही. पण एकदा ताटात घेतलेला कधी पुरलाच नाही. अगदी पाण्यासारखाच जीवनावश्यक आणि तितकाच अवीट, निर्मळ, स्वतःची एक सादगी बाळगून असलेला असा हा फोडणीचा भात, त्याच्या मी प्रेमात पडलो नसतो तर नवलच.

तर काय असायचे त्या फोडणीच्या भातत.... तर काही नाही !
गरीबांचा, मध्यमवर्गीयांचा समजला जावा असा हा पदार्थ.
ना त्यात भाज्या, ना मांसाचे तुकडे, ना काजू बदाम... थोडेसे तेल, थोडेसे मीठ, थोडा कांदा आणि घरचा मसाला ! नावाला थोडासा लसूण कडीपत्ता असायचा तो देखील कधी घाईगडबडीत खाताना कोणाच्या पोटात जायचा ते समजायचेही नाही Happy

त्यात हा फोडणीचा भात प्रामुख्याने शिळ्या भाताचा केला जायचा. आता मजा शिळ्या भतातच असली तरी त्यामुळे त्यावरचा मध्यमवर्गीय असल्याचा शिक्का आणखी ठळक व्हायचा. पण जिथे शौकच फोडणीच्या भाताचे असायचे तिथे रात्रीच्या जेवणात मुद्दामच गरज नसताना जास्तीचा भात लावला जायचा Happy

पण फोभाच्या याच वैशिष्ट्यामुळे कोणी कोणाला घरी जेवायला बोलावलेय, आणि फोडणीचा भात खाऊ घालतेय असे सहसा होत नाही...

आणि झालेच तर समजून जावे की त्या दोंघांत विशेष जिव्हाळ्याचे नाते आहे Happy

तसे तर फोडणीचा भात स्वयंपुर्ण असतो. तरी त्यासोबत तोंडी लावायच्या माझ्या आवडीच्या पदार्थांमध्ये येते - ऑमलेट (अर्थातच अंड्याचे), सुके भाजलेले बोंबील, किंवा बोंबील बटाटा, पिवळी बटाट्याची भाजी किंवा बटाटावडा, काळ्या वाटाण्याची घट्ट उसळ, सुके चिकन-मटण ईत्यादी ईत्यादी.. आणि हे रोजच माझ्या डब्यात दिलेही जायचे.

यात पापडाचे नाव मुद्दाम घेतले नाही कारण ते कंपलसरी होते. एखादा नाही तर रोज चारपाच पापड असायचे. त्याचा डबा वेगळाच असायचा. आणि फोडणीच्या भाताचा डबा उघडायच्या आधी लोकं पापडाचा फडशा पाडून वा ते हातात घेऊन तयार असायचे.

एक माझी वेगळी आवड म्हणजे ऑमलेट असले की मला सोबत तांबाट्याचा सॉसही आवडायचा. फोभा, ऑमलेट आणि सॉस हे त्रिकूट माझ्या फार आवडीचे होते. लोणचे मात्र मी फोडणीच्या भातासोबत कधीच खाल्ले नाही. त्यातले घटकपदार्थ मसाला आणि तेल हे सारखेच असल्याने मला फोभा-लोणचे हे कॉम्बिनेशन कधी जमलेच नाही.

बाकी हे वरीलपैकी नेहमीचे यशस्वी कलाकार नसले आणि दुसरीच एखादी भाजी असली तरी ती आवडीने खाल्ली जायची. पण मग सोबत ताक असणे आवश्यकच. मस्त मसालेदार फोडणीचा प्लेट भरून भात खावा, मग त्यावर ग्लासभर ताक प्यावे. मग पुन्हा हेच, मग पुन्हा हेच. असे पोटभरेपर्यंत छोटे छोटे राऊंड घ्यावेत. जेव्हा मला कॉलेजला सुट्टी पडायची, तेव्हा माझी ईतकी सोय करून आई निर्धास्त ऑफिसला जायची.

आज त्या बिर्याणीच्या धाग्यावर कोणीतरी मला म्हटले, अहो बिर्याणी वेगळी असते आणि फोडणीचा भात वेगळा असतो...
तेव्हाही मी हेच म्हटले,

फोडणीचा भात माझे पहिले प्रेम आहे. कित्येक बिर्याणीज ओवाळून टाकेन मी त्यावरून ...

आणि हे खरेच आहे

सौ बात की एक बात - बिर्याणी असेलही माझे क्रश. पण फोडणीच्या भाताला कोणी स्त्रीचे रूप दिले असते तर ती माझी आई असती, ती माझी पत्नी असती, ती माझी बहीण असती, ती माझी मुलगी असती Happy

आणि हे सुद्धा खरेच आहे Happy

- धन्यवाद
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्रीज चा शू रॅक??
जुन्या लोकांना वस्तूंचा मोह सुटत नाही हेच खरे.

आमच्या घरात जुन्या डेस्कटॉप कॉम्प्युटरचा टेबल शू रॅक म्हणून वापरतात.

आमच्याघरी तर शू रॅकला मुलांच्या खेळण्याचे कपाट करत होते. कारण नवीन घरात सेफटी डोअरसोबत शू रॅकसुद्धा बनवलेला मग आधीच्या चांगल्या स्थितीत असलेल्या शू रॅकचे करायचे काय.. पण मी शू रॅक म्हणून वापरलेले कपाट आता घरात पोरांसाठी नको म्हणून विरोध केल्याने तो कामवाल्या मावशींना दिला आणि त्या तो शू रॅक म्हणूनच वापरतील हे कन्फर्म करूनच दिला.

बाकी वस्तू फुकट घालवू नयेत. पुनर्वापर होत असेल तर करावाच. जर फोडणीचा भात हे याचेच उदाहरण असेल तर मी पुन्हा नव्याने त्याच्या प्रेमात पडेन असे वाटतेय Happy

चहा चपाती हा गावचे लोक , शेतकरी ह्यांचा नेहमीचा नास्ता आहे
>>>>

तुमचे गाव कुठचे आहे यावर ते अवलंबून आहे.
आमच्या गावी घावणे करतात चहासोबत

घावणे , पोहे, उपिट करावे लागतात

सकाळी डब्याला पोळी करतच असतात , ते वेगळे करावे लागत नाहीत , म्हणून हा प्रकार रुजला असावा

लहान मासे जसे वाकटी , बला , बोइट , कालेटं , निवटे , बगा आणि बरेच अतिशय म्हणजे अतिशय सुंदर लागतात चविला. आणि ज्याना यांची चव लागलेली असते ते पापलेट , सुरमई कड़े ऑप्शन नसेल तर च पाहतात..
अगदी खरय. ह्याची चव एकदा का जिभेला लागली तर खरा खवैय्या, बाकीच्या पापलेट वगैरे कडे अगदीच नाईलाज झाला तरच पहातो.

सकाळी डब्याला पोळी करतच असतात , ते वेगळे करावे लागत नाहीत , म्हणून हा प्रकार रुजला असावा
>>>>
चहा चपाती माझी कॉलेजला जाताना फार आवडीची होती. फक्त कंडीशन्स अप्प्लाय होत्या. म्हणजे तव्यावरून थेट ताटात यायला हवी. म्हणजे मी चार खाणार असलो तर आई सात भाजायच्या शिल्लक ठेवायची. जेणेकरून एक सोडून एक माझ्या ताटात गरमागरम येईल. ताटात आल्या आल्या त्यावर अमूल बटर चमचाभर फिरवून ती छान ओली करायची. मग त्याचा एकेक तुकडा करून द्रोण तयार करायचा आणि चहात बुडवून त्या द्रोणात चहा भरून खायची.

लहान मासे जसे वाकटी , बला , बोइट , कालेटं , निवटे , बगा आणि बरेच अतिशय म्हणजे अतिशय सुंदर लागतात चविला. आणि ज्याना यांची चव लागलेली असते ते पापलेट , सुरमई कड़े ऑप्शन नसेल तर च पाहतात..
>>>>>>>

थोडक्यात ,
पापलेट सुरमई ---------------- चिकन बिर्याणी
लहान मासे जसे वाकटी , बला , बोइट , कालेटं , निवटे , बगा -------------- फोडणीचा भात Happy

ॠला हाणा. रसभरीत वर्णनांनी भूक लागते हो.
बटर, चपाती ऐकूनही वजन वाढल्याचा भास होतोय Happy

दिवे दिवे दिवे

फोडणीचा भात मी कधीच करत नाही..लहानपणी आई करायची तेव्हा खायचे आताही माहेरी गेल्यावर खाते..आवडता/नावडता असं काही नाही...
बाकी लेमन राईस, टैमरिंड राईस, टोमॅटो राईस, कोकोनट राईस, फ्राईड राईस असे प्रकार ताज्या भाताचे करते..

एक जीरा फ्राईड राईस नावाचा प्रकार असतो, हॉटेल मध्ये. म्हणजे एक प्रकारचा फोडणीचा भातच. महाराष्ट्रात खूप चालतो. खूप लोक ऑर्डर करतात, आणि प्लेन राईस मागितला की पूर्वी बरेच वेटर फ्राईड राईस घ्या की म्हणायचे. रोटी वगैरे खाऊन झाल्यावर शेवटी राईस मागवतो तेव्हा हा जीरा फ्राईड राईस सहसा मागवला जातो. तो हा जीरा फ्राईड राईस काही फारसा आवडला नाही, तरी या एकंदरीत नसलेल्या दबावाखाली मी तो ऑर्डर केला काही वेळा आणि मग लक्षात आलं आपण आवडत नाही तरी उगाच शेवटी हा तेलकट भात ऑर्डर करतोय. आणि मग प्लेन राईसच ऑर्डर करू लागतो.

व्हेज, चिकन, एग, प्रॉन्स फ्राईड राईस खाणं वेगळं, तेव्हा मी तरी रोटी बीटी असं काही खात नाही, फक्त फ्राईड राईस सोबत चिकन मंचुरीयन ग्रेव्ही.

(*हा जीरा फ्राईड राईस काही फारसा आवडला नाही* - याबरोबर ' डाल फ्राय ' व पापड ट्राय करून पहा. तें काॅबिनेशन प्रचलित आहे)

हॉटेलात जीरा राईस फार गचाळ मिळतो. तेल वा काय माहीत नाही पण ईतका हेवी असतो की चार घासात पोट जड झाल्यासारखे वाटते. याऊलट घरी बायको तव्यावरच भाताला जिर्‍याची हलकीशी फोडणी देते त्यात असेल्ल ती भाजी डाळ रायता लोणचे वगैरे मिक्स करून खातो, बरे वाटते..

हॉटेलमध्ये भाज्या व भात बनवताना सोडा घालतात. त्यामुळे थोडे खाल्ले की पोट भरल्यसारखे वाटते.

आज वर्क फ्रॉम होम करता करता मला अचानक कडाडून भूक लागल्याने बायकोने फक्त १२ मिनिटात चाईनीज ईस्टाईल फोडणीचा भात केला Happy

1610729454311.jpg

.

1610729490267.jpg

रात्री राहिलेल्या भाताला दुसऱ्या दिवशी सकाळी फोडणी देऊन बनवलेला भात म्हणजेच शिळा भात. याला फोडणीचा भात असेही म्हणतात. मला हा भात खूपच आवडतो. लहानपणी काहीच खायची ईच्छा नसली तरी शिळ्या भाताचं नाव ऐकताच पोटात कावळे ओरडायचे.

Pages