फोडणीचा भात - पहिले प्रेम

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 January, 2021 - 13:33

फोडणीचा भात - पहिले प्रेम

फोडणीचा भात कदाचित महाराष्ट्रात सर्वत्र बनवला जात असावा. तरीही मला तो लहानपणापासून खास आमच्या गावचा, आमचा घरचा पदार्थ वाटत आला आहे. कारणही तसेच आहे, माझी जवळपास अख्खी इंजिनीअरींग फोडणीच्या भातावर झाली आहे.
शप्पथ! म्हणजे रोज डबा उघडला की त्यात फोडणीचा भात. तरीही रोजच डबा उघडताच पाच सेकंदातच त्यात दहा हात तुटून पडायचे आणि पंधराव्या सेकंदाला डब्बा रिकामा. फोडणीचा भात या त्याच्या नावाने त्याला कोणी ओळखायचेच नाही. शेजार पाजारच्या क्लासमध्येही तो ऋन्मेषचा भात म्हणूनच ओळखला जायचा. मी सिविलचा. पण ट्रिकल, मॅकेनिकल, आयटी, कॉम्प, सिनिअर ज्युनिअर, मित्र, मित्रांचे मित्र, मला नावेही माहीत नसलेली पोरं, अगदी पोरीसुद्धा माझा डब्बा उघडताना कुठून कुठून हजर व्हायचे. आणि सत्यनारायणाचा मूठभर शिरा खाल्याच्या समाधानात तृप्त व्हायचे.

प्रसिद्धी म्हटले की अफवाही आल्या, सर्वात मोठी अफवा म्हणजे ऋन्मेषच्या आईला चपात्या करता येत नाहीत म्हणून रोज डब्यात फोडणीचा भात देते. अर्थात ही अफवा मीच उडवली होती. पण लोकं या अफवेच्याही ईतके प्रेमात होते की ते म्हणायचे असा भात असेल तर आयुष्यात चपात्यांची गरजच काय. एका अर्थी खरेही होते ते. फोडणीचा भात हे पुर्ण जेवण होते. मला आठवत नाही मी घरीही कधी भाजी चपाती खाऊन मग त्यावर डाळभात खातो तसे फोडणीचा भात खाल्ला. कधीच नाही. जेव्हा फोडणीचा भात असायचा तेव्हा जेवणात फोडणीचा भातच असायचा!

आपण रोज आमरस खाऊ लागलो तर काही दिवसातच कंटाळून जाऊ. भले मग तुम्ही आमरसाचे कितीही का चाहते असेना. पण फोडणीच्या भाताला पुर्ण ईंजिनीअरींगमध्ये मी किंवा माझ्या कुठल्याही मित्राने कधी नकार दिलाय असे अनुभवण्यात आले नाही. ईतकेच नाही तर रोज डब्यात असूनही ईतर दिवशी जेव्हा घरी बनायचा तेव्हा मी तितक्याच उत्कटतेने त्यावर तुटून पडायचो.
तुम्ही रोज एकाच चवीचे सरबत पिऊन कंटाळाल, पण पाण्याला कधीच कंटाळणार नाही. कारण पाण्याला तशी चवच नसते, तसा रंगच नसतो, तसा वासच नसतो. फोडणीच्या भाताबाबतही तो बनताना मस्त घमघमाट सुटला आहे, दिसायला खूप देखणा म्हणजेच तोपासू दिसतोय असे कधी झाले नाही. ताटात घेतल्यावर त्याचा छान फोटो काढावा असे वाटले नाही. पण एकदा ताटात घेतलेला कधी पुरलाच नाही. अगदी पाण्यासारखाच जीवनावश्यक आणि तितकाच अवीट, निर्मळ, स्वतःची एक सादगी बाळगून असलेला असा हा फोडणीचा भात, त्याच्या मी प्रेमात पडलो नसतो तर नवलच.

तर काय असायचे त्या फोडणीच्या भातत.... तर काही नाही !
गरीबांचा, मध्यमवर्गीयांचा समजला जावा असा हा पदार्थ.
ना त्यात भाज्या, ना मांसाचे तुकडे, ना काजू बदाम... थोडेसे तेल, थोडेसे मीठ, थोडा कांदा आणि घरचा मसाला ! नावाला थोडासा लसूण कडीपत्ता असायचा तो देखील कधी घाईगडबडीत खाताना कोणाच्या पोटात जायचा ते समजायचेही नाही Happy

त्यात हा फोडणीचा भात प्रामुख्याने शिळ्या भाताचा केला जायचा. आता मजा शिळ्या भतातच असली तरी त्यामुळे त्यावरचा मध्यमवर्गीय असल्याचा शिक्का आणखी ठळक व्हायचा. पण जिथे शौकच फोडणीच्या भाताचे असायचे तिथे रात्रीच्या जेवणात मुद्दामच गरज नसताना जास्तीचा भात लावला जायचा Happy

पण फोभाच्या याच वैशिष्ट्यामुळे कोणी कोणाला घरी जेवायला बोलावलेय, आणि फोडणीचा भात खाऊ घालतेय असे सहसा होत नाही...

आणि झालेच तर समजून जावे की त्या दोंघांत विशेष जिव्हाळ्याचे नाते आहे Happy

तसे तर फोडणीचा भात स्वयंपुर्ण असतो. तरी त्यासोबत तोंडी लावायच्या माझ्या आवडीच्या पदार्थांमध्ये येते - ऑमलेट (अर्थातच अंड्याचे), सुके भाजलेले बोंबील, किंवा बोंबील बटाटा, पिवळी बटाट्याची भाजी किंवा बटाटावडा, काळ्या वाटाण्याची घट्ट उसळ, सुके चिकन-मटण ईत्यादी ईत्यादी.. आणि हे रोजच माझ्या डब्यात दिलेही जायचे.

यात पापडाचे नाव मुद्दाम घेतले नाही कारण ते कंपलसरी होते. एखादा नाही तर रोज चारपाच पापड असायचे. त्याचा डबा वेगळाच असायचा. आणि फोडणीच्या भाताचा डबा उघडायच्या आधी लोकं पापडाचा फडशा पाडून वा ते हातात घेऊन तयार असायचे.

एक माझी वेगळी आवड म्हणजे ऑमलेट असले की मला सोबत तांबाट्याचा सॉसही आवडायचा. फोभा, ऑमलेट आणि सॉस हे त्रिकूट माझ्या फार आवडीचे होते. लोणचे मात्र मी फोडणीच्या भातासोबत कधीच खाल्ले नाही. त्यातले घटकपदार्थ मसाला आणि तेल हे सारखेच असल्याने मला फोभा-लोणचे हे कॉम्बिनेशन कधी जमलेच नाही.

बाकी हे वरीलपैकी नेहमीचे यशस्वी कलाकार नसले आणि दुसरीच एखादी भाजी असली तरी ती आवडीने खाल्ली जायची. पण मग सोबत ताक असणे आवश्यकच. मस्त मसालेदार फोडणीचा प्लेट भरून भात खावा, मग त्यावर ग्लासभर ताक प्यावे. मग पुन्हा हेच, मग पुन्हा हेच. असे पोटभरेपर्यंत छोटे छोटे राऊंड घ्यावेत. जेव्हा मला कॉलेजला सुट्टी पडायची, तेव्हा माझी ईतकी सोय करून आई निर्धास्त ऑफिसला जायची.

आज त्या बिर्याणीच्या धाग्यावर कोणीतरी मला म्हटले, अहो बिर्याणी वेगळी असते आणि फोडणीचा भात वेगळा असतो...
तेव्हाही मी हेच म्हटले,

फोडणीचा भात माझे पहिले प्रेम आहे. कित्येक बिर्याणीज ओवाळून टाकेन मी त्यावरून ...

आणि हे खरेच आहे

सौ बात की एक बात - बिर्याणी असेलही माझे क्रश. पण फोडणीच्या भाताला कोणी स्त्रीचे रूप दिले असते तर ती माझी आई असती, ती माझी पत्नी असती, ती माझी बहीण असती, ती माझी मुलगी असती Happy

आणि हे सुद्धा खरेच आहे Happy

- धन्यवाद
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण रोज आमरस खाऊ लागलो तर काही दिवसातच कंटाळून जाऊ. भले मग तुम्ही आमरसाचे कितीही का चाहते असेना. पण फोडणीच्या भाताला पुर्ण ईंजिनीअरींगमध्ये मी किंवा माझ्या कुठल्याही मित्राने कधी नकार दिलाय असे अनुभवण्यात आले नाही.
उदाहरणाच्या तपशीलातच चुक असल्याचे निदर्शनास आणुन देतोय.
रोज चमचाभर आमरस खाल्ला तर कोणीच कंटाळणार नाही. तुम्ही इंजिनियरिंगच्या स्टुडंटन्सना रोजच डबा भरभरुन तर फोडणीचा भात खावु घालत नसाल. एका डब्यात मिळुन इतक्या जणांना मिळुन जेमतेम २/४ चमचे ( माबोवरील नव्हेत) येत असतील.

होना. लोक रोज दिवसातून किमान १-२ वेळा चहा/कॅाफी पितात तेही वर्षानुवर्षे.
रोज चपाती, भाकरी खाणारेही लोक आहेत. डाळ-भात खाणारेही आहेत. काही कंटाळा-बिंटाळा येत नाही.

ati kautuk kelay jara. mala fobha aawadto pan roj kaay 2 weeks madhe ekdach khau shakel.. mazya aai chya haat cha apratim hoto

माझा सगळा लॉकडाउन चा डब्बा फोभा वरच निभावला आहे. दोन तीन प्रकारचे करते.

१) मराठी पद्धतीचा: फोडणीत मोहरी, हिंग मिरची कढिपत्ता तळलेले शेंगदाणे कांदा हळद घालून त्यावर भात मोकळा करून पसरणे व चांगले परतणे, मीठ साखर चवीला. वरून कोथिंबीर लिंबू रस - म्हणजे साधारण पोह्यासारखेच बनवते. कधी कधी नुसता लसूण व लाल तिखट फोडणीत असे करते.

२) दाक्षिणात्य पद्धतीचा: चित्रांन्न सारखा फोडणीत डाळे शेंग दाणे, लाल मिरची कढिपत्त्ता घालून.

३) पुलिहोगारा राइस. ह्याची मसाल्याची कृती युट्युब वर आहे. पण एम टी आर चा रेडीमेड मिळतो. अडीनडीला उपयोगी पडतो.
तेल गरम करून त्याचा मसाला घालायचा व गॅस बंद करून भात त्यात कालवायचा.

४) कोकोनट राइसः फोड णीत मिरची ओले खोबरे मोहरी हिंग इतकेच व कोथिंबीर लिंबू. ओले खोबरे अलगद न जाळाता परतायचे खरपूस.

५) दही भात फोडनी देउन. बरोबर हॉट चिप्स च्या चिप्स. हे पण करून बघा.

फो भा बरोबर आदल्या दिवशीचे सुकटीचे किंवा कोलंबी चे कालवण थोड़े आटवून किंवा वाकटया भाजून कोणी खात नाही का इथे????
पण या साठी फो भा मध्ये मसाला नाही तर हिरव्या मिर्ची ची फोडणी द्यावी लागते तर च कालवण आणि वाकटी ची चव एन्हांस होते

रोज चमचाभर आमरस खाल्ला तर कोणीच कंटाळणार नाही.
>>>
जेम्स बॉन्ड, सहमत आहे
आई हेट आम रस.. मी चमचाभर कोणाला रोज खाताना बघितले तरी मला कंटाळा येईल. म्हणून मी आमरसाचे उदाहरण घेतले.

एका डब्यात मिळुन इतक्या जणांना मिळुन जेमतेम २/४ चमचे ......
>>>
माझा डब्बा साधारण दोन-अडीच माणसांचे पोट भरेल ईतक्या आकाराचा असायचा. त्यामुळे दहापंधरा जण जरी जेवले तरी अगदीच दोन चमचा भात यायचा नाही. आणि तसेही रोजच त्यात दहापंधरा जण वा त्यापेक्षा जास्त उत्सुक असले तरी काही ठराविक पोरे, माझे खास मित्र, लेक्चरलाच माझ्या बॅगेतून डबा लंपास करून पळ काढायचे जेणेकरून त्याचे दहापंधरा वाटे पडणार नाहीत.

रोज चपाती, भाकरी खाणारेही लोक आहेत. डाळ-भात खाणारेही आहेत. काही कंटाळा-बिंटाळा येत नाही.
>>>>
डाळ बदलते.
म्हणजे आमच्याकडेच घ्या - तिखट डाळ, आंबट डाळ, गोडे वरण, उसळ, सांबार, कांद्याचे कालवण, शेंगदाणा आमटी, दह्याची कढी, कोकमकढी, कुळदाची पिठी, टोमेटो सार, वा भाजीच रस्साभाजी ईतक्या प्रकारचे डाळ/कालवण तर शाकाहारात बनते. मांसाहारातले अंड्याचे कालवण, माश्याचे सार, कोलंबी/खेकडा/शिंपले आदींचे कालवण, चिकनमटणाचा रस्सा, ईत्यादी वेगळेच.
तर एकच डाळ खाणे अवघड आहे. असे उदाहरण अपवादानेच असेल ज्याच्या घरी एकाच पद्धतीची डाळ रोज बनते. आणि कुरबुर न करता आवडीने खाल्ली जाते.

ati kautuk kelay jara.
>>>>>
होय आशू २९, आता प्रेम म्हटल्यावर अति कौतुक आलेच. हेच तर प्रेम असते Happy

mala fobha aawadto pan roj kaay 2 weeks madhe ekdach khau shakel.. mazya aai chya haat cha apratim hoto
>>>>>
जर तुमच्या आईच्या हातचा अप्रतिम असूनही तुम्ही २ आठवड्यात एकदाच खाऊ शकता. तर मी आमचा फोभा रोज आवडीने खायचो वा खाऊ शकायचो तर कौतुक वाटणारच ना. तितके अति कौतुक डिजर्व्ह करतो मग तो Happy

असो,
मोराल ऑफ द स्टोरी - प्रत्येकाच्या एखाद्या पदार्थाप्रती भावना वेगळ्या असतात. त्या सगळ्यांनाच समजतील असे नाही. कोणाला नाहीच समजल्या तर माझी काही हरकत नाही. त्यातही ज्यांनी तो भात प्रत्यक्ष खाल्ला नाहीये त्यांना समजवणेही अवघडच. त्यामुळे कौतुकात दोन चार शब्द कमी जास्त झाले असे वाटत असेल तर प्लीज समजून घ्या Happy

Submitted by अमा on 9 January, 2021 - 07:49
>>>>>>
अमा आमच्याकडेही असे लाल, पिवळे, पांढरे विविध फोडणीचे भात बनतात, पण त्यांची नावे वेगळी ठेवली आहेत आम्ही. फोडणीचा भात म्हटले की तांबडा मसाल्याचाच समजतो आम्ही.
बाकी दहीभात तडका मारके माझ्याही आवडीचा. घरी करत नाही, पण बाहेर खातो शेअरींगमध्ये.. जुन्या ऑफिस शेजारी एके ठिकाणी खूप छान मिळायचा.
घरीही डाळभातात वा फोडणीच्या भातातही दही मिक्स करून ती हलकीशी आंबट चव आवडते.

जसा हळद घालून फोभा करतो तसा मी फक्त मोहोरी, हिंग लाल तिखट आणि मिठ घालून फोभा करते. रंग वेगळा पण सरस येतो. वरून कोथींबिर आणि लिंबू पिळलं की झकास काम होतंय बघा. मी वाटीभर फोभा बरोबर एक काकडी/गाजर/टाॅ/ सफरचंद आणि उकडलेलं अंड/ उकडलेले मूग घेऊन त्याला जरा संतुलित करायचा प्रयत्न करते. जेवण फारच सोप्पं आणि मजेचं होतं मग.

रुन्मेष जागु ताई चे लेख वाच
तुला कळेल.
कदाचित याला रिबन फिश म्हणतात. नेट वर वाकटया फिश म्हणून टाकून पहा. तुला फ़ोटो मिळेल बघायला

फो भा बरोबर आदल्या दिवशीचे सुकटीचे किंवा कोलंबी चे कालवण थोड़े आटवून किंवा वाकटया भाजून कोणी खात नाही का इथे????
मी मी.....मी खातो. त्यातल्या त्यात वाकट्या किंवा निरल्या किंवा बोंबील जर चुलीतल्या निखार्यावरच्या असतील तर अजुनच बेस्ट.
नकाहो असलं काही आठवण करुन देवु. त्रास होतो जिभेला :((

पण फोभाच्या याच वैशिष्ट्यामुळे कोणी कोणाला घरी जेवायला बोलावलेय, आणि फोडणीचा भात खाऊ घालतेय असे सहसा होत नाही...

एकदम सही . एकदा मित्राकडे गेल्यावर त्याच्य्या आईने फोभा खातोस विचारल्यावर मी आनन्दाने हो म्हणालो पण मित्र आईला म्हणाला कहीतरीच काय विचारतेस , तुम्ही लिहिलेय तसे घरच्यासारखाच वागल्याने काकूनी विचारले असावे.

माझाही अत्यन्त आवडीचा प्रकार.

Lolzzz मला गेले वर्षभर वाकटया दिसलेल्या ही नाहीत
अनिश्कातै, तुमच्या ओळखीत किंवा तुम्हाला पोयनाडला जायला जमत असेल तर नक्की जावुन या.( सुक्या मच्छीचा बाजार सोमवारी असतो. अलिबाग पासुन १० किमी अंतर).
जनरली दरवर्षी मी मे मधे पोयनाडला जात असतो. तिथुन वर्षभराची बेगमी करुन येतो. या वेळेस शक्यच नव्ह्ते मग राहिल.
पण पण पण........ देवाच्या घरी उशीर आहे पण काळोख नाही. मला माझ्या हितचितकांनी साधारण अर्धा अर्धा किलो सोडे, वाकट्या, अंबाडी, जवळा नी बोंबील मस्तपैकी साफ करुन नी तुकडे करुन पाठवलेत. उद्या जमल्यास फोटो टाकतो. (तुम्हाला जळवण्यासाठी नाही)

Hahah अलीबाग माझ गाव च आहे.
पोयनाड वड़खळ हे पायाखालचे आहेत... रेवस मांडवा मला 5 मीन अंतरावर आहेत. सो तो प्रश्न नाही. या वर्षी आमच्या किनार्यावर खुप जेलीफिश आलेले. आणि ते थोड़े त्रासदायक होत्ते... त्यामुळे सुकी मच्छी मिळाली नाही... पोयनाड ला आमच्या तिथुन च जाते फिश... आणि कांदे ही सफेद वाले...

अनिश्का.
ओके
सुकी मासोळी, सुके बोंबील, मलाही फोभासोबत आवडतात हे मूळ लेखातही लिहिले आहेच. फक्त आमच्याकडे मासे लिमिटेडच असतात. म्हणजे आपले हलवा सुरमई पापलेट रावस बांगडा बोंबील आपले नेहमीचे कलाकार...

हो रुन्मेष मला साधारण आयडिया होती च...माझं सासर मालवण चे असून ही तिथे तू म्हणतो तेच यशस्वी कलाकार असतात... आणि बाकी हिडन टैलेंट माहित ही नसते...
लहान मासे जसे वाकटी , बला , बोइट , कालेटं , निवटे , बगा आणि बरेच अतिशय म्हणजे अतिशय सुंदर लागतात चविला. आणि ज्याना यांची चव लागलेली असते ते पापलेट , सुरमई कड़े ऑप्शन नसेल तर च पाहतात... जागु ताई आणि में बी जेम्स बॉन्ड या गोष्टीला अग्री होतील

लेख आणि लेखकाचे काही प्रतिसाद म्हणजे अतिशयोक्तीचं उदाहरण आहे. Wink

बाकी फोडणी भात अतिशय आवडता पदार्थ नसला तरी नावडता अजिबात नाही. कधीच करत नाही, पण कोणी दिला तरी नाक मुरडत नाही. आम्ही चित्रान्नना, दहीबुत्ती, दहीभात, इमली राईस, लेमन राईस याना फोडणी भात समजत नाही. जसे बिर्याणी आणि पुलाव भाताचे प्रकार तसेच हे सगळे. फोडणीभात म्हणजे शक्यतो उरलेल्या गार भाताला खपवण्यासाठी केलेली क्लृप्ति.

बरोबर आहे तुमचे. आमच्याकडे चित्रान्न आणि दहीबुत्ती खास बेत ठरवून केला जातो, भात उरलाय म्हणुन नाही.
उरला तर आम्ही जेवणात नेहमी सारखा खातो तो भात.

*फोडणीभात म्हणजे शक्यतो उरलेल्या गार भाताला खपवण्यासाठी केलेली क्लृप्ति.* -
कुणाला फोभा आवडो न आवडो, ज्याचा त्याचा प्रश्न ! पण माझ्यासारख्या ज्याना फोभा आवडतो, त्याना वरील अभिप्राय म्हणजे, ' विक्रमादित्यचं जुनं सिंहासन तें; पावसाळ्यात पायपुसण्याजवळ ठेवणयापुरतंच ! ' म्हणण्यासारखं Wink

पण तशी क्लृप्ति असली तरी त्यात गैर काहीच नाही.

लोणचं ही सुद्धा कैऱ्या, आवळे वगैरे दीर्घकाळ टिकवून खाता यावेत याची क्लृप्ति आहे.

हा चविष्ट लेख मी मुगडाळीची खिचडी खात खात वाचला. आणि क्षणभर तिलाही फोडणीच्या भाताची चव आल्यासारखी वाटली. इतका हा तुमचा शाब्दिक फोडणीचा भात जमून आलाय.
आवडलं.

सांज धन्यवाद Happy

फोडणीच्या भाताचा शोध कदाचित उरलेल्या भाताला संपवायला लागला असावा. पण आमच्यासारखे मुद्दाम आदल्या रात्री जास्तीचा भात लाऊन सकाळी नाश्त्याला फोडणीचा भात करणारे बरेच असतील.

ऑफिसला जाण्यापूर्वी सकाळी मी नुसता चहाच प्यायचो. मला सकाळीच सकाळी काहीही जास्त खायला होत नाही. चव आलेली नसते तोंडाला.
पण मध्यंतरी एकदा बायकोने आदल्या रात्रीची शिल्लक चपाती कडक करून दिली. ईतकी आवडली सकाळीच सकाळी कुडुमकुडूम करत चहासोबत खायला की मग रोज रात्रीच्या जेवणात एक दोन चपात्या एक्स्ट्रा बनू लागल्या Happy

भाऊ, ती उपमा आवडली Lol

आणि त्यावरून संदर्भहीन आठवण आली. आजी डेक्कनला जुन्या दगडी बंगल्यात रहायची, तिचा जुना फ्रीज तिने सगळ्या अकॅसेसरीज काढुन, फक्त शेल्फ शिल्लक ठेऊन, गेटजवळ ठेवला होता. कशासाठी? घरात येताना गेटजवळ ती फ्रिजचं दार उघडायची, आत चप्पल काढायची आणि मग आत घरात. तिचं तिचं एकटीपुरतं शु रॅक होतं ते. फ्रिजच्या दारावर रांगोळीचं स्टिकर आणि वर कुंडी ठेऊन डेकोरेट केलं होतं. Proud

Pages