बिग बेंड राष्ट्रीय उद्यान

Submitted by मोहना on 24 December, 2020 - 08:25

९ दिवस आणि ३५०० मैल गाडी हाकायची ठरली तेव्हा मी माझं Big Bend नावाचं राष्ट्रीय उद्यान घरातल्या घरातच करायचं ठरवलं पण दरवर्षीच्या नेमामध्ये कोविड काळ येऊ न देता कमी गर्दीच्या ठिकाणी जायचं, विमानाने न जाता गाडीने प्रवास करायचा या विचारावर मुलं ठाम होती. शेवटी गाडी कशी चालवायची याबद्दल हजार सूचना तोंडी दिल्यावर माझं समाधान झालं पण सूचना लिखित पाहिजेत अशी सूचना आली. मी लिहिलेल्या पाच सूचनांनंतर, ६ क्रमांकावर आईने ओरडत बसायचं नाही ही सूचना मुलांनी घुसडवली आणि हल्लीच गाडी शिकलेल्या मुलीने घरातली ती सर्वोत्कृष्ट वाहन चालक असल्याचा निर्वाळाही दिला.
गाडी प्रकरण संपतय तेवढ्यात कोविड काळ अंगावर आला. बाहेरचं खायचं नाही म्हणून जिथे जाऊ तिथे स्वयंपाक आपला आपणच करायचं ठरलं! स्वयंपाक आपला आपणच म्हटल्यावर पुन्हा माझा उत्साह थंडावला. बाहेर खायचं नाही तर कशाला करायचा प्रवास? माझ्या कुरकुरीला थोपवण्यासाठी मुलांनी स्वयंपाकाची बाजू सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली आणि पुढचे ९ दिवस एकावेळच्या जेवणात आम्ही रोज दोन पिनट बटर सॅडविचेस खाल्ली. आई उगाचच बाऊ करते हे वाक्य प्रत्येक सॅडविच खाताना ’डेझर्ट’ म्हणून मला ऐकायला लागलं.

दिवस पहिला
- देशाच्या आरोग्यखात्याच्या सूचना तंतोतत पाळल्या या एका वाक्यात आमची तयारी सर्वांच्या लक्षात यावी. शार्लट ते बर्मिंगहॅम राज्यातील अलाबामा. हा ६:३० तासांचा प्रवास आहे. गर्दीमुळे ८ तास लागले. वाटेत देहधर्म उरकायला गवतात जायचं की विसाव्याच्या थांब्यांवरचा माणसांचा संपर्क खपवून घ्यायचा याबाबतीत निश्चित धोरण ठरत नव्हतं. गाडीत आवाजांचं प्रदुषण वाढल्यावर ज्याने त्याने मग स्वत:चं धोरण स्वीकारण्याबाबत एकमत झालं. ८ तासांनी आम्ही अंग टाकायला Airbnb मध्ये म्हणजे राहण्याच्या ठिकाणी पोचलो. Airbnb च्या घर मालकाने कोविडला अनुसरुन घर आधीच ’सॅनेटाइझ’ केलेलं होतं. तरीही घरात पाऊल टाकल्याटाकल्या बरोबर घेतलेले ढीगभर ओले कागद (wipes) वापरुन पुन्हा स्वच्छ केलं. धुतलेली भांडी पुन्हा धुतली. मुलाने स्वयंपाक करण्यासाठी बाह्या सरसावल्या आणि कसलेल्या आचार्‍यासारखा पास्ता केला. मुलीने दुसर्‍या दिवशीच्या जेवणाची व्यवस्था (पिनट बटर सॅडविच) करुन टाकली. जे घडेल ते पाहायचं, मिळेल ते गोड मानायचं हा मंत्र मी पाठ करत राहिले. रात्री पलंगावर पाठ टेकली ती पहाटे उठायचं आहे हे मनाशी घोळवत.

दिवस दुसरा - बर्मिंगहॅम ते टेक्सास राज्यातील क्लेबर्न. हा प्रवास १० तासांचा आहे. विरंगुळ्याचे क्षण निर्माण करणं भागच होतं. मराठी शब्दांची अंताक्षरी खेळायचं ठरलं. मुलांचं मराठीचं ज्ञान उघडं पडल्यामुळे इंग्रजी शब्दांची अंताक्षरी खेळू या असं त्यांनी आव्हानच केलं. तिथे आमचं ज्ञानप्रदर्शन झालं. मुलं आणि पालक दोघांनाही फिट्टमफाट झाल्याचं समाधान या खेळाने दिलं. मुलांना मग देशांच्या नावाची अंताक्षरी खेळायची हुक्की आली. काहीकाही देश नविनच निर्माण झाले आहेत की काय असं मला वाटलं. असतील बापडे असं मनात म्हणत मीही एकदोनदा माणसांची नावं घेऊन अशा नावांचे देश आहेत असं ठोकून दिलं. मुलांनाही हे नविनच देश असावेत असं वाटलं. अंताक्षरी संपल्यावर कुणीतरी टुम काढली, घरातल्या प्रत्येकाचा एकेक चांगला गुण आणि सुखद प्रसंग सांगण्याची. गाडीत अचानक शांतता नांदायला लागली ती मुक्कामाला पोचेपर्यंत. १० तासांनी क्लेबर्नमध्ये पोचलो तेव्हा गाडीतून सामानही काढायच्या आधी मी पर्समधून कॅमेरा काढला. हे घरच इतकं सुंदर होतं की सगळं काही टिपावं असं वाटत होतं. फोटोच फोटो काढून झाले; म्हणजे मी एकटीने काढले. कुणालाही त्यात रस नव्हता. लेक निसर्गाचे फोटो काढतो. फोटोत माणसं असल्याशिवाय निसर्ग कोणत्या गावचा ते कळत नाही हे काही त्याला पटत नाही. माणसं असलेला निसर्ग टिपण्यासाठी नाकं मुरडत माझं सामानही खोलीत नेणार्‍या लेकरांची आणि नवर्‍याची छायाचित्र मी टिपली आणि पुन्हा एकदा पास्ता खाऊन आम्ही निद्राधीन झालो.

तिसरा दिवस - क्लेबर्नमधून टेक्सास राज्यातील सॅन्डरसन गावाकडे गाडी पळवायला सुरुवात केली. ५:३० तासांचा प्रवास. सुरळीत! काहीच घडलं नाही. ती वादळापूर्वीची शांतता होती हे संध्याकाळीच लक्षात आलं. सॅन्डरसनपासून मेक्सिको अगदी शेजार्‍याचं घर बघावं इतकं जवळ आहे. थोडे ताजेतवाने झालो आणि शेजार्‍याचं घर बघण्यासाठी पुन्हा तासभर प्रवास केला. सुकलेली नदी पार केली की तिच्यापलिकडे दिसणारी खिंड म्हणजे मेक्सिको. मेक्सिको तिथून सुरु होत असलं तरी त्या बाजूला मानवी वस्ती नाही. हाताच्या अंतरावर मेक्सिको आहे ही भावना निर्माण होते इतकंच आणि तसंही कुणी जायचा प्रयत्न केलाच तर ते बेकायदेशीर आहे. भणाणत्या वार्‍यात आमची चार डोकीच तिथे होती. बाकी सारा उजाड माळ. उगाचच गस्त घालणारे कुणीतरी येतील, बेकायदेशीरपणे मेक्सिकोतून अमेरिकेत प्रवेश केल्याबद्दल आम्हाला पकडतील असं वाटण्याएवढं गुढ वातावरण होतं. पलिकडे दिसणार्‍या मेक्सिकोच्या कातळाला चौकटीत बंदीस्त करण्यासाठी कॅमेरा काढला. ’फोटो’असं म्हटल्याम्हटल्या मुलांनी डोळे वटारले. "फोटो, फोटो काय सारखं. त्या क्षणाचा आनंद घ्यायचा असतो." आठवणी अशाच फोटोतून जपायच्या असतात, आता एकही फोटो काढणार नाही तुमचा असं ठणकावून सांगत तिघं पाठमोरे असतील तेव्हा फोटो काढायचे असं मी ठरवून टाकलं. बघत बसा स्व:ताच्या पाठी असंही मनातल्या मनात खिजवलं. ती रात्र Big Bend आता हाताच्या अंतरावर आहे या जाणीवेने आणि तीन दिवसांचा प्रवास सुखरुप पार पडल्याच्या आनंदात गेली.

चौथा, पाचवा आणि सहावा दिवस - Big Bend राष्ट्रीय उद्यान - कोविड विचारात घेऊन मुद्दाम आम्ही हे ठिकाण निवडलं होतं. बर्‍याचदा रस्त्यावरुन फक्त आमचीच गाडी धावत होती. मैलोनमैल वस्ती नाही त्यामुळे इतर सोयीसुविधाही नाहीत. (पेट्रोल पंपावरच्या बाथरुम मात्र सगळीकडे अतिशय स्वच्छ होत्या) याच कारणामुळे देशातील इतर ठिकाणांपेक्षा इथे तुलनात्मक गर्दी कमी असते असं मुलांनी शोधून काढलं होतं. खरंच गर्दी कमी होती. काही जागा कोविडमुळे बंद होत्या. तीन दिवस आता बाहेरचं जग विसरायचं होतं. निसर्ग हात पसरुन आजूबाजूला उभा होता त्याच्या कुशीत शिरलो. निसर्गमय झालो. मैलोनमैल पायी तुडवले, डोंगरमाथ्यांवर चढलो, नदीच्या पात्रात उड्या मारल्या, डोंगरांनी वेढलेल्या मैदानावर तंबू (Tent) ठोकून राहिलो. रात्री ३ वाजता उठून तारांगण पाहिलं. वाळूत आडवं पडून नजर तार्‍यांवर ठेवली की हळूहळू आपणच तारा होऊन गेल्यासारखं वाटायला लागतं तो अनुभव अविस्मरणीय आहे. या राष्ट्रीय उद्यानातून मेक्सिको अगदी हाताच्या अंतरावर आहे हे सतत जाणवत राहतं. राष्ट्रीय उद्यानात पलिकडून मेक्सिकन प्रवेशही करतात पण जरी प्रवेश केला तरी उद्यानातून अमेरिकेच्या दिशेने बाहेर पडणं अशक्य आहे. जागोजागी चौक्या आहेत, रस्त्यावरही गस्त घालणार्‍या गाड्या दिसतात. उद्यानात काही ठिकाणं अशी आहेत की रितसर नदी ओलांडून होडीतून पलिकडे जाताही येतं. तिथे पोचल्यावर पासपोर्टची आवश्यकता असते. कोविडमुळे सध्या हा मार्ग बंद केलेला आहे. मात्र मेक्सिकोतले विक्रेते होडीतून येऊन वस्तू विकायला ठेवतात पण तिथे थांबत नाहीत. वस्तूंबरोबर तिथेच ठेवलेल्या पांढर्‍या बाटलीत आपण पैसे ठेवायचे आणि वस्तू घ्यायची. दरही त्यावरच लिहिलेले होते. हा दोन्ही बाजूंचा प्रामाणिकपणा अचंबित करणारा आहे. यातल्याच एका मार्गावर नदीच्या पलिकडून मेक्सिकन लोक खाद्यपदार्थ विकत होते. काठावरुन आपण आपल्याला काय हवं ते सांगायचं (बोंबलायचं). त्यानंतर ते होडीतून पदार्थ आणून देतात. भारतातल्या अनेकांना प्रश्न पडतो की ट्रम्पनी जी भिंत बांधली ती कुठे? खरंतर कुठेच नाही. जी बांधली ती अतिशय कमी लांबीची आहे. आधीच्या भिंतीची डागडुजी केली आहे त्याचाही समावेश ते त्यांनी बांधलेल्या ’भिंती’ त करतात. दुसरं म्हणजे ते जी भिंत बांधणार होते ती कॅलिफोर्निया राज्यात. त्यातलं तथ्य, वस्तुस्थिती ’गुगल’ केल्यावर कळेलच. आम्ही गेलो होतो टेक्सास या राज्यात. गर्दी टाळून पहाडांचं दर्शन घ्यायचं, वाळवंट तुडवायचं, खिंडी आणि घळी पाहायच्या, त्यातून भटकायचं याचा अनुभव घ्यायचा असेल तर पुन्हा पुन्हा जावं असं आहे हे Big Bend नावाचं राष्ट्रीय उद्यान. Big Bend हे नाव आग्नेय दिशेकडून ईशान्य दिशेकडे वाहणार्‍या नदीच्या प्रवाहाने निर्माण झालेल्या खिंडी, घळी, पहाड तसंच अमेरिका आणि मेक्सिको या नदीमुळे दुभागला गेला आहे त्यामुळे पडलेलं आहे.

सातवा दिवस - तीन दिवस उंडारुन, उनाडून अगदी ताजंतवानं व्हायला झालं. कोविडच्या वातावरणामुळे आलेली मरगळ कुठल्याकुठे पळाली. परतीचा प्रवास आम्ही वेगळ्या मार्गाने करणार होतो. राष्ट्रीय उद्यानातून निघालो ते टेक्सास राज्यातल्या टेरलिंग्वा गावात राहायला थांबलो. हा ५:५० तासांचा प्रवास होता. एव्हाना गाडी चालवायला, गाडीत तासनतास बसायला आणि भूक लागली की पिनट बटर सॅडविच खायला आम्ही सगळे सरावलो होतो.

आठवा दिवस - लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्सला घालवणार होतो. पुन्हा एकदा एकदम १० तासांचा प्रवास होता. चौघं गाडी चालवत असल्यामुळे सुरुवातीला इतक्या प्रवासाचं आलेलं दडपणही एव्हाना नाहीसं होऊन गेलं. न्यू ऑर्लिन्स जवळ यायला लागलं आणि रिकामे रस्ते पुन्हा गजबजायला लागले. निसर्गाचा वरदहस्त माणसांनी बाजूला ढकललेला क्षणोक्षणी जाणवायला लागलं. न्यू ऑर्लिन्सला पोचल्यावर आरोग्य खात्याचा, ’सुटी असली तरी एकत्र जमू नका’ हा इशारा फेटाळून लावलेला पदोपदी दिसत होता. इथे गाव फिरायचं, तिथले प्रसिद्ध पदार्थ खायचे एवढाच आमचा बेत होता. गर्दी पाहिल्यावर आम्ही सगळं लवकर आटोपतं घेतलं पण खाणं मात्र सोडलं नाही. विकत घेऊन गर्दी टाळून, लांब जाऊन यथेच्छ ताव मारला. इथून आम्ही आमचा प्रवास तसाच पुढे चालू ठेवला ते अलाबामा राज्यातील मॉन्टगोमेरी येईपर्यंत. रात्री इथे मुक्काम करुन मार्टीन ल्यूथर किंग जिथे राहायचे ते ठिकाण पाहायची इच्छा होती पण वेळेत बसत नव्हतं.

नववा दिवस - अलाबामा राज्यातील मॉन्टगोमेरीहून आमचं गाव. नॉर्थ कॅरोलायनातील शार्लट. ६:३० तास प्रवास आणि मग संपली सुटी. अटलांटा सोडल्यावर रस्त्यावर दोन - तीन अपघात, वाहनांच्या वेगावर नियत्रंण ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी दबा धरुन बसलेले पोलिस असंच दृष्य या ६:३० तासात जागोजागी होतं. नागरी सोयी सुविधा नसलेलं Big Bend अधिक मोहक होतं, मन:शांती देणारं होतं ते मागे टाकून आम्ही कुठे धावतोय असं वाटायला लागलं. एकदा का टेक्सास राज्यातील क्लेबर्न सोडलं की राष्ट्रीय उद्यानापर्यंतचा रस्ता म्हणजे निसर्गाचं राज्य आहे. कुठल्याच गावात माणसांची चाहूल विशेष जाणवत नव्हती आणि रस्त्यावर गाड्यांची गर्दीही नव्हती. सॅन्डरसनमध्ये तर माणसांपेक्षा ओसाड पडलेल्या घरांची संख्याच जास्त आहे. तिथे जवळच भुतांचं गावही आहे. Ghost Town - ओस पडलेलं गाव! ही अशी गावं, घरं दिसत होती तेव्हा पडक्या भिंतीमध्ये काय कहाणी दडली असेल असा प्रश्न पडत राहिला. परतीच्या प्रवासात मन मागे धावत होतं, वाटेतलं काही ना काही आठवत होतं. धावणं चालूच होतं. मनाचं आणि गाडीचं. मन आणि गाडी विरुद्ध दिशेने!

९ दिवसातले पाच - सहा दिवस आमचे एका वेगळ्या जगात गेले. वर्षातली ही सुटी आम्ही चौघं एकत्र असतो त्यामुळे अधूनमधून होणार्‍या प्रवासापेक्षा या सुटीची वाट आम्ही सगळेच बघत असतो. यावेळेसही तेच. घरी आल्याआल्या पुन्हा पुढच्यावर्षीचे वेध!

प्रकाशचित्र मला इथे देता आली नाहीत. माझ्या अनुदिनीला भेट द्या. तिथे पाहता येतील - https://mohanaprabhudesai.blogspot.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा मोहनाजी, किती छान आणि खुसखुशीत लिहिलंय. पहिला पॅरेग्राफ आणि पहिला-दुसरा दिवस तर हसुन लोटपोट करतो. फोटो पण मस्त आलेत. तुमच्या सोबत आमचीही सफर घडल्या सारखं वाटुन गेलं. Bw

<< घरातल्या प्रत्येकाचा एकेक चांगला गुण आणि सुखद प्रसंग सांगण्याची. गाडीत अचानक शांतता नांदायला लागली ती मुक्कामाला पोचेपर्यंत. >> फुटलेच हे वाचून. ..
सगळाच लेख एकदम खुसखुशीत आणि खमंग झाला आहे.

छान प्रवास... बाहेरचे न खाण्याचे लॉजिक समजले नाही... फूड मधून कोविड पसरत नाही...