
रवींद्रनाथांची नायिका : बिनोदिनी
पश्चिम बंगालबद्दल प्रचंड, प्रचंड आकर्षण वाटतं त्याची मुख्य कारणं म्हणजे रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, दक्षिणेश्वरी , रवींद्रनाथ टागोर व शांति निकेतन ... मी मागच्या जन्मी बंगाली होते बहुतेकं !
रवींद्रनाथांनी ज्या पद्धतीची लेखन व काव्यनिर्मिती केली आहे , केवळ अद्भुतं ! त्यांच्या नायिका तर आजही खऱ्या वाटतात , कालबाह्य असूनही त्यांचे प्रगल्भ व्यक्तिमत्त्व कुठेतरी मनात मुरतंच. कालबाह्य म्हणताना वाटतं की खरंच अगदिच कालबाह्य आहे का कारण अजूनही फार मोठा पल्ला गाठायचा आहे स्त्रियांना , माझ्या दृष्टीने ज्याला ध्येय म्हणता येईल ते कधीकधी एक प्रकाशवर्ष दूर आहे असं वाटतं. सध्या समाज म्हणून ढोबळमानाने आपण, दारू पिऊन मारत "तर" नाही/ नोकरी "करू" देतो / "शिकू" देतो / बाहेरचं "सुद्धा" खातो / मतं "सुद्धा" विचारतो / घरात "मदत" करतो म्हणजे मी/हा मर्यादा पुरूषोत्तम आहे या स्टेशनावर कुठेतरी लटकतं आहोत. ही मर्यादा पुरूषोत्तम उपमा लिंगनिरपेक्ष आहे हं ! कुठेतरी स्त्रियांनी पण या मान्यतांना रूढी/दैव/नैसर्गिक कल समजून यांचे पोषण केलं असणारंच म्हणूनच ते ध्येय प्रकाशवर्ष . नाहीतर मगं मला बिनोदिनी आणि चारूलताला अजिबात समजून घेता आलं नसतं नाही का , पणं येतयं..यातचं काय ते आलं.
रवींद्रनाथांच्या या दोघी नायिका माझ्या सर्वांत आवडत्या , या दोघींपैकी एकीला निवडणे म्हणजे माझा कुठला डोळा मला अधिक आवडतो हे ठरवणे , तरीही मी 'चोखेर बाली'तल्या बिनोदिनी पासून सुरवात करतेयं.
'चोखेर बाली' ही कथा चार व्यक्तिरेखांभोवती फिरते पण एक पाचवी अदृश्य व्यक्तिरेखा आहे याकथेत ती म्हणजे त्याकाळातले विधवांचे जीवन. ते सतत अवतीभवती असतंच ज्याच्यामुळे कुणालाचं न्यायं मिळत नाही , रादर मिळणार नाही हे माहिती असूनही आपणं गुंतत जातो. कारण या व्यक्तिरेखांचे ते गुणदोष आपण स्वतःतं बघू शकतो.

बिनोदिनी , बिहारी, आशालता व महिन्द्रबाबू (महिन) या चौघांची ही कथा आहे. महिन हा एक स्खलनशील, स्वतःव्यतिरिक्त कुणावरही प्रेम नसणारा आत्मकेंद्री तरुणं आहे. ज्याच्या विधवा आईने त्याला एकट्याने लाडाकोडात वाढवून प्रसंगी इतरांना त्याच्यासाठी त्याग करायला भाग पाडले आहे. बिहारी हा त्याचा जवळचा मित्र आहे पण महिनने वेळोवेळी त्याचा फक्त वापर केला आहे. बिहारीचे सौजन्य इतके मोठे आहे की हे लक्षात येऊनही हे नाते त्याने टिकवलयं.
महिन हा उच्चशिक्षित असल्याने त्याची आई त्याचे लग्न त्याला आवडेल अशा तिच्याचं जवळच्या मैत्रिणीच्या अनाथ मुलीशी बिनोदिनीशी ठरवते. बिनोदिनी ही त्या काळाच्या मानाने बरीच शिकलेली व गायनवादनात प्रविण अशी सुविद्य व सुस्वरूप तरुणी असते. पण महिन तिला न बघताचं लग्नाच्या चार दिवस आधी 'मी लग्नासाठी तयार नाही' हे कारण पुढे करून लग्न मोडतो. याकारणाने बिनोदिनीचे लग्न कुणाशी तरी उरकण्यात येते व तिच्या नशिबी लगेचच वैधव्य येते. या काळात बिहारीसाठी पण एका अशिक्षित खेडूत मुलीशी आशाशी विवाहाचा प्रस्ताव येतो. आशा बिहारीला आवडते पण महिन आशाच्या मोहात पडून स्वतःच बोहल्यावर उभा रहातो. महिनच्या आईला आशा कधी आवडलेलीचं नसते , नंतर महिन दुरावल्याचे कारण आशाचं आहे असं वाटून महिनची आई दुसऱ्या गावी निघून जाते जिथे त्यांना बिनोदिनी भेटते. कुठेतरी त्या बिनोदिनीच्या अशा परिस्थितीला स्वतःला जबाबदार मानतात व तिच्याशी जवळीकं वाढवतात. स्वभावातल्यां गोडव्यानी व गुणांनी बिनोदिनीही त्यांना आपलेसे करते.
केवळं बिहारीने आर्जवं केल्याने महिन स्वतःच्या आईशी पत्रव्यवहाराद्वारे संपर्कात रहातो. ती सगळी पत्रं व त्यातील महिन व आशा यांच्या सुखी वैवाहिक जीवनाची वर्णनं बिनोदिनी त्यांना वाचून दाखवतं असते. इथेचं मत्सराग्निची ठिणगी पडते. जे सुख आज माझं असतं ते आज कुणीतरी अशिक्षित मुलगी भोगतेयं या विचाराने बिनोदिनी अस्वस्थ होते. आपल्यालाही हे पटतं, हळूहळू याचं मत्सराग्निने प्रतिशोधाचा वणवा पेटतो.
बिनोदिनी मनाशी काहीतरी निश्चित ठरवून महिनच्या आईसोबत त्यांच्या घरी येते. तिथे ती भोळसट आशाशी मैत्री करते , त्या हेतुपुरस्सरं मैत्रीला ती 'चोखेर बाली' हे नावंही देते , सरळसरळ अर्थाने डोळ्यातलं खुपणं , पणं हे 'तुझे सुख मला नाही नं बघवतं', या अनुशंगाने आहे. बिनोदिनीकडे रूपगुणबुद्धी सर्व तर आहेच शिवाय ह्याची तिला सार्थ जाणीव सुद्धा आहे. ही जाणीव कथेत तिला आणखी डिझायरेबल , हवीहवीशी बनवते. त्यामुळे कुठेतरी याचा तिनं स्वतःच्या इच्छा पुऱ्या करण्यासाठी वापरं करणं सहजं वाटतं. शिवाय महिन व बिहारी यांच्या बौद्धिकचर्चेत ती व्यवस्थित भाग घेऊ शकते, आशा नाही. आशा स्वतःहून कुठेतरी अलिप्त होतं जाते. त्यामुळे महिनला , जो आधीच नीतीमुल्यांच्या बाबतीत यथातथाच आहे , प्रेमात-मोहात पाडणं तिच्यासाठी फारचं सोपं होतं. महिन व बिनोदिनीचे कायिक प्रेमसंबंध होतात पण त्यावेळेस ती बिहारीकडे खरोखरचं आकृष्टं होते. त्याच्याशी तिला मनमोकळे बोलता येत असते. फक्त दुस्वासी महत्त्वाकांक्षेपोटी ती महिन सोबत असते , ते प्रेम नसतं... ना महिनचं कुणावरं प्रेम असतं ना आशावर ना बिनोदिनीवर ना बिहारीबद्दलं त्याला काही वाटत असतं !

बिनोदिनीसाठी महिन आशाला माहेरी जायला भाग पाडतो. इकडे त्याच्या आईला ह्या गोष्टींची कुणकुण लागते. बिहारीला स्वतःलाही बिनोदिनीबाबतं नक्की काय वाटते हे कळत नसल्याने तो आशा आणि महिनच्या संसारात विष कालवल्याबद्दल बिनोदिनीला अपराधी मानतो व तिथून निघून जातो. प्रतिशोधाचा वणवा शांत झाल्याने बिनोदिनीला हे निरर्थक आहे हे लक्षात येते. तोपर्यंत तिची "कीर्ति" समाजात पसरते , ती विधवाश्रमात निघून जाते. तिथेही महिन तिच्या मागे येतो व तिला एकत्र होण्यासाठी विनवण्या करतो . त्याच्या मदतीने रागावून निघून गेलेल्या बिहारीला शोधता येईल असे वाटून बिनोदिनी खोटंच तयार होते. हे कळल्यावरं महिन कपटाने त्यांची भेट होऊ देत नाही व तिला सोडून परत आशाकडे येतो. आशाशिवाय त्याला कुणी नाही हे त्याच्या लक्षात येतं. आशा आणि आई ह्या तर आनंदाने त्याचा स्वीकार करण्यास तयारचं असतात.
निर्धनं व निराधारं बिनोदिनीचे आयुष्य पुन्हा मांजा तुटलेल्या पतंगासारखे दिशाहीन होते. तिच्या आधुनिक विचारांमुळे तीन पांढऱ्या साड्यांचे चौथ्या पांढऱ्या साडीतले गाठोडं घेऊन या विधवाश्रमातून त्या विधवाश्रमात तिची हकालपट्टी होतं असते. अचानकचं कित्येकं वर्षांनी एका स्टेशनवर तिची बिहारीशी भेट होते. महिनने बिहारीलाही बिनोदिनी टायफॉईडमध्ये निवर्तली असं सांगितलं असतं. या अचानक भेटीने मनं पुन्हा स्वच्छं होतात. इथेचं बिनोदिनी म्हणते की मी जरं सुशिक्षित विचारी नसले असते तर बरं झालं असतं निदान समाजाच्या उपेक्षा अन्याय वाटल्या नसत्या व दैव समजून सहन करनं सोपं झालं असतं. बिहारीला चुकवून इथूनही ती निघून जाते. विधवांच्या विकासासाठी उर्वरित आयुष्य वेचते. या गोष्टीचा अंत बिनोदिनीच्या आयुष्यासारखाचं अधांतरी रहातो.
*******
रवींद्रनाथांना एक संवेदनशील लेखक म्हणून याचा शेवट बिहारी व बिनोदिनी एकत्र आलेले दाखवण्याचा मोह झाला असणारचं , अशी वदंताही आहे. पणं या कथेने सुद्धा गदारोळ झाला होता , त्या काळात विधवेला नायिका करून तिच्या इच्छांना अधोरेखित करनं सुद्धा साहस होतं. कधीकधी असंही वाटतं की काळाच्या फारही पुढे जाण्याचा प्रयत्न करता येत नाही , समाजात राहून समाजाच्या कलाकलाने असे बदल घडवण्यासाठी प्रेरितं करणारं साहित्य निर्माण करावं लागतं. नाहीतर समाजाने बहिष्कृत केल्याने सगळंच वाया जाऊन आपणं अजून मागे जाण्याची भीती असते. कुठल्याही सिस्टीमला, यंत्रणेला त्या यंत्रणेच्या बाहेर राहून बदलता येणं अशक्यं होऊन बसते. त्यामुळे काही वेळेला सावधं रहाणे, नमते घेणे हीच दुरदृष्टी असते.
महिन, आशा व आईकडे पर्यायाने समाजात मानाने परत जाऊ शकला. पुरुषानं मर्यादांची कितीही मोडतोड केली, तरी त्याला ती क्षम्य , कारण क्षमा करायला स्त्री आहे हा आग्रह व विश्वास! उद्या जर या मर्यादा स्त्रीचं झुगारून द्यायला निघाली, तर सगळ्यां व्यवस्थाच निराधार व्हायच्या. हे मोठे संकटच नाही का, त्यापेक्षा स्त्रीनं कसं सदैव आज्ञाधारक राहावं. हळवं बोलावं, गहिवरावं, हुंदके द्यावेत, तळमळावं, त्याकरता आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या परावलंबी रहावं हे सर्वांच्या सोयीचं होतं . या सोयीला संस्कृती असं गोड नाव देऊन ठेवलयं. 'या'ला संस्कृती मानण्याने खरी संस्कृती कोणती हेही कळणार नाही. हे त्याकाळातं तर असायचं , दुर्दैवाने अजूनही हे चित्र दिसतंच.
जेव्हा जेव्हा तू स्त्री आहेस म्हणून तुला स्वयंपाक/संसार/ संगोपन/नटनंमुरडणं/दागदागिने/साड्या/कुलधर्म कुलाचार/पाहुणचार इत्यादी आवडले"च"/ केलं"च" पाहिजे असं कुणी विचार करतं असलं की उलट्या दिशेने पण
बिनोदिनीची चरफडं किंचित समजून घेता येते. पुन्हा काही गोष्टींना किंमत दिली नाहीचं तर त्यावरं स्त्री म्हणून जोखलेले योग्य वाटत नाही. स्त्रीपुरुष सर्वांना नीतीमुल्यांचे एकचं परिमाणं असनं आदर्श वाटतं. एखादी गोष्ट स्त्रीने फक्त ती स्त्री आहे म्हणून केलीच पाहिजे किंवा नाहीच केली पाहिजे ह्या दुराग्रही चौकटी पटत नाहीत. चौकटी नकोच !!
प्रदीर्घकाळं घेतलेली अशी छोटी छोटी पावलंही मैलाचा दगड ठरू शकतात. ही कादंबरी १९०३ साली लिहिली होती , त्यानंतर शरदचंद्र चट्टोपाध्याय यांनी 'चरित्रहीन' ही विधवांवर , नायिकाप्रधान असणारी यापेक्षा पुढचं साहसं असणारी कादंबरी १९१७ साली लिहिली. कुठेतरी त्या मागची प्रेरणा बिनोदिनी असेलही !
मी 'चोखेर बाली' कादंबरी वाचलेली नाही. त्या कादंबरीबद्दलं वाचलंय व नेटफ्लिक्सवरीलं
'स्टोरीज ऑफ रवींद्रनाथ टागौर' या मालिकेची पारायणं केली आहेत. राधिका आपटेने सुरेखं काम केलयं. या लेखात 'बिनोदिनी' या व्यक्तिरेखेच्या आकलनात काही त्रुटी किंवा अपूर्णता असतीलही , तरीही मी या कथेबाबत केवळं मला आस्था आहे म्हणून लिहिलंय. बिनोदिनीचे व तिच्यासारख्यां अनेक खऱ्यां नायिकांचे सुद्धा आभार कारण त्यांच्यामुळे मी बऱ्याचं गोष्टींकडे कृतज्ञतेने बघू शकते.
आभार
!
©अस्मिता
*संदर्भ
* In Chokher Bali, Tagore draws parallels between the educated and the uneducated through Asha and Binodini. According to Mary Wollstonecraft “girls that have been… weakly educated are often left by their parents without any provisions”. Binodini is likewise left without any financial provision, but is left with education which allows her the liberty of free thinking. Binodini represents a new female subjectivity whom western education transforms into a woman with her own heart and mind, and is not tied to traditional customs.
*https://stateoftalent.org/topic/fa7413-book-review-of-rabindranath-tagore
* https://www.google.com/amp/s/feminisminindia.com/2019/02/15/chokher-bali...
* चित्रं आंतरजालावरून साभार.
वेमा प्रताधिकार भंग होत असतील तर सुचवणे, काढून टाकण्यात येतील. धन्यवाद.
>>>>>>>अजून १ वहिनी-दीर कथा
>>>>>>>अजून १ वहिनी-दीर कथा पण सुंदर आहे.
होय मी पाहीलेली आहे. त्याचे संगीत, त्यातली गाणी फार मधुर आहेत.
चारूलता असेल ती.
चारूलता असेल ती.
अस्मिता लिहीणार आहे त्याबद्दल. जमल्यास तो चित्रपट पण बघा. सत्यजित राय ह्यांचं अप्रतिम दिग्दर्शन आहे.
आशु आणि सामो,
आशु आणि सामो,
चारूलता असेल ती.>>> हो. The broken nest नावाची कथा आहे. त्याची नायिका आहे चारूलता. वहिनी व दीर यांच्या काव्यशास्त्रविनोद आणि संगीताच्या समान आवडीतून (चारूलताच्या मनात अमोलबद्दल(दीर)) आकर्षण निर्माण होते त्यावर बेतलेली आहे. गाणी सुरेख होती.
अत्यंत तरल अशी गोष्ट आहे.
अत्यंत तरल अशी गोष्ट आहे. त्यातली भावना नक्की कळते की नाही, ते कळत नाही.
नष्टनीड
नष्टनीड
चारुलता आवडली. नवरा सतत कामात
चारुलता आवडली. नवरा सतत कामात व्यग्र. हा एक दीर जो गाणे आवडत असल्याने समानशील. दोघात एक मैत्र आणि कदाचित मैत्र ओलांडणारं काही कोवळं नातं निर्माण होउ घालतं. अशी काहीतरी कथा आहे मला वाटतं. तरल आहे.
याचे यूट्यूबवर असलेले तिन्ही
याचे यूट्यूबवर असलेले तिन्ही भाग पाहिले. आणि आज लेख वाचला. अतिशय सुंदर लिहीले आहे! प्रमुख कॅरेक्टर्स, त्यांचे स्वभाव आणि त्यांच्या वागण्यामागची कारणे सगळे अगदी चपखल उतरले आहे!
ब्रोकन नेस्ट सुद्धा चांगली आहे पण खूप स्लो वाटल्याने नेटाने पाहावी लागली. ही मात्र लगेच पकड घेते आणि मध्यावर, जेव्हा बिनोदिनी महिनच्या घरी राहायला जाते आणि आशाशी तिची मैत्री होते, तिथपासून पुढे काही वेळ खूपच मस्त आहे. राधिका आपटेने त्या भागात फार जबरदस्त काम केले आहे. तिने एकूणच चांगले काम केले आहे पण दुसर्या भागात - या वरच्या प्रसंगांत- ती जास्त भारी वाटली. बाकीच्यांची कामेही मस्त आहेत पण बीना (आईचे काम केलेली) सोडली तर इतर कोणी ओळखीचे नाही. त्यांचे घर, तिथली फुले/रंग हे ही सगळे सुंदर दिसते.
मधे मधे येणारी गाणी चांगली आहेत.
दिग्दर्शन मला आवडले. अनेक सीन एकदम जमून गेले आहेत. यालाच ठहराव म्हणतात का माहीत नाही पण जुन्या काळातील घडामोडींचा, दैनंदिन जीवनाचा एक संथ, शांत वेग आहे या कथांमधे. एकेक प्रसंगही सावकाश उलगडत जातात. आशाला बघण्याच्या कार्यक्रमानंतर परत जाताना गाडीत त्यांच्या जागा बदललेल्या दाखवल्या आहेत. हे जाणीवपूर्वक आहे का माहीत नाही पण मला "डायरेक्शन" वाटले. महिनच्या घरून निघून जाणारी बिनोदिनी पाहून मला का कोणास ठाऊक जब वी मेट मधली करीना आठवली. हे लोक पिकनिकला जातात तेव्हा महिन आशाला बुद्धिबळाबद्दल सांगतो तो सीनही मस्त जमला आहे. मागे बिनोदिनी आणि बिहारी आणि फ्रेममधे पुढे महिन आशाला रानी (वजीर) कसा कोठेही जाऊ शकतो वगैरे सांगत असतो. कदाचित या उपमेकरताच इंग्रजीत क्वीन म्हणतात तसा "रानी" चा वापर केला आहे. नाहीतर हिंदीतही वजीर कॉमन आहे.
अस्मिता - तेव्हाचे विधवांचे जीवन आणि एकूणच स्त्रियांचे जीवन, निर्णयस्वातंत्र्य याबद्दल लिहीले आहेस ते बरोबर आहे, पण हे पाहताना आपल्याला जाणवते. टागोरांना हे लिहीताना तितकेच जाणवले असेल का? यातील कॅरेक्टर्सना त्याबद्दल जाणीव असली तरी त्यांच्या दृष्टीने तेव्हा जग तसेच होते आणि एखाददुसरा उल्लेख सोडला तर या कथेची मुख्य थीम ती वाटत नाही. पण तू लिहिलेले आहेस ते निरीक्षण म्हणून बरोबर आहेच. विधवांचे सोडा, तेव्हाच्या ठकुरायन टाइप बायकांचे जीवनही किती मर्यादांनी बांधलेले होते!
मलाच माझा लेख पुन्हा वाचावा
सहा वर्षे झाली या लेखाला. मलाच माझा लेख पुन्हा वाचावा लागला, आणि टायपोच टायपो पाहून "चोखेर बाली" होते आहे - नजरेतले खुपणे.
विस्तृत आणि मस्त प्रतिसादासाठी थॅंक्यू फा
आणि तुलाही ते खूप आवडलेले पाहून मलाच खूप छान वाटले. याचसाठी तर लेखनाचा अट्टाहास ! हो, अगदी व्हिज्युअली अपीलिंग अशी सुंदर घरं, फुलांच्या बागा, देखणी लोक आहेत. संथपणा बरोबर पकडून काळाच्या त्या ठहरावात आपल्याला नेलं आहे अनुराग बासूने. प्रकाशयोजना सुद्धा मंद आणि साजेशी आहे. सगळं सूदिंग वाटतं, आल्हाददायक!
टागोरांना हे जाणवलं असेल का ? -
मी जेवढं त्यांनी लिहिलेलं वाचलं आणि पाहिलं आहे, त्यांच्याबद्दल जेथे, जेथे वाचलं आहे, त्यांची त्यांनी घरातली स्त्रिया, मैत्रिणी यांना लिहिलेली - अशी पत्रे ( उतारे) वाचली आहेत, हा लेख लिहिताना जेवढा काही रिसर्च केला होता त्यावरून मला वाटतं हो जाणवलं असेल. कारण या सगळ्यावरून त्यांची जडणघडण, संवेदनशीलता व दृष्टीकोन लक्षात येतो. अर्थात तेही त्या काळाचेच प्रॉडक्ट होते, त्यामुळे आजच्या तुलनेत ते कुठेतरी वेगळे असेलही पण त्यामागे एक 'अवेअरनेस" आहे, अन्यायाबाबत सजगता आहे. ती जाणवते. ह्या सिरीज मधल्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर ते नक्कीच पोचते. जवळजवळ सगळ्या कथा नायिकाप्रधान आहेत आणि नायिका वेगळ्या आहेत त्यांच्या. त्या काळातील इतर स्त्रियांपेक्षा त्या पुढारलेल्या, कधी आधुनिक, कधी विचारी वाटतात. त्यांना एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. बिनोदिनी इतकी परस्वाधीन असून किती व्यवस्थित बांधलेले व एक कणखरपणा असलेले पात्र आहे, तशाच त्यांच्या बहुतांश नायिका आहेत. त्याच काळातल्या पण स्वतंत्र वैचारिक, बौद्धिक क्षमता असलेल्या! एका कथेवरून थीम त्या दृष्टीने प्रकर्षाने तशी वाटत नसेलही पण सगळ्या कथा पाहिल्यावर कुठेतरी हे आपोआपच झालेलं नाही असं लक्षात येतं.
कुणाला हवं असेल तर येथे लिंक
कुणाला हवं असेल तर येथे लिंक देऊन ठेवतेय. आधी नेटफ्लिक्सवर होते, अचानक यूट्यूब वर आले आहे. हा लेख "चोखेर बाली" या कथेवरचा आहे.
Stories by Rabindranath Tagore
Stories by Rabindranath
Stories by Rabindranath Tagore….
लिंकबद्दल थँक्यू अस्मिता.
पुन्हा बघणार.
माझ्या सुचवणीकडे बघा एकदा, तुमचा टेक वाचायला आवडेल.
अनिंद्य, तुमची ती पोस्ट कालही
अनिंद्य, तुमची ती पोस्ट कालही वाचली. सुचवणीबद्दल आभार! हो, लिहेन. मला तर आवडतंच लिहायला.
जय हो ! लिहा लिहा.
जय हो !
लिहा लिहा.
<<अर्थात तेही त्या काळाचेच
<<अर्थात तेही त्या काळाचेच प्रॉडक्ट होते, त्यामुळे आजच्या तुलनेत ते कुठेतरी वेगळे असेलही पण त्यामागे एक 'अवेअरनेस" आहे, अन्यायाबाबत सजगता आहे. ती जाणवते.>>
बरोबर. ही मालिका पाहुन आणि त्यांचे इतर काही वाचून त्या काळाच्या मानाने अन्यायाबाबत चांगलीच सजगता होती व इतर बाबतीतही काळाच्या मानाने विचारांनी चांगलेच पुढारलेले होते असे वाटले.
एक पटकन आठवलेले उदाहरण गुलजारचा मासुम चित्रपट. यात शबानाची घुसमट, उद्वेग समजुन घ्या तिला वेळ द्या, सहानुभूती ठेवा, ती आतुन प्रेमळच आहे असा संदेश वाटला. आणि सोबतच झाली एक चूक नसरूद्दीनची त्याने कबूलही केली, विषय संपला असाही संदेश वाटला.
हीच चूक शबाना कडुन झाली असती तर नसरुद्दीन आणि समाजातील इतरांनी त्याकडे असेच बघितले असते का यावर लेखकाने विचार केलाय का असे वाटले. पुण्यप्रभाव नाटक अजून एक उदाहरण म्हणता येईल की ते त्या काळाला, तेव्हाच्या समजांना धरूनच होते, पतिव्रतेचे त्याकाळी होत असणारे उदात्तीकरण त्यात होते.
टागोरांची ही मालिका मात्र त्यास काळाचा प्रभाव असूनही काळाच्या पुढे आहेत. काही शेवट मग काळाचे/समाज कितीपत स्वीकारेल याचे भान/दडपण ठेवुन झालेत की काय असे वाटले मला.
काही तसे न करता केलेले वाटले. याचे एक उदाहरण म्हणजे, मृणालची कथा. तिच्या नात्यातल्या लहान मुलीचा बिंदुचा विवाह एका वेड्याशी तिच्या सासरचे लावून देतात. तिला मदत करायला तिचा नवराही तयार नसतो. बिंदु शेवटी आमहत्या करते. मृणाल शेवटी असल्या पुरुषप्रधानतेला वैतागुन कायमची घर सोडून जाते.
जुनी पुस्तके वाचताना, चित्रपट पहाताना अशा गोष्टी जाणवतात, कुठे लेखकाने काळाच्या पुढे जाऊन, चौकट ओलांडुन विचार केला आहे, कितपत केला आहे वगैरे. कथा, चित्रपट , नाटक कसे वाटले याबद्दल बोलताना मात्र मी सहसा त्याबद्दल बोलत नाही.
असा वेगळा नेमका विषय याबद्दल असला की वाचायला, बोलायला आवडते.
चारुलता कथेमध्ये समान आवडीने झालेले आकर्षण एवढंच नाही. तिची इंटलेक्च्युअल भूकही भागत नाही. फावल्या वेळात पत्ते खेळणे, कसली घरकामे काढुन वेळ घालवणे अशी तिची भावजय, तिच्या सोबत हिला घुसमट होऊ लागते. नवरा सतत कामात गर्क.
कधीकधी असंही वाटतं की
कधीकधी असंही वाटतं की काळाच्या फारही पुढे जाण्याचा प्रयत्न करता येत नाही , समाजात राहून समाजाच्या कलाकलाने असे बदल घडवण्यासाठी प्रेरितं करणारं साहित्य निर्माण करावं लागतं. नाहीतर समाजाने बहिष्कृत केल्याने सगळंच वाया जाऊन आपणं अजून मागे जाण्याची भीती असते. कुठल्याही सिस्टीमला, यंत्रणेला त्या यंत्रणेच्या बाहेर राहून बदलता येणं अशक्यं होऊन बसते. त्यामुळे काही वेळेला सावधं रहाणे, नमते घेणे हीच दुरदृष्टी असते.
हा लेखातलाच परिच्छेद. मला अगदी तसेच वाटले. एखाद्याने कितीही योग्य असलेला बदल आपल्या कलाकृतीतून मांडायचा प्रयत्न केला तरी जबरदस्तीने तो पटवून देता येत नाही. ते सगळं उलटू शकतं आणि त्याला अजिबात ॲक्सेप्टंस मिळत नाही. पण तेच समाजाच्या कलाकलाने मांडून एक विचार म्हणून पेरलं तर ते नक्कीच मूळ धरू शकतं. हे एक धोरण आहे जे अतिशय वेगळ्या प्रतिभेचे आणि बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. ह्यात तुम्हाला अलिप्त राहून सगळं मांडता येतं आणि आपली कलाकृती सुद्धा पोचवता येते.
इजाजत पाहिला नाही. चारूलता बद्दल अनुमोदन. तिची भावनिक, बौद्धिक कोंडी होते आहे. हे मांडणं तेही त्या काळात खूप आधुनिक आणि दुर्मिळ आहे. मी दुसरीकडे चारूलता बद्दल लिहिले होते ते इथे चिकटवते. प्लेटॉनिक लव्ह ही कन्सेप्ट नवीन आहे. मृणाल की चिठ्ठी पण खूप सखोल आहे, आवडतेच ती. तिला स्वतःला बाळंतपणात मिळालेली वागणूक आणि एकंदरीत बिंदू वर झालेला अन्याय बघून ती निघून जाते. नवऱ्याची भूमिका नुसती बघ्याची असते.
>>>>>>पण तेच समाजाच्या
>>>>>>पण तेच समाजाच्या कलाकलाने मांडून एक विचार म्हणून पेरलं तर ते नक्कीच मूळ धरू शकतं. हे एक धोरण आहे जे अतिशय वेगळ्या प्रतिभेचे आणि बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. ह्यात तुम्हाला अलिप्त राहून सगळं मांडता येतं आणि आपली कलाकृती सुद्धा पोचवता येते.
प्रगल्भ विचार आहे हा. छान विचारमंथन.
स्वातीच्या "बिदेशिनी"
स्वातीच्या "बिदेशिनी" लेखामुळे चर्चा सुरू झाली होती, तेव्हा ते गाणे ज्या चित्रपटात आहे त्या नायिकेची- चारुलतेची कथाही- (नष्टनीड - The broken nest) परिचय स्वरूपात लिहिली होती, आता टागोरांचा विषय सुरू झाल्याने तेही येथेच चिकटवून टाकतेय.
ते प्रेमगीतच असावे. निदान कथेच्या संदर्भाने चित्रपटात ज्या वेळी येते ते एक आनंदी, मुग्ध वगैरेच असावे.
त्या मूळ बंगाली गाण्यातला अमोलचे पात्र साकारणारा फारच लेम वाटला, चारुलता मात्र खूप आवडली. त्याला किशोरच्या आवाजाची एनर्जी किंवा त्या कॅरेक्टरची एनर्जी दोन्ही जाणवलं नाही. रॅण्डमली किबोर्ड बडवत आहे. ही कथाच काव्यशास्त्रविनोदाच्या समान ओढीमुळे दीर आणि भावजयीत झालेल्या आकर्षणावर आहे. ह्या गाण्यातला जो काळ आहे, तो चारुलतेचा सर्वात आनंदी काळ आहे. तिला प्रथमच ती गवसली आहे. नवऱ्यासोबत तिची इमोशनल कॉम्पॅटिबिलिटी नसते व तोवर तिचं जीवन नीरस प्रकारात मोडत असते. ती अमोलपेक्षा छान गात असते व कविताही करत असते. पण स्वान्तःसुखाय, तो आल्यावर तिला ते सगळं ऐकणारा कान मिळतो. शिवाय ह्या सगळ्यात तिच्या इतकेच रमणारे कुणीतरी भेटते. तो तिच्याकडे आकर्षित झाला आहे की नाही हे शेवटपर्यंत कळत नाही, तिचं मात्र स्पष्ट असतं. ते त्याला लक्षात आल्यावर तो निघून जातो. हे नवऱ्याला लक्षात आल्यावर तो 'पुढे काय करायचं, ते तूच ठरव' म्हणून निघून जातो. ती पुन्हा एकटी पडते.
यात ब्रिटिशांच्या काळात वर्तमानपत्र चालवणे, त्यात नुकसान होणे, कर्जबाजारी होणे, पार्टनर किंवा चारुलतेच्या भावाने तिच्या नवऱ्याला फसवणे वगैरे सगळे समांतरपणे होऊनही तिचा नवरा यामुळे तिला कधीही दोष देत नाही. पण तो वर्षानुवर्षे यातच बिझी असतो. त्यामुळे विश्वासाने अमोलला म्हणतो 'तू आलास ना, तू शिकव चारुला गाणं. तिलाही गायला खूप आवडते.' तोही संशयी, टिपिकल नाही. चारुलताही उच्छृंखल किंवा अमोलही उथळ नाही. तरीही हे असे घडते. प्लेटॉनिक प्रेमाने मोडलेले घरटे म्हणून 'द ब्रोकन नेस्ट.'
नष्ट नीड बद्दलची पोस्ट सुंदर
नष्ट नीड बद्दलची पोस्ट सुंदर @ अस्मिता.
हा लेखातलाच परिच्छेद. >> ओह
हा लेखातलाच परिच्छेद. >> ओह यस. आणि हा परिच्छेदही आवडला.
कल्याणीची कथेत सुद्धा त्या काळच्या मानाने मजबूत टीका आणि संदेश आहे. हुंड्यावर आहेच, पण वधु, वधुपक्षाची प्रतिष्ठा आणि स्वाभिमान महत्वाचा आणि त्यात तडजोड करता कामा नये, मोठ्यांच्या दबावाखाली मुलांनी अन्याय होत असताना गप्प राहु नये . त्याला चूक कळल्यावरही कल्याणीला सामाजिक अपेक्षांपेक्षा आपले स्वातंत्र्य महत्वाचे वाटते आणि परत लग्नाला नकार देते. शेवटी मृणाल आणि कल्याणी दोघींनाही मला वाटते अशी पॅट्रिआर्की मान्य होत नाही आणि हे त्यांना आलेल्या अनुभवांवरून प्रगल्भ विचार करून त्या निर्णय घेतात.
इथे तू आज लिहील्यावर ती सगळी
इथे तू आज लिहील्यावर ती सगळी चर्चा आठवली बिदेशिनीवरची. आत्ता पुन्हा वाचून काढली. मला त्या एपिक टीव्हीवरच्या एपिसोडमधला अमोलही अगदीच अनुल्लेखनीय वाटतो. कदाचित त्यामुळेच मला ती कथा एंगेजिंग वाटली नाही.
अवांतर - स्वातीने तिच्या लेखात "अमल" असे नाव लिहीले आहे. त्याचा बंगाली उच्चार अमोल वाटतो का त्या कथेत? की ती अमृता पुरी (चारूलता) लाडे लाडे बोलल्यासारखी उच्चार करते म्हणून?
किती छान चर्चा सुरू आहे.
किती छान चर्चा सुरू आहे. वाचतेय.
टागोरांच्या ह्या कथा फार आवडल्या पाहिल्या तेंव्हा.
ऐशवर्या राय चा १ चित्रपट पण आला होता ना टागोर कादंबरी वर?
चारूलता बद्दल मला असे वाटते:
चारूलता बद्दल मला असे वाटते:
त्यात प्लेटोनिक प्रेम दाखवले आहे. ते होण्याचे मूळ आणि ठळक कारण चारुलताच्या भावनिक आणि बौद्धिक गरजांचे होणारे दुर्लक्ष. लग्न झालं आणि त्या सोबत पत्नीला भौतिक सुख-आराम मिळाला की झालं असं नव्हे. तिची भावजय अशा आयुष्यात समाधानी आहे, तिच्या वेगळ्या गरजा नाहीत किंवा तिला जाणीव नाही. चारूलताचा मात्र होणाऱ्या भावनिक व बौद्धिक गरज्यांचा दुर्लक्षामुळे कोंडमारा होतो. दीर तो दूर करतो त्यामुळे ती त्याच्याकडे आकर्षित होते. पतीनेच तो दूर केला नाही पण अमोल ऐवजी तिचा कोंडमारा दूर करणारी घरात एखादी सखी तिला भेटली असती तर?
घरटे मोडले नसते कदाचित. घरटे मोडण्याचे मुख्य कारण भावनिक व बौद्धिक गरजा पूर्ण न होणे, त्याही फार महत्वाच्या आहेत, दुर्लक्ष करून भागणार नाही असे टागोरांना सांगायचे आहे असा अर्थ मला लागला.
थॅंक्यू अनिंद्य, आशु आणि सामो
थॅंक्यू अनिंद्य, आशु आणि सामो.
हो आशु, तोही चोखेर बालीच.
मानवदादा, छान लिहिताहात. पॅशनेटली.
तुमच्यामुळे मला पुन्हा पाहावी वाटतेय सिरीज.
कल्याणी आणि मृणाल मधे साम्य आहे खरं. दोघींचाही विश्वास उडतो संसारावरचा. अमोल ऐवजी कुणी स्त्रीही- सखीही चालली असती. सोशल मीडिया वर आपणही ज्या गरजेपायी येतो त्याच्याशी खूप साम्य वाटतं. शिवाय टागोरांनी उगाच चारित्र्याशी मूल्यमापन करून हे जोडलं नाही ह्यात सगळं येतं. ती गरज ॲक्नॉलेज करणं आणि तिची पूर्तता होणं स्त्रियांसाठीही आवश्यक असतं हे अधोरेखित करणंच मला काळाच्या फार पुढचे वाटले.
फा,
अमोल सगळीकडेच चारुलतेच्या मानाने साधारण वाटतो रूपानेच नाही तर गुणाने, बुद्धीने सुद्धा. पण तो तिला काही तरी छान देऊन जातो. बंगाली उच्चार अमोल आहे का नावच अमोल आहे हे कळालं नाही कारण दोन्हीकडे वेगवेगळे आहे. बिदेशिनी आणि ह्यात.
>>> काव्यशास्त्रविनोदाच्या
>>> काव्यशास्त्रविनोदाच्या समान ओढीमुळे
>>> भावनिक व बौद्धिक गरजा पूर्ण न होणे, त्याही फार महत्वाच्या आहेत, दुर्लक्ष करून भागणार नाही
अनुमोदन. ही गरज कुठे भागेल याला काही गणित नसतं, पण मुळात तिला ऑप्शन्सच किती मोजके आहेत! जावानणंदांच्या गप्पांत मन न रमणारी नायिका बंगाली कलाकृतींत खूपदा दिसते. 'साहब, बीबी और गुलाम'मधली मीना कुमारीने अजरामर केलेली बहूदेखील 'गहने बनवाओ, गहने तुडवाओ' रूटीनमध्ये तिचा जीव रमत नसल्याचं सांगताना रडकुंडीला येते. आत्ता हे लिहितानाच मला टायटॅनिकमधली कलासक्त आणि टी पार्टीजना विटलेली रोजही आठवली.
ऑप्शन्स लिमिटेड का आहेत, कारण काव्यशास्त्रविनोदात रमणार्या बायका आजूबाजूला कमी. का कमी? कारण ती पुरुषांची राखीव कुरणं.
या बायका व्यवस्थेच्या चाकोरीत न फिट होणार्या - आऊटलायर्स आहेत!
'अमल' नाव मी बहुधा गुडरीड्सवरच्या चारुलताच्या रीव्ह्यूजमध्ये वाचलं होतं, ते अमोलही असू शकेल - मूळ पुस्तक न वाचल्यामुळे कल्पना नाही.
कारण ती पुरुषांची राखीव कुरणं
कारण ती पुरुषांची राखीव कुरणं.
या बायका व्यवस्थेच्या चाकोरीत न फिट होणार्या - आऊटलायर्स आहेत!
--------->
हा मला बऱ्याच वर्षांपासून पडलेला प्रश्न आहे. फारच कमी स्त्रिया यात मोडतात. बऱ्याच जणींना जळीस्थळीकष्ठीपाषाणी "अरे संसार संसार" करायला आवडतं आणि त्यातच त्यांची गरजही भागते, बहुतांश ह्याच गटात येतात. जे तुम्ही घरी करता तेच तुम्ही बाहेरही कसं करू शकता तेही सातत्याने आयुष्यभर- असं वाटतं. तू लिहिलेल्या नायिकांचा जीव गुदमरतोय त्यात. संसारापेक्षा जास्त काही हवं असणाऱ्यांचं कौतुक वाटतं.
अगदीच बालिश प्लॉट आहे, इकडचे
अगदीच बालिश प्लॉट आहे, इकडचे तिकडे करत रहायचे, यात महान काय समजले नाही
Pages