रवींद्रनाथांची नायिका : बिनोदिनी

Submitted by अस्मिता. on 11 December, 2020 - 19:23

रवींद्रनाथांची नायिका : बिनोदिनी

पश्चिम बंगालबद्दल प्रचंड, प्रचंड आकर्षण वाटतं त्याची मुख्य कारणं म्हणजे रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, दक्षिणेश्वरी , रवींद्रनाथ टागोर व शांति निकेतन ... मी मागच्या जन्मी बंगाली होते बहुतेकं !

रवींद्रनाथांनी ज्या पद्धतीची लेखन व काव्यनिर्मिती केली आहे , केवळ अद्भुतं ! त्यांच्या नायिका तर आजही खऱ्या वाटतात , कालबाह्य असूनही त्यांचे प्रगल्भ व्यक्तिमत्त्व कुठेतरी मनात मुरतंच. कालबाह्य म्हणताना वाटतं की खरंच अगदिच कालबाह्य आहे का कारण अजूनही फार मोठा पल्ला गाठायचा आहे स्त्रियांना , माझ्या दृष्टीने ज्याला ध्येय म्हणता येईल ते कधीकधी एक प्रकाशवर्ष दूर आहे असं वाटतं. सध्या समाज म्हणून ढोबळमानाने आपण, दारू पिऊन मारत "तर" नाही/ नोकरी "करू" देतो / "शिकू" देतो / बाहेरचं "सुद्धा" खातो / मतं "सुद्धा" विचारतो / घरात "मदत" करतो म्हणजे मी/हा मर्यादा पुरूषोत्तम आहे या स्टेशनावर कुठेतरी लटकतं आहोत. ही मर्यादा पुरूषोत्तम उपमा लिंगनिरपेक्ष आहे हं ! कुठेतरी स्त्रियांनी पण या मान्यतांना रूढी/दैव/नैसर्गिक कल समजून यांचे पोषण केलं असणारंच म्हणूनच ते ध्येय प्रकाशवर्ष . नाहीतर मगं मला बिनोदिनी आणि चारूलताला अजिबात समजून घेता आलं नसतं नाही का , पणं येतयं..यातचं काय ते आलं.

रवींद्रनाथांच्या या दोघी नायिका माझ्या सर्वांत आवडत्या , या दोघींपैकी एकीला निवडणे म्हणजे माझा कुठला डोळा मला अधिक आवडतो हे ठरवणे , तरीही मी 'चोखेर बाली'तल्या बिनोदिनी पासून सुरवात करतेयं.
'चोखेर बाली' ही कथा चार व्यक्तिरेखांभोवती फिरते पण एक पाचवी अदृश्य व्यक्तिरेखा आहे याकथेत ती म्हणजे त्याकाळातले विधवांचे जीवन. ते सतत अवतीभवती असतंच ज्याच्यामुळे कुणालाचं न्यायं मिळत नाही , रादर मिळणार नाही हे माहिती असूनही आपणं गुंतत जातो. कारण या व्यक्तिरेखांचे ते गुणदोष आपण स्वतःतं बघू शकतो.

1_28wGh8oy0Wxovjii10MzqQ.jpeg.jpg

बिनोदिनी , बिहारी, आशालता व महिन्द्रबाबू (महिन) या चौघांची ही कथा आहे. महिन हा एक स्खलनशील, स्वतःव्यतिरिक्त कुणावरही प्रेम नसणारा आत्मकेंद्री तरुणं आहे. ज्याच्या विधवा आईने त्याला एकट्याने लाडाकोडात वाढवून प्रसंगी इतरांना त्याच्यासाठी त्याग करायला भाग पाडले आहे. बिहारी हा त्याचा जवळचा मित्र आहे पण महिनने वेळोवेळी त्याचा फक्त वापर केला आहे. बिहारीचे सौजन्य इतके मोठे आहे की हे लक्षात येऊनही हे नाते त्याने टिकवलयं.

महिन हा उच्चशिक्षित असल्याने त्याची आई त्याचे लग्न त्याला आवडेल अशा तिच्याचं जवळच्या मैत्रिणीच्या अनाथ मुलीशी बिनोदिनीशी ठरवते. बिनोदिनी ही त्या काळाच्या मानाने बरीच शिकलेली व गायनवादनात प्रविण अशी सुविद्य व सुस्वरूप तरुणी असते. पण महिन तिला न बघताचं लग्नाच्या चार दिवस आधी 'मी लग्नासाठी तयार नाही' हे कारण पुढे करून लग्न मोडतो. याकारणाने बिनोदिनीचे लग्न कुणाशी तरी उरकण्यात येते व तिच्या नशिबी लगेचच वैधव्य येते. या काळात बिहारीसाठी पण एका अशिक्षित खेडूत मुलीशी आशाशी विवाहाचा प्रस्ताव येतो. आशा बिहारीला आवडते पण महिन आशाच्या मोहात पडून स्वतःच बोहल्यावर उभा रहातो. महिनच्या आईला आशा कधी आवडलेलीचं नसते , नंतर महिन दुरावल्याचे कारण आशाचं आहे असं वाटून महिनची आई दुसऱ्या गावी निघून जाते जिथे त्यांना बिनोदिनी भेटते. कुठेतरी त्या बिनोदिनीच्या अशा परिस्थितीला स्वतःला जबाबदार मानतात व तिच्याशी जवळीकं वाढवतात. स्वभावातल्यां गोडव्यानी व गुणांनी बिनोदिनीही त्यांना आपलेसे करते.

केवळं बिहारीने आर्जवं केल्याने महिन स्वतःच्या आईशी पत्रव्यवहाराद्वारे संपर्कात रहातो. ती सगळी पत्रं व त्यातील महिन व आशा यांच्या सुखी वैवाहिक जीवनाची वर्णनं बिनोदिनी त्यांना वाचून दाखवतं असते. इथेचं मत्सराग्निची ठिणगी पडते. जे सुख आज माझं असतं ते आज कुणीतरी अशिक्षित मुलगी भोगतेयं या विचाराने बिनोदिनी अस्वस्थ होते. आपल्यालाही हे पटतं, हळूहळू याचं मत्सराग्निने प्रतिशोधाचा वणवा पेटतो.

बिनोदिनी मनाशी काहीतरी निश्चित ठरवून महिनच्या आईसोबत त्यांच्या घरी येते. तिथे ती भोळसट आशाशी मैत्री करते , त्या हेतुपुरस्सरं मैत्रीला ती 'चोखेर बाली' हे नावंही देते , सरळसरळ अर्थाने डोळ्यातलं खुपणं , पणं हे 'तुझे सुख मला नाही नं बघवतं', या अनुशंगाने आहे. बिनोदिनीकडे रूपगुणबुद्धी सर्व तर आहेच शिवाय ह्याची तिला सार्थ जाणीव सुद्धा आहे. ही जाणीव कथेत तिला आणखी डिझायरेबल , हवीहवीशी बनवते. त्यामुळे कुठेतरी याचा तिनं स्वतःच्या इच्छा पुऱ्या करण्यासाठी वापरं करणं सहजं वाटतं. शिवाय महिन व बिहारी यांच्या बौद्धिकचर्चेत ती व्यवस्थित भाग घेऊ शकते, आशा नाही. आशा स्वतःहून कुठेतरी अलिप्त होतं जाते. त्यामुळे महिनला , जो आधीच नीतीमुल्यांच्या बाबतीत यथातथाच आहे , प्रेमात-मोहात पाडणं तिच्यासाठी फारचं सोपं होतं. महिन व बिनोदिनीचे कायिक प्रेमसंबंध होतात पण त्यावेळेस ती बिहारीकडे खरोखरचं आकृष्टं होते. त्याच्याशी तिला मनमोकळे बोलता येत असते. फक्त दुस्वासी महत्त्वाकांक्षेपोटी ती महिन सोबत असते , ते प्रेम नसतं... ना महिनचं कुणावरं प्रेम असतं ना आशावर ना बिनोदिनीवर ना बिहारीबद्दलं त्याला काही वाटत असतं !

MV5BMWI1ZTcyOTEtY2Q3Ni00YmUyLWI2ZWMtNzlkNGQ2YTMyZjZmXkEyXkFqcGdeQXVyMzU4MTE1OTM@._V1_.jpg

बिनोदिनीसाठी महिन आशाला माहेरी जायला भाग पाडतो. इकडे त्याच्या आईला ह्या गोष्टींची कुणकुण लागते. बिहारीला स्वतःलाही बिनोदिनीबाबतं नक्की काय वाटते हे कळत नसल्याने तो आशा आणि महिनच्या संसारात विष कालवल्याबद्दल बिनोदिनीला अपराधी मानतो व तिथून निघून जातो. प्रतिशोधाचा वणवा शांत झाल्याने बिनोदिनीला हे निरर्थक आहे हे लक्षात येते. तोपर्यंत तिची "कीर्ति" समाजात पसरते , ती विधवाश्रमात निघून जाते. तिथेही महिन तिच्या मागे येतो व तिला एकत्र होण्यासाठी विनवण्या करतो . त्याच्या मदतीने रागावून निघून गेलेल्या बिहारीला शोधता येईल असे वाटून बिनोदिनी खोटंच तयार होते. हे कळल्यावरं महिन कपटाने त्यांची भेट होऊ देत नाही व तिला सोडून परत आशाकडे येतो. आशाशिवाय त्याला कुणी नाही हे त्याच्या लक्षात येतं. आशा आणि आई ह्या तर आनंदाने त्याचा स्वीकार करण्यास तयारचं असतात.
MV5BOTk4OWI0MjctNjdkMy00OWY1LWIzZDMtZDQxZDhmNmU1YmU0XkEyXkFqcGdeQXVyODI1ODQ2MzY@._V1_UY1200_CR751,0,630,1200_AL_.jpg

निर्धनं व निराधारं बिनोदिनीचे आयुष्य पुन्हा मांजा तुटलेल्या पतंगासारखे दिशाहीन होते. तिच्या आधुनिक विचारांमुळे तीन पांढऱ्या साड्यांचे चौथ्या पांढऱ्या साडीतले गाठोडं घेऊन या विधवाश्रमातून त्या विधवाश्रमात तिची हकालपट्टी होतं असते. अचानकचं कित्येकं वर्षांनी एका स्टेशनवर तिची बिहारीशी भेट होते. महिनने बिहारीलाही बिनोदिनी टायफॉईडमध्ये निवर्तली असं सांगितलं असतं. या अचानक भेटीने मनं पुन्हा स्वच्छं होतात. इथेचं बिनोदिनी म्हणते की मी जरं सुशिक्षित विचारी नसले असते तर बरं झालं असतं निदान समाजाच्या उपेक्षा अन्याय वाटल्या नसत्या व दैव समजून सहन करनं सोपं झालं असतं. बिहारीला चुकवून इथूनही ती निघून जाते. विधवांच्या विकासासाठी उर्वरित आयुष्य वेचते. या गोष्टीचा अंत बिनोदिनीच्या आयुष्यासारखाचं अधांतरी रहातो.

*******

रवींद्रनाथांना एक संवेदनशील लेखक म्हणून याचा शेवट बिहारी व बिनोदिनी एकत्र आलेले दाखवण्याचा मोह झाला असणारचं , अशी वदंताही आहे. पणं या कथेने सुद्धा गदारोळ झाला होता , त्या काळात विधवेला नायिका करून तिच्या इच्छांना अधोरेखित करनं सुद्धा साहस होतं. कधीकधी असंही वाटतं की काळाच्या फारही पुढे जाण्याचा प्रयत्न करता येत नाही , समाजात राहून समाजाच्या कलाकलाने असे बदल घडवण्यासाठी प्रेरितं करणारं साहित्य निर्माण करावं लागतं. नाहीतर समाजाने बहिष्कृत केल्याने सगळंच वाया जाऊन आपणं अजून मागे जाण्याची भीती असते. कुठल्याही सिस्टीमला, यंत्रणेला त्या यंत्रणेच्या बाहेर राहून बदलता येणं अशक्यं होऊन बसते. त्यामुळे काही वेळेला सावधं रहाणे, नमते घेणे हीच दुरदृष्टी असते.

महिन, आशा व आईकडे पर्यायाने समाजात मानाने परत जाऊ शकला. पुरुषानं मर्यादांची कितीही मोडतोड केली, तरी त्याला ती क्षम्य , कारण क्षमा करायला स्त्री आहे हा आग्रह व विश्वास! उद्या जर या मर्यादा स्त्रीचं झुगारून द्यायला निघाली, तर सगळ्यां व्यवस्थाच निराधार व्हायच्या. हे मोठे संकटच नाही का, त्यापेक्षा स्त्रीनं कसं सदैव आज्ञाधारक राहावं. हळवं बोलावं, गहिवरावं, हुंदके द्यावेत, तळमळावं, त्याकरता आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या परावलंबी रहावं हे सर्वांच्या सोयीचं होतं . या सोयीला संस्कृती असं गोड नाव देऊन ठेवलयं. 'या'ला संस्कृती मानण्याने खरी संस्कृती कोणती हेही कळणार नाही. हे त्याकाळातं तर असायचं , दुर्दैवाने अजूनही हे चित्र दिसतंच.

जेव्हा जेव्हा तू स्त्री आहेस म्हणून तुला स्वयंपाक/संसार/ संगोपन/नटनंमुरडणं/दागदागिने/साड्या/कुलधर्म कुलाचार/पाहुणचार इत्यादी आवडले"च"/ केलं"च" पाहिजे असं कुणी विचार करतं असलं की उलट्या दिशेने पण
बिनोदिनीची चरफडं किंचित समजून घेता येते. पुन्हा काही गोष्टींना किंमत दिली नाहीचं तर त्यावरं स्त्री म्हणून जोखलेले योग्य वाटत नाही. स्त्रीपुरुष सर्वांना नीतीमुल्यांचे एकचं परिमाणं असनं आदर्श वाटतं. एखादी गोष्ट स्त्रीने फक्त ती स्त्री आहे म्हणून केलीच पाहिजे किंवा नाहीच केली पाहिजे ह्या दुराग्रही चौकटी पटत नाहीत. चौकटी नकोच !!

प्रदीर्घकाळं घेतलेली अशी छोटी छोटी पावलंही मैलाचा दगड ठरू शकतात. ही कादंबरी १९०३ साली लिहिली होती , त्यानंतर शरदचंद्र चट्टोपाध्याय यांनी 'चरित्रहीन' ही विधवांवर , नायिकाप्रधान असणारी यापेक्षा पुढचं साहसं असणारी कादंबरी १९१७ साली लिहिली. कुठेतरी त्या मागची प्रेरणा बिनोदिनी असेलही !

मी 'चोखेर बाली' कादंबरी वाचलेली नाही. त्या कादंबरीबद्दलं वाचलंय व नेटफ्लिक्सवरीलं
'स्टोरीज ऑफ रवींद्रनाथ टागौर' या मालिकेची पारायणं केली आहेत. राधिका आपटेने सुरेखं काम केलयं. या लेखात 'बिनोदिनी' या व्यक्तिरेखेच्या आकलनात काही त्रुटी किंवा अपूर्णता असतीलही , तरीही मी या कथेबाबत केवळं मला आस्था आहे म्हणून लिहिलंय. बिनोदिनीचे व तिच्यासारख्यां अनेक खऱ्यां नायिकांचे सुद्धा आभार कारण त्यांच्यामुळे मी बऱ्याचं गोष्टींकडे कृतज्ञतेने बघू शकते.

आभार Happy !
©अस्मिता

*संदर्भ

* In Chokher Bali, Tagore draws parallels between the educated and the uneducated through Asha and Binodini. According to Mary Wollstonecraft “girls that have been… weakly educated are often left by their parents without any provisions”. Binodini is likewise left without any financial provision, but is left with education which allows her the liberty of free thinking. Binodini represents a new female subjectivity whom western education transforms into a woman with her own heart and mind, and is not tied to traditional customs. 

*https://stateoftalent.org/topic/fa7413-book-review-of-rabindranath-tagore

* https://www.google.com/amp/s/feminisminindia.com/2019/02/15/chokher-bali...

* चित्रं आंतरजालावरून साभार.
वेमा प्रताधिकार भंग होत असतील तर सुचवणे, काढून टाकण्यात येतील. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही या यादीतील लोकांविषयी अपार आदर आहे सनव Happy
जिद्दु रोचक पोस्ट पण मी पडघवली , दास डोंगरी रहातो , मोगरा फुलला , कुणा एकाची भ्रमणगाथा लक्षात ठेवणारे Happy
थोर लेखकांची कारणं शोधत बसण्यापेक्षा अधिक चांगले वाचक होण्याचा प्रयत्न करावा , ते बरंय , वाचायची आपली पण कारणं असतात की ! जे आवडलं ते घ्यावं. Happy
--------
चोखेर बाली या कथेच्या अनुषंगाने प्रतिक्रिया येऊद्या.
इतर अवांतर पुरे करा मित्रमंडळी Happy (माझ्यासहित Wink )
आभार.

रवींद्रनाथ टागोर यांच्या तुमच्या आवडत्या नायिका व कथांविषयी जरूर सांगा व चर्चा करा.
धन्यवाद.

रविंद्रनाथांची एक गोष्ट अस्पष्ट आठवते (काही चुकले असल्यास आठवण करून द्या) - दोन भाऊ व त्यांच्या दोन पत्नी असतात. एक भाऊ बायकोला मारतो, ती मरते. दुसरा भाऊ पत्नीला तू आळ घे सुचवतो व तुला शिक्षा होणार नाही असे काहीसे पटवतो. कोर्टात मात्र तो जबानी बदलतो. भाऊ रागावतो तर पत्नी दुसरी मिळेल, भाऊ एकच असतो असे काहीतरी विषण्ण करणारे म्हणतो. कोर्टात तिला खरं सांगायची संधी असते पण अशा पतीकडे राहण्यापेक्षा फाशी बरी म्हणून ती न केलेला गुन्हा मान्य करते. त्या काळात स्त्रीला पतीशिवाय रहाणे शक्य नसल्याने फाशी बरी अशी अवस्था. खूप गलबलं होतं ती कथा वाचून. रविंद्रनाथांची वाटलीच नव्हती.

किती दुःखद आहे हे , किती मोठा विश्वासघात !
मला तरी नेटफ्लिक्सवरच्यासिरीज मध्ये ही कथा नाही बघितल्यासारखी वाटतं...

अस्मिता मस्त लिहिलंय.

एपिकवर हि सिरीज होती, त्यात चोखेर बाली बघायची होती पण राहून गेलं. कधीतरी मध्ये एकदा बघितलं तर काही समजलं नाही, राधिका आपटे कुठेतरी पायऱ्यांवर बसलेली असते, नंतर कोणाला तरी बघून लपत असते. शेवटच्या काही एपिसोड्स मध्ये असावं बहुतेक.

मी शाळेत असताना मला बंगाली भाषेचं आकर्षण वाटायचं पण मग ते कधी मागे पडले समजलं नाही मला. नंतर कन्नड शिकावं असं वाटलं त्यामुळे एक डायरी केलेली, पुस्तक पण छोटं आणलं. आमच्या ओळखीच्या एक काकू म्हणजे आमचे जुने शेजारी, त्या आल्या की शब्द विचारायचे, लिहून ठेवायचे मग तेही मागे पडले. सातत्य नाही माझ्याकडे, आरंभशूर.

संस्कृती, साहित्य सर्व भारतीय भाषेतील जाणून घ्यायला, अगदी परदेशीसुद्धा आवडायचं.

बंगालीत आकर्षक काय वाटायचं मला ते आठवताना हसू येतं आता, मला मसाला पान खूप आवडतं आणि सणासुदीला आमच्याकडे जेवल्यावर असायचं. बंगालमध्ये घरातल्या बायका मस्त पान खात बसतात येता जाता, त्यांचे ते डबे उघडून नजाकतीने पान खाणे, अरे वा कित्ती छान वाटायचं. असं मसाला पान निदान दोनदा तरी रोज खायला मिळायला हवं आणि दुसरे तो साडीच्या टोकाला बांधलेला किल्ल्यांचा गुच्छ (जुडगा) अशा काही उडवत खांद्यावर टाकायच्या ना की बास रे बास. हे शाळेत अगदी पाचवी सहावीत असताना वाटलेलं आकर्षण.

@अन्जुताई
बंगालमध्ये घरातल्या बायका मस्त पान खात बसतात येता जाता, त्यांचे ते डबे उघडून नजाकतीने पान खाणे, अरे वा कित्ती छान वाटायचं.>>>
आमच्याकडेही होता बरं तसा पानसुपारीचा कडी असलेला पितळीडबा , आईकडे अजूनही रोज वापरतात ,
आहे खरं ग्रेसफुल किंवा अदबशीर वगैरे ... तुझ्यामुळे आठवला.
त्या साडीत तर प्रत्येक स्त्री एक सुंदर ठकुरायन वाटते. Happy

पहिले तीन एपिसोड आहेत त्यात, चोखेर बालीचे .
धन्यवाद अन्जुताई.

हो कोकणात पण असायचे तसे डबे, सासरी आहे आजे साबांचा चांदीचा का पितळेचा पान सुपारीचा डबा. पण कोकणातल्या सरसकट यंग बायका पानसुपारी खाताना दिसायच्या नाहीत, त्या बंगालमध्ये दिसायच्या (म्हणजे पिक्चर किंवा सिरीयलमध्ये तरी दिसायच्या). माझी कोकणातली आजी पानसुपारी खाताना कधी दिसली नाही.

अस्पष्ट आठवत असलेल्या कथेचं नाव शोधाशोध केली - शास्ति (Shasti, उच्चार काही वेगळा असेल षश्ती इ). नेटफ्लिक्सवर सीझन १ मध्ये ८वा भाग पनिशमेंट म्हणून आहे. त्यात ती शेवटी काही न बोलता फाशी जाते. मी डीडी किंवा तत्सम कुठेतरी पाहिलं/वाचलं होतं त्यात ती 'कोण पती?' असे विचारून फाशी जाते. एरवी रविंद्रनाथांच्या कथेत सगळे प्रेमाने असतात, असलीच तर परिस्थिती (दारिद्र्य, आजार, इंग्रज इ) सहसा व्हिलन असते. ही कथा फार वेगळी वाटली होती.

@सीमंतिनी
तुला लोभी आजोबांंची कथा माहिती आहे का फारच वेगळी , भयानक आहे.... टागोरांनी वेगळी लिहिली आहे. अभद्र आहे एकदमच. (स्त्री व्यक्तिरेखा नाही यात)

एक अमानवीय पण आहे. दागिन्यांच्या मोहात एक स्त्री कशी बळी पडते. मगं तिचा वावर दिसतो नवऱ्याला.. तोही मरतो मागे मागे जाऊन आणि नेहमी त्या तळ्याकाठी उभा दिसतो.

या दोन्ही हटके आहेत त्या सिरीजमध्ये. बाकी बहुतेक स्त्रीप्रधान आहेत.

शष्टी असेल का ते , स चे श किंवा ष म्हणून...
यात टी इस्टेट वरून वाद दाखवलायं का , त्यात दोन जावांचं पटत नसतं. मला का आठवत नाही माहिती नाही. पुन्हा बघते.

मला आठवते आहे ती गोष्ट. त्या मालिकेत एकातून एक गोष्टी सुरू होताना दाखवल्या आहेत. ही गोष्ट काबुलीवाला नंतरची आहे.

काय सुरेख लिहीले आहेस अस्मिता.
अगं परवाच परत डोळसपणे ही मालिका पहायला घेतली. 'विनोदिनी' गुणावगुणांनी विणलेले, मानवी पात्र आहे. मानवी स्वभावाचे कंगोरे तिच्यात स्पष्ट दिसतात विशेषतः त्या काळातील, विधवांच्या दॄष्टीकोनामधून.
ललिता प्रीती यांनी एका प्रतिसादात, वर्णन केलेले 'जानकी' चे पात्र परत पहायचे आहे म्हणुन ही मालिका परत पहायला घेतली आहे. काय मधुर संगीत आहे.
'विनोदिनी'चा रागही येतो, तिचे वागणे पटतेही, वाईटही वाटते. अनेक संमिश्र भावना मनात येतात. टॅगोरांचे, हे जे मनात तरंग उमटविण्याचं कसब आहे - फार आवडते.

खूप आवडला हा परिचय. बिनोदिनी बद्दल नेमकं लिहीलं आहे. रविंद्रनाथ टागोरांच्या व्यक्तिरेखा आणि त्यांच्या कथांबद्दल लिहीलंय ते पण पटलं. काळाच्या फ्रेम मधे त्यांच्याकडे पहायला हवे. बंगाली साहीत्य, सिनेमा खूप समृद्ध आहे. त्याला रविंद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र, सत्यजित रे अशा दिग्गजांनी खतपाणी घातलेलं आहे.
रविंद्रनाथांच्या इतर स्त्री- व्यक्तीमत्वांबद्दल वाचायला आवडेल. लिहीत रहा.

>>>>बंगाली साहीत्य, सिनेमा खूप समृद्ध आहे. त्याला रविंद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र, सत्यजित रे अशा दिग्गजांनी खतपाणी घातलेलं आहे.>>>> खरे आहे.

Pages