आठवणींतील काही : सुरस आणि चमत्कारिक

Submitted by हेमंतकुमार on 5 November, 2020 - 01:09

बातम्या हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेला आहे. सध्या तर वृत्तमाध्यमांचा अक्षरशः महास्फोट झालेला आहे. आपण विविध बातम्या रेडिओ, वृत्तपत्रे, टीव्ही आणि आंतरजाल या सर्व माध्यमांमधून ऐकत, वाचत किंवा पाहत असतो. असा एखादाही क्षण जात नसेल, की जेव्हा एखादी बातमी आपल्या पुढे येऊन आदळायची थांबली आहे. काही वेळेस तर हे अजीर्ण होते. एकंदरीत बातम्यांमध्ये नको एवढी संख्यात्मक वाढ झाल्यामुळे त्यांचा गुणात्मक दर्जा मात्र यथातथाच झालेला आहे. या मुद्द्यावर आपण अन्यत्रही यापूर्वी चर्चा केलेली आहे. पण आज तो विषय नाही. आज मी तुम्हाला टीव्हीपूर्व काळाकडे घेऊन जाऊ इच्छितो. तेव्हा सामान्य माणसासाठी बातम्या समजण्याचे दोनच मुख्य स्त्रोत होते - एक रेडिओ आणि दुसरी वृत्तपत्रे. रेडिओचा बातम्याप्रसार हा तसा पहिल्यापासूनच संयमित राहिलेला आहे. ते त्या माध्यमाचे अंगभूत वैशिष्ट्य आहे. वृत्तपत्रांमध्ये मात्र अगदी आमूलाग्र बदल दशकांगणिक झालेले दिसतात. त्याकाळी वृत्तपत्रे कमी पानांची असत. मुख्य म्हणजे वृत्तपत्राचे पहिले पान भल्यामोठ्या पानभर जाहिरातीने सुरू न होता खरोखरच महत्त्वाच्या बातम्यांनी उठून दिसे. सकाळी उठल्यानंतर घरी आलेले वृत्तपत्र आधी आपल्या ताब्यात यावे यासाठी कुटुंबीयांमध्ये देखील स्पर्धा असायची. बातम्या आवडीने, चवीने आणि बारकाईने वाचल्या जात.

अशा असंख्य बातम्या आतापर्यंतच्या आयुष्यात वाचल्या गेल्या आहेत. संस्कारक्षम वयामध्ये वाचलेल्या बातम्या अनेक प्रकारच्या होत्या. काही नेहमीच्या किरकोळ तर काही ठळक घडामोडींच्या. काही सुरस तर काही चमत्कारिक; काही थरकाप उडवणाऱ्या तर काही मनावर खोलवर परिणाम करणाऱ्या. अशा काही बातम्यांच्या निवडक आठवणी आज तुमच्यापुढे मांडत आहे. शैक्षणिक वयामध्ये आकर्षक वाटलेल्या अनेक बातम्यांची कात्रणे कापून ठेवलेली होती खरी, परंतु कालौघात आता ती कुठेतरी गडप झालेली आहेत. आता जे काही लिहीत आहे ते निव्वळ स्मरणावर आधारित आहे. त्यामुळे तपशीलात थोडाफार फरक झाल्यास चूभूदेघे.

सुरुवात करतो एका रंजक वृत्ताने. अंदाजे ४० ते ४५ वर्षांपूर्वीचे. बातमीचा मथळा असा होता:

“आंतरराष्ट्रीय टक्कलधारी संघटनेचे अधिवेशन”

तर या संघटनेचे एक विशेष अधिवेशन अमुक तमुक ठिकाणी भरले होते. त्या परिषदेचे उद्घाटन भारताचे (तत्कालीन) राजदूत इंद्रकुमार गुजराल यांनी केले होते. या परिषदेत माणसांच्या- म्हणजे विशेषतः पुरुषांच्या- टक्कल या विषयावर रोचक चर्चा झाली. देशोदेशींचे अनेक टक्कलधारी लोक या परिषदेस आवर्जून हजर होते. त्यातील एका विशेष कार्यक्रमात विविध सहभागींना त्यांच्या डोक्‍यावरील टकलाच्या आकार व तजेल्यानुसार ‘सनशाइन’, ‘मूनशाइन’ अशा मानाच्या पदव्या देण्यात आल्या ! आपल्या अध्यक्षीय भाषणात गुजराल म्हणाले, की माझ्या घरात टक्कलाची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालू असून मला तिचा सार्थ अभिमान वाटतो. एकूणच टक्कल हे माणसाचे वैगुण्य न समजता वयानुरूप होणारा शोभिवंत बदल समजण्यात यावा या मुद्द्यावर चर्चेचे सूप वाजले.

ही खूपच रंजक बातमी होती यात वाद नाही. आतापर्यंत मी अशी बातमी एकदाच वाचली. त्यानंतर या संघटनेची वार्षिक अधिवेशने वगैरे झाली का नाही, याची काही कल्पना नाही. जाणकारांनी जरूर भर घालावी.

एक बातमी आठवते ती शहरी स्त्रियांच्या वेशभूषेतील क्रांतिकारी बदलाबद्दलची. किंबहुना एका घटनेची जुनी आठवण म्हणून ती छापली गेली होती आणि माझ्या वाचनात आली. प्रत्यक्ष ती घटना घडल्याचा काळ माझ्या जन्मापूर्वीचा आहे. तो सामाजिक बदल आहे, शहरी स्त्रीने नऊवारी साडी झुगारून देऊन पाचवारी साडी आपलीशी केल्याचा. हे ज्या काळात घडले तेव्हा वृत्तपत्रातून अक्षरशः विविध विचार आणि मतांचा गदारोळ झालेला होता. त्यामध्ये स्त्रिया संस्कार विसरल्या इथपासून ते संस्कृती बुडाली, इथपर्यंत अगदी चर्वितचर्वण झालेले होते ! प्रत्यक्ष जरी तो काळ मी अनुभवलेला नसला, तरी या जुन्या आठवणींच्या बातमीने देखील माझ्या नजरेसमोरून त्याकाळचे वास्तव तरळून गेले.

अजून एक रोचक बातमी म्हणजे एकदा वृत्तपत्रात जुन्या काळातील, म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील लग्नपत्रिकांच्या आठवणींची बातमी तत्कालीन पत्रिकांसह छापून आली होती. त्यातील अगदी लक्षात राहिलेला एक मुद्दा फक्त लिहितो. तेव्हाच्या काही लग्नपत्रिकांमध्ये लग्न करण्याचा मूलभूत हेतू अगदी स्पष्टपणे नमूद केलेला असे ! त्याचा नमुना असा आहे:

“आमचे येथे श्री कृपेकरून हा आणि ही यांचा शरीरसंबंध करण्याचे योजले आहे आहे.... तरी आपण वगैरे वगैरे वगैरे.”

लग्नपत्रिकांचे बदलते स्वरूप आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. मात्र ही अजब व परखड वाक्यरचना वाचून खरोखर करमणूक झाली.
तारुण्यातील एक सर्वाधिक लोकप्रिय विषय म्हणजे क्रिकेट. त्याकाळी क्रिकेटच्या सामन्यांचे रेडिओवरील धावते समालोचन अगदी मन लावून ऐकले जाई. ते मनसोक्त ऐकलेले असले तरीही दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात त्याबद्दल जे सगळे प्रसिद्ध होई, तेही अगदी अथपासून इतिपर्यंत वाचले जाई. त्यावरील चर्चाही अख्खा दिवसभर होई. त्यामुळे क्रिकेट संदर्भातील एक दोन आठवणी तर लिहितोच.

अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी मनावर कोरली गेलेली बातमी आहे ती म्हणजे इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर झालेल्या भारताच्या दारुण पराभवाची. एका कसोटी सामन्यामध्ये आपला दुसरा डाव चक्क सर्वबाद ४२ वर संपला होता आणि जवळजवळ दोनशेहून अधिक धावांनी आपला पराभव झालेला होता. तेव्हा आमच्या आठवणीतील हा सर्वात दारुण पराभव होता. मुद्दा तो नाही. मुद्दा बातमी कशी छापली होती हा आहे. सर्वसाधारणपणे वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर सर्वात वर काय असते ? तर अगदी ठळक टाईपात त्याचे स्वतःचे नाव. ही घटना घडली त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात “भारत सर्वबाद ४२” ही बातमी खुद्द वृत्तपत्राच्या नावाच्या डोक्यावर अशी सर्वोच्च स्थानी छापलेली होती. माझ्या आयुष्यात अशा प्रकारची बातमी मी प्रथमच पाहत होतो त्यामुळे ती कायमस्वरूपी लक्षात आहे.
त्या घटनेपूर्वी भारत कसोटी सामन्यात कधीही ५० च्या आत सर्वबाद झालेला नव्हता. मात्र अन्य काही देशांनी तो अनुभव चाखलेला होता. तेव्हा भारतही आता त्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला, असे बातमीत रोचकपणे लिहिलेले होते. बाकी संपूर्ण संघाच्या 42 धावसंख्येतील निम्म्या धावा एकट्या एकनाथ सोलकर यांनी काढलेल्या होत्या आणि त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता, हेही बारकावे आठवतात.
अजित वाडेकरांच्या क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकली होती. कदाचित तो अभूतपूर्व प्रसंग असावा. त्यानंतर जेव्हा आपला संघ मायदेशी परतला तेव्हा झालेल्या त्यांच्या स्वागताच्या बातम्या बराच काळ झळकत होत्या. त्यांचेही तेव्हा खूप अप्रूप वाटले होते. ब्लेझर घातलेले फोटोतले हसतमुख वाडेकर आजही चांगले आठवतात.

आपल्या देशाच्या इतिहासात एकमेव आणीबाणी 1975 च्या दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादली होती. ती प्रत्यक्ष लादाण्यापूर्वीची रेडीओवरील एक बातमी चांगली आठवते. रात्री ८ च्या बातम्या लागलेल्या आणि एकीकडे रेडिओची खरखर चालू होती. त्यात बातमी सांगितली गेली, की
अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकसभेवरील निवड अवैध ठरवली.

रेडिओवर बातम्या सांगण्याची एक पद्धत असते. ती म्हणजे आधी ठळक बातम्या, मग विस्ताराने आणि शेवटाकडे पुन्हा एकदा ठळक बातम्या. या तीनही वेळेस मी तो ‘अवैध’ शब्द ऐकला. अगदी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा पटकन नीट अर्थबोध झाला नाही. आणि नंतर मी घरी विचारले सुद्धा की ‘रद्द केली’ असे न म्हणता ते ‘अवैध’ का म्हणत आहेत ? नंतर पुढच्या आयुष्यात अनेक अवैध गोष्टी पाहण्यात, वाचण्यात आणि ऐकण्यात आल्या, हा भाग अलाहिदा.

सध्या वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर अगदी वरच्या भागात मधोमध राजकीय व्यंगचित्र असणे कालबाह्य झालेले आहे. परंतु एकेकाळी दर रविवारच्या अंकात तर ते हटकून असे. राजकीय आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भातील एक व्यंगचित्र त्याकाळी खूप गाजले होते. ते आठवते. तेव्हा नुकताच काही कारणामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नवीन राष्ट्राध्यक्ष निवडून आले होते. पहिल्या अध्यक्षांच्या कारकिर्दीत हेन्री किसिंजर हे परराष्ट्रमंत्री होते. पुढे नव्या अध्यक्षांनीही या गृहस्थांना त्याच मंत्रिपदी कायम ठेवले. या अनुषंगाने एक सुंदर व्यंगचित्र पहिल्याच पानावर ठळकपणे आले होते. त्यात हेन्री किसिंजर मस्तपैकी हात उडवून म्हणताहेत, की “ते गेले आणि हे आले, मला कुठे काय फरक पडलाय ? मी आहे तसाच मस्त आहे !” पुढे या घटनेचा दाखला अनेकजण तत्सम प्रसंगांत देत असत. अशी मार्मिक व्यंगचित्रे त्याकाळात बऱ्यापैकी बघायला मिळत.

शालेय वयात असताना ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये एक अत्यंत वाईट बातमी वाचनात आली होती. बातमी अशी होती:

“मासिक पाळी दरम्यान शरीर संबंधास पत्नीने नकार दिल्यामुळे पतीकडून तिची हत्या “

शरीरसंबंध या विषयाबाबत धूसर आणि चाचपडते ज्ञान असण्याचे ते माझे वय. तेव्हा ही बातमी वाचली आणि एकदम सुन्न झालो. ठराविक मासिक काळातील संबंधास नकार हा बातमीतला भाग माझ्या दृष्टीने तेव्हा न समजण्यातला होता. परंतु एवढ्या कारणावरून एक पुरुष चक्क आपल्या बायकोचा खून करतो याचा जबरदस्त हादरा मनाला बसला. त्यानंतरच्या आयुष्यात दहा वर्षातून एखादी या स्वरूपाची बातमी वाचनात आली; नाही असे नाही. परंतु सर्वप्रथम अशी बातमी वाचताना त्या वयात झालेली स्थिती आणि त्यात ते दिवाळीचे दिवस, या गोष्टी आजही मनाला कुरतडतात.

...
एखाद्या मोठ्या कालखंडातील बातम्यांचा लेखाजोखा सादर करणे हा काही या लेखाचा उद्देश नाही. तेव्हा आता माझ्या आठवणी थांबवतो. त्याचबरोबर तुम्हालाही एक आवाहन करीत आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात अशा रोचक, सुरस, धक्कादायक वगैरे प्रकारच्या बातम्या वाचलेल्या अथवा ऐकलेल्या असणारच. याबद्दलचे तुमचेही अनुभव लिहा. अप्रकाशित घटनांबद्दलही लिहायला हरकत नाही.
पण एक करा...
नजीकच्या भूतकाळाबद्द्ल नका लिहू. तुमच्या आयुष्यात किमान २० वर्षे मागे जा आणि तेव्हाचे असे जे काही आठवते ते लिहा. गुगल फिगल न करता आठवतंय तसेच लिहा. त्यातच खरी मजा असते. त्यातून स्मरणरंजन होईल. तेच या धाग्याचे फलित असेल.
************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झेनॉन वायूचा वापर>> हे वाचनात आले होते. त्याचबरोबर त्या लेखात त्यांनी पहिल्या एव्हरेस्ट चढाईचा सुद्धा उल्लेख केला होता. त्यांच्यामते काही गिर्यारोहकांनी त्यावेळेस तेनसिंग आणि हिलरी यांच्या चढाईवर सुद्धा नाके मुरडली होती. कारण त्यावेळेस प्रचलित नसलेले ऑक्सिजन सिलेंडर या दोघांनी नेले होते. त्यामुळे मानवी कुवतीला वाढवण्याचा तो एक प्रकार आणि कदाचित झेनॉन वायूचा वापर हा अजून एक नवीन प्रकार असे काहीसे म्हणणे होते.

होय, पण ऑक्सिजन निदान शरीराशी संबंधित नैसर्गिक घटक तरी आहे.
xenonची संभाव्य घातकता लक्षात घेता त्याला प्रतिबंधित रसायनांच्या यादीत घातलेले आहे.

https://www.usada.org/spirit-of-sport/is-inhaling-xenon-or-hydrogen-sulf...

Xenon बद्दल नवीनच माहिती कळली.

ह्या निमित्ताने एक प्रश्न मनात आला, कोविद काळात जेव्हा O२ सिलिंडर्सचा तुटवडा होता आणि रुग्णांची O२ ची पातळी खाली गेली होती तेव्हा xenon चा प्रयोग करता आला असता का?

वरील बातमीच्या निमित्ताने झेनॉनबद्दल प्रथमच वाचले. मुळात त्याचा वैद्यकीय उपयोग अत्यंत मर्यादित आहे तो म्हणजे, शस्त्रक्रियेपूर्वी गुंगी आणण्यासाठी. या व्यतिरिक्त वैद्यकशास्त्रात त्याला मान्यता नाही तसेच सर्व देशांमध्येही तो वापरायला परवानगी नाही. तसेच तो WADA या प्रतिबंधित यादीत येतो.

गिर्यारोहणाच्या संदर्भात हा जानेवारी 2025 मधला ताजा संदर्भ पाहिला असता त्यातही म्हटलेले आहे, की या वायूचा उपयोग करून काही फायदा मिळतो का या संदर्भातील संशोधन अत्यंत अपुरे आहे.
https://www.theuiaa.org/statement-on-xenon-and-high-altitude-mountaineer...

अभ्यासूंनी अधिक सांगावे.

खरं कौशल्य आहे की supplemental oxygen न घेता एव्हरेस्ट सर करणे. उदा. मेसनर.

His approach involved using exceptionally lightweight equipment and minimizing external assistance. Messner firmly believed that the conventional expedition style, often referred to as “siege tactics,” was disrespectful to nature and the mountains. His passion for preserving the sanctity of these natural wonders fueled his dedication to the alpine style, setting him apart as a pioneer in this daring approach.

कथा पतौडी क्रिकेट चषकाची आणि नामांतराचा वाद
भारत आणि इंग्लंड दरम्यानची पहिली क्रिकेट कसोटी मालिका इंग्लंडमध्ये 1932मध्ये खेळली गेली. तिच्या अमृत महोत्सवानिमित्त सन 2007मध्ये पतौडी चषक ठेवण्यात आला.

दोन व्यक्तींच्या पराक्रमाची आठवण म्हणून त्याला पतौडीचे नाव दिले होते :
१. इफ्तिकार अली खान पतौडी : यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते इंग्लंड व भारत या दोघांच्याही बाजूने कसोटी क्रिकेट खेळलेले होते आणि असे ते एकमेव खेळाडू होते (https://en.wikipedia.org/wiki/Iftikhar_Ali_Khan_Pataudi#:~:text=*%20Engl...(1932%E2%80%931934)%20*%20India%20(1946))
आणि
२. त्यांचा मुलगा मनसूर अली खान पतौडी

जेव्हा भारत इंग्लंडमध्ये जाऊन कसोटी मालिका खेळतो तेव्हा मालिका विजेत्याला हा चषक देण्यात येतो.
अलीकडेच भारत व इंग्लंड या दोघांच्या क्रिकेट संघटनांनी वरील चषकाचे नामांतर करून त्याला तेंडुलकर-अँडरसन चषक असे नाव दिलेले आहे. हे करण्यामागे त्यांचा क्रिकेटप्रेमी तरुणांना आकर्षित करण्याचा उद्देश आहे. परंतु कुठल्याही नामांतराप्रमाणे या घटनेने देखील वाद उफाळला आहे.

https://thewire.in/sport/renaming-the-pataudi-trophy-understanding-why-t...

>>झेनॉन वायूचा वापर>>> नवी माहिती.
>> इफ्तिकार अली खान पतौडी : यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते इंग्लंड व भारत या दोघांच्याही बाजूने कसोटी क्रिकेट खेळलेले होते >> रोचक.

एव्हरेस्टचे व्यावसायिकीकरण कसे झाले आहे ते आजच्या (छापील) मटातील उमेश झिरपेंच्या लेखावरून समजते. झेनॉनचा वापर करून एव्हरेस्ट मोहीम केल्याचे वर लिहिलेच आहे. त्याच्या समर्थकांनी खालील मुद्दे मांडले आहेत :
१. या वायूचा वापर केल्यामुळे चढाई दरम्यान मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या पट्ट्यात वेळ कमी जातो आणि जीवितधोका ९५ टक्क्यांनी कमी होतो.
२. वेळेची आणि पर्यावरणाची मोठी बचत होते.

या व्यतिरिक्त यंदाच्या हंगामात ड्रोनचाही मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात आला. बेस्ट कॅम्प पासून कॅम्प एकपर्यंत ऑक्सीजन सिलेंडर, औषधे आणि इतर रसद ड्रोनने 12 ते 15 मिनिटात पोचवण्यात आली. तसेच या ड्रोननी 500 किलो पेक्षा अधिक कचरा खाली आणला. यामुळे शेर्पाही धोकादायक फेऱ्यांपासून वाचले आहेत.
पण याची दुसरी बाजू म्हणजे शेर्पाच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती आहे.

दिल्लीची AIIMS ही प्रतिष्ठित वैद्यकीय संस्था गेली 69 वर्षे कार्यरत आहे. तिच्या इतिहासात तिला एकमेव महिला संचालक लाभल्या त्या म्हणजे डॉक्टर स्नेह भार्गव. आज त्यांनी वयाची 90 ओलांडली असून आपल्या कार्यकाळातील आठवणींचे पुस्तकही लिहिले आहे.
https://thewire.in/health/sneh-bhargava-aiims-director-interview-indira-...

या संस्थेच्या संचालक होण्यापूर्वी त्या तिथल्याच रेडिओलॉजी विभागाच्या प्रमुख होत्या. संचालक म्हणून नेमणूक होताना त्यांना पंतप्रधान इंदिरा गांधींची खूप मोठी मदत झाली. इंदिराजीनी आग्रह धरल्यामुळेच त्या इतर मातब्बर स्पर्धकांवर मात करुन संचालक होऊ शकल्या. संचालकपदाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या आयुष्यात आलेला योगायोग फारच विचित्र आहे.

नेमक्या त्याच दिवशी (३१/१०/१९८४) इंदिरा गांधींवर खुनी हल्ला झाला आणि जवळजवळ मृतावस्थेतच त्या एम्समध्ये दाखल झाल्या होत्या.

‘Jaws’ ची पन्नाशी
यंदाच्या 20 जून रोजी Steven Spielberg यांच्या जॉज या चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्या चित्रपट निर्मितीसंबंधी काही रोचक माहिती इथे आहे :
https://thewire.in/film/jaws-and-the-two-musical-notes-that-changed-holl...

स्पिलबर्ग यांच्यावर हिचकॉकचा चांगल्यापैकी प्रभाव होता आणि त्याचे प्रतिबिंब जॉजमध्ये पडलेले दिसते.

मी हा चित्रपट तेव्हाच्या ‘70 mm’ चित्रपटगृहात पाहिला होता आणि चित्रपटाच्या 81व्या मिनिटाला जेव्हा शार्क समुद्रातून डोके वर काढतो तेव्हा संपूर्ण प्रेक्षागृह दचकलेले अजूनही आठवते.

दुःखद आठवण : चासनाला
बिहारमधील चासनाला येथील खाणीत झालेल्या भीषण अपघाताला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होतील. भारतातील खाणींच्या इतिहासातील हा एक भयंकर अपघात होता. त्यात 375 कामगारांचा मृत्यू झाला. तेव्हा ही घटना वृत्तपत्रातून बऱ्यापैकी वाचल्याचे आठवते. IISCO या स्टील उद्योगाची ती खाण होती.
त्या घटनेवरील खटला 37 वर्ष न्यायालयात चालला आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा खाणीच्या संचालकांना दोषी ठरवण्यात आले होते परंतु त्यापैकी दोघांचा त्यापूर्वीच मृत्यू झालेला होता.

अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांचा काला पत्थर हा चित्रपट या घटनेवर आधारित आहे.

* 11 कोटी गॅलन पाणी >>
होय, खूप वर्षांपूर्वी वाचले होते हे पुस्तक. त्यातली 'शैतानी खदान' आठवली.

1978 मध्ये डॉन या अमिताभ अभिनित चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे चंद्रा बारोट यांचे नुकतेच (20 जुलै) निधन झाले. दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता आणि त्याला अमाप यश मिळाले आणि त्यातून अमिताभ बच्चनचा प्रचंड असा चाहता वर्ग देशभर निर्माण झाला.

पहिल्याच चित्रपटात उत्तुंग यश मिळवणारे बारोट नंतरच्या काळात मात्र फारसे यशस्वी होऊ शकले नाहीत. पुन्हा तेवढेच यश मिळवणे त्यांच्यासाठी मुश्किलच नाही तर ‘नामुमकीन’ ठरले, असे म्हणता येईल !

बारोट यांना आदरांजलीच्या निमित्ताने ही आठवण.

सर्वांना स्वातंत्र्य वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
. . . .
आजपासून बरोबर पन्नास वर्षांपूर्वीची एक राजकीय आठवण म्हणजे बांगलादेशचे संस्थापक अध्यक्ष शेख मुजिबूर रहमान यांची काही कुटुंबियांसह झालेली हत्या. त्या दिवशी ते त्यांच्या खाजगी निवासस्थानातच राहत होते. लष्करातील काही अधिकारी बंड करून त्यांच्या घरात घुसले आणि जिन्यातच त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

तेव्हा त्याच्या सविस्तर बातम्या वाचलेल्या आठवतात. जेव्हा खुन्याने त्यांच्यावर बंदूक रोखली तेव्हा ते त्याला म्हणाले होते की, "अरे मी तुम्हाला हा देश मिळवून दिला आणि तू हे काय करतो आहेस?"
त्यावर त्याने फक्त बंदुकीच्या फैरी झाडल्या होत्या.

रेहमान यांच्या दोन कन्या त्या वेळी जर्मनीत असल्यामुळे बचावल्या.

15/8 / 1975 ची भारतातील सांस्कृतिक आठवण म्हणजे त्या दिवशी शोले हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि चांगलाच आपटला होता !
कालांतराने मात्र त्याने अनेक विक्रमांचा इतिहास घडवला . . .
. . .
एकेकाळी शोलेबद्दल बोलताना ए के हनगल म्हणाले होते की या चित्रपटाचे खेळ कधी संपतच नाहीत. त्याचा शेवटचा खेळ कधी होईल हे आपण सांगू शकणार नाही !

आज पन्नास वर्षानंतरही त्यांचे उद्गार खरे मानावे लागतील कारण लवकरच शोले नव्या रंगरंगोटीसह चित्रपटगृहात येणार आहे . . .

ह्या वरून आठवले.
जेव्हा s President John F. Kennedy. चा वध झाला तेव्हा त्यांची कार समोरून गेल्यावर एका माणसाने त्याची काळी छत्री उघडून नाचवली, तो कटात सामील होता का? त्याने छत्री उघडून इशारा केला होता का? ह्याला
FBI ला जंग जंग पछाडूनही त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही.
हा पुढे "umbrella man" म्हणून प्रसिद्ध झाला.
पंधरा वर्षांनतर हा माणूस स्वतः हून पुढे आला. त्याचे नाव Louie Steven Witt. त्याच्या म्हणण्या प्रमाणे तो फक्त केनेडी ह्यांच्या काही धोरणांविरुद्ध निषेध नोंदवत होता,
https://en.wikipedia.org/wiki/Umbrella_man_(JFK_assassination)

'सामना'ची प्रेरणा व निर्मितीकथा रामदास फुटाण्यांच्या मुलाखतीतून इथे ऐकता येईल.
https://www.youtube.com/watch?v=zCp7I1_YvYY
त्यांची दादा कोंडकेंशी चांगली मैत्री असूनही फुटाणेनी हे पक्के ठरवले होते की आपण चित्रपट काढायचा तो सामाजिक परिवर्तनवादीच काढायचा.
चित्रपटाचे लेखकाने आधी ठेवलेले नाव ‘सावलीला भिऊ नकोस’ असे होते परंतु फुटाणेना ते नाटकासारखे वाटल्याने त्यांनी ते बदलायला सांगितले.

सामनाचे सूत्र :
“कुठलाही माणूस सत्तास्थानी पोचला की त्याच्या अस्तित्वासाठी तो जे खेळ करतो ते जगात सर्वत्र सारखेच असतात”.

छान धागा..

पुण्याजवळ इनामगाव इथल्या पुरातत्व खात्याच्या उत्खननात साडेतीन हजार वर्षांपूर्वीची संस्कृती आढळली आहे. या संस्कृतीतल्या वसाहतीत एक दफनभूमी सापडली आहे. त्यात प्रेतांना दक्षिणेकडे पाय करून झोपवलेले आढळले . तसेच मयताचे पाय कापलेले आढळले. दक्षिण दिशा यमाची हा किती प्राचीन समज आहे याची खूण ग्रीस जवळ समुद्राखाली सापडलेल्या सुमारे दहा हजार वर्षापूर्वीच्या एका शहरातही सापडली आहे.
हे शहर खूप प्रगत होते. लोकप्रिय दाव्यांनुसार ते दहा हजार वर्षांपूर्वीचे नसून पाच हजार वर्षांपूर्वीचे असावे. इथेही मयतांना दक्षिणेकडे पाय करून दफन केल्याचे दिसते.

इराण देशात काही प्रथा आहेत ज्या आपल्याला विचित्र वाटू शकतात.

इथे लग्न करण्यासाठी मुलाला मुलीच्या पालकांकडे ठराविक रक्कम जमा करावी लागते.
इराणबाहेर केलेल्या आंतरधर्मिय आणि पालकांच्या संमतीशिवाय केलेल्या लग्नाला इराणमधे मान्यता मिळत नाही.
इराण मधे तात्पुरते लग्न नावाची एक प्रथा आहे जी अद्याप नामशेष झालेली नाही. या विवाहाला पालकांची संमती असते. मुला मुलींनी लग्नाशिवाय सोबत फिरण्याऐवजी त्या रिलेशनशिपला कायदेशीर स्वरूप द्यावं असं काही जणांना वाटतं.

नव्या चालीरिती
इराण मधे रात्रीच्या वेळी मुलं आणि मुली कार मधे रस्त्यावर येतात . चौकात, पेठेत किंवा सार्वजनिक ठिकाणी कार मधे बसून ते एकमेकांशी ओळख करून घेतात. यानंतर मुली मुलींच्या कारमधे तर मुलांच्या कारमधे बसून गप्पा मारत शहरभर फिरत राहतात. याला डोर डोर म्हणतात. आपल्याकडे येरझारा असा समानार्थी शब्द आहे. खूप वेळ पेट्रोल जाळल्यावर मग एखाद्या कॅफे मधे कॉफी घेऊन डोर डोर समाप्त होतं. यातून रिलेशनशिप निर्माण झाली तरी पालकांची संमती नसेल तर त्या विवाहाला मान्यता मिळत नाही.

रस्त्यात मुलंमुली एकमेकांना स्पर्श करू शकत नाहीत. पोलिसांच्या निदर्शनास आल्यास गंभीर शिक्षा होऊ शकते. पण आता पोलीसच अशा घटनांकदे डोळेझाक करतात.

आंतरधर्मिय विवाहाला मान्यता नसल्याने असे कपल इराणमधे आल्यास त्यांना हॉटेल मिळत नाही. पण लॉजवाले अशा कपल्सला मदत करण्यासाठी त्यांच्याकडून टेंपररी मॅरेजचे प्रतिज्ञापत्र भरून घेतात.
इस्लामिक कायद्यांना जनतेत पाठिंबा नाही पंण शासन अद्याप आग्रही आहे.

चांगली माहिती मिळाली.
*डोर डोर म्हणतात. आपल्याकडे येरझारा असा समानार्थी
>>> हे भारी आहे!

धन्यवाद सर.
इराणमधे वापरले जाणारे अनेक शब्द मराठीत आहेत. ते अझरबैजान, कझाकिस्तान आणि अन्य काही मूलच्या रशियन मुस्लीम देशातही वापरले जातात.
उदा. या देशात चाकूचे अनेक प्रकार विक्रीला असतात. ते अगदी सिंदबादच्या काळात शोभावे असे असतात. यातल्या काहींना चागू म्हणतात. आपल्याकडे त्याचं नाव चाकू आहे असं सांगितल्यावर आश्चर्य व्यक्त करतात.

*चागू>>> भारी.

माझ्या विद्यार्थीदेशेतील इराणच्या आठवणी म्हणजे, त्यांचे शाह, सर्वेसर्वो आयातुला खोमेनी आणि कित्येक वर्षे चालू असलेले इराण- इराक युद्ध. इतकी वर्षे युद्ध कसे काय चालते याचे तेव्हा आश्चर्य वाटायचे.

भूतानबद्दलची एक बातमी मध्यंतरी होती.
भूतानची राजधानी थिंपू हे जगातले पहिले ट्राफिक स्सिग्नलमुक्त शहर आहे. १९९५ साली या देशाने नो ट्र्फिक सिग्नल हा प्रयोग करून पाहिला आणि तो यशस्वी झाला. इथे कधीच ट्रॅफिक जाम लागत नाही, रस्त्यावरचे प्रदूषण कमी झाले आहे आणि वाहतूक जलद आहे.

भारतात सुद्धा कोटा या शहराने भारतातले पहिले आणि जगातले दुसरे नो ट्रॅफिक सिग्नल शहर बनण्याचा मान पटकावला. इथेही आता वेळ वाचतो आणि प्रदूषण कमी झाले आहे.

२०१६ मधे येमेनच्या एका इंजिनिअरने कमीत कमी खर्चात सिग्नलविरहीत रहदारीचं एक डिझाईन सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिलं आहे. आन्म्द महिंद्रा यांनी या दिझाईनचं कौतुक करत ते शेअर केलं होतं. कोटा मधे अंडरपासेस आणि फ्लायओव्हर याचा प्रचंड खर्च झाला आहे. त्या मानाने हे डिझाईन सुटसुटीत वाटते.
https://www.youtube.com/shorts/omaxJ8lKdl4

वरील डिझाईन मध्ये क्रॉसिंग धोके आहेत. ते टाळण्यासाठी स्पीड ब्रेकर आणि कमीतकमी एक किलोमीटर वळण रस्ता ठेवावा लागेल. परंतु फ्लायओव्हरपेक्षा निश्चित चांगला पर्याय आहे.

Pages