झटपट मसाला आप्पे

Submitted by नादिशा on 12 October, 2020 - 11:29
पटकन होणारे आप्पे
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

1) ताजे ताक -3 वाट्या
2) जाड रवा -2 वाट्या
3) मीठ -3 चमचे
4) बारीक चिरलेले कांदे -2
5) चिरलेली कोथिंबीर -1/2 वाटी.
6) कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण, आले यांची पेस्ट -2 चमचे
7) भाजण्यासाठी तेल.
8) खायचा सोडा - 1/4 चमचा

क्रमवार पाककृती: 

1) मोठ्या पातेल्यात ताक घेणे.
2) त्यात रवा, मीठ आणि कढीपत्ता इ. ची पेस्ट, चिरलेले कांदे,
चिरलेली कोथिंबीर घालून छान मिक्स करणे.
3) झाकण ठेवून 1/2 तास बाजूला ठेवून देणे. तेवढ्या वेळात
रवा छान फुगून येतो.
4) आप्पेपात्राला तेल लावून बारीक गॅसवर ठेवणे.
5) तयार मिश्रणात सोडा घालून पटपट हलवणे आणि लगेच
आप्पेपात्रात 1-1 चमचा प्रत्येक गोलात घालणे.
6) त्यावर झाकण ठेवून मोठ्या गॅसवर 2 मिनिट ठेवणे.
7) मग झाकण काढून सर्व गोलांच्या कडेने तेल सोडणे व
आप्पे उलटून घेणे.
8) दुसऱ्या बाजूनेही 2 मिनिटे भाजून घेणे.
9) काढून घेणे आणि पुढचा घाणा टाकणे.

वाढणी/प्रमाण: 
एवढ्या साहित्यात 42 आप्पे बनले. 4-5 लोकांसाठी आरामात पुरतात.
अधिक टिपा: 

यात हिरवी मिरची, कांदा, लसूण, आले, कढीपत्ता, कोथिंबीर सगळे असल्याने असेच छान लागतात. तरी हवे असल्यास सॉस किंवा नारळाची चटणी बनवून त्यासोबत खाऊ शकता.

माहितीचा स्रोत: 
माझी आई याच साहित्य आणि कृतीने डोसे बनवायची. मी वेळ वाचवण्यासाठी आप्पे बनवले.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दिसताहेत आप्पे!
जाडा रवा म्हणजे उपम्यासाठी वापरतो तो की आणखी जाडा?

मस्त होतात हे आप्पे. मी रवा + ओटस असे करते आणि लसूण घालत नाही. सोडाही घालत नाही. सोडा नसल्यानं खूप हलके होत नाहीत पण चव छान येते. एखाद दिवशी घरीच दुधात लिंबू पिळून पनीर केलं तर ते पाणी वापरूनही पीठ भिजवते.

भारीच की... व्हेरिएशन म्हणुन मी गेल्यावेळी आप्प्यांच्या पीठात शेझवान चटणी टाकली आणि मीठ थोडं जास्त टाकलं. भारी लागलं तेही व्हेरिएशन. एक घाणा असा

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
हो मामी, पनीर च्या पाण्याची चव छान लागते शिवाय ते पौष्टिक असते. पराठा , थालीपीठ बनवताना त्याच पाण्यात पीठ भिजवायचे. खूप छान बनतात. कोणतीही आमटी बनवताना पनीर चे पाणी टाकले, तर छान अमसूर चव लागते, शिवाय तर्री छान सुटते. कोणतेही सूप बनवताना पण हे पाणी वापरू शकतो. उपमा करताना हे पाणी घालू शकतो.
बरोबर आहे ललिता -प्रीति, बारीक रव्यापेक्षा जाड रवा जास्त फुगतो, त्यामुळे त्याचेच छान बनतात आप्पे. पण डोसे बनवताना मात्र मी बारीक रवा वापरते, म्हणजे डोसा तुटत नाही. मस्त कुरकुरीत डोसे बनतात. कधीकधी थोडे जाड डोसे बनवते. मग त्यावर पिझ्झा सॉस लावून मुलाच्या आवडीच्या भाज्या टाकते. चीझ किसून टाकते. झाला होम मेड पिझ्झा !

आमच्याकडे कायम असेच आप्पे केले जातात.
बारीक रव्यापेक्षा जाड रव्याचे जास्त छान लागतात.>> @लले तुझ्याकडूनच रेसिपी घेऊन मी करायला लागले आणि आता आमच्याकडेही हेच होतात.

त्यातही एकदा उरलेल्या कढीत रवा भिजवून केले तेव्हापासून आमच्याकडे ते कढीअप्पे या नावाने हिट्ट सुपर हिट्ट झाले. कढी अप्प्यांची फर्माईश असते म्हणून आजकाल कढी जास्त करावी लागते Lol

https://www.maayboli.com/node/41950

ही ललीकडून शिकून केलेल्या रेसिपीची लिंक

कविन तुमचा धागा पाहिला. आप्प्यांमध्ये भाज्या घालण्याची आयडिया मस्त आहे. करून पाहीन आता असेही एकदा.

नक्की घालून पहा भाज्या

कांदा, कोबी, सिमला मिरची, गाजर, उकडलेले मटार आणि कॉर्न्स, पालक, कोथिंबीर या भाज्या चांगल्या लागतात यात

काल केले होते. चवीला छानच होते पण तेल थोडे अधिक घालावे लागले असा रिपोर्ट दिला बाईंनी. भिड्यावर केले म्हणून जास्त लागले असेल का तेल?

छान पाकृ.
कांदा, कोबी, सिमला मिरची, गाजर, उकडलेले मटार आणि कॉर्न्स, पालक, कोथिंबीर या भाज्या चांगल्या लागतात यात>> छान आणि पौष्टीक .

थँक्स हीरा, तेजो, वर्णिता.
हो हीरा. बिडामुळे जास्त तेल लागले.
आमच्याकडे नॉनस्टिक पॅन आहे, त्याला कमी तेल लागते.
पण चवीला बिडाच्या भांड्यातील आप्पे जास्त छान लागतात, मस्त खुसखुशीत लागतात . माझ्या आईकडे बिडाचेच होते, कालांतराने त्याला क्रॅक गेला आणि मग वापरणे बंद करावे लागले ते.

नेमेची येतो पावसाळा तशी आप्यांची रेस्पी येणं ड्यू होतंच !

चांगले दिसताहेत हे. करून पाहायला हवेत.