प्रसंग अगदी काल घडलाय असा डोळ्यासमोर आहे...
"बाबू, ई नदिलोनि पवित्र जलालधु स्नानम चेसरा... जलालो मुनीगी रा.." नदीकाठावरच्या आणि पलीकडे गुडघाभर पाण्यात उभ्या आईच्या मातुल कुटुंबातील नातेवाईक मंडळींनी कृष्णेच्या 'पवित्र' पाण्यात मी स्नान करावे, असा एकच घोषा लावला होता. स्नानाला कधीही एका पायावर तयार असणारा मी ठामपणे 'नाही' म्हणत असल्याचे दुर्लभ दृश्य बघून आईच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि हसू एकाच वेळी झळकत होते. अखेर बळेबळेच मला त्या गढूळ पाण्यात ओढण्यात आले आणि कृष्णा नदीतीरी दर बारा वर्षांनी भरणाऱ्या 'कृष्णापुष्करम' उर्फ 'दक्षिण कुंभ' मेळाव्यात आमचे घोडे न्हाले! 'न आवडलेले' असे आयुष्यातील ते दुर्मीळ स्नान. अन्यथा आंघोळ करणे हे माझ्या जीवनातील सर्वाधिक आनंददायक काम होते आणि आहे.
Bath is to body what laughter is to soul असे कोणीतरी म्हटलेच आहे, नसेल म्हटले तर मी म्हणतो. जन्माला आल्यावर सर्वप्रथम नर्सबाई काय करतात, तर नवजात बाळाला आंघोळ घालून स्वच्छ करतात. त्याशिवाय खुद्द आईबाबांना तरी दाखवतात का ते बाळ? जन्मल्याबरोबर जे काम आपल्याला चिकटते तेच 'आवडते' काम असेल, तर मग त्याचा मन प्रफुल्लित करणारा सोहळा होतो. त्याचे सर्व टप्पे फार आनंददायक होतात आणि हे स्नानसोहळे स्मृतींमध्ये अलगद जाऊन बसतात.
आज पाच दशके भूतलावर काढल्यानंतर कुणी आयुष्याच्या सर्वात आनंदी प्रसंगांबद्दल विचारले, तर मला माझा स्नानप्रवास आठवतो. सकाळी शाळेत जाण्याआधी गारेगार पाण्याने केलेले सचैल स्नान, कडाक्याच्या हिवाळ्यात ऊन-ऊन पाण्याने अंग शेकणारे स्नान, सुट्टीच्या दिवशी आईने खसाखसा घासूनपुसून लख्ख करीत घातलेली आंघोळ, बाबांसोबत जलतरण तलावात केलेले स्नान, सणासुदीचे - प्रसंगविशेष स्नान, आजोळी स्वच्छ नदीपात्रात डुंबत केलेले स्नान... एक ना हजारो आनंदक्षण स्नानाशी जोडले गेले आहेत.
घरी आईचा दिवस सर्वात आधी सुरू होई. तिच्या माहेरी फार धार्मिक वातावरण होते, स्नान केल्याशिवाय ती काही खात-पीत नसे. आम्ही भावंडे अर्धवट झोपेत असताना आईचे स्नान आटोपत असे. हळू आवाजात तिचे गायत्री मंत्राचे पठण ऐकू येत असे. मग चहा-दूध तयार झाले की मला पूर्ण जाग येई. शाळा सकाळची, त्यामुळे आवरून आंघोळ करूनच शाळेत जायचे, असा नियम होता. शेजारीपाजारी सर्व मुलांमध्ये आंघोळ करून वेळेत तयार होण्यात माझा नंबर नेहेमी वर असे. घरी हिरव्या रंगाचा 'हमाम' साबण आम्हा भावंडांचा सामायिक होता. हो, तेव्हा प्रत्येकाला वेगळ्या साबणाची चंगळ नव्हती. त्यामुळे कोरडा साबण मिळावा म्हणून मीच पहिला नंबर लावत असे. ८० वर्षांपेक्षा अधिक वय असलेला शुद्ध हिंदुस्तानी 'लोकल' हमाम साबण आजही ३०० कोटी रुपयाचा ब्रँड आहे! आतासारखे 'आयुर्वेदिक', 'नैसर्गिक', ‘इको-फ्रेंडली’ साबणाचे काही खास कौतुक नव्हते. त्या वेळेपासून (१९३१) नीम, तुळस, एलोवेरा अशा नैसर्गिक पदार्थांचा वापर हे हमामचे वैशिट्य टिकून आहे हे खास. आधी टाटा आणि आता हिंदुस्थान युनिलिव्हर बनवतात. आजही महिन्याला काही कोटी हमाम साबण विकले जातात भारतात.
हिवाळ्यात गरम पाण्यासाठी स्टोव्हवर वेगळा हंडा तापत ठेवलेला असे, त्यातले हवे तेवढे गरम पाणी काढून तेवढेच गार पाणी त्या हंड्यात परत उकळण्यासाठी ठेवले जाई. जुन्या आठवणीत हमखास असणारा पाणी तापवण्याचा बंब मात्र आमच्या घरी कधीच वापरात नव्हता. नळाला पाणी ठरावीक वेळी असल्याने आणि शाळेसाठी उशीर होणे लाजिरवाणे समजले जात असल्याने टाइम वॉज ऑलवेज ऍट प्रीमियम... त्यामुळे आंघोळीची खरी मजा रविवारी असे. त्या दिवशी भरपूर पाणी आणि साबण वापरून मनसोक्त आंघोळ करायला कोणाची ना नसे. फक्त त्याआधी 'केस धुणे' हा गंभीर अत्याचार होत असे. केसांसाठी वेगळ्या 'शिकेकाई' साबणाचा प्रवेश आमच्या घरी झाला नव्हता. रोजच्याच साबणाने किंवा कधी तर सर्फसारख्या पावडरींनी आमचे 'मळके, घाण, चिपचिप' केस स्वच्छ केले जात. साबणाचे पाणी हमखास डोळ्यात जात असल्याने हे मला फार त्रासदायक वाटत असे. एकदा हे झाले की हवा तेवढा वेळ पाण्यात खेळायला परवानगी असे. आम्ही भावंडे एकमेकांवर पाणी उडवून, एकमेकांना ढकलून, दंगामस्ती करत रविवारची सकाळ सार्थकी लावत असू. कधीकधी बाबाही आमच्या कंपूत सामील होत आणि आमच्या जलपंचमीला उधाण येत असे.
उन्हाळ्याच्या सुटीत आमच्या मूळ गावी आणि आजोळी विभागून जात असू. दोन्ही ठिकाणची स्नानवैशिष्ट्ये वेगवेगळी होती. आमच्या गावी पाण्याचे दुर्भिक्षच. घरात विहीर नव्हती. गावातल्या दोन विहिरींनाच काय ते पाणी आणि उन्हाळा म्हणजे तिथेही पाणी कमी. आमचा घरगडी लच्छू विहिरीतून हंडे भरून आम्ही घरचे, गडीमाणसे, जनावरे सर्वांसाठीच पाणी आणीत असे. पाणी जपून वापरावे लागे, आंघोळीसाठी काटकसर करावी लागे. तरी त्या घरी स्नान आवडायचे, कारण विहिरीचे थंडगार पाणी आणि 'लाइफबॉय' साबण. गुलाबी रंगाचा, चौकोनी. बाबांच्या लहानपणापासून तोच एकमेव साबण गावात विक्रीला असे. लाइफबॉय आता सुमारे शंभर वर्षे भारतात विकला जात आहे, अगदी मागच्या एका वर्षातच २००० कोटी रुपयांचे लाइफबॉय साबण विकले गेले भारतात! म्हणजे आजही वट असलेला हा खरा सुपरब्रॅंड! पुढे 'लाइफबॉय है जहाँ तंदुरुस्ती है वहाँ' या जिंगलचे मराठी भाषांतर 'लाइफबॉय ज्याचे घरी आरोग्य तेथे वास मारी' असे करून खिदळणे अनेक वर्षे चालले.
* * *
तिकडे आजोळी वेगळीच तर्हा. दररोज पहाटे साधारण ५च्या सुमारास ...
नंदिनी नलिनी सीता मालती च महापगा
विष्णुपदाब्जसंभूता गंगा त्रिपथगामिनी
भागीरथी भोगवती जान्हवी त्रिदशेश्वरी
द्वादशैतानि नामानी यत्र यत्र जलाशये
स्नानोद्यत: स्मरेनित्यं तत्र तत्र वसाम्यहं…….
सर्व जण साखरझोपेत असताना बाहेर आजोबांचे मोठ्या आवाजात स्तोत्रपाठांसह स्नान सुरू असायचे. आता थोड्याच वेळात दिवस उगवणार आणि आपल्याला बिछाना सोडावा लागणार, हे दुष्ट सत्य हळूहळू मनाला स्पर्श करू लागे. बाहेर पेटवलेल्या बंबाच्या धुराचा, गरम पाण्याचा, मैसूर चंदन साबणाचा, अग्निहोत्रात टाकलेल्या अर्धवट पेटलेल्या गोवऱ्यांचा, पूजेसाठी आणवलेल्या ताज्या फुलांचा एक मिश्र दैवी सुवास पसरत असे.
त्यांच्याकडे एक जादुई कुलूपबंद कपाट होते - फक्त साबणांचे! त्यात वेगवेगळ्या ब्रँडचे अनेक साबण हारीने रचलेले असत. लांबचा प्रवास करून जबलपूरला आजोळघरी पोहोचल्यावर ते कपाट उघडून आम्हा भावंडांना प्रत्येकी एकप्रमाणे हवा तो साबण घेता येई, फक्त मैसूर संदल वगळता. मैसूरवर आजोबांचा एकाधिकार होता आणि तो अन्य कोणालाही वापरायला मिळत नसे. त्याचा राग येई.
पुढे अनेक वर्षांनी बंगळुरूला कर्नाटक स्टेट सोप फॅक्टरीत एका कामासाठी गेलो, तेव्हा तेथे मैसूर संदल साबण आणि त्याचे अनेक नवनवीन प्रकार सुंदर वेष्टनात विकायला होते. आजही पूर्वीसारखेच चंदनाचे शुद्ध तेल वापरतात त्यात. मी अधाशासारखे विकत घेतले, स्वतः भरपूर वापरले आणि घरी-दारी-मित्रांना भेट म्हणून दिले. 'छोटा बच्चा' म्हणून मला नाही म्हणतात म्हणजे काय? ते एक सोडले तर भेडाघाट, ग्वारीघाट अशा नर्मदेच्या वेगवेगळ्या घाटांवर स्वच्छ गार पाण्यात तासनतास केलेले स्नान ही आजोळची सर्वोत्तम आठवण.
सौंदर्यतारकांचा म्हणून नावाजलेला 'लक्स' साबण फार प्रसिद्ध होता. मध्यमवयीन-मध्यमवर्गीय स्त्री-पुरुष आधी फारसा वापरत नसत. शेजारपाजारच्या कॉलेजकुमारी-कुमार मात्र तो साबण खास वापरत. त्यांचा हेवा वाटत असे. मी साधारण १० वर्षांचा होतो, तेव्हा केसांसाठी वेगळा साबण दिसू लागला. श्रीमंत नातेवाईक स्त्रिया 'केशनिखार' साबण वापरत. गोदरेज आणि विप्रो ब्रँडचे 'शिकेकाई' साबण आले आणि मग केशनिखार चे कौतुक संपले. शिकेकाई साबण पुरुष मंडळी मात्र वापरत नसत, आम्हा मुलांनासुद्धा केसांसाठी शिकेकाई साबण वापरणे फार 'गर्ली' वाटत असल्यामुळे आम्ही रोजचाच साबण केसांना फासत असू.
मग काही वर्षांनी 'सनसनाती नींबू की ताजगी' देणारा लिरिल, 'सुपर फ्रेश' सिंथॉल आणि नीम की गुणवत्ता लिये 'मार्गो' असे अनेक ब्रँड बाजारात दिसू लागले. टीव्ही रंगीत झाला आणि जाहिरातीत दिसणारी बिकिनीतली सचैल लिरिल कन्या सर्वत्र चर्चेचा विषय झाली. पुढेही अनेक वर्षे लक्सचे 'फिल्मी सितारों का सौंदर्य साबुन' हे स्थान आणि लोकप्रियता कायम राहिली. ९०नंतर विप्रोच्या संतूर साबणाने लक्सच्या इंद्रासनाला बऱ्यापैकी झटके दिले. 'आप की त्वचा से आप की उमर का पता ही नही चलता' हे फार गाजलेले कॅम्पेन. पण तो 'गर्ली' आहे हे माझे मत काही बदलले नाही. आम्हा पुरुष मंडळींसाठी विशेष वेगळे साबण फारसे नव्हते. लाइफबॉय, सिंथॉल आणि ओके याच साबणांना 'पुरुषांसाठी' म्हणून मान्यता होती. पुढे सुपरस्टार शाहरुख खानने 'लक्स'साठी टबबाथ घेत हे बदलण्याचा एक प्रयत्न केला. त्यामुळे लक्स फक्त बायका वापरतात हा समज थोडा कमी झाला.
फेब्रुवारी १९८२ ह्या महिन्यात माझ्या स्नानप्रेमासाठी एक नवे युग अवतरले. आम्ही स्वतःच्या मोठ्या घरात राहायला गेलो. ह्या घरात वेगळे मोठे भिंतभर टाइल्सची सुखद रंगसंगती असलेले कोरे करकरीत स्नानघर होते. पूर्ण बंद होणारा दरवाजा, उत्तम सूर्यप्रकाश आणि मुख्य म्हणजे डोक्यावर भरपूर जलधारांचा 'शॉवर' होता! आजवर स्नान म्हणजे बादलीत किंवा घंगाळात असलेले पाणी अंगावर घ्यायचे असे स्वरूप बदलून जलौघाचे रेशमी तुषार अंगावर झेलत सचैल स्नान करायचे, असा सुखवर्धक बदल झाला. माझे आंघोळीचे तास वाढले. आमचे शहर उन्हाळ्यात प्रचंड तापत असे, पाणीटंचाई मात्र नव्हती. त्यामुळे दिवसातून दोनदा स्नानाचे सुख लुटले जाई. पुढे काही वर्षांनी पाणी तापवायला गीझर आला, गरम पाण्याचा हिवाळी स्नानसोहळा जास्तच लांबल्यामुळे पूर्ण स्नानघरात वाफेचे धुके पसरत असे. त्यातून बाहेर पडताना आपण ढगातून बाहेर पडून जमिनीवर पाय ठेवत आहोत असा फील येत असे.
१९८०पासूनच शाम्पूच्या बाटल्या आमच्या शहरातल्या दुकानांत दिसू लागल्या होत्या. हे महागडे प्रकरण आपल्यासाठी नाही असे सर्वच मध्यमवर्गीय लोक समजत, त्यामुळे ते काही आमच्या घरी आणले गेले नाही. शाम्पू प्रकरणात खरी क्रांती 'Chik' नामक शाम्पूच्या सॅशे पॅकने घडवली. १ रुपया अशी माफक किंमत, तीव्र सुगंध, भरपूर फेस असे सर्व काही त्यात होते. बहुतेक १९८३ साल असावे. हे झाले आणि मग मात्र वेगवेगळ्या सर्वच ब्रॅण्ड्सचे शाम्पू असे सॅशेमध्ये मिळू लागले, जास्त आवाक्यात आले. २-५ वर्षांतच ते स्नानाचा अविभाज्य भाग बनले. आज तर देशातील एकूण शाम्पूविक्रीपैकी ७५% विक्री फक्त 'सॅशे पॅक'ची असते.
माझ्या स्नानसोहळ्यातही शाम्पूचे कौतुक वाढतेच राहिले. साधारण १० वर्षांनी त्याचा धाकटा भाऊ 'कंडिशनर' बाजारात आला. कंडिशनरचा जन्म मात्र पुरुषांच्या गरजेपोटी झाला आहे, 'ब्रिलियंटाइन' ह्या दाढी-मिश्या चमकदार करणाऱ्या उत्पादनाचे दुसरे रूप म्हणजे कंडिशनर. काही ब्रॅंड्सनी आधी शाम्पूसोबत कंडिशनर मोफत वाटले आणि पुढे त्याची सवय कधी लागली ते समजलेच नाही.
* * *
१९९४पासून नोकरीधंद्याला सुरुवात झाली, शहर बदलले. सर्व साबण, शाम्पू स्वतःच्या आवडीचे घेता येऊ लागले. याच वेळी लिक्विड सोपचे पेव फुटले. एकापेक्षा एक सरस सुगंध असलेले हे द्रवरूपी नावीन्य, त्याचा फेसच फेस आणि त्यासाठी वेगळे 'लूफा' असा जामानिमा. एकदम राजेशाही. मुंबईतील अनेक छोट्या घरात राहिलो. इथे जागा कमी आणि बाथरूम तर मी जेमतेम उभा राहून ओला होऊ शकेन एवढीच जागा असलेले. बाहेर घाम आणि प्रदूषण भरपूर, त्यामुळे दिवसातून दोनदा स्नान हा शिरस्ता कायम राहिला, तरी स्नानसुखात व्यत्यय मात्र आला.
तोवर खास पुरुषांसाठी म्हणून साबण आणि स्नानप्रावरणे भारतीय बाजारात दिसू लागली होती, त्यांचा लाभ घेण्याएवढी ऐपत आली होती. 'एक्स्ट्राव्हॅगंटली मेल' अशी खास टॅग लाइन असलेला 'आरामस्क' साबण दिल्लीच्या दिवान वाधवा ग्रूपने आणला. तो आम्हा तरुण मुलांमध्ये फारच लोकप्रिय झाला. वेगळा, थोडा तीव्र सुवास आणि वेगळाच आकार, साबणाच्या वडीवर एक डौलदार A अक्षर कोरलेली पट्टी असे ते आकर्षक प्रॉडक्ट होते. नीश की काय म्हणतात तसे. तो अनेक वर्षे मी वापरला. पुढे क्रेझ ओसरली आणि तो ब्रँड विस्मृतीत गेला. एका मराठी मुलीने ब्रँड रिव्हायव्हल शीर्षकाखाली ह्या साबणावर शोधप्रबंध सादर केला, इतकी त्याची लोकप्रियता. जुन्या गाण्यांचे जसे रिमेक बाजारात येते, तसे काही खास ब्रॅंड्सचे व्हायला पाहिजे.
दिवाळीचा सण आणि 'मोती' साबणाने स्नान हे अद्वैत तर वर्षानुवर्षे उपभोगतोच आहे. तो सुवास आणि दिवाळी एकमेकांना पर्यायवाची जणू. मोती साबण आणि दिवाळी निदान महाराष्ट्रात तरी एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत.
पितृत्व लाभले, तेव्हा स्नानप्रेमामुळेच नवजात बाळाला आंघोळ घालायची जबाबदारी सहज स्वीकारली आणि पार पाडली. जसजसे वय वाढत गेले, तसतसे साबण आणि आइसक्रीमच्या जाहिराती सारख्याच होत गेल्या - मलाई, बदाम, फळांचे रस दोहोंत असल्याचे कानीकपाळी सांगण्यात येऊ लागले. साबणातून 'नैसर्गिक' सुगंध हळूहळू कमी होत गेला आणि साबण 'दिसायला' सुंदर होऊ लागले. आता 'खादी'सारखी दर्जेदार (आणि महाग) उत्पादने सोडली, तर 'खरे' सुवास दुष्प्राप्य झाले आहेत.
पुढे कामानिमित्त देशभर-जगभर प्रवास करता आला. आलिशान-गेलिशान सर्वच प्रकारच्या गेस्ट हाउस, लॉज, तारांकित-बिनतारांकित अशा हॉटेलातून राहण्याचे प्रसंग वाढले. जणू एक नवीन स्नान-दालन पुढ्यात आले. तेव्हा आणि आताही रूमचा ताबा मिळाला की सर्वात आधी तेथील बाथरूमचे निरीक्षण-परीक्षण करणे आणि तिथले शॉवर-तोट्या उघडबंद करण्याचे विशेष तंत्र समजून घेणे हे प्रचंड आवडीचे काम आहे. त्यामुळे नंतर होणारी फजिती होत नाही हा मोठा फायदा. त्यातही प्रचंड वैविध्य असते हे कळले. उंची हॉटेलातून स्नानागारांच्या रचनेवर भरपूर मेहनत घेतलेली दिसून येई, स्वच्छतेचा, सौंदर्याचा आणि स्नानानुभव समृद्ध करण्यासाठी लागणाऱ्या वातावरण निर्मितीवर भर दिलेला असे. स्नानाचा आनंद शतगुणित होत गेला.
वेगवेगळ्या शहरात मुक्कामात बाथ टब, बाथ सॉल्ट, बाथ बॉम्ब्स आणि बबल बाथ यासारखे नखरेल प्रकारही पुरेपूर अनुभवले. Wash away your troubles with some bubbles हे ध्येयवाक्य ठेवून स्टीम बाथ, सौना बाथ, व्हिटॅमिन फिल्टर लावलेले शॉवर, पाठीच्या कण्याला सुखद मसाज देणारे प्रेशर शॉवर, जाकुझी असे शरीराचे चोचले करण्यात मागे राहिलो नाही. अत्याधुनिक स्नानगृहांमुळे काहीदा फजितीही झाली. जपानी हॉटेल्समधली स्पेस कॅप्सुलसारखी अरुंद स्नानगृहे आणि माझे सहाफुटी धूड हे व्यस्त प्रमाण सहन न झाल्यामुळे त्यात असलेल्या असंख्य तोट्या-बटणे-रिमोट-अलार्म यांनी वात आणला होता. स्वीडन आणि जपान दोन्हीकडे पारंपरिक बाथहाउसचा अनुभव घ्यायला म्हणून गेलो असता तिथल्या 'दिगंबर ओन्ली' अटीमुळे काही क्षण अवघडलो होतोच.
सिंगापूरच्या मरीना बे सँडच्या सर्वोच्च मजल्यावर माझ्या छोट्या पिल्लाला सोबत घेऊन खिदळत केलेलं जाकुझी स्नान, गोव्यात थोड्या अप्रसिद्ध शांत समुद्रकिनाऱ्यावरचे रात्रीच्या चांदण्यातले स्नान, भोपाळला ३०० वर्षे जुन्या कादिमी हम्माम मध्ये केलेला नवाबी गुसल, धबधब्याखाली केलेली तुषारस्नाने, मे महिन्याच्या प्रचंड उकाड्यात पटियाला-अमृतसर मार्गावरील अनोळखी गावातल्या एक निर्जन ट्यूबवेलवर मनसोक्त केलेले स्नान, कडाक्याच्या थंडीत मित्रांच्या पैजेखातर तिस्ता नदीच्या उथळ पात्रात केलेले, ब्रह्मपुत्रेच्या घनगंभीर पाण्याकाठी घाबरत केलेले, सोरटी सोमनाथला समुद्राच्या प्रचंड खारट पाण्यात केलेले, उज्जयिनीत क्षिप्रा 'नदी' म्हटल्या जाणाऱ्या ओघळात जेमतेम पाय बुडवून केलेले, पुष्करच्या ब्रह्मसरोवरात भल्यापहाटे केलेले, मालदीवच्या रिसॉर्टमध्ये खाली काचेतून समुद्र आणि वर मोकळे आकाश दिसणाऱ्या राजेशाही स्नानागारात केलेले.. अशा एक ना अनेक स्नानस्मृती माझ्या मनाला आजही भिजवून काढतात. Life is a long bath, the more you stay, the more wrinkled you get हे पुरेपूर पटलंय.
स्नानमाहात्म्यात एक अध्याय टॉवेलचाही आहे. सुती पांढरा पंचा, मग थोडे बरके कोइम्बतूरच्या 'मोती' ब्रँडचे जाडसर टॉवेल, मग सुखसंवर्धक टर्किश टॉवेल, मग खास बांबूच्या/केळीच्या तंतूंपासून बनवलेले अतिमुलायम टॉवेल्स, जुन्या सिनेमातील व्हिलन मंडळी वापरीत तसले स्टायलिश बाथरोब असे सर्व चोचले पुरवायला मिळाले. तो प्रवासही आनंददायक ठरलाय.
* * *
सर्वच स्नानप्रवास आनंदी झाला असेही नाही. प्रयाग-वाराणसीला भेटी घडल्या, पण गंगास्नानाचे आलेले योग बरेचदा पाण्याच्या अस्वच्छतेमुळे नाकारले आहेत - डोक्यावर पाण्याचे शिंतोडे घेऊन प्रतीक-स्नान करून वेळ मारून नेली आहे. गंगेच्या कुशीत स्वच्छ नितळ पाण्यात स्नान करायला मिळाले, तोही प्रसंग अगदी कालच घडल्यासारखा वाटतो.
….. कुरु कृपया भवसागरपारम् ...... तीर्थपुरोहित जुळे भाऊ पंडित सुदीक्षित सुभिक्षित मंत्रपठण करीत आहेत. त्यांच्या कानात हिऱ्यांच्या कुड्या चमचमत आहेत. मावळतीचा सूर्य, नोव्हेंबर महिन्याची कडाक्याची थंडी आणि गंगेच्या स्वच्छ बर्फगार पाण्याचा तीव्र प्रवाह, त्यात भिजत उभा मी. मनाची भावविभोर अवस्था. त्यांचा आवाज टिपेला पोहोचतो ...
तव चेन्मातः स्रोतःस्नातः
पुनरपि जठरे सोऽपि न जातः
नरकनिवारिणि जाह्नवि गंगे
कलुषविनाशिनि महिमोत्तुङ्गे …..
सुदीक्षित मृदू आवाजात म्हणतात, "अनिंद्यजी, माताजी को अंतिम प्रणाम कीजिये, अस्थियों को अब गंगार्पण कीजिये..." आणि त्या एका क्षणातच आईचा हात नेहमीसाठी सुटल्याचे आलेले भान... हरिद्वारचे एकमेव गंगास्नानही कधीच न विसरता येण्यासारखे.
* * * समाप्त * * *
इतरत्र पूर्वप्रकाशित. काही चित्रे जालावरून साभार.
… सुरभी मधे हमामखाने आणि
… सुरभी मधे हमामखाने आणि त्यासाठी आयुर्वेदिक साबण बनवणार्यांच्या मुलाखती…
हे मला आठवते आहे. यात लेखात उल्लेख असलेल्या कादिमी हमाम (भोपाल) बद्दल फीचर होते.
जबरदस्त माहिती, आचार्य !
जबरदस्त माहिती, आचार्य !
तरीही हे उटणे होईल साबण म्हणून नक्की काय अभिप्रेत होते हे कळलं नाही.
टाईमपास ही शोधाची जननी आहे.
टाईमपास ही शोधाची जननी आहे.
https://vishwakosh.marathi.gov.in/25530/
यावर हे सापडले.
इतिहास : साबण किमान २३०० वर्षांपासून ज्ञात आहे. मात्र तो प्रथम केव्हा व कोठे तयार करण्यात आला, हे निश्चित माहीत नाही. बॅबिलोनियन लोकांनी इ. स. पू. सु. २८०० दरम्यान प्रथम साबण वापरल्याचे म्हटले जाते. ईजिप्शियन लोक नैसर्गिक रीत्या आढळणारे सोडा लवणांचे साठे, प्राणिज व वनस्पतिज तेले आणि मसाले वापरुन सुगंधी साबण बनवीत असावेत. इ. स. पू. सु. ६०० या काळात फिनिशियन लोक ऱ्होन नदीच्या मुखाशी स्थायिक झाले. त्यांनी साबणाचा शोध लावल्याचे मानले जाते. बकऱ्याची चरबी व लाकडाची राख यांच्यापासून साबण बनविल्याचा उल्लेख थोरले प्लिनी यांनी आपल्या हिस्टॉरिया नॅचरॅलिस या गंथात केला आहे ( इ. स. ७७). बहुतेक इतिहासकारांच्या मते रोमजवळच्या टेकड्यांच्या भागातील सॅपो नावाची मृत्तिका कच्च माल म्हणून साबण बनविण्यासाठी वापरीत. गॉल ( फ्रान्समध्ये राहणाऱ्या ) लोकांनी मलम व वस्तुविनिमयाची वस्तू म्हणून इ. स. १०० मध्ये साबण वापरला होता.
पाँपेई येथील उत्खननामध्ये सु. २०२५ वर्षांपूर्वीचा साबण कारखाना आढळला आहे. रोमन साम्राज्यात साबणाची विस्तृत माहिती होती. रोमन लोक साबणाचा उपयोग व उत्पादन या गोष्टी भूमध्य सागरी लोकांकडून शिकले. ब्रिटानियाचे रहिवासी केल्ट लोकांनाही या गोष्टी माहीत होत्या. केल्ट लोक चरबी व वनस्पतींची राख यांपासून साबण तयार करीत व त्याला सैपो म्हणत. यावरू न सोप हा इंग्रजी शब्द आला. दुसऱ्या शतकापर्यंत साबणाचे धुलाई करण्याचे महत्त्व लक्षात आले नव्हते. ग्रीक वैद्य गेलेन यांनी औषधी उपयोगाचे व शरीर स्वच्छ करण्याचे साधन असे साबणाचे वर्णन केले होते. पूर्वी साबणाचा औषधी उपयोग होत असे. आठव्या शतकातील जाबीर दूब्न हय्यात यांच्या लेखनात पृष्ठभाग स्वच्छ करणारे द्रव्य असा साबणाचा उल्लेख आलेला आहे.
जर्मनीत थोड्या प्रमाणात तर मध्य यूरोपात त्याहून कमी प्रमाणात साबण तयार होत असे. १६७२ मध्ये ए. लिओ या जर्मन गृहस्थांनी लेडी फोन श्लीनिटस् यांना इटलीमधून साबण भेटीदाखल पाठविला होता. तेव्हा हे गूढ द्रव्य कसे वापरायचे याचे तपशिलवार वर्णनही त्यांनी सोबत पाठविले होते.
सुरभीचे एपिसोड नाही सापडले. पण हे काही तरी सापडले.
आपल्याकडे अभ्यंग प्रचलित असताना साबणाचा शोध लागला नसेल असे वाटत नाही.
https://historum.com/t/ancient-indian-hygiene.177438/
हमामखाने या विषयावर पूर्वी जी
हमामखाने या विषयावर पूर्वी जी काही माहिती याहू सर्च इंजिनातून मिळायची ती आता उपलब्ध नाही असे दिसते. हा अनुभव अन्य विषयांत सुद्धा आलेला आहे. सुरभी ने चांगलाच प्रकाश टाकला होता. त्यांचे एपिसोडस कुठे मिळतील एकत्र ? ते शोधताना हम लोग आणि बुनियाद या मालिका सापडल्या .
हमामखान्यांच्या बाहेर खोल्या असत. त्यात राजदरबारी पगारी असलेले हमाम ( यांना काय म्हणायचे ?) असत ज्यांना वैद्य किंवा युनानी शास्त्रातली स्नानाशी संबंधित विद्या अवगत असे. ते द्रव्य बनवण्यात तरबेज असत. काही प्रवासवर्णनात हमामखान्यांची वर्णने आहेत. फक्त उटणीच नाहीत तर विविध तेलांचा वापर, ती तेलं काढून मसाले लावणे याचे ज्ञान त्या सेवकांना असे. स्नानाआधी मालिशचे महत्व वादातीत होते. स्नान हा सोहळाच असे. शाही स्नान हा शब्द त्यावरूनच आला असेल का ?
अंग रगडून स्नान केलं कि झोप लागते हा बालपणीचा अनुभव आहे. आजीला वेगवेगळ्या दगडांचा स्नानासाठी कसा वापर करायचा याचे ज्ञान होते. ती साय आणि त्यात वेगवेगळे पदार्थ मिसळून अंगाला लावायची. नंतर उन उन पाण्याने दगडाने रगडून स्नान घालायची. ते दगडाने क्रूर वाटायचं म्हणून ती दिसली कि लपून वसायचो. आज महत्व कळते.
गंमत म्हणजे त्या वेळी राजघराण्यातल्या स्त्रियांना स्नानासाठी पुरूषच कामाला ठेवत. मालिश साठी पहिलवानच असत. तेव्हढी ताकद लावून अंग रगडले तर रंध्रं मोकळी होतात असा समज असेल. स्त्रियांना पपुरूषाने स्पर्श करणे हे जेव्हां केव्हां इभ्रतीशी जोडले गेले असेल तेव्हापासून या सेवकांना जबरदस्ती किन्नर बनवले जाऊ लागले. बहुतेक मुघलांनी ही प्रथा सुरू केली असावी.
सध्या याचे संदर्भ नाहीत. सापडले तर देईन.
अन्य काही संदर्भ
१. https://www.jstor.org/stable/27192897
२. https://www.facebook.com/enrouteindianhistory/posts/hammam-e-qadimi-it-i...
३. https://en.wikipedia.org/wiki/Hammam#:~:text=India%20and%20Pakistan,-Pub...,(16th%E2%80%9319th%20centuries).
४. मोहेंजोदरो https://en.wikipedia.org/wiki/Great_Bath#:~:text=The%20Great%20Bath%20of....
५. https://www.britannica.com/place/Great-Bath-Mohenjo-daro
६. https://www.bbc.com/travel/article/20121129-the-origins-of-bathhouse-cul...
अस्मिता, सुंदर पोस्ट.
अस्मिता, सुंदर पोस्ट.
काल विश्वकोशाची ही लिंक पाहिली होती. धन्यवाद इथे दिल्याबद्दल.
सुंदर माहिती, अस्मिता आणि रघु
सुंदर माहिती, अस्मिता आणि रघू.
मस्त पोस्ट आचार्य, लिंक
मस्त पोस्ट आचार्य, लिंक सवडीने बघेन.
मस्त लेख आचार्य. तुमची शंका
मस्त लेख आचार्य. तुमची शंका पण रास्तच आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून इतर देशांशी जो व्यापार चालत असे त्यात साबाणाबरोबर तो शब्दही आयात झाला असावा.
आचार्य आणि अस्मिता दोघांनी
आचार्य आणि अस्मिता दोघांनी भरपूर साबणाचा फेस (मराठीतला) करुन ठेवलेला आहे. सावकाशीने शाही स्नान करतो.
अस्मिता आणि रघू आचार्य
अस्मिता आणि रघू आचार्य
उत्तम माहिती
सुंदर माहिती, अस्मिता आणि रघू
सुंदर माहिती, अस्मिता आणि रघू.....+१.
आपल्याकडे फेनक शब्द (फेस आणतो तो) आहे.
खरंच की! आणि फेना नावाचा साबण
खरंच की! आणि फेना नावाचा साबण पण आहे. फेना ही लेना.
(या फेनमिशे हससी निर्दया कैसा - या ओळी आठवल्या)
अस्मिता आणि या छान माहिती
अस्मिता आणि रआ छान माहिती
फेनक = फेस आणतो तो
फेनक = फेस आणतो तो
छान. म्हणजे साबणाला प्रतिशब्द ?
व्हॉट से @ हरचंद पालव ?
हो. फेनक हा संस्कृतोद्भव
हो. फेनक हा संस्कृतोद्भव वाटतो. फेनम् करोति इति फेनकः | ('क' आला की 'करणे' अभिप्रेत आहे, पण भावार्थ - फेस 'आणणे' - बरोबर आहे. या न्यायाने तोंडाला फेस आणणार्याला मुखफेनक म्हणावे का
).
मुखफेनक
मुखफेनक
You never fail to surprise with your wit.
_/\_
_/\_
हपा
हपा
>>> मुखफेनक
>>> मुखफेनक

फारच उद्बोधक माहिती आली आहे इथे साबणांच्या उगमाबद्दल.
'फेनिल' असाही एक ब्रॅन्ड आहे का? मला अंधुक आठवतंय.
ह्याच धाग्यावर अगदी
ह्याच धाग्यावर अगदी सुरुवातीला बहुदा लिहिलं होत मी. आम्ही शाळेत असताना एकदा संस्कृत दिनाला गंगा साबणाची जिंगल संस्कृतात केली होती गंगा फेनकम अस्माकं अशी काहीतरी
हो संस्कृत मध्ये फेनकम म्हणजे
हो संस्कृत मध्ये फेनकम म्हणजे साबण. मुखफेनक म्हणजे त्या अर्थाने फेस वॉश होइल. तोंडाला फेस आणणारा बहुदा मुखफेनकारक किंवा मुखफेनकारक व्हावा.
मुखफेनकर्ता
मुखफेनकर्ता
आमचं मत मात्र मायसोर
आमचं मत मात्र मायसोर सॅन्डललाच! +१
काय मस्त माहिती आहे ही.
काय मस्त माहिती आहे ही. अस्मिता, हपा, रघु आचार्य .... माहितीसाठी धन्यवाद.
या न्यायाने तोंडाला फेस आणणार्याला मुखफेनक म्हणावे का >>>>
हपा.
याचं मिंग्लिश भाषांतर फेसफेस होईल.
फेनिल' असाही एक ब्रॅन्ड आहे
फेनिल' असाही एक ब्रॅन्ड आहे का? >>>
यावरून वसंत बापटांची 'दख्खनची राणी' ही कविता आठवली.
फेनिल मृदुल रेशीम वसनि
ठेविल्या बाहुल्या बांधून बासनी
गोजिरवाणी लाजिरवाणी
पोरटी घेउनि पोटाशी, कुशीत
दख्खनराणी ही चालली खुशीत
मस्त माहिती!
मस्त माहिती!
पाडगावकरांच्या 'दर्शन' कवितेत पण 'फेनिल' शब्द आहे.
होत्या लाटा उधळित अपुली फेनिल कविता
फुलांफुलांतून अखंड उमलत होती नवता
मुखफेनकारक >> +१ फेसफेस >>
मुखफेनकारक >> +१

फेसफेस >>
“फेनिल” मिमांसा, कविता, जिंगल
“फेनिल” मिमांसा, कविता, जिंगल. अर्थफोड - वाहवा !
हिंदीतही वापरतात. सेम अर्थ. इथे दारूच्या फेसाचं वर्णन आहे :
मादक स्वप्निल प्याला फेनिल
साक़ी, फिर फिर भर अंतर का
आलोकित जिनका उर निश्चित
पीते वे मधु मदिराधर का
शब्द वाचायला म्यूझिकल वाटतोय… sonorous.
मुखफेनकारक >> +१
सगळे प्रतिसाद आवडले.

(मुखफेनका कुठं फेडशील हे पाप.)
मुखफेनकारक >> +१
फेसफेस >>
मुखफेनक>>>
यावरून मला 'कुफेहेपा ऐवजी 'मुफेकुफेहेपा' करता येईल असं वाटतंय.
'फेनधवल' हा शब्द ऐकलाय , फेसासारखे शुभ्र. मला 'फसफसले' हा शब्दही फेसासारखा वाटतो.
थांकू सर्वांना, लिंक चिकटवली आहे फक्त.
आज ही ओरिजनल लिरिल गर्ल नजरेस
आज ही ओरिजनल लिरिल गर्ल नजरेस आली. छापिल जाहिरात.
बघताच प्रीती सागरच्या आवाजातली जिंगल, वनराज भाटियांचे संगीत मना-कानात वाजले
Pages