अंकुर बालवाडी

Submitted by नादिशा on 6 September, 2020 - 12:58

स्वयम जेव्हा 2.5 वर्षांचा झाला, तेव्हा त्याच्यासाठी मी बालवाडीचा शोध सुरू केला. मी "पालकनीती "मासिकाची सदस्य होते. "जडणघडण "पण माझ्याकडे नियमित यायचे. दिवस राहिल्यापासून मी मुलांसाठीचेच वाचन करत होते.रेणूताईंचे "कणवू "पुस्तक, नामदेव माळींचे "शाळाभेट "ही तर माझी खूप लाडकी होती . रेणूताईंची सगळीच पुस्तके पालकांसाठी उत्तम आहेत. त्यामुळे आपण स्वयमला शिस्त लावण्यासाठी नाही, तर त्याला explore करण्यासाठी, फुलवण्यासाठी शाळेत घालायचे आहे, हे माझ्या मनात ठाम होते.

बालमोहन, अक्षरनंदन,खेळघर अशा काही हातांच्या बोटांवर मोजता येण्यासारख्या शाळा आहेत मुलांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने वाढू देणाऱ्या, त्यांना हसतखेळत शिकवणाऱ्या, फक्त रूढ अर्थाने, अक्षरओळख, अभ्यास असे न करता त्यांना जीवनशिक्षण देणाऱ्या. पण त्या सगळ्या दुसरीकडे. इथे आपल्या साताऱ्यात अशी कोणती शाळा आहे का, याचा शोध मी घेऊ लागले.परिसरातल्या सगळ्या बालवाड्या, सगळे प्ले ग्रुप्स 3-4 महिन्यांत पालथे घातले. पण पदरी निराशाच आली.मग आपल्या साताऱ्याच्या आजूबाजूला अशी शाळा आहे का, याचा शोध घेऊ लागले.वेळ पडल्यास तिकडे शिफ्ट होण्याची माझी मानसिक तयारी होती. कारण बालवाडी म्हणजे मुलांच्या आयुष्यातील, वाढीतील सर्वात महत्वाचा टप्पा. त्याच्या जडणघडणीचा पायाच जणू. आत्ता या वयात जी बीजे पेरली जातील, त्यावरूनच उद्याचे पीक कसे असेल, हे ठरणार होते. त्यामुळे अशीच शाळा मला स्वयम साठी हवी होती.

याच दरम्यान माझ्या जुन्या शेजारणीचा फोन आला. तिने "अंकुर बालवाडी "सुचवली. तिचा मुलगा तिथे शिकला होता. आई आणि मुलगा दोघेही जाम खुश होते शाळेवर.
वेळ न दवडता आम्ही दुपारी बालवाडी पहायला गेलो.गेट पर्यंत पोचलो मात्र, पाहताक्षणीच शाळेच्या प्रेमात पडलो.शाळा म्हणजे इमारत नव्हतीच तिथे. शाळेला भिंतीच नव्हत्या, एरवी मुलांना आत घेऊन दरवाज्यांना कड्या लावून घेतात, ज्यामुळे मुले बावरतात, कोंडून ठेवल्याची भावना येते मनात, ते दरवाजे नव्हते. शाळा म्हणजे एक मोठाच्या मोठा डोम होता.300 मुले आरामात त्याखाली बसू शकतील, असे माथ्यावर मोठे विस्तीर्ण छत मिरवणारा, आधारासाठीचे खांब सोडले, तर सगळ्या बाजूंनी मोकळा ! या डोम च्या आजूबाजूला छान झाडें होती, घसरगुंडी, झोके, कागदाच्या होड्या करून सोडायला छोटासा हौद आणि रुसायचे असेल, तर जाऊन बसायला छोटेसे "बाहुलीघर "पण होते. ऊन, वारा, पाऊस सगळ्यांचा आनंद घेत, झाडें, पक्षी, फुलपाखरे पाहत मुले मोकळेपणाने शिकू शकणार होती. संरक्षणासाठी बाजूने 4 फुटाचे दगडी कंपाउंड आणि पूर्ण उंचीचा दरवाजा होते मात्र.

तिथून आम्ही संस्थापिका आणि चालक असलेल्या पूनम पाटणकर मॅडमना भेटायला गेलो. पन्नाशी ओलांडलेल्या, उत्साही, हसऱ्या चेहऱ्याच्या मॅडमना पाहूनच आम्ही निर्धास्त झालो. त्यांच्या नजरेतच एक लहान मुलांसारखे कुतूहल आहे आणि त्यांचे लहान मुलांवरचे निर्व्याज, निखळ प्रेम त्यांच्या देहबोलीतून, बोलण्यातून जाणवत होते.
" शिशुविहार"ला त्यांचा बालवाडीचा कोर्स झालेला आहे. ताराबाई मोडक या आपल्या बालवाडी शिक्षणाच्या जनक. त्यांनी आखलेला तो कोर्स आहे आणि खुद्द अनुताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तो कोर्स एक वर्ष त्यांनी केलाय. यथावकाश B.Ed.वगैरे करून त्या सेंट पॉल स्कुल मध्ये 15-16 वर्षे नोकरीही केली त्यांनी, पण लहान मुलांवरचे प्रेम, त्यांना घडवण्याची आस त्यांना शांत बसू देईना म्हणून मग त्यांनी नोकरी सोडून दिली. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील यांना भेटून, त्यांची कोल्हापूर मधील शाळा पाहून आल्या. आणि मग स्वतः च्या संकल्पनेतून 1988 साली ही बालवाडी सुरू केली, ही सर्व माहिती आमच्या प्रश्नांना त्यांनी दिलेल्या उत्तरातून समजली. स्वयमची चित्रे घेऊन गेले होते मी त्यांना दाखवायला, त्याच्या अबोल स्वभावाची काळजी व्यक्त केली होती. मॅडम म्हणाल्या, "अहो, तो बॉर्न आर्टिस्ट आहे, हे समजतेय त्याच्या चित्रांवरून. अशी मुले खूप सेन्सिटिव्ह असतात. पण काळजी नका करू. इथे तो नक्की छान ग्रूम होईल आणि बघा शेवटच्या वर्षी तो खोड्या करतोय, मस्ती करतोय, अशी तुम्हीच माझ्याकडे कंप्लेंट करता की नाही !"आमच्या सर्व बारीकसारीक शंका आम्ही त्यांना विचारल्या, त्यांचा सिलॅबस पाहिला वाचून आणि मग तिथल्या तिथे लगेचच स्वयमला ऍडमिशन घेऊन टाकली. ऍडमिशन फी होती - फक्त 150/-आणि नंतर दर महिन्याची फी 50/-

मॅडमचा एक आगळावेगळा नियम होता, की मुलांना युनिफॉर्म नाही. त्यांचे हे वय मजा करण्याचे, हसण्याखेळण्याचे आहे. त्यांना शाळा म्हणजे सजा न वाटता शाळा म्हणजे मजा वाटली पाहिजे. त्यामुळे युनिफॉर्म, शाळेचे सॉक्स, बूट काहीही नाही. त्यांना रंगांची मजा लुटू दे. जे सहज घालता येणारे कपडे आहेत, ज्यात मुलांना comfortable वाटेल, असे शर्ट -पॅन्ट -बर्मुडा घाला. मुलींनाही हेच कपडे घातले तरी चालेल, हवे असतील तर इतर कपडेही घालू शकता, मात्र ते त्यांना कॅरी करता आले पाहिजे. बाथरूमला वगैरे त्यांना जाता आले पाहिजे, बस्स.जे सहज घालता -काढता येईल, असे काहीही घाला पायात.

पहिले 3-4 महिने कम्पलसरी बॅच लावायचा, शिक्षकांना मुलांची नावे माहिती व्हावीत, लक्षात राहावीत, ओळखता यावीत यासाठी. एकदा ते झाले, की नंतर बॅच लावला नाही तरी चालतो..
शाळेची सुरुवात सरस्वती वंदनेने होते .लहान गट -मधला गट -मोठा गट. प्रत्येक गटाला 2-2 शिक्षिका. स्वतः पाटणकर मॅडम सहित 5 छान शिक्षिका आहेत .सगळ्याजणी खूप प्रेमळ आहेत. तिन्ही गट त्या एकाच डोम खाली आरामात नांदतात , आपला आपला अभ्यास करतात , ऍक्टिव्हिटी करतात , मजा करतात.

छोट्या गटाला फक्त डबा आणि वॉटरबॅग द्यायची असते . त्यांना अभ्यास नाही , फक्त गाणी असतात . दर महिन्याला मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषांतली गाणी असतात , जेणेकरून तिन्ही भाषा मुलांच्या ओळखीच्या व्हाव्यात, त्यांतील शब्द कानावरून जावेत, भीती वाटू नये कोणत्याही भाषेची. स्पष्ट शब्दोच्चर आणि जिभेला वळण लागण्यासाठी दर महिन्याला एकेक श्लोक.

ही गाणी तिन्ही गटासाठी सारखीच असतात . पण मधल्या गटापासून अभ्यास चालू होते . मराठी -इंग्लिश मुळाक्षरे, अंक, मग छोटे छोटे शब्द, 1-100 अंक हा अभ्यास मधल्या गटाचा असतो .

तर मराठी - इंग्लिश बाराखडी, जोडशब्द, बेरीज - वजाबाकी, दैनंदिन वापरातील गोष्टींची स्पेल्लिंग्स हा मोठ्या गटाचा अभ्यास असतो.

मूल 4 वर्षांचे झाल्याशिवाय लेखन नाही, हा ठाम नियम आहे मॅडमचा. कारण तोवर मुलाची बोटांची पकड पक्की नसते, चिमटीत नीट धरता येत नाही, मग अक्षर बिघडते. शिवाय लेखन पाटी - पेन्सिल नेच, हाही नियम आहे . पाटीचा गुळगुळीत स्पर्श -पेन्सिल चा काहीसा खरबरीत स्पर्श हे एक विभिन्न कॉम्बिनेशन आहे, असे त्यांचे मत आहे .पाटीवर हात स्थिर राहतो आणि पेन्सिल च्या कडांमुळे (edgesमुळे )पकड पक्की राहते. दाबून, व्यवस्थित pressure ने मुले पाटीवर छान लिहायला शिकतात.अक्षरांचे वळण बिघडत नाही, असे त्या सांगतात . त्यामुळे पाटी - पेन्सिलनेच मुख्यतः अभ्यास असतो तिथे. पण खरेच तिथे मुलांचा पाया एकदम पक्का होतो . नंतर आम्ही जेव्हा पाहिलीत दुसऱ्या शाळेत ऍडमिशन घेतली, तेव्हा इतर मुलांपेक्षा अंकुर बालवाडीची मुले त्यांच्या अभ्यासातील प्रगतीमुळे आपोआप वेगळी ओळखू यायची.

मला स्वतः ला सगळ्यात जास्त महत्वाचे वाटते, ते तिथे मिळणारे जीवनशिक्षण ! धुणंभांडीकरणाऱ्या स्त्रियांच्या मुलांपासून ते डॉक्टर, इंजिनीअर, कारखानदारांची मुलं अशी सर्व आर्थिक गटातील मुलं तिथे असतात . सर्व जातीधर्माची मुलं तिथे असतात . सर्वांकडे सारखेच लक्ष पुरवले जाते . आज Neurophysicians सांगतात, जर तुमच्या मुलांचा IQ वाढवायचा असेल, तर अशा बहुरंगी वातावरणात वावरण्याचा आपल्या मुलांना अनुभव द्या, ही गोष्ट पाटणकर मॅडम मुळे या मुलांच्या बाबतीत सहजसाध्य होते .

मुलांना डायपर्स घालायचे नाही, असा तिथला नियम आहे .त्यामुळे टॉयलेट ट्रैनिंग पासून, पॅन्ट -शर्ट ची बटणे लावायची, काढायची,काही दिवसानंतर सुईत दोरा ओवायचा बटणे शिवायची, फुले ओवायची, वेगवेगळी धान्ये, डाळी यांचे स्पर्श, रंग, आकार अनुभवत त्या भांड्यात भरायच्या, निवडायच्या, त्यापासून वस्तू बनवायच्या, मातीकाम, उकडलेले बटाटे सोलणे, वाटाणे, घेवडे सोलणे, भेळ बनवणे, रुमालावर टाके घालणे, कात्रीने कागद कापणे अशा वयानुसार रोजच्या व्यवहारातल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांच्या अभ्यासक्रमात असतात .

अध्येमध्ये तिथे कलर्स डे साजरे केले जातात .त्यामुळे एकाच रंगामध्ये कित्ती वेगवेगळ्या शेड्स असतात, ते मुलांना सहज माहिती होते. तसेही युनिफॉर्मचे बंधन नसल्याने त्यांची दुनिया रोजसाठीच रंगीबेरंगी असते .

दर शनिवारी शाळेमध्ये खाऊ मिळतो. टीचर्स स्वतः पौष्टिक खाऊ बनवतात आणि सर्व मुलांना देतात. तेच वाढदिवसाबद्दलही. महिन्याच्या शेवटच्या शनिवारी त्या महिन्यातील सर्व गटातील मुलांचे वाढदिवस एकत्रितपणे साजरा केला जातो. सर्व आर्थिक स्तरातील मुले असल्याने पालक त्यांच्या ऐपतीप्रमाणे सर्व मुलांना वस्तू वाटणार, खाऊ देणार आणि मग मुलांना हा श्रीमंत, हा गरीब हे मनात टोचत राहणार.हे सर्व टाळण्यासाठी तिथला नियम असा आहे , की कुणीही पालकांनी मुलांना काहीही वाटायचे नाही.. वस्तू नाही, चॉकलेट नाही, काहीही नाही. टीचर्स स्वतः केक बनवतात , खाऊ बनवतात , उत्सवमूर्तींच्या हस्ते कापला जातो आणि मग ते तुकडे आणि मॅडम नी बनवलेला खाऊ सर्व मुलांना वाटला जातो .उत्सवमूर्तीना छानसे ग्रीटिंग आणि केक कापतानाचा फोटो गिफ्ट मिळतो शाळेकडून. जर कुणा पालकांची खूपच इच्छा असेल त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाबद्दल काहीतरी करण्याची, तर ते शाळेला काहीतरी उपयोगाची गोष्ट देऊ शकतात .

सर्वच सण तिथे खूप उत्साहाने साजरे केले जातात . पण त्यामागेही मुलांनी आनंद लुटणे, हा महत्वाचा उद्देश असतो . पाटणकर मॅडमच्याच शब्दात सांगायचे तर -"प्रत्येक सणाचे धार्मिक महत्त्व नक्कीच आहे. ते आम्ही नाकारत नाहीये.पण त्याहून महत्वाची गोष्ट मला ही वाटते, की सण समारंभ हे आनंद लुटण्यासाठी असतात. सणांचा मुख्य उद्देश आपण आनंद घेणे आणि इतरांना देणे हा आहे. तोच प्राधान्याने आम्ही इथे अंमलात आणतो. त्यामुळे किचकट सोपस्कार बाजूला ठेवून आनंदसोहळा साजरा करतो. "

त्यामुळे दर महिन्याला कोणता ना कोणता सण येतोच , तो आवर्जून साजरा केला जातोच , पण तो साजरा करण्यामागचे कारण, तो साजरा करण्याची पद्धत, त्यासाठी केली जाणारी विशिष्ट वेशभूषा असेल, तर ती का करायची, हे सर्व सगळे मुलांना समजावून सांगत.
काही उदाहरणे द्यायची झाली तर आषाढी एकादशीला दिंडी. काही मुले तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, विठ्ठल - रखुमाई बनून येणार, बाकीचे सारे वारकरी. टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी, आरती होऊन मग साबुदाणा खिचडी खाऊन सांगता होते .बैलपोळ्याला बैलांची पूजा, नागपंचमीला पेपर नाग बनवायला शिकवून त्यांची पूजा, रक्षाबंधन ला सर्व मुलांना टीचर्स राखी बनवायला शिकवतात .(आधल्या दिवशीच पालकांना सूचना दिलेली असते , मुलांजवळ छोटीशी भेटवस्तू देण्याबद्दल. )मग मुली त्या राखी बांधणार, मुले टिकली, बांगडी, क्लिप, रबरबँड अशी छोटीशी भेट देणार. नारळीपोर्णिमेला कोळी वेशभूषेत मुलेमुली येतात . मोठी होडी बनवून सजवली जाते . मग समुद्राची पूजा करून नारळ वहायचा, कोळीगीते गायची, नारळीभात खाऊन सांगता.

गोकुळाष्टमीला दहीहंडी ! मुलांमधला एक कृष्ण बनलेला असतो , तो दहीहंडी फोडणार .सर्वांचे डबे एकत्र करून दहीकाला बनवताना मॅडम मुलांना दहीकाला म्हणजे काय, सर्व स्तरातील मुलांनी एकत्र जमून, आपापले खाणे एकत्र करून वाटून खायचे, देण्यातला आणि एकत्र राहण्याचा आनंद लुटायचा..वगैरे सर्व समजून सांगतात. एकोप्याचा हा संदेश घेऊनच मुले घरी जातात .

स्वातंत्र्यदिन -प्रजासत्ताकदिन म्हणजे काय, कधी असतात, का साजरे करायचे, याची सविस्तर माहिती सांगून झेंडावंदन, ध्वजगीत, मुलांचे भाषणे यांसह साग्रसंगीत साजरे होतात. खाऊ म्हणून बिस्किटे मिळतात . चॉकलेटला कडाडून विरोध आहे मॅडमचा.तिथल्या तीन वर्षांत एकदाही एकही चॉकलेट मिळाले नाही स्वयमला .

गणेशचतुर्थीला गणपती बसणार. म्हणजे मखर सजवणे, फुलांच्या माळा लावणे, रांगोळी, छोटासा गणपती देव्हाऱ्यात बसवायचा, पूजा, आरती करायची, प्रसाद म्हणून मोदक वाटले जातात , बस्स.

शारदोत्सव पण असाच साजरा होतो . दिवाळीचे मोठे आकर्षण म्हणजे किल्ला ! टीचर्स, मुले मिळून दरवर्षी वेगवेगळा आणि मोठा किल्ला बनवतात. सगळयांनी मिळून आकाशकंदील बनवायचे, पणत्या सजवायच्या, एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या, लाडूचिवडा खायचा आणि "फटाके फोडायचे नाही, दिवाळी म्हणजे प्रदूषणाचा नाही, तर प्रकाशाचा सण आहे," हा संदेश घेऊन घरी जायचे. मॅडम चे सांगणे एकदम पटते , मनावर इतके ठसते मुलांच्या ..की एकही मुलगा घरी फटाके आणूच देणार नाही.

नाताळला एखाद्या ख्रिश्चन पालकाच्या मार्गदर्शनाखाली ख्रिसमस ट्री सजवला जातो. सर्व मुले आधुनिक वेशभूषा करून येतात . ख्रिस्तजन्मावर नाटुकले(टॅबलो )सादर करतात. गाणी गातात .प्रेयर होते. मग सांताक्लॉज येतो आणि सर्व मुलांना भेटवस्तू देतो !

रमजान ईदला मुस्लिम वेशभूषेत मुलांना बोलावले जाते . शाळेतील एखाद्या मुस्लिम पालकाच्या मार्गदर्शनाखाली शीरखुर्मा बनवला जातो . ईद का साजरी करतात, याबद्दल ते मुलांना माहिती सांगतात . मग सगळी मुले त्यांच्याबरोबर नमाज पढतात . एकमेकांची गळाभेट घेऊन "ईद मुबारक "म्हणून शुभेच्छा द्यायच्या आणि मग शीरखुर्मा खाऊन सांगता होते. आत्ता या अजाण वयातच आपण सगळ्या धर्मांचे सण हे आनंदच देणारे असतात, हे ठसवू शकलो, तर पुढच्या काळात धार्मिकतेने तेढ निर्माण न होण्याचे थोडे तरी चान्सेस कमी होतील, हा मॅडमचा या साऱ्यामागे हेतू असतो.

तोवर क्रीडा स्पर्धा येतात . प्रत्येक मुलाने कोणत्या तरी क्रीडा प्रकारात भाग घ्यायचाच , अशी सक्ती असते .खेळांचे आयुष्यातील महत्त्व मनावर ठसवले जाते . नंबर काढले जातात .छोटेसे बक्षीस दिले जाते.

मग येते गॅदरिंग ! प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे, स्टेज डेअरिंग आलेच पाहिजे..यासाठी सर्वांनी गॅदरिंग मध्ये भाग घ्यायचाच, असा मॅडमचा नियम आहे . काही आले नाही मुलाला, तरी चालेल, तो नुसता स्टेजवर येऊन उभा राहू दे, पण भाग घ्यायचाच, असे त्या सांगतात . मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, हा मुख्य उद्देश असतो गॅदरिंगचा .त्यासाठी उगाचच मुलांना कुठेतरी मॉब मध्ये उभे करायचे आणि मुलांच्या - पालकांच्या मनाचे समाधान करायचे, हा प्रकार इथे नसतो. मोजक्याच, मोजक्या 10-10 मुलांचाच ग्रुप्स करून त्यांचे डान्स बसवले जातात, मग डान्स ची संख्या कितीही वाढो.त्यामुळे प्रामाणिकपणे सगळ्यांना गुणदर्शनाची संधी मिळते. त्यासाठी शाळेलाच सजावट करून स्टेज बनवले जाते , मुलांचे पालक हेच प्रेक्षक. ड्रेपरी घरातीलच वापरावी, अशी सूचना असते . शक्य होईल, त्यांना शाळेतील टिचर्सच ड्रेपरी बनवून देतात . किंवा ज्यांना शिवणकाम येते, ते पालक शिवून देतात . सगळा प्रेमाचा मामला असतो . स्टेज म्हणून रोजचीच शाळा , प्रेक्षक म्हणून रोजचेच आपले पालक..सगळे होम पीच च वाटते मुलांना. आणि मुले बिनधास्त परफॉर्म करतात.

सूर्य कुठे उगवतो, दिशा किती - कोणत्या, ऋतू किती - कोणतेकोणते, कोणत्या ऋतूत कायकाय बदल होतात, झाड कसे लावायचे, कसे वाढवायचे, झाडाचे पार्ट्स कोणकोणते, झाडांचे फायदे कोणतेकोणते, असा मुलांचा सगळा अभ्यास स्वतः पाहून, अनुभव घेऊन चालू असतो . ही शाळा म्हणजे अगदी ओपन बुक आहे . शाळेत नक्की काय चालते, हे कुणीही पालक भिंतीबाहेरून पाहू शकतात, (अर्थात मुलांना disturb न करता !)आणि निर्धास्त होऊ शकतात. शिक्षकाची काहीही आडकाठी नसते त्यासाठी.

अभ्यासाचा वेळ सोडला, तर इतर वेळी मुलांनी पाने -फुले तोडा, मातीत, पाण्यात मनसोक्त खेळा, खेळणी खेळा, झोका, घसरगुंडी, सी सॉ खेळा कुणीही रागावत नाही. मुलांमध्ये भांडणे झाली, तरी ती प्रेमाने समजावून, फक्त दटावूनच सोडवली जातात . तीन वर्षात क्वचितच कुणाला शिक्षा झाल्याचे मी पहिले आहे.क्षेत्रभेट म्हणून भाजी मंडई, किराणा दुकान, पोस्ट ऑफिस अशा ठिकाणी मुलांना नेले जाते. न चुकता दरवर्षी गुरुवार बागेत सहल होते.

दर महिनाअखेरीला पालक मीटिंग. त्यावेळी प्रगतीपत्रक पाहता येते , टीचर्सशी बोलता येते , महिन्याभरातील प्रगती समजते . इथे एकदाच परीक्षा होते मुलांची - वार्षिक परीक्षा . पण तिचे यत्किंचितही भय मुलांना वाटत नाही , एवढी पक्की तयारी त्यांची करून घेतलेली असते .

शाळेचा शेवटचा दिवस म्हणजे "बाहुलीचे लग्न. "आपल्या पिढीतील सगळ्यांनीच आपल्या लहानपणी हा खेळ खेळलेला आहे. त्यात किती मौज असते, सांगायची गरज नाही. तोच आनंद या पिढीतल्या मुलांनाही देण्याचा मॅडमचा हेतू आहे . आता इथल्या बऱ्याच शाळांनी हा उपक्रम चालू केला आहे . पण याची सुरुवात "अंकुर बालवाडी "ने केलेली आहे, हे मी अभिमानाने सांगते.
दरवर्षी वेगळ्या पद्धतीने लग्न.. कधी महाराष्ट्रीयन, कधी गुजराती, कधी राजस्थानी, कधी बंगाली.. त्या लग्नविधींची व्यवस्थित माहिती मिळवून, सर्व तयारी केली जाते .मुलांमधलाच वधूपक्ष, वरपक्ष, करवली, भटजी आणि वकीलही ! सारे त्या पद्धतीने नटून सजून आलेले असतात . साऱ्या टीचर्स, हौशी पालक सारे तशी वेशभूषा करून येतात .साग्रसंगीत पार पडते बाहुला बाहुलीचे लग्न. भटजीबुवा मंगलाष्टका म्हणतात . मग वकीलसाहेब येतात रजिस्टर घेऊन. नवरा नवरीच्या सह्या घेतात . मग खाऊ. धम्माल असते अगदी. लग्न कोणत्याही पद्धतीने होवो, रजिस्ट्रेशन झालेच पाहिजे, हा संदेश घेऊनच मुले घरी जातात .

मोकळ्या वातावरणात, हसतखेळत, स्वतः ला हवे तसे मुक्तपणे वाढत, शिक्षण घेतल्यानंतर साऱ्या मुलांमधील गुण explore झाले नाहीत तरच नवल !

आमच्या बाबतीत बोलायचे तर आमचा स्वयम एकदम अबोल, नको एवढा शांत. पहिल्या वर्षी तर त्याला शिकवणाऱ्या शारदा मॅडम चा पदर एक क्षण पण सोडला नाही त्याने. त्यांच्या जवळच बसणार, तिथेच शिकणार, शाळा सुटली की घरी परतणार. कुणाशी बोलणे नाही, मैत्री नाही, खोड्या करणे तर लांबच राहिले. कितीही बोलते करायचा प्रयत्न केला, तरी शाळेत काय झाले, याबद्दल काहीही बोलायचा नाही. सगळे मार्ग अवलंबून दमलो आम्ही. काही दिवसांनी त्याने नवीन खेळ शोधला. रोज संध्याकाळी तो ब्लॉक्स वापरून अंकुर बालवाडी बनवायचा.तिथे त्याच्या खेळण्यांची तो शाळा भरवायचा. 6 टीचर्स, मावशी, फळा सारे काही. आणि मग त्याची शाळा चालू व्हायची. आज शाळेत जे जे झाले असेल, ते इत्यंभूत आमच्यासमोर प्रात्यक्षिक घडायचे, आगाऊ मुलांच्या खोड्या, खेळ, अभ्यास सारे काही. आणि त्याच्यातून आम्हाला कळायचे आज शाळेत काय झाले ते ! अभ्यास, स्पर्धा , drawing डान्स सगळ्यांत आवडीने भाग घेणार, सगळ्यांत यश मिळवणार . पण एकदम आज्ञाधारक, गुणी बाळ. जेवढे सांगेल तेवढेच करणार . कोणाशी बोलणे नाही, कुणी त्रास दिला तर मॅडमना, आम्हाला सांगणार पण नाही, नुसताच रडत राहणार - रुसून बसणार ! पहिले वर्ष असेच गेले.

पण दुसऱ्या वर्षीपासून त्याची मुलांशी मैत्री झाली, मोकळेपणाने खेळायला लागला,शाळेतल्या गमतीजमती, किस्से सांगायला लागला. नंतर नंतर तर एवढा बडबड करायचा,किती सांगू नि किती नको , असे होऊन जायचे त्याला. इतके बोलायचं की बास, बास आता , डोके दुखायला लागले आमचे , असे म्हणावे लागे.
शेवटच्या वर्षी चक्क त्याच्या तक्रारी यायला लागल्या, की हा खूप दंगा करतो . अभ्यास पटकन करून टाकतो आणि मग खूप मस्ती करतो. त्यावेळी माझा विश्वासच बसला नाही माझ्या कानांवर. पण कपडे - केस सगळा अवतार झालेला असायचा , शाळेतून घरी यायचेच नसायचे बाळराजेंना. अजून थोडा वेळ , अजून जरा थांब ना, असे करत रेंगाळतच राहायचा. पाय निघायलाच नाही त्याचा शाळेतून. नेहमी त्याला त्रास देणाऱ्या मुलाकडून नेहमीसारखा मार न खाता जेव्हा स्वयमनेही मारामारी केली, तेव्हा मी पहिल्यांदा जाऊन पाटणकर मॅडम ना कोपरापासून हातच जोडले. माझ्या सुरवंटाचे फुलपाखरू झाले होते त्यांच्या कुशल देखरेखीखाली !

आणि ही सगळी जादू घडवले जाते, अगदी प्रेमाने, मनापासून, आणि महिना 50/-एवढ्या माफक फी मध्ये !सगळीच मुले आणि पालकपण अगदी खुश असतात शाळेवर. आमच्यासारखे कितीतरी पालक दरवर्षी मॅडमना विनंती करतात, पुढचे वर्ग चालू करण्याची ! पण अबोध वयातीलच मुलांना घडवण्याचा घेतला वसा मॅडम टाकत नाहीत.

मी तर त्या शाळेच्या, मॅडम च्या इतकी प्रेमात आहे, की दरवर्षी त्यांच्या शाळेतील मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी न चुकता हजेरी लावते.त्यांच्या उपयोगी पडण्याचा चान्स मला बिलकुल सोडायचा नसतो.

तर अशी ही अंकुर बालवाडी ! गेली 30 वर्षे अव्याहतपणे पाटणकर मॅडम चे कळ्यांना फुलवण्याचे काम चालू आहे. आत्ता शाळेच्या या 31व्या वर्षी मॅडमनी अंकुर बालवाडीचे यू ट्यूब चॅनल चालू करून डिजिटल युगाशीही हातमिळवणी केली आहे . त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो , त्यांचे ओल्या मातीला आकार देण्याचे हे काम असेच दीर्घकाळ चालू राहो , अनेक मुग्ध कळ्यांना त्यांच्या हातांचा परीस स्पर्श लाभो आणि भविष्यकाळातील चांगले नागरिक समाजाला लाभोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

f33cc6ce-2674-4f34-9c71-7abc984a4d62.jpgdcc2c8e9-bdfe-4948-b398-e8c86eb7702d.jpg5d15289f-ca32-42d4-8ab4-032204fa95c4.jpg390fa681-b6c3-4201-8209-d483a6a7b526.jpg49384be2-1661-484a-bac5-7962a0fb987f.jpga5680b42-26c1-418f-a766-76ef04a0bcff.jpgcffb719c-0fc3-46cc-8aea-893fac5ac7c1.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्स रूपाली विशे -पाटील.
हो मानव पृथ्वीकर. आम्ही दोघे असेच म्हणायचो स्वयमला, आम्हाला नाही मिळाली रे अशी बालवाडी..त्याचे पप्पा तर त्याला म्हणायचे कधीकधी, "आज मी बसू का रे तुझ्या ऐवजी तिथे? तू सांग ना मॅडम ना तसे , माझ्या पप्पाना बसू द्या म्हणून. " मग स्वयम चिडायचा, म्हणायचा, वेडे आहात का पप्पा, कित्ती मोठ्ठे झालाय आता तुम्ही. आणि ती तुमची नाही, माझी शाळा आहे. "

Hi... या लेखात मी share केलेले काही फोटो दिसत आहेत, काही दिसत नाहीयेत. असे का होत असावे? कुणी सांगू शकेल का प्लीज?

मी तुमचे लेख वाचतो. मला खरं म्हणजे आश्चर्य वाटतं की पालकत्वाची एवढी मोठी जबाबदारी सांभाळताना इतकं सगळं लिहायला तुम्हाला वेळ कधी आणि कसा मिळतो.... तुमचे दिवस अठ्ठेचाळीस तासाचे वगैरे आहेत की काय तुम्ही राहता तिकडे? एकेका दिवसात दोन दोन लेख असतात तुमचे... बाप रे.. मुलाला सांभाळणारी बाई ठेवली असेल तरच हे शक्य आहे असे वाटते. तसे नसेल तर आम्हालाही गुपित कळू द्या ' के आए कौन ' दिशा ' से हम...! नाही तर आमची स्थिती म्हणजे ना दिशा ना जगदी शा!

किती छान !.. फोटो दिसत नाहीयेत.. बघायचे आहेत

..

ऍडमिशन फी होती - फक्त 150/-आणि नंतर दर महिन्याची फी 50/-
>>>>
आणि त्या दुसरया धाग्यावर आम्ही काही पालक बालवाडीच्या मुलांची लाखभर फी ने परेशान आहोत.
दर्जेदार आदर्श शाळा बोले तो ड्रीमस्कूल तर ईतक्या कमी पैश्यात शिकवत आहेत..

प्रतिसादाबद्दल सर्वांना थँक्स.

ऋ ssन्मेष, खूप दिवसांच्या अथक शोधकार्यानंतर ही शाळा मिळाली. ही बिनभिंतीची शाळा खरेच सुंदर आहे.मला दिसताहेत फोटो. तुम्हाला एकही फोटो दिसत नाहीये का? पुन्हा टाकू का images?

बिथोवन, तुमचा प्रतिसाद सकारात्मक घेऊ ना मी? अहो, आम्ही दोघेच आहोत, पण आमच्या मुलाच्या development मधली each & every moment enjoy करतो आम्ही. कामवाली /बाळ सांभाळायला जाणीवपूर्वक कुणी ठेवले नाही कधीही. माझा दिवस रोजच सकाळी 5ला चालू होतो. रात्री 11 - 11.30 ला संपतो . माझी opd घरातच आहे, ती सकाळी 9ते रात्री 9चालू असते. अगदी Continue पेशंट नसतात, त्यामुळे मोकळ्या वेळात लेखन करते. मुलाचा अभ्यास वगैरे घेऊ शकते.
माझे मिस्टर जमेल तेवढी मदत करतात मला. आमची chemistry चांगली आहे. आमच्या सहजीवनावर एक लेख लिहिलेला आहे मी. वाचून पहा...
https://www.maayboli.com/node/76333

एका दिवसात 2-2 लेख? अरे हो, ते शिक्षक दिनादिवशी लिहिले. माझ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मला ते शिक्षक दिनादिवशीच लिहायचे होते. नशिबाने स्वयम साठीही मला पहिल्या गुरू चांगल्या लाभल्या. त्यामुळे त्यांनाही गिफ्ट द्यायची होती मला शिक्षक दिनाची. त्यामुळे तेव्हा अगदी रात्रंदिवस जागून ते तिन्ही लेख लिहिले. "माझ्या आयुष्यातील त्रिमूर्ती -भाग 1, भाग 2 आणि अंकुर बालवाडी. "
धन्यवाद !

@नादिशा, तुम्ही लेखनात जे फोटो देत आहात ते दिसण्यासाठी तुमच्या वैयक्तिक जागेत तसेच असणे अपेक्षित आहेत. ते तुम्ही तिथून काढून टाकले तर इथेही लेखनात ते दिसत नाहीत.