एका लग्नाची दशकपूर्ती

Submitted by नादिशा on 28 August, 2020 - 07:11

पंधरा ऑगस्ट ला भारतातील सर्व लोकांबरोबर स्वातंत्र्यदिन साजरा करत असतानाच आमच्या घरात अजून एक आनंद वाहत होता . तो दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल होता , खूप गोडकडू आठवणींचा पिसारा सोबत घेऊन आलेला होता , कारण त्या दिवशी असतो आमच्या लग्नाचा वाढदिवस !यावर्षी हा दिवस आमच्यासाठी अजून खास होता , कारण त्या दिवशी होती, आमच्या लग्नाची दशकपूर्ती !

त्या दिवसभरात सुहृदांच्या शुभेच्छा घेता घेता त्यांच्या कोपरखळ्यांनाही आम्हाला दरवेळी तोंड द्यावे लागते, "असा काय दिवस निवडला तुम्ही लग्नासाठी?" "सगळ्या देशाला स्वातंत्र्य मिळाले या दिवशी आणि तुम्ही मात्र पारतंत्र्यात!"... वगैरे.. वगैरे..

पण त्यांना काय माहिती, हा दिवस निवडण्यामागे मुळात तेच कारण होते . अत्यंत काटकसरीने, एक -एक पै जमवून, कष्टाने स्वतः चे घर बांधल्यानंतर "आपल्या देशाला ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळाले, त्याहून मोठा शुभ मुहूर्त कोणता असू शकतो? "असा विचार करून ज्योतिषाकडून मुहूर्त न काढता पंधरा ऑगस्टला वास्तुशांती करणाऱ्या पपांचे संस्कार आहेत त्यामागे. त्यामुळे आमचे लग्न ठरले, तेव्हा वरपक्षाने त्यांच्या ज्योतिषाकडून जे तीन -चार मुहूर्त काढून आणले होते, त्यात पंधरा ऑगस्ट ही तारीख दिसताच मी तीच निवडली. कारण खरेच तो आपल्यासाठी एवढा गौरवाचा, अभिमानाचा दिवस आहे, कि त्याहून शुभ असा दुसरा मुहूर्त असूच नाही शकत.

पपांमुळे सुरुवातीपासूनच समाजवादी, सत्यशोधक विचारांची नाळ बांधली गेल्यामुळे थाटामाटात, वाजतगाजत लग्न करण्याला माझा विरोध होता. जरुरीपुरत्या खर्चात, मोजक्याच आपल्या जवळच्या माणसांच्या उपस्थितीत, साधेपणाने पण सर्व विधींचा अर्थ समजून घेत लग्न करण्याची माझी इच्छा होती. पण ती कल्पना कुणाच्या पचनी पडायची नाही. पण माझ्या भावी पतीला ती कल्पना भावली, त्याने त्याच्या घरच्यांना पटवून दिली. आणि माझ्या कल्पनेप्रमाणे माझ्याच माहेरी आमच्याकडच्या दहा - त्यांच्याकडच्या दहा अशा मोजक्या सुहृदांच्या उपस्थितीत विधिवत आमचे लग्न पार पडले.रुखवत, फर्निचर अशा गोष्टी एक पद्धत म्हणून माझ्या सोबत देण्यापेक्षा माझ्या आईवडिलांनी मला पाच तोळे दागिने केले होते आणि माझ्या अकाउंट ला रोख रक्कम भरली होती. "तुम्हाला दोघांना तुमच्या संसारासाठी ज्या गोष्टी आवश्यक वाटतील, त्या परस्पर विचारविनिमयाने तुम्ही यातून घ्या," असे सांगितले होते त्यांनी माझ्या पतीला.

आज बघता बघता दहा वर्षे होऊन गेली त्या गोष्टीला. पण मला तर आमच्या संसाराला दहा वर्षे झालीत, असे वाटत नाही. वर्षानुवर्षे होऊन गेली, असे वाटते. एवढे आम्ही रमलो आहोत, एकजीव झालो आहोत या संसारात.

पण हे सारे व्हायला दोघांनी पण मनापासून प्रयत्न केले आहेत, आपले प्राण ओतले आहेत या संसारात.

तुझा भाऊ, माझी आई असे उल्लेख कधीच करायचे नाहीत. दोन्ही घरे आपलीच आहेत आणि दोन्ही घरातली माणसे आपली दोघांची आहेत, असेच कायम लक्षात ठेवायचे, हे आम्ही पाहण्याच्या कार्यक्रमातच ठरवले होते. ते दोघांनीही पाळले.त्यामुळे मी सासरच्यांची मुलगी होण्याचा आणि अमितने माझ्या घरच्यांचा मुलगा होण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. एकमेकांशी बोलताना आपल्या नाशिकच्या घरी आणि आपल्या सातारच्या घरी असे उल्लेख करतो.आणि दोघांनाही समान व्हॅल्यू आहे आमच्या दृष्टीने, त्यामुळे त्या विषयावरून आमचे कधीच वाद नाही झाले.

सर्वात महत्वाची गोष्ट आमच्या सहजीवनाची मला वाटते ती ही, कि आम्ही दोघेही एकमेकांचे स्वातंत्र्य जपतो. समोरचा स्वतंत्र माणूस आहे, त्याचे स्वतंत्र विचार, स्वतंत्र मते आहेत, याची जाणीव आमच्या मनात कायम असते आणि त्या वेगळेपणाचा आम्ही मनापासून आदर केला. त्यामुळे स्वतः साठी समोरच्याला बदलायचा प्रयत्न न करता त्याच्या वेगळेपणाचा स्वीकार केला. "तुला असे वाटते ना, ठीक आहे, तुझेही बरोबर आहे, माझेही बरोबर आहे, तुला पटते, तसे तू वाग, मला वाटते तसे मी. "असा आमचा स्टॅन्ड असतो.
उदा. स्वयम लहान असताना अमितची इच्छा असे, त्याची नजर काढावी. माझा अशा गोष्टींवर विश्वास नाही. मग तोच स्वयम ची नजर काढायचा. तेव्हा ना मी कधी वाद घातला-अडवले , कि हे चुकीचे आहे,मला पटत नाही, तू करायचे नाही.. ना त्याने मला जबरदस्ती केली, कि मी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केलाय, असते असे सारे आणि तू आई आहेस याची तर तूच काढली पाहिजे नजर...अशी.

खाण्यापिण्याच्या आवडींपासून कपडे , परफ्यूम , इंग्लिश मूवी पर्यंत.. ज्या ज्या गोष्टींत मतमतांतरे येतात, तिथे आम्ही हेच धोरण अवलंबले आहे, तुझे तुझ्याजवळ, माझे माझ्याजवळ. त्याला चायनीज भयंकर आवडते, मला एक घास पण खायची इच्छा नसते. मी पुस्तकी किडा, त्याला रोजचा पेपर जरी वाचला नाही, तरी काही बिघडत नाही. तो धार्मिक, मी काहीतरी एक शक्ती विश्वात आहे, एवढेच मानणारी. त्याला पॉप सॉंग्स आवडतात, मी गझलांची दिवाणी ! बाहेर जायचे असेल, तर मी पाच मिनिटात तय्यार, त्याला तयार व्हायला कमीत कमी अर्धा तास !तो चहाप्रेमी, मी कॉफी ची चाहती !पण आम्ही समोरच्याचा वेगळेपण स्वीकारून आपापल्या आवडीनिवडी जपतो. जरुरी नाही प्रत्येक वेळी एकत्रच असले पाहिजे. कधीकधी समांतर, पण एकमेकांसोबत चालू शकतोच कि.

पण हे सगळे करताना हेटाळणी नसते, चेष्टा नाही करत आम्ही एकमेकांची, तर एकमेकांच्या वेगळ्या मतांचा आदर करतो. त्यामुळे त्याचा मुहूर्त, शुभदिन अशा गोष्टींवरचे प्रेम जाणून त्याने ठरवलेल्या दिवशी खरेदी करणे, पेपर मध्ये ज्योतिषावर एखादा लेख आला तर त्याला माहिती देणे, रविवारच्या पेपर मध्ये आठवडयाचे ज्योतिष पाहून त्यावरून कामे ठरवण्यावरून त्याची थट्टा केली, तरी त्याच्यासाठी तो पेपर स्वयम च्या कातरकामापासून जपून ठेवणे,वाचनालयात ज्योतिष शास्त्रावरचे नवीन पुस्तक दिसले, तर त्याच्यासाठी घेऊन येणे.. हे जसे मी करते, तसेच माझे वाचनावरचे प्रेम जाणून माझी वाचनालयातील पुस्तके न कंटाळता बदलून आणून देणे, मी वाचत असेन, तर स्वयम ला खेळवणे, विणकाम मला आवडते,पण ते करताना मी खांदा दुखवून घेते, यावरून मला कितीही ओरडला, तरी कुठे चांगली डिझाइन दिसली, तर माझ्यासाठी फोटो काढून ठेवणे, हे तोही करतो.मला नसली, तरी त्याला परफ्युम्स आवड आहे, याची जाणीव ठेवून त्याच्यासाठी उत्तमोत्तम डिओ, परफ्यूम्स मी खरेदी करते. तर मला आवडणारी निशिगंधाची फुले, मोगऱ्याचा गजरा तो जमेल तेव्हा आणून देतो. सतत चोवीस तास एकमेकांसोबत घालवण्यापेक्षा आम्ही एकमेकांना स्वतः ची स्पेस देतो. सुटी असेल तरी एकमेकांसोबत राहून पण आपापल्या पद्धतीने तिचा आनंद घेतो.मराठी सिनेमा पहायला मी माझ्या मैत्रिणीसोबत जाते, तो मित्राबरोबर जाऊन इंग्लिश मूवी पाहून येतो.

काही काही बाबतीत तर सहनशक्ती चा कडेलोट असतो.उदा. तो खान्देशातील असल्याने तो कुस्करून जेवायचा. मला समोर तो काला पाहिला, कि पोटात ढवळून यायचे, जेवणच जायचे नाही सुरुवातीला . आता सवयीचे झाले. गणपती डेकोरेशन म्हटले, कि अमित मध्ये उत्साह संचारतो.दरवर्षी वेगवेगळे डेकोरेशन, तेही स्वतः च बनवायचे असते त्याला.त्याच्या ऑफिस मधून मिळणाऱ्या तुटपुंज्या वेळामुळे अक्षरशः रात्री जागून करतो तो सर्व. कुठेही तडजोड नाही. अक्षरशः सेमी -सेमी ची मापे घेऊन, थोडेही इकडे तिकडे झालेले चालत नाही त्याला, एवढीशी ही चूक चालत नाही त्याला.जवळजवळ पंधरा -वीस दिवस चालू असते हे सारे . तोवर इतर कशामध्येही त्याचे लक्ष नसते, अगदी जेवण्याखाण्यातही .डोक्यातली आयडिया प्रत्यक्षात येईपर्यंत चैन नसते. त्याला स्वतः ला खूप थकवणारे असतेच हे सर्व आणि त्यामुळे "कर ना बाबा, एकदाचे जे करायचे ते. हो पटकन मोकळा, "अशी माझी चिडचिड होत असते.

एखादे लोकरीचे नवीन डिझाईन मिळाले , तर तासनतास, प्रसंगी रात्री जागूनही, ते पूर्ण करेपर्यंत मला चैन पडत नाही. दुखऱ्या खांद्याची तेव्हा जराही जाणीव नसते मला, तेव्हा अमितचाही जीव असाच वरखाली होत असतो."अगं, उद्या विणलेस, तर काय तुझ्या मेमरी मधून डिलिट होणार आहे का ते डिझाईन? "अशी तेव्हा त्याचीही चिडचिड होत असते.पण अशा प्रसंगात आम्ही दोघेही एकमेकांचे वेड समजून घेतो, आपण शांत राहणे, हीच या वेळी समोरच्याला आपली मोठी मदत आहे, हे जाणून त्याला फ्रेश ठेवायला चहा कॉफी पुरवणे, त्याचे आवडते म्युझिक लावून देणे, वेळेवर जेवायची आठवण करणे, स्वयमकडे लक्ष देणे, अशा गोष्टी करतो .

सुदैवाने बऱ्याच बाबतीत आमची मते खूप जुळतात. दोघांनाही समाजसेवेची आवड आहे, झाडांचे, फुलांचे दोघांनाही वेड आहे, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड वस्तू याचा दोघांनाही तिटकारा आहे, फुरसत मिळाली, तर शॉपिंग करणे, मॉल्स ना जाणे यापेक्षा एखाद्या शांत, निसर्गसंपन्न ठिकाणी जायला दोघांना आवडते.गल्लाभरू सिनेमांपेक्षा दर्जेदार, विचारप्रवृत्त करणारे, काहीतरी शिकवणारे सिनेमे आवडतात आम्हाला.प्रिंसिपल ऑफ मिनिमलायझेशन आम्हा दोघांनाही पटते. त्यामुळे अनावश्यक गोष्टींवर जाणीवपूर्वक पैसे खर्च करत नाही. एकमेकांचे वाढदिवस, एनिवर्सरी अशा दिवशी महागडी गिफ्ट देण्यापेक्षा संसारोपयोगी गोष्टीच परस्पर विचारांनी घेतल्या आम्ही. त्यांवर तारीख मात्र त्या दिवशीची असते, जेणेकरून आमची आठवण राहते,त्या स्पेशल दिवसाची.त्यामुळे सुरुवातीला बेताची आर्थिक परिस्थिती असली, तरी लवकरच सर्व गोष्टीनी सुसज्ज असा संसार आम्ही उभारू शकलो आणि तोही कोणत्याही कर्जाशिवाय.गरजेच्या सर्व गोष्टी आज आमच्या घरी आहेत, पण छानछोकीला मात्र थारा नाही.

आम्हा दोघांना त्या दिवशी उत्सुकता असते, ती मात्र समोरचा आपल्याला कसले ग्रीटिंग देतोय याची !हो, आजच्या या डिजिटल युगातही आम्हा दोघांचे खूप प्रेम आहे ग्रीटिंग्स वर. दोघांनाही मनापासून आवडते ग्रीटिंग देणे -घेणे !समोरच्याच्या स्वभाव, विचारांना, स्वप्नांना जुळेल, असे समर्पक शब्द असणारे ग्रीटिंग शोधणे, हा मोठा च टास्क असतो आणि दोघेही मनापासून पूर्ण करतो.म्हणूनच दरवेळेचा ठरलेला प्रोग्राम असूनही मनात खूप उत्सुकता असते आपल्याला कोणते ग्रीटिंग मिळणार याची. त्यामुळे खूप सुंदर सुंदर ग्रीटिंग्स चा खजिना साठलाय आमच्याकडे एवढ्या वर्षांत. एका एनिवर्सरीला तर गंम्मत च झाली.आम्ही दोघांनीही सेम ग्रीटिंग आणले होते एकमेकांसाठी. एकमेकांच्या हातात सेम सेम ग्रीटिंग पहिले आणि खूप हसलो दोघे.. अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत. आपण आता खरेच एकरूप झालोय,याची खात्रीच पटली जणू त्यादिवशी.

काही बाबतीत आमची "बदल -एक प्रेमकथा "आहे. पण हे बदल सहवासामुळे, प्रेमामुळे आपोआप घडले. उदा. माझ्या घरी सगळे शांत असल्याने माझाही स्वभाव शांत, काहीसा अबोलच होता. याला एक मिनिट पण शांत बसवत नाही, त्याच्यामुळे मी बोलायला शिकले. वाद झाला, तर काहीही न बोलता रुसून बसायची धुमसत राहायची माझी सवय. याचे मात्र म्हणणे, "चीड, भांड, हवे तर शिव्या दे, पण स्पष्ट बोल."त्याच्यामुळे मी मन मोकळे करायला शिकले. मला सर्व गोष्टी प्लॅनिंग ने करण्याची सवय, याच्या कधी ते गावीही नाही. पण आता तो प्लांनिंग करायला आणि त्या बरहुकूम वागायला शिकलाय. माझ्यावर काटकसरीचे, पैसे गुंतवणुकीचे संस्कार, तो "कल कि कल देखेंगे यार, आज का दिन ख़ुशी में बिताते है, "या घरातला. आता अमित काटकसरीचे, पैसे साचवण्याचे महत्व समजलाय. कर्ज काढून एखादी गोष्ट घेण्यापेक्षा पैसे साचवून थोड्या कालावधीने वस्तू घेऊ आणि कुठल्याही दडपणाशिवाय तिचा उपभोग घेऊ, या विचारांनी वागतोय. त्याला लवकर उठायचा, व्यायामाचा आळस, मला एकही दिवस व्यायामाशिवाय गेला, तर वाया गेल्यासारखा वाटतो. आज तो ही न चुकता व्यायाम करतो, जंक फूड पासून चार हात लांब राहतो.

काहीकाही बाबतीतले एकमेकांचे प्रभुत्व आम्ही मान्य केलेय. माझा वैद्यकीय व्यवसाय, त्यामुळे आरोग्य संबंधी निर्णय मी घेणार, हे ओघानेच आले. माझे वाचन, माझा अभ्यास यामुळे स्वयम ला वाढवणे, त्याला सवयी लावणे या बाबतीतले निर्णय मी घेते, अमित प्रतिप्रश्न सुद्धा न विचारता ते फॉलो करतो. तर शेअर मार्केट हे त्याचे क्षेत्र, त्यामुळे पैसे गुंतवणे, सोनेचांदीसारख्या गोष्टींची खरेदी याबाबतीत अंतिम निर्णय अमितचा, त्यात मी किंचितही ढवळाढवळ करत नाही.

मी उच्चशिक्षित, सांपत्तिक घरातली, त्यामुळे अमितच्या स्वाभिमानाला ठेच लागू नये, याची मी काळजी घेते. तर माझ्या शिक्षणावर, बौद्धिक कौशल्यावर आपल्याकडून आणि आपल्या घरच्यांकडून अन्याय होऊ नये, यासाठी तो जागरूक असतो.कितीही चुकले असले, तरी घरातील धाकटा असल्याने अमित आपल्या घरच्यांना बोलू शकत नाही, आणि यामध्ये कधीही बदल होणार नाही, हे वास्तव मी स्वीकारले, तर स्वतः पर्फेक्शनिस्ट असल्याने दुसऱ्यांच्या बालिश चुका सहनच करू शकत नाही, समोर कुणीही, अगदी स्वतः जरी असले, तरी विचारपूर्वक स्वीकारलेल्या तत्वांशी तडजोड करायची नाही, मग त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजावी लागली, तरी बेहत्तर, हा माझा स्वभाव त्याने समजून घेतला.

एकमेकांच्या प्रगतीची आस दोघांनाही होती आणि आहे. त्यामुळे आर्थिक विवंचना असतानाही भरमसाठ फी भरून अमितला ओ टी ए कोर्स करायला मी साथ दिली.त्याला ज्योतिषाची आवड आहे, तर रीतसर त्याचा कोर्स करून डिग्री घ्यायला उद्युक्त करण्यापासून ते अमित इंग्रजी माध्यमात शिकल्याने त्यातील काही मुद्दे त्याला समजायचे नाहीत तर त्याला अभ्यासात मदत करण्यापासून, त्याचे मराठी अक्षर खराब असल्याने त्याने काढलेले पॉईंट्स सुवाच्च अक्षरांत लिहून देण्यापर्यंत सारे मी मनापासून केले. तर माझ्या पीएच. डी. च्या वेळी स्वयम ला सांभाळणे, घरातली जास्तीत जास्त कामे स्वतः करणे, हे अमित ने केले. लग्नापूर्वी चालू असलेले माझे लेखन लग्नापासून बंद आहे, याचे त्याला वाईट वाटत होते, ते मी पुनः चालू करावे यासाठी सतत आग्रह करण्यापासून, माझा खालावलेला आत्मविश्वास जागृत करण्यापासून, माझा ब्लॉग बनवून, माझ्या अक्षरशः डोक्यावर बसून पहिले दोन -तीन ब्लॉग्स माझ्याकडून लिहून घेण्यापर्यंत सारे अमित ने केले.

अमितच्या शब्दांत सांगायचे तर"चहाच्या पेल्यातील वादळे इतरांप्रमाणे आमच्याही संसारात आली. आणि इतरांप्रमाणे आम्हीही काही वेळा ती सोडवण्यासाठी इतरांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. पण ती आपल्या पेल्यातली वादळे आहेत आणि ती फक्त आणि फक्त आपल्याला दोघांनाच समोर बसून, चर्चा करून शमवावी लागतील. आलेले वादळ शमवायचे, का त्याचे वावटळीत रूपांतर होऊ द्यायचे, याचा निर्णय फक्त आपण दोघांनीच घ्यायचा आहे, हे आमच्या लवकर लक्षात आले, त्यामुळे ती वादळे जिथल्या तिथे शमली. "

माझ्या मते मी, अमित आणि आमचा स्वयम हे आपले आतले वर्तुळ, आपली पहिली प्रायोरिटी आणि दोन्हीकडचे घरचे, इतर नातेवाईक, मित्रमंडळी, हे त्या बाहेरच्या वर्तुळात, सेकंड प्रायोरिटी, हे तत्व मी ठरवले, अमितला ते पटले आणि कसोशीने आम्ही ते पाळले. दुसऱ्या वर्तुळातल्या कोणत्याही गोष्टीमुळे आतल्या वर्तुळातल्या कोणत्याही गोष्टीवर परिणाम होणार नाही, सुखशांती भंग होणार नाही, याची काळजी कायम दोघांनीही घेतली. त्यामुळे खूप लवकर मी, माझे याकडून आपण, आपले याकडे प्रवास चालू झाला. भांडणाच्या प्रसंगात पण मग कोण चुकले, यापेक्षा काय चुकले आणि यापुढे काय करायचे, ह्याला महत्व दिले गेले. आणि आजच्या वादाचे मळभ उद्याच्या दिवसावर येऊ द्यायचे नाही, हे साधता आले. या साऱ्यात हैप्पी थॉटस च्या महाआसमानी शिबीराचीही खूप मदत झाली आहे आम्हाला, स्वतः मधील प्लस -मायनस पॉईंट्स ओळखण्यासाठी, कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची सवय लागण्यासाठी.

आजही वाद होतातच. ऑफिस ला जाताना रोज काही ना काही अमित विसरणार, गेट बाहेर गेल्यावर त्याला ते आठवणार आणि ते घरातून आणून देताना मी वैतागून काहीतरी पुटपुटणार.सकाळी जाताना सांगितलेले एखादे काम संध्याकाळी घरी येताना दहा पैकी आठ वेळा अमित विसरलेला असणार, त्यावरून मी घरी आल्यावर पुन्हा चिडचिडणार.. तर सतत एकामागून एक कामे का करत राहतेस तू, कधीतरी आराम करत जा ना, यावरून अमित मला ओरडणार. सगळ्याच बारीकसारीक गोष्टी प्लॅनिंगनुसारच करायला हव्यात,असा का अट्टाहास करतेस, त्यासाठी स्वतःला का थकवतेस, काय होईल एखादेवेळी प्लांनिंग फिस्कटले तर, म्हणून तो माझ्यावर वैतागणार.. पण आता या वैतागण्यामध्ये कधीही यात सुधारणा होणार नाही याचा स्वीकार आणि मला माहीतच होते, हे असेच होणार आहे , याची जाणीव, असा सूर असतो आम्हा दोघांचाही.

हा सगळा प्रवास थोडक्यात सांगायचा तर कवी अनिलांची मदत घेईन मी -
"कसे निभावून गेलो, कळत नाही, कळत नव्हते.
तसे काहीच जवळ नव्हते, फक्त हातात हात होते !"

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांचे मनापासून धन्यवाद !
प्रकाश घाटपांडे सर, अमित चा, त्याच्या घरच्यांचा आणि माझ्या घरच्यांचा पत्रिकेवर विश्वास असल्याने पत्रिका आधीच पहिली होती. ती 34गुणांनी जुळली होती. त्यानंतर च पाहण्याचा कार्यक्रम झाला.

खूप खूप मनाला भिडणारे लेखन! खूप प्रयत्न दोन्ही बाजुने जाणीवपुर्वक झाल्याशिवाय असे सहजीवन सहज शक्य होत नाही. तुम्हा दोघान्च्याही पुढच्या वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा! पुलेशु!

आपले सहजीवन खूप सुंदररित्या मांडले आहे तुम्ही.. मनाला भावले.. भावी सहजीवनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा..

दोघांनाही समाजसेवेची आवड आहे, झाडांचे, फुलांचे दोघांनाही वेड आहे << कौतुकास पात्र आहात तुम्ही दोघेही..

सर्वात महत्वाची गोष्ट आमच्या सहजीवनाची मला वाटते ती ही, कि आम्ही दोघेही एकमेकांचे स्वातंत्र्य जपतो. समोरचा स्वतंत्र माणूस आहे, त्याचे स्वतंत्र विचार, स्वतंत्र मते आहेत, याची जाणीव आमच्या मनात कायम असते आणि त्या वेगळेपणाचा आम्ही मनापासून आदर केला. त्यामुळे स्वतः साठी समोरच्याला बदलायचा प्रयत्न न करता त्याच्या वेगळेपणाचा स्वीकार केला. >>>>>>
आम्ही समोरच्याचा वेगळेपण स्वीकारून आपापल्या आवडीनिवडी जपतो. जरुरी नाही प्रत्येक वेळी एकत्रच असले पाहिजे. कधीकधी समांतर, पण एकमेकांसोबत चालू शकतोच कि.>>>>>>
खूप खूप आवडले

आतले वर्तुळ बाहेरचे वर्तुळ पण खूप छान आयडिया
बाहेरच्या गोष्टी मुळे आपल्यावर परिणाम नाही झाला पाहिजे >>>>
सगळ्यांनी असे केले तर बरेच वाद कमी होतील

पूर्ण लेख सुंदर

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद बादशहा, देवकी, मानव पृथ्वीकर आणि च्रप्स.
खरे आहे बादशहा, "इतुके आलो जवळ की ज्वळपणाचे झाले बंधन "ही वस्तुस्थिती खूप लोकांच्या लक्षात येत नाही. एकमेकांवर प्रेम असले म्हणजे कायम सयामी जुळ्यांसारखे बरोबर असलेच पाहिजे, असे नाही. त्यापेक्षा स्वतः ची आणि जोडीदाराची space, स्वतंत्र्य व्यक्तिमत्व, स्वतंत्र्य विचार आदरपूर्वक जपणे महत्वाचे !
असे न केल्यामुळेच एक व्यक्ती म्हणून दोन माणसे खूप चांगली असतात, पण जोडीदार म्हणून त्यांचे बिलकुल पटत नाही, अशी उदाहरणे समाजात दिसतात असे मला वाटते.

"इतुके आलो जवळ की ज्वळपणाचे झाले बंधन "ही वस्तुस्थिती खूप लोकांच्या लक्षात येत नाही. एकमेकांवर प्रेम असले म्हणजे कायम सयामी जुळ्यांसारखे बरोबर असलेच पाहिजे, असे नाही. त्यापेक्षा स्वतः ची आणि जोडीदाराची space, स्वतंत्र्य व्यक्तिमत्व, स्वतंत्र्य विचार आदरपूर्वक जपणे महत्वाचे !>>>>>

हे नुसते जोडीदाराबाबत काय, लोक सर्वच नात्यात हे असले घोळ घालतात आणि नाती खराब करून टाकतात. विशेषतः मुले स्वतंत्र झाल्यावर आई व मुलांमध्ये तणाव निर्माण होतात ते आया स्पेस द्यायला तयारच नसतात त्यामुळे. आया 'आपले मूल 1 महिन्याचे बाळ आहे व प्रत्येक पावलावर त्याला जपायला हवे' या भूमिकेतून बाहेर येत नाहीत Lol

अगदी अगदी साधना!
अदिशा तुम्ही दोघेही कौतुकास पात्र आहात. आणि तुमच्या वडिलांची शिकवण खुपच छान . लिहीत रहा वाचायला आवडेल.
तुम्ही ग्रिटींगबद्दल लिहीलेत ते वाचून मला माझं ग्रिटींट प्रेम आठवलं. मला स्वतःला असं हाताने तयार केलेलं पर्सनलाईज्ड ग्रिटींट द्यायला खुप आवडतं. ते तयार करून देई पर्यंत चा काळ मी इतकी अस्वस्थ असते ( चांगल्या अर्थाने) ग्रिटींट दिलं कि मला रिकामपण येतं. असो फारच अवांतर झालं.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद साधना आणि धनुडी.
साधना, अगदी बरोबर आहे तुमचे म्हणणे. सगळ्याच नात्यांच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.. खूप ताणतणाव कमी होतील आयुष्यातील.
धनुडी, अवांतर झाले, तरी हरकत नाही. छान आहे तुमची स्वतः ग्रीटिंग बनवण्याची सवय. एक personal touch असतो आपण स्वतः बनवून गिफ्ट केलेल्या गोष्टींना. आणि आपल्या creativity ला वाव मिळतो, ते वेगळेच. मी greetings नाही बनवली फारशी कधी, पण विणकाम चांगले येते मला. त्यामुळे वास्तुशांती, birthday, बाळाचा जन्म असे काहीही occassion असेल माझ्या जवळच्या कुणाचे, तर स्वतः काहीतरी item विणून देते.
माझ्या वडिलांच्या शिकवणीबद्दल लिहिलेय तुम्ही. थँक्स. खरेच great आहेत ते. शब्दांना माझ्या आयुष्यात त्यांनीच आणले. त्या process वर मी एक लेख लिहिलेला आहे. जमल्यास तो सुद्धा वाचून पहा :-

शब्दांशी मैत्री -
https://www.maayboli.com/node/76167

नादिशा तो लेख वाचलाय मी, म्हणूनच मला माहिती आहे कि तुमच्या जडणघडणीत तुमच्या वडिलांचा काय वाटा आहे ते. Happy

खूपच सुंदर !!!

आपण लेखात सुखी सहजीवनचे मंत्र दिले आहेत
"तुझं माझं करायचं नाही
आतलं वर्तुळ बाहेरच वर्तुळ
एकमेकांचं स्वातंत्र्य जपायचं "

आपल्या सहजीवनाच्या शतकपूर्तीसाठी खूप खूप शुभेच्छा !!!