माझ्या आयुष्यातील त्रिमूर्ती -भाग 2

Submitted by नादिशा on 5 September, 2020 - 00:55

त्याच शाळेत मला इंग्रजी शिकवायला मिळाल्या, त्या कळंबे मॅडम. सावळ्या पण स्मार्ट, शेलाटा बांधा, कुणावरही लगेच छाप पडेल, असे व्यक्तिमत्व.साडी नेसावी, दिमाखात कॅरी करावी, तर ती त्यांनीच ! अतिशय सुंदर डिझाईन च्या, फेंट कलर च्या उत्तम रंगसंगतीच्या साड्या आम्हाला खूप आवडायच्या.
इंग्रजी विषयावरचे त्यांचे प्रभुत्व वादातीत होते. खूप उत्साहाने, मनापासून शिकवायच्या. त्यांची शिकवण्याची पद्धत एवढी सोपी होती, की आम्हाला कुणालाच त्या परक्या भाषेची कधी भीती वाटली नाही.
आठवड्यातून एकदा ग्रामर चा तास, ते शिकलेले ग्रामर पुढच्या तासापर्यंत रोज घोटून घेणे, रोज 5 नवी स्पेल्लिंग्स पाठ करणे, एक पान तरी इंग्रजी पुस्तकांचे अवांतर वाचन करायचे, त्यांच्या तासाला फक्त इंग्रजीतच सर्वांनी बोलायचे, अशा कितीतरी गोष्टी त्यांनी केल्या.सुरुवातीला आम्ही लाजायचो, बिचकायचो इंग्रजी मध्ये बोलायला. पण त्यांनी मराठी मध्ये बोलणाऱ्याला शिक्षा चालू केली. मध्ये एखादा दुसरा मराठी शब्द आला तरी चालेल, पण इंग्रजी मध्येच बोलायचे,मोडकेतोडके आले तरी चालेल, अशी तंबी दिली. परिणामी सार्वजणी बोलू लागलो, एकमेकींच्या चुका सुधारू लागलो, हळूहळू गोडी लागली आणि मग दहावीत आम्ही अस्खलित इंग्रजी बोलू लागलो.बस मधून जातायेता इंग्रजी मध्ये गप्पा मारायचो आम्ही मैत्रिणी बाकीच्यांना कळू नये म्हणून, एवढ्या तयार झालो.
नववी आणि दहावी दोन्ही वर्षी आमचा सिलॅबस बदलला. मॅडमनी ही गोष्ट आव्हान म्हणून स्वीकारली. ज्या मुली जरा कच्या होत्या, त्यांची वेगळी बॅच बनवली. त्यांच्यासाठी शाळा सुटल्यावर एक्सट्रा लेक्चर्स चालू केली. अभ्यासात हुशार मुलींसाठी शाळा भरण्यापूर्वी एक्सट्रा क्लास. अशी सर्वांची तयारी करून घेऊ लागल्या.
मी त्यांची लाडकी विद्यार्थिनी होते. मला रोज इतरांपेक्षा एक्सट्रा होमवर्क असायचा.जेवढी म्हणून ग्रामर ची पुस्तके त्यांना मिळतील, तेवढी मिळवून त्यांनी ती माझ्याकडून सोडवून घेतली, ग्रामर अक्षरशः घोटून घेतले माझ्याकडून. परिणामी माझे ग्रामर एवढे पक्के झाले, की कितीही अवघड प्रश्न असला तरी लीलया सोडवून तर व्हायचा.हमखास पैकीच्या पैकी मार्क्स मिळायचे.
मॅडमच्या या सर्व कष्टांचे चीज झाले. मी मेरिट लिस्ट मध्ये आले. नवीन अभ्यासक्रमाची पहिली बॅच असूनही त्यांच्या विषयाचा निकाल 100%लागला. आणि त्यांचा सत्कारही झाला.
तेव्हाचा तो अभ्यास आजही इतका ताजा आहे, की कुणी झोपेतून उठवून जरी विचारले, तरी ग्रामर चुकणार नाही. नंतरच्या काळात BAMS झाल्यानंतर डिप्लोमा करण्यासाठी मी पुण्याला Ruby Hall ला ऍडमिशन घेतली. तेव्हा इतक्या वर्षानंतरही fluently english बोलू शकले, आत्मविश्वासाने तिथे वावरू शकले, तेव्हा मनातून शतशः धन्यवाद दिले मॅडमना.

माझ्या आयुष्यातील तिसरे महत्वाचे शिक्षक म्हणजे संस्कृतचे आर. एन. चौधरी सर.कुरळे केस, कृष्ण वर्ण, रागीट चेहरा, दाट मिशा, चेहऱ्यावरचे देवीचे वर्ण त्यांच्या रागीटपणात भरच घालायचे. मोठा आवाज आणि खूप कमी बोलायचे. आठवीमध्ये आमच्या वर्गाला पूर्ण संस्कृत मिळाले आणि सर आम्हाला शिकवायला आले.
खूप शिस्तप्रिय होते, यांना हसता येते की नाही, असा प्रश्न पडायचा, एवढे गंभीर राहायचे. सगळा वर्ग चिडीचूप असायचा त्यांच्या तासाला, अगदी टाचणी पडली , तरी आवाज होईल, एवढी शांतता !पण ते शिकवायला लागले, की अगदी ऐकत राहावे वाटायचे, एवढे सुंदर शिकवायचे. सुरुवातीचे व्याकरण पाठ केले, की संस्कृत खूप सोपे आहे, हे त्यांनी दाखवून दिले. त्यासाठी आवश्यक व्याकरण, सुभाषितमाला यांचे पाठांतर करून घेतले.शब्दोच्चर स्पष्ट असतील, संधीचा विग्रह करून आम्हाला वाचता येईल, याकडे जातीने त्यांनी लक्ष दिले. त्या पाठांतराची नंतर आम्हाला गोडी लागली आणि मग सर वर्गावर येईपर्यंत, मधल्या सुट्टीत वेळ मिळाला की, ऑफ लेक्चर ला आम्ही सगळ्या स्वतः होऊन सामूहिक पाठांतर करू लागलो. सरांना संस्कृत मधूनच अभिवादन, प्रतिज्ञा संस्कृत मध्ये म्हणणे, त्यांच्या तासाला संस्कृत मध्ये बोलणे, मराठी उताऱ्याचे संस्कृत मध्ये आणि संस्कृत उताऱ्याचे मराठीत भाषांतर करायला लावणे, असे प्रयोग त्यांनी स्टेप बाय स्टेप चालू केले. परिणामी सर्वांना संस्कृत आवडता विषय झाला.
मी एकपाठी आहे, हे त्यांच्या लक्षात आले, मग माझ्याकडून त्यांच्या अपेक्षाही वाढल्या. वर्गात इतरांना विचारले जाणारे प्रश्न माझ्यासाठी कधी नसायचेच. ज्यांची उत्तरे कुणाला देता येणार नाहीत, त्या प्रश्नांसाठी ते मला उठवायचे. उत्तर आले, तर "ठीक ", असे जेमतेम कौतुक होई. पण जर नाही आले, तर मात्र खैर नाही. "ना -लायक "(नालायक हा शब्द सर ना -लायक, असा तोडून म्हणायचे ), "मूर्ख "या त्यांच्या फेवरेट शब्दांचा मारा व्हायचा. कधी "तू वर्गात आहेस, हे माहिती आहे मला. दिसत नाहीयेस, म्हणून नाही उभे केले, उत्तर द्यायला उभे केलेय, कळते का? ", "अभ्यास करायला नको, नुसता आईवडिलांचा पैसा घालवायचा, उद्यापासून उत्तर आले नाही, तर सरळ घरी पाठवेन, कळाले? "असे ऐकावे लागायचे.
आम्ही साऱ्याच जणी खूप घाबरायचो सरांना. अभ्यासाशिवाय दुसरे काही बोलायचेच नाहीत. मधल्या सुटीत वर्गाबाहेर, जिन्यात, मैदानात जरी समोर आले, तरी "अभ्यास करा", " कसा चालू आहे अभ्यास? "एवढेच बोलायचे. परीणामी आम्ही मुली टाळायचो त्यांना. सर इकडून येताना दिसले, तर दुसऱ्या जिन्याने पळून जायचो, त्यांच्या समोर यायचो च नाही.
एकदा आमचे गर्ल गाईड चे शिबीर होते, त्यात मेहंदी, रांगोळी वगैरे स्पर्धा होत्या. स्वतःच्या हातावर मेहंदी नाही काढायची, अशी अट होती. म्हणून एका स्पर्धक मैत्रिणीने माझ्या हातावर छान मेहंदी काढली होती.लगेच संस्कृत चा तास होता. एवढी सुंदर डिझाईन.. हात लगेच धुवायचे माझ्या जीवावर आले. मी हात बेंच खाली ठेवून बसले होते. पण सरांच्या ते लक्षात आलेच. अन मग काय, अग्निवर्षावच !एक अवघड प्रश्न त्यांनी मला विचारला, अपेक्षेप्रमाणे मला उत्तर देता आलेच नाही. मग "अभ्यास करायला नको.. नुसत्या बाकीच्या गोष्टी करा.. आपले आयुष्य असल्या फालतू गोष्टींसाठी नाही, एवढेही कळत नसेल, तर काय उपयोग त्या बुद्धिमत्तेचा? चारचौघांसारखेच जिला राहायचेच, आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, हे जिला कळत नाही, स्वतः ला जी ओळखू शकत नाही, ती काय दिवे लावणार? आमचेच चुकले, आम्ही अपेक्षा ठेवतो तुझ्याकडून, ना -लायक, या गोष्टींसाठी अख्खे आयुष्य पडलेय, शिरते आहे का डोक्यात? "सारा वर्ग चिडीचूप ऐकत होता, माझ्या डोळ्यांतून धारा लागल्या होत्या.
फक्त मेहंदी काढली, म्हणून एवढे बोलावे सरांनी? मला खूप राग आलेला सरांचा, खूप अपमान वाटत होता. बरेच दिवस मनात धुमसत होते मी.
पण सर फणसासारखे आहेत, वरून रागीट पण आतून तेवढेच प्रेमळ, हे नंतर लक्षात आले. दहावीला मी जेव्हा मेरिट मध्ये आले, तेव्हा माझे प्रथम अभिनंदन करणारे चौधरी सर होते आणि चक्क हसत होते. मला शाबासकी देताना म्हणाले, "मला खात्री होतीच तू मेरिट मध्ये येणार याची !"तीन वर्षांत मी पहिल्यांदा हसताना पाहत होते त्यांना!
मला संस्कृत मध्ये 97मार्क्स पडले होते. पण सर माझ्या पप्पाना सांगत होते, "तुम्ही फेरतपासणी करून घ्या.तिला 100 पैकी 100च मार्क्स पडणार, मला खात्री आहे, तिला 97मार्क्स पडूच शकत नाहीत. " पप्पानी नाही केली फेरतपासणी, याचे खूप वाईट वाटले होते सरांना.
नंतरच्या सर्व बॅच च्या मुलींना सर कायम माझे उदाहरण देत. त्या मुलींकडून जेव्हा हे कळत राहायचे , तेव्हा सरांचे माझ्यावरचे वात्सल्य जाणवायचे आणि तेव्हाचे त्यांचे चिडणे माझ्या भल्यासाठी होते, याची जाणीव व्हायची.
नंतर मी BAMS ला ऍडमिशन घेतली, तेव्हा संस्कृत मधले मूळ ग्रंथ वाचताना मला खूप फायदा झाला.ग्रंथ वाचता यायचेच, विग्रह करून समजून घेता यायचे, ग्रंथोक्त सूत्रे लीलया पाठ व्हायची, तेव्हा ही सगळी सरांची कृपा, हे जाणवायचे आणि त्यांच्याविषयीच्या आदराने मन भरून जायचे.
फक्त अभ्यासातच याचा फायदा झाला असे नाही, तर संस्कृत मधली सुभाषिते, इंग्रजी मधली गुड थॉटस, प्रोवर्ब् यांनी भाषा समृद्ध झाली. नंतरच्या काळात लेखनासाठी, भाषणासाठी याचा खूप फायदा झाला मला.
तर अशा या माझ्या आयुष्यातील त्रिमूर्ती !त्यांचे ऋण या जन्मी तरी फिटण्यासारखे नाही. आज हा लेख लिहून मी त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करते आणि त्यांना योग्य वेळी माझ्या आयुष्यात आणणाऱ्या त्या नियतीचेही मनोमन आभार मानते !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरेच चांगले शिक्षक लाभले तुम्हाला.. संस्कृत वाले जरा जास्तच कडक.. पण मेरिटमध्ये यायला संस्कृत फायदेशीर ठरते...
उशिरा वाचला लेख .. आता प्रतिक्रिया देतोय...

धन्यवाद सामो, च्रप्स आणि santosh zond. याच लेखाचा first पार्ट पण वाचून पहा -

माझ्या आयुष्यातील त्रिमूर्ती -भाग 1
https://www.maayboli.com/node/76541

शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी लिहिलेला अजून एक लेख :
अंकुर बालवाडी
https://www.maayboli.com/node/76567