इयरफोन आठवण

Submitted by राधानिशा on 5 September, 2020 - 14:47

इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स किंवा तत्सम वस्तूंचं आश्चर्य किंवा चकीत होणे असं होणं कमी होत चाललं आहे .. नवी पिढी तर मोबाईल बघतच पाळण्यातून रांगणे आणि पावलं टाकणे या फेज मध्ये पोहोचते आहे .. चिंटूच्या एका स्ट्राईपमध्ये चिंटूचे पप्पा विचारतात नवीन फोन आणला की मला त्यातलं शिकवशील ना ... चिंटू हसू लागतो , म्हणतो त्यात काय शिकायचं असतं ? ज्या मोबाईल कॉम्पुटरसंबंधित गोष्टी आधीच्या पिढीला थोडी शिकून घ्यावी लागतात ती आताची 5 - 7 वर्षांची मुलं सहज करतात जणू काही पोटातूनच शिकून आली आहेत मोबाईल वापरणं ... त्यांना कधी कुठलं गॅझेट चकीत करू शकेल असं वाटत नाही ...

याबाबत एक आठवण आहे .. मी सहावी सातवीत असताना 2006 - 07 मध्ये पहिला गाणी - व्हिडिओ सेव्ह होणारा मोबाईल घरात आला , त्याआधी ते सगळीकडे प्रचलित असणारं जुनं नोकियाचं मॉडेल होतं .. नवीन सुद्धा नोकियाचाच होता पण यात गाणी , व्हिडीओ आदी सेव्ह होत होते , जरा चांगले गेम वगैरे ... मला गाणी ऐकण्याची खूप आवड होती आणि अजूनही आहे ... तोपर्यंत मला इयरफोन ही वस्तू माहीत सुद्धा नव्हती ... आजोळी मामाकडे राहायला गेले असताना मुंबईचे मामा - मावशी - आजी आजोबा पण गावी आले होते .. मामाने इयरफोन दिला .. तो मोबाईलला कनेक्ट केला .. गाण्याचा आवाज फक्त आपल्यालाच येतो आहे बाकी कोणाला नाही याचं प्रचंड आश्चर्य वाटलं .. 2 - 3 वेळा इयरबड्स काढून आवाज बाहेर जात नाही याची खात्री करून घेतली .. किमान 15 मिनिटं तरी त्या awe मधेच होते .. फुल वॉल्युमवर ठणाणा लावलं .... म्हटलं गायक माझ्या डोक्याच्या आत बसून गाणं म्हणतोय असं वाटतं आहे .. ते ऐकून मामा हसायला लागला ..

आश्चर्य वाटलेली अशी ही एकमेव इलेक्ट्रॉनिक वस्तू .. त्यानंतर आजपर्यंत कशाचं आश्चर्य कौतुक वाटलेलं नाही .. उद्या इथून गुरु शुक्राचे फोटो काढणारा कॅमेरा जरी समोर आला तरी काही वाटणार नाही ( तसा एक आलाच आहे म्हणे पण अजून फार क्लिअर फोटो येत नाहीत ) ... आता कशाचं अप्रूप वाटण्याचा स्वभाव राहिला नाही म्हणा किंवा टेक्नॉलॉजीचंचं एकूण अप्रूप संपलं आहे .. पण ती एक आठवण कायमची स्मरणात राहिली आहे ... किती भारी वाटलं होतं याची ...

पुढे इयरफोन्सनी खूप साथ दिली .. कॉलेजच्या प्रवासात जाताना आणि येताना कानात बड्स खुपसल्या की कोणाशी चार शब्द बोलायच्या जीवघेण्या संकटातून सुटका व्हायची .. मैत्रीण पुढच्या स्टॉपवर चढून बाजूला येईपर्यंत कावरीबावरी किंवा ऍन्कशियस न होता शांतपणे बसायला इयरफोन मदत करायचे ..

सध्या घरात इयरफोन फारसे वापरले जात नाहीत .. नीट उचलून कपाटात किंवा बॉक्समध्ये ठेवायची सवयच नसल्याने मांजरांच्या हातून अनेक इयरफोन धारातीर्थी पडले त्यामुळे दर वेळी नवीन आणण्यापेक्षा मोठ्यानेच ऐकण्याची सवय पडली .. आज बऱ्याच दिवसांनी नवीन आणला आणि जुनी आठवण आली ... श्री हरी स्तोत्र फेव्हरेट झालं आहे , ते इयरफोनवर ठणाणा लावून उद्घाटन केलं .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली आठवण.
आम्ही जेव्हा इयरफोन सर्रास वापरत नव्हतो तेव्हा आमच्या घरी एक इसम आला होता. त्याने इयरफोन लावले होते. आमच्या आजीला ते प्रकरण माहीत नसल्याने तो गेल्यावर चुकचुकली की "बिचारा तरुण वयापासून बहिरेपण आलंय. कसं होणार याचं"
आता ती असती तर सगळ्यांनी इयरफोन लावूनच काम करताना वगैरे बघून तिला काय वाटलं असतं Proud

सुंदर लिहिलय... माझ्या बाबतीत मात्र मी दिल्लीहून मुंबईला आगगाडीने प्रवास करतांना इयर फोन लावून ( तेव्हा ही वस्तू जरा नविनच होती ) , ते माझ्या सोनीच्या वॉकमन बरोबर आले होते- गाणी ऐकत होतो. ऐकता ऐकता केव्हा डोळा लागला कळलेच नाही, रात्री १० ची वेळ होती. माझी बर्थ दारापाशीच होती अन मी एकटाच प्रवास करत होतो.... ११ च्या सुमाराला डोळा उघडला तेव्हा खाली ठेवलेली ब्रीफ केस गेली होती अन त्या बरोबरच त्यातील तिकिट अन बरीच मोठी रक्कम,,,, तेव्हा फ्लॅट बुक करायला नकद द्यावी अशी बोली झाली होती....
इयर फोनची ही सुखद हकिकत Sad

प्राचीन , मजेशीर किस्सा Happy ..

रेव्यू .. धन्यवाद .. वाईट झालं पण आता विसरून जा .. मागचं देणं चुकतं झालं म्हणून माफ करून टाका चोराला .. सॉरी सध्या ब्रह्माकुमारी तत्वज्ञान - कार्मिक अकाऊंट वगैरे ऐकत असल्यामुळे अनाहूत सल्ला देत आहे .. राग मानून घेऊ नका .. माफ केलं की आपल्याला हलकं वाटतं , तोपर्यंत माहीतही नसतं ओझं घेऊन चाललो होतो ..

मृणाली , थँक्स Happy

भारी आठवण Happy

माझी इयरफोनच्या बाबतीत होणारी फजिती म्हणजे इयरफोन हॅन्डसेटला लावलेला असतो तरी पण फोन आला की रिसिव्ह करुन हॅन्डसेट कानाला लावला जातो. 'हॅलो हॅलो' करत बसायचं. लक्षात येत नाही की 'आवाज का येत नाहीये' Lol

छान लेख

मांजरा पासून वाचण्यासाठी तुम्ही वायरलेस इअर फोन वापरू शकता (कानाच्या खोलगट भागात मावणारे गोळे)

मी noise shots वापरतोय...चांगले आहेत... वायर ची कटकट नाही.

मस्त...हे एक गॅजेट माझ मोस्ट फेवरेट आहे, अर्थातच गाणी ऐकण्याच्या आवडीमुळे आणि एक पर्सनल स्पेस मिळाल्या सारखे वाटते काही ही ऐकताना...सध्या एक बोसचा, एक सेनहायजरचा, एक वनमोअरचा वायर्ड आणि एक जेबीएल चा, एक ब्लापंक्ट चा असे वायरलेस इअरफोन आहेत आणखीन एक सेनहायजरचा वायर्ड होता पण त्याची वायर उंदराने कुरतडली तेव्हा स्पेशल पिंजरा आणुन उंदरांचा बिमोड केला होता.. Happy

छान आठवण आणि धागा

मी पहिल्यांदा ईअरफोन १९९२-९३ साली Aiwa च्या वॉकमनसोबत वापरला होता. मामाच्या गावाला गणपतीला गेलो होतो तेव्हा तेच घेऊन बसायचो.

आता मात्र मला बोअर होते कान गुंतवून ठेवणे. काही ढिंच्य्येक गाणी ऐकायला मजा येते पण थोडा वेळच. त्यानंतर जगशी संपर्क तोडून काय आपल्यातच आपण ऐकत बसायचे असे वाटते. कोणी कानाला असा बूच लाऊन बसला असेल आणि आपले त्याने पहिल्याच फटक्यात ऐकले नाही तर चीडचीडही होते. कदाचित मला त्याची आवड नसल्याने समोरच्याचे सुख बघवत नाही असेही असेल. बोले तो हुमायून नेचर Happy

मस्त लिहिलंय. प्राचीन गमतीशीर किस्सा. विनिता माझी ही फजिती अशी होते. अजूनही होते. कानात इयरफोन असतो. आणि फोन आला की ऐकायला व्यवस्थित येत असूनही मी आपसूक तो हँडसेट कानाला लावूनच बोलते. ते विनोदी दिसत असेन खरं तर. मग लेक असेल जवळपास तर माझा हात खाली करतो आणि अशी कशी गं तू म्हणतो.