निर्गुणी भजन - राम निरंजन न्यारा रे

Submitted by अस्मिता. on 3 September, 2020 - 18:33

निर्गुणी भजन - राम निरंजन न्यारा रे

कबीरांचं नावं सुद्धा लावायची गरज वाटली नाही कारण राम आणि कबीर एकच ना.. ..आधी वाटलं की शीर्षकात पुढे काही अर्थ , अन्वय , विवेचन द्यावे का पण नाही ते ह्या निरंजन रामाला लागलेले अंजन- किल्मिष वाटलं मलाच .... मी कोण अर्थ लावणारी जे कबीराला ऐकताना झिरपलं आणि विशुद्ध भाव फक्त उरला तो व्यक्त करायला ह्या काळ्या चिन्हांचा आधार...अक्षरांची केविलवाणी धडपड. जे मुक्त आहे अव्यक्त आहे ते व्यक्त करायला पुन्हा त्याला बंधनात टाकावं लागलं... विरोधाभासच नाही का!

बायबलमध्ये* लिहीलयं की "In the beginning was the word and the word was God " ह्याचा नेमका काय अर्थ असेल याचा मी बराच विचार केला. कुणी म्हणे ओम , कुणी आमेन कुणी अजून काही पण मला हा शब्द ,शब्द नाही तर नाद या अर्थाने जास्त योग्य वाटतो. शब्दाचे सुक्ष्मरूप नाद. कोणी ऐकले नसेल तर नादाची कल्पना करता येत नाही ज्यांनी ऐकलाय त्यांना सुद्धा नेमके काय ऐकले हे सांगता येत नाही. त्या नादब्रह्माला सुद्धा "शब्द' म्हणून बद्ध व्हावे लागले.

कारण अव्यक्ताला व्यक्त करण्यासाठी शब्द कुठून आणनार.. मगं त्यालाच उत्तमोत्तम मानवी मेंदूंच्या कल्पनेतील कमाल मर्यादेत बसवण्याच्या प्रयत्नात जेवढ आलं तेवढच आपल्याला मिळालं. (आठवा, चार अन्ध आणि हत्तीची गोष्ट) पण खरंतर अनंताचा अंशसुद्धा अनंतच , गणितात देखील इन्फिनिटी भागिले कुठलीही संख्या इन्फिनिटी म्हणजेच अनंत असेच येते. या सिद्धांतामुळे आपण खात्रीने म्हणू शकतो की या नादब्रह्माला कुठल्याही किमान अंशमात्राने सुद्धा आपण ओळखत नाही.

त्यामुळे नादब्रह्माने आरंभ झालेली सृष्टी , ही पाण्यात दगड टाकल्याने होणाऱ्या तरंगांसारखी अनिश्चित आहे. त्या नादाने उत्पन्न झालेले कंपन किंवा संगीत आहे हे. कुणालाच माहिती नाही कसे, कधी, कुठे का सुरू झाले आहे. कारण आरंभही अनंतच आणि अंत अंतहीन....

हे असे विचार आले की मी अंतस्थ गुरूवर चिडते म्हणते की तुला जाणून घेणे तू एवढे का अवघड करून ठेवलेस , why are you so complicated and hard to get !! मग तो हसून म्हणतो की तुला जसे वाटेल तसाच मी असेल !! म्हणजे आलं की पुन्हा माझ्यावरच. मगं तो म्हणतो , "तुझ्यावरच, कारण तू आणि मी वेगळे कुठेत? कोहंसोहं remember ! "

ठीकयं, मोको कहां ढुंडेरे बंदे मै तो तेरे पासही..... कळतयं पण वळवता येत नाही. मला दुर्दैवाने पोथ्या, व्रतकथा, पारायणं, उपासतापास, मंदिर एकूणच धार्मिक गोष्टींमध्ये "तो" सापडत नाही. त्याने फक्त तात्पुरता आनंद मिळतो पण जीवाला विसावा मिळत नाही. साधारण आयुष्यात मी अत्यंत तडजोडी, इझी गोइंग आहे पण याबाबतीत मला करताच येत नाही तडजोड !!

जलबिन मछली का काय होते अगदीच. मगं मंदिरात जाणे, उपासना करणे, स्तोत्र म्हणने, आदि करून सुद्धा ध्यान करायचे त्याशिवाय कनेक्शन वाटतंच नाही. किंवा मगं हे काहीच करायचे नाही पण ध्यान मात्र करायचेच ! हे प्राधान्य कसे रूढ / establish झाले मला माहिती नाही. पण घरच्यांना कळत नाही की आता मंदिरात जाऊन आलोय तर पुन्हा काय ध्यानाला बसायची गरज , मलाही सांगता येत नाही का !!

नंतर कुठे कुठे अकस्मात "तो" सापडतो मगं कसं पकडलं टाइप आनंद होतो. असे साधेच पण bang on स्पष्टीकरण वाचण्याने थोडा आत्मविश्वास येतो . कुणीतरी आहे ज्याला हे व्यक्त करता येते. जो हे लिहून गेलायं माझ्यासारख्या अध्यात्मात वारंवार ठेचा खाणाऱ्यांसाठी, निनावी अध्यात्मिक आजाराचे निदानच झाले जणू .... असा प्रत्येक निर्गुणी क्षण तादात्म्य देऊन जातो. ह्या कबीराच्या भजनाचा मला कळलेला म्हणणार नाही पण प्रथमच जाणवलेला अर्थ जो मला आनंद देऊन गेला. पुन्हा नव्याने कळतं राहील अर्थातच.

*************************

काय लिहू मी कसं झालयं ! This bhajan is straightforward and pretty much self explanatory म्हणून आधीचे व नंतरचे पाल्हाळ समजून घ्या Happy .

अंजन म्हणजे माया किंवा भ्रम अशी काजळी ज्यामुळे निरंजन राम सर्वात ब्रह्मरूपाने असूनही दिसत नाही. ते मायेचे पटल दूर झाले की जे परमतत्व उरते ते निरंजन.
निर्गतम् /निःसृतम् अञ्जनं यस्मात् सः /तत् । ज्याच्यामध्ये कोणताही कलंक, दोष, डाग, भेसळ उरलेली नाही असे विशुद्ध परम तत्त्व.

राम निरंजन न्यारा रे

अंजन सकल पसारा रे

भाई...राम निरंजन...

निरंजनही ही एक अनुभूती आहे, जी किल्मिषहीन, विशुद्ध अशी आत्मिक ऊर्जा आहे. पण राम सोडलं तर फक्त आणि फक्त किल्मिषच उरते. निरुपायाने त्याच सगळ्या अपवित्र गोष्टींना घेऊन मला त्या पवित्र अनुभूतीला व्यक्त करावं लागतय. असा तो माझा निर्गुणी राम , बाकी तर अशुद्धतेचा पसारा, शब्दजंजाळ. तुझ्यासारखं खरोखर कुणीच नाही.

अंजन उत्पत्ति ओंकार

अंजन मागे सब बिस्तार

अंजन ब्रह्म शंकर इन्द्र

अंजन गोपी संगी गोविन्द रे

या संसाराची व्युत्पत्ती ते प्रणव सुद्धा ह्या निर्गुणी रामासारखे नाही. कारण ते आणि ही माया एकाच उगमापासून निर्माण झाले. त्यामुळे जिथे जिथे ब्रह्म तिथे तिथे त्यावर काजळमाया. सर्वांना तिची विकारांची अशुद्धता दिसतेय, तू कुणाला कसा कळणार. त्यामुळे सर्व सगुणरूपी देवता तुझ्यापुढे फिक्या आहेत, तो हरी त्याच्या गोपी पण तुझ्या सच्चिदानंद रूपापुढे खुज्या वाटतात. तुझ्यासारखं कुणीच नाही खरोखरं , तूच निर्गुणी निरंजन राम माझा.

अंजन वाणी अंजन वेद

अंजन किया नाना भेद

अंजन विद्या पाठ पुराण

अंजन वो घट घटी ज्ञान रे

पण निरंजन राम सोडलं तर फक्त आणि फक्त किल्मिषच उरते. तो तुझ्या वर्णनासाठी केलेला शब्दच्छल , त्या श्रद्धा नसलेल्या भ्रामक वाणीने तुझे घेतलेले नाम , शब्दजंजाळ , त्या मायेच्या अंजनाने आम्हाला सगळे वेगवेगळे वाटते एकतत्व दिसतच नाही. ते पुराण , ते वेद , त्या पोथ्या सगळी माहितीची कोठारे सगळे मायेच्या पटलाखाली ...नुसती माहिती , मनन, अध्ययन आहे ते , तू कुठेस. तुझ्यासारखं कुणीच नाही खरोखरं , तूच निर्गुणी निरंजन राम माझा.

अंजन पाति अंजन देव

अंजन की करे अंजन सेव

अंजन नाचे अंजन गावे द

अंजन भेष अनन्त दिखावेरे

ती देवपूजा त्या पुढे लावलेला दिवा म्हणजे तर भ्रमच भ्रमाची पुजा करतयं. ते नृत्यसंगीत आणि मनोरंजनाचा आनंद , वेगवेगळे वस्त्रप्रावरणं आणि निरानिराळे भौतिक आनंद सगळे असत्य आहे. नुसते क्षणभंगुर आनंद आहेत ते तू कुठेस.
तुझ्यासारखं कुणीच नाही खरोखरं , तूच निर्गुणी निरंजन राम माझा.

अंजन कहां कहां लग केता

दान पुणी तप तीरथ जेता

कहे कबीर कोई बिरला जागे

अंजन छाड़ी अनंत ही ध्यावे रे

सगळ्या तीर्थयात्रा, दानपुण्य सगळे अवडंबर हे याच काजळमायेच्या अधीन आहे. कबीराच्या मते असा कुणीतरी एकच डोळस ज्याला ह्या भ्रमाचे आच्छादन जाणवते आणि निर्गुण निरंजन रामाच्या अस्तित्वाची कल्पना येते. मगं तो हे अंजन सोडून त्या अनंताची कामना करतो.

***********

हे असं वर्णन आहे की ते त्यातल्या त्यात योग्य होण्यासाठी त्याच्या सारख्या नसलेल्या गोष्टींशी तुलना केली आहे. जसं एखाद्या व्यक्तीने अद्वितीय अद्भुतरम्य काही तरी पाहिले पण त्याला सांगताच येत नाही, अशावेळेस समोरचा विचारेल असं असं होतं का तर उत्तर तसे नाही हे, या या वेदात त्याच वर्णन आहे तसं होतं का उत्तर तसे नाही हे, ही गोष्ट करताना मला अशाप्रकारचा आनंद होतो तसा आनंद आहे का हा ..उत्तर तसे नाही हे.

जे अमूर्त आहे त्याचे वर्णन करायला ते जसे नाही ह्या तुलनात्मक वर्णनाचा आधार घ्यावा लागला आहे. त्यामुळे निरंजन राम कसा आहे , कुठे आहे हे कळणार नाहीच पण निदान तो कसा नाही , कुठे नाही हे थोडेसे कळणार. गूढ कोडे सोडवल्यासारखे काहीसे , पण चिरंतनतत्वाचे गूढ कोडे अपूर्णच रहाणार ना. Happy तरीही हे मनात आले की जर त्या अनंताचा किमान अंश सुद्धा अनंत आहे (इन्फिनिटी भागिले कुठलीही संख्या) मगं आपण मनुष्य सुद्धा अनंतच ना !! Hope will always be there.

।। शुभं भवतु ।।

**धन्यवाद**
मला जसं सुचलं तसं मी लिहीत गेले काही महत्त्वाचे राहिले असेल किंवा अनावश्यक/ चूकीचे लिहील्याही गेले असेल. तुम्ही भजनाचे तुमचे चिंतन जरूर सांगा. प्रत्येकाला काही तरी नवीन मिळत असेलच यातून ! त्या भजनाची संगीताची मांडणी/ बाजू सुद्धा समजावून सांगा. Happy मला आवडेल.

©अस्मिता.

संदर्भसूची

* कुमारजींचे राम निरंजन न्यारा रे ( दुसरे कुणाचे Happy )
https://m.youtube.com/watch?fbclid=IwAR3c6oWeL9_ymwlI_Ejex-0KAzzqNeTCBsf...

* याच भजनाचा इंग्रजी अर्थ
http://blisswords.blogspot.com/2016/02/blog-post_15.html?m=1

* Bible reference
When we read, "In the beginning was the Word" in John's Gospel, we should immediately think of another Bible text that begins with the same introductory phrase. Genesis 1:1.
"Jesus is the Word because through him all things are made," says Jonathan, 8. "What he said became. Through the words of Jesus, the Earth and man were made. So, he is the Word."

*https://www.creators.com/read/kids-talk-about-god/03/14/why-does-the-bib...

*Infinity divided by any number is still infinity. In fact infinity multiplied by infinity is also equal to infinity. Even if you would consider 1 followed by infinite number of zeroes and divide it by infinity then also it would turn out to be infinity.
************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे आवड्ते भजन . कुमारांचा अगदी कस दिसतो ह्यात.

अंजन सकल पसारा रे. म्हणजे लोक आपापल्या ब्भौतिक प्रगतीवर मान मरातब पैसा हुद्दे ह्या वर भारी खुष असतात. मी किती कमावले आयु ष्यात म्हणून स्वतःचाच जय जय कार करून घेतात. त्या पायी दुसर्‍या जीवांना कमी लेखतात मारतात सुद्धा. हा तो अंजन पसारा आहे. त्या पुढे ती व्यक्ती गेली तरच त्यांच्याशी संबंध शक्य आहेत. स्वतः भोवती जो काय अंजनाचा कोष विणलेला आहे तो स्वतःच फाडून निराकारास सामोरे गेल्या शिवाय अंत:स्थ उर्जा सापडत नाही. भौतिक अंधारात चाचपडणे होते.

तसेच कर्मकांडातही अडक णे म्हणजे स्वतः ची फसवणूक ़ करणे आहे. कोणतीही दैवी नैसर्गिक ताकद फक्त तुमच्या साठी कधीच राबत नाही. तिचे काम एका वेगळ्या लेव्हल वर चालू असते.च तुमच्या कर्मांची फळे मिळतात. अशी ताकत मनुष्य जात निर्माण व्ह्यायच्या आधीपासून होती व नंतरही असणार आहे. हे सत्य जाणून आपल्या कृमिकीटकांसारख्या जीवनात चांगली कर्मे केली तर थोडा फार उद्धार शक्य आहे.

निरीच्छ निर्मम निर्मळ जगणे बेस्ट. मग निरंजन राम तुमच्या सोबतच चालत असतो.

लेख अंतर्मनाचा ठाव घेणारा वाटतोय. नक्कीच एखाद्या क्षणी अंतर्मुख होऊन आलेले विचार शब्दबद्ध झाले असावेत ज्यामुळे लेख अतिशय सुंदर झालाय.

पण मला हा शब्द ,शब्द नाही तर नाद या अर्थाने जास्त योग्य वाटतो. >>>> बरोबर आहे. ओम किंवा प्रणव हा खरा नादच आहे. त्या नादाची संज्ञा म्हणून ओम हा शब्द आहे. पतंजली योगसूत्रामध्ये ईश्वराची वाख्या करून झाल्यावर म्हणतात ' तस्य (ईश्वरस्य) वाचक: प्रणव:.

आपल्याकडे एक गैरसमजूत आहे की ओम हा अनाहत नाद तोंडाने ओम म्हणल्यावर जसा ऐकू येतो तसाच ऐकू येत असावा. खरेतर ओम हा नाद ऐकू येतो परंतु शारीरिक कानांद्वारे नाही तर अंतर्ज्ञानाने. साधनेची विशिष्ट पातळी ओलांडलेल्या योग्याला हा आवज अंतर्ज्ञानाने ऐकता येतो मग तो शारीरिक कानाने ठार बहिरा असला तरी. आणि तो आवाज ओम असा नसून समुद्रगर्जनेच्या आवाजासारखा असतो.

हे असे विचार आले की मी अंतस्थ गुरूवर चिडते म्हणते की तुला जाणून घेणे तू एवढे का अवघड करून ठेवलेस , why are you so complicated and hard to get !! मग तो हसून म्हणतो की तुला जसे वाटेल तसाच मी असेल >>>> खरंय. परमहंस योगानंद म्हणतात God (परब्रह्म या अर्थाने) is very simple....everything else is complex.
परब्रह्म अद्वैत असल्यामुळे सिम्पल आहे कारण सगळीकडे तेच भरून राहिले आहे दुसरे काहीच नाही. परंतु माया मात्र अतिशय गुंतागुंतीची आहे कारण द्वैतरूपी मायेमध्ये शक्यता अनंत आहेत.

"त्यामुळे निरंजन राम कसा आहे , कुठे आहे हे कळणार नाहीच पण निदान तो कसा नाही , कुठे नाही हे थोडेसे कळणार" >>> आपण सर्वजण त्या निरंजनाचेच अंश असल्यामुळे शेवटी सर्वच जण निरंजन होणार. विवेकानंद म्हणतात या जगतात प्रत्येक जीवाला परब्रह्माची प्राप्ती होणारच होणार. फक्त केंव्हा हे सांगणे अत्यंत कठीण आहे कारण मायेच्या पाशात सर्वजण वेगवेगळ्या गाठीने बद्ध आहेत. जेंव्हा या मायेच्या सर्व गाठी सुटतील तेंव्हाच मुक्तता !

खूप सुंदर लिहिलयं अस्मिता.. माझं आध्यात्मिक वाचन फारसं नाही पण तू जे काही लिहितेस ना ते तुझ्या खोल अंतर्मनातून आल्यासारखं वाटतं आणि वाचताना ते अगदी मनाच्या तळापर्यंत पोहचतं. खूप सुंदर विचार...

अस्मिता तुला खरच या सगळ्याची आवड आहे. माझे तसे नाही. खूप दोलायमान होते मी. तसेच माझी मुख्य आवड स्तोत्रे/ काव्य ही आहे. अध्यात्म दुय्यम - बायप्रॉडक्ट.
छान मांडतेस. लिहीत रहा.

निरीच्छ निर्मम निर्मळ जगणे बेस्ट. मग निरंजन राम तुमच्या सोबतच चालत असतो. ~~~You nailed it अमा Happy .
कोहंसोहं प्रतिसाद आवडला. Happy
आपण सर्वजण त्या निरंजनाचेच अंश असल्यामुळे शेवटी सर्वच जण निरंजन होणार. ... ~~~ज्याचा आरंभ निरंजनातून होतो त्याचा अंतही निरंजनात अगदी , and that makes sense too !

धन्यवाद कविन आणि पाचपाटिल Happy .
रूपाली... तुझ्या प्रतिसादांमुळे तू संवेदनशील आहेस असं वाटतं गं . अध्यात्मिक पुस्तके न वाचणारी व्यक्ती सुद्धा अध्यात्मिक असूच शकते Happy .

@सामो
अस्मिता तुला खरच या सगळ्याची आवड आहे....>>>
एखाद्या कलाकाराला कलेची आवड असते असं नसत तर ते त्याचे अस्तित्व असते. तसंय हे , बाधा समज Wink !
आपल्या मुलांची आवड असते का आपल्याला, नाही ना प्राण असतो आपला तो .

स्तोत्र वाचणे ऐकणे ही एक अत्यंत सकारात्मक आणि आनंददायी गोष्ट आहे पण ध्यानाशी त्याची तुलना म्हणजे ...आपल्या बाळाला विडीओ मध्ये संवाद साधणे विरुद्ध आपल्या बाळाला प्रत्यक्ष पहाणे. मला दुसरे तितके उत्कट उदाहरण सुचत नाही या क्षणी !
हे आपले तू मला ओळखतेस म्हणून मोकळेपणाने सांगतेय. Happy

हीरा , प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. धन्यवाद.
तुम्ही थोडी लोकं तर आहात जी अध्यात्मिक लेखनावर नियमितपणे आवर्जून प्रतिसाद देतात. त्यामुळे तुमची नेहमीच वाट बघते. Happy

मला खूपदा इथे आणि जनरली बाहेर सुद्धा वेगवेगळे
धार्मिक मतप्रवाह आढळले आहेत. संसारी माणसाला काय करायचाय ध्यानमार्ग आपले पूजा पोथी नामस्मरण बरे. पण एखाद्याच मन रमत नसेल नामस्मरणात तर त्याने काय करावं , मोजून जप करणे पटत नसेल तर त्याने काय करावं हे कुणीही नीट समजावत नाही. Overall हे mundane आणि खूप mechanical वाटत असेल तर काय करायचं.

ढिगानी माहिती आहे उपलब्ध पण काही उपयोग नाही त्याचा स्वप्रयत्न नसतील तर. एकेकाळी जीव दडपून जायचा लोकांची या विषयावरील माहिती बघून, आता काहीच वाटतं नाही, कारण माहिती आहे म्हणजे अनुभव असेलच असे नाही. आणि माहिती नाही म्हणून अनुभव येणार नाहीत असेही नाही. तुलनेची गरज आणि उपयोग दोन्ही नाही. शेवटी त्यालाच काळजी Happy !

आणि जर आपला मार्गच आपल्याला निवडत असेल तर का घाबरायचे आणि कशाला घाबरायचे. सारखे का स्वतःला कमी लेखायचे ( स्वानुभव). आयुष्यातला बराच वेळ शोधण्यात जातो ते वेगळेच, भयंकर एकटेपणा येतो याने.

निर्भय हो मना निःशंक हो काय आहे मगं , की ते फक्त संसारालाच लागू होते. वेगळ्या अध्यात्मिक मार्गासाठी असं कुणाला tame करता येत नाही. आपल्यापेक्षा वेगळ्या/कमी/जास्त दर्जाची साधना आपल्याकडून होऊच शकत नाही हे अशातच कुठेतरी वाचले , अगदीच पटले.

ज्याला ऊर्मी वाटते त्याने जरूर ध्यान करावे पण फक्त आणि फक्त अंतस्थ गुरूच्या मार्गदर्शना खाली. बाहेरच्या कुणाचेही काहीही ऐकू नये. त्याने नुकसान होऊ शकते.

हे सगळे कुणीतरी माझ्यासारखे असेल त्याच्यासाठी , त्याची तगमग कमी व्हावी म्हणून !!

आमच्याकडे आहे आभाळ आणि पाऊस त्यामुळे मी लिहिले की काय एवढे Happy .

>>>>आमच्याकडे आहे आभाळ आणि पाऊस त्यामुळे मी लिहिले की काय एवढे Happy .>>> होय निसर्गाचा मूडस/मनाचा फार प्रचंड घनिष्ठ संबंध असतो.

जे मुक्त आहे अव्यक्त आहे ते व्यक्त करायला पुन्हा त्याला बंधनात टाकावं लागलं... विरोधाभासच नाही का! >>> आहाहा, हे जाम आवडलं.

हे असे विचार आले की मी अंतस्थ गुरूवर चिडते म्हणते की तुला जाणून घेणे तू एवढे का अवघड करून ठेवलेस , why are you so complicated and hard to get !! मग तो हसून म्हणतो की तुला जसे वाटेल तसाच मी असेल !! म्हणजे आलं की पुन्हा माझ्यावरच. मगं तो म्हणतो , "तुझ्यावरच, कारण तू आणि मी वेगळे कुठेत? कोहंसोहं remember ! " >>> वाह.

अध्यात्मिकता तुझ्यातच सामावली आहे, दैवी देणगी मिळाली आहे. तुझे लेख वाचताना ती जाणीव होते.

मी अजून अर्धाच लेख वाचला आहे. मला नीट समजून घ्यायला थोडा वेळ लागतो. उरलेला थोड्या वेळाने किंवा उद्या वाचेन.

माझे अतिशय आवडते भजन ...

कुमारजींनी गायलेले हे निर्गुणी भजन तर निव्वळ अप्रतिम .... पण त्यांची मुलगी कलापिनी कोमकली देखील हे भजन अतिशय सुंदर गातात

https://www.youtube.com/watch?v=GywUpd3YrpI

...

अन्जुताई, मला एकटीला काही दैवी देणगी नाही गं , प्रत्येकालाच मिळालेली आहे पण मला जाणून घ्यायची उत्सुकता मात्र आहे. पण माझ्या मते आपण सगळेच पुन्हा पुन्हा जन्म घेऊन इतके evolve झालो आहोत की आता बाह्य गुरूची गरज राहिली नाही.
ये नं ये नं , तुझा आणि माझा माबो टिपी टाइम एकच आहे. Happy

धन्यवाद मंदार , तुमची लिंक नक्कीच ऐकणार. मला हे भजन शोधताना राहूल देशपांडेची पण लिंक सापडली तेही चांगले वाटले.

धन्यवाद मामी आणि प्राचीन , मी लेख आनंदात आणि उत्साहात एकटाकी ( एकटाइपी Wink ) लिहीलायं पण इन्टेस झाला वाटतं. आता तगमग बऱ्यापैकी कमी झाली आहे , नाही तर लिहीताच आले नसते. हे त्यानेच लिहून घेतलेयं असंच समजा.
मला धार्मिक clichés मोडायला आवडतं , boxed thinking आहे फार , त्याला फाडून अध्यात्मिक होणे काळाची गरज आहे. मी फार फार private person होते अध्यात्मिक बाबतीत , आता नाही राहिले , पुष्कळ मोकळेपणाने लिहीते ही त्याचीच इच्छा असेल, कारण इतके सुचते की थांबताच येत नाही. जबरदस्त ऊर्मी वाटते. दरवेळेस वाटतं की झालं आता यानंतर काही सुचणार नाही पण पुन्हा सुचतं , त्यामुळे त्याचीच इच्छा आहे.

बाकी वेळेला मी सर्वांसारखीच कधी तरी वैतागणारी , स्वयंपाकाचा कंटाळा असणारी, मुलांचा अभ्यास घेणारी , सिनेमे बघणारी , नावं ठेवणारी , जोक्स मारणारी , टापटीपीचे प्रयत्न करणारी , जीवाभावाच्या मैत्रीणी असणारी, नवऱ्याशी अधूनमधून भांडणारी बाई आहे Lol . संसार कुणाला चुकलायं. जमलं तसं रोज घरातल्या घरात अर्धा पाउण तास ध्यान करण्याने जन्मोजन्मी रहाणारी प्रगती होतं असेल तर किती ग्रेट डील आहे ही, नाही का ?

बाकी वेळेला मी सर्वांसारखीच कधी तरी चिडकी , स्वयंपाकाचा कंटाळा असणारी, मुलांचा अभ्यास घेणारी , सिनेमे बघणारी , नावं ठेवणारी , जोक्स मारणारी , टापटीपीचे प्रयत्न करणारी , जीवाभावाच्या मैत्रीणी असणारी, नवऱ्याशी अधूनमधून भांडणारी बाई आहे >> खूप हसले गं मी..
याबाबतीत जुळतयं आपलं.

>>>>बाकी वेळेला मी सर्वांसारखीच कधी तरी वैतागणारी , स्वयंपाकाचा कंटाळा असणारी, मुलांचा अभ्यास घेणारी , सिनेमे बघणारी , नावं ठेवणारी , जोक्स मारणारी , टापटीपीचे प्रयत्न करणारी , जीवाभावाच्या मैत्रीणी असणारी, नवऱ्याशी अधूनमधून भांडणारी बाई आहे Lol .>>>> हाहाहा मस्त. मी पण मी पण Wink डिट्टो!!! आरशात पाहून कधी(१०% वेळा) स्वतःला विश्वसुंदरी समजणारी तर ९०% जाडी समजणारी बाईही आहे मी LOL

मी , रूपाली आणि सामो मैत्रिणी झालो Happy .
खूप खूप आभार चिन्नु. Happy
बाकी काही प्रतिसाद द्यायला अजून तयारी नाहीये तेवढी..~~~~~~ असं काही नसतं गं .

आरशात पाहून कधी(१०% वेळा) स्वतःला विश्वसुंदरी समजणारी तर ९०% जाडी समजणारी बाईही आहे मी~~~ १०% वालाच आरसा घे आता Wink

Pages