निरंजन

Submitted by अस्मिता. on 27 March, 2020 - 18:39

निरंजन हा माझ्या अत्यंत आवडत्या शब्दापैकी एक शब्द. लहानपणी ना.सि.फडके यांची निरंजन नावाची कादंबरी वाचली होती. काय होते त्या कादंबरीत आता आठवत सुद्धा नाही. पण या शब्दाने मात्र मनावर गारूड केलं.
निरंजन या शब्दाचा अर्थ आहे अत्यंत पवित्र, निष्कपट आणि कुठलेच किल्मीष नसलेले .पण मला त्याच्या नादाची भूरळ पडली. या शब्दाचा नाद मला देवळाच्या गंभीर घंटानादा सारखा वाटायला लागला. शांत अशी आत्म्याला स्पर्श करणारी जाणीवच जणू ती. हाच शब्द माझे अवघे प्रणव झाला.
माझ्या मनाचा अध्यात्मिक ओढा मला अश्याच जागा, वस्तू, लोक, चित्रे, नैसर्गिक सौंदर्य आणि शांतीमय वातावरणाकडे कायम ओढत असतो.
आसपास छोटी मोठी मंदिर असणाऱ्या छोट्या गावाच्या जुन्या भागात सगळे बालपण गेले. त्यामुळे ती मंदिरे त्यातले अर्चा विग्रह हे माझ्या आयुष्याचा भाग होते. आपण जसे आपल्या आईवर आपली श्रद्धा किंवा अंधश्रद्धा आहे याचा विचार करत नाही. सहवासाने परमेश्वरा बाबतीत तसेच झाले होते. आयुष्याचा भाग असल्याने आणि सतत द्रुष्टी समोर असल्याने त्याच्या बद्दल प्रेमच वाटायला लागले.
तो सहवास म्हणजे सहज उपलब्ध असलेल्या मोठ्या आनंदापैकी एक होता.
हक्काचे आनंदाचे एक ठिकाण म्हणजे कृष्ण मंदिर. माझी सखी तिथे रहात असे. तासनतास या कृष्ण मंदिरात खेळण्यात जायचे. तिच्या आजोबांनी आयुष्यभर निस्वार्थपणे त्या मंदिराच्या पूजा अर्चेचा भार सांभाळला.
हे एक दोन तीनशे वर्ष जुने मंदिर होते. आमच्या वाड्या जवळ असणारा हा एक वाडा होता. एक मोठा गेरू रंगाचा दिंडी दरवाजा असलेला . ह्यात एक पोटदरवाजाही होता. हा दरवाजा आणि त्याची आगळ दोन्ही अवजड होते. बंद करायला नक्की दोन माणसे लागत असणार म्हणून की काय हा कायम उघडाच असायचा. मी पंधरा वर्षांत हा फक्त दोनदाच बंद होता हे ऐकून होते. एकदा गोदावरीला आलेल्या पुरामुळे आणि दुसर्यांदा अयोध्या राम मंदिर प्रकरणात झालेल्या धर्मिय दंगलींमुळे. मला अर्थातच दोन्ही गोष्टींचे गांभीर्य नव्हते. शाळा नसूनही जाता आले नाही यानेच उदास वाटले.
आत गेल्यावर दगडी अंगण, उजव्या कोपर्यात न्हाणीघर, त्याच्या बाजूला बुजवून टाकलेली विहीर आणि त्याच्या वर असलेले प्राजक्ताचे नाजूक झाड. त्या विहिरीत तळ्यात मळ्यात करताना भारीच गंमत वाटायची. नेहमीच त्या केशरी दांड्यांच्या पारिजातकाचा सडा पडलेला असायचा. दोन बोटांमध्ये हलकेच दाबले तर अष्टगंधा सारख्या रंगाची मेंदी उमटायची. आजही चित्रात ते फूल पाहिले तर मन काही क्षण त्या आठवणीतल्या सुगंधात रेंगाळते.
आणखी दोन पावले पुढे गेले की सखीच्या खोल्या. बाहेरच्या खोलीला दारही नव्हते. पण तिथे कुणी नाही असे देखील कधीच झाले नाही.
चार पाच कुटुंबे त्या वाड्यात समाधानाने रहायची. पुढे दोन तीन दगडी पसरट पायर्या.. आणि आत दोन ऊंच ओसर्या मधले अरुंद दगडी अंगण. त्या पैकी एका ओसरी वर भाजी वाले भाज्यांची टोपली ठेवायची.. प्रखर ऊन्हापासून वाचवायला. दुसर्या ओसरीवर आम्ही पत्ते कुटायचो.
अजून काही पावले चालत गेले की मुख्य अंगण.ओट्याच्या बाजूला वडाचे झाड आणि त्याचा ऊंच पार. आणि समोर ओटा मागे गाभारा.
अपूर्व शांती असलेला सुंदर गाभारा. तिथे जाताच मन निरंजन व्हायचे. राधाकृष्णाचे साधारण दोन तीन फुटाचे काळ्या पाषाणात बनवलेले रेखीव अर्चा विग्रह आणि समोर नित्य तेवत असणाऱ्या प्रसन्न समया. अजून काय लागते मन नमन व्हायला.
. .तो कृष्ण मला आमच्यापैकीच एक वाटायला लागला. एकही खेळ नसेल जो तिथे खेळला नाही. कधीही हाकलून दिल्या शिवाय किंवा बोलावणे आल्याशिवाय घरी आलेले आठवत नाही. प्रदक्षिणेसाठी मोकळ्या सोडलेल्या अंधार्या बोळात डोकेही फोडून घेतले होते आम्ही दोघींनी .दुसर्या दिवशी टेंगळासहीत पुन्हा तिथेच खेळत होतो. तो गारवा, एकांत आणि मुग्ध शैशव. कृष्णा समोर आजोबा चंदन उगाळायचे तरी मी एकटक बघत बसायचे. त्यांनी साधेपणाने केलेली या अप्रसिद्ध अशा जुन्या मंदिरातली पूजा माझ्यासाठी रोजचा सोहळा होती. ते दिवस निरंजन झाले.
समोरच्या झाडावर एक मुंजा रहातो. तो कुणाला तरी रात्री शुक् शुक् करुन सरसर झाडावर चढत गेला अशी वदंता होती. ते ऐकल्यापासून आमच्या तिथल्या गप्पांमध्ये भूतांच्या गोष्टींची पण भर पडली. कृष्णाच्या समोर बसून आम्ही भूतांवर गप्पा मारल्या. किती हसला असेल तो.
रोज संध्याकाळी घरी आल्यावर आई विचारायची आज तरी पाया पडलीस का..मी शांतपणे हौदातले पाणी पायावर घेत नाही म्हणायचे. मग तिचे सुरु व्हायचे अग शेकडो वर्षापासूचे जागृत मंदिर आहे ते रोज कस विसरू शकतेस तू. मी काय सांगणार आणि कसे. कधीच आठवायचे नाही. समोरच्या नळावर उगाच पाय धूताना, ओट्यावर बसून पत्ते खेळताना. फूले वेचताना. गप्पा मारताना .तिथे तासनतास असून कधीच लक्षातच यायचे नाही की कृष्णाला नमस्कारही करायला हवा. काही तरी मोहिनीच जणू. आम्हीच कृष्ण व्हायचो कदाचित मग कोण कुणाला नमस्कार करणार.
सगळ्या गप्पांचा, खेळांचा, छोट्या छोट्या भांडणांचा अगदी सगळ्याचा तो सगुण साकार रुपाने साक्षी होता.कृष्णा सोबत त्याची सखी माझ्यासोबत माझी. आमच्या चौघांची ताटातूट होईल कधीच वाटले नव्हते बालमनाला . आज वीस वर्षे झाली त्या मंदिरात जाऊन. पुन्हा जावे तर भीती वाटते तिथली पडझड बघून मनातील हळवी आठवण दुखावेल.
सगुण साकार रुपात त्याचे नेहमीच समोर असणे मी फार ग्रुहीत धरले होते. कारण तो बालपणाच्या अस्तित्वाचा भाग होता. नंतर भौतिक अंतर वाढल्यावर लक्षात आले की तो सर्वव्यापी आहे असे नुसते माहिती असून उपयोग नाही. त्याचे तसे असणे हे जाणीवेचा भाग झाले पाहिजे. बाहेरच्या मंदिरात तो फक्त दिसतो अंतरात तो जाणवतो. त्या जाणीवेला शब्दबद्ध करणारी अवस्था हीच निरंजन. परमानंदा शिवाय काहीच न उरणे हेच निरंजन.
हीच चिरंतन निरंजन अवस्था सर्वांना मिळावी अशी त्या कृष्णाकडे प्रार्थना.
HarsingarFlowers-1-1024x768-1-1024x500-1.jpg

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर लिहिलं आहे.
राम निरंजन न्यारा रे , अंजन सकल /(जगत) पसारा रे हे कबीरांचे एक सुप्रसिध्द निर्गुणी भजन आहे. कुमार गंधर्व, कलापिनी कोमकली अशा अनेकांनी ते गायले आहे हे सर्वांना माहीतच आहे. अंजन म्हणजे काजळ. पूर्वी लोक ते डोळ्यांत घालायचे. दृष्टी साफ होण्यासाठी. तर हे काजळ सर्वत्र पसरलेले आहे. ही माया. जी. ए. कुलकर्ण्यांची हीच ती काजळमाया. दिसतेय, भासतेय ते खरे नाही. मायेने आच्छादित आहे ते. फक्त एक राम हे जाणतो कारण तो ' निरंजन' आहे. ह्या काजळमायारूपी बयेपासून अलिप्त आहे. म्हणूनच तो न्यारा आहे, वेगळा आहे.
असो. दत्त, अवधूत आणि नाथ संप्रदायात ' अलख निरंजन' असा जयघोष असतो. अलक्ष्य म्हणजे अगोचर. ज्याला इंद्रिये पाहू शकत नाहीत असा . आणि निरंजन म्हणजे मायेने न झाकोळलेला, मायेच्या पडद्याआडचे सत्य पाहू शकतो तो. खरा ज्ञानी.
मूळ लेख आवडला म्हणून हे लिहावेसे वाटले.

हीरा प्रतिसाद आवडला. कित्येक वर्षानंतर केलेला लिहीण्याचा पहिलाच प्रयत्न होता म्हणून विशेष आभार.
आसा, सूर्यगंगा, प्राचिन, निरु, सामो ,हीरा धन्यवाद.

निर्गतम् /निःसृतम् अञ्जनं यस्मात् सः /तत् । ज्याच्यामध्ये कोणताही कलंक, दोष, डाग, भेसळ उरलेली नाही असे विशुद्ध परम तत्त्व. >>> एका संस्कृृृृृृत तज्ज्ञ मित्राने सांगितलेला अर्थ.

लेख फारच छाने. Happy

एक गहिनीनाथांचा मंत्र आहे माझ्या रोजच्या उपासनेत. त्या मंत्राची देवता कोणतीही नसून निर्गुण निराकार निरंजन आहे. त्यात आधी आणि शेवटी बीजमंत्र असून मधली शब्द रचना अशी आहे - "निरंजन जटाहस्वाही तरंग" कृपया कोणी संस्कृतचा जाणकार असल्यास "जटाहस्वाही " या शब्दाचा खुलासा करावा

शशांक पुरंदरे,
होय, तसाच आहे अर्थ. अंजन म्हणजे काजळ, सुरमा किंवा शाई. ज्याच्यातून सगळा काळेपणा बाहेर निघून गेला तो निरंजन. निर्धास्त, निश्चिंत, निष्प्राण, निस्सारण वगैरे शब्दांप्रमाणे. नि: हा उपसर्ग एकतर नकारार्थक किंवा ' पासून दूर' या अर्थी वापरला जातो.
इथे राम निरंजन न्यारा रे ह्या ओळीपुढे अंजन सकल (एक पाठभेद ' जगत' असा आहे.) पसारा रे ही ओळ आहे. जगतावर सर्वत्र काळिमा पसरलाय म्हणजेच जगताचे सत्य स्वरूप काळोखात बुडालेय. अंधारात खरी वस्तू किंवा वस्तूचे खरे रूप दिसत नाही त्याप्रमाणे जगताचे खरे स्वरूप दिसत नाही, ते मायेने झाकलेले आहे. फक्त एक तो राम ह्या काळिम्यापासून दूर, त्याच्या पार आहे, म्हणून तो न्यारा, आगळावेगळा आहे. आपण सगळे ह्या काळोखात आहोत म्हणून आपल्याला तो दृष्टिगोचर, इंद्रियगोचर नाही. म्हणून अलक्ष्य निरंजन. इथे ह्या bhajanaat ' राम' हा सगुण नव्हे तर निर्गुण स्वरूपात कबीरांना आकळला. म्हणून हे निर्गुणी भजन .

अगदी मनापासून धन्यवाद सर्व प्रतिक्रियांंबद्दल..हा माझा शाळेनंतर लिहीण्याचा पहिलाच प्रयत्न होता... त्यामुळे खरेच समाधान वाटले.
निर् + अंजन विकारचे अंजन दूर झाले की जे उरते ते निरंजन.. तेच परमतत्त्व.
गंमत म्हणजे माझा मुलगा जन्माला आल्यानंतर जेव्हा मी त्याला पहिल्यांंदा जवळ घेतले..तेव्हा हेच ते निरंजन वाटले.
त्यामुळे त्याचे नावच निरंजन ठेवले.

जिद्दू तुमच्या कडून नेहमीच नवे काही तरी कळते.. शशांक पुरंदरे सर तुमचे निरूपण नेहमीच आवडतात तुमची प्रतिक्रिया अनमोल आहे. धन्यवाद स्वाती2, जाई, हीरा, जिद्दू, शशांक पुरंदरे सर .

आदिश्री ,
छान लिहिलंय, त्या मंदिराचा, परिसराचा फोटो असल्यास टाका इथे.
हीरा आणि शशांकजी आपला प्रतिसाद खूप आवडला.

शब्दात वर्णन न करता येणारी निरंजन अनुभूती उत्तम साकारली आहेत.
वास्तूच्या द्रुष्याचे , प्रसंगांचे वर्णन या अनुभूतीकडे निर्देश करणारेआहेत. ज्यांनी हे असे वाडे - मंदीर पूर्वी पाहिले आहेत , असे बालपण जे पूर्वी जगले आहेत ते मनाने सहज तिथे पोहोचतील.

छान लिहिलंय, त्या मंदिराचा, परिसराचा फोटो असल्यास टाका इथे.~~धन्यवाद ऋतुराज, फोटो भावाकडे आहे बहुतेक ..टाकते मिळाला तर.
शब्दात वर्णन न करता येणारी निरंजन अनुभूती उत्तम साकारली आहेत. ~~धन्यवाद पशुपत , ही अनुभूती देण्याचाच प्रयत्न होता जी मला झाली होती .

हीरा यांनी उल्लेख केल्याने, मुद्दाम निर्गुणी भजन ऐकण्याचा काल प्रयत्न केला. पैकी डॉ. बालाजी तांबे यांची 'हार्मनी' नावाची सी डी आहे माझ्याकडे. त्यात फार गंभीर सूरात व काही वेगळ्याच रागात भजनं आहेत. म्हणजे ऐकल्यानंतर एक विलक्षण असं म्हणजे, मला तरी उदास वाटते. कोणी ती सी डी ऐकलेली आहे का? असं उदास का वाटत असावं?
म्हणजे माझा मूड , बाह्य स्टिम्युलसवरती कमालीचा अवलंबून असतो हे तर माहीते मला. पण कोणते राग आहेत त्या सीडीत जे उदास करतात? कदाचित इतरांना रिलॅक्स करत असतील... मलाच उदास वाटत असेलही Sad पण हे पूर्वीपासून होते. राग माहीत असल्यास कोणीतरी सांगा.
'भजन न करना, जाने रे मनवा, ..."
"गुरु घर आव्या ..."
"दत्ताची करुणा त्रिपदी.."
"शिरडीवाले साई पिया .."
"अपना देस निराला, सद्गुरु देस निराला ..."

अशी भजने आहेत. पण सूर इतके विलक्षण आहेत.
खाली दुवा दिलेला आहे त्यावरही ऐकता येतील -
https://www.youtube.com/watch?v=2sjDW-3iXao&list=OLAK5uy_nVYNB_E46eZ_zmv...

पं. कुमारजींनी गायलेले हे एक अतिशय सुंदर निर्गुणी भजन...

गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊँ जी,
दूजे के संग नहीं जाऊँ जी,

दुःख ना जानूँ जी मैं दर्द ना जानूँ जी मैं ,
ना कोई वैद्य बुलाऊँ जी,
सदगुरु वैद्य मिले अविनाशी,
वाको ही नाड़ी बताऊँ जी,
दूजे के संग नहीं जाऊँ जी,

गंगा न जाऊँ जी मैं जमना न जाऊँ जी मैं,
ना कोई तीरथ नहाऊँ जी,
अड़सठ तीरथ हैं घट भीतर,
वाही में मल मल नहाऊँ जी,
दूजे के संग नहीं जाऊँ जी,

कहे गोरख जी हो सुन हो मच्छन्दर मैं ,
ज्योति में ज्योति मिलाऊँ जी,
सतगुरु के मैं शरण गये से,
आवागमन मिटाऊँ जी,
दूजे के संग नहीं जाऊँ जी,

गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊँ जी,
दूजे के संग नहीं जाऊँ जी,

निरंजनीं आह्मीं बांधियेलें घर । निराकारीं निरंतर राहिलों आह्मी ॥1॥

निराभासीं पूर्ण जालों समरस । खंड ऐक्यास पावलों आह्मी ॥2॥

तुका ह्मणे आतां नाहीं अहंकार । जालों तदाकार नित्य शुद्ध ॥3॥

येथील सर्वांचाच व्यासंग, अनुभव खूप महान आहे .
मला कुमार गंधर्व यांनी गायलेल्या गोरखनाथांच्या निर्गुण भजनाच्या ओली द्यायचा मोह होतोय.... माझं आवडतं

शून्य गढ शहर, शहर घर बस्ती
कौन सूता कौन जागे है
लाल हमरे हम लालान के
तन सोता ब्रह्म जागे है

जल बिच कमल, कमल बिच कलियाँ
भँवर बास न लेता है
इस नगरी के दस दरवाजे,
जोगी फेरी नित देता है

तन की कुण्डी मन का सोटा
ज्ञानकी रगड लगाता है
पाञ्च पचीस बसे घट भीतर
उनकू घोट पिलाता है

अगन कुण्डसे तपसी ताप
तपसी तपसा करता है
पाञ्चो चेला फिरे अकेला,
अलख अलख कर जपता है

एक अप्सरा सामें उभी जी,
दूजी सूरमा हो सारे है
तीसरी रम्भा सेज बिछावे,
परण्या नहीं कुँवारी है

परण्या पहिले पुतुर जाया
मात पिता मन भाया है
शरण मच्छिन्दर गोरख बोले
एक अखण्डी ध्याया है

हीरा जरुर.
_________
काल मला गुजराथ, अहमदनगर येथे जन्मलेल्या एका संतांची वाणी वाचायला मिळाली. दादू म्हणुन ते ओळखले जातत - https://aneela-daduji.blogspot.com/search/label/%22%E0%A4%B6%E0%A5%8D%E0...

दोहा:-
तीनै भाग शरीर में, सर धड़ टाँगैं जान ।
पूरन रूप शरीर का, सत्य वचन परमान ॥१॥
पाँच तत्व प्रकृती सहित, कहत जिन्हैं हैं तीस ।
पाँच चोर औ तीन गुण, मन बुध्दी चालीस ॥२॥
कुण्डलिनी षट चक्र हैं, मुद्रा पाँचै जान ।
सात कमल तन में अहैं सत्य वचन यह मान ॥३॥
पाँच प्राण यामें बसैं, जीव आतमा जान ।
इड़ा पिंगला सुखमना, नाड़ी तीन यह जान ॥४॥
सुखमन में है चित्रिणी, तामें बज्रणि जान ।
ताके अभ्यन्तर धुनी, सब सुर तहाँ लोभान ॥५॥
राजयोग का मार्ग यह, जानै पुरुष महान ।
सबै देव मुनि तीर्थ हैं, राजत कृपानिधान ॥६॥
मानुष का तन पाय कै, नाम पाय गयो जौन ।
अनइच्छित हरि पुर गयो, बैठि गयो मुख मौन ॥७॥
दश इन्द्री यामे अहैं, माया अति बलवान ।
दीन भाव ह्वै हरि भजै, सटकि जाय जो ज्वान ॥८॥
मन बानी के है परे, अमित भानु का तेज ।
सतगुरु जो किरपा करैं, देवैं छिन में भेज ॥९॥
मन को लीन्हेव जीत जिन, सोई इन्द्री जीत।
मन का सारा खेल है, सब इन्द्रिन को मीत ॥१०॥
मन स्थिर सतगुरु करैं, और करै नहिं कोय ।
देंय शब्द का भेद जब, ररंकार धुनि होय ॥११॥
भोजन थोड़ा कीजीये, बहुत बोल नहिं बोल ।
प्रेम पदारथ लीजिये, नाम रूप अनमोल ॥१२॥
दादू दुखिया क्या कहै, सुखिया सो ह्वै जाय ।
सतगुरु से उपदेश लै आँखिन देखै भाय ॥१३॥

@सामो...
'भजन न करना, जाने रे मनवा, ..." मला सुद्धा गंभीर आणि एकाकी वाटले ऐकून...तरीही आवडले.
माझे अत्यंत आवडते स्तोत्र आहे.. शिवोहम् शिवोहम्
https://youtu.be/h0Bt-qCxQR0 याने फार प्रसन्न वाटते. मी वेगळ्या जगात जाते. काही क्षणापुरती माझी देह ही ओळख अद्रुष्य होत आहे असे वाटते.

Pages