पाककृती स्पर्धा १ - उपवास मोदक/ उपवास शाही मोदक - साक्षी

Submitted by साक्षी on 30 August, 2020 - 14:11

साहित्य :

सारणासाठी -
आळीव/ हाळीव - ५० ग्रॅम
ओलं खोवलेलं खोबरं - २ वाट्या
गुळ - १.५ वाटी
वेलची पावडर

उपवास मोदक पारीसाठी -
वरई पीठ - १ वाटी
पाणी - १ वाटी
लोणी/ तेल - १ चमचा
चवीपुरते मीठ

उपवास शाही मोदक पारीसाठी -
काजू - १ वाटी
साखर - अर्धी वाटी
पाणी - पाव वाटी

कृती :
सारण -
१) आळीव २ तास दुधात किंवा नारळाच्या पाण्यात भिजत घालावे. किंवा नारळाच्या चव घेऊन त्यात मिसळून ठेवले तरी चालतील.
२) आळीव भिजले की गुळ मिसळून गॅस वर शिजवायला ठेवा. अंदाजे ८-१० मिनिटांत व्यवस्थित शिजेल. सारण आधी पातळ असेल नंतर घट्ट होत जाईल.
३) सारण शिजलं की गॅस बंद करून वेलची पावडर मिसळा.
४) हे सारण दोन्ही प्रकारच्या मोदकांसाठी कॉमन असणारे.

तयारी
IMG_20200830_185027.jpg
उपवास मोदक
१) जाड बुडाच्या पातेल्यात पाणी घ्या. त्यात लोणी/ तेल आणि चवीपुरतं मीठ घाला. पाणी चांगले रटरट उकळले की वरईचे पीठ घाला आणि भराभर हलवा. सगळं नीट मिक्स होऊ द्या. झाकण ठेऊन एक दणदणीत वाफ येऊ द्या आणि आच बंद करा.

२) उकड गरम असतानाच चांगली मळून घ्या. छोटा गोळा घेऊन तो परत छान मळून घ्या. हाताला किंचित तेल लावून वाटी चा आकार द्या. पातळ पारी झाली की एक चमचा सारण भरा. बोटांनी पारीच्या कडेवर निऱ्या घाला आणि मोदक वळून पूर्ण करा. असे सगळे मोदक वळून घेऊन नेहेमीच्या मोदकांसारखे १५ मिनिटे वाफवून घ्या.
IMG_20200830_185103.jpg

उपवास शाही मोदक
१) मिक्सरमधून काजूची पूड करुन घ्या.
२) जाड पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून गॅसवर ठेवा. पाणी उकळलं की लगेच काजू पावडर घालून सतत ढवळा. मिश्रण थोडं घट्ट झालं की लगेच गॅस बंस करा.
३) जरा गार झालं की ह्याचा गोळा मळून घ्या.
४) एक छोटा गोळा घेऊन त्याला वाटीचा आकार द्या. उकडिच्या मोदकाइतकी पातळ पारी नको. जाड ठेवा.
५) ह्यात एक चमचा सारण भरून वाटी बंद करून मोदकाचा आकार द्या. मग चमच्याच्या मागच्या बाजूने हळुवार हाताने निर्‍या काढा. याच पद्धतीने सगळे मोदक वळून घ्या. तुमच्याकडे मोदकाचा साचा असेल तर हे मोदक साच्यात करायला जास्त सोपे जातील. माझ्याकडे साचा नाहिये आणि स्पर्धेला साचा नको असा नियम होता म्हणून मी असे केले.

शाही मोदक कसे करायचे ते इथे बघून कळेल
KajuModakCollage.jpg

तयार शाही मोदक
KajuModakReady.jpg

अजुन एक
KajuModakReady1.jpg

हे उकडीचे आणि काजूचे सगळे एकत्र
All_2.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच सुंदर, सुबक
अळीव मोदक. मस्तच लागतील.
तुमच्या हाताला जबरदस्त सीमेट्री आहे.चमच्याने इतक्या समान अंतरावर रेषा म्हणजे..मोदकाच्या भरपूर आणि सुबक कळ्या बघून पण नतमस्तक वगैरे व्हावंसं वाटलं.

अरे बापरे आताच तुमच्या आधीच्या एन्ट्री वर प्रतिसाद देऊन आले आणि आता हे. साष्टांग दंडवत घ्याच.

काय ग्रेट आहेस ग
उपासाचे मोदक कल्पनाच कसली भारी। बरं त्यातही दोन ऑप्शन्स Happy
वरईच्या मोदकाच्या कळ्या किती सुंदर
अन काजु मोदक तर अफलातून। चमच्याची कल्पना आणि तो वापरण्याचं कौशल्य!पुन्हा दंडवत ___/\___
रेसिपी, फोटो दोन्हीही सुंदर

बापरे,काजूची पारी! कसं सुचते बाई
भारीच इनोव्हेटिव्ह>>अगदी खरंय. इथल्या सगळ्या प्रवेशिका बघून रोजच्या स्वयंपाकाचाही न्यूनगंड येऊ म्हणतोय Wink Wink

फारच सुंदर साक्षी!
अळीवाच्या सारणाची कल्पना मस्त आहे. आणि काजूच्या पारीचीही! काजूचे मोदक उकडायचे नाहीत ना? मस्तच लागतील ते नुसतेच.

सगळ्यांना प्रतिसाद दिल्याबददल धन्यवाद.

वावे, काजू मोदक उकडावे लागत नाहीत. सारण आणि पारी दोन्ही शिजलेले असते. ह्याची चव काजू कतली च्या जवळची येते

मोदकाच्या भरपूर आणि सुबक कळ्या बघून पण नतमस्तक वगैरे व्हावंसं वाटलं. +111
सुबक आहेत अगदी.. चित्रातल्यासारख्या

भारीच आहे आयडिया !! मला पण करून बघायला आवडेल.
वरई च्या पिठा ऐवजी दुसर काय घेता येईल ? माझ्याकडे एकही उपवासाच पीठ नाहीये . अळीव आहेत .. बटाटा उकडून त्याच बघायला हवं ..

साबुदाणा अगदी थोडा भाजून त्याचं मिक्सर मध्ये पीठ बनवून चाळून ते आणि उकडलेला बटाटा असं मिळून वापरता येईल.
उकडलेलं रताळं आणि बाईंड म्हणून किंचीत राजगीरा किंवा साबुदाणा पीठ पण>
(पूर्ण दिवस उपास आणि भिजवलेला साबुदाणा संपला की अशी थालिपिठं करतो आम्ही.)

मस्त दिसताहेत मोदक. मी अळिवाचे लाडू बनवते. काजूचे मोदक पण बनवते. पण काजूमध्ये हे अळिवाचे सारण कसले सुंदर दिसतेय. अगदी एकसारखे -सुबक बनलेत मोदक.

Pages