प्रकरण २: अमेरिका स्थलांतरितांचा/स्थल-आंतरितांचा देश?

Submitted by गुंड्या on 26 August, 2020 - 15:04

जगमान्य सिद्धांताप्रमाणे, १४९२ साली कोलंबसाने "नवीन जगाचा" शोध लावल्यापासून "नव्या जगाकडे" स्थलांतरितांचा ओघ गेली ५०० वर्षे अव्याहतपणे सुरु आहे, आणि या पुढेही तो सुरूच राहील.
परंतू कोलंबसाच्या "शोधाला" छेद देणारे नव-नवीन प्रस्ताव सतत मांडले जातात.
जसे,
१) दहा - पंधरा हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी कमी असल्याने आशिया खंडातून अलास्कामार्गे प्रथम स्थलांतर झाले, तीच संस्कृती पुढे "मूळ-निवासी" (नेटिव्ह - इंडियन) विस्तारली आणि त्यांची कोलंबसाची भेट झाली.
२) लिएफ एरिक्सन (व्हायकिंग) नावाच्या युरोपियन व्यक्तीने दहाव्या शतकात अमेरिकेचा शोध लावला होता त्याने ह्या प्रदेशाला विनलँड असे नाव दिले होते.
३) चिनी लोकांच्या प्रस्तावाप्रमाणे कोलंबसाच्या आधी १४२१ सालीच चायनाच्या सामुद्रिक सफरीतून त्यांनी अमेरिकेचा शोध लावला होता.

ह्यावर अजून शोध घेता विविध देशांचे अनेक प्रस्ताव सापडतील, कोलंबसाने जरी अमेरिका शोधली तरी अमेरिका देशाला नाव मिळालेय ते अमेरिगो वासपूची ह्याच्या नावावरून. परंतू ह्या लेखमालेमधून ज्या समस्येची चर्चा करायची आहे ती आधुनिक काळातील असल्याने आपली शिडे इतिहासाच्या सफरीत भरकटवायची गरज नाही. परंतू जगभरातील देश-प्रदेशातून स्थलांतरीत झालेल्या समुदायांना अमेरिकन मुख्य प्रवाहात मिसळून जाण्याची प्रक्रिया संक्षिप्त स्वरूपात समजून घेणे गरजेचे आहे.

अमेरिका जगाचा मेल्टिंग पॉट आहे. विभिन्न गुणधर्माच्या धातूंच्या एकजिनसीकरणासाठी ज्या पात्रात एकत्र केले जाते त्याला मेल्टिंग पॉट अशी संज्ञा आहे. तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपर्यातील संस्कृतीमधून आलेले असा, परंतू मुख्यप्रवाहाशी; समाज जीवनात तुम्ही "अमेरिकन आयडेंटिटी"नेच जोडले जाता. अमेरिकन आयडेंटिटीच्या मूल्य व्यवस्थेशी कुठल्याही प्रकारची तडजोड सार्वजनिक जीवनात अस्वीकारणीय आहे. आधी सांगितलेल्या अमेरिकन संघराज्याच्या निर्मितीमध्ये; नवीन राज्ये (संघर्षातून, विकत घेतलेले किंवा अन्य प्रकारांनी येऊन जोडले गेलेले) जोडण्याच्या प्रक्रियेत त्या त्या राज्यातील स्थानिक जनतेने स्वतःची मूळ ओळख न विसरता एक लार्जर अमेरिकन आयडेंटिटी सहज स्वीकारली आहे. परंतु हि अमेरिकन आयडेंटिटीची मूल्य-व्यवस्था एका रात्रीत किंवा राष्ट्रपित्यांचा आदेश म्हणून तयार झालेली नाही, तर ती वर्षानुवर्षाच्या विविध समुदायांच्या योगदानातून, सहजीवन आणि अंतर्विरोधाच्या समुद्र-मंथनातून तयार झाली आहे.

१३ कॉलोन्यांपासून सुरुवात होऊन अमेरिका ह्या नवीन देशाची निर्मिती व्हायच्या आधी २०० वर्षांपासून फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश, जर्मन आणि विविध युरोपियन देशातून आलेले स्थलांतरित रहातच होते. अमेरिका ह्या नवीन देशाला जगाकडून मान्यता मिळाल्यानंतरही युरोपियन देशातून स्थलांतर होतंच राहिले. गुलामगिरीमुळे आफ्रिका खंडातून माणसांची आयात झाली, स्कॉट- आयरिश आले तसे चायनीज आणि जापनीज मजदूर म्हणून आणले गेले. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्यू आले, जगभरातून माणसे इथे आली आणि इथलीच होऊन गेली. (मुंबईचं वर्णन केल्यासारखं वाटत आहे का?) तरी उदाहरण म्हणून दोन-तीन समुदायांच्या प्रवासाकडे संक्षिप्त स्वरूपात बघूया.

नेटिव्ह अमेरिकनांचा (इंडियन), आधुनिक अमेरिकेच्या निर्मितीमध्ये सफायाच झालेला आहे, हे अमेरिकन सरकारने मान्य केलेले आहे.

गुलामगिरीच्या माध्यमातून आफ्रिकेतील लोकांना एखाद्या वस्तू-उत्पादनाप्रमाणे अमेरिकेत आणले गेले, हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. राष्ट्रपित्यांची इच्छा असूनही स्वातंत्र्याच्या घोषणापत्रात ते गुलामगिरीच्या प्रथेविरुद्ध कलम घालू शकले नाहीत कारण त्याने संघराज्याचे अस्तित्वच संकटात येत होते. हि प्रथा नष्ट व्हायला पुढे ९० वर्षे लागली आणि अंतर्कलहावर विजय मिळवूनच कायद्याद्वारे तीचे उच्चाटन करावे लागले, परंतू आफ्रिकन-अमेरिकनांच्या समानाधिकारासाठी १९६५ चे साल उजाडावे लागले. व्हाईट अमेरिकन मुलांच्या आणि आफ्रिकन अमेरिकन मुलांच्या शाळांचे एकत्रीकरण; म्हणजेच व्हाईट आणि आफ्रिकन-अमेरिकन मुले एकाच शाळेत, एकाच वर्गात मांडीला मांडी लावून शिकायला १९६०-७०च्या दशकात सुरुवात झाली. फेब्रुवारी महिना आफ्रिकन-अमेरिकन मंथ, तसेच जानेवारीमधील मार्टिन लुथर किंग दिवसाच्या माध्यमातून ह्या संघर्षाची देशभरात दखल घेतली गेली आहे.

स्कॉट-आयरिश स्थलांतरितांचा १८०० च्या आसपास प्रामुख्याने न्यू-यॉर्कच्या एलिस आयलंडच्या पोर्ट द्वारे अमेरिकेत प्रवेश झाला. त्यांच्या देशातील हालाखीला कंटाळून त्यांनी अमेरिकेचा रस्ता धरला. अमेरिकेत तितक्याच किंवा अधिक हलाखीत जीवन जगत त्यांच्या "नव-जीवनाला" सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांनी अत्यंत हलक्या दर्जाची, आणि धोकादायक कामे स्वीकारली. कंपन्या/फॅक्टर्यांमधून ह्यांना अक्षरश: पिळून घेतले गेले आहे. इतके की Railroad construction was so dangerous that it was said, "[there was] an Irishman buried under every tie".

आयरिश, इटालियन आणि आफ्रिकन लोकांना एकाच तराजूत तोलले जात होते, त्यांच्याविरुद्ध उघड उघड वांशिक, धार्मिक भेदभाव केला जात होता, प्रसंगी त्यांना हिंसाचारालाही सामोरे जावे लागले. जस-जशी आयरिश लोकांची संख्या आणि राजकीय प्रभाव वाढू लागला तस-तसे आयरिश व्हाईट (मुख्य) धारेत सामावले गेले. १८५५ साली न्यू-यॉर्क शहरातील ४० टक्के पोलीस हे स्थलांतरित होते त्यातील तीन-चतुर्थांश आयरिश होते. आज अमेरिकेत सेंट पॅट्रिक डे साजरा केला जातो, त्याला २-३ शतकांची पार्श्वभूमी आहे.

अमेरिकेच्या पुर्व किनाऱ्यावर आयरिश समुदायाबरोबर घडामोडी घडत होत्या तर पश्चिम किनारपट्टीवर वेगळेच नाट्य घडत होते. चायनीज लोकांचा अमेरिकेतील चंचू-प्रवेश कॅलिफोर्नियामधील सोन्याच्या शोधापासून झाला. चायनीज लोकांना जगाच्या सफरी नवीन नव्हत्या, अमेरिका, आफ्रिका खंडापासून सर्वत्र त्यांचा संचार आधीपासूनच होता. परंतू कॅलिफोर्निया मधील सोन्याचे मृगजळ लवकरच त्यांच्या लक्षात आले, तोपर्यंत त्यांनी स्वतःला अत्यंत होस्टाइल परिस्थतीत ढकलले होते. परतीच्या प्रवासाची सोय नाही, कुटुंबाच्या पालन-पोषणासाठी स्रोत नाहीत, अमेरिकन समाजाकडून बहिष्कृत झालेच होते.

१८४०-५० च्या दशकात अमेरिकेत रेल्वेचे जाळे विणण्याचे काम अत्यंत जोरात सुरु होते, अनेक कंपन्यांमध्ये रॅट-रेस होती. चायनीज लोकांनी अत्यंत कमी पगारावर अतिशय धोकादायक, प्रसंगी प्राणहानीकारक स्वरूपाची कामे स्वीकारली. अर्थात त्यांनाही वांशिक, धार्मिक भेदभावाच्या विस्तवातून, तसेच सामाजिक तिरस्कृततेतून जावेच लागले. आज अमेरिकेतील शहरो-शहरी चायना-टाउन उभी आहेत, अमेरिकेत चायनीज नव-वर्ष साजरे केले जाते त्याला ह्या चायनीज संघर्षाची पार्श्वभूमी आहे.

आफ्रिकन, आयरिश, चायनीज समुदायांच्या संघर्षाची, मुख्य-प्रवाहात सामील होण्याच्या प्रक्रियेची संक्षिप्त स्वरूपात तोंड-ओळख प्रातिनिधिक स्वरूपात करून दिली आहे. अमेरिकेच्या तटी आलेल्या नवीन समुदायांना अश्याच सामाजिक परिस्थितीचा सामना करत स्वतःला सिद्ध करावे लागले आहे.

ह्या समुदायांनी "नवीन - जगाला" आपले घर मानले, आपल्याला आणि पुढील पिढीला इथेच राहायचे आहे, त्यासाठी जे पडेल, जे करावे लागेल ते इथेच करायचे आहे. हेच आपले नवीन घर आहे ह्याची खूणगाठ त्यांनी ठामपणे आपल्या मनाशी बांधली. स्थानिक समाजात आपले स्थान निर्माण करण्यासाठी हर-प्रकारे प्रयत्न करत आपले "अमेरिकनत्व" सिद्ध केले. स्वतःच्या सांस्कृतिक खुणा जपत अमेरिकन मुख्यधारेमध्ये मिसळून गेले. आफ्रिकन - अमेरिकन, चायनिज - अमेरिकन, आयरिश - अमेरिकन अश्या आयडेंटिटी-मधून त्यांच्या मूळ संस्कृतीशी बांधलेली नाळ दिसून येते.

जगाच्या कानाकोपर्यातून आलेल्या पहिल्या पिढीतील स्थलांतरितांना, स्थानिक समाजाकडून विविध प्रकारच्या अवहेलनेला सामोरे जावे लागले आहे; जसे स्वस्त मजूर, कायद्यातून पळवाटा काढणारे फसवणूक करणारे, ह्यांना देशातून हाकलून दिले पाहिजे, ह्या देशात रहायला हे अपात्र आहेत, अमेरिकेची संस्कृती बुडवणारे वगैरे वगैरे. व्यापारी/औद्योगिक अमेरिकेच्या कुशल, तसेच अकुशल कामगारांची गरज / निर्माण झालेली पोकळी पहिल्या पिढीतील स्थलांतरित लोकांनी भरून काढली.

जगाच्या मानाने भारतीयांचे अमेरिकेमध्ये स्थलांतरण फारच उशिरा झाले, पहिल्या पिढीतील भारतीयांचा अनुभव कसा होता? कि अजूनही पहिल्या पिढीचे स्थलांतरण सुरूच आहे? तसे असेल तर २१ व्या शतकातील पहिल्या पिढीतील भारतीय स्थलांतरितांचा अनुभव कसा आहे?

लेखाच्या शीर्षकात स्थलांतरित न लिहिता स्थल - आंतरित असा प्रयोग केला आहे. आंतरित म्हणजे internal; आधीच आहेत ते; म्हणजेच निवासी. निवासी म्हटले तरी "आमच्या" आधी तुम्ही आलात, तुमच्या आधी "ते" होते अशी शृंखला तयार होते. आजपर्यंतच्या स्थलांतरितांच्या योगदानाने अमेरिकेच्या प्रगतीत आणि समृद्धीत भरच पडली आहे हे विविध संशोधनांनी सिद्ध केले गेले आहे. मग अमेरिका हा फक्त स्थल - आंतरितांचाच देश की स्थलांतरितांनाही त्यात स्थान आहे; ह्यात स्थल - आंतरितांची काय भूमिका असावी?

एम्मा लाझारसच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टच्याच्या कवितेशिवाय हा लेख अपुर्ण आहे.

The New Colossus
Not like the brazen giant of Greek fame,
With conquering limbs astride from land to land;
Here at our sea-washed, sunset gates shall stand
A mighty woman with a torch, whose flame
Is the imprisoned lightning, and her name
Mother of Exiles. From her beacon-hand
Glows world-wide welcome; her mild eyes command
The air-bridged harbor that twin cities frame.
“Keep, ancient lands, your storied pomp!” cries she
With silent lips. “Give me your tired, your poor,
Your huddled masses yearning to breathe free,
The wretched refuse of your teeming shore.
Send these, the homeless, tempest-tossed to me,
I lift my lamp beside the golden door!”

https://www.nps.gov/stli/learn/historyculture/colossus.htm
https://www.loc.gov/teachers/classroommaterials/presentationsandactiviti...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा गुंड्या! थोडक्यात पण फार सुंदर आढावा घेत आहात तुम्ही. तुमच्या लिखाणात तुम्ही केलेला अभ्यास तर जाणवतोच.. पण तुमची लेखनशैलीही खुप छान आहे.

छान लेख!
एलिस आयलंड वरचं संग्रहालय पाहताना या कवितेतला संदेश आणि तेव्हाची प्रत्यक्ष इमिग्रेशनची धोरणं यातला विरोधाभास जाणवायला लागतो. अर्थात you had to be a tough nut to survive in the erstwhile US.
आजही विकसित देशांमध्ये रोजच्या जीवनात सामान्य माणसासाठी सर्वात जास्त कठीण परिस्थिती असलेला देश म्हणून अमेरिका पहिल्या क्रमांकावर असेल.

प्रकरण १:अमेरिका, अमेरिकन जीवनाच्या प्रेरणा आणि मूल्य व्यवस्था
https://www.maayboli.com/node/76269

प्रकरण २: अमेरिका स्थलांतरितांचा/स्थल-आंतरितांचा देश?
https://www.maayboli.com/node/76288

प्रकरण ३: भारतीयांचें अमेरिकेतील स्थलांतरण: एक दृष्टिक्षेप
https://www.maayboli.com/node/76299

<< आजही विकसित देशांमध्ये रोजच्या जीवनात सामान्य माणसासाठी सर्वात जास्त कठीण परिस्थिती असलेला देश म्हणून अमेरिका पहिल्या क्रमांकावर >> Rofl