प्रकरण १:अमेरिका, अमेरिकन जीवनाच्या प्रेरणा आणि मूल्य व्यवस्था

Submitted by गुंड्या on 26 August, 2020 - 07:41

जर तुम्ही आधीचे लेख न वाचताच ह्या लेखावर आला असाल, तर काही गैरसमज होऊ नये आणि विषयाची/ समस्येची व्याप्ती समजावी म्हणून प्रस्तावनेपासून सुरुवात करावी हि विनंती.
प्रस्तावना: https://www.maayboli.com/node/76257
_________________________________________________________________________

अमेरिका... विकासाचा चर्मबिंदू!!, अमेरिकेतील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कलात्मिक तसेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींचा संपुर्ण जगावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. इतर देश एखाद्या क्षेत्रातील आपला विकास किती झाला आहे हे दर्शवण्यासाठी अमेरिकेच्या प्रमाणाची फूटपट्टी वापरतात. अमेरिकेला सर्दी झाली की जगाला ताप येतो वगैरे म्हणी सहज बोलताना वापरल्या जातात, आणि जागतिक मंदीच्या काळात त्या जाणवतात देखील.

१७७६ साली जन्माला आलेला (स्वातंत्र्याची घोषणा केल्यानंतर) आणि अवघ्या २४५ वर्षातच जागतिक नेतृत्व पदापर्यंत पोचलेल्या ह्या देशामध्ये काहीतरी विलक्षण जादू आहे हे नक्की. नावाप्रमाणेच युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे एक संघराज्य आहे. १७८७ सालच्या पहिल्या डेलावेर राज्यापासून १९५९ साली संघराज्यात विराजमान झालेल्या हवाई बेटांपर्यंतच्या प्रवासातून आधुनिक अमेरिकेच्या सीमा तयार झाल्या आहेत. ह्या प्रवासात काही राज्ये संघराज्यात सामील झाली, काही संघर्षानंतर येऊन मिळाली तर काही राज्यांना चक्क पैसे मोजून "विकत" घेतले गेले आहे; उदा अलास्का.

२४५ वर्षाच्या इतिहासात १७७५ - १७८३ च्या स्वातंत्र्ययुद्धा व्यतिरिक्त १८१२ चे युद्ध, १८३५-३६ चे टेक्सास - मेक्सिको युद्ध, १८४६ - १८४८चे मेक्सिको - अमेरिका युद्ध, १८६१ - १८६५ ची अमेरिकन यादवी, १८९८ - १८९९ चे स्पॅनिश - अमेरिका युद्ध, त्यानंतर २० व्या शतकातील पहिले आणि दुसरे महायुद्ध आणि अलीकडचे आतंकवादाविरुद्धचे अफघाण/इराक - अमेरिका युद्धांचा समावेश मोठ्या युद्धांमध्ये करता येईल. ह्याशिवाय आधुनिक संघराज्याच्या निर्मितीमध्ये विविध राज्यात तात्कालिक कारणावरून चकमकी/युद्ध घडून आलेलीच आहेत.

या व्यतिरिक्त सामाजिक बदलांसाठी झालेल्या चळवळी आणि आंदोलनांची यादीही मोठी आहे. अगदी महिलांच्या मतदानाच्या अधिकारापासून, कायद्याने गुलामगिरी रद्द करण्यासाठी; ज्यातूनच पुढे यादवी युद्ध झाले, तसेच डॉक्टर मार्टिन लुथर किंग यांच्या अहिंसात्मक मार्गाने उभ्या राहिलेल्या नागरी हक्क चळवळींचा उल्लेख करता येईल.

ह्या युद्ध, चळवळी आणि संघर्षांमधून तयार झाली आहे ती अमेरिकन आयडेंटिटी (ओळख). स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची, वेगळेपणाची जाणीव. त्याची नीव आहे; अमेरिकन मूल्य आणि तत्वांमध्ये.

बाहेरून वाटत; तितका सामान्य अमेरिकन माणूस ऐशो-आरामात गादया गिरद्यांवर लोळत (!!) आयुष्य नक्कीच जगत नाही. भारतीयांच्या स्थैर्यांच्या संकल्पनेपेक्षा भांडवलशाही व्यवस्थेमध्ये अमेरिकनांच्या जीवन-पद्धती आणि अपेक्षा खूपच वेगळ्या आहेत. परिस्थितीनुरूप कुठल्याही क्षणी, मांडलेला संसार मोडून/ किंवा उखडून देशाच्या दुसऱ्या कोपर्यात जाऊन परत उभा करण्याची तयारी सामान्य अमेरिकन माणसाकडे नक्कीच असते. अमेरिकन माणसाला नाविन्याची कास आहे. जन्मजातच हाडात मुरलेल्या "individualism" मुळे स्वतःच्या पसंतीच्या-आवडीच्या गोष्टी करण्याकडे त्याचा जास्त कल असतो. उद्योग धंद्यांमध्ये प्रचंड मोठे धोके (रिस्क्स) घेण्याचे धाडस तो दाखवतो, कारण तो जीवनाविषयी आशावादी आहे. अमेरिकन ड्रीम त्याच्या हाडीमाशी मुरलेले आहे.

अमेरिकन संस्कृतीबद्दल कितीही प्रचार, अपप्रचार असले तरी काही गोष्टीचा उल्लेख करणे ह्या लेखमालेच्या संदर्भात गरजेचे आहे. कुटुंब (फॅमिली), वृद्ध, लहान मुले, स्त्रियांच्या बाबतीत झालेली कुठलीही हेळसांड समाज सहन करू शकत नाही.

सामान्यतः अमेरिकन माणसाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, विचार करण्याची पद्धत रचनात्मक, संरचित (structured & methodical), योजनात्मक (planned), संस्थात्मक (organizational) आहे. कुठलेही रचनात्मक काम करताना, संस्थात्मक पातळीवर (systemic) विचार करण्याची प्रवृत्ती जागोजागी, अगदी साध्या साध्या गोष्टीतही दिसून येते. तसेच प्रत्येक गोष्टीचे; सार्वजनिक असो वा खाजगी; प्रमाणीकरण (Standardization) करण्यामागे कलही दिसून येतो. हीच गोष्ट त्यांच्या उद्योग-धंद्यांमध्येही डोकावते.

अमेरिकन माणूस तसा एकदेशीय नक्कीच नसतो, पोटापाण्याच्या नौकरी-व्यवसायाव्यतिरिक्त जीवनाच्या अनेक वेगळ्या क्षेत्रातील गोष्टींमध्ये सहभाग (volunteerism) असतो. म्हणूनच अपारंपारिक (unconventional) अश्या विविध अनवट क्षेत्रांचा विकास इथे झालेला दिसून येतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळे अश्या विविध अनवट क्षेत्राचे उद्योगीकरण तितक्याच झपाट्याने झाले आहे. व्यापाराच्या दृष्टीने व्यवसायाचे विस्तारीकरण आणि उत्पन्नाचे स्रोत वाढविताना सद्यकाळात अनेक व्यवसायांचे जागतिक कॉर्पोरेटायझेशनमध्ये रूपांतर झाले आहे.

नाविन्याची कास धरताना, इथे श्रम/ज्ञान-प्रतिष्ठा आहे. उपयुक्त नावीन्यपुर्ण कल्पना / उत्पादनांना समाजा कडून नक्कीच सकारात्मक प्रतिसाद मिळतो, कारण अमेरिकन समाज एकंदरीतच चोखंदळ आहे. सातत्याने नव-नवीन कल्पना आणि उपयुक्त उत्पादनांची निर्मिती करत राहणे हे आव्हानात्मक काम आहे. म्हणूनच जितक्या वेगात नवीन कंपन्या येतात, उभ्या राहतात, तितक्याच वेगाने त्या लयालाही जातात. ह्यातून कुणाचीही सुटका नाही, अगदी ज्यांना टायकून वगैरे समजले जाते त्यांचाही कालौघात टायटॅनिक झालेला आहे.

स्वातंत्र्यानंतर अमेरिकन आयडेंटिटी (ओळख) तयार करण्याचे महत्वाचे काम अत्यंत सजगपणे केले गेले आहे. त्याचाच परिपाक म्हणून बेसबॉल, बास्केटबॉल, अमेरिकन फुटबॉल सारख्या अमेरिकन खेळांचा विकास झाला. ह्यातील बेसबॉल आणि बास्केटबॉल जगभर पोचले आहेत. अमेरिकन फुटबॉल ह्या खेळामध्ये अमेरिकन मानसिकतेचे प्रतिबिंब पडले आहे. शारिरीक सामर्थ्याबरोबर, बौद्धिक नीती, युक्ती आणि योजनेशिवाय हा सांघिक खेळ खेळणे अशक्य आहे. १०० यार्डच्या मैदानात तुम्हाला चेंडू तुमच्या विभागातून, प्रतिस्पर्ध्याच्या विभागाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचवल्या नंतरच गुण मिळतात. जरी खेळाडू मैदानावर सर्व शक्ती पणाला लावून झुंजत असले तरी (मैदान) पटावरचे डाव कसे टाकावे ह्यावर प्रशिक्षकाच्या रणनीतीचा कस लागत असतो. सर्व शक्तीनिशी प्रत्येक यार्डासाठी झुंजत असताना, प्रतिस्पर्धीही तेव्हढ्याच ताकदीने तुम्हाला थोपवण्याचे (मागे रेटण्याचे) हर प्रकारे उपाय करत असतो. तुम्हाला प्रत्येक पाऊलावर प्रत्येक यार्ड जिंकण्यासाठी स्वतःला सिद्ध करावेच लागते. परंतू गुण फक्त १०० यार्ड पार केल्यावरच मिळतात...!!! कला - क्रीडा - संस्कृती - जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अमेरिकन आयडेंटिटीचे प्रतिबिंब आणि त्याची केलेली जोपासना दिसून येते.

अमेरिकेची स्वातंत्र्य घोषणा, राष्ट्रगीत, अमेरिकेच्या नागरिकत्वाच्या प्रतिज्ञापत्रावरील काही वाक्ये लक्षपुर्वक वाचा; व्यक्ती-स्वातंत्र्य, व्यक्ती-समानतेचा उद्घोष सर्वत्र केलेला दिसून येतो. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आणि समान असून, तिला तिच्या आनंदाचा मार्ग शोधण्याची मुभा देण्याचे आश्वासन हा देश देतो.

Declaration of Independence
All men are created equal, that they are endowed by their creator with certain unalienable rights, that among these are Life, Liberty and the pursuit of happiness.

American Anthem
Land of the free and the home of the brave.

Pledge of Allegiance
One nation under god, indivisible, with liberty and justice for all.

American Belief System
Liberty, Equality and Justice for all
People over government
Individualism
Volunteerism
Mobility
Growth
Patriotism
Progress
Diversity

अमेरिकन समाजमनाची भूमिका जेत्याची आहे, आपले जगातील सर्वोत्तम स्थान राखण्यासाठी जे कष्ट पडतील ते केलेच पाहिजेत, कितीही संकटे आली तरी आपण त्यावर मात करू ह्याचा विश्वास त्यात आहे. "हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् । तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।" ची झलक त्यात नक्कीच आहे.

राष्ट्राच्या मुळ संकल्पना आणि धारणांचे प्रतिबिंब त्याच्या कायदे, न्यायिक प्रणालीमध्ये पडत असते. मुळ संकल्पनांना छेद देणारे कायदे सामाजिक कसौटीवर जास्त काळ टिकू शकत नाहीत आणि म्हणूनच अमेरिकन समाजमनाच्या मूळ संकल्पना आणि धारणा आधी समजून घेणे गरजेचे आहे.

पण अमेरिकन, अमेरिकन म्हणजे तरी काय? कारण भारत किंवा युरोपसारखी हजारो वर्षांची संस्कृती तर ह्या देशाला नाहीये. जे इथले नेटिव्ह!! होते, ते आधुनिक अमेरिकन संस्कृतीत सामावून गेले आहेत.
२४५ वर्षाची कारकीर्द असलेला हा देश आजही समुद्र-मंथनातून जातोय, पुढील काही काळ तरी जात राहील. अमेरिकन म्हणजे नक्की कोण? ह्या प्रश्नाला आजही; इथे सगळेच बाहेरून आलेले आहेत हे उत्तर दिले जाते. मग सगळेच स्थलांतरीत असतील तर नवीन / मागाहून आलेल्यांवर निर्बंध का?

इथे प्रत्येकाला संघर्ष करूनच गोष्टी पदरात पाडून घ्यायला लागतात. कुणीही दान पदरात टाकत नाही. परंतु तुमच्या संघर्षाला कालांतराने मान मिळतो, केलेले श्रम वाया जात नाहीत हे नक्की. हा आशावादच प्रत्येकाला त्याचे अमेरिकन ड्रीम चेस करायला भाग पाडतो..

https://en.wikipedia.org/wiki/List_of_U.S._states_by_date_of_admission_t...
https://www.hasdk12.org/cms/lib3/PA01001366/Centricity/Domain/854/Americ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समस्येची व्याप्ती समजावी म्हणून प्रस्तावनेपासून सुरुवात करावी हि विनंती.
___________________________इथे आधीच्या भागाची लिंक असेल तर बरे.

चर्मबिंदू > परमबिंदू
नवीन Submitted by चिडकू on 26 August, 2020 - 09:12

>>>>कदाचित चरमबिंदू म्हणायचे असेल त्यांना.

गुंड्याभाऊ चांगली सुरुवात. पुढील भागाच्या प्रतीक्षेत

गुंड्या.... मायबोलिवर जे काही निवडक लिखाण वाचनिय व उपयुक्त आहे त्यात या तुमच्या लेखाचा नंबर नक्कीच खुप वरचा लागेल. ज्या पद्धतीने तुम्ही प्रस्तावना व पहिला भाग लिहीला आहे त्यावरुन तुमचा हा संपुर्ण लेख तुम्ही नीट अभ्यास करुन व विचारपुर्वक लिहीत आहात व लिहाल याचा मला विश्वास वाटतो.. माझे असे स्पष्ट मत आहे की जर कोणी अमेरिकेत यायचा निर्णय घेतला तर तुम्ही जसा अमेरिकेच्या इतिहासाचा ,अमेरिकन समाजाच्या जडणघडणीचा , मुल्यांचा , खेळांचा सखोल अभ्यास केला आहे तसा अभ्यास प्रत्येकाने केला पाहीजे.

पुढील भागाची उत्सुकतेने वाट बघत आहे.

( अमेरिकेच्या इतिहासाबद्दल जे तुम्ही संक्षिप्तपणे लिहीले आहे ते छान सार आहे.. फक्त अमेरिकेने भाग घेतलेल्या युद्धात तुम्ही व्हिएतनाम युद्ध नमुद करायला विसरलात. त्या युद्धाचे परिणाम अमेरिकेच्या समाजात आजही तुम्हाला बघायला मिळतील. व्हिएतनाम युद्धच् नव्हे तर आमेरिकेने अनुभवलेल्या व भाग घेतलेल्या प्रत्येक युद्धाचे अमेरिकन माणसांच्या मानसीक जडणघडणीवर व एकंदरीत त्यांच्या समाजावर फार मोठे व दुरगामी परिणाम झालेले आहेत. असो. )

तुमच्या लेखाचा हा पहिला भाग वाचुन एकंदरीत आम्हा वाचकांना एक इंटलेक्च्युअल मेजवानी मिळणार असे दिसत आहे.

मुकुंद, +१ व्हिएतनाम युद्ध, कोरिया युद्ध आणि शिवाय रशिया बरोबरचे शीतयुद्ध याचा उल्लेख हवा होता. Cold War shaped the modern American dream in many ways.
अमेरिकन माणूस तसा एकदेशीय नक्कीच नसतो >> एकरेषीय म्हणायचे आहे का?

जे इथले नेटिव्ह!! होते, ते आधुनिक अमेरिकन संस्कृतीत सामावून गेले आहेत. >> हे विधान साफ चुकीचे आहे. युरोपीयन लोकांच्या आगमनानंतर अमेरिकेतील अनेक स्थानिक वंश संपूर्ण लयाला गेले. आता जे शिल्लक आहेत ते फार थोडे लोक आहेत. It was a cruel massacre and the diseases brought in by the Europeans that led to the extermination of these native civilizations. The natives had zero immunity and had no weapons to fight against the European weapons and ammunition.

>>इथे प्रत्येकाला संघर्ष करूनच गोष्टी पदरात पाडून घ्यायला लागतात. कुणीही दान पदरात टाकत नाही.<< +१
अमेरिका इझंट इझी, हे अँड्र्यु शेफर्डचं कोट वेगळ्या कांटेक्स्ट मधे असलं तरी ते युनिवर्सल ट्रुथ आहे. याबाबतीत कोणाचं हि दुमत नसावं... Wink

गुंड्याभाऊ, या मालिकेची थीम इमिग्रेशन बेस्ड आहे असं प्रस्तावनेवरुन वाटतंय. या विषयावर इथे बरंच चर्वितचर्वण झालेलं असुनहि काहि नविन मुद्दे येतील अशी आशा करतो...

U.S.is country of opportunity. It was a great country in the past but not anymore. It has reached to its saturation stage and their country politics level has reached to bottom.

जे इथले नेटिव्ह!! होते, ते आधुनिक अमेरिकन संस्कृतीत सामावून गेले आहेत.
>>
हे काही खरे नाही. आजही बहुसंख्य नेटिव्ह अमेरिकन हे त्यांच्या रिजर्वेशनवर राहतात. त्यांच्या तिथल्या समस्या, शिक्षणाचा अभाव, उच्चशिक्षणसंस्थांतून असलेले त्यांचे नगण्य विद्यार्थी, वगौरे पाहता ते आधुनिक पाश्चात्य अमेरिकन संस्कृतीत सामावून गेले आहेत असे म्हणणे फारच धाडसी ठरेल.

जिज्ञासा.. हो बरोबर आहे.. कोरियन युद्ध व रशिया बरोबरचे “ शितयुद्ध‘ नमुद केले पाहीजे. ( बाय द वे.. जिज्ञासा...तुझे लेखन वाचतानाही एक इंटेलेक्च्युअल आनंद मिळतो)

पण गुंड्याच काय.. अमेरिकेतले बहुतेक सगळे.. कोरियन युद्धाला “ फरगॉटन वॉर“ असेच संबोधतात.. कारण ते युद्ध दुसरे महायुद्ध व व्हिएतनाम युद्ध या दरम्यानच्या काळात सँड्विच झाले होते.. व त्या २ मोठ्ठ्या युद्धाच्या तुलनेत कोरियन युद्धाचे दुरगामी सामाजीक व जागतीक परिणाम लोकांच्या आठ्वणीत जास्त काळ घर करुन राहीले नाहीत.

वास्तविक पाहता... कोरिअन युद्ध, रशिया विरुद्धचे शितयुद्ध व व्हिएतनाम युद्ध हे एकाच माळेचे ३ मणी म्हटले तरी वावगे ठरु नये. या तिनही युद्धाचे मुळ कारण होते.... ते म्हणजे दुसर्‍या महायुद्धानंतर झालेला रशिया व चायना या दोन कम्युनिस्ट विचारसरणी असलेल्या देशांचा उदय! ती कम्युनिस्ट विचासरणी अमेरिकेच्या भांडवशाही तत्वांना थेट काटशह देणारी अमेरिकेला वाटत होती (व आहे). ती कम्युनिस्ट विचारसरणी जास्त देशात फोफावण्याची त्या २ देशांची आकांक्षा अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशाला सलु लागली होती . मग त्या कम्युनिझमचा प्रसार जास्त देशात फैलु नये यासाठी १९४५ पासुन अमेरिकने जे कमुनिस्टविरोधी धोरण राबवले ( व राबवत आहेत) ..हेच या तिनही युद्धाच्या मागचे कारण होते.

जिज्ञासा, टवणे सर.. तुम्ही नेटिव्ह अमेरिकन्स नविन अमेरिकेत ते सामावुन गेले या विधानाला आक्षेप का घेत आहेत हे मी समजु शकतो.. जिज्ञासा तु दिलेली.. त्यांची कत्तल व युरोपिअन्सनी आणलेले देवी, कांदण्या व फ्ल्यु हे विषाणुजन्य रोग व त्या रोगांना नसलेली नेटिव्ह लोकांची प्रतिकरशक्ती... ही २ कारणे अगदी बरोब्बर आहेत. त्या २ कारणांनी..१४९२ नंतरच्या पहिल्या २०० वर्षाच्या आतच.. जवळजवळ.. ९०% मुळचे( इंडेजिनिअस) नेटिव्ह अमेरिकन्स मरुन गेले. जे काही उरले सुरले नेटिव्ह होते ते बहुतेक आंतरजातिय विवाहाने समाजात सामावुन गेले व अगदी थोडे “ नेटिव्ह अमेरिकन्स“..आजही “इंडियन रिझरव्हेशन्स “ वर दारुच्या आहारी जाउन जिवन जगत आहेत. त्यातल्या बर्‍याच जणांचा उपयोग मग आधुनिक अमेरिकन लोकांनी स्वत:चा फायदा करुन घेत गॅम्बलींग इण्डस्ट्री अमेरिकेत उदयास आणली.

असो.. गुंड्या यांनी ज्या विषयाला हात घातला आहे.. तो विषय नीट समजावा म्हणुन त्यांनी खुप सार्‍या मुद्द्यांना हात लावला आहे. त्या प्रत्येक मुद्द्याचे जर आपण इथे चर्वीचरण केले तर ते हा लेख कधीच पुर्ण करु शकणार नाहीत... Happy

मृणाली समद... तुम्ही प्रत्यक्ष अमेरिकेत किती वर्षे राहात आहात? तुमचे विधान एखादी पिंक टाकल्यासारखे वाटते. तुमच्या विधानाला जर तुम्ही काही अभ्यासपुर्वक उदाहरणे देउन पुष्टी दिलीत तर तुमचे विधान समजायला मदत होइल.

गुंड्या.. माफ करा... तुमच्या लिखाणात व्यत्यय आणला असेल तर.. तुमच्या लेखाचे पुढचे भाग वाचायला मी तरी उत्सुक आहे.

लेखमालेबद्दल उत्सुकता आहे. वाचते आहे.
कुटुंब (फॅमिली), वृद्ध, लहान मुले, स्त्रियांच्या बाबतीत झालेली कुठलीही हेळसांड समाज सहन करू शकत नाही - हे अमेरिकन समाजाबद्दल लिहीले आहे का? आधीच्या वाक्याच्या अनुषंगाने हो असे वाटते. पण अधिक उहापोह हवा होता. अमेरिकेतील अत्यल्प मातृत्त्वाची रजा, जगातील सर्वाधिक घटस्फोटांचे प्रमाण, सातत्याने ढासळणारा प्राथमिक शिक्षणाचा दर्जा इ लक्षात घेता हेळसांड कशी होत नाही हे वाचायला आवडले असते.

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद..प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे मी जो विषय मांडणार आहे तो राजकारण, इतिहास, अर्थकारण बऱ्याच गोष्टींना स्पर्श करतो, परंतू ते विषय गरजेपुरतेच, विषयाच्या (मूळ समस्येच्या) संदर्भापुरतेच घेण्याचा विचार आहे. मुळ विषयाला हात घालण्याआधी पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे, पहिली काही प्रकरणे पार्श्वभूमी ह्या सदरात मोडतील. तरी ह्या प्रकरणांमधून मूळ विषयाला उपयुक्त होतील असे, आणि एवढेच संदर्भ घेतले आहेत.

परंतू प्रतिक्रियांमधून, नवंनवीन माहिती मिळते आहे, त्यामुळे त्या देण्याचे थांबवू नका.

15-20 वर्षांपूर्वी अमेरिकेत जाणे बहुतेकांचे स्वप्न होते.
It's a opportunity land in those days now there are so many restrictions to work there and getting a green card is a myth. Why it has happened?
The country is under fear because they outsourced manufacturering and services jobs to other countries, now they are facing dominance from those countries, they want to take back manufacturering .
After TWC collapse, normal american citizens mind is filled with fear, politicians had used that fear to criticize other countries to gain their political power.now america is talking about to build walls at borders and quarlling with other countries (Russia,china,Iraq) and restricting workforce to other countries . What that means, it's a combination of fear,low opportunites. How it can be a great country in today's context??
One more recent example-
why they are having maximum no. Of corona deathes for 40 corore population? Why they are blaming china and WHO?Why they can't controlled?
I didn't work in america but I have keen interest in geopolitical and economical studies.

फक्त तिकडच्या स्थायिक लोकांकडूनच चर्चा अपेक्षित असेल ना?

ओह , असं आहे का??
वर तसं mention केले असते तर कळलं असतं ना.

मृणाली.. गैरसमज नसावा.. तुम्ही मांडलेले मुद्दे रास्त आहेत. पण त्याचा उहापोह करण्याआधी आपण गुंड्या यांची ही लेखमाला पुर्ण वाचु. कदाचित तुमच्या प्रश्नांची उत्तरे या लेखमालेत सापडु शकतील.

मी तुम्ही इथे किती वर्षे राहीलात असे याकरता विचारले की मला असे वाटते की कुठल्याही देशात काही काळ स्वतः तिथे राहील्यावर, तिथले दैनंदिन जिवन जगल्यावर, तिथल्या समाजात प्रत्यक्ष वावर केल्यावर, तिथे काम केल्यावर, तिथल्या लोकांशी रोज इंटरॅक्ट केल्यावर आपल्याला.. त्या देशाची सामाजीक घडी ओळखायला, त्यांची मानसीक जडणघडण ओळखायला व त्या देशाच्या समस्या ... सामाजीक म्हणा की वैयक्तिक म्हणा की राजकारणातल्या म्हणा... त्या का उदभवल्या याचे कारण समजायला मदत होते. नुसत्या ऐकिव व वाचलेल्या माहीतीवरुन एखाद्या देशाचे व त्या देशाच्या समाजाचे, त्यांच्या समस्यांचे एक वेगळे ( डिस्टॉर्टेड म्हटले तरी चालेल) चित्र उभे राहु शकते.. कारण तुम्ही त्या समस्यांकडे बघताना त्या समाजाच्या फ्रेम ऑफ रेफरंसच्या बाहेर् असता. असो.

तुम्ही मांडलेल्या प्रश्नांची उत्तरे माझ्या अल्पमतीप्रमाणे मला माहीत आहेत पण ती मी आत्ताच इथे देत नाही. मी वर म्हटल्याप्रमाणे गुंड्या यांना त्यांची ही अभ्यासपुर्ण लेखमाला लिहुन संपवु देउयात. मग त्यात जर त्याची उत्तरे नाही मिळाली तर आपण त्याची चर्चा जरुर करु.

सीमंतिनी यांचे प्रश्नही रास्त आहेत. त्याची उत्तरे शोधताना अमेरिकन समाजाचा अजुन एक वेगळाच पँडोराज बॉक्स उघडला जाइल. मला असे वाटते की गुंड्या यांना( त्यांच्या लेखमालेच्या शिर्षकावरुन) ते प्रश्न त्यांच्या या लेखमालेत उद्ध्रुत करायचे नसतील. वर ते म्हणालेसुद्धा की काही विषयांचा ते ओझरताच उल्लेख करणार आहेत. खुद्द गुंड्याच यावर जास्त भाष्य करु शकतील.

प्रकरण १:अमेरिका, अमेरिकन जीवनाच्या प्रेरणा आणि मूल्य व्यवस्था
https://www.maayboli.com/node/76269

प्रकरण २: अमेरिका स्थलांतरितांचा/स्थल-आंतरितांचा देश?
https://www.maayboli.com/node/76288

प्रकरण ३: भारतीयांचें अमेरिकेतील स्थलांतरण: एक दृष्टिक्षेप
https://www.maayboli.com/node/76299

अमेरिकेत खूप खूप वर्षांपासून आहे. त्यामुळे हे सगळे विचार मनात येऊन गेले आहेत. लेखमाला नीट वाचणार आहे. यात भयावह असे इन्शुरन्स चे राजकारण येणार आहे का. अमेरिकन लोकांचे मत नक्की माहिती नाही पण इमिग्रंट म्हणून थोडे सांगता येईल. या सर्वाशीच संबंधित एक जबरदस्त youtube documentary पाहिली होती. पाच सहा सभ्य गुंडांनी कसे banks सुरू केल्या मग काय काय झाले. Thrive documentary ..ज्यांना आवड असेल त्यांनी बघाच such an eye opener !! It is too much to take at one shot though .

https://youtu.be/lEV5AFFcZ-s

So far एवढे लक्षात आले आहे की पोटपाणी , घरे (जी तीस वर्षे तुमची होत नाहीत ) वैद्यकीय खर्च , college education यासाठी बहुतांश लोकांचा कस लागतो , सगळे एवढे inflated आहे की मिळवणी होता होत नाही. आणि जन्मभर कस लागतो. त्यात तुम्ही अपंग , आजारी किंवा वयस्कर असाल तर संपलच. तुम्हाला रोज रोज कमावण्याचा भयंकर ताण असतो. Majority people have no back up. It is sad, that they don't care about their own people when they need support Sad ! Immigrants have to accept this culture and move forward with this society too, and they have additional pressure about surviving Visas and all. We can only decide for ourselves that we are not gonna let maybe GeenCard run our life !!

धन्यवाद गुंड्याभाऊ.
चि.वि. जोशी यांची चहाती असल्याने कंट्रोल झाले नाही. Happy

>>फक्त तिकडच्या स्थायिक लोकांकडूनच चर्चा अपेक्षित असेल ना?
ओह , असं आहे का??<<
तसं नाहि. शेवटि फ्रीड्म ऑफ स्पीच हा अमेरिकन लोकशाहिचा गाभा आहे. तुमची मतं, झालेले समज इ. बिन्धास्त मांडा, वर मुकुंद म्हणाला तसं इथले जाणकार एकेक शंका/मुद्दे यांचं निरसन करतील. तसंहि अमेरिका म्हणजे युटोपिया नाहि याची क्ल्पना सर्वांना आहे...

>>फक्त तिकडच्या स्थायिक लोकांकडूनच चर्चा अपेक्षित असेल ना?
ओह , असं आहे का??<< >>>
असं काही नाही. आणि लिहीणार्‍याने म्हंटले तरी माबोकरांनी ते मानायलाच हवे असे नाही Wink तुम्ही ट्रोलिंग करत नसाल, बळंच भलतेच मुद्दे आणून भरकटवत नसाल तर कोणीही लिहायला काही प्रॉब्लेम नाही.

इण्टरेस्टिंग लेखमाला आहे. वाचतोय.

मला अमेरिकेतील changing demographics बद्दल जाणकारांकडून समजून घ्यायला आवडेल.
ऑलरेडी 18 वर्षांखालील मुलांत गोरे लोक अल्पसंख्य आहेत. अजून एक 15-20 वर्षात गोरे लोक 50 % हून कमी कमी होत जाणार, त्यातही 40 वया च्या खाली minority 5-7 वर्षातच होणार अशी प्रोजेक्शन्स वाचली आहेत.
Hispanics हा आफ्रिकन अमेरिकन्सपेक्षा मोठा ग्रुप होणार(ऑलरेडी झालाय बहुधा). अरब, पाकिस्तानी, चिनी ,भारतीय यांचाही टक्का लक्षणीय वाढणार.

तर यामुळे अमेरिका कशी बदलेल? ऑलरेडी California, new Jersey तील काही भाग इथे हे बदललेले racial breakup दिसते. RNC मध्ये California ला नाक मुरडली जातात, आम्ही सगळ्या देशाचा कॅलिफोर्निया होऊ देणार नाही असं म्हटलं जातं त्यामागे हे कारण आहे का?

छान विषय आणि मांडणी आहे. लेखावर प्रतिक्रिया पण आवडल्यात.

<< जे इथले नेटिव्ह!! होते, ते आधुनिक अमेरिकन संस्कृतीत सामावून गेले आहेत. >>
----- जिज्ञासा यांनी वर कारणे लिहीले आहेच त्या कारणांसाठी असहमत.

वा, वा छान लेख. अमेरिका किती छान.
"So far एवढे लक्षात आले आहे की पोटपाणी , घरे (जी तीस वर्षे तुमची होत नाहीत ) वैद्यकीय खर्च , college education यासाठी बहुतांश लोकांचा कस लागतो , सगळे एवढे inflated आहे की मिळवणी होता होत नाही. "
हे खरे आहे, पण कष्ट करायची तयारी असल्याने बिचारे मरत असतात, पण जीवनाचा आनंद लुटणे कमी नाही. नको तितके जास्त पैसे कर्जाऊ मिळतात.
दुसरी गोष्ट मी पाहिली की यांना कुठलेहि काम करण्यात कमीपणा वाटत नाही. नोकर माणसे फक्त अति श्रीमंत लोकांना परवडतात. स्वतःची कामे स्वतःच करण्यात लाज तर नाहीच उलट अभिमान वाटतो. माझी गाडी मी दुरुस्त करीन! कित्येकदा लोक सहज बोलून जातात - मी वीकेंड ला घरात नवीन खोली बांधली, स्वैपाकघराची फरशी उचकटून नविन बसवली - नि हे सगळे स्वतः करणारे कोण तर आमच्या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट, डायरेक्टर वगैरे. उगाच नोकरीत हाताखाली असलेल्या माणसांकडून फुकटात काम करून घेणे नाही.
तसेच बहुधा सर्व मुला मुलामुलींना कधी एकदा १८ वर्षाचे होऊन घराबाहेर पडतो असे झाले असते. आईवडिलांकडे जास्त पैसे नसतील तर खुश्शाल कुठेतरी झाडू मारायचे काम सुद्धा करतील, पण आपले पैसे आपण मिळवतील. यामुळे स्वतःची अशी त्यांची मते असतात. उगाच ३६ वय झाल्यावर, १० वर्षे नोकरी झाल्यावर, दोन पोरांचा बाप झाल्यावर, बापाला, काकाला विचारत बसत नाही की मी दुसरी नोकरी मिळते आहे ती घेऊ का? नि बाप नि काका सुद्धा नसते सल्ले देण्याच्या भानगडीत पडत नाहीत!
त्यामुळे उगाच कोण काय काम करतो, किती पैसे मिळवतो, हे असले प्रश्न अगदी स्वतःच्या नातेवाईकांना सुद्धा विचारणे चांगले समजत नाहीत,
या उलट गंमत म्हणजे जेंव्हा जेंव्हा भारतीय पूर्वी इथे येत असत ते पहिल्यांदा विचारत तुम्हाला पगार किती, अमक्या तमक्याला किती, त्याला कमी/जास्त का?