चोरी

Submitted by पराग र. लोणकर on 15 August, 2020 - 02:49

चोरी

सगळं आटपून पिया अंथरुणावर टेकली तोच दारावरची बेल वाजली. पियानं घड्याळ बघितलं. रात्रीचे साडे-दहा झाले होते. `इतक्या रात्री कोण कडमडलय?` या विचाराने आणि थोड्याश्या भीतीनं पियानं मुख्य दरवाजाकडे धाव घेतली. दरवाजाबाहेर कोण आलंय ते बघण्यासाठी असलेल्या गोलातून तिनं बाहेर पाहिलं आणि ती गर्भगळीतच झाली.

दाराबाहेर राघव उभा होता. राघव तिचा नवरा. तोच राघव; ज्यास मृत्यूनंतरचा अग्नी देऊ पंधरवडाच झाला होता.

`पियू, दार उघड न लवकर...` राघव बाहेरून घाई करत होता.

प्रचंड घाबरलेली असूनही पियू भानावर आली. तिचा भुताखेतांवर विश्वास नव्हता. आलेली व्यक्ती राघवच आहे हे तिच्या लक्षात आलं. तिनं दार उघडलं.

`र... र... राघव...`

राघवनं आत येताच तिला मिठीत घेतलं. तिनं चटकन त्याला हलकेच थोडंसं दूर ढकललं. त्याचा अवतार बघून ती थक्कच झाली. जागोजागी फाटलेले कपडे, जखमांवर लावलेल्या पट्ट्या...

`राघव, काय हे सारं...?`

`सांगतो, सगळं सांगतो. मला आधी पाणी तर देशील?`

राघव तिथेच सोफ्यावर बसण्याच्या तयारीत असतानाच पियानं त्याच्या हाताला धरून त्याला त्यांच्या बेडरूममध्ये नेलं. बेडवर बसवलं. पाणी दिलं.

`हं बोल आता.`

`पियू, प्रथम मला माफ कर. माझ्या सगळ्या चुका दुरुस्त करायला मी तयार आहे. गेल्या काही दिवसात मी जे जे अनुभवलंय त्यानं मी पार बदलून गेलोय. आता मी तुला भरपूर वेळ देणार आहे. माझं पिणंही कमी करणार आहे. सौरभ, सुश्मितालाही आपण होस्टेलवरून घेऊन येऊ. नवीन जीवनाची सुरुवात करूया आपण सारे.`

राघव बोलत सुटला होता. त्यानं जे काही सांगितलं ते थोडक्यात असं होतं.

ऑफिसच्या कामासाठी पंधरा-वीस दिवसापूर्वी तो मुंबईला गेला होता. दोन दिवसातच काम आटपून तो रात्रीच एखाद्या taxiने पुण्यास येण्यासाठी स्टेशनवर निघाला होता. मध्यरात्रीच्या त्या वेळेत, सुनसान गल्लीत अचानक दोन व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला केला होता. त्यांनी त्याचे घड्याळ, अंगठ्या वगैरे सगळे लुटून घेतले. त्यांच्या बोलण्यावरून त्यांनी नुकताच काहीतरी उपद्व्याप करून ठेवला होता आणि त्यांना आता मुंबईतून फरार व्हायचे होते. त्यांना कोणताही पुरावा राहावयास नको असल्याने मारून टाकण्याच्या दृष्टीनेच त्यांनी राघवला जीवघेणी मारहाण केली होती. राघव प्रचंड जखमी होऊन निपचित पडल्यावर, तो मेलाय असं वाटून त्यांनी त्याची bag उघडली. त्यांना बदलावयास कपडे हवे होते. Bag मध्ये त्यांना कपड्यांचा एकच जोड मिळाला. मग त्यांनी राघवच्या अंगावरचे कपडेही उतरवले. मग ते कपडे एकाने घातले, आणि bag मधील कपडे दुसऱ्यानं घातले. आपापसात बोलताना त्यातील एक मध्यप्रदेशात पळण्याच्या तयारीत असल्याचे तर दुसरा पुण्याजवळील एका खेड्यात घर असल्याने पुण्याकडे पळण्याच्या तयारीत असल्याचंही राघवच्या कानावर पडलं.

दोघे पळून गेले आणि राघवची शुद्ध हरपली.

राघवला जाग आली ती थेट पाच-एक दिवसानी, सरकारी इस्पितळात! डोक्यावरही बराच मार लागल्यानं पुढील आठवडाभर त्याला आपण कोण आहोत, याचेही संपूर्ण विस्मरण झाले होते. या दिवसात त्यानं त्या general ward मध्ये विविध प्रकारचे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, लोकांची करूण अवस्था, विविध लोकांच्या विविध प्रकारच्या मनोवृत्ती हे सारं पाहिलं आणि आजच सकाळी त्याला आपलं सारं जीवन आठवलं. त्याच बरोबर आपल्या जीवनाचं महत्व, आपण केलेल्या चुकांचा पश्चाताप अश्या सगळ्या गोष्टीनी त्याच्या मनात थैमान घातलं. त्या सरकारी इस्पितळातील general ward मधील सगळ्या गोंधळातून गुपचूप पळून जाणं त्याला शक्य वाटलं. तो तिथून निसटला आणि मिळेल त्या रेल्वेनं पुण्यात पोहोचला. Without ticket!

पियाच्या चाणाक्ष बुद्धीने. झालेला प्रकार तिच्या लक्षात आला. ज्या चोराला पुण्याकडे पळायचे होते त्याने राघवचे कपडे, घड्याळ, अंगठ्या, पाकीट असं सगळं घालून पुण्याकडे पोबारा केला होता आणि रेल्वेने येत असताना दरवाजातून पडून त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी ओळखपत्र वगैरे पाहून आपल्याला कळवलं आणि आपण धावत गेलो. Bodyचा चेहरा चेंदामेंदा झाल्याने ओळखण्यासारखा नव्हताच. शरीरयष्टी राघवच्याच जवळपास होती. कोणत्याही शंकेला वाव नव्हताच. पुढील सारे सोपस्कार करून body ताब्यात घेऊन पुढील विधी पूर्ण केले.

पियानं ह्या साऱ्या गोष्टी राघवला सांगितल्या. राघव पुन्हा पुन्हा त्याच्या गेल्या काही वर्षांतील चुका मान्य करून नवीन जीवन सुरु करण्याविषयी पियाला आश्वस्त करत होता. दहा वर्षांपूर्वी love marriage केल्यानंतर पाचएक वर्षानंतर राघवनं खूप घोडचुका केल्या होत्या. पण आता तो खरंच जागा झाला होता. अगदी मनापासून पियाची माफी मागत होता.

`राघव, तू आता आधी स्वच्छ आणि मनसोक्त आंघोळ कर बरं. तुला खूप फ्रेश वाटेल.` तिनं लगेच उठून त्याचे कपडे, टॉवेल वगैरे काढून बेडवर ठेवले, आणि त्याला हाताला धरून बेडरूममधल्याच बाथरूममध्ये अगदी पोचवून आली.

पंधरा मिनिटातच राघव अंघोळ करून बाहेर आला. अंग पुसले, कपडे घातले आणि पियाला म्हणाला,

`पिया, काही खायला आहे का ग? खूप भूक लागलीये.`

`चल देते तुला खायला. पराठे केले होते. मला सकाळी परत breakfastला मिळावेत म्हणून दोन जास्तच केले होते. ते देते तुला.`

पिया त्याला घेऊन बाहेर hallच्या कोपऱ्यात असलेल्या dining tableपाशी आली. तो खुर्चीवर बसणार इतक्यात वरच्या बेडरूममधून काहीतरी खूडखुड ऐकू आली. अगदी स्पष्ट.

`पिया, वरच्या खोलीत कुणीतरी आलं असणार. बहुदा चोर असावा.` राघव हलक्याच आवाजात म्हणाला.

`नक्कीच! पण आता काय करायचं?`

`घाबरू नकोस. माझं त्या drawerमधलं पिस्तुल दे. मी बघतो वर जाऊन.`

`अरे पण त्या चोराकडेही हत्यार असलं तर? तू आज मला नव्याने परत मिळाला आहेस. मला तुला पुन्हा गमवायचं नाहीये.`

`हे बघ, काळजी करू नकोस. माझ्याकडे आहे ते पिस्तुल licensed आहे. अश्या प्रसंगी मी ते स्वसंरक्षणासाठी वापरू शकतोच. वरती खरंच चोर आहे हे दिसलं, तर मी त्याला वेळही न देता माझं पिस्तुल चालवेन.`

राघव हलकेच वर गेला. बंगल्यात जीना आतून होता आणि वरच्या राघवच्या स्वतंत्र बेडरूममधून आवाज येत होता. राघव वर पोहोचला. त्यानं हलकेच त्याच्या खोलीचं दार सरकवलं. समोर त्याच्या wardrobeचा दरवाजा उघडलेला होता. बिछान्यावर त्याचे कपडे, त्याच्या आईचे काही दागिने अस्ताव्यस्त पडले होते आणि एक व्यक्ती बनियन आणि रेघा-रेघांच्या हाफ चड्डीवर त्याच्या कपाटात शोधाशोध करत होती.

`काय चाललंय रे?` राघवनं दरडावून विचारताच समोरच्या व्यक्तीनं राघवकडे पाहिलं आणि ती दचकलीच. तिनं वेगानं आपला हात बिछान्याकडे नेला. चोर आपले हत्यार उचलण्यास जात असल्याचं पाहून राघवनं पाठीमागे धरलेली आपली बंदूक सरळ केली आणि `रुस्तम` चित्रपटात पाहिल्याप्रमाणे एका मागून एक गोळ्या त्याच्यावर झाडल्या. यातून तो चोर वाचणं शक्यच नव्हतं.

गोळ्यांचा आवाज ऐकून पिया वर आली. राघवनं तो चोर ज्या जागेकडे हात करत होता तेथे चाचपणी केली. तिथं कोणतंच हत्यार नव्हतं. तो चोर फक्त त्याची pant घ्यायला हात पुढे करत होता.

`पिया, खलास केला चोराला. चल, खाली चल. पोलिसांना फोन करावा लागेल.`

`तू करतोस फोन? मी इथेच थांबते.`

पियाचे हे धाडसी बोल ऐकून राघवला आश्चर्यच वाटलं. तरी तो फोन करण्यास खाली निघून गेला.

पिया हलकेच पुढे झाली. तिनं त्या चोराकडे जवळून पाहिलं.

अंकुश नक्की मरण पावल्याची तिनं खात्री केली.

अंकुश- ती ज्या जिमला जात होती त्याचा तो instructor. गेल्या काही वर्षांपासून राघवशी तिचे संबंध असून नसल्यासारखेच होते. तिला जे हवं होतं ते आता ती अंकुशकडून मिळवत होती. राघव दौऱ्यावर गेला की अंकुशला बोलवत होती. एरवी अंकुश तसा फाटकाच. पण पियाला त्याच्याकडून जे हवं होतं ते त्याच्याकडे भरपूर होतं. त्यालाही सोप्या मार्गाने पैसा कमावण्याचा पिया हा मार्ग मिळाला होता. दोघांचेही काम होत होते.

अंकुश झोपायला मात्र राघवच्या बेडरूममध्ये जात असे. तेथले ते टेरेसचे दार उघडून त्या अलिशान बेडरूममध्ये झोपायला अंकुशला आवडत असे.

तसा आज तो तेथे झोपला होता आणि खाली राघव परत आला होता.

राघवला आंघोळीला पाठवल्यावर पियाची बुद्धी वेगाने चालू लागली. तिचा फायदा कशात आहे याचा तिचा विचार चालू होता. पोलीस रेकॉर्ड नुसार राघव मेलेलाच होता. राघवची पिस्तुल अंकुशच्या हातात देऊन त्याला राघवला मारायला सांगणे तिला शक्य होते. बंगल्याच्याच आवारात प्रेत पुरणेही सहज शक्य होते. पण राघव आता बदलला होता. तो पियाचे एकेकाळचे प्रेम होता. आता पुन्हा संसार नव्याने सुरु करण्यास तो उत्सुक होता. आर्थिक बाबीचा विचार केला तरी अंकुशकडून काहीच मिळणार नव्हते. उलट त्यालाच संपूर्ण जीवन पोसावे लागणार होते.

पियाचा निर्णय झाला. ती तडक वरच्या बेडरूममध्ये गेली. तिनं अंकुशला म्हटलं,

`अंकुश, माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. राघवचे death certificate यायला अजून काही दिवस लागणार आहेत. तोपर्यंत त्याच्या खात्यातील रक्कम मला काढता येणार नाहीये. माझ्याकडे माझे असे फारसे पैसे नाहीयेत. राघवच्या कपाटात काही रोख रक्कम आणि त्याच्या आईचे दागिने आहेत. किल्ली माझ्याकडे नाही, पण तू हे कपाट सहज तोडू शकतोस. हे तोडून तू जरा शोधतोस का काय काय मिळते आहे ते?`

रोख पैशाचा आणि दागिन्यांचा उल्लेख ऐकून अंकुशचे डोळे लकाकले. ते तसे लकाकतील याची पियाला कल्पना होतीच. त्याच्यावर ते काम सोपवून पिया खाली निघून आली.

काही वेळातच पुढील सगळ्या घटना घडल्या.

पिया अजूनही तिथेच उभी होती. इतक्यात राघव वर आला.

`केला फोन पोलिसांना. पोचतीलच दहा-एक मिनिटांत.` राघव तिला म्हणाला. `पण मला एक कळत नाहीये, हा चोर चोरी करताना आपले कपडे का काढून बसला होता?` राघवनं पियाला अचानक विचारलं.

या गोष्टीचं आपल्यालाही राघवइतकंच आश्चर्य वाटतंय हे दाखवायला पियाला आपलं सगळं अभिनयकौशल्य पणाला लावावं लागलं.

***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे देवा.. ईथेही जिम ईन्स्ट्रक्टर ..
पण मस्त आहे कथा.. आवडली
थोडक्यात बरेच संदर्भ देत चित्र उभे करता तुम्ही

मस्त