`ती` लेखणी

Submitted by पराग र. लोणकर on 10 August, 2020 - 09:28

`ती` लेखणी

साडेअकरा-बाराची वेळ. रात्रीचा नुकताच डोळा लागला असेल नसेल आणि मोबाईलची रिंग वाजली. आमच्या क्षेत्रात वेळी-अवेळी, दिवस-रात्र न पाहता फोन येणे ही तशी नेहमीचीच गोष्ट. त्यामुळे त्याची सवय झालेली.

फोन उचलला. समोरून आवाज आला, ``पक्या सिरीयस आहे. तुला बोलवतोय. ताबडतोब सिटी हॉस्पिटलला ये.``

बातमी ऐकताच ताडकन उठलो. झपाझप आवरलं आणि गाडी काढली. ड्रायव्हरची कामाची वेळ संपलेली असल्यामुळे गाडी स्वतः चालवत पंधरा-वीस मिनिटात सिटी हॉस्पिटलला पोचलो. मला आलेलं पाहून तिथं उभ्या असलेल्यांपैकी माझ्या ओळखीची मंडळी समोर आली आणि त्यातील एक-दोन जण मला आयसीयूमध्ये घेऊन गेले.

आय. सी. यु.च्या स्पेशल रूममध्ये प्रकाश; म्हणजे खरं तर प्रकाशचा देह आडवा पडलेला मला दिसला. सर्व शरीर जखमांनी भरलेले होते. परिस्थिती बिकट होती. तरीही, मी त्याच्या हातावर हात ठेवताच त्याने डोळे उघडले. अतिशय चिंताजनक प्रकृती असली तरी तो बोलू शकत होता. तो मला म्हणाला, ``बरं झाला आलास. माझं महत्त्वाचं काम होतं. जरा माझ्या बॅगेची चेन उघड.``

मी लगोलग ते काम केलं.

``त्यातलं माझं golden पेन बाहेर काढ.``

मी तेही लगेच केलं.

``आता इथून बाहेर पडलास की तोडून मोडून ते पेन नष्ट कर. कुणाच्याही हातात लागायला नको.``

आता मात्र मला बोलल्याशिवाय राहवलं नाही.

``प्रकाश, काय हे सगळं?``

``सांगतो, सगळं सांगतो. आता सांगायलाच पाहिजे. मी काही आता जगणार नाही याची मला कल्पना आलेली आहे. खरं तर तसं मीच लिहिलेलं आहे.``

``म्हणजे..?``

``आजच्या माझ्या या सगळ्या परिस्थितीस ही लेखणीच जबाबदार आहे. अगदी गेल्या काही वर्षांत मी मिळवलेल्या अफाट यशापासून ते माझ्या या अपघातापर्यंत.``

``अरे आपण लेखक मंडळी. आपलं सगळं काही या लेखणीमुळेच असतं..``

``थांब. मला तसं म्हणायचं नाहीये. प्लीज मलाच बोलू दे... माझ्याकडे वेळ कमी आहे. सगळं नीट शांतपणे ऐक. तुला आठवतं? वेदप्रकाशजींकडे मी लेखनिक होतो. माझ्यातील लेखनप्रतिभा त्यांनी ओळखली होती. मी त्यांचा खूपच लाडका होतो. मला त्यांनी त्यांचा शिष्यच मानलं होतं. एकदा त्यांनी असंच मला जवळ बोलावलं आणि मला म्हणाले, `हे पेन येथून बाहेर पडलास की ताबडतोब नष्ट कर.` ते काय म्हणाले ते थोडक्यात सांगतो. ते म्हणाले, `या पेनने जे काही लिहिले जाते ते सत्य होते, प्रत्यक्षात घडते. परंतु ही जादू जशी फायद्याची आहे तशीच खूप तोट्याचीही आहे. अतिशय आनंद जसा यातून मिळू शकतो तसेच कमालीचे दुःखही यातून पदरी पडू शकते. आणि म्हणूनच ही लेखणी नष्ट करणे आवश्यक आहे.` त्यावेळी या लेखणीबाबतचे काही किस्सेही त्यांनी सांगितले. वेदप्रकाशजींवर माझी अतोनात श्रद्धा होती व अजूनही आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यावर माझा लगेचच विश्वास बसला. पण स्वत:ला त्यांचा पट्टशिष्य मानत असूनही, त्या दिवशी त्यांच्या घरातून बाहेर पडलो आणि पहिल्यांदाच त्यांनी दिलेला आदेश मी पाळला नाही.

मी ती लेखणी नष्ट केली नाही. पण त्यानंतर माझं जीवनच बदलून गेलं. जे जे मला हवं होतं ते ते मी त्या लेखणीनं कागदावर उतरवू लागलो. तसं तसं प्रत्यक्षात घडत गेलं. अनेक निर्मात्यांकडून मला लेखनाची थेट कामं हवी होती. हे माझे विचार मी कागदावर उतरवत गेलो आणि अगदी तसं घडत गेलं. काही दिवसांतच मी इतका स्वार्थी बनत गेलो की काही मोठ्या चित्रपट निर्मात्यांचे वेदप्रकाशजी नेहमीचे लेखक असताना मी त्यांचीही कामं मला मिळतील हे पाहिलं. हळूहळू सर्व बिग banner निर्मात्यांच्या कामांचा माझ्याकडेच ओघ चालू झाला. वेद्जींकडील नोकरी तर मी केव्हाच सोडली होती. मी अचानक घेतलेली उत्तुंग झेप कशामुळे आहे याची वेद्जींना कल्पना आली. तो माणूस किती great बघ! त्यांनी याबाबत मला केवळ एक-दोनदा फोन केला, पण तोही माझ्या काळजीपोटी. फोनवर ते मला एवढंच म्हणाले, `प्रकाश, तू जे करतो आहेस त्यानं तुलाच पुढे त्रास होणार आहे. थांबव हे सारं.` पण मी माझ्याच धुंदीत होतो. मी तसंच चालू ठेवलं.``

``मला काहीच कळत नाहीये तू काय बोलतो आहेस ते.``

``अरे त्या लेखणीची जादू लक्षात घे. त्यानं मी एखाद्या व्यक्तीचं नाव लिहून काही लिहिलं आणि त्या नावाची व्यक्ती जर माझ्या ओळखीची, परिचयाची असेल, तर त्या व्यक्तीच्या बाबतीत अगदी तसंच घडतं. मी चांगलं लिहिलं, तर चांगलं होतं, आणि मी वाईट लिहिलं, तर वाईट! त्यामुळे मी इतकी वर्ष कटाक्षानं जेव्हा जेव्हा त्या लेखणीनं काही साहित्य लिहित होतो, तेव्हा मी मुद्दाम अशी नावं वापरत होतो, कि त्या नावांचं माझ्या परिचयाचं कोणी नसेल. तरी, इतकी काळजी घेऊनही कधी कधी नकळत मी लिहिलेल्या एखाद्या चांगल्या-वाईट प्रसंगाचा फायदा अथवा त्रास त्या प्रसंगात मी नाव वापरलेल्या एखाद्या परीचीतास झालेला मी पाहिला आहे. लेखन चालू असताना, ती व्यक्ती न आठवल्यामुळे तसं झालं होतं.

आज काही वेळापूर्वी माझा जो आणि जसा अपघात घडला ना, तसा; अगदी शब्दन शब्द तसा अपघात मी काही वेळापूर्वीच एका चित्रपटासाठी प्रसंग म्हणून लिहिला होता. राज productionच्या आगामी चित्रपटात चरित्र अभिनेते विनोदजी नायकाच्या वडलांचे काम करत आहेत. श्रीहर्ष हे त्यांचं पडद्यावरचं नाव आहे. या श्रीहर्षचा खलनायक मंडळी पाठलाग करून अपघात घडवून आणून खून करतात असा प्रसंग मी लिहिला, तो याच लेखणीनं. आणि अगदी तसाच्या तसा पुढील काही तासांत माझा अपघात झालेला पाहून मी विचारात पडलो आणि माझ्या लक्षात आलं, माझं प्रकाश हे नाव जरी प्रचलित असलं तरी माझं पाळण्यातलं एक नाव श्रीहर्ष आहे. लिहिताना ते माझ्या लक्षात आलं नाही आणि घडू नये ते घडलं. वेद्जींनी दिलेला इशारा न ऐकल्याचा मला आता पश्चात्ताप होतोय. पण आता वेळ निघून गेलीये. हे पेन एक वरदान नसून शाप आहे. तेव्हा प्लीज इथून बाहेर पडल्यावर ते ताबडतोब नष्ट कर. याबाबतीत वेद्जींची मला आणखीन एक कमाल वाटते, ती म्हणजे ते वेळेवर सावध झाले. त्यांनी योग्य वेळी या लेखणीचा मोह सोडला. आणखी एक. या पेनाची आणखीन एक जादू म्हणजे ते पेन जो वापरत असतो तो त्या जादूने इतका भारावलेला असतो की तो स्वत: ते पेन नष्टच करू शकत नाही. त्यामुळेच वेद्जींनीही ते काम माझ्यावर सोपवलं होतं, आणि मी आता ते तुझ्यावर सोपवत आहे. या लेखणीची कोणतीही परीक्षा न बघता इथून बाहेर पडताच ती नष्ट कर.``

हे सगळं ऐकून मी थक्कच झालो होतो. नर्सनं येऊन मला खूप वेळ झाला असल्यानं बाहेर जावयास सांगितलं. मी बाहेर पडलो. बाहेर आल्यावर तेथील लोकांचा निरोप घेऊन मी माझ्या घरी पोचलो. काही वेळातच प्रकाशचं निधन झाल्याची बातमी येऊन ठेपली.

इकडे मी विचारात पडलो. या सगळ्यावर विश्वास न ठेवण्याचं माझ्याकडे काहीच कारण नव्हतं. माझीही असंख्य स्वप्ने अपुरी होती. ही लेखणी ती पुरी करण्याचं सामर्थ्य हाती धरून होती.

मग मीही ठरवलं. आपण या लेखणीचा वापर करायचा. फक्त खूप खबरदारी घेऊन. मी ताबडतोब ते पेन locker मध्ये ठेऊन दिलं. माझं नेहमीचं सर्व लेखन मी इतर लेखण्या वापरून करू लागलो. माझ्या प्रगतीसाठी मला जे जे आणि जसं जसं व्हायला हवं होतं, ते लिहिण्यासाठी मात्र मी lockerमधून `हे` पेन काढून तो मजकूर कागदावर लिहू लागलो.

पुढील दहा वर्षात सारं चित्रच बदलून गेलं. आज मी हिंदी चित्रपट क्षेत्रातील सर्वात महागडा आणि सर्वात मागणी असलेला लेखक आहे. सर्व बिग bannerचे चित्रपट माझ्याच लेखणीतून उतरलेले असतात. पैसा तर धो धो येऊन पडत आहे.

उद्या दीपकचा वाढदिवस. दीपक माझा पुतण्या. माझी स्वप्ने एवढी मोठी होती, की विवाह वगैरे करण्यास माझ्याकडे वेळच नव्हता. त्यामुळे हा पुतण्याच माझं सर्वस्व आहे. त्याचंही माझ्यावर अतोनात प्रेम आहे. दीपकचं सारं पुढील करियर कसं घडावं याच्या माझ्या मनात काही कल्पना आहेत. अतिशय बुद्धिमान असलेल्या दीपकचे मात्र काही वेगळेच फंडे आहेत. समाजसेवेचे त्याला वेड आहे. त्यासंदर्भातले त्याचे बेत चुकीचे नसले, समाजाच्या हिताचे असले, तरी त्याच्या स्वत:च्या प्रगतीच्या वाटेत अडथळे आणणारे आहेत. मला त्यानं खूप मोठं व्हायला हवं आहे. माझ्या डोक्यात असलेल्या मार्गानं, दिशेनं गेल्यास तो खूप मोठा होईल याची मला खात्रीच आहे.

या वाढदिवसाला, हा मार्ग त्याच्यासाठी आखून देणं, हीच मोठी भेट होईल असं वाटल्यानं मी lockerमधून `ती` लेखणी काढली. दीपकनं पुढे काय काय आणि कसं कसं करावं याचं लिखाण मी त्या लेखणीनं करायला सुरुवात केली.

काही ओळी लिहून झाल्या आणि माझ्या mobileची रिंग वाजू लागली. सरल शर्माजींचा फोन होता. शर्माजी हे इंडस्ट्रीतील topचे निर्माते. ते म्हणत होते,

``जयेशजी, एक प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे. नुकतीच अभिनेता सुरेशनं आत्महत्या केलेली तर आपण जाणतोच. आपण त्यावरच चित्रपट बनवतोय. यात एक नवीन concept आपण आणतोय. सुरेशनं आत्महत्या केली आहे, की त्याची हत्या झाली आहे हे अजून कोडंच आहे. ``

``बरोबर आहे. पण शर्माजी, तुम्ही ते नवीन conceptचं काय म्हणत होतात?``

``हा! आपण या चित्रपटात काय झालं असू शकेल ते सर्व पर्याय दाखवणार आहोत. आत्महत्या झाली असेल तर का आणि कशी, आणि हत्या झाली असेल तर का आणि कशी? शेवटी प्रेक्षकांनीच योग्य तो निष्कर्ष काढायचा आहे. यातील आत्महत्या या भागाचे लेखन तुम्ही करावे आणि हत्या या भागाचे लेखन कपिलजींनी करावे, असा दोन लेखकांचा प्रयोगही आपण करतोय.``

``ठीक आहे. आव्हानात्मक आहे हे सारं. नक्की लिहायला घेतो.``

शर्माजी माझ्या होकारानं निर्धास्त झाले, आणि मी– याबाबतचा विचार डोक्यात सुरु झाल्याने दीपकला शुभेच्छा द्यायच्या थांबवून या विषयावर लिहावयास सुरुवात केली.

``का केली असेल सुरेशनं आत्महत्या. त्याच्या बालपणापासूनच्या जडणघडणीकडे याची पाळमुळं जात असतील? की या क्षेत्रातील स्पर्धा? चढाओढ? प्रेमभंग? नात्यांतील दुरावा. योग्य मित्रमंडळी न भेटल्याचा परिणाम?``

विचार करता करता माझ्या मनात माझाच विचार चालू झाला. आज मी इतका संपन्न असूनही तसा एकटाच आहे. अजूनही अनेक इच्छा पूर्ण व्हायच्या बाकी आहेत. आहे तो वेळ पुरत नाही. अनेक नाती दुरावली आहेत. समजून घेईल असा जोडीदार मला मिळालाच नाहीये. जसजसा संपन्न होत गेलो, काही रिलेशनशिप झाल्याही, पण त्या सगळ्या माझ्या पैशांकडे बघून होत्या. खरं प्रेम मला कधी मिळालंच नाही. माझं यश बघायला माझे आई-वडील जिवंत नव्हते. त्यामुळे माझ्या यशाचं कौतुक करायला खरं तर या जगात कोणीच नाही. काही जवळची मंडळी, म्हणायची जवळची, पण त्यांच्या नजरेत असूयाच दिसून येते. खरंच काय अर्थ आहे या जगण्याला? मग असं जीवन संपवायला काय हरकत आहे?

विचार करता करता मी माझ्या एकविसाव्या मजल्यावरच्या flatच्या टेरेसमध्ये आलो आणि सरळ खाली उडी टाकून मोकळा झालो.

माझ्या टेरेसच्या खाली आमच्या आलिशान कोम्प्लेक्सची बाग आहे. त्यात अगदी उंच झाडांपासून लहान झाडांपर्यंत झाडे आहेत. या झाडांमुळे मी थेट खाली येऊन आपटण्याऐवजी अनेक ठिकाणी आपटत खाली पडलो. त्यामुळे जखमी खूप होऊनही मी लगेच मेलो नाही.

आमचे securityवाले धावत आले. मी आता सिटी हॉस्पिटलच्या जवळच्या उच्चभ्रू भागात राहायला आलो होतो. त्यामुळे पुढील काही मिनिटातच मी हॉस्पिटलच्या आय.सी.यु. मध्ये admit होतो.

इतक्या वरून पडल्यामुळे जगण्याची आशा नव्हतीच, वेदनाही खूप होत होत्या, पण मेंदू विचारही करत होता. असं कसं झालं? का घेतली मी उडी? मी एकटा असलो तरी frustrate कधीच नव्हतो. उलट माझी भलतीच मौजमजा चालली होती. भविष्याचीही मला कोणतीही चिंता नव्हती. पैश्याला कमी तर नव्हतीच, पण म्हातारपणी पाहायला दीपकचा भक्कम आधार होता. मग मी अशी उडी घेतलीच कशी?
मग माझ्या लक्षात आलं.

दीपकसाठी शुभेच्छा लिहिताना जी `ती` लेखणी माझ्या हातात होती, नेहमीप्रमाणे ती बाजूला ठेवायची विसरून मी पुढील सारं लेखन `त्याच` लेखणीनं केलं होतं.

आणि आज मी `जयेश` या माझ्या चित्रपटसृष्टीतील वावरासाठी पंधरा-वीस वर्षापूर्वी घेतलेल्या नावाने जरी सुप्रसिद्ध असलो, तरी माझं मूळ नाव आहे-

`सुरेश!`

*

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हा हा!
धन्यवाद!
उडी मारताना ती लेखणीही हातात राहिल्याने आपोआपच मोडून नष्ट झाली असे समजूयात!

Sad
गुढ लेखण, भारी लिहिलय.
मला वाटलं होतं दिपकच्या बाबतीत काही वाईट घडणार, पण ट्विस्ट चांगला होता.
बायदवे, तुमच्या फोटोत तो हात कुणाचा आहे.

आवडली कथा...
मला वाटलं होतं दिपकच्या बाबतीत काही वाईट घडणार, पण ट्विस्ट चांगला होता. +१

छान...

एक माकडाच्या हाताची कथा वाचली होती पूर्वी..

जबरदस्त कथा.यात खूप पोटेनशियल आहे.एखाद्या 20 मिनिटाच्या शॉर्ट फिल्म चं.
लेखनशैली मध्ये मध्ये रत्नाकर मतकरींची आठवण करून देते.

आसा. व mi_anu,
अभिप्रायांसाठी मनापासून आभार!

छान आहे कथा.
मतकरींच्या डायरी कथेची आठवण झाली.