डि आय वाय: साबणापासून साबण

Submitted by mi_anu on 9 August, 2020 - 03:54

रविवारची सुंदर सकाळ.या सकाळी लोकांच्या पोटात भरपूर नाश्ता घातल्यावर आपल्याकडे बरेच पर्याय असतात.कपाट आवरणे, दाण्याचा कूट करणे,ऑफिसचं थोडं काम करणे वगैरे.
पण मटा वर 'घरच्या घरी करा नीम सोप' वाचून हे सगळं मागे पडतं.

आता यांनी एक साधा साबण वापरायला सांगितलाय.पण आम्ही घरातले सगळे उरले सुरले साबण तुकडे गोळा केले.निळा साबण अधिक नारिंगी साबण अधिक लाल साबण अधिक बदामी साबण हे एकत्र होऊन काय रंग बनेल असे घातकी विचार मनात आणायचेच नाहीत.

आता घरातलं खूप नावडतं भांडं मिडीयम नावडत्या भांड्यात ठेवून मिडीयम नावडत्या भांड्यात पाणी घेऊन ते उकळायला ठेवावे.तोवर सुरीने सगळ्या तुकड्यांचे लहान लहान काप करावे आणि खूप नावडत्या भांड्यात टाकावे.हे वितळायला वेळ लागणार आहे तोवर सोसायटीत जाऊन उड्या मारून 2-3 कडुनिंब फांद्या आणि तुळशीच्या रोपातले अगदी खालचे खालचे थोडे कंटेंट(सगळे ओरबाडायाचे नाही.झाड लवकर वाढणार नाही) घ्यावे.आमच्या सोसायटीत सिनियर सिटीझन लोक भल्या पहाटे फिरून पिशवीत फुलं गोळा करून त्यांच्या त्यांच्या देवाला आरास करतात.त्यामुळे फुलं, कडुनिंब पानं, फुलांच्या उद्या फुलणाऱ्या कळ्या हे सगळं गेलेलं असतं.जी थोडीफार फुलं आणि बाकी गोष्टी शिल्लक असतात त्या ट्रान्सफॉर्मर बॉक्स च्या वर, चिखलाच्या वर, सापाच्या वारुळाच्या वर, 20 फूट उंच अश्या सोयीच्या जागी असतात.सोसायटीने 'फुलं तोडू नये' अशी पाटी लावली.आता त्या पाटीच्या खाली आणि 5 फूट आजूबाजूला कोणी फुलं तोडत नाही.तर असं असल्याने उड्या मारून पण कडुनिंब मिळत नाही.मग घरातल्या उंच मेम्बराला पकडून नेऊन उड्या मारायला लावावे.

आता आपल्या कडे बेसिक माल तयार झाला.तोवर नावडत्या भांड्यात साबण तुकड्यांचा चिखल तयार झाला असेल.तो ढवळावा.
IMG_20200809_110900.jpg

तोवर मिक्सर ला तुळशी, कडुनिंब आणि हवी असल्यास जिरेनियम,लिंबू,गवती चहा ची पानं टाकून 3 चमचे पाणी टाकून सर्व बराच वेळ घुर्र करावे.पुदिना चटणी सारखे मिश्रण बनेल.हे मिश्रण तारेच्या गाळणीतून गाळून घ्यावे.या मिश्रणात खूप जास्त पाणी असता कामा नये.
IMG_20200809_110924.jpg

आता सिलिकॉन मोल्ड ला(हा नसेल तर वाट्या/साधी बाटलीची आटे नसलेली मोठी झाकणं,जुन्या चॉकलेट बॉक्स मधले फेकायचे प्लॅस्टिक स्टॅन्ड यापैकी काहीही वापरा.) तुपाचे दोन थेंब लावून नीट आतून चोळून घ्यावेत.
उकळलेल्या साबण मिश्रणात आपण गाळलेले हिरवे पाणी घालून नीट हलवून थोड्या वेळात गॅस बंद करावा.
IMG_20200809_111447.jpg

मिश्रण मोल्ड मध्ये ओतून अर्धा तास काहीतरी टाईमपास करावा.
साबण तयार.आम्ही फारच वेगवेगळ्या रंगाचे साबण मिक्स केल्याने वेगळा रंग आलाय.मटा वाल्या बाईचा मात्र सुंदर गडद हिरवा आलाय.
IMG_20200809_120721.jpg

'काय मेणचट शेणेरी रंग आहे ना' वगैरे टिप्पणी दुर्लक्षित करून घरातल्या सर्वाना 1 आठवडा ट्रायल ला हा साबण वापरायला द्यावा.(यालाच ह्युमन ट्रायल म्हणतात ना?)

ताकः साबणात जास्वन्द नाहीये, ती आमच्या सोसायटीत सकाळी ११.३० ला झाडावर जास्वन्द शिल्लक राहीले या आनन्दात तिथे ठेवली आहे.

IMG_20200809_121524.jpgIMG_20200809_120941.jpg

Group content visibility: 
Use group defaults

ती लिंक पाहिली सिंबा.चांगली आहे.
थोडे व्हिडीओ पाहिल्यावर आपल्याला साधारण अंदाज येतोच की हे आपल्याच्याने असं नाही होणार.(आईने एकदा पेपर मधली कृती वाचून तव्यावर रताळ्याची सुतरफेणी उपवासाला केली होती ते आठवलं. फार चांगला नव्हता तो प्रकार.)
आमच्याकडे बाल गोपाळांनी रेसिपी व्हिडीओ पाहून पोटॅटो लजानिया केले होते.यातली मुख्य स्टेप 'बटाट्याच्या बारीक पातळ चकत्या कराव्या' त्यांनी आपल्या सोयीने कस्टमाईज करून बटाट्याच्या ढोल्या चकत्या केल्या होत्या.नंतर आम्ही तीनदा तो लजानिया अवतार बेक केला तरी ते बटाटे काही शिजले नाहीत.चौथ्या वेळा बटाटे शिजले पण बाजूचे चीज करपले.ते काचेचं भांडं 5 दिवस पाण्यात भिजत टाकल्यावर ते धुता आलं.
बांधणी मध्ये पण एका काळ्या कुट्ट टीशर्ट वर आधी ब्लिच लिक्विड टाकून मग रंग टाकून मग फिक्सर टाकायचा होता.यातली ब्लिच वाली स्टेप टाळली.मग अनेक रंगात रंगूनही निर्वीकार निरिच्छ राहणाऱ्या एखाद्या संन्याश्याप्रमाणे तो काळाकुट्ट टीशर्ट काळाकुट्ट राहिला आणि रंग वाया गेले.
लहानपणी शाळेत काही भरतकाम क्रोशा सुयांचे विक्रेते यायचे.ते कापडावर भरभर सुंदर रंगीत टर्किश टॉवेल डिझाईन सारखा कशिदा काढायचे.आईला इम्प्रेस करून दुसऱ्या दिवशी पैसे देऊन ती सुई घरी आल्यावर ती कापडाला भोकं आणि उसवल्या सारखे 3-4 दोरे सोडून काहीही कलाकृती करायची नाही.आणि आईच्या तोंडून प्रेमळ शब्द खावे लागायचे.

काॅस्टीक सोडा, तेल आणि रंग घालून बनवतात म्हणे बेसिक साबण. शाळेत असताना टोकयंत्रातून निघालेल्या पेन्सिलच्या फुलांपासून आणि कागदाच्या लगद्यापासून खोडरबर बनतं अशी काहीतरी अफवा होती ती आठवली.

कॉस्टिक सोडा घालून जर बनवला तर भांडी धुण्याचा साबण बनेल.ते खूप करोजीव्ह असतं.कॉस्टिक पोटॅश आणि तेल मिसळून बनू शकेल अंगाचा साबण.

लहानपणी शाळेत काही भरतकाम क्रोशा सुयांचे विक्रेते यायचे.ते कापडावर भरभर सुंदर रंगीत टर्किश टॉवेल डिझाईन सारखा कशिदा काढायचे.>>
होय होय! आणली होती मीपण अशी सुई एकदा. Lol

मस्त आहे प्रयोग आणि लेख
वड्या चांगल्या दिसत आहेत की साबणाच्या
छान packing करून गिफ्ट करता येतील handmade soups Lol

अरे लोक्स, टॉयलेट सोप म्हणजे अंघोळीचा साबण, डिश वॉश बार, नंतर कपडॅ धुवायचा साबण केसाला लावायचा साबण डिटर्जंट साबण व पावडर. फेस वॉश हँड वॉश बॉडी वॉश ह्या प्रत्येक कॅटेगरीचे स्वतंत्र फॉर्मुलेशन असते व नेमुन दिलेले घटक पदार्थ व त्यांचे प्रमाण असते. सरमिसळ करून बनवू नका त्वचेला अपाय होउ शकतो. त्यात लहान मुले बनव्णार, तर त्यांना प्रोटेक्टिव्ह रबर हातमोजे द्या. काही हार्श केमिकल्स असतील तर ते करू नका घरी आणूच नका. माइल्ड ग्लिसरीन सोप वगैरे बनवायला हरकत नाही. फूड कलर साब णात वापरू नये. ओरिजिनल बेस ते घेणार नाही नीट. वेगले सोप कलर असतात ते घालावे.

दुसरे महत्वाचे म्हणजे बारके तुकडे हे घरात किंवा बाथरूम मध्ये कुठे तरी खूप दिवस पडलेले असले तर त्यांवर जंतुंची ग्रोथ झालेली असू शकते.
ते वाप्रून साबण बनवला तर स्किन इन्फेक्षन होउ शकते. त्यात लहान मुले बनव्णार. काळजी घ्या.
साबण बनवायचा माल विकणारे सप्लायर असतात तिथे सर्व कच्चा माल मिळेल. बेस/ नूडल्स / तेल कलर इत्यादि. फ्रेग्रन्स अमेझॉन वर मिळेल. तो अगदीच कमी प्रमा णात लागतो. हैद्राबादेत महारा श्ट्र मंडल रामकोट जिथे आहे त्या रस्त्यावर ह्या लोकांची लायनीने दुकाने आहेत. १० - २५ किलो अत्तरे घेणारे लोक्स.

हम्म हे पटतंय
पुढच्या वेळी नीट चांगला फ्रेश माल आणूनच बनवू.

सोप मेकिंग किट मिळतात अनु त्यात एसेंशयल ऑयल सुद्धा असते, मोल्ड असतात (जेलेटीन किंवा मिल्क) बेस, स्क्रब असतो.
आणि मायक्रोवेव्ह मध्ये करता येते . So we can avoid the chemical fumes if there are any.

So we can avoid the chemical fumes if there are any.>> हार्श केमिकल बंदिस्त जागेत गरम केले तर त्याच्या फ्युम्स घरातील वातावरणात मिसळ णार च म्हणून प्रॉडक्षन युनिट्स मध्ये एअर फिल्ट र लावलेले असतात. दुसरे महत्वाचे म्हणजे प्रत्येक केमिकलचे एक एम एस डी एस मटेरिअल सेफ्टी डा टा शीट उपलब्ध असते. ते देणे उत्पादकांना बंधन कारक आहे. हे जग भर लागू असते. उदाहरणा र्थ सोडिअम हायड्रॉक्साइड लाय हे सोप चे बेसिक मटेरिअल आहे त्याचे एम एस डीएस ची लिंक दिली आहे.
https://fscimage.fishersci.com/msds/21300.htm#:~:text=Causes%20severe%20...

घरात काहीही रसायने आणल्यास पहिल्यांदे त्याचे सिनो नेम्स चेक करा एकच केमिकल अने क नावांनी जग भर उपलब्ध असते व त्याच्या उत्पादकांचे एम एस डी एस शीट पीडीएफ मध्ये उपलब्ध असते ते डाउन लोड करून ठेवा. त्या रसायनांचे गुणधर्म, व वापरण्याची पद्धत काही चुकीचे वापरल्यास काय होउ शकते ते व त्याचे उपाय हे एम एस डी एस मध्ये दिलेले असते. त्यानुसार प्राथमिक उपचार करू शकता.
काही फायर कॉजिन्ग हायली कंबस्टिबल मटेरल असतात. जसे आपले अमोनिअम नायट्रेट. परवा अपघात झाल्यावर मी पहिले त्याचे एम एस डी एस वाचून बघितले व हताश झाले.

मी_अनु तुमच्या विनोदी लेखावर मी जरा माहितीचे भरताड अवांतर लिहीले आहे. त्या बद्दल सॉरी. पण रसायनांचा संबंध आला की तुम्ही जितकी काळजी घ्याल तितके सेफ राहाल.

डोन्ट वरी गाईज
काळजी घेऊनच करतोय हे प्रयोग
सोप मेकिंग किट मिळतात हेही माहिती आहे
(लेबेनॉन ला ठेच लागून आपण शहाणे झालो आणि चेन्नई चा साठा वाटेला लावला हे त्यातल्या त्यात बरे.)
आम्ही केमिकल ची नीट माहिती वाचूनच प्रयोग करतो.पेपरमध्ये खूप बातम्या वाचून उगीच आगाऊपणा करायची भीती आहेच.
(अस्मिता, लेख आधीच वाचलाय. साबण एकदम सुंदर प्रो दिसतायत)

अमा तुमचे बरोबर आहे पण माझ्या किट वरच्या सूचनेनुसारच सर्व केले मी ...But I do agree that mixing , combining and heating could be harmful .
अनु Happy , नवीन डि आय वाय साठी शुभेच्छा.

पण माझ्या किट वरच्या सूचनेनुसारच सर्व केले मी .>>अहो मी तुम्हाला उद्देशून नाही लिहिले. वरून माबो वाचणारी जनरल पब्लिक असते त्यांच्यासाठी लिहीते मी जनरली. तुमचा बाफ मस्तच आहे.

मला समहाऊ माझी चांगली भांडी/उपकरणे खराब होणे व नंतरची साफसफाई याची भीती वाटते त्यामुळे DIY मी टाळतेच.
अनुचे मात्र कौतुक आहे- किती हौसेने नवीन प्रयोग करत असते!

घरगुती केक, बिस्किटे, मेहंदी, परफ्यूम बनवण्याच्या क्लासेस च्या जाहिरातींसारखी ऑर्गॅनिक साबण बनवायच्या क्लास ची पण जाहिरात पाहण्यात आली होती.

ऑरगॅनिक साबण, लहान मुलांचे सुंदर साबण याचे खूप क्लास पुण्यात आहेत
कधी वेळ मिळेल तेव्हा नक्की करणारे.(आईची पुण्यात न राहण्या मागची ती मुख्य खंत होती.'तिथे सकाळ पेपरमध्ये छोट्या जाहिरातीत किती मस्त गोष्टींचे क्लास असतात.मला ते करायचेत'. जेव्हा पुण्यात यायला मिळाले तेव्हा तिने झपाट्याने पाव, केक, ग्रेव्ही, पाच प्रकारच्या बंगाली मिठाई,एन्व्हलप आणि असे बरेच क्लास पूर्ण केले.)

ह्युमन ट्रायल Lol
सिम्बा (च्या पोरीचे) प्रयोगही भारी. Proud
५ मिनिट्सचे चिक्कार व्हिड्यू बघतो आणि मग ते डिबंक केलेले आणखी व्हिड्यू बघतो, पण अंगातल्या आळसाने त्यावर आधीच मात केलेली असते. Lol

साबण-पॉपकॉर्न पुन्हा साबणासारखेच वापरायचे... झिजलेले चपटे तुकडे हातातून निसटतात, त्यापेक्षा पॉपसोप हाताळायला सोपे, बाकी काही नाही Lol

लेख आणी प्रतिक्रिया दोन्हीही भन्नाट!
सिम्बा कडचा किस्सा भारी,
जेव्हा पुण्यात यायला मिळाले तेव्हा तिने झपाट्याने पाव, केक, ग्रेव्ही, पाच प्रकारच्या बंगाली मिठाई,एन्व्हलप आणि असे बरेच क्लास पूर्ण केले>>> तुझ्यात हे कुठुन आलय हे कळतय!
उत्साही आहेस्, करत रहा प्रयोग !

हर्बल सोप बेस विकत मिळतात. साधारण १५० रुपये किलोपासून सुरुवात आहे. ते वापरून याच पद्धतीने घरच्या घरी वेगवेगळे साबण बनवता येतील.

छान प्रयोग.
पण साबणाचा रंग सिमेंटसारखा आलाय Lol
बांधणी मस्त जमलंय.

आजचा घरच्या पात्रांचा ताजा ताजा प्रयोग
सतत उसवणाऱ्या लेगिंग च्या क्रोच ला भोक पाडून त्यातून मान घालून फुल स्लीव्ह टीशर्ट
(माझी आजी असती तर नक्की भिकेचे डोहाळे किंवा कमरेचे डोक्याला गुंडाळणे यापैकी एक म्हणाली असती.)
आजच कोणता तरी व्हिडीओ बघून लेगिंग चे कापलेले पाय आणि शुलेस याचा मास्क पण बनवून झालाय.
IMG_20200812_214313.jpg

मस्त हहपुवा लेख आणी प्रतिसाद.
जाम मजा आली वाचायला अनु.

ते साबण केशरयुक्त निम म्हणून पण दिवाळीत खपतील Proud

बादवे भांडं फारच नावडतं दिसतंय Lol

या साबण मेकींग वरून लहानपणी असंच ते किट आणून भांडी घासायचा साबण बनवायचे आई बाबा त्याची आठवण झाली. चांगला बादलीभर बनायचा.

Pages