डि आय वाय: साबणापासून साबण

Submitted by mi_anu on 9 August, 2020 - 03:54

रविवारची सुंदर सकाळ.या सकाळी लोकांच्या पोटात भरपूर नाश्ता घातल्यावर आपल्याकडे बरेच पर्याय असतात.कपाट आवरणे, दाण्याचा कूट करणे,ऑफिसचं थोडं काम करणे वगैरे.
पण मटा वर 'घरच्या घरी करा नीम सोप' वाचून हे सगळं मागे पडतं.

आता यांनी एक साधा साबण वापरायला सांगितलाय.पण आम्ही घरातले सगळे उरले सुरले साबण तुकडे गोळा केले.निळा साबण अधिक नारिंगी साबण अधिक लाल साबण अधिक बदामी साबण हे एकत्र होऊन काय रंग बनेल असे घातकी विचार मनात आणायचेच नाहीत.

आता घरातलं खूप नावडतं भांडं मिडीयम नावडत्या भांड्यात ठेवून मिडीयम नावडत्या भांड्यात पाणी घेऊन ते उकळायला ठेवावे.तोवर सुरीने सगळ्या तुकड्यांचे लहान लहान काप करावे आणि खूप नावडत्या भांड्यात टाकावे.हे वितळायला वेळ लागणार आहे तोवर सोसायटीत जाऊन उड्या मारून 2-3 कडुनिंब फांद्या आणि तुळशीच्या रोपातले अगदी खालचे खालचे थोडे कंटेंट(सगळे ओरबाडायाचे नाही.झाड लवकर वाढणार नाही) घ्यावे.आमच्या सोसायटीत सिनियर सिटीझन लोक भल्या पहाटे फिरून पिशवीत फुलं गोळा करून त्यांच्या त्यांच्या देवाला आरास करतात.त्यामुळे फुलं, कडुनिंब पानं, फुलांच्या उद्या फुलणाऱ्या कळ्या हे सगळं गेलेलं असतं.जी थोडीफार फुलं आणि बाकी गोष्टी शिल्लक असतात त्या ट्रान्सफॉर्मर बॉक्स च्या वर, चिखलाच्या वर, सापाच्या वारुळाच्या वर, 20 फूट उंच अश्या सोयीच्या जागी असतात.सोसायटीने 'फुलं तोडू नये' अशी पाटी लावली.आता त्या पाटीच्या खाली आणि 5 फूट आजूबाजूला कोणी फुलं तोडत नाही.तर असं असल्याने उड्या मारून पण कडुनिंब मिळत नाही.मग घरातल्या उंच मेम्बराला पकडून नेऊन उड्या मारायला लावावे.

आता आपल्या कडे बेसिक माल तयार झाला.तोवर नावडत्या भांड्यात साबण तुकड्यांचा चिखल तयार झाला असेल.तो ढवळावा.
IMG_20200809_110900.jpg

तोवर मिक्सर ला तुळशी, कडुनिंब आणि हवी असल्यास जिरेनियम,लिंबू,गवती चहा ची पानं टाकून 3 चमचे पाणी टाकून सर्व बराच वेळ घुर्र करावे.पुदिना चटणी सारखे मिश्रण बनेल.हे मिश्रण तारेच्या गाळणीतून गाळून घ्यावे.या मिश्रणात खूप जास्त पाणी असता कामा नये.
IMG_20200809_110924.jpg

आता सिलिकॉन मोल्ड ला(हा नसेल तर वाट्या/साधी बाटलीची आटे नसलेली मोठी झाकणं,जुन्या चॉकलेट बॉक्स मधले फेकायचे प्लॅस्टिक स्टॅन्ड यापैकी काहीही वापरा.) तुपाचे दोन थेंब लावून नीट आतून चोळून घ्यावेत.
उकळलेल्या साबण मिश्रणात आपण गाळलेले हिरवे पाणी घालून नीट हलवून थोड्या वेळात गॅस बंद करावा.
IMG_20200809_111447.jpg

मिश्रण मोल्ड मध्ये ओतून अर्धा तास काहीतरी टाईमपास करावा.
साबण तयार.आम्ही फारच वेगवेगळ्या रंगाचे साबण मिक्स केल्याने वेगळा रंग आलाय.मटा वाल्या बाईचा मात्र सुंदर गडद हिरवा आलाय.
IMG_20200809_120721.jpg

'काय मेणचट शेणेरी रंग आहे ना' वगैरे टिप्पणी दुर्लक्षित करून घरातल्या सर्वाना 1 आठवडा ट्रायल ला हा साबण वापरायला द्यावा.(यालाच ह्युमन ट्रायल म्हणतात ना?)

ताकः साबणात जास्वन्द नाहीये, ती आमच्या सोसायटीत सकाळी ११.३० ला झाडावर जास्वन्द शिल्लक राहीले या आनन्दात तिथे ठेवली आहे.

IMG_20200809_121524.jpgIMG_20200809_120941.jpg

Group content visibility: 
Use group defaults

छान यशस्वी प्रयोग
अभिनंदन.
ह्या साच्यात मसाल्याचा / फोडणीचा चमचाभर हळद किंवा आंबे हळद मिक्स करून ते मिश्रण नीट ढ़वळून अर्धा तास वाट पाहायला हवे एकदा ! बहुतेक सर्व मिश्रणाचा सरमिसळ राखाडी रंग जावून हळदी रंग आलाच तर भारी काम होईल.

वास जुन्याच साबण तुकड्यान्चा आहे. त्यामुळे चान्गलाच आहे.
मूळ व्हिडिओ मध्ये चटणी थेट टाकली होती. मला ती अंगाला टोचेल वाटलं त्यामुळे गाळून पाणी टाकले.
हळद टाकूनही मेणचट शेणेरी रंग जाणार नाही. काहीतरी वेगळी ट्रिक करावी लागेल बीट वगैरे.

धन्यवाद मंडळी
नावडतं भांडं आता अश्याच कामांसाठी वाहून घेतलं जाईल.
परवा बांधणी डी आय वाय पण केले. (नीट काळ्जी घेऊन, मोजे घालून, रंगाचा वास न घेता.)
IMG_20200809_131221.jpgIMG_20200809_131250.jpg
विजार खूप पातळ होती. शॉर्ट टोप्स खाली घालता येत नव्हती. त्यामुळे त्याला पांढर्‍या पासून परावृत्त केलं. रुमाल मांजर्पाट आहे तो असाच फडके होता. त्याला असेच इथे तिथे धूळ पुसायला वापरले जाईल. अजून प्रो काम नंतरच्या टप्प्यात.

भरत, Lol

छानच झाले आहेत साबण. नीम ऑइल व बेसिल ऑइल वापरता येइल त्या चटणी ऐवजी. नीम ऑइल व बेसिल मिक्क्ष भरपूरच फ्रेग्रन्स उपलब्ध आहेत.

सॉरी अनु, आमच्या घरचा अनुभव द्यायचा मोह अनावर होतोय,

आमच्याकडे नुकताच एक DYI सर्जिकल स्राईक झाला,
मुलीला साबण बनवायचा एक किट वाढदिवसाला मिळाला होता, एक raw साबणाची लहानशी विट, फ्रेग्ननन्स, रंग, मोल्ड असा सगळा मसाला होता. फक्त त्यांच्या टार्गेट युजर साठी पेशन्स ची पुडी द्यायला ते विसरले.

दुपारी आजी झोपलेली आणि आई कामात चा मुहूर्त साधून मुलीने DIY करायचे ठरवले.
ती अनु इतकी चाणाक्ष नसल्याने साबणाची वीट वितळवण्यासाठी डायरेक्ट पातेल्यात वीट घालून पातेले गॅस वर ठेवायचा पर्याय तिने निवडला.
विटेला सगळीकडून उष्णता लागावी म्हणून तिचे छोटे तुकडे करणे वगैरे प्रकार तिच्या गावी ही नव्हते.
कुठलिही गोष्ट तिची फेवरेट सामग्री घेऊन केली की छान होते असे तिला वाटते, या केस मध्ये तिचे फेवरेट असणारे पातेले नेमके तिच्या आजीने माहेरहून आणलेले होते.

विट वितळली की त्यात रंग आणि वासाचे थेंब घालायचे , आणि मिश्रण मोल्ड मध्ये ओतायचे असा सोप्पा प्लॅन होता.

पण झाले भलतेच, भणभण गॅस वर विटेची खालची बाजू जेमतेम वितळून जळायला सुरवात झाली. त्याच्या वासाने आजी जागी झाली, आपली प्रॉपर्टी अशीं वापरली जात असल्याचा तिने दणदणीत आवाजी निषेध नोंदवला.
पुढे झालेले कांड पूर्ण सांगत नाही.

भाग 2-
मागच्या भागातील वीट अर्धीअधिक जळून खलास झाली होती, मोल्ड भरण्यासाठी कच्चा माल म्हणून घरातले जुने साबण तुकडे गोळा केले, हुश्शार बाबा involve झाला असल्याने लेखात सांगितली तशी व्यवस्था केली, विटेचे छोटे तुकडे केले, प्रयोग सुरू झाला, विट ग्लिसरीनवाल्या साबणाची होती, तुकडे भरभर वितळले, पण जुने साबणाचे तुकडे काही वितळत नव्हते, ,परत ग्लिसरीन वितळून जळते की काय या अवस्थेला पोहोचले, (या वेळी आजी बाजूलाच सुपरव्हिजन ला उभी होती) त्यामुळे नाईलाजाने ते मिश्रण मोल्ड मध्ये ओतले,
आता छान केशरी रंगाचा पारदर्शक, आणि मध्ये मध्ये साबणाचे गठ्ठे असणारे साबण तयार होतोय असे दिसू लागले.
मिश्रण गार होताना त्यातून बुडबुडे वर येऊन पृष्ठभाग खरखरीत झाला:(
हं, या पेक्षा ती विट तशीच साबण म्हणून वापराची, असा शेरा मारून चीफ सुपरवायजर निघून गेला.

अशा तर्हेने आमचा घरगुती साबण बनवायचा प्रयत्न पार पडला.

बापरे भयंकर अनुभव आहे
मलाही थेट गॅस वर किंवा मायक्रोवेव्ह मध्ये एखादेच भांडे ठेवायचा मोह झाला होता.पण एकदा असं करुन कोको पावडर जाळून झालीय त्यामुळे निमूट 2 भांडी वापरली.
साबणाचा फोटो पाहिजेच.

छानच! बांधणीचा प्रयोगही मस्त झालेला दिसतोय!
सिम्बा, असा एक खरखरीत organic साबण एकदा एका प्रदर्शनातून आम्ही आणला होता. Actually दोन आणले होते. एक केसांना लावण्याचा रिठे-शिकेकाईचा आणि एक अंगाला लावण्याचा कॉफी फ्लेवरचा Lol शिकेकाईचा मस्त निघाला. पण हा कॉफीवाला खरखरीत होता, शिवाय तेलकट होता. Sad
शेवटी कसाबसा संपवला. हात धुवायला वगैरे वापरून. नशीब कॉफीवाला आणला. बाकीचे फ्लेवर्स नीम वगैरे होते. त्यांंचा वास आणखी कसातरी आला असता.

खादी भांडारचे का?
हा इथल्या एका लोकल दुकानाचा होता. नाव लक्षात नाही. पण बरीच उत्पादनं होती त्यांची. लाकडी टूथब्रश वगैरे.

मस्तच साबण, माझे सोप मेकिंग(लेख) आठवले !! आम्ही नंतर फूडकलर टाकला आणि चेहरा निळा हिरवा होत आहे.
तुझे साबणं आयुर्वेदिक झाले आहेत. लेखही खुसखुशीत Happy

मस्त साबण आणि लेख दोन्ही. मला माझ्या लेकाने केलेले प्रताप आठवले. लोकडाऊन मध्ये हा उद्योग त्याने केलेला यू ट्यूबवर बघून. लॉजवर ज्या oyo च्या साबनवड्या मिळतात ते कापून ओव्हनमध्ये ठेवलेले. मी कामात होते. मग वास सुटला तशी धावत किचनमध्ये गेले . ओव्हनचा वास जायला जाम त्रास झाला. कित्येक वेळा लिंबाच्या पाण्याने पुसून काढला, फ्रीजमध्ये 2 दिवस काढू काढू म्हणत राहिलेली भाजी टाकायच्या आधी ओव्हनमध्ये गरम करून घ्यायची मग टाकायची, असं करत वास गेला.

लिखाण मस्त नेहमीसारखेच..
साबणही काही वाईट नाही. फक्त रंग तेव्ढा डेंजर आलाय. असा साबण लावताना हा त्याचा रंग आपल्या अंगावर तर सोडणार नाही ना अशी सायकॉलॉजिकल भिती तेवढी वाटते. पण त्यावर मात केली तर छान पौष्टीकच प्रकरण दिसतेय Happy

मस्त लिहिलं आहेस ग. एकूणात हे प्रकरण कठिणच दिसतंय. आधीच इशारा मिळाला ते बरंय. ह्या वाटेला जायचा मोह होणार नाही.

Pages