डि आय वाय: साबणापासून साबण

Submitted by mi_anu on 9 August, 2020 - 03:54

रविवारची सुंदर सकाळ.या सकाळी लोकांच्या पोटात भरपूर नाश्ता घातल्यावर आपल्याकडे बरेच पर्याय असतात.कपाट आवरणे, दाण्याचा कूट करणे,ऑफिसचं थोडं काम करणे वगैरे.
पण मटा वर 'घरच्या घरी करा नीम सोप' वाचून हे सगळं मागे पडतं.

आता यांनी एक साधा साबण वापरायला सांगितलाय.पण आम्ही घरातले सगळे उरले सुरले साबण तुकडे गोळा केले.निळा साबण अधिक नारिंगी साबण अधिक लाल साबण अधिक बदामी साबण हे एकत्र होऊन काय रंग बनेल असे घातकी विचार मनात आणायचेच नाहीत.

आता घरातलं खूप नावडतं भांडं मिडीयम नावडत्या भांड्यात ठेवून मिडीयम नावडत्या भांड्यात पाणी घेऊन ते उकळायला ठेवावे.तोवर सुरीने सगळ्या तुकड्यांचे लहान लहान काप करावे आणि खूप नावडत्या भांड्यात टाकावे.हे वितळायला वेळ लागणार आहे तोवर सोसायटीत जाऊन उड्या मारून 2-3 कडुनिंब फांद्या आणि तुळशीच्या रोपातले अगदी खालचे खालचे थोडे कंटेंट(सगळे ओरबाडायाचे नाही.झाड लवकर वाढणार नाही) घ्यावे.आमच्या सोसायटीत सिनियर सिटीझन लोक भल्या पहाटे फिरून पिशवीत फुलं गोळा करून त्यांच्या त्यांच्या देवाला आरास करतात.त्यामुळे फुलं, कडुनिंब पानं, फुलांच्या उद्या फुलणाऱ्या कळ्या हे सगळं गेलेलं असतं.जी थोडीफार फुलं आणि बाकी गोष्टी शिल्लक असतात त्या ट्रान्सफॉर्मर बॉक्स च्या वर, चिखलाच्या वर, सापाच्या वारुळाच्या वर, 20 फूट उंच अश्या सोयीच्या जागी असतात.सोसायटीने 'फुलं तोडू नये' अशी पाटी लावली.आता त्या पाटीच्या खाली आणि 5 फूट आजूबाजूला कोणी फुलं तोडत नाही.तर असं असल्याने उड्या मारून पण कडुनिंब मिळत नाही.मग घरातल्या उंच मेम्बराला पकडून नेऊन उड्या मारायला लावावे.

आता आपल्या कडे बेसिक माल तयार झाला.तोवर नावडत्या भांड्यात साबण तुकड्यांचा चिखल तयार झाला असेल.तो ढवळावा.
IMG_20200809_110900.jpg

तोवर मिक्सर ला तुळशी, कडुनिंब आणि हवी असल्यास जिरेनियम,लिंबू,गवती चहा ची पानं टाकून 3 चमचे पाणी टाकून सर्व बराच वेळ घुर्र करावे.पुदिना चटणी सारखे मिश्रण बनेल.हे मिश्रण तारेच्या गाळणीतून गाळून घ्यावे.या मिश्रणात खूप जास्त पाणी असता कामा नये.
IMG_20200809_110924.jpg

आता सिलिकॉन मोल्ड ला(हा नसेल तर वाट्या/साधी बाटलीची आटे नसलेली मोठी झाकणं,जुन्या चॉकलेट बॉक्स मधले फेकायचे प्लॅस्टिक स्टॅन्ड यापैकी काहीही वापरा.) तुपाचे दोन थेंब लावून नीट आतून चोळून घ्यावेत.
उकळलेल्या साबण मिश्रणात आपण गाळलेले हिरवे पाणी घालून नीट हलवून थोड्या वेळात गॅस बंद करावा.
IMG_20200809_111447.jpg

मिश्रण मोल्ड मध्ये ओतून अर्धा तास काहीतरी टाईमपास करावा.
साबण तयार.आम्ही फारच वेगवेगळ्या रंगाचे साबण मिक्स केल्याने वेगळा रंग आलाय.मटा वाल्या बाईचा मात्र सुंदर गडद हिरवा आलाय.
IMG_20200809_120721.jpg

'काय मेणचट शेणेरी रंग आहे ना' वगैरे टिप्पणी दुर्लक्षित करून घरातल्या सर्वाना 1 आठवडा ट्रायल ला हा साबण वापरायला द्यावा.(यालाच ह्युमन ट्रायल म्हणतात ना?)

ताकः साबणात जास्वन्द नाहीये, ती आमच्या सोसायटीत सकाळी ११.३० ला झाडावर जास्वन्द शिल्लक राहीले या आनन्दात तिथे ठेवली आहे.

IMG_20200809_121524.jpgIMG_20200809_120941.jpg

Group content visibility: 
Use group defaults

हाहा धमाल लिहिलंय.
सिम्बा आणि वर्णिताचे किस्से पण मस्त!
पुण्यात बऱ्याचदा प्रदर्शनात वगैरे बघितले आहेत हॅन्डमेड सोप्स. तेही असेच बनवत असतील का?

माझ्या मुलीला असा किट कोणी गिफ़्ट देऊ नये हीच इच्छा!

अमेझॉन वर अगदी प्लेन साबण आहेत.त्यात काय काय आवडते महाग घालून आपल्या आवडीचा साबण बनतो.
आम्ही लहानपणी एक गुलाबी साबण बनवायचो 6 महिन्याचा. भरपूर
खोबरेल तेल बादलीभर आणि एक कॅन मध्ये स्किन ला भोकं पाडणारी तीव्र ऍसिड स्लरी मिक्स करायची असायची.त्याने स्किन मऊ छान बिन व्हायची नाही पण स्वच्छ व्हायची.
साबणाचा साबण करणे हे तसं म्हटलं तर चॉकलेट चं चॉकलेट करण्या सारखं मनाला चिटिंग वाटतं.

परदेशात एका 5स्टार हॉटेल च्या रिसेप्शन वर मस्त पॅकिंग केलेले सोप्स होते विकायला, (पॅकिंग खरेच खूप मस्त होते, पॅकिंग पाहताच साबण विकत घ्यावासा वाटत होता)
आणि खाली टीप होती " हॉटेल गेस्ट च्या वापरातून उरलेले सोप रिसायकल करून या वड्या बनवण्यात आल्या आहेत, रिसायकलिंग करून गो ग्रीन होण्या करता आम्हाला मदत करा"

गो ग्रीन हा कितीही जिव्हाळ्याचा विषय असला तरी असा साबण घ्यायला चलबिचल झाली. पण घरी उरलेले तुकडे साठवून असे करून पाहायला हवे एकदा.

हो चॉकलेटचं चॉकलेट ही फेज माझी यशस्वी रीत्या पार पडली आहे. पण शेवटी तो एक फूड आयटेम पातेल्यात मेल्ट करणं आणि साबणाचे तुकडे घरच्या पातेल्यात मेल्ट करणं म्हणजे नॉर्मल गृहिणी ते फीबीचा भाऊ इतका फरक पडतो.

एका अमेरिकन माणसाने सर्व मोठ्या हॉटेल ने वापरलेले (1 दिवस राहणारा माणूस 1दा वापरलेला साबण) डिसकार्ड केलेले चांगले तुकडे विरघळून आफ्रिकेत वाटायला साबण बनवलेत
मी एरवी असा साबण वापरलाही असता(फ्रेंड्स मधलं वाक्य: 'सोप इज सोप.सोप इज सेल्फ क्लिनिंग'.आणि तो उकळला असेल असं मानून)
पण आता करोनाच्या काळात हिंमत होणार नाही.

एरवी असा साबण वापरलाही असता(फ्रेंड्स मधलं वाक्य: 'सोप इज सोप.सोप इज सेल्फ क्लिनिंग'.आणि तो उकळला असेल असं मानून)....पण जोई काय म्हणतो नंतर त्याने ईईई होते .
मुलीला मजा आली असेल ना...काही गोष्टी मजेसाठीच असतात Happy .

हेहेहे
तो प्रश्न आहेच
मला अगदी शून्यातून चांगला साबण बनवायचा आहे
मस्त एकदम होऊ दे खर्च करून केशर बिशर टाकून.

मगं माझ्यासारखे कीट घे ना... सोप मेकिंग किट...
सोपं आहे, आम्ही फूड कलर बाबत अती केलं नंतर.. ते सोडून it's perfectly usable.

छान जमलाय साबण.. लहानपणी जेव्हा कुठलंही इंटरनेट अव्हेलेबल नव्हतं तेव्हा लक्स ची जाहीरात बघून दूधात रूआब्जा घालून तो एका डब्यात ओतून, फ्रिजर मधे ठेऊन, त्याचा साबण म्हणून वापर करून घरी पाहुणा म्हणून आलेल्या छोट्या मावस भावाला आंघोळ घातल्याचं आठवतंय Lol

आपल्या विज्ञानाच्या पुस्तकात होता ना प्रयोग साबण तयार करण्याचा. आठवीच्या पुस्तकात बहुतेक. घरी नव्हता मी केला, पण शाळेत बाईंनी तयार करून दाखवला होता साबण असं आठवतंय.

मस्त लिहिलंय Lol

अंतिम फोटो (रंग बिघडलेल्या) पिस्ता बर्फीचा म्हणूनही खपेल Proud एक काजू घातलेली, एक केशर घातलेली आणि एक नुसतीच Light 1

सनव
फिबिचा भाऊ वाला पंच आताच वाचला
तो सगळ्या प्लास्टिक वस्तू आणि फोन विरघळवत असतो(फिबी घाबरून त्याच्या शेजारी आग विझवायचं नळकांडं ठेवते झोपताना तर तो त्याची पण नळी वितळवतो Happy )
साबण वितळवणे त्या लेव्हल चे सायको वाटणार नाही.तुम्ही लहानपणी संपलेल्या मेणबत्त्या वितळवून त्याची फुगा किंवा बल्ब आकाराची मेणबत्ती केली असेल किंवा काजूफळाची बी मेणबत्तीवर काडीला लावून भाजून त्यातला काजू खाल्ला असेल तर त्यापुढे साबण वितळवण्याचा गोंधळ अति फुटकळ वाटेल (काजूफळ वाला प्रयोग जाम स्फोटक ठरतो.जमिनीवर काळ्या काजूतेलाचे डाग पडतात. ते तेल उडून एकदा हाताला भाजतं. हे सर्व एका काजूसाठी केलेलं जो पालक बघतो तो स्वखुशीने पुढच्या वेळी 1 किलो आयते काजू आणून देतो.)

काजूची बी मेणबत्तीवर भाजणं हे डेंजर आहे.
चुल्यावर पत्र्याच्या उघड्या डब्यात किंवा घमेल्यात बिया भाजतानासुद्धा पुरेसं लांब उभं राहून लांब काठीने ढवळतात. तेल सुटतं त्या बियांना. एखादी बी फुटून उडते.
पण काय छान खरपूस वास दरवळतो...आहाहा!
हे अतिच अवांतर झालं Happy

घरी मायक्रोवेव्ह नवीन होता तेव्हा साबणाची संपत आलेली वडी त्यात ठेवून १० सेकंद फिरवली होती...
फुलून मस्त तिप्पट-चौपट आकाराची साबण-लाही झाली होती Lol
ते आठवलं वाचताना

(सकाळी प्रतिसादात हे लिहायचं राहिलं होतं Proud )

पण अश्या साबण पॉपकॉर्न चा उपयोग काय?
आमच्या कडे पण 5 मिनिट व्हिडीओ पाहून हा साबणलाही प्रयोग होणार होता.मी कडाडून विरोध केला.मग संत्र्याच्या सालाचे तुकडे चिरोट्या सारखे पाकात बुडवून साखरेत घोळवून वाळवून ऑरेंज कँडी चा प्रयोग झाला पिंटरेस्ट वरून.

https://thekidshouldseethis.com/post/debunking-fake-kitchen-hacks-bbc-click

यूट्यूब वरच्या हॅकस पाहुन गोष्टी करत असाल तर थोडी खबरदारी बाळगा, भरपूर व्युज असणारे व्हिडीओ देखील सपशेल खोट्या गोष्टी दाखवतात.

Pages