रेसीपी ऑफ ग्लास ट्रेसिंग ऊर्फ GT

Submitted by पाचपाटील on 25 June, 2020 - 16:11

(आणि हे अर्जुना, मी आता तुला आमच्याकाळचं हे
परमगुह्यज्ञान देतो आहे. )

** साहित्य: बल्ब,स्वीच,टेबल,एक्सटेंशन बोर्ड, जाडजूड पुस्तके, बर्‍यापैकी लांबरूंद अखंड अशी स्वच्छ ग्लास, दोन ड्रॉईंग शीट्स, पेन्सिल,स्केल आणि खोडरबर.

**कृती:
प्रथमतः पुस्तकांचे दोन सेट टेबलवर रचून ठेवावे.
त्यांच्यामध्ये बल्ब चालू करून ठेवावा.
मग त्या बल्बच्या वरती, थोडं अंतर राहील, अशा पद्धतीने ग्लास पुस्तकांवर रेस्ट करावी.
मग त्या ग्लासवर कुणीतरी कंप्लीट केलेली शीट अंथरून ठेवावी.
आणि त्या शीटवर आपली कोरी शीट ठेवावी.

दोन्ही शीट्सचे कोपरे तंतोतंत जुळवावे.
त्या शीट्स बरोब्बर एकाखाली एक येतील, अशा पद्धतीने, त्यांना पिन लावून फिट करून टाकावे.

**तत्व: ''बल्बचा उजेड ग्लासमधून आणि दोन्ही शीट्स मधून
आरपार ट्रान्समीट होतो'', ह्या फिजिक्सच्या प्रिन्सिपलचं practical application आता लगेच आपल्या डोळ्यांना दिसेल.

खालच्या कंप्लीट झालेल्या शीटवरचा सगळा कंटेंट, तुम्हाला कोर्‍या शीटवर आपोआप पाझरताना दिसायला लागेल.

मग वरून झुकून कोर्‍या शीटवर लक्षपूर्वक फोकस करावं.
पेन्सिल आणि स्केल घेऊन हळूहळू 'आपल्या कोर्‍या'
शीटवर खालच्या शीटवरच्या ड्रॉइंगच्या बरहुकूम गिरवायला
सुरुवात करावी.

कोर्‍या शीटच्या कुठल्याही एका कोपऱ्यापासून सुरुवात करून, हळूहळू खालची आख्खी शीट जशीच्या तशी कॉपी करावी.
बिल्डींग्जचे प्लान्स, इलेवेशन्स, सेक्शन्स, सगळे डाइमेन्शन्स, सिम्बॉल्स, अॅब्रीवेशन्स... सगळं तल्लीन होऊन कॉपी मारावं.
काही म्हणजे काही सोडू नये.

पण नंतर शीट्स बाजूला घेऊन आपल्या शीटवर 'स्वत:चंंच' नाव आणि रोल नंबर टाकावा..
कारण कधीकधी एखाद्या प्रतिभावंत कलावंताकडूनसुद्धा
तंद्रीमध्ये 'खालचंच' नाव गिरवलं जाण्याचा संभव असतो..!

अजून एक प्रीकॉशन म्हणजे, ट्रेसींग झाल्यावर आपल्या शीटच्या मागच्या बाजूला, काळसर अस्पष्ट असे पेन्सिलचे मार्कींग्ज उमटलेले असतात.
एखादा खवट एक्झामिनर तेवढ्यावरूनच ओळखून तुम्हाला हाकलून देऊ शकतो किंवा चारचौघांत पुरेशी आब्रू काढू शकतो.

म्हणून GT मारल्याचा तेवढा पुरावा न विसरता खोडरबरने नष्ट करून टाकावा.

आणि अशा खूप सार्‍या शीट्सच्या GT मारून, त्यांचं सुबक पंचिंग करून, आपण स्वत:च पूर्ण सेमिस्टरभर कंबरडं
मोडेपर्यंत मेहनत घेऊन काढलेल्या आहेत, अशा
आत्मविश्वासानं डुलत डुलत चेकींगला जावं.

**निष्कर्ष:

अशा रीतीने स्वत: ड्राफ्टर, ड्रॉईंग बोर्ड, रेफरन्सची
डिझाईनची पुस्तकं, सगळी calculations करून करून,
काढायला १५-२० दिवसही पुरले नसते..
त्या शीट्स‌ची भेंडोळी तुम्ही GT च्या मदतीनं अवघ्या
एक-दोन दिवसरात्रीत खतम करू शकता...

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहीलंय.
प्रचंड आवड असल्याने स्वतःच्या सगळ्या शीट्स स्वतःच बनवल्या, पण सबमिशनच्या डेड लाईन वेळी पब्लिक पॅनिक होत असताना स्वतःच्या शीट वरून मित्रांना GT करून दिल्याय.

वरून ते करताना
जाने वो कैसे लोग थे जिनके
शीट को ए ग्रेड मिला
हम ने ओ बस पासिंग मांगा
रिपीट का रिमार्क मिला

हम को अपना GT ग्लास भी
अक्सर फुटा मिला

वगैरे पीजे मारलेत.

शाळेतल्या मित्रांना fwd केली लिंक. प्रचंड आवडलंय. त्याची प्रतिक्रिया >" अरे आम्ही तर जीटी वरती पीएचडी केली आहे.
प्रिकॉशन म्हणून एक गोष्ट सांगायची राहिली त्या आर्टिकल मध्ये. जीटी झाल्यावर खालच्या शीट मध्ये जिथे जिथे कर्कटक ची भोक असतील त्या त्या ठिकाणी नवीन शीट मध्ये सुद्धा भोक करावेत.>>>> आणि म्हणाला जीटी म्हणजे जीव की प्राण

Pages