सहदेव आणि वचन - पंचम (अंतिम)

Submitted by अजय चव्हाण on 22 May, 2020 - 23:59

प्रथम : https://www.maayboli.com/node/71790

द्वितीय : https://www.maayboli.com/node/71846

तृतीय : https://www.maayboli.com/node/71949

चतुर्थ : https://www.maayboli.com/node/72343

लीकडे सूर्य मावळतीला आलेला. ऐरवी ह्या वेळी सुसाट असणारा वारा निष्प्राण असल्यासारखा दिशाहिन वाहत होता. त्या वार्यात उष्णता नव्हती की, आद्रताही नव्हती. होता केवळ कोरडेपणा. पृथ्वी स्वतःभोवती व सूर्याभोवती भिरते म्हणून दिशा अस्तित्वात आहे. खरंतरं माणसाचा प्रवास हा दिशाहिनच असतो. त्याला दिशा मिळते किंवा दिशाहिन होते ते केवळ नियतीमुळे आणि ह्या सृष्टीला निर्माणलेल्या विधात्यामुळेच.नियती आणि कर्मांपुढे कुणाचं काही चालत नाही. घडणारं हे घडतचं आणि आज विधीलिखित असलेलं घडलं. संकेत मिळूनही, भविष्य माहीत असूनही ते बदलता मात्र येत नाही. मनुष्याचा जन्म केवळ एकाच सूत्रांवर चालतं आणि ते फक्त आणि फक्त कर्म. मनुष्याचं कर्मच भाग्य आणि आयुष्य ठरवतं. पंडूचा असा शापित मृत्यू होणं हे त्याचं कर्म. कर्मातून भाग्य ठरतं. कदाचित काही कर्मांना वारसादेखिल असावा आणि म्हणूनच पंडूच कर्म आणि त्याचं फलित पंडूच्या वारसानांदेखिल लागू होणार होतं.

कुटीजवळच्या त्या अंगणात सदैव पडणारा प्रफुल्लित फुलांचा सडा आज कोमजलेला भासत होता. एकप्रकारची उदास शांतता वातावरणात अवतरली होती. पंडूच कलेवर अंगणात उत्तरेकडे मुख आणि दक्षिणेकडे पाय असं ठेवण्यात आलं होतं. उत्तर काय दक्षिण काय? आयुष्यभर माणूस दिशाहिनच असतो. आता कसला आलाय रिवाज आणि कसलं शास्त्र? ह्या जगात सगळी शास्त्र एकच सूत्र सांगतात आणि ते सूत्र म्हणजे जीवन आणि मृत्यू. ह्यादरम्यान घडत असलेल्या कालावधीला "जीवन" असं म्हणायचं. जग हे मिथ्या आणि ब्रम्ह सत्य हे माहीत असलं तरी एकदा ह्या भूतलावर जन्माला आलो की मनुष्य आपोआप त्यात गुरफटतो. मग त्याची आस लागून राहते. आप्त, पत्नी, पुत्र, गुरू, राज्य, प्रजा ह्या संसाररूपी मायाजालात जगणं हवहवसं वाटायला लागतं पण मनुष्य हा येताना एकटा येतो आणि जातानाही एकटाच जातो. जन्माला आलो की नाती चिकटतात आणि हीच नाती मग सुटतात.

पंडूचा चेहरा निश्चित भासत होता. मृत्यू कवटळताना सगळे भाव इथेच नामशेष होतात. मेलेल्या माणसाचा चेहरा थंड भासतो अगदी गाढ झोपेत असल्यासारखा. षडरिपूचा लवलेशही नसतो त्यात. खरंतरं मृत्यू हा शेवट नसून एक नवी सुरूवात असते. एका नव्या अजाण प्रवासाची सुरूवात पण अनामिक प्रवासापेक्षा परिचित प्रवास नेहमीच सुखाचा म्हणून तो मनुष्यासाठी शेवट.

डोक्याजवळ कुंती मुकपणाने आसवं गाळत होती तर माद्रीचा आक्रोश सार्या आसंमताचं काळीच हेलकावून सोडत होतं. ऐरवी धीट आणि संयम राखून असलेला युद्धिष्टर आज पुरता कोलमडल्यासारखा भासत होता. इतर पांडवांना काहीच सूचेनासं झालं होतं फक्त सहदेवाच्या मनात थोडीफार चलबिचल चालू होती. सहदेवाच्या मनात पित्याचे ते शब्द आणि वचन घोळत होतं.
कितीही विक्षिप्त, विचित्र आणि किळसंवाणं वाटलं तरी वचन आणि अंतिम इच्छाही पाळायलाच हवी. अर्जुन आणि भीम आजूबाजूच्या परिसरातल्या काही लोकांना निरोप धाडायला गेले होते. जेणेकरून खुद्द हस्तिनापूर, गोकुळ, मद्र, गांधार अशा इतर राज्यात तो निरोप पुढे पोहचेल. युद्धिष्टराने कुंती व माद्रिला सावरलं आणि पुढच्या रितीसाठी हळद, चंदन आणि इतर सुवासिक उटणं तयार करायला सांगितलं. राजाच तो. राजाला निरोप हा राजेशाही थाटातच द्यायला हवा. इकडे सहदेव आसपास कुणी नाही पाहून मृतदेहाजवळ आला आणि पित्याने सांगितल्याप्रमाणे मेंदूचे तीन भाग खाल्ले. पहिल्या भागातून संपूर्ण भूतकाळ ज्ञात झाला मग दुसर्या भागात वर्तमान आणि शेवटच्या तिसर्या भागात पूर्ण भविष्यकाळ.

अज्ञानात सुख असतं हे जे म्हणतात ते उगीच नाही. कधी कधी आपल्या कल्पनेपेक्षाही आयुष्य खुपच विचित्र असतं. नियती काय भोगायला लावेल हे सांगता येत नाही. क्षणात ते राजेसुख, क्षणात कपट, क्षणात लग्न, क्षणात अज्ञातवास आणि क्षणात विनाश. आयुष्याचं कालचक्र कसं, कुठे कधी फिरेल हे सांगता येत नाही. संयमित राहणं हे एकच आपल्या हातात असतं. काळ हळूहळू सरकत होता. सहदेवाची अवस्था फारच गंभीर झालेली. पुढे कृष्ण भेटला.

कृष्णाला सगळचं ज्ञात होतं. सहदेवाची अवस्थाही त्याला माहीत होती आणि पुढे नियती बदलणं हे जरी त्याच्या हाती असलं तरी ते तो करणार नव्हता किंवा इतर कुणालाही ते करू देणार नव्हता आणि म्हणूनच कृष्णाने सहदेवाकडे वचन मागितलं. जरी तुला सार्या गोष्टी माहीत असल्या तरी त्यात कोणताही हस्तक्षेप करणार नाहीस आणि कृष्णाने पुढे होणार्या महाभारताच प्रयोजन, आवश्यकता समजाऊन सांगितली. साक्षात भगवंताने सांगूनसुद्धा मनाचे शंभर भाग होऊन त्याचे शक्कले व्हावीत किंवा ह्रद्याला क्षणाक्षणाला काटे टोचावेत आणि साधं तोंडातून ऊं सुद्धा करू नये. ही कसली शिक्षा? हे कसलं आयुष्य? आता तडकं जावं आणि सांगावं सगळ्यांना असं कितीही वाटतं असलं तरी सहदेव वचनबद्ध होता आणि हे वचन आयुष्यभर पाळावं लागणारं होतं. महाभारतात इतरांची लढाई काही सोप्पी नव्हती पण सहदेवाची स्वतःच्याच मनाशी ही लढाई ही खुपच क्लेशकारक होती आणि हा क्लेश आयुष्यभर सोसावा लागणार होता. सगळं ज्ञात असूनही नियतीपुढे हतबल असणं काय असतं हे फक्त सहदेव आणि कृष्णच समजू शकतात पण हाच खरा धर्म आहे आणि हेच त्यांच्या आयुष्याचं प्रयोजन आहे.

समाप्त

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजयदा, मी ह्याबद्दल वाचलेल नाही याआधी. महाभारताची अशीही कथा(व्यथा) आहे.. हे माहितीच नव्हत. थँक्स! Happy

अवांतर :
माझी छोटीशी इच्छा, तुझ्याकडुन हे असच चित्रदर्शी लेखन आणखी वाचायला मिळुदेत. एकेक प्रसंग नजरेसमोर कॅनव्हास सारखा जिवंत उभा केला आहेस. असाच लिहीत रहा. Happy

धन्यवाद तायडे.. ही पूर्ण कथा तेलगू भाषेतल्या आख्येयिकेवर आधारीत आहे.. आता काल्पनिक आहे की, खरं ते माहीत नाही पण सहदेवाचा हा पैलू इतरांसमोर यायला हवा म्हणून हा प्रपंच.

बघू जमलं तर लिहेन नक्की...

आवडलं, ऐकून होते की सहदेवाचा अध्यात्मिक अधिकार फार मोठा होता. पण तुमच्या लेखांमुळे ते वाचायला मिळाले. सगळे भाग वाचले आहेत आणि सुरेख आहेत. मी आधी वाचनमात्र होते म्हणून प्रतिसाद दिला नाही.
लिहीत रहा Happy !

धन्यवाद अस्मिता.

धन्यवाद अज्ञातवासी,
धन्यवाद कटप्पा - महाभारतातल्या प्रत्येक पात्राचा वेगळा इतिहास आहे.. बाकी अर्जुन, कृष्ण, भीम, युद्धिष्टर ह्यांच्यावर जास्त फोकस असल्यामुळे ते अज्ञातच राहीले..