सहदेव आणि वचन

Submitted by अजय चव्हाण on 30 September, 2019 - 06:23

प्रथम:

दुरवर सातशृंगा पर्वताच्या रांगेतून हलकेच चंद्राच टपोर प्रतिबिंब दिसत होतं आणि त्याच आसपासच्या निबीड अरण्यात चंद्र आणि अवतीभोवतीच्या टिमटिमणार्या चांदण्याचाच काय तो प्रकाश.काळोख्या रात्री उंच आणि गर्दीगर्दीने वाढलेल्या देवदार वृक्षांच्या काही फांदाच्या फटीतून तो प्रकाश कसाबसा जमिनीवर पोहचू पाहत होता.दुरवरून पाहताना चंद्राची काही प्रकाशतिरीपे सुंदर चंदेरी भासत होती.मध्येच देवदार वृक्षाच्या काही फांद्यावर काजव्यांचे थवे पहुडलेले त्यामुळे अंधारात चमकणारा हिरवा प्रकाश आणि चांदण्याचा तो चंदेरी प्रकाश आणि ह्या हिरव्या-चंदेरी प्रकाशांच्या खेळामूळे अंधारातला तो निसर्ग खुपच सुंदर आणि मनमोहक भासत होता.

दुरवरून सहदेव ते मनमोहक दृश्य डोळ्यात साठवत होता आणि कुठल्यातरी विचारांत तो इतका मुग्ध झाला होता की, पाठीमागून भीमने आवाज दिला तरी तो त्याला ऐकू आला नाही. हाकेला ओ देत नाही पाहून भीम त्याच्याजवळ गेला व हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवत भीमने प्रश्न केला -

"सहदेवा इतका कशात गुंतला आहेस?"

भीमचा अचानक झालेला स्पर्श आणि मग प्रश्नाने सहदेव थोडासा गडबडला मग लगेच सावरत...

"भ्राताश्री काजव्यांना जसा स्वप्रकाश असतो तसा मानवाला का नाही?" असा प्रतिप्रश्न केला.

अचानक असा प्रश्न भीमला अपेक्षित नव्हता त्याने त्याच उत्तरीय सावरत नकारार्थी मान हलवली व हा प्रश्न तातश्री ना विचार हे सांगून हलकेच तिथून पळ काढला..

भीमच्या येण्याने त्याची विचारश्रृंखला काही वेळ खंडीत झाली व तो आपल्या कुटीच्या दिशेने जायला निघाला.

ओसरीवर पंडू आणि समोर त्याचे चार पुत्र मांडी खालून बसले होते.

सहदेवाला पाहताच नकुल हलक्या आवाजात कुरकुरला -

" तु नेहमीच कसा रे हरवतोस आणि ते ही बरोबर तातश्री गोष्टी सांगण्याच्या वेळेला..ये बस लवकर इथे...तुझ्यामुळे असं थांबाव लागतं आम्हाला."

नकुल-सहदेव एकमेकांना अरे तुरेच करायचे.. सारखंचं तर वय होतं त्यांच..

सहदेव बसला तसा पंडूने काल जिथे गोष्ट संपली होती तिथून सांगायला सुरूवात केली....


"तु मलिन,कुटिल,नीरस जडहि पुर्णभवपणेही कचसाचं"

कच हा शुक्राचार्यांचा अत्यंत लाडका शिष्य होता आणि देवयानीलाही तो प्रिय होता आणि त्यामुळेच तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे असूरांना तो अप्रिय होता आणि कारण कच हा सुर म्हणजेच देव होता आणि मृत्यू संजीवनी विद्या मंत्र मिळवणं हा एकच हेतू ठेऊन तो शुक्राचार्यांचा शिष्य झालेला आणि हे असूरांना चांगलचं माहीत होतं.

त्याची दोनदा हत्याही करण्यात आली पण शुक्राचार्यांनी मृत्यू संजीवनी मंत्राने त्याला पुन्हा जिवित केलं पण पुन्हा जिवित करण्यासाठी त्यांना मयत कचाचे काही अवशेष लागत हेच हेरून असूरांनी त्याला दुर नेऊन जाळून टाकले आणि त्याची राख एका मद्यात घोळवून खुद्द शुक्राचार्यानाच ते मद्य प्यायला दिलं.

शुक्राचार्यांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यानी पोटातच कचाला तो मंत्र शिकवला आणि अशाप्रकारे कचाने तो मंत्र मिळवला पण जेव्हा आश्रमातून निरोप घेताना देवयानीने कचाला विवाहासाठी विचारले असता कच म्हणला -

" हे देवी क्षमा असावी.मी तुझ्याच पिताश्रीच्या पोटातून आता पुन्हा जिवित झालो आहे..ह्याचा अर्थ असा आहे आता आपण भाऊ-बहीण आहोत आणि धर्मानुसार भाऊ बहीणीला वरू शकत नाही"

कचाचे हे उत्तर ऐकून देवयानी संतापल्या आणि त्यांनी रागाच्या भरात कचाला -

"तु मलिन,कुटिल,नीरस जडहि पुर्णभवपणेही कचसाचं"

हे शब्द उच्चारले आणि वर ऐनवेळी तुला मंत्र आठवणार नाही हा शापही दिला.

ह्याच शुक्राचार्य कन्या देवयानीशी आपले पूर्वज ययाती ह्यांनी
लग्न केलं आणि देवयानी महाराणी झाल्या.

इतकं सांगून पंडूने दिर्घ श्वास घेतला व स्वतःशीच विचार करत मनातल्या मनात पुटपुटला..

"पुरूने ययातीला तारूण्य बहाल केले आणि त्यांची शापातून सुटका झाली...पण माझे काय? माझी सुटका म्हणजे मृत्यूच."

"तातश्री पुढे काय झाले मग?"

अर्जुनाच्या प्रश्नावर पंडू भानावर आला.

"गोष्ट संपली...आता उद्या दुसरी गोष्ट.."

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे, छान आहे गोष्ट. क्रमशः मुळे उत्सुकता वाढली. मला पौराणीक, धार्मिक, रहस्यमय सगळ्याच कथा आवडतात. त्यामुळे लहानपणी आत्याने भरपूर पुस्तके भेट स्वरुपात वाचायला दिली होती. अजून येऊ द्या, वाट पहात आहे.

छान...
लिहिताना पूर्ण विरामानंतर एक स्पेस देत जा...

प्रतिसादाबद्दल धन्यवाद राजेशजी, मंजूताई

@गणेश: तु मळलेला, कुटील म्हणजे कुटनीती वापरणारा, रस नसलेला,
आणि केसांसारखाच पुन्हा पुन्हा उगवणारा...