सहदेव आणि वचन - तृतीय

Submitted by अजय चव्हाण on 12 October, 2019 - 02:21

संध्याकाळची कातरवेळ. नदीकिनारी अस्ताला चाललेला सूर्य.
सूर्याने जाता जाता बहुतेक ह्या सृष्टीला आपला रंग बहाल केलेला.
आणि त्यामूळेच आसंमत केशरी-लाल रंगाने माखलेल. त्यात पांढर्या वकःपक्षांची सुरेख माळ पुढे पुढे सरकतेय.नदीचा खळखळाट आणि वार्याच्या मंद संगिताने सुरेख मैफल निर्माण होतेय. दुपारच्या उन्हाने तप्त झालेली सोनेरी वाळू हळूहळू सोनेरी रंग सोडून सुंदर फिक्कट केशरी भासतेय आणि संध्याकाळची शितलता आता तिच्यात अवतरतेय. अशाच शितल वाळूवर कोमल पाऊलाचे ठसे उमटतायेत. दुरवर ते ठसे कमळफूलांचा आकार व्हावा तसे भासतायेत. असेच कमळफूलांचे अलगद ठसे उमटवत माद्री काखेत पाण्याचा घडा घेऊन लयबद्ध हळूच चालत येतेय. तिचा धवल पदर वार्याने सैरवैर होतोय. तिची मूळ असलेली गौर कांती संधीप्रकाशाने काहीशी सोनेरी जाणवतेय. चालताना होणार्या अलवार हालचालीने घड्यातले पाणी हळूच उसळी मारून तिच्या अंगावर सांडतय आणि त्यामूळे भिजलेली तिची धवल साडी आता थोडीशी पारदर्शक होऊन तिच्या मादक शरीरावर घट्ट चिकटू पाहतेय. अशात कुठलीही स्त्री सुंदर दिसली नाही तर नवलचं!

थोड्याशा अंतरावरून पंडू तिची आकृती हळूच पाहतोय.
तिची सुंदरता..तिचं चालणं..तिचं नाजूक हसणं..तिचं सावरणं आणि घडा आणि पदर दोन्ही सावरताना तिची होणारी तारांबळ..
खुपच मोहक आहे सारं. अगदी मनाला आव्हान देणारं..मोहात पाडणारं..सारं काही विसरून तिला मिठीत घ्यावं. ही वेळ आणि ही लोभसं क्षणे पुन्हा येणे नाही. जगाचा विसर पडावा आणि फक्त मी आणि ती...पंडूच्या मनातले विचार भात्यातून सुटलेल्या बाणासारखे एकामागून एक त्याला घायाळ करू पाहतायेत नव्हे तो केव्हाच घायाळ झालाय. त्याच उत्तरीय केव्हाच वार्याने उडून गेलयं आणि त्याचबरोबर संयम आणि मनाचा विवेकदेखिल...

एव्हाना माद्री जवळ आलीय. दुरवरून सुंदर भासणारी माद्री जवळ आल्यावर आणखीनच सुंदर भासतेय. पंडूची उघडी आकृती आणि डोळ्यांतले भाव खुप काही सांगून गेले तिला.
काखेतला घडा निसटला..अगदी राखलेला संयम निसटावा ना अगदी तसाच..जमिनीवर फुटून त्याचे तुकडे इतरस्तः विखुरले आणि पाण्याचे ओघळ जमिनीवर दिशाहिन वाहतायेत जणू काही ते ओघळ नसून तिचा संसार आहे जो आता क्षणात दिशाहिन वाहणार आहे ह्या ओघळसारखाच...इतका वेळ तिच्या चेहर्यावर तग धरून असलेल्या शांत भावांची जागा आता भितीच्या सावटाने घेतलीय..

ती काही बोलणार इतक्यात...

"माद्री...प्राणप्रिये ..माझी सखी.." पंडूच्या ओठातून निश्वासातले शब्द उमटले..

माद्री दुर जाण्याच्या बेतात असतानाच अवचितपणे पंडूने तिला जवळ ओढले. तिच्या कपाळावर चुंबनाचा वर्षाव होऊ लागलेला.
आवेशात पंडूने तिला छातीशी कवटाळले. घट्ट मिठ्ठी मारत असतानाच त्याच्या छातीत कळ उमटली आणि त्याला किंदम ॠषीचा शाप आठवला..

सगळचं त्याच्या डोळ्यासमोरून धुसरं धुसरं होत गेलं..कुठल्यातरी गडद काळेशार विवरात पडत असल्याचा त्याला जाणवलं..मिठ्ठीत असलेली माद्री त्याला आता दिसत नव्हती. दिसत होता फक्त फुत्करात असलेला काळा मोठा नाग.. त्याच्या डोळ्यात आग होती..त्याची कोपर्याएवढी लवचिक जीभ तलवारीच्या पात्यासारखी भासत होती. क्षणात त्याने आवासला. पंडूला गिळकृंत करणार इतक्यात पंडू झोपेतून खडबडून जागा झाला..

कपाळावरचा घाम पुसत तो उठला. घड्यातले गार पाणी प्यायलावर त्याला कुठे जरा बरे वाटले. दुर झोपेत असलेल्या आपल्या पाचही पुत्रांना त्याने डोळे भरून पाहीले. आज ना उद्या हे कटू सत्य त्यांना कळलेच तेव्हा त्यांना आपल्या पित्याबद्दल काय वाटेल? आपण ह्या जगात नसू तेव्हा त्यांच पालनपोषण कसं होईल? असे अनेक विचार पंडूच्या मनात पिंगा घालत होते.

क्षणात मनातले सगळे विचार त्याने झटकले. उद्या गोष्ट सांगताना त्यांना हे कटू सत्य सांगितलचं पाहीजे असा स्वतःशीच त्याने निर्धार केला.

क्रमश::

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त रे .
हे वाचायच कसा काय मीस झाल माहित नाही.
मागचे भाग वाचुन काढते आधी.