कैरी रोल

Submitted by अनामिका. on 12 May, 2020 - 13:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

कैर्‍या - १ किलो
साखर - ३०० ग्रॅम
निवडलेला पुदिना - अर्धी वाटी
साधं मीठ - १ लहान चमचा
काळं मीठ - चवीपुरते
तुप - ताटाला लावण्यासाठी
खाण्याचा हिरवा रंग - ३-४ थेंब

कढई
उलथणे
मध्यम आकाराचे ताट
मिक्सरचे मोठे भांडे , मिक्सर
कुकर

क्रमवार पाककृती: 

१. प्रथम कैर्‍या धुवून पुसून घ्याव्या.
२. कैर्‍यांची सालं काढून चौकोनी फोडी तयार कराव्यात. त्या फोडींमध्ये थोडे पाणी घालून कुकरला ३ शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे.
फोडी मऊ शिजतील असे पहावे.
३. पुदिन्याची पाने थोडे मीठ घालून मिक्सरवर बारीक वाटावे.
४. वाटलेला पुदिना, साखर , खाण्याचा रंग व मीठ शिजवलेल्या कैरीत मिसळून लगदा तयार करावा. असा लगदा तयार करण्यासाठी मी हँड ब्लेंडरचा वापर केला.
५. तयार लगदा पुरणाच्या जाळीतून गाळून घ्यावा जेणेकरुन कैरीच्या शिरा वेगळ्या होतील.
६. त्यानंतर गाळून घेतलेला लगदा ३-४ मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यावा.
७. एका मध्यम आकाराच्या ताटाला तूप लावून त्यात शिजवलेला गोळा टाकावा व मिश्रण ताटात पसरवावे.
मिश्रणाचा पातळ लेयर येण्यासाठी पसरवण्याची क्रिया भरभर होणे आवश्यक आहे.
८. हे ताट दिवसभर उन्हात सुकण्यासाठी ठेवावे.
सुकल्यानंतर लांब पट्ट्या कापून रोल तयार करावेत.

वाढणी/प्रमाण: 
५ रोल
अधिक टिपा: 

१. साखरेचे प्रमाण चव, पथ्य व आवडीनुसार वाढवू शकता.
२. ताटात मिश्रण थोडे जाडसर पसरवले तर जेलीसारख्या वड्याही छान लागतात.
३. साखरेऐवजी गुळ चालणार नाही.
४. पाककृतीत मिश्रण सुकवण्याचा वेळ धरलेला नाही.
५. हे रोल यावर्षी पहिल्यांदा केलेत. परंंतु हवाबंद डब्यात घालून डीप फ्रिजमध्ये ठेवले तर ६ महीने नक्की टिकतील.

माहितीचा स्रोत: 
प्रिय मम्मी (साबा)
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद अनामिका. करून बघेन की नाही माहित नाही पण फोटो एकदम तोंपासु होता. बनाना केक आणि मफिनची रेसिपी द्या प्लीज. ते नक्की करून बघेन. चॉकोलेट आईस्क्रीम आणि कॉफी वॉलनट आईस्क्रिम पण थोडक्यात इथेच सांगितले तरी चालेल.

कल्पना खूप आवडली. मागे दिनेशदा आले होते तेव्हा त्यांनी असले रोल्स आणले होते. तुमचे फोटो पाहून त्याचीच आठवण झाली होती.

ताटलीत थापताना थोडे जाड असले तरी नंतर वाळून पातळ होणार ना? मी जे खाल्ले व तुमच्या फोटोत दिसले ते अतिशय पातळ होते, हाताने थापून इतके पातळ करणे जरा कठीण वाटतेय.

मस्त लागत असतील ना?
मी तर करणार नाही पण ह्यात आलं टाकून कैरी रोल्स करून दिले तर एका फटक्यात संपवून मी.

मायबोलीवर, बरेच जण कलाकार आहेत हे खाउगल्ली मेनू पाहून कळले आणि सर्व नवे आयडी नव्या कल्पना घेवून करताहेत, तोच तोच पणा नाहीये.

असे फ्रूट रोल्स अमेरीकेत मिळायचे. मी व माझी मुलगी ते आंबट-चिंबट चेरी, स्टाबेरी, अननस रोल्स एका झटक्यात संपवून टाकायचो. कमालीची साखर्बसते त्यात... आता नाही खाउ शकत.