थांबेल भळभळ कधीतरी

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 12 May, 2020 - 03:03

थांबेल भळभळ कधीतरी
- महेश मोरे (स्वच्छंदी),सातारा
8554085101

जखमा जुन्या भरतील अन् थांबेल भळभळ कधीतरी
बस् याचसाठी सोसतो.. संपेल ही कळ कधीतरी

थांबेल श्वासांची तलफ अन् एक वळवळ कधीतरी
त्याच्या जरा आधी गडे! तू ये मला छळ कधीतरी

छातीत खंजिर खोच तू अन् सांग बस् एवढे मला
पाठीवरी उठलेत ते मुजतील का वळ कधीतरी ?

तू दे कळीला जेवढी आहे हवी ती उसंत बस्
उमलेल फुल काट्यात अन् पसरेल दरवळ कधीतरी

इतक्याचसाठी लावले दारास अडसर खरेखुरे
ठरवून माझ्याही घरी येईल वादळ कधीतरी

दुनिया जशी हसली मला गेलीस तूही हसून पण
लागेल विरहाची तुझ्या हृदयासही झळ कधीतरी

डोहाप्रमाणे हा उभा आहे तुझ्या मी घरापुढे
बस् एकदा उतरून ये..भर एक ओंजळ कधीतरी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users