अत्तर - २

Submitted by धनश्री- on 9 May, 2020 - 04:33

अत्तर - १

मात्र एकदा एका पुरुषाचे लक्ष तिच्याकडे गेले. व एका कोपर्यात बसलेल्या तिच्या निकट जाऊन त्याने तिच्याशी ओळख करायच्या मिषाने हात पुढे केला. इतकी वर्षे मधुराचा विश्वास होता की आपला प्रियकर जेव्हा आपल्या समोर येइल तेव्हा आपल्याला काहीतरी अंतःप्रेरणेने कळेल की हाच तो. या तरुणाबाबत तर तसे काहीच झाले नाही तेव्हा बेसावध, आनंदी निश्चिंतीने तिनेही हात पुढे करुन हस्तांदोलन केले. इतकी वर्षे गेली कित्येक स्त्री-पुरुष आले गेले, हासुद्धा त्यातलाच एक होता की. तेव्हा मैत्री करण्यात एवढा विचार तो काय करायचा. एक नवीन मानवी-स्वभाव जवळून पहाण्याची सुसंधी. रोजच्या चाकोरीबद्ध आयुष्यातील एक परिचित. त्या च्या हस्तस्पर्शाने कादंबरीत लिहीतात तसा काटा वगैरे तिच्या शरीरावरती फुलला नाही. पण तिचे मन नकळत खूण करुन गेले की त्याची पकड आश्वासक आणि हवी तितकी कणखर आहे. त्याला तिच्या हस्तांदोलनाबद्दल काय वाटले हे कळण्याचा ना मार्ग होता ना तिला ते जाणून घेण्याची निकड भासली. हळूहळू प्रत्येक शुक्रवारी दोघे या पबमध्ये एकाच वेळी, येउन गप्पा मारू लागले. गर्दीतून वेगळे बसून गप्पा मारताना किती विषय होते त्याच्याकडे बोलण्यासारखे, किती कुतूहल होते त्याला तिच्याबद्दल. स्त्रियांना स्वतःबदल बरेच काही बोलायचे असते, हे जाणून होता की काय तो? कारण प्रत्येक भेटीतील ६५% वेळ ती बोलत असे व तो ऐकत असे. तो अतिशय चांगला श्रोता होता. बरे असेही नाही की तो ढोंग करत असे, तो खरच तिला जाणून घेण्याचा प्रयत्न करे. एखाद्या व्यक्तीला मनोमन जाणून घेणे म्हणजे अलगद, त्या व्यक्तीच्याही परवानगीने तिला विवस्त्र करणे असते की काय? त्याने तिच्या मनावरील एकेक आवरण दूर करणे असे तिचे अंतरंग जाणून घेणे बरे का वाटावे तिला? आणि तसे मनाने विवस्त्र होण्यातही आपल्याला आनंद का वाटावा, याचा मधुरा विचार करत असे. कदाचित त्याने तिला दिलेले एकाग्र अवधान हा जादूचा भाग असेल.
My hands
open the curtains of your being
clothe you in a further nudity
uncover the bodies of your body
My hands
invent another body for your body
- Octavio Paz

प्रत्येक नात्यातील सूक्ष्म मनोव्यापार ताबडतोब त्याच क्षणी जाणून घेता येतात असे काही नसते. ना तसा अट्टाहास करणार्यातील ती होती. ती फक्त त्याचे अवधान समरसून आकंठ उपभोगत होती. हा साधासा आनंद घेण्याने, देण्याने असे मोठे काय बिघडणार होते? ती थोडीच त्याच्याबरोबर एकांतात जात होती की तिने घाबरावे. ती तर गर्दीत होती, पबच्या ऊबदार, आनंदी गर्दीत आणि तो होता गर्दीतला एक चेहरा. तसाही प्रेम शोधण्याचा तिचा उत्साह मावळतच चालला होता. त्यामुळे एखाद्या शोडष वर्षीय तरुणीप्रमाणे, बावरण्याचे काही प्रयोजन नव्हते. She was in control. तिचे परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण होते.

अत्तर - ३

Group content visibility: 
Use group defaults